पाचोरा – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) श्रीमती स्मिताक्षी बरुआ (IAS) यांनी आज पाचोरा येथे भेट दिली. या भेटीच्या दरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि तयारीचा सखोल आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. स्मिताक्षी बरुआ यांनी सर्वप्रथम निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. या कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष पाहणीसाठी ठेवले होते, ज्यात आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मीडिया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष, तसेच मतदार सुविधा कक्ष यांचा समावेश होता. या सर्व कक्षांच्या कामकाजाची तपासणी करून, संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.याच दरम्यान, श्रीमती बरुआ यांनी मतपत्रिका आणि इतर महत्त्वाच्या निवडणूक साहित्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन केलेल्या Strong Room च्या सुरक्षेची पाहणी केली. Strong Room मध्ये ठेवलेल्या साहित्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी तपासले.पुढे, निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी, नियमानुसार अडचणी आणि त्यावर उपाययोजना यांचा आढावा घेतला गेला. सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पार पाडली जात असल्याची खात्री करून घेतली.या महत्वपूर्ण भेटीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भूषण अहिरे, संपर्क अधिकारी तथा जिल्हा परिषद जळगावच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाचोरा/भडगाव श्रीमती शितल सोलाट, श्री. विजय बनसोडे आणि इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्वसाधारण निरीक्षक स्मिताक्षी बरुआ यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी दिलेल्या सूचनांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. या भेटीनंतर निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांनी अधिक जोमाने तयारीला लागण्याचे संकेत मिळाले. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आणि निवडणुकीचे निर्भय व निष्पक्ष आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे काम करत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.