पाचोरा-भडगाव तालुक्यात “विकास ” झाला पण कोणाचा ?

0

पाचोरा -गेल्या काही काळात पाचोरा-भडगाव तालुक्यात “विकास” नावाचा प्रोपेगेंडा खूप मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आला आहे. विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखाली तब्बल 3 हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली आणि काही कामे सुरूदेखील झाली. मात्र, या विकासात खरेच जनतेचा लाभ आहे का? की केवळ ठेकेदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी हा विकास आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कामांमागील वास्तव आणि कार्यक्षमतेबद्दल जनतेला जागरूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

*आमदार साहेबांच्या हजारो कोटींच्या  (कागदावरील ? )विकास कामांचे चॅलेंज अमोलभाऊ शिंदे यांनी स्विकारले*

निकृष्ट दर्जाची कामे आणि अल्पायुषी विकास

प्रत्यक्ष जाऊन बघीतले तर असे दिसून येते की जनतेच्या कर रूपी पैशातुन खर्च झालेल्या विविध निधीतून करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. यात प्रामुख्याने रस्त्यांचे बांधकाम, सार्वजनिक मोकळ्या जागांवर पेवर ब्लॉक्स बसवणे, लायटिंग लावणे, पुतळ्यांचे सुशोभीकरण स्मशानभुमी आणि इमारतीं व सभामंडप उभारणी , पाणी सिंचन , भुयारी गटारी  या कामांचा समावेश आहे. परंतु, प्रत्यक्षात बघितले तर या सर्व  कामांचा दर्जा अत्यंत हलका आहे, ज्यामुळे यांची आयुष्यमान अत्यल्प आहे. त्यामुळे लवकरच या कामांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची आवश्यकता भासणार आहे, ज्यामुळे जनतेचा पैसाच वाया जाणार आहे.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी
सर्वसाधारण करदात्यांच्या पैशांतून निधीची उभारणी करून, सरकारी निधीचा वापर ठेकेदारांना विशेषतः नातेवाईविकांना अष्टपैलू व्यवसायातून लाभ देण्यासाठी होत आहे, अशी जनतेची भावना आहे. कारण 90% कामे ही ठेकेदारांना & स्वकियांना आर्थिक फायदा देण्यासाठी करण्यात आली आहेत. यात नेत्यांचा थोडा हिस्सा, टेंडर घेणारे मुख्य ठेकेदार, सब-ठेकेदार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कामांची निवड आणि त्याची वाटणी यामध्ये नेत्यांच्या नातेवाईक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेल्या अर्थात आता आता आलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात आहे, असे दिसून येते.

कायमस्वरूपी रोजगार निर्माणाचा अभावामुळे

या 3 हजार कोटींच्या विकास कामांमधून किती लोकांना तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला, हे तपासल्यास उत्तर “शून्य” असे आहे. मागील दहा वर्षांतील विकासकामांमधून स्थायी रोजगार निर्माण झाला नाही. दरवर्षी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले गेले, परंतु वास्तविकता तशी नसल्याचे जनतेला दिसून आले आहे. या विकास कामांमधून स्थायी रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न नाहीत, ही बाब लोकांच्या असंतोषाचे मुख्य कारण ठरली आहे.

पिण्याचे पाणी: दुर्लक्षित गरज

पाचोरा व भडगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होण्याची आवश्यकता आहे. सध्या पाचोरा-भडगाव शहरासह तालुक्यातील लोकांना पाणीपुरवठा वर्षात फक्त 40-50 दिवसच होतो, म्हणजेच साधारणपणे महिन्यातून 3-4 वेळा. बाकी वेळा लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही मूलभूत गरज पूर्ण करण्याऐवजी निधी विकासाच्या अन्य कामांसाठी खर्च केला जातो. त्यामुळे, कोणता विकास केला जातो, हे स्थानिकांना समजत नाही.

कुठे गेला “खरा विकास”?

तालुक्यातील जनतेला विचारायचे आहे, “विकास” म्हणवले जाणारे हे काम नक्की कोणासाठी आहे? इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाचोरा-भडगाव हा तालुका अजूनही मागासलेला आहे. उद्योगधंदे नाहीत, कायमस्वरूपी रोजगार नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि वीज पुरवठा अनियमित आहे. एस टी महामंडळाच्या बसेस सर्व नादुरुस्त अवस्थेत धावत आहेत बस स्टँड आवारात कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नाही ग्रामीण रुग्णालय दोघेही तालुक्यात शेवटचा श्वास घेत आहे इतकी वाईट अवस्था रुग्णालयाची झालेली आहे मग हा विकास नक्की कोणासाठी आणि कशासाठी? जनतेच्या हिताचा खरा विचार करताच या कामांमध्ये दीर्घकालीन लाभ असलेले प्रकल्प अद्याप का होत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो.
भ्रष्टाचार आणि व्यवस्थेतील फोलपणा
या कामांच्या माध्यमातून फक्त काहीमोटार मोजण्याएवढे लोकांचेच भले झाले आहे. कामांच्या ठेक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मोठे ठेके मिळवणारे ठेकेदार आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय नेते यांना प्राधान्य दिले जाते, आणि सामान्य माणूस दुर्लक्षितच राहतो. कामांची गुणवत्ता तपासणाऱ्या यंत्रणाही कमजोर आहेत, ज्यामुळे कामांचा दर्जा उंचावण्यास अडथळा निर्माण होतो. ठेकेदारांना कामे मिळाल्यानंतर त्यांचा दर्जा पाहण्यास कोणतेही ठोस उपाय होताना दिसत नाहीत, हे व्यवस्थेतील फोलपणा स्पष्ट करते.
  जनतेची भूमिका आणि पुढील वाटचाल
  आता तालुक्यातील लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे. निवडणूक तोंडावर येत असताना पुन्हा एकदा आश्वासनांची यादीची उधळण होत आहे विविध जाती धर्माचे मेळावे – बैठका घेऊन त्यांना लाखो आणि कोटीच्या कामांची तोंडी खैरात वाटली जात आहे  कधी नव्हे ते पहिल्यांदाच पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघात समाजामध्ये फुट पाडून त्यांच्यामध्ये भिंती उभारून विशेषतः युवक पोरांना नको ते व्यसन व लालच देऊन त्यांच्याकडून निवडणुकीची कामे करून घेतली जात आहेत परंतु विकासाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे होऊन प्रत्यक्षात किमान सुविधा मिळाल्या नाहीत, हे लक्षात ठेवावे लागेल. विकासाचे खरे स्वरूप ओळखून, निर्णय घ्यावा लागेल.
   अखेर, पाचोरा-भडगाव तालुक्यातील विकास कामे केवळ एक प्रोपेगेंडा म्हणून लोकांसमोर आणली जात आहेत. या कामांमध्ये निस्कृष्ट कामांची उधळपट्टी, ठेकेदारांना फायदा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा वापर करून फक्त काही लोकांचे भले केले जात आहे. त्यामुळे, तालुक्यातील जनतेने आता “खऱ्या विकासासाठी” ठोस मागण्या उभ्या कराव्यात, असे आवाहन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here