सण-उत्सव ही केवळ धार्मिक भावना नव्हे, ती समाजात ऐक्य, आपुलकी, सौहार्द आणि माणुसकी जागवणारी एक अनमोल संधी असते. भारताच्या सामाजिक रचनेत, विशेषतः महाराष्ट्रासारख्या विविधतेने नटलेल्या राज्यात, ही भावना अधिक गहिरतेने अनुभवता येते. असाच एक सजीव अनुभव यंदाच्या रमजान ईदच्या निमित्ताने पाचोरा शहरात पाहायला मिळाला – ते म्हणजे येवले (वाणी) कुटुंब आणि त्यांच्या घराण्याच्या परंपरेनुसार वर्षानुवर्षे जोपासले जात असलेले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण मुळगाव गोंदेगाव (ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) येथून व्यवसायासाठी पाचोरा शहरात स्थायिक झालेल्या स्व. कालिदास रामचंद्र येवले यांच्या परिवाराने केवळ उद्योगाच्या माध्यमातून नव्हे, तर सामाजिक समतेच्या विचारातूनही आपल्या अस्तित्वाची ठसा उमठवला आहे. पाचोऱ्यातील बहुसंख्य मुस्लिम धर्मीय असलेल्या जंगी मोहल्ला या भागात ते वर्षानुवर्षे सौहार्दाने राहात असून, स्थानिक मुस्लिम समाजाशी त्यांच्या संबंधांमध्ये हट्ट स्नेह आणि परस्पर आदराचं नातं आहे. अशा सामंजस्यपूर्ण सहजीवनाचे बीज अगदी जुन्या पिढीकडून पेरले गेले आहे आणि आजही नव्या पिढीकडून त्याचे संवर्धन होत आहे.हे कुटुंब म्हणजे समाजात शांततेने, सीमित गरजांमध्ये, परिश्रमपूर्वक, स्वतःच्या उद्योगावर विश्वास ठेवून जीवन जगणाऱ्या वाणी समाजाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक तेढाच्या प्रसंगातही येवले परिवार हा नेहमी सौम्य, संयमी आणि समन्वयकारी भूमिका घेत आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांतील दोन मोठ्या हिंदू-मुस्लिम दंगलीतही जंगी मोहल्लात राहत असलेला हा परिवार समाजाच्या एकीच्या पूलासारखा कार्यरत राहिला. केवळ स्वतःला अलिप्त ठेवणे नव्हे, तर दोन्ही समाजात समजूत घालून शांतता प्रस्थापित करण्यातही त्यांची भूमिका मोलाची ठरली.आज या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील अतुल विश्वनाथ येवले, चेतन येवले, अश्विन रमेश येवले, रजनीकांत रमेश येवले, तेजस अनिल येवले हे तरुण या परंपरेचे जतन करीत आहेत. ईद, बकरी ईद, रमजान, तसेच दिवाळी, गणेशोत्सव, रामनवमी – कोणताही सण असो, या कुटुंबासाठी सण म्हणजे सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन साजरा करण्याची संधी असते. ईदच्या दिवशी त्यांच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मुस्लिम बांधवांच्या घरी भेटी देतात, त्यांना शुभेच्छा देतात नव्हे तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात ही परंपरा कोणत्याही दिखाव्याशिवाय, माणुसकीच्या नात्यावर आधारलेली आहे. या एकतेच्या वातावरणाला अधिक अधोरेखित करणारी व्यक्ती म्हणजे अनिलआबा येवले. समाजात संवाद, ऐक्य आणि जागरूकतेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे अनिलआबा हे त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ बातम्या देत नाहीत, तर दोन समाजांमधील पूल बनून कार्य करतात. सिटीझन जर्नलिझमच्या माध्यमातून कोणतीही प्रसिद्धी न सांगता ते समाजाच्या मूळ गरजांवर प्रकाश टाकतात. त्यांचा आवाज कोणत्याही राजकीय हेतूपासून दूर असून, माणुसकीच्या आणि सच्चेपणाच्या तत्त्वांवर आधारित आहे.त्यांचे कार्य त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक जडणघडणीचा एक भाग आहे. अनिलआबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सतत पायी फिरणारे कोणी गाडीवर लिफ्ट दिली तर बसणार नाहीतर आपली ११ नं जिंदाबाद असे स्वाभिमानी, कष्टाळू आणि निर्व्यसनी राहणीचा आदर्श अनिलआबा! ते कधीच कोणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत, कुठलाही राजकीय पाश धरत नाहीत आणि आपले सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात योगदान कोणत्याही मोबदल्याशिवाय देतात. आज ईदसारख्या सणांच्या काळात त्यांचे मुस्लिम बांधवांशी असलेले आपुलकीचे नाते अधिकच दृढ दिसत होते. ते दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक मुस्लिम कुटुंबाशी भेटून ‘ईद मुबारक’ देत होते – हे केवळ स्नेहाचे दर्शन नव्हते, तर दोन धर्मांतील सौहार्दाचा खरा झरा होता.पाचोऱ्यातील इतर भागांमध्येही येवले कुटुंबाची ही सौहार्द परंपरा सगळीकडे पोहोचलेली आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात जाताना, विशेषतः सणाच्या काळात, त्यांना अडथळा येत नाही. उलट त्यांच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. हेच तर एका खऱ्या हिंदुस्थानी कुटुंबाचे लक्षण आहे – जिथे सण-उत्सव साजरे होतात, पण इतर धर्मांच्या सणांना देखील तितकाच सन्मान दिला जातो. आज देशात अनेक भागांमध्ये धर्माच्या नावावर तेढ निर्माण होतो, समाजात फूट पडते, आणि राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन होते. अशा काळात पाचोऱ्यातील येवले कुटुंब ही एक अशी मशाल आहे, जी अंधारात प्रकाश देणारे कार्य करत आहे. त्यांच्या कृतीतून हेच दिसून येते की, आपल्याला धर्माच्या आधारावर भांडायचे नसून, एकमेकांचा सन्मान करत एकत्र राहायचे आहे.अशा समाजघडवणाऱ्या कुटुंबांची गरज आज प्रत्येक गावात, शहरात आणि राज्यात आहे. अनिलआबा येवले आणि त्यांचा परिवार हे या संदर्भात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. सणांचा खरा अर्थ केवळ उत्सव नव्हे, तर माणसांमध्ये बंध निर्माण करणे असतो – आणि हे बंध जितके गहिरे, तितका समाज अधिक सशक्त. येवले कुटुंब आणि त्यांची परंपरा हेच सांगते की, जाती, धर्म, भाषा, वेष – या सर्वांच्या पलीकडे जाऊन जर काही शिल्लक राहत असेल, तर ती आहे माणुसकी.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.