Home Dhyeya News Special पाचोरा न पा चे पाच दिवसांपासून कचऱ्याचे ट्रॅक्टर ट्रॉली जैसे थे; भंगार...

पाचोरा न पा चे पाच दिवसांपासून कचऱ्याचे ट्रॅक्टर ट्रॉली जैसे थे; भंगार घंटागाड्यां सुद्धा पडुन आहेत

0
88

Loading

पाचोरा : शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या पाण्याच्या टाकीजवळ गेल्या तब्बल पाच दिवसांपासून कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली उभे असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पावसामुळे ट्रॅक्टर ट्रॉली मधील ओला कचरा कुजत असल्याने परिसरातील परिस्थिती अधिकच त्रासदायक झाली आहे. याच ठिकाणी नगरपरिषदेच्या काही घंटागाड्या भंगार अवस्थेत उभ्या असून, या वाहनांच्या विल्हेवाटीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून कचरा वाहून नेणारे ट्रॅक्टर विना ट्रॉली जुन्या पाण्याच्या टाकीजवळ उभे असुन पावसाचे पाणी कचऱ्यात मिसळल्याने कचरा सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ओला कचरा दीर्घकाळ साचून राहिल्यास दुर्गंधीबरोबरच माशा, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रश्न केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. कचरा वाहून नेणारे वाहनच पाच दिवस एकाच ठिकाणी उभे राहून त्यातील कचरा कुजत असेल, तर शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
दरम्यान, याच परिसरात नगरपरिषदेच्या काही घंटागाड्या दीर्घकाळापासून भंगार अवस्थेत उभ्या असल्याचेही निदर्शनास येत आहे. वापरात नसलेल्या या वाहनांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्यांची नियमानुसार विल्हेवाट अथवा लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहनांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होत राहिल्यास त्यातील सुटे भाग खराब होणे किंवा चोरीला जाणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर वाहनांची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासकीय अथवा नगरपरिषदेच्या मालकीची वापरात नसलेली वाहने वर्षानुवर्षे अशाच पद्धतीने पडून राहण्यापेक्षा त्यांची नियमानुसार तपासणी करून आवश्यक असल्यास निर्लेखन व लिलावाची प्रक्रिया तातडीने राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे एकीकडे अनावश्यकपणे जागा व्यापून राहणारा भंगार दूर होईल, तर दुसरीकडे प्रशासनाला त्यातून नियमानुसार उत्पन्नही मिळू शकते.
या संपूर्ण परिस्थितीची पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पाहणी करून कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर तेथून हलवावे, कचऱ्याची दररोज योग्य विल्हेवाट लावावी, परिसराची स्वच्छता व आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. तसेच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ भंगार अवस्थेत उभ्या असलेल्या नगरपरिषदेच्या घंटागाड्यांची यादी तयार करून त्यांची नियमानुसार विक्री अथवा लिलाव प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी ‘झुंज’ साप्ताहिक व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!