पाचोरा – पोलिस दलाचे कार्य हे फक्त कायदा-सुव्यवस्था राखण्यात नसून, समाजात सुरक्षा आणि न्यायाचे भान निर्माण करणे हेदेखील त्यांचे कर्तव्य असते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या १०० कलमी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलीस दलाकडून वेगवान व कार्यक्षम तपासास अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक उज्वल आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यशैलीने जळगाव जिल्ह्यात घडवलेला एक अभूतपूर्व विक्रम.दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा एका पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (B.N.S.) २०२३ अंतर्गत कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५) नुसार नोंदविण्यात आला. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, आणि कासोदा पोलीस स्टेशनने याचे ज्वलंत उदाहरण घालून दिले.
फिर्याद दाखल होताच तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल ब. नं. ६९८ राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांनी विलक्षण तत्परतेने आणि जबाबदारीने तपासकार्य सुरू केले. केवळ २४ तासांच्या आत, गुन्ह्यातील चारही आरोपींना शोधून काढण्यात आले. आरोपींच्या विरोधात योग्य पुरावे गोळा करण्यात आले आणि तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर कायद्याचे भान ठेवून सुसूत्रता राखण्यात आली. त्यानंतर दोषारोपपत्र थेट मा. न्यायालयात दाखल करण्यात आले. या कार्यपद्धतीमुळे कासोदा पोलीस स्टेशन हे जळगाव जिल्ह्यातील पहिलं पोलिस ठाणं ठरलं ज्यांनी दाखल गुन्ह्याचा तपास केवळ २४ तासांत पूर्ण करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली.
तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जळगाव जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डीसाहेब , अपर पोलीस अधीक्षक मा कविता नेरकर , चाळीसगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चंदेल तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तपासामध्ये दाखल अमलदार नरेंद्र पाटील, तपास अमलदार पो.हे.कॉ. राकेश खोंडे, कासोदा टाऊनचे पो.हे.कॉ. ब.नं. ३१६१ श्रीकांत गायकवाड, तसेच टाऊन हद्दीतील पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे गुन्ह्याचा तपास अत्यंत प्रभावी आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आला.
या संपूर्ण तपास कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य फक्त नियमांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकरणाकडे पाहिले. कोणताही वेळ न दवडता साक्षीदारांचे जबाब, पुरावे, आरोपींची उपस्थिती, घटनास्थळी तपास, वैद्यकीय अहवाल आदी सर्व बाबी तात्काळ पूर्ण केल्या गेल्या. या वेगवान तपासाची माहिती प्राप्त होताच संपूर्ण जिल्ह्यातून पोलीस विभागाच्या या कृतीचे कौतुक होऊ लागले आहे.
पो.हे.कॉ. राकेश खोंडे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या अचूक तपास कौशल्यामुळे गुन्ह्यातील आरोपींना सापडून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले. त्यांच्या कठोर कर्तव्यदक्षतेमुळे समाजात असा संदेश गेला आहे की, पोलिस दल केवळ घटनांनंतर कारवाई करणारे यंत्र नाही, तर तत्काळ न्यायासाठी सजग असलेली यंत्रणा आहे. त्यांच्या कार्यामुळे पोलिस दलाविषयी विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी पोलीस कर्मचारी, तसेच सामाजिक स्तरावरून भरभरून अभिनंदन होत आहे.
कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस टीमने कायद्याचे पालन करीत, कोणताही दबाव न स्वीकारता फक्त न्यायासाठी ही लढाई लढली. आज समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अशा घटना रोखण्यासाठी आणि पिडीतांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी ही कार्यपद्धती प्रेरणादायक ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांना पूर्तता करताना केवळ आकड्यापुरते नाही, तर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी कशी करावी याचे उदाहरण कासोदा पोलिसांनी सिध्द केले आहे.
अशा प्रकरणांमध्ये अनेकदा तपासकामी दिरंगाई होते, आरोपी फरार होतात, पुरावे नष्ट होतात आणि पीडितेला न्याय मिळण्यास अनेक महिने, कधी कधी वर्षही लागतात. मात्र कासोदा पोलीस स्टेशनने या साऱ्या पारंपरिक मर्यादांना छेद देत, वेळेच्या मर्यादेत न्यायप्रक्रियेला गतिमान केले. ही कार्यशैली संपूर्ण जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यभरातील पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.
या संपूर्ण यशस्वी तपासामध्ये पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुसंगत समन्वय, अचूक नियोजन, आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळेच हे शक्य झाले. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर विधी सल्लागारांशी सल्लामसलत करण्यात आली. कोणतीही कार्यवाही ही न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहून केली गेली. अशा प्रकारच्या पद्धतशीर आणि कायदेशीर तपासामुळेच चार्जशीटमध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही. त्याचबरोबर आरोपींवर कठोर कारवाईला मजबूत आधार मिळाला.
पो.हे.कॉ. राकेश खोंडे यांच्यासह सर्व सहभागी अमलदारांनी जी तत्परता, चिकाटी, आणि निःस्वार्थ सेवाभाव दाखवला, त्यातून एक बाब स्पष्टपणे अधोरेखित होते की, पोलिस दलात आजही प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारी माणसं आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे सन्मान, प्रोत्साहन, आणि प्रचार हे शासनाने वेळोवेळी करणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील उत्तम कार्यप्रेरणा मिळेल.
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने, विशेषतः महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणेचा वेग आणि तत्परता हीच मुख्य भूमिका बजावते. कासोदा पोलीस स्टेशनच्या यशस्वी कार्यवाहीने केवळ गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही, तर इतर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील एक स्पष्ट इशारा मिळाला आहे की, कायद्यापासून कोणीही दूर नाही.
या घटनेनंतर जिल्हाभरातून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे कौतुक सुरू झाले असून, या पद्धतीचा अभ्यास करून इतर पोलीस स्टेशनमध्येही तशीच कार्यपद्धती राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. गुन्हा घडल्यानंतर केवळ तक्रार घेणे आणि कारवाईचे प्रतीक्षा करणे इतकेच काम नसून, ते तातडीने तपास पूर्ण करून न्यायप्रक्रियेला गती देणे हेच खरे पोलीस कर्तृत्व असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
एकूणच, कासोदा पोलीस स्टेशनच्या या यशस्वी आणि आदर्शवत कारवाईमुळे समाजात पोलिस दलाविषयी विश्वास वाढीस लागेल, आणि पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाची ही कृती परिपूर्ती आहे आणि यामुळे प्रशासनाचे उद्दिष्ट अधिक दृढतेने पुढे जाणार आहे. कासोदा पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नाला केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यभरातून दाद मिळावी आणि हा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनीही अंगीकारावा, हीच अपेक्षा समाजाला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.