Home Dhyeya News Special नगरदेवळ्यात शहीद भैय्यासाहेब बागुल स्मारकाच्या उभारणीला प्रारंभ; वीर माती संकलन सोहळ्यात देशभक्तीचा...

नगरदेवळ्यात शहीद भैय्यासाहेब बागुल स्मारकाच्या उभारणीला प्रारंभ; वीर माती संकलन सोहळ्यात देशभक्तीचा अविस्मरणीय आविष्कार

0
243

Loading

पाचोरा : देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य केवळ इतिहासाच्या पानांमध्ये मर्यादित न राहता भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ ठरावा, या उद्देशाने राज्य शासनाने जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक स्मारकासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर (आप्पा) पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी मिळाली. याच उपक्रमांतर्गत नगरदेवळा बु. येथे देशासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवान शहीद सैनिक भैय्यासाहेब रोहीदास बागुल यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासह ‘वीर माती संकलन’ सोहळा अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगरदेवळा बु. ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक, प्रशासनातील अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद जवानाच्या स्मृतीस्थळावरील पवित्र माती त्याच दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक असल्याची माहिती समोर आल्यानंतर वेळेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार विजयजी बनसोडे यांनी कोणताही विलंब न करता स्वतः पुढाकार घेत ही जबाबदारी स्वीकारली. कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय प्रोटोकॉल, औपचारिकता किंवा पदाचा आव न आणता त्यांनी स्वतः ती वीर माती जळगाव येथील सैनिक कल्याण कार्यालयात जमा केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाखविलेली ही संवेदनशीलता, कर्तव्यदक्षता आणि देशभक्तीची भावना उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. सैनिक कल्याण कार्यालयातही त्यांच्या या कृतीचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना तहसीलदार विजयजी बनसोडे म्हणाले की, शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या बलिदानाला २६ वर्षे पूर्ण झाली असली तरी नगरदेवळा गावाने त्यांच्या स्मृती आजही जिवंत ठेवल्या आहेत. गावातील प्रत्येक नागरिक, ग्रामपंचायत तसेच आजी-माजी सैनिकांनी त्यांच्या त्यागाचा सन्मान ज्या आत्मीयतेने जपला आहे, तो संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणारा आहे. देशाच्या सीमेवर सैनिक आपल्या प्राणांची पर्वा न करता राष्ट्ररक्षण करतात, म्हणूनच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो. त्यामुळे त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा सर्वोच्च सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडचणी, प्रशासकीय प्रश्न आणि प्रलंबित बाबी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. आजी-माजी सैनिक संघाचे प्रमुख ऑनररी कॅप्टन ज्ञानेश्वर महाजन यांनी आपल्या मनोगतात शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या अद्वितीय शौर्याची आठवण करून देताना सांगितले की, देशरक्षणासाठी शत्रूशी लढताना त्यांनी आपल्या अंगावर तब्बल ३० गोळ्या झेलल्या आणि मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आजही नगरदेवळा गावातील युवकांच्या मनात देशसेवेची ज्योत तेवत असून शेकडो तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारत आहेत. हेच त्यांच्या बलिदानाचे खरे यश आणि त्यांना वाहिलेली सर्वोच्च आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला शहीद जवानाच्या वीरमाता तुळसाबाई रोहीदास बागुल यांची भावपूर्ण उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिकच भावुक झाले. माजी सैनिकांनी शहीद जवानास मानवंदना अर्पण केली, तर त्यांच्या वतीने तहसीलदार विजयजी बनसोडे यांचा नागरी सत्कार करून त्यांच्या संवेदनशील कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सरपंच किरण काटकर, मंडळ अधिकारी राहुल पवार, ग्राम महसूल अधिकारी तात्याराव सपकाळ, ग्राम महसूल अधिकारी बबन मंडले, ग्राम महसूल अधिकारी उमेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरदेवळ्यात उभारले जाणारे हे शहीद स्मारक केवळ एका वीर जवानाच्या स्मृती जपणारे ठिकाण न राहता भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्ती, शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागवणारे पवित्र स्मृतिस्थळ ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!