![]()
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही.” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.
“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
१२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





श्रीमान गुरूदत्त सर नमस्कार
आपण आयोजित आणि संचालित केलेला कार्यक्रम छान होणार नाही… असं कसं म्हणता येईल! कारण आपला आखिव रेखिव आणि सुसूत्र बद्ध तसेच शेवटपर्यंत कवी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हातोटी विलक्षण आहे. कार्यक्रम सुरू असताना खेळीमेळीच्या वातावरणात संमेलन पार पडते. ते फक्त आणि फक्त आपल्या माणसाला माणसाशी जोडून सौहार्दाचे वातावरण निर्माण करून इष्ट ध्येय गाठण्यासाठी लागणारी हातोटी. जसे की प्रत्येकाचीच आस्थेने विचारपूस. त्यांच्या कवितेला दाद देत, त्यांच्या साहित्याचा सन्मान व पुरस्कार तसेच साहित्यिकांचा ही योग्य तो सन्मान. एवढेच नव्हे तर कोणताही प्रस्थापित साहित्यिक न बोलावता. आपल्यामधील साहित्यिकास अध्यक्षांचा मान देत असता त्यामुळे त्यांना मान मिळतोच मिळतो पण आपणही स्वतंत्रपणे अध्यक्ष पद किंवा कोणतेही पद भुषवू शकतो अशी भावना निर्माण व्हायला मदत होते. त्यांच्यातील छुपा आत्मविश्वास जागृत करण्याचे कार्य आपण करत आहात. राहिला मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रश्न तर सारेच कवी, साहित्यिक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. त्यास योग्य व्यासपीठ मिळायला हवे. त्यासाठी एखादं पुस्तक म्हणा किंवा कविता म्हणा यावर पुर्ण वेळ नाही तर फक्त आणि फक्त अर्धा तास चर्चासत्र घडवून आणले पाहिजे असे मला वाटते. कारण कविता लिहिल्या जातात. एखादा विषय दिला असतो त्यावरचं कविता असतात. कवी कल्पना, वास्तव त्याचा आशय कधी कधी कवी स्वतः सांगू शकत नाही तर जो रसिक आहे तोच सांगू शकतो. प्रत्येक रसिक वाचकांची आकलन शक्ती वेगळी असते. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही वेगळा असू शकतो. त्यामुळे बऱ्याचवेळा कविता सुद्धा वाटते की अरे…मी लिहिलेल्या कवितेचा आशय असा सुद्धा असू शकतो. मी तर अशी कल्पना ही केली नव्हती. तेव्हा त्यांना एक हुरूप आणि नवीन विचारांनी लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
अशोक बी कांबळे, नागपूर