पाचोरा तालुक्यात मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन

0

पाचोरा : 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्विप (SVEEP) अभियानाच्या अंतर्गत आणि मा. स्विप नोडल अधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच मतदार प्रतिज्ञा, निबंध लेखन, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, आणि फोटो सेल्फी पॉइंट तसेच संकल्पपत्र वितरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. पथनाट्य सादरीकरणाद्वारे ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच ‘वोटर हेल्पलाइन अॅप’चे रजिस्ट्रेशन करून मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.मतदान जनजागृती अभियानाचे नेतृत्व श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये मतदारांची सहभागिता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here