पाचोरा – आजच्या 21 व्या शतकातील शिक्षणप्रक्रिया ही केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्रावीण्यासाठी बहुआयामी प्रयत्नांची गरज भासते. या पार्श्वभूमीवर आधुनिक शिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांची तयारी करून घेणे हे काळाची गरज ठरत चालली आहे. अशाच धर्तीवर पाचोऱ्यातील ख्यातीसंपन्न शारदा इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, संशोधन प्रकल्प व ओलंपियाड परीक्षा यासाठी प्रशिक्षण देत आहे. या वर्षीही शाळेने आपल्या परंपरेला साजेसे असे यश संपादन केले असून, सिल्वर झोन फाउंडेशन, दिल्ली संचलित गणित व विज्ञान ओलंपियाड परीक्षेत शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दहाव्या वर्षी आपली उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व आत्मविश्वासाने सहभाग नोंदवून स्पर्धेच्या या मंचावर आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. या परीक्षेत एकूण 40 विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली असून त्यात 17 सुवर्ण, 15 रजत, तर 8 कास्यपदक समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे इयत्ता चौथीतील आरव मिलिंद महाजन या विद्यार्थ्याने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे दुसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, जे या वयात फारच उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर अन्य विद्यार्थ्यांनीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत स्टेट व नॅशनल रँक प्राप्त केली आहे. या स्पर्धेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित या विषयांची गोडी निर्माण करणे, त्यांची तर्कशक्ती व विश्लेषणात्मक बुद्धी विकसित करणे तसेच त्यांना जागतिक पातळीवर विचार करण्यास प्रवृत्त करणे. सिल्वर झोन फाउंडेशन, दिल्ली ही संस्था दरवर्षी विविध विषयांवर आधारित आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेते. यात भारतासह विविध देशांतील लाखो विद्यार्थी सहभागी होतात. या परीक्षांचे स्वरूप अत्यंत गुणवत्ता पूर्ण असून त्यामध्ये केवळ पाठांतर नव्हे तर सखोल आकलन, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक विचार व समस्या सोडविण्याची क्षमता तपासली जाते. शारदा इंग्लिश मीडियम स्कूल ही केवळ अभ्यासक्रम मर्यादित शाळा नसून, विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांच्या जगात सामोरे जाण्याची तयारी करून देणारी संस्था आहे. शाळेच्या नियोजनात नियमितपणे गांधी रिसर्च प्रकल्प, राज्यस्तरीय व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षा, टॅलेंट हंट स्पर्धा, विविध ओलंपियाड परीक्षा तसेच विज्ञान व गणित प्रदर्शन यांचा समावेश असतो. हे उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञान वृद्धीसाठीच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरतात. शाळेचे सचिव निलेश पांडे, शाळेचे प्राचार्य डी. ए. पाटील, तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका किरण खंडेलवाल यांच्या संयुक्त प्रयत्नातून व प्रेरणेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, योग्य दिशा आणि शैक्षणिक वातावरण सतत पुरवले जाते. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेनंतर नुकताच शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात सर्व 40 यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कास्य पदकांसह प्रमाणपत्र व गुणपत्रिका प्रदान करण्यात आली. हा गौरव समारंभ शाळेचे सचिव निलेश पांडे, प्राचार्य डी. ए. पाटील व ज्येष्ठ शिक्षिका किरण खंडेलवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना निलेश पांडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे भविष्यातील महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, “आजचे युग हे ज्ञान व गुणवत्तेवर आधारित आहे. अशा युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा विकास करून त्यांचे रूपांतर सिद्धतेमध्ये करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा ही केवळ शैक्षणिक चाचणी नसून, त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व, संकल्पशक्ती, चिकाटी व प्रयत्नांची तयारी निर्माण करतात. म्हणूनच अशा परीक्षांमध्ये सहभागी होणे हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.” शाळेचे प्राचार्य डी. ए. पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचा शिक्षणात होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला. ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थी जर त्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावरच योग्य दिशेने तयारी करत असेल, तर पुढे जाऊन त्याला कोणतेही महागडे कोचिंग क्लासेस लावण्याची गरज भासणार नाही. लहान वयातच जर मूल आत्मविश्वासाने भरलेले असेल, तर ते भविष्यकाळात कोणतीही स्पर्धा लीलया पार करू शकते.” त्यांनी विशेषतः शिक्षकांना संबोधित करताना म्हटले की, “विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेबाबत असणारी भीती दूर करणे, त्यांना सकारात्मक विचार देणे आणि योग्य मार्गदर्शन देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. आपण जर मूलांच्या मनात विश्वासाची पालवी पेरली, तर ती यशाची फळे देणारी ठरते. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या क्षमतेला चालना देणारे वातावरण निर्माण करावे.” या यशस्वी कार्यात शाळेतील गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक, तसेच शालेय प्रशासन व मार्गदर्शक मंडळाचे सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच ही उत्कृष्ट फळे विद्यार्थ्यांना मिळाली आहेत. कार्यक्रमात निलेश पांडे यांनी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की, “आज मुलांना घडविण्याचे काम शिक्षक करतात, त्यासाठी लागणारी ऊर्जा, संयम, तंत्रज्ञानाचा वापर व मनापासूनची सेवा ही सर्व काही शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक करीत आहेत. त्यामुळेच शाळेने विविध परीक्षांत यश मिळवले आहे.” या परीक्षांद्वारे शाळेने विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास दिला आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण युपीएससी, एमपीएससी, जेईई, नीट, सीए, सिव्हिल सर्व्हिसेस अशा नामांकित परीक्षांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास शाळेच्या प्रशासनाला आहे. या यशाबद्दल शाळेच्या सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी व माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन पर प्रगट करत शाळेच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, सशक्त शिक्षण, सुसंगत मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.