Home Blog Page 110

पुनगाव सोसायटीची शंभर टक्के कर्जवसुलीची आदर्श कामगिरी

0
Oplus_16908288

Loading

पाचोरा — सहकार क्षेत्रात विश्वास आणि जबाबदारीचे भान बाळगून कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी वेळोवेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. अशाच एका उल्लेखनीय आणि अनुकरणीय घडामोडीचे उदाहरण नुकतेच पुनगाव (ता. पाचोरा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने घडवले आहे. सोसायटीने जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगांवच्या पाचोरा शाखेकडून घेतलेल्या कर्जाची शंभर टक्के वसुली यशस्वीरित्या पूर्ण करून, संपूर्ण जिल्ह्यात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. मार्च अखेरीस ही वसुली पूर्ण झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रातून या कार्याचे कौतुक होत आहे.          या यशस्वी वसुलीसाठी संस्थेच्या संचालक मंडळापासून ते बँकेच्या शाखा व्यवस्थापनापर्यंत सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकदिलाने व एकसंध प्रयत्न केले. बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक योगेश चंदिले, बँक इन्स्पेक्टर श्री महाजन साहेब, पाचोरा शाखेचे व्यवस्थापक प्रमोद साहेब, बँकेतील कर्मचाऱ्यांचे संघटन व समर्पित योगदान, संस्थेचे चेअरमन प्रल्हाद रामदास पाटील, व्हा चेअरमन, संचालक मंडळ, सचिव आणि सर्व सभासद यांनी एकत्रितपणे यासाठी परिश्रम घेतले. याचेच फलित म्हणजे १००% कर्जवसुलीचे हे ऐतिहासिक यश आज सहकार क्षेत्र अनेक अडचणींमध्ये अडकलेले असताना, पुनगाव संस्थेच्या या यशाने सकारात्मक ऊर्जा दिली आहे. काही भागांमध्ये कर्जवसुली ही बँकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असताना, पुनगाव सोसायटीने दाखवलेली शिस्त, नियोजन आणि कर्जदार सभासदांमध्ये जागरूकता निर्माण करून कर्जवसुलीचे उद्दिष्ट गाठणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब ठरली आहे.या पार्श्वभूमीवर पाचोरा शाखेत एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या चेअरमन प्रल्हाद रामदास पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक योगेश चंदिले आणि शाखा व्यवस्थापक प्रमोद साहेब यांनी आपले विचार मांडताना संस्थेच्या कार्यपद्धतीचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित भावनेचे भरभरून कौतुक केले.या समारंभात बोलताना विभागीय उपव्यवस्थापक योगेश चंदिले म्हणाले, “सहकार क्षेत्राचे मूळ हे पारदर्शक कारभार, सभासदांचे हित आणि जबाबदारीची भावना यावर आधारित असते. पुनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने या तिन्ही बाबींचा अत्यंत प्रभावीरीत्या अवलंब करून हे यश मिळवले आहे. कर्ज घेणे जितके महत्त्वाचे, तितकेच ते वेळेवर परत करणे हे संस्थेच्या टिकाऊपणासाठी आवश्यक असते. ही भावना प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचवणे हीच खरी संस्थेची यशाची गुरुकिल्ली आहे.”बँक इन्स्पेक्टर श्री महाजन साहेब यांनीही यावेळी आपल्या भाषणात सांगितले की, “आज अनेक संस्था कर्जवसुलीच्या टप्प्यावर अडकतात, मात्र पुनगाव संस्थेच्या कार्यपद्धतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. सततचा पाठपुरावा, सभासदांशी संवाद, वेळोवेळी मार्गदर्शन आणि आर्थिक शिस्त या गोष्टींनी मिळूनच कर्जवसुलीला गती दिली जाते. या संस्थेने ते प्रत्यक्षात करून दाखवले आहे.”पाचोरा शाखेचे व्यवस्थापक प्रमोद साहेब यांनीही संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आणि सभासदांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की, “सहकारी संस्थांचा खरा आत्मा म्हणजे सर्वांचे एकत्रित योगदान. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यानेच आज आपण १००% कर्जवसुलीचा टप्पा गाठू शकलो. याचे श्रेय फक्त व्यवस्थापनालाच नव्हे, तर प्रत्येक सभासदाच्या प्रामाणिक प्रयत्नांना द्यावे लागेल. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन प्रल्हाद रामदास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही केवळ कर्जवसुली नसून संपूर्ण संस्थेच्या विश्वासाचा विजय आहे. आमच्या संस्थेचे ध्येय नेहमीच पारदर्शक कारभार, सभासदांचा सहभाग आणि आर्थिक शिस्त यावर आधारित राहिले आहे. या यशाने आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. व्हा चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे उगमस्थान असलेल्या सहकारी संस्थांनी मजबूत आणि जबाबदारीची भूमिका निभावली, तर भविष्यातील अनेक आर्थिक संकटे सहजपणे टाळता येतील.या सत्कार समारंभाच्या निमित्ताने संस्थेने एकजुटीचा, प्रामाणिकपणाचा आणि जबाबदारीच्या भावनेचा एक सुंदर आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारच्या संस्था आणि त्यामागील लोकांचा सत्कार ही केवळ औपचारिकता नसून, त्यांच्या कार्याचे समाजापुढे केलेले एक जिवंत सादरीकरण आहे.सहकार क्षेत्रातील अनेक पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या कामगिरीबद्दल संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.पुनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने दाखवलेली ही उदाहरणार्थ कृती, आजच्या सहकार चळवळीला एक नवा दिशा आणि नवा आत्मविश्वास देणारी आहे. ग्रामीण भागातील सहकारी संस्था ही केवळ कर्ज देणारी संस्था नसून, ती एक विश्वासाची आणि प्रगतीची वाटचाल घडवणारी यंत्रणा ठरू शकते, हे या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.या यशाचा पायाभूत पाया असलेल्या सर्व सभासदांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि बँकेच्या प्रतिनिधींचे जसे कौतुक व्हायला हवे, तसाच या कृतीचा आदर्श इतर संस्थांनीही घेणे आवश्यक आहे. कारण एकदा जर सहकाराच्या मूळ तत्वांना धरून काम सुरू झाले, तर कोणतीही संस्था यशस्वी होऊ शकते — हे पुनगाव सोसायटीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

गिरणगावात भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचा उत्साह

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने आणि मराठी नववर्षाचा प्रारंभ या दिवसापासून होत असल्याने या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीविष्णूंच्या रामावताराची विजयगाथा आणि अयोध्येतील विजयोत्सवाची परंपरा जपत, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, लेझीम पथके आणि आकर्षक रांगोळ्यांनी शोभायात्रा सजली होती.

सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मठ (परळ वर्कशॉप) येथून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेने परळ नाका, नरे पार्क, भारतमाता सिनेमा, लालबाग मार्केट, जयहिंद सिनेमा मार्गे सणसवाडी येथे समारोप केला.

या प्रसंगी यशवंत जाधव (मा. अध्यक्ष स्थायी समिती बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेना), प्रा. डॉ. मनिषा कायंदे विधान परिषद सदस्य सचिव व प्रवक्त्त्या-शिवसेना), रत्ना रघुनाथ महाले (मा. नगरसेविका अध्यक्षा-महिला तालुका विभाग वरळी विधानसभा), डॉ. सतिश वैरागी (अध्यक्ष-कोकण विभाग), राजीव काळे (मा. अध्यक्ष रायगड सहकारी बँक), डॉ. विजय पवार (सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ) आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच, शोभा यात्रेतील नागरिकांना एक हजार पेनाचे वाटप करण्यात आले.व सहभागी समाज बांधवांना पर्यावरणपूरक कापडी पिशवी, उच्च दर्जाचे आकर्षक पेन, अल्पोपहार व पाणी यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ललित चरित्र ग्रंथ भेटस्वरूप देण्यात आले. संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटून शोभायात्रेची शोभा वाढवली.

शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर, दिलीप गणपत खोंड, किशोर मेहेर, डॉ. सतिश वैरागी, दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत, यशवंत महाडीक, प्रशांत मधुकर कसाबे, रुपाली अनंत मावळे, यांनी अथक परिश्रम घेतले.या भव्य शोभायात्रेमुळे हिंदू नववर्षाच्या स्वागताला विशेष रंगत आली. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला आणि आगामी वर्षांतही अशीच उत्साही शोभायात्रा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

पाचोऱ्यात मध्यरात्री मोठी कारवाई – गुटख्याची लाखोंची खेप जप्त;– आता ‘तोंडाला रक्त’ लागलेल्या भुरट्यां पत्रकारांची साखळी मोडली जाणार!

0

Loading

पाचोरा – शहरात मध्यरात्री पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान एका संशयास्पद वाहनातून गुटख्याची प्रचंड मोठी, अवैध खेप जप्त करण्यात आली. ही कारवाई एव्हढ्यावरच मर्यादित नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोगस पत्रकार, खोट्या संघटना आणि त्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या अवैध धंद्यांच्या एका अख्ख्या साखळीचा पर्दाफाश होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काल रात्री पोलिसांनी मोठ्या शिताफीने मिळालेल्या खबऱ्यांवर विश्वास ठेवून, शहराच्या ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी एका वाहनाची तपासणी करताना त्यामध्ये लाखोंच्या किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यामागील रॅकेटचा तपास सुरू आहे.
पण खरी बातमी इथेच आहे — हा गुटखा केवळ एका तस्कराचा माल नाही. दिलीपसह हे रॅकेट कित्येक दिवसांपासून कार्यरत असून त्यास पाठबळ देणाऱ्या बोगस पत्रकार व त्यांच्या खोट्या संघटनांची

संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. शहरात गुटखा, लाकूड तस्करी, रेती वाहतूक करणाऱ्यांना ब्लॅकमेल करत बनावट ब्रेकिंग, खोट्या बातम्यांचे सौदे – हे सर्व एकाच साखळीचे दुवे असून पोलिसांच्या या कारवाईने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
पाचोऱ्यात काही वर्षापासुन अघोषित पत्रकारांनी तयार केलेल्या बनावट पत्रकार संघटनांनी आपले ‘पत्रकार’ म्हणून फोटो लावून, चार बोगस सहकाऱ्यांना पदे वाटून, हॉटेलमध्ये बसून साखळी निर्माण केली. या लोकांना सुरुवातीला कुणीही गंभीर घेत नव्हते, पण जेव्हा त्यांचा त्रास खऱ्या पत्रकारांना व अधिकाऱ्यांना होऊ लागला तसेच खऱ्या पत्रकारांचे फोटो, नाव, आणि संघटनांचे बॅनर वापरून पोलीस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे, एखाद्या अवैध धंद्यावाल्याची ‘ब्रेकिंग’ टाकून पैसे उकळणे आणि पोलिसांवर दबाव आणणे सुरू केले, तेव्हा गंभीरतेने पाहणे आवश्यक झाले.
याच बोगस पत्रकारांच्या थापा व भंपकपणा मध्ये येऊन पाचोऱ्यातील काही चक्री अवैध धंदेवाल्यांनी त्यांना आर्थिक मदत सुरू केली, दरमहा पैसे दिले जात होते त्यामुळेच त्यांच्या तोंडाला पैसा नावाच्या रक्ताची चव लागली. आणि त्यांनी आपला मोर्चा थेट पिंपळगाव व भडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीकडे वळवला.तेथील थेट अधिकाऱ्यांना त्रास देणे सुरू केले पिंपळगाव व भडगाव परिसरातील अवधंदे वाल्यांकडे पोहोचताच या बोगस पत्रकारांनी पुन्हा तीच पद्धत सुरू केली. स्थानिक अवैध धंदेवाल्यांना म्हणू लागले, तुम्ही आता पैसे दरमहा सुरू करा लाकडे वाल्यांनो पैसे वाढवा नाहीतर पुन्हा ब्रेकिंग टाकू.” काही व्यापाऱ्यांकडे जाऊन धमकीवजा भाषेत सांगण्यात आले
त्यांच्या अशाच प्रकारामुळे पाचोरातील अवैध चकऱ्या स्थानिक पोलीस प्रशासनाने बंद केल्याने त्या संधीचाही उपयोग घेऊन इतर अवैध व्यवसायिकांना सांगू लागले
“आमची कमाल बघितली का? आम्हीच चक्रऱ्या थांबवल्या… तुम्हीही नीट राहा, नाहीतर तुमच्याही व्यवसायावर टाच येईल.”
या धमक्यांमागे प्रत्यक्षदर्शी पुरावे नसले तरी, अनेक व्यापाऱ्यांनी नोंदवलेल्या तोडी तक्रारी आणि माहितीवरून ही टोळी एकमेव उद्देशाने कार्यरत आहे – ‘दहशत निर्माण करून पैसा उकळणे.’ ते पत्रकार नाहीत, ते ‘ब्लॅकमेलिंग एजंट’ आहेत.
पाचोरा पोलिसांची योग्य वेळ साधलेली कारवाई – थेट चक्रालाच उद्ध्वस्त केले!
पाचोरा पोलिसांनी या संपूर्ण यंत्रणेची माहिती मिळवताच, केवळ बोगस पत्रकारांवर नव्हे, तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या मूळ चक्री अवैध धंद्यालाच लक्ष्य केले. त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या मुख्य मालमत्तांवर छापे टाकून, मुख्य खेप जप्त केली. परिणामी बोगस पत्रकारांची बडेजावशीर भाषा आणि धमक्या संपूर्ण थंडावल्या.
गमतीशीर बाब म्हणजे हीच मंडळी आता सांगत आहेत – “आमच्यामुळे चक्रा थांबल्या, आता आम्ही पुन्हा सुरू करतो. साहेबांना सांगून सगळं सुरळीत करू.” मात्र वस्तुस्थिती ही आहे की – पोलिसांच्या चौकस हालचाली, खबऱ्यांचं नेटवर्क मुळे पाचोऱ्यात चक्री व्यवसायाला ‘ब्रेक’ लागलं आहे.
हेच बोगस पत्रकाराचं रॅकेट लाकूड तोड प्रकरणातही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. एखाद्या वनक्षेत्रात लाकूड चोरले गेले, तर लगेच एखाद्याला ‘खबरदार’ टाईप फोटो सोशल मीडियावर टाकायचा. त्यानंतर संबंधित व्यवसायिकाकडे जाऊन सांगायचं – “तुमच्यावर बातमी आलीय, ती थांबवायचीय? मग काही ‘डील’ करू.” यामध्ये अनेक वेळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही चुकीच्या पद्धतीने फोन रेकॉर्ड करून फसवले गेले आहे
अगदी रेती वाहतूक प्रकरणातही हेच बघायला मिळालं.बनावट पत्रकारांचे हे टोळके ‘पत्रकार संघटना’ या नावाने अधिकाऱ्यांकडे जाऊन, एकतर स्वतःची बाजू मांडून दुसऱ्यांवर आरोप ।करतं, किंवा पथकावर दबाव टाकून धंदा सुरू ठेवण्यास सांगतं.
शेवटी… हे पत्रकार नाहीत, ही एक आर्थिक ब्लॅकमेलिंग संस्था आहे!
सामान्य व्यापारी, डॉक्टर, कंत्राटदार, पत्रकार, अधिकारी – कोणताही समाजघटक सुरक्षित नाही, जोवर ही बनावट पत्रकार मंडळी शहरभर फिरत आहेत. त्यांच्या मागे असलेल्या अवैध धंद्यांनी त्यांना पैसा, संरक्षण, आणि बनावट प्रतिष्ठा दिली आहे. आता वेळ आली आहे या सगळ्याचा भांडाफोड करण्याची.        Dhyeya News चे वाचक, सजग व्हा!आपल्या संघटनेचं नाव, फोटो कुठे वापरलं जातंय का?तुमच्याकडून एखाद्या ‘पत्रकाराच्या’ नावावर पैसे मागण्यात आलेत का?खऱ्या पत्रकारांचं नाव वापरून कुणी फसवणूक करतंय का?ताबडतोब संपर्क साधा. पोलिसांशी सहकार्य करा. माहिती द्या. आणि या बनावट यंत्रणेपासून पाचोऱ्याला, पिंपळगावला, भडगावला वाचवा.कारण ही केवळ पत्रकारितेची थट्टा नाही, ही समाजाच्या विश्वासाची घातक विक्री आहे!Dhyeya News                           खऱ्या पत्रकारांसोबत, खोट्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज!
लवकरच आणखी पुरावे, नावं आणि माहिती घेऊन परत येत आहोत! संपर्कात राहा!

५० रुपयांच्या व्हायरल व्हिडिओमागे सत्य, अर्धसत्य की अपप्रचार? : पाचोऱ्यातील वाहतूक पोलिसां विषयी समाज मनात उमटलेले प्रश्न

0

Loading

पाचोरा – सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलेला एक व्हिडिओ, ज्यामध्ये पाचोरा शहरातील तीन वाहतूक पोलिसांपैकी एखादा पोलीस वाहनचालकाकडून ५० रुपयांची लाच घेत असल्याचे दिसते, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. परंतु या घटनेची दुसरी बाजू, जी सध्या दुर्लक्षित केली जात आहे, ती म्हणजे या व्हिडिओची सत्यता, त्यामागील हेतू, आणि कोणत्याही तपासाअगोदरच  तिघंही पोलिसांवर लागलेले आरोप हे कितपत योग्य ठरतात?
   सर्वप्रथम अधिकृत तांत्रिकदृष्ट्या लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे – सदर व्हिडिओ प्रत्यक्षात सत्य घटनांचे प्रतिबिंब आहे की त्यात एडिटिंग, साउंड मिक्सिंग, किंवा कोणत्याही प्रकारचा अपप्रचार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामध्ये फक्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लगेचच त्यावरून तीन पोलिसांवर आरोप करत निलंबनाची कारवाई झाली? पण हा व्हिडिओ अधिकृत तपासणीच्या प्रक्रियेतून गेलाय का? तो फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पडताळण्यात आलाय का? त्याच्या एडिटिंग तपासल्या गेल्या आहेत का? ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी थेट पोलीस प्रशासनाकडे जाऊन दिला का ? हे सगळं सोशल मीडियातील व्हिडिओच्या आधारे सुरू आहे ? कारण हे तेवढे स्पष्ट आहे की जेव्हा ” सत्य घरात बसून सिद्ध करे पर्यंत ,असत्य गावभर हिंडून आलेले असते” त्यामुळे या व्हायरल व्हिडिओ बाबतच हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
   कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आहे की नाही, हे ठरवण्याचे अधिकार कायद्याला आहेत, सोशल मीडियाला नाही. ५० रुपयांचा व्यवहार म्हणजे लाच का? की कोणतं दंड किंवा अधिकृत शुल्क? का कुणीतरी मुद्दामहून ही घटना वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला? समजा एखादा दोषी असेल तर इतरांना शिक्षा का ? या गोष्टी तपासल्या गेल्याच पाहिजेत. व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीने नेमकी तक्रार नोंदवली का? की केवळ त्याने व्हिडिओ काढून समाजात खळबळ निर्माण करणे, बदनामी करणे, हे उद्दिष्ट ठेवले? इतक्या लहानशा रकमेच्या व्यवहारावर देशभरात चर्चा होणे आणि निलंबनासारखी कडक कारवाई होणे, हे न्याय्य आहे का, असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
आज देशात कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार करणारे अनेक अधिकारी, व्यापारी, दलाल, राजकीय नेते खुलेआम वावरत आहेत, त्यांच्यावर कोणतीही तत्काळ कारवाई होत नाही. त्यांच्यावर फक्त चौकशा लांबविल्या जातात किंवा प्रकरणे थांबवली जातात.किंबहुनानंतर चीट दिली जाते  मग एखाद्या साध्या पोलीस कर्मचाऱ्याने ५० रुपये घेतले (किंवा घेतल्याचा संशय आला) म्हणून त्याच्या सह  थेट  तिघांना निलंबित करणे आणि सामाजिक माध्यमांवर बदनाम करणे ही अन्यायकारक बाब ठरत नाही का?
  या प्रकरणात सर्वप्रथम व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी तपासणे आवश्यक आहे. त्याने हा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या कायद्यानुसार अधिकृत यंत्रणेला दिला का? की फक्त सोशल मीडियावर टाकून समाजात बदनामीसाठी तो वापरला? शिवाय त्यात कोणतीही मिक्सिंग, आवाज बदल, किंवा एडिटिंग केले गेले आहे का, याचीही तांत्रिक चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांवर लगेचच कार्यवाही करण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.
      शिवाय ज्याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे, त्या व्यक्तीने कुठे तक्रार केली का? त्याला जबरदस्तीने पैसे द्यायला लावले गेले का? की ते पैसे एखाद्या अधिकृत कारणासाठी दिले गेले होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे हे एकपक्षीय आणि न्यायव्यवस्थेच्या तत्वांना बाधक ठरणारे आहे.
    पोलिस दल हे समाजाचे सुरक्षाकवच आहे. काही व्यक्तींकडून चुकाही होऊ शकतात, पण त्या चुकांचे प्रमाण, तीव्रता आणि त्यामागचा हेतू महत्त्वाचा असतो. ५० रुपयांच्या प्रकरणातही दोषी असेल तर शिक्षा व्हावीच, पण त्याआधी दोष सिद्ध होणे गरजेचे आहे. अन्यथा हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या प्रतिष्ठेचा बळी घेणारा प्रकार ठरू शकतो.
   अशा घटना सत्ताधारी, प्रशासन आणि समाज यांना एकत्र बसून विचार करण्यास भाग पाडतात की – आपण न्याय देतोय की फक्त व्हायरल गोष्टींवर प्रतिक्रिया देतोय? सोशल मीडियाच्या ताकदीने सत्य लपवलं जाऊ शकतं आणि खोटं मोठं केलं जाऊ शकतं. म्हणूनच प्रत्येक अशा प्रकरणामध्ये तपास, पुरावे, आणि दोन्ही बाजू ऐकून निष्पक्ष निर्णय घेणे हेच लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचे खरे बलस्थान आहे.
     पाचोरा प्रकरणातही असेच निष्पक्षपणे आणि गांभीर्याने चौकशी होऊन योग्य निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे. दोषी कोणताही असो, शिक्षा व्हावीच; पण त्यासोबत इतर निर्दोष व्यक्तीची नाहक बदनामी होऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

मुंबईने २४ व्यांदा केकेआरला हरवले, वानखेडेवर गतविजेत्यांवर विक्रमी १० वा विजय नोंदवला

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला आठ विकेट्सनी पराभूत करून विजयाचे खाते उघडले. सोमवारी वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गतविजेत्या केकेआरने २० षटकांत १० गडी गमावून केवळ ११६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, मुंबईने रायन रिकेल्टनच्या अर्धशतकाच्या जोरावर केवळ १२.५ षटकांत लक्ष्य गाठले आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यापूर्वी त्यांना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.
आयपीएलमध्ये मुंबईचा केकेआरवरचा हा २४ वा विजय आहे. त्याचवेळी, एमआयने वानखेडे स्टेडियमवर कोलकात्याला १० व्यांदा पराभूत केले आहे. ४३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून मुंबईने गुणतक्त्यामध्ये मोठा गोंधळ घातला आहे. दोन गुण आणि ०.३०९ च्या निव्वळ धावगतीसह, मुंबई सहाव्या स्थानावर पोहोचली तर केकेआर १० व्या स्थानावर घसरले. त्यांच्या खात्यात निश्चितच दोन गुण आहेत पण केकेआरची निव्वळ धावगती -१.४२८ झाली आहे. आयपीएल २०२५ च्या गुणतक्त्यामध्ये सध्या आरसीबी अव्वल स्थानावर आहे, ज्यांनी त्यांचे दोन्ही सामने जिंकून चार गुण मिळवले आहेत. त्यांची निव्वळ धावगती देखील +२.२६६ आहे.
११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने हिटमनला हर्षित राणाकरवी झेलबाद केले. तो १२ चेंडूत १३ धावा करू शकला. या हंगामात माजी भारतीय कर्णधार पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यानंतर रायनला विल जॅक्सचा पाठिंबा मिळाला. रसेलने मुंबईला ९१ धावांवर दुसरा धक्का दिला. जॅकला फक्त १६ धावा करता आल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी केली आणि फक्त नऊ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ६२ धावा करून नाबाद राहिला. त्याने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
त्याआधी, अश्विनी कुमारच्या घातक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सना ११६ धावांवर रोखले. या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये दहाव्यांदा केकेआर १२० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद ऑलआउट झाले. विशेष म्हणजे, केकेआर मुंबई इंडियन्सविरुद्ध सहा वेळा बाद झाला आहे.
या सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विनी कुमारने भेदक गोलंदाजी केली. त्याने फक्त तीन षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २४ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात पदार्पणात कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोलकाताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. पॉवर प्लेमध्येच, संघाने ४१ धावांवर चार विकेट गमावल्या. त्यांच्याकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक २६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने ११, रिंकू सिंगने १७, मनीष पांडेने १९ आणि रमनदीप सिंगने २२ धावा केल्या. त्याच वेळी, पाच फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही. मुंबईकडून दीपक चहरने दोन तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथुर आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली                                   उद्याचा सामना:-
आयपीएल २०२५ मधील १३ वा सामना लखनऊ येथे होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांचे चाहते विजयासाठी उत्कंठेने वाट पाहत आहेत.

ईदच्या निमित्ताने सौहार्दाचा संदेश देणारे येवले कुटुंब: हिंदू-मुस्लिम ऐक्याची पाचोऱ्यातील जिवंत प्रेरणा

0

Loading

सण-उत्सव ही केवळ धार्मिक भावना नव्हे, ती समाजात ऐक्य, आपुलकी, सौहार्द आणि माणुसकी जागवणारी एक अनमोल संधी असते. भारताच्या सामाजिक रचनेत, विशेषतः महाराष्ट्रासारख्या विविधतेने नटलेल्या राज्यात, ही भावना अधिक गहिरतेने अनुभवता येते. असाच एक सजीव अनुभव यंदाच्या रमजान ईदच्या निमित्ताने पाचोरा शहरात पाहायला मिळाला – ते म्हणजे येवले (वाणी) कुटुंब आणि त्यांच्या घराण्याच्या परंपरेनुसार वर्षानुवर्षे जोपासले जात असलेले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण मुळगाव गोंदेगाव (ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) येथून व्यवसायासाठी पाचोरा शहरात स्थायिक झालेल्या स्व. कालिदास रामचंद्र येवले यांच्या परिवाराने केवळ उद्योगाच्या माध्यमातून नव्हे, तर सामाजिक समतेच्या विचारातूनही आपल्या अस्तित्वाची ठसा उमठवला आहे. पाचोऱ्यातील बहुसंख्य मुस्लिम धर्मीय असलेल्या जंगी मोहल्ला या भागात ते वर्षानुवर्षे सौहार्दाने राहात असून, स्थानिक मुस्लिम समाजाशी त्यांच्या संबंधांमध्ये हट्ट स्नेह आणि परस्पर आदराचं नातं आहे. अशा सामंजस्यपूर्ण सहजीवनाचे बीज अगदी जुन्या पिढीकडून पेरले गेले आहे आणि आजही नव्या पिढीकडून त्याचे संवर्धन होत आहे.हे कुटुंब म्हणजे समाजात शांततेने, सीमित गरजांमध्ये, परिश्रमपूर्वक, स्वतःच्या उद्योगावर विश्वास ठेवून जीवन जगणाऱ्या वाणी समाजाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक तेढाच्या प्रसंगातही येवले परिवार हा नेहमी सौम्य, संयमी आणि समन्वयकारी भूमिका घेत आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांतील दोन मोठ्या हिंदू-मुस्लिम दंगलीतही जंगी मोहल्लात राहत असलेला हा परिवार समाजाच्या एकीच्या पूलासारखा कार्यरत राहिला. केवळ स्वतःला अलिप्त ठेवणे नव्हे, तर दोन्ही समाजात समजूत घालून शांतता प्रस्थापित करण्यातही त्यांची भूमिका मोलाची ठरली.आज या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील अतुल विश्वनाथ येवले, चेतन येवले, अश्विन रमेश येवले, रजनीकांत रमेश येवले, तेजस अनिल येवले हे तरुण या परंपरेचे जतन करीत आहेत. ईद, बकरी ईद, रमजान, तसेच दिवाळी, गणेशोत्सव, रामनवमी – कोणताही सण असो, या कुटुंबासाठी सण म्हणजे सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन साजरा करण्याची संधी असते. ईदच्या दिवशी त्यांच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मुस्लिम बांधवांच्या घरी भेटी देतात, त्यांना शुभेच्छा देतात नव्हे तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात ही परंपरा कोणत्याही दिखाव्याशिवाय, माणुसकीच्या नात्यावर आधारलेली आहे. या एकतेच्या वातावरणाला अधिक अधोरेखित करणारी व्यक्ती म्हणजे अनिलआबा येवले. समाजात संवाद, ऐक्य आणि जागरूकतेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे अनिलआबा हे त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ बातम्या देत नाहीत, तर दोन समाजांमधील पूल बनून कार्य करतात. सिटीझन जर्नलिझमच्या माध्यमातून कोणतीही प्रसिद्धी न सांगता ते समाजाच्या मूळ गरजांवर प्रकाश टाकतात. त्यांचा आवाज कोणत्याही राजकीय हेतूपासून दूर असून, माणुसकीच्या आणि सच्चेपणाच्या तत्त्वांवर आधारित आहे.त्यांचे कार्य त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक जडणघडणीचा एक भाग आहे. अनिलआबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सतत पायी फिरणारे कोणी गाडीवर लिफ्ट दिली तर बसणार नाहीतर आपली ११ नं जिंदाबाद असे स्वाभिमानी, कष्टाळू आणि निर्व्यसनी राहणीचा आदर्श अनिलआबा! ते कधीच कोणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत, कुठलाही राजकीय पाश धरत नाहीत आणि आपले सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात योगदान कोणत्याही मोबदल्याशिवाय देतात. आज ईदसारख्या सणांच्या काळात त्यांचे मुस्लिम बांधवांशी असलेले आपुलकीचे नाते अधिकच दृढ दिसत होते. ते दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक मुस्लिम कुटुंबाशी भेटून ‘ईद मुबारक’ देत होते – हे केवळ स्नेहाचे दर्शन नव्हते, तर दोन धर्मांतील सौहार्दाचा खरा झरा होता.पाचोऱ्यातील इतर भागांमध्येही येवले कुटुंबाची ही सौहार्द परंपरा सगळीकडे पोहोचलेली आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात जाताना, विशेषतः सणाच्या काळात, त्यांना अडथळा येत नाही. उलट त्यांच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. हेच तर एका खऱ्या हिंदुस्थानी कुटुंबाचे लक्षण आहे – जिथे सण-उत्सव साजरे होतात, पण इतर धर्मांच्या सणांना देखील तितकाच सन्मान दिला जातो. आज देशात अनेक भागांमध्ये धर्माच्या नावावर तेढ निर्माण होतो, समाजात फूट पडते, आणि राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन होते. अशा काळात पाचोऱ्यातील येवले कुटुंब ही एक अशी मशाल आहे, जी अंधारात प्रकाश देणारे कार्य करत आहे. त्यांच्या कृतीतून हेच दिसून येते की, आपल्याला धर्माच्या आधारावर भांडायचे नसून, एकमेकांचा सन्मान करत एकत्र राहायचे आहे.अशा समाजघडवणाऱ्या कुटुंबांची गरज आज प्रत्येक गावात, शहरात आणि राज्यात आहे. अनिलआबा येवले आणि त्यांचा परिवार हे या संदर्भात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. सणांचा खरा अर्थ केवळ उत्सव नव्हे, तर माणसांमध्ये बंध निर्माण करणे असतो – आणि हे बंध जितके गहिरे, तितका समाज अधिक सशक्त. येवले कुटुंब आणि त्यांची परंपरा हेच सांगते की, जाती, धर्म, भाषा, वेष – या सर्वांच्या पलीकडे जाऊन जर काही शिल्लक राहत असेल, तर ती आहे माणुसकी.

राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर थरारक विजय: नितीश राणाची आक्रमक खेळी

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या ११व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या नितीश राणाने ३६ चेंडूत ८१ धावांची दणकेबाज खेळी करत सामना फिरवला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. चेन्नईचा डाव शेवटच्या षटकापर्यंत रंगला, मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी योग्यवेळी विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि २० षटकांत १८२/९ अशी लढाऊ धावसंख्या उभारली. नितीश राणाने जबरदस्त खेळी करत ८१ धावा केल्या, त्याला कर्णधार रियान परागने ३७ धावांची मदत केली. चेन्नईच्या गोलंदाजांमध्ये सईद खलील अहमद, नूर अहमद आणि मथीशा पथिराना यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या, तर रवीचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजानेही १-१ गडी बाद केला.
१८३ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने दमदार सुरुवात केली नाही. राचिन रवींद्र शून्यावर बाद झाला, मात्र रुतुराज गायकवाडने (६३) जबाबदारी घेत संघाला सावरले. मधल्या फळीत शिवम दुबे आणि विजय शंकर अपयशी ठरले, पण अखेरच्या षटकांत रवींद्र जडेजाने (३२*) आणि महेंद्रसिंग धोनीने (१६) फटकेबाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेले. मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत ६ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केला.
वानिंदू हसरंगाने ४ विकेट्स घेत चेन्नईच्या डावाला खिळखिळे केले, तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मानेही निर्णायक विकेट्स मिळवल्या. राजस्थानच्या अचूक गोलंदाजीमुळे चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती, पण त्यांनी फक्त ६ धावा काढल्या आणि सामना गमावला.
राजस्थान रॉयल्सच्या नितीश राणाला ८१ धावा (३६ चेंडू, १० चौकार, ५ षटकार) च्या स्फोटक खेळीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.
या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत झेप घेतली असून पुढील सामन्यासाठी आत्मविश्वास मिळवला आहे.

उद्याचा सामना:-
उद्या ३१ मार्च २०२५ रोजी, इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सायंकाळी ७:३० वाजता खेळवला जाणार आहे.
हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वाचा आहे, कारण ते त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल, तर कोलकाता नाइट राइडर्स त्यांच्या अलीकडील विजयामुळे आत्मविश्वासाने मैदानात उतरतील.

स्वाभिमान विकून मिळणारा पुरस्कार: आधुनिक काळातील नवा तमाशा

0

Loading

आजचा समाज अनेक अर्थांनी बदललेला आहे. कुठलीही गोष्ट तिच्या मूळ हेतूपासून कधी आणि कशी दूर जाते, हे लक्षातही येत नाही. अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे “पुरस्कार” ही संकल्पना. एकेकाळी पुरस्कार म्हणजे कार्याचा गौरव, सामाजिक सन्मान आणि निस्वार्थ कर्तृत्वाची पोचपावती समजली जात होती. आज मात्र हीच संकल्पना एका वेगळ्याच स्वरूपात आपल्यासमोर उभी राहते आहे. ज्या व्यक्तीची शैक्षणिक,सामाजीक,नैतिक पातळी नाही, जे स्वतः१ रुपया सुध्दा स्व कमाई करत नाही अशा लोकांनी सुद्धा आता कट्याच्या हॉटेलवर पुरस्कार विक्रीचे व देण्याचे दुकान उभारले आहे, ज्याला किंमत ठरवता येते, मागणी करता येते आणि विक्री देखील होऊ शकते. त्याचा दर्जा, त्यामागचा हेतू, तो देणाऱ्या संस्थेचे विश्वासार्हत्व आणि तो स्वीकारणाऱ्याची पात्रता – या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरल्या आहेत. सध्या एक नवाच प्रकार उदयाला आला आहे, जिथे काही संस्था, संघटना किंवा गट पुरस्काराच्या नावाने लोकांकडून पैसे गोळा करतात. हे पैसे कधी “नोंदणी शुल्क” म्हणतात, कधी “कार्यक्रम व्यवस्थापन खर्च”, तर कधी “संस्थेच्या उपक्रमांना मदत” असे गोंडस नाव देतात. पण प्रत्यक्षात ते पैसे म्हणजे त्या तथाकथित पुरस्काराची किंमत असते. त्या बदल्यात मोठ्या रंगमंचावर झगमगत्या लाईटखाली ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि एका ढोबळ भाषणात “आदरणीय”, “गौरवशाली”, “आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त”, “सन्माननीय” असे विशेषण लावून साजरं केलं जातं. ही प्रक्रिया बघताना आपण एखाद्या नाटकाचा भाग आहोत असं वाटावं, इतकी ती कृत्रिम आणि अभिनयपूर्ण असते. या पार्श्वभूमीवर एक जुनी पण समर्पक म्हण पुन्हा आठवते – “भिक नको, कुत्रं आवर”. अनेक स्वाभिमानी व्यक्ती हीच म्हण जपतात. त्यांना अशा खोट्या पुरस्कारांची भिक नको असते, आणि त्यामुळे त्यासाठी मागे लागणाऱ्या संस्थांची कुत्रीगिरी आवडत नाही. पण हे तसंच थांबत नाही. जेव्हा या व्यक्तींनी असे पुरस्कार घेण्यास नकार दिला, तरी संस्थांचे लोक त्यांच्या कार्यालयात, घरी, अगदी ते जिथे असतील तिथे जाऊन जबरदस्तीने फोटो काढतात, त्यांना काहीतरी वस्तू हाती देतात, फोटोत स्मितहास्याने उभे करतात आणि मग तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात. हा प्रकार इतका चकित करणारा असतो की पुरस्कार घेणाऱ्यालाही काही वेळा कळत नाही की तो सन्मानित झाला की विनाकारण ओढला गेला. हे एकप्रकारे मानसिक आणि सामाजिक अतिक्रमणच आहे. या सगळ्या प्रकरणाचा मुख्य उद्देश असतो प्रसिद्धी मिळवणं. सोशल मीडियाच्या जमान्यात कोण किती फोटोमध्ये झळकतो, कोणाच्या पोस्टवर किती लाईक्स, कमेंट्स आणि शेअर मिळतात, यावर त्याचं सामाजिक स्थान मोजलं जातं. त्यामुळे “पुरस्कारप्राप्त” असा टॅग मिळवणं म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी सोपी पायरी ठरते. त्यामुळेच बऱ्याच लोकांचा पुरस्कार म्हणजे “फोटो सेशन” आणि “कॅप्शन पोस्ट” एवढाच अर्थ असतो. काही ठिकाणी तर याचे पॅकेजेस तयार झाले आहेत – इतके पैसे दिले की अमुक प्रकारचा पुरस्कार, त्यात फोटो, सोशल मीडिया पोस्ट, मीडिया कव्हरेज आणि कार्यक्रमातील एक छोटं भाषण मोफत मिळतं. दुर्दैव म्हणजे, या चमकधमकीच्या दुनियेत खरं कार्य करणारे लोक मागे पडतात. जे खरोखरच समाजासाठी झगडतात, जनतेच्या प्रश्नांवर काम करतात, गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवतात, ते या पुरस्काराच्या बाजारात सहभागी होत नाहीत. कारण त्यांना माहित असतं की त्यांच्या कार्याची किंमत केवळ एखाद्या ट्रॉफीने होणार नाही. पण त्याचमुळे अशा कार्यकर्त्यांचं समाजात फारसं नाव होत नाही. त्यांची कामगिरी विस्मृतीत जाते आणि वर वरची सजावट करणारे लोक मात्र पुढे जातात. याला जबाबदार आपण सगळेच आहोत. कारण आपण सत्यापेक्षा प्रदर्शनाला महत्त्व देतो, आपली वाहवा हेच खरं मापदंड मानतो. या सगळ्या प्रक्रियेमुळे एक खोटं आणि बनावटीचं समाजचित्र निर्माण होतं. जेव्हा कोणी फोटोवरून, कागदावरून आणि मीडिया पोस्टवरूनच एखाद्याचं मूल्य ठरवतं, तेव्हा त्यामागचं खोटेपण उघड दिसतं. अनेकदा काही लोक या सगळ्या गोष्टींचा भाग होऊन नंतर लाजतात, कारण त्यांच्या हातात काहीच ठरत नाही. ते पुरस्कार घ्यायला तयार नसतात, पण संस्थेचे लोक त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःचा प्रचार करतात. यात त्या व्यक्तीचं खोटं प्रतिनिधित्व होतं आणि संस्थेला प्रसिद्धी मिळते. एकप्रकारे ही फसवणूकच असते, पण ती प्रतिष्ठेच्या आवरणात लपलेली असल्यामुळे त्याला कोणी आवाज उठवत नाही. या सर्व प्रकारावरून असे वाटते की पुरस्कार देणाऱ्या संस्था आणि संघटनांनी आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. पूर्वी संस्था त्या व्यक्तीच्या कार्यावर, सामाजिक योगदानावर आणि दीर्घकालीन परिणामावर आधारित निर्णय घेत असत. आज मात्र त्यांना पाहिजे असतो – देणारा, प्रसिद्ध व्यक्ती, ज्याचं नाव वापरून त्यांची संस्था झळकू शकेल, ज्याने भरपूर फॉलोअर्स कमावले असतील, आणि ज्याच्याकडून काही “परतावा” मिळू शकेल. त्यामुळे अनेकवेळा कार्य नव्हे तर संपर्क, समाजसेवा नव्हे तर प्रसिद्धी, आणि प्रयत्न नव्हे तर प्रतिष्ठा पाहून पुरस्कार दिला जातो. अशा परिस्थितीत पुरस्कार घेण्याऐवजी नकार देणं हे स्वाभिमानाचं लक्षण आहे. काही लोक ठामपणे सांगतात की त्यांना हे बनावट खेळ नको आहेत. ते आपलं काम करत राहतात, कोणताही पुरस्कार न मागता, कोणतीही प्रसिद्धी न शोधता. पण तरीही संस्थांचे लोक त्यांच्या मागे लागतात. कारण त्यांना माहित असतं की या व्यक्तींचं नाव वापरलं, फोटो टाकला, की त्यांना आपोआप प्रसिद्धी मिळेल. हाच स्वार्थी विचार पुरस्काराच्या संकल्पनेला काळं करत आहे. मूलतः पुरस्कार ही एक सकारात्मक, प्रेरणादायक गोष्ट असायला हवी. ते व्यक्तीला केवळ सन्मान देण्यासाठी नव्हे, तर इतरांना प्रेरणा देण्यासाठी दिले जातात. पण जेव्हा पुरस्कार ही खरेदी-विक्रीची वस्तू बनते, तेव्हा त्यामागची प्रेरणादायक भावना संपून जाते. मग ती केवळ फोटो, व्हिडीओ, भाषणं आणि सोशल मीडिया पोस्ट्स यापुरती मर्यादित राहते. अशावेळी सच्च्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की – त्याने खरं काम करावं की केवळ फोटोसाठी काहीतरी करावं? या संपूर्ण प्रक्रियेत समाजाचंही एक मोठं योगदान आहे. कारण समाज अशा प्रकारांवर प्रश्नच विचारत नाही. कोणी पुरस्कार घेतो, तर आपण लगेच “अभिनंदन” म्हणतो. कोणी फोटो पोस्ट करतो, तर आपण त्याला “आदर्श” म्हणतो. पण आपण कधी विचारतो का – हा पुरस्कार कशासाठी दिला गेला? त्यामागचा खरा निकष काय होता? त्या व्यक्तीनं नेमकं काय केलं? आपण हे विचारायला शिकलो, तरच बनावटपणा थांबेल. नाहीतर खोटेपणाचं प्रमाण वाढत जाईल, आणि खरं काम करणारे लोक उपेक्षित राहतील. हे सगळं थांबवायचं असेल, तर सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने आपल्या मूल्यांचा पुनर्विचार केला पाहिजे. आपण प्रतिष्ठेच्या हव्यासात फसतो का? आपल्याला सामाजिक सन्मान खरा हवाय की केवळ त्याचा देखावा? आपण काय करत आहोत आणि का करत आहोत, हे जाणून घेतलं तरच आपण हे अपप्रवृत्ती ओळखू शकतो. संस्थांनी आपली निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवली पाहिजे. पुरस्कार देताना फक्त कामाची गुणवत्ता आणि परिणाम पहिला गेला पाहिजे, ओळख किंवा पैसे नव्हे. तसेच पुरस्कार घेणाऱ्यानेही विचार केला पाहिजे की, तो कुठल्या हेतूने ते स्वीकारतो – खऱ्या गौरवासाठी की केवळ सोशल मीडियासाठी? आपण सगळ्यांनी मिळून जर पुरस्कारांची ही विकृत दिशा बदलायची असेल, तर प्रत्येक स्तरावर विचार करावा लागेल. बनावट कार्यक्रमांना, बनावट सन्मानांना, आणि बनावट गौरवांना नकार द्यावा लागेल. समाजात खरं काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, कार्यकर्ते आणि सेवाभावी लोक यांना पुढे आणावं लागेल. त्यांच्या कामाचं खरेदेमूल्य मानावं लागेल. पुरस्कार ही प्रेरणादायी गोष्ट परत व्हावी, यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. कारण शेवटी स्वाभिमान म्हणजे व्यक्तीच्या मूल्यांचा आरसा असतो. आणि पुरस्कार म्हणजे त्या स्वाभिमानाला मिळालेली मान्यता असते. ती मान्यता ही खरं योगदान पाहून मिळाली पाहिजे, नुसत्या प्रसिद्धीच्या भंपक दिखाव्याने नाही. अन्यथा, आपण अशा समाजात जगत राहू जिथे सन्मान विकले जातील, पण सन्माननीय व्यक्ती हरवतील.

गुढीपाडव्याच्या मंगलप्रसंगी सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडून शुभेच्छा

0

Loading

पाचोरा शहराच्या मध्यवर्ती महाराणा प्रताप चौकात वसलेले सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सेवा, समर्पण आणि विश्वास यांचे प्रतीक बनले आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधांसह ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार उपचार देण्याच्या उद्देशाने या रुग्णालयाची स्थापना झाली असून, “मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा… निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण…” हे त्यांचे ब्रीदवाक्य आज समाजात ठसठशीतपणे उमटले आहे. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंगलप्रसंगी हॉस्पिटलच्या वतीने सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, हा नववर्षसण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन यावा, ही सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलकडून आरोग्य जनजागृती उपक्रम, तपासणी शिबिरे आणि विविध सेवा देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यसेवा यांची सांगड घालत सिद्धीविनायक हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत व दर्जेदार उपचार पुरवत आहे. या योजनांच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधोपचार आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. हॉस्पिटलचा प्रशासन विभाग अत्यंत पारदर्शकतेने आणि तत्परतेने या योजनांची अंमलबजावणी करत आहे. या योजनांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीव वाचवणारे उपचार वेळेवर मिळाले आहेत. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स हे अत्यंत कुशल, अनुभवी आणि सेवाभावाने कार्य करणारे आहेत. डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील या MBBS व DCH (पुणे) पदव्या प्राप्त केलेल्या असून, त्यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथून MBBS शिक्षण घेतले आहे आणि यशवंत चव्हाण शासकीय रुग्णालय, पुणे येथून बालरोगातील पदविका पूर्ण केली आहे. त्या बालकांच्या आरोग्यसेवेसाठी विशेषतः नवजात अर्भकांच्या देखभालीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल सेवेने अनेक नवजात बालकांचे प्राण वाचले असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉ. स्वप्निल प्रल्हाद पाटील हे MBBS व MD (Medicine) पदवी प्राप्त असून, MD मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. त्यांनी सायन हॉस्पिटल, मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण घेतले असून, जसलोक हॉस्पिटल, मुंबई येथील क्रिटिकल केअर विभागात कार्यानुभव घेतलेला आहे. ते हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, संक्रामक रोग व इतर अंतर्गत वैद्यकीय आजारांवरील उपचारांमध्ये तज्ज्ञ आहेत. रुग्णांच्या मानसिक आणि सामाजिक बाजूंनाही समजून घेत, ते एक समग्र उपचारपद्धती राबवतात. त्यांच्या अनुभव आणि संवेदनशीलतेमुळे अनेक गंभीर रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. हॉस्पिटलमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. यामध्ये मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी, इमर्जन्सी सेवा, ईसीजी, फिजिओथेरपी आदी सुविधा एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळून उपचार प्रक्रियेचा कालावधी कमी होतो आणि त्याचा थेट लाभ रुग्णांना होतो. हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांसाठी विशेष देखभाल कक्ष, मधुमेह आणि हृदयरोग यांसाठी विशेष तज्ज्ञांचे सल्ले, तसेच नियमित तपासणीसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. रुग्णसेवेबाबत हॉस्पिटलने घेतलेली सामाजिक बांधिलकी आजवरच्या अनेक रुग्णांच्या अनुभवांतून दिसून येते. अनेक रुग्णांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि कौतुकाच्या शब्दांनी हॉस्पिटलच्या कार्यक्षमता आणि निष्ठेची प्रचिती येते. ही संस्था केवळ वैद्यकीय उपचार पुरवते असे नाही, तर ती एक विश्वासाचे स्थान म्हणून पाचोरा परिसरात उदयास आलेली आहे. हॉस्पिटलचा पत्ता आहे – पहिला मजला, एस. एस. पाटील कन्स्ट्रक्शन ऑफिस, गजानन पेट्रोल पंप समोर, महाराणा प्रताप चौक, पाचोरा. अधिक माहितीसाठी 02596-244136 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा +91 7709105764 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र हे नवचैतन्याचे, नवसंकल्पांचे प्रतीक आहेत. या शुभदिनी सिद्धीविनायक हॉस्पिटलकडून आरोग्यसेवेचे नवे संकल्प घेतले जात आहेत. आधुनिक सुविधा, सेवा देणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची टीम आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हे हॉस्पिटल पाचोऱ्यातील जनतेसाठी एक मोठे आरोग्यधाम ठरत आहे. नवा वर्षारंभ आरोग्यपूर्ण ठरावा, हीच त्यांच्या शुभेच्छांमागची खरी भावना आहे.

गुजरात टायटन्सची मुंबई इंडियन्सवर ३६ धावांनी मात

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १९६ धावा केल्या.
साई सुदर्शनच्या फलंदाजीच्या चमकदार कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून विजयाचे खाते उघडले. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सुदर्शनच्या अर्धशतकाच्या मदतीने २० षटकांत आठ बाद १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला निर्धारित षटकांत सहा गडी

गमावून फक्त १६० धावा करता आल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४८ धावा केल्या, तर तिलक वर्माने ३९ धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त, इतर कोणीही प्रभावित करू शकले नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण त्यांनी रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांच्या विकेट खूप लवकर गमावल्या. नंतर, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव डळमळीत झाला. मुंबईचा हा दुसरा पराभव आहे आणि त्यांना आयपीएल २०२५ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ११, रोहित शर्माने आठ, रिकलटनने सहा आणि रॉबिन मिंजने तीन धावा केल्या. याशिवाय, नमन धीर आणि मिशेल सँटनर १८-१८ धावा करून नाबाद परतले. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडा आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुदर्शनच्या ४१ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६३ धावांच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत आठ गडी गमावून १९६ धावा केल्या. सुदर्शन वगळता गुजरातचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्याने दोन, तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला गिल आणि सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. गिल २७ चेंडूत ३८ धावा काढून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर, जोस बटलरने सुदर्शनसह ५१ धावा जोडल्या, परंतु तो ३९ धावा करून तंबूमध्ये परतला. त्यानंतर सुदर्शनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले आणि काही चांगले फटके खेळले. सुदर्शन बाद होताच गुजरातचा डाव मंदावला आणि तो २०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. गुजरातकडून शेरफेन रदरफोर्डने १८ धावा, शाहरुख खानने नऊ धावा, रशीद खानने सहा आणि आर साई किशोरने एक धाव केली, तर कागिसो रबाडा सात धावा काढून नाबाद राहिला.
या विजयासह गुजरातने गुणतक्त्यामध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. दरम्यान, मुंबईची नवव्या स्थानावर घसरण झाली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाचे आता दोन गुण झाले आहेत आणि त्यांची निव्वळ धावगती ०.६२५ आहे. त्याच वेळी, सलग दोन सामने गमावल्यानंतर, मुंबईची निव्वळ धावगती -१.१६३ झाली. अव्वल स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आहे, ज्यानी त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये उद्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – दोन थरारक सामने होणार आहेत.
पहिला सामना – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम येथे दुपारी ३:३० होणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चांगली लय दाखवली असून, त्यांचे धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ फॉर्मात आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधार एडन मार्करमकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या संघात हेनरिक क्लासेन, राहुल त्रिपाठी आणि अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांसारखे खेळाडू आहेत, जे दिल्लीच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर दुसरा सामना – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये बरसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी ७:३० वाजता रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ दमदार फॉर्मात असून, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची जोडी आतापर्यंत प्रभावी ठरली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला एम. एस. धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा आहे. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत. गुवाहाटीच्या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता आहे.
उद्याच्या दोन्ही सामन्यांत प्रेक्षकांना रोमहर्षक लढती पाहायला मिळणार आहेत. कोणते संघ विजय मिळवतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!

ताज्या बातम्या

error: Content is protected !!