महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव: लातूर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममध्ये 4,200 पिल्लांचा मृत्यू

0

           पाचोरा  (झुंज वृत्तपत्र &ध्येय न्युज प्रतिनीधी -अविनाश माळी, कुऱ्हाड Mo.9766719218 ) :- महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना एक गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये 4,200 पिल्ले अचानक मरण पावल्याने खळबळ उडाली आहे. ही पिल्ले पाच ते सहा दिवसांची असून दोन ते तीन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. पोल्ट्री फार्म मालकाने या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना वेळीच दिली नाही. प्रशासनाने मृत पिलांचे नमुने पुणे येथील राज्य पशू रोग निदान प्रयोगशाळेत पाठवले असून तपास सुरू आहे.
        बर्ड फ्लू, ज्याला एव्हियन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, हा पक्ष्यांमध्ये होणारा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणू पक्ष्यांच्या लाळ, विष्ठा किंवा डोळ्यांच्या स्रावांद्वारे पसरतो. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो.
      महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात पोलिस आयुक्तांच्या सरकारी बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या घटनेनंतर ठाणे महापालिकेने २१ कोंबड्या आणि २०० अंडी नष्ट केली आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चिकन-मटणाच्या दुकानांवर देखील परिणाम झाला आहे.
     बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती दिली जात आहे. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद करण्यात आली आहे. उघड्या कत्तलखान्यांमध्ये स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे. बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
      बर्ड फ्लू माणसांना होणं दुर्मीळ आहे. त्यासाठी या विषाणूमध्ये जनुकीय बदल व्हावे लागतात, ज्याला म्युटेशन म्हणतात. म्युटेशन झाल्यानंतर जनुकीय बदल घडलेला विषाणू असेल त्याचे भाकीत करणे कठीण आहे. डिसेंबर 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2006 ते 2020 पर्यंत जगभरातील 40-45 लोकांना बर्ड फ्लूची बाधा झाली आहे. भारतात आतापर्यंत एकालाही बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला नाही.
     बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असू शकतात, जसे की ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखी, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास. गंभीर प्रकरणांमध्ये, न्यूरोलॉजिकल लक्षणे जसे की दौरे किंवा मानसिक बदल देखील दिसू शकतात. बर्ड फ्लूमुळे बहुअवयव निकामी होणे किंवा सेप्टिक शॉक देखील होऊ शकतो.           बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत:
     संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येण्याचे टाळा.
      स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करा.
       अर्धवट शिजवलेल्या मांस आणि अंड्यांचे सेवन टाळा.
     पक्ष्यांच्या मृत्यूची घटना आढळ्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवा.
       बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सतर्कता आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here