पाचोऱ्यातील चक्री व्यवसाय बंदीनंतर ‘राजकीय आशीर्वाद’ मिळवण्याच्या नावाखाली बोगस पत्रकारांवर पैशांची उकळपट्टी

0

पाचोरा शहरात पोलीस प्रशासनाने नुकत्याच घेतलेल्या कठोर कारवाईतून चक्री व्यवसायावर पूर्णतः बंदी आणण्यात आली आहे. शहरातील अनेक भागांत सायंकाळी व रात्रीच्या वेळी बिनधास्त सुरु असलेल्या चक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत साहित्य जप्त केले आणि असंख्य चक्रीचालकांना तंबी दिली. या कारवाईचे शहरवासीयांनी स्वागत केले असले तरी, बंद झालेला हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एक नवीनच आणि धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, पाचोरा शहरातीलच एका बोगस पत्रकाराने आणि त्याच्या हॉटेल टेबलावर जन्मलेल्या एका बनावट पत्रकार स्वयंघोषित संघटनेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा चक्री व्यवसाय सुरू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कथित पत्रकाराकडून असं सांगितलं जात आहे की, “मी तुमच्या वतीने मी आपल्या व्यवसायाला राजकीय आशीर्वाद मिळवून देतो, तुम्ही फक्त ठराविक रक्कम भरा.” अशा प्रकारे प्रत्येक चक्री व्यवसायिकाकडून दरमहा १००० रुपये मागितले जात आहेत. यामागील कल्पना अशी आहे की, जर चक्री पुन्हा सुरू झाली, तर हे पैसे त्या बोगस पत्रकारला लाकूड व्यवसायाचे जसे दिले जातात तसे द्यायचे आहेत.
यामुळे शहरात पुन्हा एकदा अशांतता आणि चिंता वाढली आहे. पोलीस प्रशासनाने जे कठोर निर्णय घेऊन चक्री व्यवसाय मोडीत काढला, त्याला बोगस पत्रकार व राजकीय हस्तक्षेपाच्या नावाखाली सुरु झालेली ही खेळी खोळंबा आणू शकते. नागरिकांमध्ये असे बोलले जात आहे की, अशा प्रकारे पैशांची उकळपट्टी ही फक्त बेकायदेशीरच नव्हे, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही थेट आघात करणारी आहे.
हॉटेलच्या टेबलावरच उभ्या राहिलेल्या या तथाकथित पत्रकार संघटनेच्या नावावरून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या संघटनेला कोणतीही अधिकृत नोंदणी नाही, त्याचे कुठलेही ठोस उद्दिष्ट नाही आणि त्यात असलेले पदाधिकारी हे केवळ ‘पत्रकार’ या ओळखीचा गैरवापर करणारे आहेत. ते ना कुठल्या अधिकृत प्रसारमाध्यमाशी संबंधित आहेत, ना त्यांच्याकडे कोणतेही अधिस्वीकृत ओळखपत्र आहे. यामुळे ही संपूर्ण संघटना केवळ चक्री व अवैध व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी वापरले जाणारे एक मुखवटे आहे, हे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, या बोगस संघटनेच्या बॅनरवर पाचोरा येथील काही अधिकृत वृत्तपत्रांचे प्रतिनिधी अथवा वार्ताहर यांचे फोटो झळकताना दिसतात. त्यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या, व्यवसायाच्या व हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी जाहिरात अधिकृत वृत्तपत्रांना न देता, त्या बदल्यात या बोगस संघटनेच्या अध्यक्षामार्फत मागच्या दाराने पैसे घेतले जात नाहीत ना? किंवा ज्यांच्या नावाखाली जाहिरात मागितली गेली, तेच प्रतिनिधी त्या भामट्या संघटनेच्या नावाखाली स्वतःसाठी पैसे उकळत नाहीत ना? याची सखोल चौकशी संबंधित वृत्तपत्र संस्थांनी वरिष्ठ पातळीवरून स्वतःहून करणे ही काळाची गरज ठरते. कारण जर आपल्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव, फोटो आणि ओळख या अशा बोगस संघटनांच्या फायद्यासाठी वापरले जात असेल, तर संपूर्ण पत्रकारिता व्यवसायावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
या बोगस पत्रकाराकडून शहरात याआधीही वर्षातून किमान चार ते पाच वेळा विविध कार्यक्रमांतून डॉक्टर, व्यावसायिक, आणि सामाजिक संस्थांकडून पैसे उकळले गेल्याचे आरोप आहेत. नुकतेच एका हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगीही मध्यस्थी व्यक्तीद्वारे १५००० रुपये उकळल्याचा प्रकार चर्चेत आहे. यावेळी जाहिरातीची मोठे रक्कम अधिकृत वृत्तपत्रांना न देता, फक्त काही पोर्टल्सवर बातम्या लावून उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा प्रकारच्या बनावट पत्रकार व संघटनांकडून शहरातील सामान्य व्यावसायिकांची फसवणूक केली जात आहे. विशेषतः चक्रीच्या माध्यमातून आधीच समाजाला लागलेली कीड, पोलिसांच्या मेहनतीने काही प्रमाणात आटोक्यात आली होती. परंतु अशा गैरप्रकारांना वेळीच अटकाव न झाल्यास पुन्हा एकदा चक्री व्यवसायाला ऊत येईल आणि त्यातून मुलांचे भविष्य, स्थानिक शांती आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
पोलीस प्रशासनाने यावेळी फक्त चक्रीचालकांवरच नव्हे, तर बोगस पत्रकार व त्याच्या फसवणूक करणाऱ्या संघटनेवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. प्रत्येक पत्रकार संघटनेची पार्श्वभूमी तपासून, त्यांची नोंदणी, सदस्य संख्या, आणि वास्तव पत्रकारिता कारभाराची माहिती घेणे आवश्यक आहे. बनावट पत्रकारांच्या नावावर उघडलेली ही दहशत आता चक्री व्यवसायाला नवा चेहरा देत आहे, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
शहरातील नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर संतापाची भावना आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीर व्यवसाय बंद करून जनतेला दिलासा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर असा राजकीय-प्रेरित घाला घालण्याचा प्रयत्न हा पूर्णतः अमान्य आहे. नागरिक आता पोलिसांकडून अपेक्षा करत आहेत की, त्यांनी केवळ चक्रीवरच नाही, तर अशा बनावट पत्रकारांवरही कारवाई करून समाजात विश्वास निर्माण करावा.
शेवटी, ‘पत्रकार’ हा सन्मानाचा दर्जा आहे, तो असंवेदनशील, लोभी आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या हातात गेल्यास संपूर्ण चौथा स्तंभ ढासळू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून कोणत्या पत्रकार संघटना खरी आहेत आणि कोणत्या केवळ पैसा कमवण्यासाठी उभ्या केल्या आहेत, याचा तपास स्वतःही घेतला पाहिजे. प्रशासनाने मात्र याला प्राधान्य देऊन, चक्री व्यवसायाच्या पुनश्च सुरुवातीसाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारावर त्वरित लगाम घालावा, हीच अपेक्षा आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here