‘दिलीप’वर कारवाई न झाल्याने गुटख्याचा महासंचार कायम; पाचोरा ते अर्धा मराठवाडासह जळगाव जिल्हा होलसेल नेटवर्कच्या विळख्यात

0

पाचोरा – राज्य सरकारने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असली, तरी पाचोरा शहरासह अर्ध्या जळगाव जिल्ह्यात गुटख्याची खुलेआम होलसेल विक्री सुरूच आहे. यामागे खऱ्या अर्थाने ‘मास्टरमाइंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारखेडा येथील दिलीप नावाच्या सराईत विक्रेत्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. पोलीस प्रशासनाच्या धमाकेदार व कौतुकास्पद कामगिरीमुळे अनेक गुटखा तस्कर अटकेत असतानाही गुटख्याचा माल सुरळीतपणे पोहोचतो आहे, याचे मुख्य कारण म्हणजे हा दिलीप नावाचा मुख्य पुरवठादार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात २०१२ पासून गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ही बंदी लागू करण्यात आली. तरीही, गुटखा विक्रीचं संजाळ इतकं खोलवर रुजलेलं आहे की पोलिसांनी अनेक वेळा केलेल्या छापेमारी, अटका आणि कारवायांच्या पार्श्वभूमीवरही विक्री थांबलेली नाही. पाचोरा शहरात ठीक ठिकाणी यांनी साठे केले आहेत यामागे एका मोठ्या आणि बिनधास्त कार्यरत असलेल्या नेटवर्कचं अस्तित्व आहे, ज्याच्या मुळाशी दिलीप नावाचा व्यक्ती असल्याची माहिती पुढे येत आहे.
तारखेडा गावातून कार्यरत असलेला दिलीप हा गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा आयात, साठवणूक, वितरण आणि विक्री यामध्ये अग्रेसर असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक वेळा गुटखा जप्तीच्या कारवायांमध्ये आढळलेली मालाची शैली, वितरणाची पद्धत, आणि वाहतुकीच्या साधनांचा तपशील पाहता या नेटवर्कचं संचालन दिलीप नावाची व्यक्तीच व्यवस्थित आणि स्थिर पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट होते. या साखळीत दिलीपचा समावेश असल्याबाबत अनेक ठोस पुरावे असून देखील त्याच्यावर कार्यवाही होत नाही, हे अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे.
दिलीपच्या नेटवर्कचा विस्तार – पाचोरा ते भडगाव, चाळीसगाव, एरंडोलसह अर्ध्या मराठवाड्यापर्यंत पोहोचला दिलीपच्या नेटवर्कमधून फक्त पाचोरा नाही, तर भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, यावल, अमळनेर व अर्ध्या मराठवाड्यापर्यंतच्या भागांत दररोज गुटख्याचा पुरवठा होतो. यासाठी त्याच्या नेटवर्कमध्ये विविध एजंट, वाहन चालक, होलसेल विक्रेते आणि स्थानिक दुकानदार सहभागी असल्याचे बोलले जाते. एखादा तस्कर अटकेत गेला तरी वितरण थांबत नाही, कारण दिलीपच्या नेटवर्कमध्ये ‘बॅकअप’ यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे संपूर्ण साखळी जणू एखाद्या संगणकीय प्रणालीसारखी प्रभावीपणे चालते. ‘विमल’ हा गुटखा ब्रँड या नेटवर्कचा मुख्य घटक आहे. मागणी वाढल्याने आणि साठा नियंत्रित राहिल्याने विक्रेत्यांनी विमल गुटख्याच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी १० रुपयाला मिळणारा गुटखा आता १५ ते २० रुपये दराने विकला जातो. ग्राहकांनी ही किंमत मोजूनही गुटखा घेण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक तरुण, विद्यार्थी, आणि कामगारवर्ग या व्यसनात आकंठ बुडालेला आहे.दिलीपच्या नेटवर्कमधून केवळ मूळ विमल नव्हे, तर नकली विमल गुटख्याचाही पुरवठा होत असल्याची शक्यता आहे. असे नकली गुटखे मूळ उत्पादनासारखेच दिसतात, परंतु त्यामध्ये वापरले जाणारे घटक अधिक अपायकारक असतात. त्यामुळे गुटखा सेवनाच्या दुष्परिणामांमध्ये आणखी वाढ होत असून, कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचे गंभीर आरोग्यदायी परिणाम पुढील काही वर्षांत अधिक स्पष्ट होतील, अशी वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता आहे. दिलीपवर यापूर्वी कठोर कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखाद्या सराईत विक्रेत्याची ओळख सर्वांनाच असताना, तो वर्षानुवर्षं खुलेआम गुटख्याचा मुख्य पुरवठादार म्हणून कार्यरत राहतो, यामागे कोणाचा तरी अप्रत्यक्ष अथवा थेट आश्रय असल्याची जोरदार चर्चा आहे.
या प्रश्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. नागरिकांनी अशा विक्रेत्यांविरुद्ध माहिती प्रशासनाला देणे, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी जनजागृती करणे, तर पत्रकारांनी सत्य समोर आणणं – हे सगळं अनिवार्य आहे. अन्यथा, तरुण पिढी नकली गुटख्याच्या विळख्यात अडकून आरोग्य बिघडवेल आणि हे मूकपणे होत राहील.
गुटख्याच्या या साखळीवर पूर्ण आळा बसवायचा असेल, तर या साखळीच्या मूळावर म्हणजेच तारखेड्याच्या दिलीपवर तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्याच्या नेटवर्कचे सर्व बिंदू शोधून, आर्थिक व्यवहारांची चौकशी करून, स्थानिक पोलीस प्रशासनाने आणि अन्न व औषध प्रशासनाने एकत्रित कारवाई करावी. केवळ पाचोरा नव्हे तर अर्ध्या जळगाव जिल्ह्यातील & अर्ध्या मराठवाड्यात गुटखा विक्री रोखायची असेल, तर या एकाच व्यक्तीवर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे.
पाचोरा व परिसरात गुटख्याची साखळी तुटण्याची एकमेव किल्ली म्हणजे तारखेड्याचा दिलीप. जोपर्यंत तो मोकाट फिरतोय, तोपर्यंत कितीही अटक, जप्ती किंवा कारवाई झाली, तरी गुटखा विक्री थांबणार नाही. आता प्रशासनाने लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांना थांबवण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा, ही साखळी समाजाच्या मुळावरच घाव घालेल निश्चित.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here