सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यांचा पारदर्शक हिशोब देणं: नैतिकतेचं खरं रूप

0

आजच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, धार्मिक उत्सव, सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात, ढोलताशांच्या गजरात, रोषणाईने उजळून निघालेल्या रस्त्यांवर साजरे होताना आपण पाहतो. प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकात, मोठमोठ्या मंडपांमध्ये, रंगीबेरंगी पताका आणि हारांनी सजवलेल्या व्यासपीठांवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाषणे होतात, सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा गौरव केला जातो. धार्मिकतेचा रंग अधिक गडद होतो. भक्तिभाव, श्रद्धा, निष्ठा आणि सामाजिक एकोपा याचे दर्शन घडते. मात्र या सगळ्या उत्सवांमागे आर्थिक खर्चाची जी भलीमोठी रचना असते, तिचा पारदर्शक हिशोब लोकांसमोर येतो का? आणि जर येत नसेल, तर ही खरेच आपल्या नैतिकतेची उपेक्षा नाही का? जवाबदारी म्हणजे केवळ कार्यक्रम साजरे करणे & स्वतःचा फोटो मोठा करून लावणे नव्हे, तर जनतेपुढे पारदर्शकपणे उत्तरदायी राहणे देखील होय. विशेषतः जेव्हा आपण सार्वजनिक जागेत, समाजाच्या सहभागातून, जनतेच्या निधीतून, अथवा देणगीदारांच्या योगदानातून एखादा कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा त्याचा प्रत्येक पैशाचा हिशोब देणे हे आयोजकांचे नैतिक कर्तव्य असते. आज मात्र अनेकदा असे आढळते की, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असोत की धार्मिक उत्सव, ते केवळ सामाजिक प्रतिष्ठेचे, राजकीय वजनाचे, वा सामाजिकीकरणाच्या दर्शनी लक्षणाचे साधन बनले आहेत. सर्वसामान्यपणे पाहता, एखादा मध्यम आकाराचा सार्वजनिक उत्सव साजरा करायला किमान ५० हजार ते लाखो रुपये खर्च होतो. यात मंडप भाड्याने घेणे, व्यासपीठ सजावट, बँड, डीजे, लाईट्स, फलक, प्रसाद, भोजन व्यवस्था, वक्त्यांना मानधन, पोलीस परवानगी, जेनरेटर, पाण्याची व्यवस्था, बॅनर आणि जाहिरात यांचा समावेश होतो. अनेकदा काही खर्च रोखीने होतात तर काही थेट देणग्यांद्वारे भागवले जातात. मात्र, हे सगळे झाल्यावर त्या देणग्यांचा आणि खर्चाचा हिशोब किती जणांच्या माहितीत येतो? आपण सरकारी कार्यालयांवर, नेत्यांवर, संस्था चालकांवर सतत पारदर्शकतेची अपेक्षा ठेवतो, त्यांचा हिशोब मागतो. मग सामान्य लोकांनी आयोजित केलेल्या उत्सवांमध्ये पारदर्शकतेचा अभाव का? आज विविध धर्माचे धार्मिक कार्यक्रम व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. त्या निमित्ताने समाज एकत्र येतो. अनेक जण देणगी देतात. काही जण वेळ, श्रम, साहित्य देतात. अशा वेळी त्या खर्चाचा आणि जमा निधीचा हिशोब समाजासमोर यायला हवा, कारण हा कार्यक्रम केवळ आयोजकांसाठी स्वतःची घरभरणी आणि दारूच्या पार्टी करणे यासाठी नसून संपूर्ण समाजासाठी असतो. हिशोब लपवणे म्हणजे समाजाच्या विश्वासाला तडा देणे. हा नैतिक भ्रष्टाचार ठरतो. आज अनेक ठिकाणी असे दिसते की, जयंत्यांचे आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मंडळांचे बॅनरवर आपली नावे व फोटो मोठ मोठे छापलेली असतात. जसे काही त्यांचं स्वतःचं प्रमोशन झालेले असते. काही मतलबी मात्र याचा पुरेपुर राजकीय फायद्यासाठी याचा वापर करतात. मात्र त्या मंडळाचा आर्थिक हिशोब विचारला की, गोंधळ उडतो. काही दिवस भुमिगत असतात विचारलं तर “सगळं तर व्यवस्थित झालं ना?” असं उत्तर दिलं जातं. पण प्रश्न हा आहे की, कार्यक्रम नीट होणं हेच उद्दिष्ट नसून त्यामागचा पारदर्शक हेतू आणि विश्वास हाच समाजासाठी महत्त्वाचा आहे. पारदर्शक हिशोब मांडण्याची परंपरा तयार झाली तर समाजात कोणताही गैरसमज किंवा संशय निर्माण होणार नाही. कोणत्याही ।व्यक्तीला वाटणार नाही की, “माझी देणगी कुठे गेली?”, “खरंच इतकाच खर्च झाला का?”, “या कार्यक्रमामागे कोणाचा व्यक्तिगत फायदा झाला का?” हिशोब दिल्यामुळे विश्वास वाढतो, लोकांचा सहभागही वाढतो, आणि कार्यक्रम अधिक प्रभावी होतो. जाहीर हिशोब म्हणजे केवळ आर्थिक माहिती मांडणे नव्हे. तो एक प्रकारचा आत्मपरीक्षणाचा आरसा असतो. आपण कोणत्या बाबतीत खर्च केला, कुठे वाचवता आलं असतं, कुणाचं योगदान मोठं होतं, हे सगळं लोकांसमोर आल्यावर समाजात आदरभाव निर्माण होतो. काही वेळा सामाजिक हिशोबाच्या वेळी दानशूर लोकांचे कौतुक होते. तर काही वेळा चुका स्पष्ट होतात. पण या दोन्ही गोष्टी भविष्यातील कार्यक्रमांची गुणवत्ता वाढवतात. कोणताही उत्सव संपल्यानंतर त्याचं हिशोबपत्रक व्हॉट्सॲप ग्रुप, बॅनर, पम्फ्लेट किंवा समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध करता येऊ शकतं. यात एकत्रित निधी, देणग्या, खर्चाची यादी, आणि शिल्लक असे तपशील असावेत. यामध्ये प्रत्येक देणगीदाराचे नाव व रक्कम नमूद असावी. खर्चाच्या बाबतीत सर्व प्रमुख बाबी नमूद करून त्याचे बिल किंवा पुरावे दाखवले जावेत. हे करताना कुठलाही अहंकार, घमेंड न ठेवता, समाजाच्या विश्वासाचा आदर ठेवून काम केले पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की, काही कार्यक्रमांमध्ये राजकीय पुढारी आपली सत्ता सिद्ध करण्यासाठी मोठ्या देणग्या देतात, त्याच्या बदल्यात व्यासपीठावरचे प्रमुख स्थान, बॅनरवरील मोठा फोटो, आणि समाजावर एकप्रकारचे वर्चस्व गाजवतात. यामध्ये मग सामाजिक हेतू दुय्यम ठरतो आणि आर्थिक अपारदर्शकता वाढते. अशावेळी निष्पक्ष आणि सामाजिक हेतू असलेली मंडळी बाजूला पडतात. म्हणूनच हिशोब ही एक सशक्त शस्त्र असते, जी या सगळ्या अपप्रवृत्तींचा नायनाट करू शकते. जर आजपासून आपण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमानंतर हिशोब देण्याची परंपरा घडवू, तर पुढील पिढीला नैतिकतेचा योग्य आदर्श मिळेल. ते कार्यक्रम केवळ ढोलताशांचे नसतील, तर मूल्यांचे आणि पारदर्शकतेचे असतील. यातून युवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, नियोजन, व्यवस्थापन आणि प्रामाणिकपणाचे बीज रोवले जाईल. याच पार्श्वभूमीवर असेही काही लोक बघायला मिळालेले आहेत किंवा आजही पाहायला मिळतात की, जे स्वतः महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये अधिकाऱ्यांकडून पावती न देता वेगळा पैसा घेतात, पण तो कधीच समाजासमोर मांडत नाहीत. मात्र जेव्हा इतर कार्यक्रम असतात, तेव्हा मात्र हेच लोक खाली बसून किंवा एकतर त्यांची स्टेजवर बसायची लायकी नसते म्हणुन नेत्याच्या गाडीखालचे बनुन बिनबुलाए महेमान होतात आणि वक्त्याला व नेत्याला भाषण करतांना प्रॉम्टींग करताना दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की अशा लोकांचा हेतू सामाजिक नैतिकता नसून आपली प्रतिमा, आपली लायकी जपणे हाच असतो. अशा खोट्या प्रतिष्ठेवर आधारलेल्या वृत्ती समाजाला दिशाभूल करतात ज्या महापुरुष यांनी आपले जीवन समाजासाठी दिले. त्यांची जयंती आपण साजरी करतो, त्यांच्या विचारांचे स्मरण करतो. पण खरोखर त्यांच्या विचारांप्रमाणे वागायचं असेल, तर त्यांच्या कार्याचे स्मरण करताना आपण प्रामाणिक, जबाबदार, आणि पारदर्शक वागलो पाहिजे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो, धार्मिक उत्सव असो, राष्ट्रपुरुषांची जयंती असो – त्यासाठी खर्च झालेल्या निधीचा चोख हिशोब जनतेसमोर मांडणे हीच खरी समाजसेवा आणि नैतिकता होय. समाजात विश्वास निर्माण करायचा असेल & पुन्हा अध्यक्ष पद भुषवायचं असेल तर पारदर्शकतेला पर्याय नाही. हा संदेश घेऊन आपण सर्वांनी सार्वजनिक कार्यक्रम साजरे करताना जबाबदारी आणि नैतिकतेची जोपासना केली पाहिजे. तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगल्भ, स्वावलंबी आणि जागरूक बनेल.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here