मेष आजचा दिवस कामात स्थिरता देईल. आर्थिक बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी विचार आवश्यक. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. शुभ अंक: १ शुभ रंग: लाल
वृषभ घरगुती खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे. एखादा जुना मित्र मदतीला येईल. बोलताना संयम ठेवा. शुभ अंक: ६ शुभ रंग: हिरवा
मिथुन तुमच्या कल्पकतेला दाद मिळेल. नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस. जवळच्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळेल. शुभ अंक: ३ शुभ रंग: पांढरा
कर्क भावनांच्या आहारी जाऊ नका. मनात अस्वस्थता जाणवू शकते. गरज असल्यास थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. शुभ अंक: ५ शुभ रंग: निळसर
सिंह सामाजिक वर्तुळात मान वाढेल. व्यवसायात नव्या वाटा खुल्या होतील. वरिष्ठांचे कौतुक मिळेल. शुभ अंक: ९ शुभ रंग: सोनेरी पिवळा
कन्या कामात अचूकता ठेवल्यास यश नक्की. जुने काम पूर्ण करण्याची संधी. घरच्या वातावरणात समजूतदारपणा ठेवा. शुभ अंक: ४ शुभ रंग: गडद तपकिरी
तुळ संपर्कातून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. मैत्रीमध्ये विश्वास वाढेल. शुभ अंक: २ शुभ रंग: जांभळा
वृश्चिक एखादी महत्त्वाची गोष्ट उलगडण्याचा दिवस. मन प्रसन्न राहील. आरोग्य उत्तम राहील. शुभ अंक: ८ शुभ रंग: गडद निळा
धनु दुसऱ्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. अचानक खर्च टाळा. शुभ अंक: ५ शुभ रंग: पिवळसर नारिंगी
मकर दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो. संयम ठेवल्यास लाभ होईल. कुटुंबातील मतभेद मिटतील. शुभ अंक: ७ शुभ रंग: राखाडी
कुंभ आज मन प्रसन्न राहील. जुनी योजना कार्यान्वित होण्याची शक्यता. नवे नाते जुळू शकते. शुभ अंक: ६ शुभ रंग: आसमानी निळा
मीन स्वतःला वेळ देण्याचा दिवस. कला, लेखन, अध्यात्मात रस वाढेल. शांत वातावरणात कार्य यशस्वी होईल. शुभ अंक: ३ शुभ रंग: फिकट गुलाबी
भुसावळ : समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीला अलीकडेच एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मिळाली असून, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसो गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून समाजकार्यासाठी पन्नास हजार एकशे रुपयांची (₹51000) रोख स्वरूपात मदत करण्यात आली. या उदार मदतीमुळे समाजातील विविध उपक्रमांना चालना मिळणार असून, भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीने मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. नवलसिंग पाटील यांनी नुकतीच भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीला सदिच्छा भेट दिली. समाजातील चालू घडामोडी, गरजा आणि उपक्रमांची माहिती घेत असताना त्यांनी समाजाच्या एकात्मतेचे व संघटनशक्तीचे कौतुक केले. याच दरम्यान त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने समाजकार्याच्या सहाय्यर्थ 51000 रुपये रोख रक्कम समाज समितीकडे सुपूर्त केली. या योगदानामुळे समाज समितीने त्यांचा औपचारिक सत्कार केला आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या सेवेसाठी मिळालेली ही रक्कम विविध उपक्रमांसाठी उपयोगात आणली जाणार आहे. त्यामध्ये गरजूंना शैक्षणिक मदत, समाजभवन दुरुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, आरोग्य शिबिरे, वृद्धांसाठी सहाय्य अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. भुसावळ दोडे गुर्जर समाज समितीने यापूर्वीही सामाजिक विकासासाठी कार्यरत राहून अनेक उपक्रम राबवले आहेत, मात्र आर्थिक अभावामुळे काही गोष्टींना मर्यादा येत होती. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मिळालेली ही मदत समाजासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. या भेटीवेळी भुसावळ दोडे गुर्जर समाज मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. सुर्यभान पाटील, डॉ. कैलास पाटील, हरिचंद्र पाटील, धनराज पाटील, महेंद्र पाटील, विलास पाटील सर, उमाकांत पाटील, दिपक चव्हाण, चंद्रशेखर पाटील, शशीकांत पाटील, विवेक पाटील आणि पराग पाटील यांचा समावेश होता. या सर्वांनी नवलसिंग पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि समाजाच्या जडणघडणीत अशा प्रकारे सहकार्य करणाऱ्यांप्रती आभार व्यक्त केले. कार्यक्रमावेळी सामाजिक एकतेचा आणि सहकार्याचा संदेश दिला गेला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजाची गरज ओळखून अशा स्वरूपातील मदत मिळणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. शासनस्तरावर समाजासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी यावेळी गौरवपूर्ण शब्दांत स्मरण केले. समाजातील व्यक्तींनीही यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदिच्छा भेटीत सहभाग नोंदवला. समाजात अशी मदत केवळ आर्थिक स्वरूपात मर्यादित राहत नाही, तर ती समाजाच्या आत्मविश्वासात भर घालणारी असते, हे या प्रसंगाने अधोरेखित झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुस्थितीत पार पडले. उपस्थितांनी शिस्तबद्धपणे आपापली मते व्यक्त केली आणि समाजाच्या भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे पदाधिकारी आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील आणि नवलसिंग पाटील यांचे आभार मानत त्यांचे समाजप्रती असलेले योगदान गौरवले. समाजहिताचे भान ठेवून दिलेली मदत हे एका जबाबदार नेतृत्वाचे लक्षण असून, अशी मदत समाजाला नवी दिशा देणारी ठरते. मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांसाठी कार्य करत आहेत. त्यांनी भुसावळ दोडे गुर्जर समाजासाठी केलेले योगदान हे त्या सामाजिक जाणिवेचे आणि बांधिलकीचे उदाहरण आहे. भविष्यात समाज समिती अशा मदतीच्या जोरावर आणखी व्यापक उपक्रम राबवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यापुढील काळातही शासनस्तरीय योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाज समिती प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायबर साक्षरतेच्या दिशेने विद्यार्थ्यांमध्ये सजगतेचे ठोस पाऊल उचलत, वालिया सी. एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल. सी. कॉलेज ऑफ आर्ट्स येथील सायबर वॉरियर्स — अप्सरा राऊत आणि मिश्कत सैफी यांनी एस सी डी बर्फीवाला हायस्कूल येथे प्रभावी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबवले.
क्विक हिल फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहकार्याने आयोजित या सत्रात सायबर बुलिंग, फिशिंग, सुरक्षित ब्राउझिंग सवयी, डिजिटल स्वच्छता अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि काळानुरूप विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी सायबर धोके ओळखावेत, डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरावे आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करावा, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता.
सदर उपक्रमाचा लाभ ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय सत्रांद्वारे घेतला. सत्रात शाळेतील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह सत्राच्या प्रासंगिकतेचे, मुद्द्यांच्या सुस्पष्ट मांडणीचे आणि संवाद शैलीच्या प्रभावीपणाचे शिक्षकांनी विशेष कौतुक केले.
हे सत्र “सायबर शिक्षेसाठी सायबर सुरक्षा” या व्यापक जनजागृती मोहिमेचा एक भाग होते. या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील संभाव्य धोके समजावून सांगणे, त्यांच्यात सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आवश्यक ज्ञान व साधनांनी सज्ज करणे हा होता.
अप्सरा राऊत आणि मिश्कत सैफी यांनी स्पष्ट संवादशैली, उत्साही सादरीकरण आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधण्याच्या कौशल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक ठामपणे रुजली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सजगतेची पायाभरणी घडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
मेष आज तुमच्या मनातील संकल्पना पुढे राबवण्याची योग्य वेळ आहे. आत्मविश्वास वाढेल. जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. शुभ अंक: २ शुभ रंग: केशरी
वृषभ व्यवसायातील निर्णयात थोडा विलंब होईल. घरातील व्यक्तींशी संवाद वाढवा. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक: ५ शुभ रंग: फिकट हिरवा
मिथुन बुद्धिमत्ता वापरून समस्या सोडवू शकाल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक: १ शुभ रंग: सफेद
कर्क भावनिक निर्णय टाळा. नोकरीतील तणाव दूर करण्यासाठी वेळ काढा. आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. शुभ अंक: ७ शुभ रंग: चंदेरी
सिंह महत्त्वाची जबाबदारी पार पडेल. स्वतःचे मत प्रभावीपणे मांडू शकाल. कुटुंबीयांचे पाठबळ लाभेल. शुभ अंक: ९ शुभ रंग: सोनेरी
कन्या प्रत्येक निर्णयात सावधपणा ठेवा. वादविवाद टाळा. जुने नातेसंबंध अधिक दृढ होतील. शुभ अंक: ६ शुभ रंग: फिकट तपकिरी
तुळ नवीन संधींचा लाभ घ्याल. तुमचे विचार आणि कृती यामध्ये समतोल आवश्यक आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शुभ अंक: ३ शुभ रंग: निळा
वृश्चिक मनातील भीती बाजूला सारून धैर्याने निर्णय घ्या. कौटुंबिक शांतता लाभेल. आरोग्य स्थिर राहील. शुभ अंक: ८ शुभ रंग: गडद जांभळा
धनु धंद्यात प्रगतीचे संकेत. मित्रांशी महत्त्वाचे चर्चासत्र होईल. जुनी अडथळे दूर होण्यास सुरुवात. शुभ अंक: ४ शुभ रंग: गव्हाळ
मकर कार्यक्षेत्रात काहीशी अस्थिरता जाणवेल. निर्णय घाईत नको. घरातील वातावरण शांत ठेवावे. शुभ अंक: ५ शुभ रंग: राखाडी
कुंभ तुमचे प्रयत्न आज यश देणार आहेत. आर्थिक लाभाची शक्यता. नवे करार फायदेशीर ठरतील. शुभ अंक: ७ शुभ रंग: फिकट निळा
मीन मनापासून केलेल्या कार्यात यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण. आजचा दिवस सौख्यदायक ठरेल. शुभ अंक: २ शुभ रंग: गुलाबी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ६० व्या (२०२२) आणि ६१ व्या (२०२३) राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम, स्व. राज कपूर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर व छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कारांचे वितरण डोम
एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, संचालक बिभीषण चवरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रकर्मी, रसिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ पासून सुरू झालेली ही परंपरा आज वटवृक्षासारखी बहरली आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. मराठी कलाकारांनी छोट्या-मोठ्या पडद्यावर, ओटीटीवरही असामान्य कामगिरी केली आहे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, अनुपम खेर, महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे आणि भीमराव पांचाळे यांच्या योगदानाचे विशेष गौरव त्यांनी केला.
या सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेत्री काजोल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना तर छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांना प्रदान करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले की, मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी आता परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. राज्यभरातील चित्रीकरणासाठी सुलभ सुविधा पुरवण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. एफएम रेडिओवर मराठी गाणी व कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील नेटफ्लिक्सवरही मराठी चित्रपटांना स्थान मिळावे यासाठी चर्चाही केल्याचे ते म्हणाले.
६० वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ निवडण्यात आला. दिग्दर्शक प्रविण तरडे (धर्मवीर), सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), अभिजीत देशपांडे (हर हर महादेव) यांना दिग्दर्शनासाठी सन्मानित करण्यात आले. अभिनय विभागात प्रसाद ओक (धर्मवीर), अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी) यांना पुरस्कार प्राप्त झाले. संगीत विभागात निहार शेंबेकर (समायरा), मनिष राजगिरे (धर्मवीर), आर्या आंबेकर (चंद्रमुखी) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘समायरा’ (सामाजिक) आणि ‘गाभ’ (ग्रामीण) या चित्रपटांना देण्यात आले.
६० व्या पुरस्कारांत इतर विजेते असे – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘पॉन्डीचेरी’, क्रमांक ३ ‘हर हर महादेव’, सहाय्यक अभिनेता योगेश सोमण (अनन्या), सहाय्यक अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी), विनोदी अभिनेता संजय नार्वेकर (टाईमपास ३), प्रथम पदार्पण अभिनेता जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही), प्रथम पदार्पण अभिनेत्री ऋता दुर्गुळे (अनन्या), उत्कृष्ट कथा सुमीत तांबे (समायरा), पटकथा तेजस मोडक व सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), संवाद प्रविण तरडे (धर्मवीर), गीते अभिषेक खणकर (अनन्या), पार्श्वसंगीत हनी सातमकर (आतूर), पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), पार्श्वगायिका आर्या आंबेकर (चंद्रमुखी), अमित घुगरी (सोयरिक), नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), कला दिग्दर्शन महेश कुडाळकर (उनाड), छायालेखन अभिजीत चौधरी / ओंकार बर्वे (४ ब्लाइन्ड मेन), प्रियशंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही), संकलन एस. सुर्वे (काटा किर्रर्र), ध्वनिमुद्रण सुहाश राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), ध्वनिसंयोजन लोचन कानविंदे (हर हर महादेव), वेशभूषा उज्ज्वला सिंग (ताठकणा), रंगभूषा सुमेध जाधव / सौरभ कापडे (ताठकणा), बालकलाकार श्रीनिवास पोकळे (छुमंतर), अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय), प्रथम पदार्पण निर्मिती झेनिथ फिल्म्स (आतूर), प्रथम पदार्पण दिग्दर्शक प्रताप फड (अनन्या), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक ऋषी देशपांडे, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक अनुप जत्राटकर.
६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘भेरा’ निवडला गेला. दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे (भेरा), महेश लिमये (जग्गु आणि ज्युलिएट), सुधाकर रेड्डी (नाळ २) यांना दिग्दर्शनासाठी गौरविण्यात आले. अभिनय विभागात अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट) आणि रिंकू राजगुरू (आशा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत विभागात अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर), मोहित चौहान (घर, बंदूक, बिर्याणी), ऋचा बोंद्रे (श्यामची आई) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘आशा’ (सामाजिक), ‘जिप्सी’ (ग्रामीण) आणि ‘श्यामची आई’ (राष्ट्रीय सन्मान) या चित्रपटांना देण्यात आले.
६१ व्या पुरस्कारांत इतर विजेते – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘जग्गु आणि ज्युलिएट’, क्रमांक ३ ‘नाळ २’, विनोदी अभिनेता उपेंद्र लिमये (जग्गु…), विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत (झिम्मा २), सहाय्यक अभिनेता संतोष जुवेकर (रावरंभा), सहाय्यक अभिनेत्री उषा नाईक (आशा), बालकलाकार कबीर खंदारे, त्रिशा ठोसर (नाळ २), विशेष बालकलाकार भार्गव जगताप (नाळ २), कथा सुधाकर रेड्डी (नाळ २), पटकथा शशी खंदारे (जिप्सी), संवाद अंबर हडप व गणेश पंडित (जग्गु…), गीते वैभव देशमुख (नाळ २), पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर (नाळ २), नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे, संजीर हाउलदार (जग्गु…), कला दिग्दर्शन अमेय भालेराव (श्यामची आई), छायालेखन प्रविण सोनवणे (जिप्सी), संकलन अक्षय शिंदे (जिप्सी), ध्वनीमुद्रण कुणाल लोळसुरे (श्यामची आई), ध्वनिसंयोजन विकास खंदारे (जिप्सी), वेशभूषा मानसी अत्तरदे (जग्गु…), रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस), प्रथम पदार्पण अभिनेता दीपक जोइल (भेरा), अभिनेत्री श्रद्धा खानोलकर (भेरा), गौरी देशपांडे (श्यामची आई), प्रथम पदार्पण दिग्दर्शक आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट), प्रथम पदार्पण निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक दीपक पाटील, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक शशी खंदारे. विशेष सन्मान – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘श्यामची आई’.
पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी “तयारी स्पर्धा परीक्षांची” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा, प्रशासनातील संधी, व स्वतःच्या करिअर घडविण्याच्या अनंत शक्यतांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. आपल्या भाषणात नानासाहेब वाघ म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमतांच्या बळावर स्वतःला सिद्ध केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा, जिद्द आणि कर्तृत्व दडलेले असते, केवळ त्या गुणांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असते.” ते पुढे म्हणाले, “आजच्या काळात करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत. केवळ डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्राध्यापक होणेच जीवनाचे उद्दिष्ट नसून, या व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रांत प्रगतीची दारे उघडी आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्यपूर्ण मेहनत घ्यावी. नोकरी लागल्यानंतरही थांबू नये, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, याचा विचार करून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.” नानासाहेब वाघ यांनी पुढे सांगितले की, “तळागाळातील विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करायला हवेत. आपल्या गावाचा, कुटुंबाचा आणि संस्थेचा अभिमान वाढवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची आवश्यकता देशाला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था आणि महाविद्यालयाचा संपूर्ण परिवार नेहमीच पाठीशी उभा असून, कुठलीही अडचण येऊ नये म्हणून संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी असते.” या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, विशेषतः यूपीएससी व एमपीएससीसारख्या प्रशासकीय परीक्षांबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर असलेल्या संधी त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.” प्रा. चिंचोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देत प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. दीपक कुमार या विद्यार्थ्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, “दिल्लीमध्ये चहाच्या टपरीवर काम करणारा दीपक कुमार याने अपार कष्ट घेत आयएएस झाल्याने त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरतो.” त्यांनी एरंडोल तालुक्यातील ताडेबामणे गावचे राजेश पाटील यांचे उदाहरण दिले. “एकेकाळी पाव विकणारा हा तरुण सध्या आयएएस अधिकारी म्हणून देशसेवा करत आहे,” असे सांगून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी कमलेश पारेख, रमेश घोलप आणि अन्सार शेख यांसारख्या विद्यार्थ्यांचेही उल्लेख केले, जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आले असूनही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन आज देशासाठी महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. तसेच अरुणीमा सिन्हा या विद्यार्थिनीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, “रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या अरुणीमाने शारिरीक मर्यादा झुगारून जगातील सर्वोच्च शिखरे सर केली आणि माऊंट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले.” प्रा. चिंचोले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपली आर्थिक परिस्थिती, शारीरिक अपंगत्व, किंवा सामाजिक मर्यादा ही आपल्याला थांबवू शकत नाहीत, जर मनात दृढ निश्चय असेल आणि दिशादर्शक योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणत्याही अडथळ्यावर मात करता येते.” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी, संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी आपल्या उपस्थितीत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन या सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी.एन. चौधरी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही केवळ भूतकाळातील विद्यार्थी म्हणून नव्हे तर वर्तमान आणि भविष्यकालीन पिढीसाठी देखील काम करत आहोत. आपल्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा देणे ही आमची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. जे. डी. गोपाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अँडव्होकेट महेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य केले. हा कार्यक्रम केवळ एक व्याख्यान सत्र नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित करणारा आणि वास्तवाशी जोडणारा एक प्रभावी उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनातील संघर्षांवर मात करत यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी, हीच अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. शिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देणे हे अशा कार्यक्रमांचे मोलाचे वैशिष्ट्य ठरते.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेच्या वतीने फोटोग्राफी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन वेगवेगळ्या थीम निश्चित करण्यात आल्या आहेत – “युनेस्को हेरिटेज १२ किल्ले” आणि “महाराष्ट्रातील इतर किल्ले”. या माध्यमातून छायाचित्रकारांना ऐतिहासिक गडकोटांचा भव्यतेसह गौरव करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले असून, ३१ ऑगस्ट २०२५ ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. प्रत्येक थीमनुसार स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून त्यामध्ये पहिला क्रमांक ₹५,०००/-, दुसरा क्रमांक ₹३,०००/-, तिसरा क्रमांक ₹२,०००/-, तर प्रोत्साहनपर पारितोषिक ₹१,०००/- असे आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. निकाल ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल आणि पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील Google Form भरावा – https://forms.gle/Bv1KJN1Dk9UiYPRr8
अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास युक्ता गोठणकर यांच्याशी 8591747565 / 8691973874 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
इतिहास आणि छायाचित्रकलेचा संगम साधणारी ही स्पर्धा छायाचित्रकारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तर चला गडकोटांचे वैभव तुमच्या नजरेतून जगाला दाखवा!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक प्रभावी सामाजिक पुढाकार घेत, वालिया सी.एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल.सी. कॉलेज ऑफ आर्ट्स या महाविद्यालयांतील हरीश राजपूरोहित आणि बकेश कोटी या दोन विद्यार्थी प्रतिनिधींनी २६ जुलै २०२५ रोजी पोदार इंटरनॅशनल हायर सेकंडरी स्कूल येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पाडले.
हे सत्र महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सत्रात ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, पासवर्ड संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि जबाबदारीने इंटरनेटचा उपयोग या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संवादात्मक आणि सहभागी स्वरूप. उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्नोत्तर सत्र, दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे आणि उपयुक्त टिप्स यांद्वारे सायबर सुरक्षेचे प्रत्यक्ष आणि सुलभ स्वरूपात शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या शंका समाधानासह प्रत्यक्ष अनुभवही शेअर केले.
श्री. राजपूरोहित आणि श्री. कोटी यांचे मुद्देसूद सादरीकरण, स्पष्ट संवादशैली आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी याचे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही विशेष कौतुक केले. काही शिक्षकांनी अशा सत्रांची नियमित गरज अधोरेखित करत, सायबर सुरक्षा विषय अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, अशी सूचनाही दिली.
“सायबर शिक्षासाठी सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित हे सत्र विद्यार्थ्यांना सजग, जबाबदार आणि डिजिटलदृष्ट्या साक्षर नागरिक म्हणून घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त माहितीपूर्णच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या जागरूक, सुरक्षित आणि नैतिक डिजिटल व्यवहार करणारे नागरिक म्हणून घडतात, हे निश्चित.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानवी तस्करीच्या धोक्याविरोधात समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीच्या वालिया महाविद्यालय आणि प्रकृती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय पथनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्या डॉ. बागेश्री बांदेकर म्हणाल्या, “मानवी तस्करी थांबवणे हे कोण्या एका व्यक्तीचे काम नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.” तसेच, प्रकृती संस्थेच्या ‘यंग इंडिया अनचेंज्ड’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरविंद पांचाळ यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यांच्यातील संवेदनशीलता वाढीस लागते आणि अशा समस्या रोखण्यासाठी सक्षम पिढी घडते.” तसेच कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित बालन यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “अशा शिबिरांतून घडणारे स्वयंसेवक समाजकार्याच्या प्रवाहात पुढे येतात आणि परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलतात.”
या कार्यशाळेतील प्रमुख पथनाट्य मार्गदर्शक म्हणून सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) येथील मराठी विभागप्रमुख आदरणीय प्रा. जगदीश संसारे यांनी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादरीकरणाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके, संप्रेषण कौशल्य, शारीरिक अभिव्यक्ती व नाट्यकला यावर आधारित सत्रे घेतली. त्यांना सहाय्यक पथनाट्य प्रशिक्षक माधवी पवार यांनी मार्गदर्शनासाठी मोलाची साथ दिली.
प्रशिक्षणार्थींनी केवळ अवघ्या अर्ध्या तासाच्या सरावानंतर सादर केलेली सहा पथनाट्ये त्यांच्या कल्पकतेचे आणि सजगतेचे प्रभावी दर्शन घडवत होती. ज्यातून मानवी तस्करीविरोधातील सजगतेचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अतिशय समर्पितपणे काम पाहिले. समारोप प्रसंगी वालिया महाविद्यालयाच्या एन.एस.एस. जनरल सेक्रेटरी सदिच्छा कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक व शिबिरार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.