पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) — धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात लहानग्यांचे बालपण हरवले आहे. संगणक, मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं अनेकदा अध्यात्म, संस्कार आणि चारित्र्य विकासापासून दूर जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजात नवसंस्कार निर्माण करण्याच्या हेतूने पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय) यांच्यातर्फे शक्तीधाम, स्वप्नशिल्प हॉटेल समोर, भडगाव रोड येथे दिनांक ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ दरम्यान भव्य, दिव्य, आणि पूर्णपणे मोफत निवासी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिराची परंपरा गेली सहा वर्षे सातत्याने सुरू आहे. प्रत्येक वर्षी उत्तर महाराष्ट्रातील विविध भागातून २०० ते २५० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभतो. केवळ एका शिबिरापुरती मर्यादा न ठेवता यामधून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात वळण आणणारा हा अध्यात्मिक संस्कार सोहळा ठरतो. या शिबिराचा हेतू मुलांच्या मनामध्ये देश, धर्म, देव, संस्कृती आणि समाजसेवा याविषयी प्रेम, आदर व जबाबदारीची भावना निर्माण करणे हाच असून याचे यश म्हणजे मुलांमधील सकारात्मक परिवर्तन.
या शिबिरात विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. योगासन, हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र, हरिपाठ, वारकरी पावली, श्रीमद्भागवतगीता, विष्णु सहस्त्रनाम, मंत्रपुष्पांजली, गायन, पखवाज वादन, किर्तन प्रशिक्षण, भजन शिक्षण, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास असे अनेक विषय शिबिराच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत. या प्रशिक्षणासाठी वारकरी संप्रदायातील अनुभवी अध्यापक व कीर्तनकार यांची उपस्थिती लाभते.
गौसेवक माऊली सातगाव को यांचे शिबिरातील मार्गदर्शन, गु. रामायणाचार्य श्री. संजय महाराज पाचपोर (आकोला ज्ञानेश्वर) यांचा अध्यात्मिक आधार आणि आदरणीय रमेशजी मोर यांचा संयोजकत्वाचा हातभार यामुळे हे शिबिर अधिक प्रभावी व उत्साही बनले आहे. या शिबिराचे प्रमुख आयोजक भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगांवकर आणि अनाथांची माय – ह.भ.प. सुनीताताई पाटील (पाचोरा) हे असून त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, सेवाभाव आणि भक्तिपथावरची श्रद्धा हे या उपक्रमाचे खरे बळ आहेत.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्याची पूर्णतः मोफत निवासी सुविधा असून, विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे पोटभर भोजन, सकाळचा नाष्टा, दुपारी शीतपेय, तसेच शिबिरात शिकवले जाणाऱ्या सर्व स्तोत्रांच्या पुस्तकांची मोफत सोय करण्यात आली आहे. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला भागगते, हरिपाठ, रामरक्षा, गीता, विष्णुसहस्रनाम यांची पुस्तके तसेच सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
शिबिरात सहभागासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. नऊ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वारकरी पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच शिबिर परिसरात मोबाईल फोन पूर्णतः वर्ज्य असून विद्यार्थ्यांनी आपले आंघोळीचे कपडे, अंथरुण-पांघरुण, ताट, तांब्या सोबत आणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा जीवित नुकसानाबाबत आयोजक जबाबदार राहणार नाहीत, याची माहिती पालकांनी समजून घ्यावी. हे शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे आहे.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे अनाथ व गरीब मुलांसाठी वर्षभर निवास, शालेय व वारकरी शिक्षणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे समाजातील वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना धर्म, संस्कार आणि मूल्ये यांची सांगड घालता येणार आहे.
संघटनात्मक पातळीवर पाहता, या शिबिरासाठी लक्ष्मी माता वारकरी सेवाभावी मंडळ आणि लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय), पाचोरा यांनी परिश्रम घेतले आहेत. वारकरी भवन, रामदेव लॉन्सजवळ, जारगाव चौफुली, पाचोरा हे संस्थेचे केंद्र असून, या संस्थेने गेल्या काही वर्षांत वारकरी संस्कृतीच्या जतनासाठी व प्रसारासाठी अविरत कार्य केले आहे.
या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9545855243 / 7798755431 दिलेले आहेत. संस्थेचे सदस्य, पालक आणि वारकरी मंडळी यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना या अध्यात्मिक संस्कार शिबिरात सहभागी करून त्यांचे भविष्य उज्वल बनवावे.
हा उपक्रम केवळ संस्कारांचा नव्हे, तर समाजबदलाचा महत्त्वाचा टप्पा आहे. अशा शिबिरातून निर्माण होणारी मूल्यसंस्कारित पिढीच उद्याचे शीलवान, जबाबदार, देशप्रेमी नागरिक घडवू शकते. केवळ अभ्यासक्रमाच्या परिघात अडकलेल्या शिक्षणाला अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाची जोड मिळाल्यास मुलांचे सर्वांगीण विकास होऊ शकतो, आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे वारकरी बालसंस्कार शिबिर होय.
राम कृष्ण हरी! – या जयघोषाने स्फूर्ती घेणाऱ्या या अध्यात्मिक वाटचालीसाठी शेकडो मुलांच्या शांतीपूर्ण, संस्कारित आणि भक्तिप्रेरित भविष्याची पायाभरणी या उपक्रमातून होणार आहे, हे निश्चित!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.