![]()
पाचोरा – शहरासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी म्हणजे चंद्रकांत नारायण पाटील यांची नुकतीच सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१), वस्तू व सेवा कर कार्यालय, धुळे जिल्हा या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे. कठोर परिश्रम, प्रामाणिक कार्यशैली, सातत्यपूर्ण अभ्यास, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षमय जीवनप्रवासाच्या बळावर त्यांनी हे मानाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चंद्रकांत पाटील हे स्व. डॉ. नारायण दत्तू पाटील यांचे चिरंजीव असून अनिल नारायण पाटील व शरद नारायण पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. लहानपणापासूनच अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रिय स्वभाव आणि ध्येय गाठण्याची जिद्द ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख राहिली आहे. जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, परंतु प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर यशाचा मार्ग स्वतः घडवला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पाचोरा येथील श्री सु. भा. पाटील प्राथ विद्यामंदिर येथे झाले. त्यानंतर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण श्री. गो. से. हायस्कूल आणि श्री.एम. एम. कॉलेज येथे पूर्ण झाले. विद्यार्थी जीवनातच त्यांनी अभ्यासासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव जोपासली. याच गुणांच्या जोरावर त्यांनी शासकीय सेवेत उल्लेखनीय वाटचाल केली. सन १९९४ मध्ये मुंबई येथे लिपिक पदावर त्यांची नियुक्ती झाली. आपल्या कार्यक्षमतेच्या आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर त्यांनी प्रत्येक पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावली. सन २००७ मध्ये राज्य कर निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांची बदली जळगाव येथे झाली. पुढे सन २०१४ मध्ये राज्य कर अधिकारी (वर्ग-२) या पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. प्रशासकीय कौशल्य, नियमांची सखोल जाण, निर्णयक्षमता आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्यांनी वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. या यशस्वी प्रवासाचे फलित म्हणजे आज त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१) या प्रतिष्ठेच्या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या यशामागे एका संघर्षशील आईचे त्यागमय जीवन दडलेले आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या मातोश्री स्व. उशाबाई पाटील यांनी परधाडे येथे स्वतः शेतात राबून, कष्टाची पर्वा न करता मुलांचे संगोपन केले. शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यांच्या त्याग, जिद्द आणि संस्कारांच्या बळावर तिन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रात वरिष्ठ पदांवर यशस्वीपणे कार्य करण्याचा मान मिळवला. हा प्रवास प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे.
चंद्रकांत पाटील हे सु. भा. पाटील प्राथ.विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक सीताराम पाटील सर ( पुनगाव )यांचे द्वितीय जावई असून, प्रसिद्ध स्तंभलेखिका व प्रभावी सूत्रसंचालक वैशाली पाटील यांचे पती आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे जाणवतो.
महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर कार्यरत असूनही त्यांनी कधीही पदाचा गर्व बाळगला नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन नियमांच्या चौकटीत राहून योग्य मार्गदर्शन करणे, प्रत्येकाशी सन्मानाने वागणे आणि सेवाभाव जपणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. आर्थिक बाबतीत कोणालाही वेठीस धरणे किंवा पदाचा गैरवापर करणे, या गोष्टींना त्यांनी आपल्या सेवाकाळात कधीही स्थान दिले नाही. स्वतः आणि परिवाराने अनुभवलेल्या संघर्षाची जाणीव आणि भूतकाळातील कठीण परिस्थितीची आठवण यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, नम्रता आणि प्रामाणिकपणा कायम राहिला.
आज त्यांची पदोन्नती ही केवळ एका अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील टप्पा नसून, संघर्षातून उभ्या राहिलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाच्या यशाचा गौरव आहे. सचोटी, सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी या मूल्यांवर उभी असलेली त्यांची वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
“झुंज” वृत्तपत्र व “ध्येय न्यूज”चे संपादक संदीप महाजन तसेच महाजन परिवारातर्फे चंद्रकांत नारायण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीस उत्तरोत्तर यश लाभावे, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या माध्यमातून अधिकाधिक उल्लेखनीय कार्य त्यांच्या हातून घडत राहो, अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.





























