‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणत अनेकांनी तंत्रज्ञानाचा अंकुश आपल्या हातात घेतला. पण दुर्दैवाने ही मुठ्ठी उघडली तेव्हा आपल्या मुलंच कधी निसटली, हे लक्षातच आलं नाही.
एके काळी शिक्षक म्हणजे समाजातील आदर्शवत व्यक्ती. त्यांचे बोलणे म्हणजे शिस्त, वर्तन म्हणजे सुसंस्कृती आणि निर्णय म्हणजे अंतिम सत्य मानले जायचे. पालक त्यांच्या मुलांबाबत शिक्षकांचा सल्ला घेत, सहकार्य करत. पण आज स्थिती उलटी झाली आहे. शिक्षकाने जर एका विद्यार्थ्याला साधी शिक्षा केली, तर पालक शाळेत धडकतात. त्यांची भाषा असते, “त्याला शिक्षा केली म्हणून तो आजारी पडला… आम्ही लगेच डॉक्टरकडे नेलं… हात सुजला… तो शांत का बसतोय… त्याला काय मानसिक धक्का बसलाय का?”
आज शिक्षकांनी चुकूनही कुणाला ओरडले, तरी तो गुन्हा ठरतो. कुणा मुलाच्या – मुलीच्या बॅगेत लव्ह लेटर सापडले, मोबाईलमधून अश्लील मजकूर आढळला, तरी शिक्षकांनी पालकांना सांगायला भीती वाटते. कारण सांगितल्यास शिक्षकावर विनयभंग, छळ, मानसिक त्रास यांसारखे आरोप लावण्याची धमकी दिली जाते.
हे चित्र इतके विदारक आहे की, शिक्षकांचे काम शिक्षणापेक्षा स्पष्टीकरण देणे झाले आहे.
पूर्वी शिक्षकांकडून मिळणारी शिस्त म्हणजे आयुष्याचे मार्गदर्शन असे. शिक्षकांनी दिलेली एखादी शिक्षा – ती वेळेवर दिलेली दिशा होती. पण आता शिस्त म्हणजे अन्याय, शिक्षा म्हणजे अत्याचार, आणि शाळा म्हणजे आरोपांची जागा बनली आहे.
आज सहावी-सातवीची मुले सैराटसारख्या चित्रपटांतील वर्तन जगायला लागली आहेत. प्रेयसीप्रेमाची नाटके, बिनधास्त संवाद, मोबाईलच्या साहाय्याने अश्लील व्यवहार – ही आजची खरी शाळेतील परिस्थिती आहे.
पूर्वी पालक मुलांच्या वेळो-वेळी वह्या, दप्तर, कंपास तपासायचे. आता मात्र पालकांच्या हातात मुलांच्या प्रगतीचं अंधार पडलंय. त्यांना मुलांच्या मोबाईलमध्ये काय आहे, हे माहिती नाही. बॅग तपासण्याऐवजी त्यांचं लक्ष फक्त ‘त्याने कोणता ब्रँडचा मोबाईल घेतला’ यावर असतं.
पालक शाळा, परीक्षा, शिक्षक याकडे फक्त जबाबदारी टाकून मोकळे होतात. मग मुलांच्या चुकीच्या वर्तनाला शिक्षक जबाबदार कसे?
अलीकडे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून फायटर , हल्ले, चाकू बाळगणे, व्हायरल व्हिडिओ तयार करणे अशा घटना घडू लागल्या आहेत. हे केवळ शिस्तीचे उल्लंघन नाही, तर सामाजिक अस्थिरतेचे लक्षण आहे. शिक्षक जर यावर बोलले, तर पुन्हा ‘शाळेने आमच्या मुलाला त्रास दिला’ असा आरोप.
एक काळ होता, शिक्षकांच्या घरासमोर मार्गदर्शनासाठी लोक उभे राहायचे. आज शिक्षकांचं मत विचारण्याऐवजी त्यांच्यावर संशय घेतला जातो. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते.
शिक्षकांचे निर्णय, निरीक्षण, सूचना – आता पालकांना ‘हस्तक्षेप’ वाटतात. शाळेतील शिक्षणव्यवस्था रोज टिकली की नाही, याची चिंता आता शिक्षकांच्या मनात आहे.
शिक्षक हे समाज घडवतात. पण त्यांच्यावरच जर शिक्षण थोपवले गेले, तर समाजाची दिशा भरकटते. पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवायला हवा. शिक्षकांना संरक्षण हवे, अधिकार हवे, आत्मसन्मान टिकवण्यासाठी सामाजिक पाठबळ हवे.
शाळा म्हणजे केवळ पुस्तके शिकवायची जागा नाही, ती संस्कारांचे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठात जर शिक्षक असुरक्षित असतील, तर शिक्षण कुंठित होईल.
आज गरज आहे ती पालकांच्या मानसिकतेच्या बदलाची. मुलाला फक्त पैसे, मोबाईल, वस्तू देणं म्हणजे जबाबदारी नव्हे. पालकत्व म्हणजे संवाद, मार्गदर्शन आणि परिश्रमाची साथ.
शिक्षकांनी दिलेले संस्कार जर पालक पेलू शकत नसतील, तर ही पिढी स्वैराचार आणि दिशाहीनतेच्या गर्तेत जाणार. मुलांवर प्रेम जरूर करा, पण अंधप्रेम करणे शिक्षणाच्या विरोधात आहे.
आजचा लेख कुठल्याही व्यक्तिगत कोणत्याही शिक्षकाच्या किंवा शाळेच्या , गावाच्या बचावार्थ नव्हे, तर सद्यस्थितीत समाजातील असंतुलन दाखवणारा आरसा आहे. शिक्षक हे अजूनही समाजाचा आधारस्तंभ आहेत. पण जर त्यांना आपण ‘अपराधी’ ठरवत राहिलो, तर उद्याची पिढी ‘अशिक्षित’ नसली तरी ‘अविचारी’ नक्की होईल.
म्हणूनच, शिक्षकांनी जबाबदारी घ्यावीच, पण पालकांनीही ती टाळू नये. शिक्षण ही एकत्रित प्रक्रिया आहे, शिक्षक आणि पालक दोघांनीही ती सन्मानाने आणि सहकार्याने पार पाडली पाहिजे.
लेखक – सौ. शितल संदीप महाजन ( उप- शिक्षीका श्री गो से हायस्कूल पाचोरा Mo. 7588645908 )






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.