Home Blog Page 58

पाचोरा शहरात गणेशोत्सवासाठी सुरेख व अध्यात्मिक स्पर्श असलेल्या गणरायाच्या मूर्ती – ‘सलोनी सिलेक्शन’ जामनेर रोड येथे उपलब्ध

0

Loading

पाचोरा – गणेशोत्सव जवळ येताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. या पवित्र वातावरणात भाविकांना दर्जेदार व आकर्षक मूर्ती सहज मिळाव्यात यासाठी जामनेर रोडवरील ‘सलोनी सिलेक्शन’ येथे पारंपरिकतेचा व

आधुनिकतेचा संगम असलेल्या गणेशमूर्तींचा विशेष संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे लहान घरगुती मूर्तींपासून ते मोठ्या मंडळांसाठी भव्य मूर्तीपर्यंत विविध पर्याय आहेत. प्रत्येक मूर्तीचा चेहरा भावपूर्ण, डोळ्यांमध्ये तेज आणि अलंकारातील कलाकुसर भक्तांना वेगळाच अध्यात्मिक अनुभव देते. आकर्षक रंगसंगती, उत्कृष्ट शिल्पकला आणि पर्यावरणपूरक साहित्यामुळे या मूर्तींना विशेष मागणी आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धेनुसार बाप्पाला घरी आणतो आणि त्यासाठी योग्य मूर्तीची निवड महत्त्वाची ठरते. ‘सलोनी सिलेक्शन’मध्ये सर्व प्रकारच्या बजेटसाठी मूर्ती उपलब्ध असल्याने भाविकांची सोय होते. महेंद्र खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शोरूम भाविकांच्या सेवेत कार्यरत आहे. इच्छुकांनी थेट संपर्क साधून मूर्ती आरक्षित करण्याची सोयही उपलब्ध आहे. संपर्क क्रमांक आहे – 94 22 97 87 95. शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर भेट देवून आपली आवडती मूर्ती निवडावी. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे मोठी गर्दी अपेक्षित आहे. पारंपरिकता, आधुनिकता व अध्यात्मिक भाव यांचे अनोखे मिश्रण असलेल्या या मूर्ती नक्कीच आपल्या घरातील उत्सव अधिक संस्मरणीय करतील. सुख-समृद्धी, सौख्य आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या गणेशमूर्तींसाठी ‘सलोनी सिलेक्शन’, जामनेर रोड, पाचोरा येथे नक्की भेट द्या.

“मंडळांनी मूर्तींची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवावी” – आमदार किशोरआप्पा पाटील

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – पाचोरा तालुका नेहमीच सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो. या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव तसेच ईद-दुर्गोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातील शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनामध्येअप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भूषवले होते. व्यासपीठावर प्रभारी डीवायएसपी बापूजी रोहन, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, विद्युत मंडळाचे भरत उकलकर आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वर्मा हे मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये एपीआय संजय निकम, पीएसआय योगेश गनगे, पीएसआय ठाकूर यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, स्थानिक पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपालिकेचे अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटक उपस्थित होते. या बैठकीची विशेष बाब म्हणजे शांतता समितीतील सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य आणि विविध मंडळांचे पदाधिकारी यांना यावेळी स्वतंत्र निमंत्रण देण्यात आल्यामुळे सभागृहात केल्या अनेक वर्षानंतर अभूतपूर्व गर्दी होती. बैठकीच्या प्रारंभी एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांचा वाढदिवस असल्याने आमदार किशोरआप्पा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रमाला एक उत्साहवर्धक सुरुवात करून दिली. यानंतर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे येणाऱ्या उत्सव काळात सामाजिक शांतता राखणे, धार्मिक ऐक्य वृद्धिंगत करणे, सर्व समाजघटकांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय उत्सव साजरे करणे आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबविल्या जातील, असे आश्वासनही दिले. बैठकीत आलेल्या प्रत्येक सदस्याने उत्साहाने आपले विचार मांडले. अनेकांनी गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव यामध्ये परस्पर समन्वय राखण्यावर भर दिला. विशेषतः धार्मिक एकता, सामाजिक शांतता, युवकांचा सकारात्मक सहभाग, तसेच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढविण्याची आवश्यकता यावर ठोस चर्चा झाली. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले, “गणेशोत्सवामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येक मंडळाने नियोजन समितीत महिलांना स्थान द्यावे. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित होईल आणि उत्सव अधिक समृद्ध, सुसंस्कृत बनेल.” त्यांनी महसूल विभाग आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, ‘एक खिडकी अभियान’ राबवून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. “मंडळांना परवानगीसाठी इथे-तिथे भटकावे लागू नये. कुठल्याही प्रकारची सक्ती, त्रास अथवा लाचलुचपत होऊ नये. तसेच प्रत्येक मंडळाकडे एक जबाबदार कर्मचारी पहिल्या दिवसापासून विसर्जनापर्यंत नियुक्त असावा,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांना आवाहन केले की, प्रत्येक मंडळाने स्वतःकडे स्वयंसेवकांची स्वतंत्र टीम ठेवावी, जेणेकरून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. उत्सव हे आनंद साजरे करण्याचे दिवस आहेत, परंतु थोडीशी बेफिकिरी गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे प्रत्येक मंडळ जबाबदारीने काम करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.बैठकीचा उत्कर्ष बिंदू म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे समारोपात्मक मार्गदर्शन. त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत मंडळांना आवाहन केले – “मंडळांनी मूर्तींची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढवावी. समाजात सौहार्द, संस्कार आणि सद्भावना वाढवणे हीच खरी प्रगती आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक संस्कारांचे शाळा आहे. त्यामुळे युवकांनी आणि मंडळांनी यामधून सकारात्मकतेचे बीज पेरावे.” त्यांनी विज वितरण कंपनीला विशेषतः सूचना दिल्या की, उत्सव काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये. शाळा, स्थानिक समाजसंस्था आणि मंडळ यांच्यात समन्वय वाढवून अधिक सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. बैठकीदरम्यान पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी युवकांना भुरळ घालणाऱ्या अमली पदार्थांच्या धोक्याविषयी इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले, “गणेशोत्सवामध्ये अमली पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. स्वच्छ, सुरक्षित आणि सांस्कृतिक वातावरणात उत्सव साजरा झाला तर त्यातून पुढील पिढ्यांनाही सकारात्मक प्रेरणा मिळेल.” या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने काही ठोस निर्णय घेतले. प्रत्येक मंडळाने महिलांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करणे, महसूल विभाग व नगरपालिकेकडून ‘एक खिडकी अभियान’ राबविणे, वर्गणी घेताना कुठल्याही प्रकारची सक्ती न करणे, प्रत्येक मंडळाकडे एक कर्मचारी संपूर्ण उत्सव काळात कार्यरत ठेवणे, अमली पदार्थ मुक्त उत्सव साजरा करणे, गणेश मूर्तींची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवणे, वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची दक्षता घेणे आणि सुरक्षिततेसाठी पोलिस पथके व स्वयंसेवक तैनात करणे यावर सर्वांचे एकमत झाले. या शांतता समिती बैठकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सदस्याला मुक्तपणे आपले मत मांडण्याची संधी मिळाली. कोणावरही बंधने किंवा दडपण नसल्याने सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. महिला प्रतिनिधींचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला. पत्रकार बांधवांची उपस्थितीही महत्त्वाची ठरली. सदस्यांनी व्यक्त केले की, “गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव हे समाजाला एकत्र आणणारे सण आहेत. प्रशासन, पोलीस, मंडळे, समाजसंस्था आणि नागरिक यांनी मिळून हे उत्सव साजरे केल्यास तालुक्यात आदर्श निर्माण होईल.” राष्ट्रगीताच्या गजरात या बैठकीचा समारोप झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिवाजी शिंदे यांनी केले यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने ठरवले की, पाचोरा तालुक्यातील गणेशोत्सव व ईद-दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकी, धार्मिक ऐक्य आणि सुरक्षिततेचा आदर्श ठरेल. या बैठकीतून एक सकारात्मक संदेश बाहेर गेला – “गणेशोत्सवाचा खरा गाभा केवळ मूर्तीची उंची नव्हे, तर समाजातील विचारांची उंची आहे.”

शेतकऱ्यांच्या अनुदानातील घोटाळा : पत्रकार संदीप महाजन आमरण उपोषणाला सज्ज, आता शेतकऱ्यांकडून लेखी घेण्याचा प्रयत्न

0

Loading

पाचोरा: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात झालेल्या गंभीर घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा हडप झाल्याचा प्रकार प्रकाशझोतात आल्यानंतर आता परिस्थिती नव्या वळणावर पोहोचली आहे. पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी या प्रकरणात आवाज उठवला आणि दिनांक 1 सप्टेंबर 2025 पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, संबंधितांनी आता शेतकऱ्यांकडे जाऊन “आम्हाला अनुदानाची रक्कम मिळाली आहे” असे लेखी घेण्याची मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सन 2023-24 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील तब्बल 52,689 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. त्यासाठी शासनाकडून 70 कोटी 16 लाख 53 हजार 240 रुपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र या अनुदानाचे वितरण करताना 39 शेतकऱ्यांच्या सुमारे 14 लाख 50 हजार रुपयांची रक्कम परस्पर इतरांच्या खात्यात वळवण्यात आली. प्रशासनाने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. आतापर्यंत 4 लाख 63 हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याचे देखील समजते उर्वरित रक्कम चार दिवसांत वसूल होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे मात्र, केवळ नोटिसा बजावणे किंवा वसुलीवर समाधान न मानता हे थेट गुन्हेगारी कृत्य असल्याने SIT अथवा आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे.व आजही ती कायम आहे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई न झाल्यास, ते 1 सप्टेंबरपासून अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.त्यावर ते ठाम आहेत
घोटाळा उघड झाल्यानंतर काही संबंधित ज्या शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यात वर्ग झाले होते, त्या शेतकऱ्यांकडे जाऊन, “आम्हाला ती रक्कम मिळाली आहे” अशा आशयाचे लेखी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पत्रकार महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “आज तुम्हाला दारापर्यंत येऊन पैसे देणारे ओळखा लक्षात ठेवा हेच लोक आहेत, ज्यांच्या दारापर्यंत तुम्ही मदतीसाठी फिरत होता.
म्हणून आता तुम्ही कोणाच्या पाठीशी राहायचे हे ठरवा. आज जर तुम्ही लेखी दिले, तर उद्या तुमच्यासाठी कोणीही आंदोलनाला उतरणार नाही.एवढे निश्चित राहिला प्रश्न तो अनुदान घोटाळ्याचा शेवटी सर्व व्यवहार ऑनलाईन झालेले असून त्यांचे पुरावे कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. एक रुपयाचा अपहार असो की कोटींचा, तो अपहारच ठरतो व शिक्षा सारखीच होते.” महाजन यांनी पुढे सांगितले की, “जालना जिल्ह्यात देखील याच पद्धतीने प्रकरण दडपण्यासाठी तंत्र वापरण्यात आले होते.ते यशस्वी न झाल्याने शेवटी कोट्यावधी रुपयाची रॅकेट समोर आले आणि आरोपींची लाईनच लागली आता पाचोऱ्यातही अशाच या प्रकरणाची चौकशी झाली तर हे घबाड केवळ लाखोंमध्ये नाही, तर कोट्यवधींमध्ये असल्याचे बाहेर येणारच आहे.” पत्रकार महाजन यांचे उपोषण आता अपरिहार्य दिसत असून, शेतकरी वर्गामध्ये या घोटाळ्याबद्दल मोठा संताप आहे. प्रशासनाने या प्रकरणात जर पारदर्शक, निष्पक्ष आणि ठोस कारवाई केली नाही, तर केवळ पाचोरा नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. महाजन म्हणाले, “माझा लढा हा फक्त ऑनलाईन व्यवहारांच्या ठोस पुराव्यांवर आधारित आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण अपरिहार्य आहे. शेतकऱ्यांचा पैसा खाल्लेला कुणीही सुटणार नाही. दोषींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून लेखी घेण्याचा प्रकार हा भ्रष्टाचार झाकण्याचा नवा डाव आहे, मात्र सत्य बाहेर निघणारच आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणारच असे संदीप महाजन यांनी सांगितले शेतकऱ्यांना विनंती कोणत्याही आमिषाला बळी न पडता लेखी देऊन तुम्ही देखील शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या लूट मधील आरोपी होऊ नका

अभ्युदयनगर पुनर्विकास : नागरिकांचा आक्रोश, प्रशासनाची उदासीनता

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील अभ्युदयनगर वसाहत ही म्हाडाने सन १९६० साली उभारली. साधारण तीस वर्षांपूर्वी ही वसाहत दुरुस्त करून नागरिकांना सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक इमारत किमान तीन वेळा दुरुस्त करण्यात आली. मात्र, वारंवार दुरुस्त्या करूनही आज प्रत्येक इमारत अधिक बिकट अवस्थेत आहे. गळती, भेगा, लोखंडी सळई बाहेर येणे, छत कोसळण्याचा धोका — अशा गंभीर समस्या रहिवाशांचे आयुष्य भीतीच्या छायेत जगण्यास भाग पाडत आहेत. अनेक कुटुंबे सुरक्षिततेच्या चिंता करत आहेत आणि परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांनी पुनर्विकासासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न झाले, परंतु यश मिळाले नाही. त्यानंतर म्हाडामार्फत प्रकल्प पुढे नेण्याची तयारी दाखवली गेली. पण म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला तब्बल सहा महिने उलटून गेले तरी एकाही विकासकाने प्रतिसाद दिलेला नाही. ही बाब नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी गंभीर आणि निस्तेज उदासीनतेची साक्ष आहे.

अभ्युदय नगर पवन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे सरचिटणीस उमेश येवले यांनी या विषयावर म्हाडाच्या मा. उपाध्यक्षांना पत्र दिले असून तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ठाम शब्दांत इशारा दिला:
“आजवर केवळ आश्वासनांचे ढग आले, पण पावसाचे थेंब कधीच पडले नाहीत. जर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. तसेच न्यायालयाच्या दारांवर आपली दाद मागावी लागेल.”

मधल्या काळात काही खाजगी विकासकांनी आकर्षक प्रकल्पांचे आमिष दाखवले. परंतु त्यांनी आवश्यक सरकारी देय रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली. परिणामी नागरिकांचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले आणि त्यांच्या भवितव्यावरचा धोका अधिक स्पष्ट झाला. शासन व प्रशासनाची गंभीर उदासीनता नागरिकांचा संयम सुटू लागल्याचे दर्शवते.

अभ्युदयनगरवासीयांचा आवाज आता अधिक तीव्र आहे:
“आम्हाला सुरक्षित छप्पर द्या, आमच्या मुलांना नव्या घराचे स्वप्न दाखवा! आमच्या कुटुंबांचे सुरक्षित भवितव्य सुनिश्चित करा!”

ही बाब केवळ इमारतींचा प्रश्न नाही; ही हजारो कुटुंबांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. शासनाने या हाकेला तात्काळ प्रतिसाद देऊन ठोस, निर्णायक व धोरणात्मक पावले उचलणे हीच खरी वेळेची गरज आहे. अन्यथा अपघात व जीवनधोक्याची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

व्यवस्थापन कौशल्यांचा अनोखा धडा – मुंबईत आगळ्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत प्रथमच नाटक, मालिका, चित्रपट आणि इव्हेंट्स व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. यशवंत नाट्य मंदिर संकुल (सी हॉल), जे. के. सावंत रोड, माटुंगा येथे झालेल्या या कार्यशाळेला नवोदितांसह क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेचे आयोजन व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर आणि पॅसिफिक ओशियन प्रॉडक्शनचे प्रसाद सावर्डेकर यांनी केले. सहाय्यक संयोजक म्हणून तेजस्विनी जोईल, अनिश म्हेसळकर आणि लव क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत दिलीप जाधव, विवेक वैद्य, राकेश तळगांवकर, वैभव पवार, देवेंद्र पेम, विजय गोखले आणि अनिल गवस यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेत व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “पिन टू कार्पेट” ही संकल्पना आत्मसात करण्याची गरज स्पष्ट केली गेली. आजच्या काळात मोठ्या नाट्य-महोत्सवांसोबतच वाढदिवस, लग्नसमारंभ, बारसे, मुंज, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळे आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स अशा छोट्या-मोठ्या सर्व कार्यक्रमांमध्ये व्यवस्थापनाची व्याप्ती झपाट्याने वाढली आहे.

कार्यशाळेची संकल्पना पॅसिफिक ओशियन प्रॉडक्शनचे प्रसाद सावर्डेकर यांनी मांडली. ते स्वतः अनुभवी मालिका व्यवस्थापक असून प्रत्यक्ष कामात जाणवलेल्या अनुभवांमुळे अशा कार्यशाळेची गरज वाटली. उद्घाटनावेळी ‘ऑल दी बेस्ट’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम विद्यार्थी म्हणून सहभागी झाले.

दिवसभरात अभिनेते विजय गोखले आणि अनिल गवस यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत विविध दिग्गज व्याख्याते मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव, ‘स्वाभिमान’ आणि ‘काव्यांजली’ मालिकांचे कार्यकारी निर्माते विवेक वैद्य, नाट्य-एकांकिका स्पर्धा व सरकारी पुरस्कार सोहळ्यांचे व्यवस्थापक राकेश तळगांवकर, तसेच इव्हेंट टेक सोल्युशन्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंटचे संचालक वैभव पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

संध्याकाळी झालेल्या समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक व अभिनेते अजित भुरे उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “आपल्याकडे कार्यकर्ते वाढले पाहिजेत. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. म्हणूनच व्यवस्थापन कार्यशाळा घेणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.

प्रशिक्षणार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले. निलेश पाळेकर म्हणाले, “निर्मितीच्या क्षेत्रात नवख्यांना उभे राहण्यासाठी खोलवर मार्गदर्शन मिळाले.” राजेश मौर्य यांनी नमूद केले, “नार्वेकर सर, सावर्डेकर दांपत्य आणि टीमचे आयोजन अत्युत्तम होते.” सचिन चव्हाण म्हणाले, “योग्य वेळेत सुरू आणि संपलेला कार्यक्रम, तसेच दिग्गजांचे मार्गदर्शन, हे अनुभव अनमोल आहेत. पुढील उपक्रमांत सहभागी होण्याची मला आवड आहे.”

मुंबईत प्रथमच झालेली ही नाटक-मालिका-चित्रपट-इव्हेंट्स व्यवस्थापन कार्यशाळा सर्वार्थाने यशस्वी ठरली. प्रभावी नियोजन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि आयोजकांची मेहनत यामुळे सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. सर्वांच्या अभिप्रायातून या कार्यशाळेची गरज आणि उपयुक्तता अधोरेखित झाली.

पत्रकार बांधवांचा ऐतिहासिक सन्मान : पाचोरा पीपल्स बँकेत ज्येष्ठ पत्रकार अनिलआबा येवले आमंत्रित सदस्यपदी नियुक्त

0

Loading

पाचोरा – पाचोरा शहर व तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच एका पत्रकाराला वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. पाचोरा पीपल्स बँक लि., पाचोरा या शहरातील नामांकित सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर ज्येष्ठ पत्रकार अनिलआबा कालिदास येवले यांची आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, या निर्णयामुळे पत्रकार बांधवांच्या प्रतिनिधित्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या ऐतिहासिक नियुक्तीमागे पाचोरा –
भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील,विविध राजकीय पक्षाचे मान्यवर,बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल तसेच विद्यमान संचालक मंडळाचा व्यापक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. या नियुक्तीने अनिलआबा येवले यांचा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,वैशालीताई सूर्यवंशी,अमोल भाऊ शिंदे,सचिन दादा सोमवंशी या राजकीय स्तरावरील मान्यवरांकडून कडून वैयक्तिक सन्मान झाला आहेच, परंतु त्यासोबत पत्रकारिता या क्षेत्रालादेखील प्रथमच संस्थात्मक स्तरावर मान्यता मिळाली आहे. पत्रकार हे समाजाचे डोळे-कान मानले जातात; परंतु त्यांच्या योगदानाला कधीही औपचारिक मान्यता मिळत नाही. पाचोरा पीपल्स बँकेने हा इतिहास घडवत पत्रकार बांधवांना नवी ओळख, नवा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील पत्रकार व समाजातील विविध घटकांतून संचालक मंडळाच्या या निर्णयाचे मनःपूर्वक कौतुक होत आहे. अनिलआबा येवले हे गेली तीन दशके पत्रकारितेत सक्रिय आहेत. “दक्ष पोलीस टाइम्स” या दैनिकातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि आजही त्याच वृत्तपत्राशी निष्ठा राखून कार्यरत आहेत. एका दैनिकाशी दीर्घकाळ निष्ठा ठेवून पत्रकारिता करणे हे स्वतःतच दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांनी कधीही पत्रकारितेला वैयक्तिक फायद्याचे साधन केले नाही. जाहिराती मागणे, ब्रेकींग टाकून ब्लॅकमेलिंग करणे आणि अशा पत्रकारितेला उत्पन्नाचे साधन समजणे अशा प्रवृत्तींपासून ते नेहमीच दूर राहिले. उलट अनेकदा स्वतःच्या खिशातून खर्च करून बातम्या छापणे आणि गरजूंपर्यंत वृत्तपत्र पोहोचवणे हे त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य मानले. समाजकारणातही त्यांचा वाटा लक्षणीय आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, पंखे, पुस्तके यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना सायकली देऊन प्रोत्साहन देणे, अशा उपक्रमांतून त्यांनी शिक्षणक्षेत्राला हातभार लावला आहे. आपल्या कुटुंबावर आर्थिक संकटं, स्वतःवर कर्जाचे ओझे आले तरीही त्यांनी कधीही आपल्या प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही. त्यांचे सर्व जाती-धर्मांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत ते मुस्लिम वस्तीत पाच दशके राहूनही त्यांचे कोणाशीही वाद-विवाद नाही किंवा एकही गुन्हा किंवा साधी एन.सी. नोंद झालेली नाही, ही त्यांच्या संयमी व प्रामाणिक जीवनशैलीची साक्ष आहे. पत्रकारितेत त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. समाजातील प्रत्येक घटकाची चांगली बाजू मांडणे, मान्यवरांचा सन्मान अधोरेखित करणे, लहानमोठ्या आनंदाच्या वा दुःखाच्या क्षणी लोकांसोबत राहणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज पुढे नेणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. म्हणूनच पाचोरा शहरातील विविध सामाजिक संस्था, मान्यवर नागरिक, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती होणे म्हणजे पत्रकारांच्या कामाला औपचारिक प्रतिष्ठा मिळण्याचा टप्पा आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील , चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल, संचालक अविनाशभाऊ भालेराव आणि इतर सर्व संचालक मंडळाचे यासाठी विशेष कौतुक केले जात आहे. त्यांनी एक पत्रकाराचे प्रतिनिधित्व बँकेत आणून सहकार चळवळीच्या इतिहासात नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिलआबा येवले यांनी याआधीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून धाडसी पाऊल उचलले होते. दोन मोठ्या पॅनेलसमोर एकाकी उभे राहूनही त्यांना तब्बल 400 च्या जवळपास मते मिळाली होती. यंदाही त्यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र संचालक मंडळाने त्यांना पॅनेलच्या विजयासाठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनी ती सहज स्वीकारून एका शब्दात माघार घेतली परिणामतः संचालक मंडळाने त्यांची आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाने संचालक मंडळाचे वचनपूर्तीबाबतचे प्रामाणिकपण अधोरेखित झाले आहे. नियुक्ती जाहीर होताच शहरातील विविध संस्था, मान्यवर नागरिक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला. फुलांचे गुच्छ, शाल-श्रीफळ, मानपान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अजूनही अनेक ठिकाणी त्यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित होत आहेत. या उत्स्फूर्त प्रतिसादातून जनसामान्यातील त्यांच्यावरील विश्वास, प्रेम आणि आत्मीयता प्रकर्षाने दिसून येते. पत्रकार संदीप महाजन यांनीही या निमित्ताने चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल, संचालक अविनाशभाऊ भालेराव तसेच सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी व्यक्त केले की, अशा प्रकारे निस्वार्थी व स्वावलंबी पत्रकारांना संधी मिळाली तर निश्चितच पत्रकार बांधवांना नवचैतन्य मिळेल आणि समाजाप्रती जबाबदारी अधिक जोमाने पार पाडता येईल. या घटनेने पाचोरा शहराच्या इतिहासात एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. पत्रकारांच्या निस्वार्थ कार्याला समाजमान्यता मिळणे हे समाजजीवनाच्या परिपक्वतेचे द्योतक आहे. भविष्यात अशाच स्वरूपात पत्रकारांना विविध संस्थांच्या, मंडळांच्या व समित्यांच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत राहिले तर लोकशाही अधिक बळकट होईल. पत्रकार बांधवांना केवळ चौथ्या स्तंभाचे स्थान न राहता समाजकारणाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळेल. पत्रकार बांधवांना मिळालेल्या या संधीमुळे भविष्यात बँकेच्या कार्यात अधिक पारदर्शकता, सकारात्मक संवाद आणि जनतेशी जास्तीत जास्त सलोखा साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकारांचा सहभाग संचालक मंडळात असल्यानं बँकेच्या निर्णय प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांचा आवाज पोहोचेल, हे निश्चित आहे. भविष्यात शैक्षणिक संस्था, सहकारी मंडळे, सामाजिक संघटना आणि अगदी नगरपरिषदांमध्येही पत्रकारांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे. कारण पत्रकार समाजातील समस्यांशी रोजच झगडतो, लोकांच्या वेदना आणि अपेक्षा जवळून पाहतो. त्यामुळे त्यांचा सहभाग कोणत्याही निर्णय प्रक्रियेत अधिक परिणामकारक ठरतो. पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या या ऐतिहासिक निर्णयातून इतर संस्थांनी प्रेरणा घ्यावी आणि पत्रकार बांधवांना संधी देऊन लोकशाही अधिक सबळ करावी, अशी मागणी होत आहे. पाचोरा शहराने पाहिलेला हा ऐतिहासिक क्षण केवळ एका व्यक्तीच्या नियुक्तीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पत्रकार बांधवांच्या सन्मानाचा आणि समाजातील विश्वासार्हतेचा टप्पा आहे.

आरटीआयचा मुखवटा फाडा – खंडणीखोरांनो, तुमचं साम्राज्य आता संपणार!

0

Loading

पाचोरा – लोकशाहीत माहितीचा अधिकार (आरटीआय) म्हणजे नागरिकांच्या हातातलं प्रभावी अस्त्र. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी हा कायदा २००५ मध्ये लागू झाला. हजारो नागरिकांनी याचा योग्य वापर करून घोटाळे उघडकीस आणले, भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आणि शासनाची पारदर्शकता टिकवली. पण आज या कायद्याला काही नीच प्रवृत्तींनी विकृत करून तो ब्लॅकमेल व खंडणीचा धंदा बनवला आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालयांना छळण्यासाठी निरर्थक अर्ज दाखल करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकावणे, विशेषत: महिला अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना वैयक्तिक माहिती उघड करण्याच्या नावाखाली त्रास देणे – हे प्रकार लोकशाहीसाठी घातक ठरत आहेत. हा कायद्याचा वापर नाही, तर कायद्याचा बलात्कार आहे. शासनात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या खंडणीखोरांनी मानसिक छळाचं शस्त्र उगारलं आहे. “तुमची वैयक्तिक माहिती बाहेर काढीन, नाव बदनाम करीन” अशा धमक्यांमुळे त्यांच्यावर प्रचंड ताण येतो. काही विकृत प्रवृत्ती वैयक्तिक जीवनात शिरकाव करून सन्मान धुळीस मिळवतात. ही प्रवृत्ती गुन्हेगारांचीच आहे. महिला अधिकाऱ्यांचा छळ करून हे लोक केवळ त्यांचा सन्मान नाही, तर लोकशाहीचंही नुकसान करत आहेत. खंडणीखोरांच्या हजारो निरर्थक अर्जांनी सरकारी कार्यालयं ठप्प होतात. खरी माहिती मागणारे नागरिक मात्र ताटकळत उभे राहतात. याचा तोटा केवळ प्रशासनालाच नाही, तर सर्वसामान्य जनतेलाही होतो. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अवघ्या दोन महिन्यांत दहा हजारांहून अधिक निरर्थक अर्ज फेटाळून या प्रवृत्तीला धडा शिकवला. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र अर्ज फेटाळणं हा केवळ इशारा आहे; खरी गरज आहे ती थेट गुन्हे दाखल करून शिक्षा देण्याची. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांविरुद्ध आता भादंवि अंतर्गत गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. शासनाने विशेष आरटीआय संरक्षण सेल सुरू करून अशा तक्रारी तत्काळ नोंदवाव्यात आणि गुन्हेगारांना तुरुंगात डांबावं. आरटीआय हा जनतेचा हक्क आहे – तो कोणाचं खासगी हत्यार नाही. ब्लॅकमेलर व खंडणीखोरांनो, तुमचं साम्राज्य आता संपणार आहे. आरटीआयचा गैरवापर करून तुम्ही कायद्याला बदनाम करता आहात. पण लक्षात ठेवा – कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे. जर तुम्ही महिला अधिकाऱ्यांचा छळ सुरूच ठेवला, तर कायदा तुम्हाला असा चिरडून टाकेल की पुढच्या पिढ्या तुमचं नाव घेतानाही शरमतील. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या प्रवृत्तीला आळा घालणं अपरिहार्य आहे. आरटीआयचा उद्देश आहे – भ्रष्टाचार्यांना उघडे पाडणं. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाबरवणं हा त्याचा हेतू नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचारी ही समाजाची संपत्ती आहे. त्यांचा सन्मान राखणं हे शासन, कायदा आणि नागरिक – तिघांचं समान कर्तव्य आहे. त्यामुळे ब्लॅकमेलर खंडणीखोरांनो, कान उघडे ठेवा – आता तुमच्यासाठी कुठलीही सुटका नाही. हा कायदा पुन्हा जनतेच्या हातात परतला आहे. जनता जागी झाली की तुमचं साम्राज्य राखेत मिळण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. म्हणूनच – कष्ट करा आणि प्रामाणिकपणे कमवा. लोकशाहीला ब्लॅकमेलचा कलंक लावणाऱ्यांसाठी आता शून्य सहनशीलता असेल!

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार : आरोपी पोलिस कोठडीत ; पाचोरा परिसरात संतापाची लाट

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील एका गावात दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण पाचोरा तालुका आणि शेजारील भागातही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अबिद हुसेन शेख जलील (वय ३८, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हा स्कूल बसचालक असून, तो दररोज गावातील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करत असे. १९ ऑगस्ट रोजी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने संबंधित मुलीला दुचाकीवर बसवून माळेगाव पिंप्री (ता.सोयगाव ) येथील शेतामध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार उघड होताच गावकरी आणि पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली.
तपासादरम्यान एक नवा धक्कादायक तपशील समोर आला. घटनेपूर्वीही आरोपी अबिद हा मुलीच्या गावात दुचाकीवर गेला होता. तेव्हा मुलगी घराबाहेर आली असताना त्याने तिचा पाठलाग करून “तू मला आवडतेस” असे म्हणत तिचा विनयभंग केला होता. त्या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी स्थानिक शाळेच्या प्रशासनाकडे तोंडी तक्रार दिली होती. तथापि शालेय प्रशासनाने फक्त त्या वाहनचालकाचा रूट बदलला त्या घटनेवरून आरोपीला धडा न मिळता त्याने आणखी निर्ढावलेल्या पद्धतीने बलात्काराचा प्रकार घडवला. यामुळे गावकऱ्यांचा संताप अधिकच वाढला आहे.
सदर गावातून व परिसरातुन रोज अंदाजे ५० ते ६० विद्यार्थी दोन स्कूल बसने शेंदुर्णी येथे शिक्षणासाठी जातात. आरोपी अबिद याच बसचा चालक होता. त्यामुळे त्याने याआधी इतर मुलींसोबतही गैरवर्तन केले असावे, असा संशय पोलिस तपासातून व्यक्त केला जात आहे. सध्या या बाबतीत स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून, शाळा व्यवस्थापनालाही याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
या प्रकरणात आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत (Protection of Children from Sexual Offences Act – POCSO) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पाचोरा पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.
या प्रकरणाची विशेष बाब म्हणजे, सदर गुन्हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. पोलिस प्रशासनाला घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे तपास अत्यंत गोपनीय व संवेदनशील पद्धतीने करण्यात आला. या तपासात ए पी आय कल्याणी वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवरील संपर्क, तांत्रिक पुरावे व गुप्त चौकशा यांच्या आधारे त्यांनी आरोपीविरुद्ध मजबूत पुरावे गोळा केले आणि शेवटी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले.
या घटनेनंतर पाचोरा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी पालक संघटनांकडून होत आहे. “शिक्षणासाठी मुलींना शाळेत पाठवावे की नाही” असा प्रश्न पालक वर्गासमोर उभा राहिला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकरणात सदरची केस फास्टट्रॅक कोर्टात अंडर ट्रायलचालवुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यासाठी तपास अधिक गतीमान केला आहे. आरोपीने एकट्याने हा गुन्हा केला की अन्य कोणी सहभागी होते, याचीही चौकशी सुरू आहे. तसेच, शाळेतील इतर विद्यार्थिनींशी संबंधित तक्रारी असल्यास त्या देखील तपासाच्या कक्षेत आणल्या जात आहेत.
एका अल्पवयीन दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आरोपी अबिद हुसेन शेख जलीलला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयीन कोठडीत ठेवले असले तरी, या प्रकरणामुळे शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालक, शिक्षक, समाज व शासन यांनी यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक जागरूक राहणे गरजेचे ठरले आहे.
शालेय वाहनांतील सुरक्षेचा प्रश्न : पालकांचा सजग सहभाग काळाची गरज
शालेय बस व इतर वाहनांमध्ये घडणाऱ्या गैरप्रकारांनी पालक, शाळा प्रशासन आणि समाज यांना मोठा धक्का दिला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेला धक्का देणाऱ्या ठरतात. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या वाहनातून शाळेत पाठवतो याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. कारण अनेकदा पालकांच्या निष्काळजीपणामुळे ज्या शाळेत आणि वाहनातून मुलांना पाठवले जाते, तेच त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. मुलांच्या सुरक्षेबाबत बेफिकीर राहणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी थेट खेळण्यासारखे आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये पालकांनी वैयक्तिक स्तरावर समिती गठित करून, त्या समितीमार्फत शाळेच्या वाहनांची तपासणी, चालक व कर्मचाऱ्यांचे पोलिस खात्रीपत्र, तसेच वाहनातील सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे. नियमितपणे या समितींनी वाहनांविषयीची माहिती, चालकांची पार्श्वभूमी आणि सुरक्षा सुविधा याबाबत अद्ययावत अहवाल पालकांपर्यंत पोहोचवावा. पालकांनी स्वतः जबाबदारीने पुढाकार घेतल्यासच मुलांचे भविष्य सुरक्षित राहील आणि शाळा-वाहन व्यवस्थापन अधिक जबाबदारपणे काम करण्यास भाग पडेल. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी खालील काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या घ्याव्यात :

1. वाहनाची निवड करताना तपासणी – आपल्या मुलाला पाठवले जाणारे स्कूल बस/व्हॅन नोंदणीकृत आहे का, त्याला आरटीओ व शाळेकडून मान्यता आहे का हे तपासावे. अनधिकृत किंवा परवानगी नसलेली वाहने मुलांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतात.

2. चालक व कर्मचाऱ्यांचे पोलिस पडताळणीपत्र – बस चालक व कंडक्टर यांचा गुन्हेगारी इतिहास नाही याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा पडताळणी न झाल्याने चालकांकडून गैरवर्तन किंवा गंभीर गुन्हे घडतात.

3. वाहनातील सुरक्षा सुविधा – आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग (Emergency Exit), सीसीटीव्ही कॅमेरे, फर्स्ट-एड बॉक्स, अग्निशामक यंत्रणा यासारख्या मूलभूत सुरक्षा सुविधा वाहनात असणे अनिवार्य आहे. वाहनांच्या नियमित तांत्रिक तपासणीची नोंद ठेवली पाहिजे. 4. पालक समितीची स्थापना – गाव किंवा शाळास्तरावर पालकांनी समिती गठित करून वाहनांच्या हालचाली व चालकांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे. समितीकडून शाळा प्रशासनावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. 5. नियमित अपडेट – वाहनाचा मार्ग, वेळा, तसेच वाहनाची यांत्रिक स्थिती याबाबत पालक समितीकडे आणि पालकांकडे सातत्याने माहिती पोहोचावी. अनियमितता आढळल्यास तातडीने शाळा प्रशासनास कळवावे.

6. शाळा प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन थेट जबाबदार आहे. शाळांनी चालक व कर्मचाऱ्यांची पडताळणी, वाहन तपासणी आणि सुरक्षा नियमांचे पालन नियमित करावे. पालकांनीही शाळेकडून तपासणी अहवाल मागवावा.

7. मुलांना जागरूक करणे – पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षिततेविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. गैरवर्तन झाल्यास तत्काळ पालक वा शिक्षकांना सांगण्याची शिकवण द्यावी. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हेही त्यांचे संरक्षण करण्याचा मार्ग आहे. अलीकडील घटनांनी स्पष्ट केले आहे की केवळ शासन वा पोलिस यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही, तर पालकांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. समाजातील सजग पालकांचा सहभाग वाढला, तर अशा गैरप्रकारांना आळा बसू शकतो. वाहनांची तपासणी, चालकांची पार्श्वभूमी, सुरक्षा साधनांचा वापर आणि मुलांचे समुपदेशन या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे केल्या तरच मुलांचे भविष्य सुरक्षित राहू शकेल. निष्कर्ष असा की, शालेय वाहन सुरक्षेचा प्रश्न केवळ शाळा वा प्रशासनापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक पालकाच्या जबाबदारीचा आहे. पालकांनी सजग राहून समित्यांच्या माध्यमातून नियमित देखरेख केली तर शाळा-वाहन व्यवस्थापनावरही अंकुश राहील. मुलांचे सुरक्षित भविष्य हे समाजाचे भविष्य असल्याने, याबाबत सर्व स्तरावर जागरूकता व जबाबदारी घेणे आजच्या काळाची अपरिहार्यता ठरली आहे.

प्रतिक्षा संपली : पाचोऱ्यात ऋषीकेश चौधरी यांच्याकडून माफक दरात गणेशोत्सव आकर्षक डेकोरेशनची सुविधा

0

Loading

पाचोरा – शहर व परिसरात गणेशोत्सवाची चाहूल लागताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू असून साफसफाई, नवीन खरेदी आणि आकर्षक सजावटींचा उत्साह दिसत आहे. गणेशोत्सवात सजावट हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो कारण त्यातून भक्तीभाव, संस्कार आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम घडतो.
अनेकदा मंडळांना आणि कुटुंबांना सुंदर सजावटीसाठी मोठा खर्च करावा लागतो किंवा योग्य साहित्य उपलब्ध होत नाही. या गरजेची जाणीव ठेवून पाचोरा शहरातील तरुण उद्योजक ऋषीकेश चौधरी यांनी यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी विशेष डेकोरेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या कडे विविध प्रकारचे पारंपरिक तसेच आधुनिक डेकोरेशन साहित्य सहज आणि माफक दरात मिळते.
लहान जागेत स्थापना करणाऱ्यांसाठी साधे पण आकर्षक पर्याय, तर मोठ्या मंडळांसाठी भव्य पार्श्वभूमी, मंच आणि लाइटिंगची व्यवस्था येथे केली जाते. फुलांची सजावट, एलईडी लाइट्स, मंदिरसदृश रचना, नैसर्गिक वातावरण दर्शवणाऱ्या थीम अशा अनेक संकल्पना ग्राहकांच्या आवडीप्रमाणे उपलब्ध आहेत.
गणेशोत्सव हा धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक एकतेचाही प्रतीक आहे. या काळात लोक एकत्र येतात, आरत्या, भजन-कीर्तन आणि विविध कार्यक्रमांत सहभागी होतात. अशा वेळी सजावट ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. त्यामुळेच ऋषीकेश चौधरी यांनी सर्वसामान्यांना दर्जेदार व किफायतशीर सजावट मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या सजावटीबाबत आधीपासूनच शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यंदाही आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सेवेत वेगळेपणा, गुणवत्ता आणि किफायतशीरपणा यांचा सुंदर संगम दिसतो.
गणेशोत्सव आता अगदी जवळ आला आहे. पाचोऱ्यातील घरे आणि मंडळे सजावटीने सज्ज होत असून भक्तगणांची प्रतिक्षा संपली आहे. या पार्श्वभूमीवर ऋषीकेश चौधरी यांची सेवा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क –  छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी पुलाजवळ शिवबा मेडिकल समोर ,भाग्यलक्ष्मी प्लाझा,Mo. 8793846414.

आज दि.23/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
आज मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. शांत राहणेच उत्तम.
शुभ अंक : ८
शुभ रंग : फिकट करडा

वृषभ :
नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. महत्वाच्या व्यक्तींकडून मदत मिळेल.
शुभ अंक : ४
शुभ रंग : गहूवर्ण

मिथुन :
कौटुंबिक मतभेद टाळावेत. विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे. आर्थिक बाजू स्थिर राहील.
शुभ अंक : ६
शुभ रंग : हिरवा

कर्क :
कामात यश मिळेल. एखादी जुनी गोष्ट आठवून भावूक व्हाल. घरगुती कामांवर लक्ष केंद्रित करा.
शुभ अंक : १
शुभ रंग : पांढरट निळा

सिंह :
प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. सामाजिक क्षेत्रात नवे संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक : ३
शुभ रंग : केशरी

कन्या :
सकारात्मक विचार ठेवा. एखादी पूर्वीची अडचण सोडवता येईल. मित्रांची साथ लाभेल.
शुभ अंक : २
शुभ रंग : तांबूस

तूळ :
महत्त्वाचे निर्णय आज टाळावेत. मानसिक थकवा जाणवेल. शरीराची काळजी घ्या.
शुभ अंक : ७
शुभ रंग : निळसर करडा

वृश्चिक :
नवे संकल्प सिद्ध होण्याचा दिवस. आत्मविश्वासाने वाटचाल करा. घरात आनंददायी घडामोडी संभवतात.
शुभ अंक : ५
शुभ रंग : गडद जांभळा

धनु :
प्रवासाचे योग संभवतात. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. निर्णय योग्य ठरतील.
शुभ अंक : ९
शुभ रंग : फिकट पिवळा

मकर :
शांततेने व संयमाने काम करा. कोणाच्याही भांडणात पडू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
शुभ अंक : ६
शुभ रंग : गडद तपकिरी

कुंभ :
नवीन दिशा मिळेल. योजनांचा शुभारंभ होईल. कलेत रस असेल तर आजचा दिवस योग्य.
शुभ अंक : ५
शुभ रंग : आकाशी

मीन :
विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक सुधारणा जाणवेल. नवा उत्साह जाणवेल.
शुभ अंक : २
शुभ रंग : फिकट गुलाबी

ताज्या बातम्या

error: Content is protected !!