पाचोरा -पाचोरा शहर, तालुका स्पेशली पिंपळगाव, नगरदेवळा या परिसरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांची वाढती चलती व तीव्र होत चाललेली व्यावसायिक स्पर्धा ही स्थानिक प्रशासनासाठी व सभ्य नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या धंद्यांच्या आर्थिक लाभामागील शर्यत इतकी तीव्र झाली आहे की, केवळ कायद्याचे उल्लंघनच नव्हे, तर या अवैध धंद्यांचे चालक एकमेकांच्या पाय ओढण्यासाठी स्थानिक माध्यमांचा आणि पत्रकारांचा वापर करत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
हे चित्र केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून सामाजिक स्वास्थ्य व पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यामुळे, या सर्वच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत निष्पक्ष भूमिका घेणे अत्यावश्यक ठरत आहे.
पाचोरा, पिंपळगाव व नगरदेवळा या ग्रामीण-नगर मिश्रित परिसरांमध्ये बेकायदेशीर धंद्यांचा विस्तार विविध स्वरूपात वाढताना दिसतो. त्यामध्ये बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री, जुगार अड्डे, सट्टा व्यवसाय, चक्री, पोटली ,गुटखा, तंबाखूचे प्रतिबंधित उत्पादन, वाळू तस्करी, तसेच परवाना नसलेली बार व लॉजेस चालवणे , गावठी कट्टे यांचा समावेश आहे.
हे सर्व व्यवसाय केवळ सामाजिक स्वास्थ्याला धोका देणारे नाहीत तर स्थानिक तरुणवर्गाला दिशाभूल करणारे आहेत. यामागे असलेले कमी वेळात जास्त ‘आर्थिक आकर्षण आणि गुन्हेगारीच्या साहाय्याने मिळणारा अवैध लाभ यामुळे हे धंदे अधिकाधिक फोफावत आहेत.
या अवैध धंद्यांच्या चालकांमध्ये आता फक्त अधिक कमाईची स्पर्धा उरलेली नसून, एकमेकांचा धंदा बुडवण्यासाठी सत्ताधारी व प्रभावशाली माध्यमांचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी असेही उघड झाले आहे की, एक प्रतिस्पर्धी दुसऱ्याविरुद्ध ठोस पुरावा देण्याऐवजी, पत्रकार किंवा स्थानिक न्यूज पोर्टल्सकडून बातम्या प्रसिद्ध करून दुसऱ्याचा धंदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे प्रकार इतके सूक्ष्मपणे रचले जातात की, बातम्यांच्या मथळ्यांतून किंवा विशिष्ट पत्रकारांमार्फत मुद्दाम विशिष्ट व्यक्ती व व्यवसायाचाच उल्लेख करून बातमी प्रसिद्ध केली जाते. यामुळे त्या व्यवसायावर अचानक पोलिसांची नजर जाते, तपास होतो आणि धंदा बंद होतो. दुसऱ्या धंद्यावाल्याला याचा फायदा होतो.
या प्रकारांमुळे पत्रकार आणि पोलीस यांच्यातील सहकार्याची पारंपरिक साखळी तुटू लागली आहे. पोलिसांच्या दृष्टीने पत्रकारांच्या माहिती मधील वस्तुस्थितीपेक्षा हेतू महत्त्वाचा वाटू लागला आहे, तर पत्रकारांच्या बाजूने पोलीस कारवाईतील निवडकपणा आणि ढिलाईवर बोट ठेवले जात आहे.
या परस्परसंशयामुळे एकप्रकारचे ‘शितयुद्ध’ निर्माण झाले आहे. पोलिसांना वाटते की पत्रकार एखाद्याच्या सांगण्यावरून बातमी करत आहेत, तर पत्रकारांना वाटते की पोलीस निवडक कारवाई करत एका गटाला वाचवत आहेत. अशा स्थितीत दोघांमधील विश्वास हरवून स्थानिक गुन्हेगारीला अप्रत्यक्षपणे संधी मिळत आहे.
ही समस्या केवळ स्थानिक पातळीपर्यंत मर्यादित न ठेवता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नियमित गुप्त तपास, सूत्रबद्ध माहिती संकलन, आणि निष्पक्षता यावर भर देऊन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे.
विशेषतः एखाद्या पत्रकाराच्या बातमीच्या आधारावर कारवाई करताना पोलीस प्रशासनाने त्या बातमीतील माहितीची खातरजमा करणे व अन्य अवैध धंद्यांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा हे एकपक्षीय कारवाईचे रूप घेतल्यास त्याचे सामाजिक व प्रशासकीय दुष्परिणाम मोठे होऊ शकता
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. त्यामुळे तिचा वापर केवळ आर्थिक व व्यक्तिगत हितसंबंधांसाठी झाल्यास पत्रकारितेचा धर्मच लोप पावतो. पत्रकारांनी कोणतीही बातमी देताना निष्पक्षतेचे भान ठेवणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे संपादक व न्यूज पोर्टल्सचे मालक यांच्यावरही सामाजिक उत्तरदायित्व आहे. एकतर्फी आरोपांच्या बातम्या प्रसिद्ध करण्याऐवजी वस्तुनिष्ठ माहिती, दोन्ही बाजूंनी मते घेऊन सखोल विश्लेषणासह बातम्या द्याव्यात.
अवैध धंद्यांमुळे समाजाची नैतिक मूल्ये ढासळत आहेत, तर स्पर्धेच्या नावाखाली माध्यमांचा गैरवापर होत आहे. अशा वेळी पत्रकार व पोलीस यांनी एकमेकांवर संशय ठेवण्याऐवजी एकमेकांचे साथीदार म्हणून काम करणे गरजेचे आहे.
दोघेही समाजासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने सर्व अवैध धंद्यांवर एकाच निकषाने कारवाई व्हावी, आणि पत्रकारिताही निष्पक्ष व मूल्याधिष्ठित राहावी, हीच अपेक्षा.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.