मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आणि २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या कलाकार, तंत्रज्ञ व नाट्य संस्थांचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार असून सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या कार्यक्रमात प्राथमिक फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्य कलाकारांचा, तंत्रज्ञांचा तसेच नाट्य संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नवोदित आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (बैसरन) येथे TRF या पाकिस्तानप्रेरित दहशतवादी संघटनेने घडवलेल्या अमानुष आणि निर्घृण हल्ल्याचा तीव्र निषेध पाचोरा शहरात उमटला. या हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना पाचोरा शहरातील बजरंग दल, हिंदू संघटना आणि हिंदू सकल समाज यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये संपूर्ण पाचोरा शहर सहभागी झाल्याने एकप्रकारे देशभक्ती आणि शौर्याचा आवाज रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहलगाममधील घटनेनंतर देशातील लाखो नागरिकांप्रमाणेच पाचोऱ्यातील हिंदू समाज बांधव देखील संतप्त झाले. निष्पाप नागरिकांच्या रक्ताने माखलेली ही घटना केवळ मानवतेच्या विरोधात नसून संपूर्ण राष्ट्राच्या अस्मितेवर झालेला घाव असल्याचे म्हणत बजरंग दल व हिंदू संघटनांनी तत्काळ आंदोलनाची हाक दिली. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात सकाळी जळगाव चौफुली येथून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हातात तिरंगा, डोक्यावर भगवे फेटे, देशभक्तीपर घोषणा देणारे तरुण आणि शिस्तबद्ध रचना यामुळे हा मोर्चा प्रचंड लक्षवेधी ठरला. मोर्चा जळगाव चौफुलीपासून सुरु होऊन थेट पाचोरा पोलीस स्टेशन पर्यंत गेला. मार्गक्रमण करताना “भारत माते की जय”, “दहशतवाद मुर्दाबाद”, “TRF हाय हाय”, “पाकिस्तानला चिरडून टाका” अशा घोषणा दुमदुमत होत्या. पोलीस स्टेशनसमोर निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहशतवाद व पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या बंदमध्ये विशेषतः उल्लेखनीय बाब म्हणजे शहरातील सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून एकतेचा परिचय दिला. केवळ हिंदू समाजच नव्हे तर मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवत देशाच्या रक्षणार्थ एकवटण्याचा संदेश दिला. अशा प्रकारचा सलोख्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा दुर्मिळ संगम पाचोरा शहराने अनुभवला. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, मंडई, व्यापारी संकुले, वाहतूक, शाळा, कार्यालये हे सर्वच बंद राहिले. बंद पाळताना कुठल्याही अनुशासनभंगाची घटना न घडता अत्यंत शांततेत आणि संयमाने हे आंदोलन पार पडले, याकडे पोलिस प्रशासनानेही विशेष लक्ष वेधले. पोलीस निरीक्षकांनी आंदोलनकर्त्यांना मदत करून व्यवस्था अबाधित ठेवली. बजरंग दल व हिंदू संघटनांचे नेते म्हणाले की, “TRF ही संघटना पाकिस्तानची कुकर्मांची प्रयोगशाळा आहे. भारतात शांतता नांदू नये म्हणून ती वेळोवेळी हल्ले घडवते. आता केंद्र सरकारने फक्त निषेध न करता पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्ध छेडले पाहिजे. काश्मीरमधून अशा घटनांचा कायमचा बंदोबस्त करावा.” हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील या निमित्ताने केंद्र सरकारकडे मागणी केली की, “TRF च्या प्रत्येक अतिरेक्याला शोधून नष्ट करण्यात यावे. पाकिस्तानवर त्वरित आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आणावेत. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी निर्णायक धोरण स्वीकारावे.” नागरिकांच्या भावना व्यक्त करताना काही ज्येष्ठांनी म्हटले, “या देशात आमचे पोरं, नवरे, भाऊ शांततेत राहावेत म्हणून लढतात. आणि तिकडे बसलेले काही जिहादी आमच्यावर गोळ्या झाडतात. आता मात्र हे थांबायला हवे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.” याचवेळी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून निवेदन घेऊन त्याचे पुढे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य व केंद्र शासनाकडे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पाचोऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनीही या बंदला नैतिक पाठिंबा दिला. काहींनी तर स्वतः मोर्चामध्ये सहभाग घेऊन एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला. शहरात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने भगवे झेंडे, फलक आणि भारतमातेला अभिवादन करणारे पोस्टर लावण्यात आले होते. युवकांचे समूह हे मिरवणुकीत जोशात सहभागी होते. महिलांनीही आपल्या स्तरावर घरांमधून भगव्या पताका लावून या निषेधात सहभाग नोंदवला. या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. पाचोऱ्यात घडलेली ही ठाम प्रतिक्रिया म्हणजे केवळ एक बंद नव्हता, तर तो हिंदू समाजाच्या अस्मितेचा जागर होता. बंद नंतर सोशल मीडियावरही विविध व्हिडीओ, फोटोंच्या माध्यमातून मोर्च्याचे क्षण वायरल झाले. अनेक नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावरून “शतशः समर्थन”, “TRF विरुद्ध निर्णायक कारवाई करा”, “पाचोरा एकसंध आहे” असे संदेश देत आंदोलनाला उर्जा दिली. हा पूर्ण बंद शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांचे नियोजन योग्य होते, हे स्पष्ट झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कोठेही जोरजबरदस्तीचा आरोपही नोंदवला गेला नाही. आजच्या घटनेने हे स्पष्ट झाले की, हिंदू समाज, व्यापारी वर्ग, युवक, महिला आणि प्रशासन विशेषतः सर्व धर्मीय देशप्रेमी नागरीक सर्वजण एकत्र आल्यास राष्ट्ररक्षणासाठी किती सजग आणि कटिबद्ध राहू शकतो. बजरंग दल, हिंदू संघटना आणि हिंदू सकल समाजाच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक बंदाने पुन्हा एकदा देशप्रेमाचा आणि एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
पाचोरा – शेतकऱ्याच्या आयुष्याचे गणित त्याच्या जमिनीशी जोडलेले असते. पीक हे त्याचे शेतीतील श्रमाचे फलित असते. मात्र या कष्टाच्या फळाला जर शासनाच्या यंत्रणेतील हलगर्जीपणा आणि महावितरणच्या दुर्लक्षामुळे आगीचे गालबोट लागत असेल, तर तो समाज म्हणून आपला पराभव ठरतो. अशाच एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाला हात घालणाऱ्या घटनेने पाचोरा तालुक्यातील परधाडे गावातील शेतकरी दत्तू हरी पाटील यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतालगतून गेलेल्या विद्युत वाहिनीत अचानक फॉल्ट निर्माण झाला. त्या ठिकाणी पडलेल्या ठिणग्यांनी क्षणात शेतात वाऱ्यावर वाळवून ठेवलेला मका आणि चाऱ्याला आग लावली. हळूहळू पेट घेतलेली ही आग काही क्षणांतच भडकली आणि संपूर्ण २ एकरवर वाळवण्यासाठी ठेवलेला मका व चारा जळून खाक झाला. उन्हाची तीव्रता आणि सुकलेल्या मक्याचे ज्वलनशील स्वरूप लक्षात घेता आगीचा वेग थक्क करणारा होता. दत्तू हरी पाटील यांनी गट नंबर ११२/१ या त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर यावर्षी २ एकर क्षेत्रावर मका पीक घेतले होते. शेतीतील हंगामी बदल आणि हवामानाच्या चढ-उतारांनंतर अखेर मेहनत करून उभे केलेले पीक यंदा बहरात आले होते. चार दिवसांपूर्वीच मका कापणी व खुडणी पूर्ण करून पीक वाळवण्यासाठी शेतात पसरवले गेले होते. नियोजनानुसार अजून ४–५ दिवसांनी तो मका व चारा गोळा करून घराकडे वाहून नेण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र नियतीने वेगळेच लिहिले होते. सकाळी अचानक वीज वाहिनीच्या फॉल्टमुळे शेताच्या कडेला ठिणग्या पडल्या आणि एका क्षणात वाऱ्याच्या झोताने आग सर्वत्र पसरली. परिसरातील काही शेतकऱ्यांनी आणि पाटील कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या वेगाने आणि तीव्रतेने ते सारे प्रयत्न निष्फळ ठरले. संपूर्ण मका व चारा जळून खाक झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या गटातून हळहळ व्यक्त केली गेली. संपूर्ण हंगामभर मेहनत करून उभे केलेले पीक एक क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते. आगीचे कारणही अत्यंत धक्कादायक होते – विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झालेले फॉल्ट!घटनेची माहिती मिळताच तलाठी ज्योती पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी नुकसानाची नोंद घेण्यात आली असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी दत्तू पाटील यांच्यासोबत संवाद साधून त्यांची मानसिक अवस्था जाणून घेतली गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वीज पुरवठा अधिकारी आणि वायरमनदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज वाहिनीची पाहणी केली, मात्र ही पाहणी फक्त औपचारिक ठरली. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “महावितरणच्या दुर्लक्षामुळे आणि वीज वाहिन्यांची वेळोवेळी तपासणी न केल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे.” शेतकरी दत्तू हरी पाटील हे कुटुंबाचा एकमेव आधार आहेत. त्यांचे संपूर्ण आर्थिक गणित या पीकावर अवलंबून होते. कर्ज काढून, खत, बी-बियाणे व मजुरीचा खर्च करून उभा केलेला मका एकाच क्षणात आगीच्या तडाख्याने जळून गेल्याने आता त्यांच्यासमोर पुढील आयुष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक अवस्था डळमळीत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली जात आहे. एकंदरीतच, ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या नुकसानीची गोष्ट नाही. ही घटनाच सरकारी यंत्रणांच्या निष्काळजी वागणुकीचा आरसा ठरते. वेळेवर विद्युत वाहिनींची तपासणी, त्यांची देखभाल, फॉल्टसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबी जर काटेकोरपणे राबवल्या गेल्या असत्या, तर आज दत्तू पाटील यांचे २.५ लाखांचे नुकसान टळले असते. शेतकऱ्यांची जीवनरेखा ही शेती आहे आणि शेतीचे नियोजन हे निसर्गाबरोबरच सरकारी यंत्रणांच्या जबाबदारीवरदेखील अवलंबून असते. महावितरणसारख्या यंत्रणांनी जर वेळोवेळी तपासणी केली नाही, लाईनमधील झाडाझडती काढली नाही किंवा फॉल्टची पूर्वसूचना प्रणाली सक्रिय केली नाही, तर यापुढेही अशा अनेक शेतकरी कुटुंबांवर आपत्ती कोसळत राहील. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, विद्युत यंत्रणेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेषतः शेती हंगामात, पिककापणीच्या काळात शेतात सुकवण्यासाठी ठेवलेल्या पिकांसाठी सुरक्षा उपाययोजना करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. शासनाने केवळ पंचनाम्याच्या नावाखाली कागदी कार्यवाही करून थांबू नये, तर प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर नुकसान भरपाईचा निधी जमा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. या घटनेने संपूर्ण परधाडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘पाणी, वीज, बी-बियाणे, खत, मेहनत – एवढं सगळं लावून शेतकरी जर यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे उध्वस्त होणार असेल, तर त्याचा खरा शत्रू निसर्ग नसून व्यवस्था आहे’, अशी प्रतिक्रिया काही ज्येष्ठ शेतकऱ्यांनी दिली. तत्कालीन मदत पुरवण्यासाठी तहसील प्रशासन, कृषी विभाग, महसूल विभाग आणि महावितरण यांच्यात समन्वय साधून त्वरेने शेतकऱ्याच्या पदरात आर्थिक मदत टाकली पाहिजे. त्याशिवाय या घटनेचा चौकशी अहवाल तयार करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अन्यथा ग्रामीण भागातील लोकांचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास उध्वस्त होईल.अशा घटना वारंवार घडत असतील आणि त्यावर ठोस उपाययोजना केली जात नसेल, तर हे केवळ प्रशासनाची निष्क्रियता नव्हे तर ग्रामीण जनतेच्या जिवावर उठलेले संकट ठरेल. सरकार आणि महावितरण यांनी ही जबाबदारी ओळखून, शेतकऱ्यांच्या कष्टांची किंमत ओळखून, तात्काळ नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, हीच झुंज वृत्तपत्र्य व ध्येय न्यूजच्या या बातमीच्या माध्यमातून जोरदार मागणी आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वतःच्या आरोग्यासाठी घेतलेलं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असतं. तंबाखूपासून दूर होणं म्हणजे केवळ व्यसन सोडणं नाही, तर नव्या उमेदीनं, आरोग्यदायी जीवन जगणं. आजही समाजात तंबाखूविषयी अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत, ज्या व्यसनमुक्त होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. तंबाखूचा खराखुरा धोका समजून घेतल्यावरच आरोग्यपूर्ण आयुष्याची वाट मोकळी होते. चला तर मग, या चुकीच्या समजुती बाजूला करून वास्तवाकडे जाऊ या.
चुकीची मतं आणि सत्य
चुकीची समजूत १: तंबाखू हे औषध (drug) नाही.
सत्य: तंबाखूमध्ये असलेले निकोटीन हे अतिशय व्यसनी औषध आहे. त्याचे व्यसन कोकेन आणि हेरॉइनसारख्या घातक औषधांशी तुलना केली जाते.
चुकीची समजूत २: हलक्या किंवा कमी टार असलेल्या सिगरेट्स सुरक्षित असतात.
सत्य: “लाईट” किंवा “लो टार” सिगरेट्स पिणारे लोक निकोटीन मिळवण्यासाठी अधिक खोल श्वास घेतात आणि जास्त सिगरेट्स ओढतात. त्यामुळे टार आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण शरीरात अधिक प्रमाणात जाते.
चुकीची समजूत ३: स्मोकिंग सोडलं तर मानसिक आजार वाढू शकतो.
सत्य: स्मोकिंग सोडल्यावर चिडचिड, अस्वस्थता, चिंता, झोपेच्या तक्रारी होऊ शकतात, पण या केवळ निकोटीन विड्रॉवलची (व्यसनमुक्तीची) लक्षणं आहेत. मानसिक आजार बिघडल्याचं लक्षण नाही.
चुकीची समजूत ४: सोडलं किंवा नाही, नुकसान तर झालंच आहे.
सत्य: स्मोकिंग सोडल्यानंतर शरीराची सुधारणा त्वरित सुरू होते:
काही तासांतच रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी सामान्य होते आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.
एका आठवड्यात फुफ्फुसांचे कार्य सुधारते.
एक वर्षात हृदयविकाराचा धोका सुमारे निम्म्यावर येतो.
चुकीची समजूत ५: स्मोकिंग केल्यावर विश्रांती मिळते.
सत्य: प्रत्यक्षात स्मोकिंगमुळे रक्तदाब आणि हृदयगती वाढते, ज्यामुळे शरीरावर जास्त ताण येतो. विश्रांती मिळण्याऐवजी शरीराला अतिरिक्त त्रास होतो.
चुकीची समजूत ६: स्मोकलेस तंबाखू (गुटखा, मावा वगैरे) सिगरेट्सपेक्षा सुरक्षित आहे.
सत्य: स्मोकलेस तंबाखूमध्येही निकोटीन व अनेक कर्करोगकारक (कॅन्सर करणारे) घटक असतात, जे तोंड, घसा व स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढवतात.
तंबाखू सोडण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती
१. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) विचार, भावना आणि परिस्थिती ओळखायला मदत करते, ज्यामुळे तंबाखू वापर वाढतो. योग्य रणनीती तयार करून व्यसन सोडण्याची शक्यता वाढवते.
२. मोटिवेशनल इंटरव्ह्यूइंग सोडण्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेते आणि आरोग्यासाठी प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते.
३. माइंडफुलनेस (सजगता साधना) ओढ आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला वेगळं ठेवायला शिकवते. ताण आणि अस्वस्थ भावना हाताळण्याची क्षमता वाढवते, जे तंबाखूपासून दूर राहण्यास मदत करते.
“आजच सुरुवात करा — तंबाखू विरहित आरोग्यदायी जीवनाकडे पहिले पाऊल टाका!”
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संस्कृतीत मंदिरे केवळ भक्तीची केंद्रे नसून ध्यानसाधना व गुरुकुल शिक्षणाचीही शक्तिपीठे मानली जात. उडुपी (कर्नाटक) जिल्ह्यातील पंगाला, कापू येथे असलेल्या १०व्या शतकातील आर्यादी श्री जनार्दन मंदिराचे जिर्णोद्धार कार्य अंतिम टप्प्यात असून, नव्या रूपाने हे मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुलं होण्याच्या तयारीत आहे.
या ऐतिहासिक मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर १६ ते २० मे २०२५ या कालावधीत भव्य कलशोत्सव सोहळा आयोजिला जाणार आहे. वेदमूर्ती श्री पदिगरु श्रीनिवास तंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यासाठी डॉ. पी. मोहनदास भट, पी. गोविंद शेट्टी, बाळकृष्ण टी. शेट्टी तसेच अनेक मान्यवर मंडळी परिश्रम घेत आहेत.
माधव विजय पर्व तसेच दंडतीर्थ या गुरुकुल परंपरेतील उल्लेखांमध्ये या मंदिराचा गौरवशाली उल्लेख आढळतो. मंदिरातील जनार्दन मूर्तीच्या स्पर्शाने व्याधी निवारण व मनःशांती प्राप्त झाल्याच्या अनेक घटना भाविकांकडून सांगितल्या जातात. त्यामुळे भक्तांच्या वतीने हा सोहळा अत्यंत श्रद्धेने साजरा करण्यात येत आहे. देणगीदार व भाविकांना या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक माधवाचार्य यांनी उडुपी श्रीकृष्ण मंदिर स्थापन केल्यानंतर पांगालाच्या नदीकाठच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचे महत्त्व ओळखून येथे आर्यादी श्री जनार्दन मंदिर उभारले. दंडतीर्थ गुरुकुल पद्धतीमुळे या भागात अनेक विद्वान घडले. दाक्षिणात्य वास्तुशैलीतील या मंदिरात गर्भगृह, सभामंडप, गोपुरम यांचा सुंदर समावेश आहे. मंदिरातील जनार्दन मूर्तीच्या तेजस्वी रूपामुळे भक्तांमध्ये अनोखा श्रद्धाभाव निर्माण होतो.
मंदिर परिसर स्वच्छ, शांत व निसर्गरम्य आहे, जे ध्यानधारणा व प्रार्थनेसाठी आदर्श वातावरण प्रदान करते. आजही हे मंदिर गावाच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. स्थानिक लोक मंदिराच्या व्यवस्थापनात तसेच विविध उत्सवांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतात.
मंदिरदर्शनासोबतच कापू बीच, उडुपी श्रीकृष्ण मंदिर, माल्पे बीच आणि पांगाला नदीकिनाऱ्याचे सौंदर्यही अनुभवता येते. जनार्दन हे भक्तांचे रक्षक व कल्याणकारी देव मानले जातात आणि त्यांच्यासोबत अनेक अन्य देवतांचीही येथे पूजा केली जाते. “आर्यादी” हा शब्द स्थानिक इतिहासाशी किंवा विशिष्ट परंपरेशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
पांगाला परिसरातून वाहणाऱ्या स्वर्णा व सीता नद्यांमुळे या भागाचे नैसर्गिक सौंदर्य आणखी खुलते.
येत्या भव्य कलशोत्सवासाठी सर्व भक्तांनी व देणगीदारांनी आपली उपस्थिती व सहकार्य यांची नोंद करून या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भिवंडी (गुरुदत्त वाकदेकर) : मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर शौर्यगाथांचा जयघोष करणारे “शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलन २०२५” भिवंडीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. मराठी साहित्य व कला सेवा, राष्ट्रकुट, अखिल आगरी साहित्य विकास मंडळ (शाखा – भिवंडी) आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धात्मक कविसंमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सारस्वतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन, शौर्य, मर्दुमकी, सामाजिक आणि राजकीय कार्यावर आधारित वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. उपस्थित रसिकांनी त्या सादरीकरणांना भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमात गुजरातमधील बडोदा येथून आलेल्या केतकी कुलकर्णी यांनी सुनिल पाटील यांची “शिवबा” ही ओजस्वी कविता सादर करत विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाबद्दल त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि सस्नेह भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही सादरीकरणानंतर मान्यवरांच्या हस्ते सस्नेह भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
प्रथम क्रमांक: विवेक शेळके – रोख ₹३००१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
द्वितीय क्रमांक: राजेश साबळे ओतूरकर – रोख ₹२००१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ पारितोषिके: मिथून गायकवाड, योगिता कोठेकर व अक्षता गोसावी – प्रत्येकी रोख ₹५०१/-, शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी, समीक्षक शिवाजी गावडे आणि प्रा. डॉ. राजेंद्र डोंगरदिवे यांनी त्यांच्या स्वतंत्र शैलींमध्ये केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविवर्य आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास थळे यांनी भूषविले, तसेच त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या वेळी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजूभाऊ चौधरी, तसेच अध्यक्ष विश्वास थळे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात रवींद्र तरे यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत सादर करत वातावरण भारावून टाकले.
सुनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत पुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि नेमके सूत्रसंचालन कवयित्री निर्मला पाटील आणि साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर यांनी संयुक्तपणे पार पाडले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रकाश ओहळे (राष्ट्रकुट), कैलास अनंता भोईर (सरपंच), मच्छिंद्र पाटील, विक्रांत लाळे, रविंद्र शंकर पाटील, किरण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाला काव्याच्या माध्यमातून उजाळा देणारे हे पहिले स्पर्धात्मक कविसंमेलन प्रेरणादायी ठरले. भविष्यात अशा शिवशौर्यपर उपक्रमांची मालिका सुरू राहो, अशी अपेक्षा उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.
पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या, पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पहेलगाम बैसरन या भागात घडलेली अतिरेकी हिंसाचाराची घटना केवळ अमानुष नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला मानली जात आहे. टी.आर.एफ. या पाकिस्तानच्या पाठबळाने चालणाऱ्या दहशतवादी संघटनेने निष्पाप भारतीयांवर चालवलेला गोळीबार हृदय पिळवटून टाकणारा ठरला. या हल्ल्यात २८ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. संपूर्ण देशभरात या घटनेविरोधात संताप व्यक्त होत असतानाच, दिल्लीस्थित ‘आयडियल पत्रकार संघटना’ आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पाचोरा तालुक्यातील पत्रकार संघटनांनी या दहशतवादी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत केंद्र सरकारकडे कठोर आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी केली आहे.या पार्श्वभूमीवर पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने ‘आयडियल पत्रकार संघटना’चे राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र सरकारने आता वेळ न घालवता पाकिस्तानवर निर्णायक हल्ला करून त्याला जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावे, तसेच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे, अशी आक्रमक आणि राष्ट्रवादी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे आणि पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्याकडे अधिकृतपणे सादर करण्यात आले. निवेदन सादरीकरणाच्या वेळी उपस्थित असलेले पत्रकार व संघटनांचे पदाधिकारी अत्यंत भावनिक आणि राष्ट्राभिमानाने भारावलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर देशद्रोही प्रवृत्तींविरोधातील चीड स्पष्टपणे दिसून येत होती. काश्मीरमधील या अमानुष हत्याकांडाने केवळ जम्मू-काश्मीरमधील शांती प्रक्रियेलाच आव्हान दिले नसून, देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात दहशत आणि रोष निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत यापुढे केवळ निषेध आणि तात्पुरती कारवाई न करता पाकिस्तानच्या पाळण्यात वाढणाऱ्या या अतिरेक्यांच्या मुळावरच घाव घालणे गरजेचे असल्याचे पत्रकारांनी ठामपणे नमूद केले. पत्रकार संघटनांच्या या निषेधामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहराध्यक्ष प्रविण बोरसे, उपशहराध्यक्ष प्रशांत येवले, शहर सहकार्याध्यक्ष नरसिंग भुरे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप जैन, अनिल आबा येवले, तसेच व्हॉईस ऑफ मीडिया पाचोरा विभागातील कार्यकर्ते जावेद शेख, निखिल मोर, बंडू सोनार यांच्यासह शहरातील प्रिंट व सोशल मीडियातील अनेक पत्रकारांनी सहभाग नोंदवला. या निमित्ताने बोलताना लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांनी सांगितले की, “भारतीय नागरिक वारंवार अशा दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत आहेत. प्रत्येक वेळी शहीदांचे अंत्यसंस्कार तर होतात, पण या देशद्रोही संघटनांचे खरे खपवून घेणारे पाकिस्तानसारखे राष्ट्र अद्याप टिकून आहे हे दुर्दैव आहे. आता वेळ आली आहे की केंद्र सरकारने केवळ प्रतिउत्तराच्या घोषणा न करता, थेट पाकिस्तानच्या गडगडलेल्या व्यवस्थेला लक्ष्य करून कठोर लष्करी कारवाई करावी.” तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “केवळ पत्रकार संघटनांनीच नाही, तर संपूर्ण देशाने आता सरकारवर दबाव आणून पाकिस्तानविरुद्ध एकमुखाने आवाज उठवायला हवा. टी.आर.एफ. सारख्या संघटना फक्त शस्त्रांनीच नव्हे तर आर्थिक, तांत्रिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही कमकुवत करायला हव्यात. शत्रूच्या मानसिकतेवरच घाला घातल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही.” राहुल महाजन, प्रविण बोरसे आणि प्रशांत येवले यांनीही उपस्थित पत्रकारांमध्ये देशभक्ती आणि एकजुटीचा संदेश देत, ‘भारताच्या संप्रभुतेवर कुणीही घाला घालायचा प्रयत्न केला, तर आमच्या लेखणीच नव्हे, तर आवाजही रणगर्जनेप्रमाणे गूंजेल’, असे ठाम मत मांडले. त्यांनी पाकिस्तानचे नाव घेत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र आहे, जे स्वतःच्या देशातील भूक, बेरोजगारी, महागाई, पाणीटंचाईसारख्या समस्या सोडवू शकले नाही, आणि आता भारतात गोंधळ निर्माण करून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.” या निषेधप्रसंगी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे अन्य पदाधिकारी जावेद शेख, निखिल मोर, बंडू सोनार यांच्यासह शहरातील सोशल मीडिया प्रतिनिधी, स्वतंत्र पत्रकार, आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकत्रितरित्या सर्व पत्रकार बांधवांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत, अशा घटनांना विरोध करण्यासाठी पत्रकारांची भूमिका केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक सजगतेची जबाबदारी स्वीकारणारी असते, हे अधोरेखित केले. पाचोरा सारख्या लहानशा शहरातसुद्धा राष्ट्रप्रेमाने भारलेल्या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन एक तीव्र आवाज दिला. त्यांनी केवळ निषेधच व्यक्त केला नाही, तर सरकारसमोर थेट कारवाईची मागणी ठेवून देशातील इतर पत्रकार संघटनांसाठीही एक आदर्श निर्माण केला. सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारिता केवळ बातमी पोहोचवण्याचे माध्यम न राहता, जनभावना, राष्ट्रहित आणि सामाजिक समत्व यांचे नेतृत्व करणारे माध्यम बनले पाहिजे, असा संदेश या निषेधातून मिळाला. शेवटी, उपस्थित सर्व पत्रकारांनी मूक प्रार्थना करत, मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी पाचोऱ्याचा परिसर काही क्षण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी निनादला. हा निषेध म्हणजे केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो भारतीय जनतेच्या मनातील अस्वस्थतेचा, रोषाचा आणि अपेक्षेचा जिवंत आवाज होता.
चाळीसगाव – दिनांक ३० मे २०२५ या दिवशी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली. वाघले (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी अनिल गणेश राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्याचे वडील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे काही अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले असून त्यांची सुटका करण्यासाठी ४५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर एका गुंतागुंतीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा वेध लागला. फिर्यादीनंतर तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. १३७/२०२५ भादंवि कलम ३६३ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, अपहरणकर्त्यांनी फिर्यादी अनिल यांना त्यांच्या वडिलांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल्सद्वारे धमकी देत खंडणीची रक्कम मागितली होती. मात्र, गणेश राठोड यांचे नेमके कोठून अपहरण झाले, हे प्रथमदर्शनी स्पष्ट नव्हते. यामुळे पोलीस तपास अधिक गुंतागुंतीचा आणि संवेदनशील बनला होता. या गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ तपासासाठी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा जळगावचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोउपनि शेखर डोमोळे, पोह संदीप पाटील, पोह मुरलीधर धनगर, पोकों महेश पाटील, पोकों सागर पाटील, पोकों भुषण शेलार, पोकों ईश्वर पाटील, पोकों भुषण पाटील, पोकों जितेंद्र पाटील आणि चापोह दीपक चौधरी यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून या गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळाला. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना या अपहरणामागे जयेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव, जि. नाशिक) यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांचे लोकेशन तपासले असता ते नांदगाव तालुक्यातील मौजे मोझर्ण परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पथकाने लगेच त्या दिशेने मोर्चा वळवला आणि पुढील तपासात कळले की आरोपी हे मनमाड रेल्वेस्टेशनच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या पाठलागाला सुरुवात केली. पोलिसांची गाडी पाहून आरोपींनी मोटारसायकल सोडून शेतामार्गे पळ काढला. मात्र, पोलिसांनी सुमारे पाच किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि शेवटी त्यांना शेतात पकडण्यात यश आले. ही कारवाई खऱ्या अर्थाने थरारक आणि धाडसी होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघा आरोपींनी चौकशीत धक्कादायक खुलासे केले. त्यांनी कबूल केले की, गणेश राठोड यांचे अपहरण त्यांनी जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील (रा. शिंदी, ता. चाळीसगाव, ह.मु. डोंबिवली, ठाणे) आणि त्याचा मित्र सोनू भाऊ (पूर्ण नाव अज्ञात, रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून केले. त्यांनी गणेश राठोड यांना जबरदस्तीने चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाच्या शिवारातील एका शेताच्या शेडमध्ये नेले आणि तेथे त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीचे व्हिडीओ बनवून त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मुलाला म्हणजे फिर्यादी अनिल राठोड याला पाठवले आणि त्यांच्याच नंबरवरून कॉल करून खंडणीची मागणी केली. तपासादरम्यान दोघा आरोपींनी सांगितले की, गणेश राठोड यांना काही वेळासाठी लासलगाव परिसरातील घनदाट जंगलात नेले आणि तिथे त्यांना सोडून दिले. उर्वरित दोन आरोपी त्याच ठिकाणाहून फरार झाले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे तातडीने लासलगावच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच एक झुडपी भागात गंभीर जखमी अवस्थेत गणेश राठोड हे सापडले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. त्यानंतर आरोपी जयेश शिंदे आणि श्रावण भागोरे यांना ताब्यात घेऊन, त्यांच्यासह अपहरणातून सुटलेले गणेश राठोड यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, त्यांच्या सतर्कतेने आणि धाडसाने अवघ्या १२ तासांत अपहरणग्रस्ताला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले. ही कामगिरी पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपास कौशल्याचे उदाहरण ठरली आहे. सदर संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रसिंह चंदेल आणि स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांच्या सूचक मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी तपासाचे व सर्व पथकाचे परिसरातून कौतुक होत असून, पोलिसांनी केवळ एका दिवसात ही धाडसी आणि प्रभावी कारवाई करून पुन्हा एकदा जनतेच्या मनात सुरक्षा आणि विश्वासाचे प्रतिक निर्माण केले आहे. या प्रकरणात अजून दोन आरोपी फरार असून त्यांचा तपास वेगाने सुरू आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणीही सदर आरोपींविषयी माहिती असेल तर ती तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याशी शेअर करावी, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करता येईल. यापुढेही पोलिसांकडून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांवर तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाचोरा – पाचोऱ्यातील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार व कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विशेष भेट दिली. कलेप्रती असलेले प्रेम आणि कलाकारांविषयीची आपुलकी याचे हे मनस्वी उदाहरण ठरले. नुकतेच पंढरपूर येथे पार पडलेल्या शिक्षक संमेलनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासाठी शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळीच्या माध्यमातून व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक सादर केले होते. त्या वेळी काही वैयक्तिक कारणांमुळे तांबे सर उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र त्यांनी कुलकर्णी सरांना फोन करून आश्वासन दिले होते की, पाचोऱ्यात आल्यावर नक्की भेट देतील आणि आपल्या शब्दाला जागत त्यांनी आज स्वतः ‘कला छंद ड्रॉइंग व रांगोळी क्लास’ येथे येऊन त्यांच्या कलेला मानाचा मुजरा दिला. यावेळी दादांनी क्लासेस मधील विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळ्या वातावरणात संवाद साधत त्यांचे कौतुक केले, कलेविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रयत्नांना नव्या प्रेरणेने चेतवले. त्यांच्या प्रेमळ भेटीमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. “एका सामान्य घरातील कलाकारास पदवीधर आमदारांनी दिलेली ही भेट म्हणजे माझ्या प्रामाणिक मेहनतीचे, विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फलित आहे,” असे भावनिक उद्गार शैलेश कुलकर्णी यांनी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजशी बोलताना व्यक्त केले. या घटनेच्या निमित्ताने एक व्यापक प्रश्न उपस्थित झाला – शिक्षकांचे खरे कौतुक कशासाठी व्हायला हवे? फलकावर शिक्षकांनी स्वतःरंगवलेले रंग पाहून की विद्यार्थ्यांच्या प्रतिभेतून स्वतःउमटलेल्या तेजस्वी विचार पाहून? देशाच्या इतिहासात अजरामर ठरलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध प्रसंगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. या वेळी शाळांचे फलक रंगवले जातात, विद्यार्थी भाषणे करतात, रचना सादर करतात आणि महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहचवले जातात. मात्र, काही शाळांमध्ये असेही चित्र दिसते की, ज्या चित्रकला शिक्षकांनी स्वतः चित्रे रंगवली आहेत, त्यांच्या कामाचे अधिक कौतुक होते, तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला संधीच दिली जात नाही.की त्यांना तसे शाळेमध्ये घडवले जात नाही कारण शाळांमध्ये फलक रंगवण्याची परंपरा ही शिक्षणसंस्थेच्या सौंदर्यबद्धतेचे व महापुरुषांप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक असली तरी शिक्षणाचा खरा हेतू विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीची जाणीव जागृत करणे हा असायला हवा. एखाद्या शिक्षकाने स्वतः रंगवलेले चित्र सुंदर असले तरी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून महापुरुषांची चित्रे साकार करून घेतली तर त्याचा खरा शैक्षणिक हेतू साध्य होतो. चित्र रंगवणे हा कौशल्याचा भाग असतो, पण त्या रंगातून विचार साकार करणे हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवे.या उलट तसेच इतर विषयांतील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास अशा विषयांमध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिक्षकांच्या शिकवणीचा मोलाचा वाटा असतो. परीक्षेच्या निकालांमध्ये विद्यार्थी जेव्हा यशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या मागील परिश्रमासोबतच शाळेतील शिक्षकांच्या स्पेशली शाळेत केलेल्या अध्यापनाचे (घरी घेतलेल्या क्लासेसचे नाही ) योगदान असते. त्यामुळे शिक्षणाचा उद्देश केवळ कौशल्यप्रदर्शनात नव्हे, तर ज्ञान व विचारांची पेरणी करण्यात असायला हवा. पण काही ठिकाणी असेही दिसते की, शिक्षक स्वतःच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःच्या हाताने फलक रंगवतात, स्पर्धांमध्ये फक्त स्वतःच्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांकडून स्वतः चित्र काढून ते विद्यार्थ्याच्या नावाने सादर करून घेतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, अभिव्यक्तीशक्ती आणि सृजनशीलता कोमेजते. विशेष म्हणजे, काही कलाशिक्षक शाळेत अपेक्षित कामगिरी दाखवण्यात अपयशी नसतात पण स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी खासगी शिकवण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तयार करतात. मात्र यश आल्यावर शाळेच्या नावाखाली श्रेय घेतात, शिक्षकत्वाचे खरे कार्य विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत दिसायला हवे. आजच्या घडीला शाळांमध्ये प्रश्न निर्माण होतो की, विद्यार्थ्यांना रंगांचे तंत्र शिकवायचे की विचारांचे रंग चढवायचे? फलक सजावट म्हणून न ठेवता, तो एक प्रेरणादायी संदेशवाहक म्हणून साकारायला हवा. फलकावर उमटणारे रंग हे महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करायला हवेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देऊन त्यांच्या हातून असे चित्र तयार करावे, जे समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरणारे ठरेल. यासाठी प्रत्येक कला शिक्षकाने स्वतःकडे आत्मपरीक्षणाचा आरसा धरायला हवा. शिक्षण ही एक नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन नाही, ती विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या पायाभरणीची पवित्र प्रक्रिया आहे. आणि यात प्रत्येक शिक्षकाचा वाटा महत्त्वाचा आहे. कलाशिक्षकांनीही हे जाणले पाहिजे की, त्यांच्या हातून विद्यार्थी घडले तरच त्यांच्या कलेला खरा अर्थ प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रात जेव्हा विचार उमटतो, तेव्हा त्यामागे उभा असलेला शिक्षक हा खरा आदर्श ठरतो. शाळा व्यवस्थापनाने आणि पालकांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, शिक्षण ही नुसती सजावट नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या हातून घडवलेल्या सर्जनशील कामाला आणि विचारशील अभिव्यक्तीला अधिक मान्यता द्यायला हवी. शिक्षकाने स्वतः रंगवलेले चित्र हे त्याच्या कौशल्याचे प्रतीक असते, पण शाळेतील (घरच्या क्लासेस मधील नाही ) विद्यार्थ्यांनी साकारलेली कलाकृती हे शिक्षकाच्या अध्यापनाचे खरे यश असते. आणि म्हणूनच आपण, समाज म्हणून, विद्यार्थ्यांच्या घडवणुकीवर अधिक भर देणाऱ्या शिक्षकांचे खरे कौतुक केले पाहिजे.आणि अशाच शिक्षकाची देखील शिफारस केली पाहिजे
जळगाव जिल्ह्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे शेंदुर्णी हे गाव म्हणजे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातही अत्यंत प्रतिष्ठित नाव. शेंदुर्णी म्हटले की, त्या गावाच्या इतिहासात आणि वर्तमानात अढळ स्थान मिळवलेल्या गरुड कुटुंबियांची ओळख आपोआपच पुढे येते. या गरुड कुटुंबाने केवळ आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर समाजहितासाठी घेतलेल्या ध्येयवादी झपाट्यामुळे संपूर्ण खानदेशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच घराण्यातील वंदनीय स्व. गजाननराव गरुड यांचे संस्कार, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी ही आजही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरते. याच गरुड परिवारातील सुनीलदादा गरुड, आणि त्यांचे चतुर, संवेदनशील, सेवाभावी विचारसरणीचे सुपुत्र डॉ. सागरदादा गरुड यांच्यावर आज या संपूर्ण परंपरेचा वारसा जपण्याची जबाबदारी आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी ती जबाबदारी केवळ यशस्वीपणे पार पाडलीच नाही, तर त्या सेवेला एक वेगळेच व्यापक रूप दिले आहे.ते आपले काका संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यात ज्यांना युवकांचा खरा मित्र, गरजूंसाठी धावून जाणारा डॉक्टर, आणि भारतीय जनता पक्षाच्या तडफदार नेतृत्वाचे उदयोन्मुख प्रतीक म्हणून ओळखले जाते ते म्हणजे डॉ. सागर गरुड. त्यांचा वाढदिवस, जो 30 एप्रीलला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या १ दिवस आधी येतो, तो दिवस एक साक्षात्कारच वाटावा, असा असतो. कारण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिवशी एकदिवस आधी जन्मलेली ही प्रतिभाशाली, संवेदनशील, आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणजे जनसेवेसाठी जन्मलेलाएक खरा योध्दा आहे. 29 मे च्या मध्यरात्रीपासूनच पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानासमोर युवकांची उत्साहात गर्दी झाली होती. दोन्ही मतदारसंघातील विविध भागांमधून, अनेक युवक चारचाकी व दुचाकी वाहनांवर मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन सागरदादांचा वाढदिवस साजरा करत होते. युवकांच्या चेहऱ्यावरचा आत्मीयतेचा प्रकाश, एक आदर्शाची भेट घेण्यासाठी धावून आलेली तरुण मनं, आणि सागरदादांप्रती असलेली निखळ प्रेमभावना पाहून त्या रात्री पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या वाढदिवसाची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे युवकांनी खास बनवलेला, डॉ. सागरदादा गरुड यांचा मोठा चार बाय तीन फुटाचा फोटो असलेला केक, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या केकवर सागरदादांची छायाचित्रित प्रतिमा म्हणजे एक श्रद्धा व आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतिक ठरली होती. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील ना.गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली सागरदादा यांचे कार्य पाहता, ते केवळ वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, राजकीय मार्गदर्शक आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ठसठशीत ओळख निर्माण करत आहेत. त्यांचे काका संजयदादा गरुड हे लोकप्रिय नेते असून, त्यांच्या छायेतून तयार झालेला डॉ. सागर गरुड हा एक असा नेतृत्वप्रवृत्तीचा तेजस्वी तारा आहे, जो राजकीय आकांक्षा असूनही त्याच्या कर्तव्यातून, वैद्यकीय सेवेतून, आणि सामाजिक कार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांचे कार्य हे केवळ व्यवसायिक नसून त्यामध्ये सेवा, तळमळ, आणि माणुसकीचा गंध आहे. गरीब, गरजू आणि सत्ताधारी राजकीय मंडळींपासून दूर असलेल्या सामान्य जनतेसाठी ते नेहमी उभे राहिले आहेत. रुग्ण कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, सागरदादांची वैद्यकीय सेवा म्हणजे त्यांच्यासाठी आशेचे दार ठरतो. कोरोना काळ असो किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे, सागरदादांनी कधीही समाजसेवेपासून माघार घेतली नाही. एकीकडे डॉक्टर म्हणून सतत रुग्णांमध्ये राहून त्यांना उपचार देणं, तर दुसरीकडे युवकांच्या प्रश्नांसाठी, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, आरोग्य जनजागृतीसारख्या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेणे हे त्यांचे गुणविशेष आहेत.त्यांच्या वाढदिवशी विशेषतः राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उपचारांमुळे पुनर्जन्म मिळालेल्या अनेक रुग्णांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर सागरदादांना शुभेच्छा देणारे मेसेजेस, रील्स, फोटो कोलाजेस आणि व्हिडीओ क्लिप्सचा अक्षरशः पूर आला होता. त्यांच्या चहत्यांनी पोस्टर्स लावून, विविध सार्वजनिक ठिकाणी अन्नदान उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला.वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, हार घालणे, फोटोसेशन करणे एवढाच मर्यादित उत्सव नाही, तर तो त्या व्यक्तीच्या कार्याचा जाहीर गौरव असतो. आणि सागरदादा गरुड यांचा वाढदिवस ही केवळ औपचारिकता नव्हे, तर जनतेने त्यांच्या मनापासून केलेली कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. राजकीय स्वार्थाच्या या गढूळ वातावरणात जेव्हा डॉक्टर सागरदादा गरुड सारखी व्यक्तिमत्वं आपल्या कामातूनच आदर्श निर्माण करतात, तेव्हा समाजाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यांचे नाव सागर असले तरी त्यांच्या सेवाभावाची व्याप्ती सागराच्या खोलीपेक्षाही अधिक खोल आहे. त्यांची गाठ नुसती शेंदुर्णी किंवा पाचोऱ्यापुरती मर्यादित नाही, तर ती जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या हृदयात जाऊन पोहोचली आहे. ते राजकारणात नसूनही, हजारो युवक त्यांना आपला नेता मानतात आणि त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्यात असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ताकद आहे.आजच्या वाढदिवशी अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी त्यांच्या या सेवाभावी कामाचे कौतुक केले. एका साध्या कुटुंबातून आलेल्या सागरदादांनी डॉक्टर होणे, आणि मग यशस्वी हॉस्पिटल चालवणे, एवढ्यावर समाधान न मानता गरजूंकरिता मोफत आरोग्य शिबिरे, मोफत ऑपरेशन योजना, आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत उभे राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, याचा आज समाजाला विशेष अभिमान वाटतो. त्यांच्या वाढदिवशी “आरोग्य हेच खरे धन” ही उक्ती समाजात प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सागरदादांना शुभेच्छा देताना अनेक रुग्णांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू पाहायला मिळाले. कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यापेक्षा अधिक प्रेम आणि आपुलकी डॉ. गरुड यांनी रुग्णांच्या मनात मिळवली आहे.आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘झुंज वृत्तपत्र’ आणि ‘ध्येय न्यूज परिवार’ यांच्यावतीने आम्ही डॉ. सागर गरुड यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, जनसेवेचे हे व्रत निरंतर चालू राहो आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे यश शतगुणित होवो, हीच प्रार्थना! एकविसाव्या शतकात सेवाभावाने झेप घेणाऱ्या गरुडाप्रमाणे, डॉ. सागर गरुड हे नाव खऱ्या अर्थाने जनतेसाठी गरुड झेप घेणारे व्यक्तिमत्व बनले आहे.