पाचोरा शहरातील सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सजग असलेले पोलीस दल, सध्या नव्या उमेदीने सामाजिक शिस्तीच्या पुनर्स्थापनेसाठी पुढे सरसावले आहे. विशेषतः पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आपल्या कर्तृत्वाने अवैध चक्रीधंदा आणि अश्लील वर्तनाला खतपाणी घालणाऱ्या बोगस कॉफी शॉप्सवर थेट धडक देऊन सर्वसामान्य पालक, शिक्षक आणि समाजप्रेमी नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या समय -सूचकते बाबत एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे – दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्यानंतर त्यांनी उचललेली विशेष खबरदारीची पावले. परीक्षा संपल्यानंतर, विशेषतः अल्पवयीन वयोगटातील मुला-मुलींची ‘सैराट’ होण्याची प्रवृत्ती सामाजिकदृष्ट्या धोकादायक ठरते हे त्यांनी वेळीच ओळखले. भावनिक वयात आणि परीक्षेचा ताण संपल्यानंतर भविष्यातील विचार न करता अचानकपणे सैराट सारखे निर्णय घेण्याची मानसिकता याच वयोगटात दिसून येते. यासाठी श्री. पवार यांनी दहावी व बारावीच्या शेवटच्या पेपरच्या दिवसापासून पुढील तीन ते चार दिवस पाचोरा शहरात पोलीस यंत्रणा सतर्क ठेवली. रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक, तसेच शहरातून बाहेर जाणारे महत्त्वाचे मार्ग – जसे की जळगाव चौफुली, भडगाव रोड, जामनेर रोड – याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना छुप्या पद्धतीने तैनात करण्यात आले. यामुळे अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचे अनावश्यक स्थलांतर ( पळून जाणे ) किंवा गैरवर्तन रोखण्यात यश आले. या कारवाईमुळे पालकवर्गात समाधानाची भावना निर्माण झाली. पोलीस केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणारे नसून आपल्या मुलांचे रक्षण करणारे सामाजिक प्रहरी आहेत, याची प्रचीती आली अशोक पवार यांची ही दूरदृष्टी व सजगता कौतुकास पात्र आहे. २३ मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पाचोऱ्याच्या राजीव गांधी टॉउन हॉलच्या मागे सुरु असलेल्या एका अवैध चक्रीवर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. संगणकाच्या साहाय्याने LED स्क्रीनवर १ ते १० अंकांच्या माध्यमातून पैसे लावण्याचा प्रकार तेथे सुरू होता. या छाप्यात पोलीसांनी ४० हजार रुपये किमतीचे संगणक साहित्य जप्त केले. संबंधित चक्रीचालक अविनाश खंडू सूर्यवंशी हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राहुल शिंपी, पो.कॉ. योगेश पाटील, व वाहनचालक पो.हे.कॉ. समीर पाटील यांनी केली २४ मार्चच रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील नवकार प्लाझा इमारतीतील ‘सिल्वर पॉईंट’ नावाच्या कॉफी शॉपमध्ये युवक-युवतींसाठी अश्लील वर्तनाची जागा उपलब्ध करून दिली जात आहे. पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत छापा टाकला आणि या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला. कॉफी शॉपमध्ये ८ बाय १० फूट आकाराचे चार कंपार्टमेंट पडद्यांच्या सहाय्याने बनवलेले होते. त्यामध्ये काही युवक-युवती आढळून आले, ज्यांचे वर्तन अत्यंत अश्लील स्वरूपाचे होते. याठिकाणी कॉफी बनवण्यासाठी लागणारे कोणतेही साहित्य नसल्याने हे ठिकाण केवळ अश्लील वर्तनासाठीच वापरले जात असल्याचे उघड झाले सदर ठिकाणाहून ५,००० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, समाधान संजय भोई याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९ व १३१ (क क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाळा भाड्याने देणारा अजयसिंग राजपूत याची भूमिका तपासात आहे. या घटना केवळ गुन्हेगारी पातळीवरच्या नव्हत्या, तर त्या समाजाच्या नैतिक आरोग्याशी संबंधित होत्या. अल्पवयीन विद्यार्थी कोणत्या वातावरणात वेळ घालवत आहेत, यावर आता समाज, पालक आणि शिक्षकांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. पोलीस विभागाने घेतलेले हे पाऊल केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे.पाचोरा पोलीस ठाण्याच्या अशा धाडसी आणि सुजाण कारवाया समाजासाठी दिलासादायक आहेत. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे कार्य हे केवळ प्रशासकीय कारवाई न राहता, जनमानसाच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या समयसुसंगत निर्णयांनी, समाजाला दिशा देणाऱ्या कृतींनी आणि तात्काळ, धोरणात्मक कारवायांनी पाचोऱ्यातील कायदा-सुव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचली आहे. एक पोलीस अधिकारी केवळ शस्त्र आणि वर्दीचा आधार नसतो, तर तो समाजाच्या विवेकाचा जागवणारा असतो. अशोक पवार हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.