जळगाव येथे “राष्ट्रीय स्तरावरील बडगुजर समाज विचार-मंथन संमेलनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

2

जळगाव – आजच्या यंत्रयुगीन आणि तांत्रिक प्रगतीच्या काळात बडगुजर समाजाच्या अंतर्गत एकात्मता, विचारांची दिशा आणि सामाजिक संघटनाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत चालले आहे. समाजाच्या चिरस्थायी प्रगतीसाठी आणि उद्याच्या पिढीला मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई यांच्यावतीने आणि देशभरातील विविध सहकारी मंडळे, कार्यकर्ते, सामाजिक नेतृत्व यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक ४ मे २०२५ रोजी, जळगाव शहरात दापोरेकर मंगल कार्यालय येथे एक ऐतिहासिक व राष्ट्रीय स्वरूपाचा समाज विचार-मंथन संमेलन सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांतील विविध

जिल्ह्यांतून हजारो समाजबंधू, कार्यकर्ते, तरुण-तरुणी, महिला मंडळे, ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केवळ समाजहितासाठीच नव्हे तर भावी पिढीच्या समृद्ध भविष्याचा पाया रचण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई या संघटनेने आपल्या स्थापनेपासून समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक भान असलेल्या उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प करत यंदाचा वर्धापन दिन काहीतरी आगळंवेगळं करून साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यातूनच समाजहिताचे विचारमंथन व्हावे, नव्या विचारांचा अविष्कार घडावा, समाजात एकात्मता यावी, नेतृत्व घडावे आणि विवाह, शिक्षण, नोकरी, व्यसनमुक्ती, महिलासक्षमीकरण यांसारख्या प्रश्नांवर एकत्रित विचार होऊन उपाययोजना सुचवाव्यात यासाठी “समाज विचार-मंथन संमेलन सोहळा” साकार झाला आहे.
समाजातील सर्वात जळजळीत व संवेदनशील विषयांपैकी एक म्हणजे विवाहविषयक समस्या. समाजात योग्य वयात विवाह होत नाही, मुले-मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी विलंबाने स्थिर होतात, आर्थिक अपेक्षा वाढतात, मुलींना वर मिळणे कठीण जाते किंवा मुलग्यांना मुली मिळत नाहीत असे प्रकार वाढले आहेत. आधुनिक जीवनशैली, सोशल मीडियाचा अतिरेक, समाजातील संवादाचा अभाव, जातीतील संकुचितता, परंपरांचे अंधानुकरण आणि तांत्रिक साधनांचा अभाव यामुळे विवाह संस्थेचा पाया डळमळीत होतो आहे.
या पार्श्वभूमीवर संमेलनामध्ये विशेष सत्र आयोजित करून विवाह संस्था सशक्त करणाऱ्या उपाययोजना, सामूहिक विवाहांचे आयोजन, विवाह मेळावे, डिजिटल डेटाबेस तयार करून जुळवाजुळव सुविधा, वयाच्या अनुषंगाने समाजाचे मार्गदर्शन, पालकांसाठी कार्यशाळा यावर चर्चा होणार आहे. समाजातील ज्येष्ठ व मार्गदर्शक मंडळींच्या अनुभवाच्या आधारे एक सकारात्मक विचारवाट उभा करण्याचा मानस आहे.
समाजाचा विकास केवळ आर्थिक भरभराटीने होत नाही. त्यासाठी सशक्त विचारांची, ध्येयवेड्या नेतृत्वाची, एकतेची आणि कृतिशील सहभागाची आवश्यकता असते. समाजात नेतृत्व निर्माण होत नाही असे नाही – पण ते स्थिर राहत नाही, कारण त्यामागे सहकार्याचा अभाव असतो. मतभेदांना संघटनात आड येऊ नये यासाठी नेतृत्वसंवर्धन हेही या संमेलनाचे एक प्रमुख परिमाण असेल.
कार्यक्रमात विविध राज्यातील व जिल्ह्यांतील युवक-युवतीं करीता यामार्फत नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. काही यशस्वी बडगुजर तरुणांनी उद्योग, प्रशासन, शिक्षण, न्यायक्षेत्र यामध्ये केलेली वाटचाल इतरांना प्रेरणा देईल अशा स्वरूपात माहीती मिळणार आहे
शिक्षण व कौशल्य विकास – गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज व दिशा
युवकांतील व्यसनमुक्ती व जीवनशैली सुधारणा
महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि अर्थिक स्वावलंबन
समाजातील विविध गटांतील संवाद व सुसंवाद निर्मिती
संघटित सहभागाने समाजविकासाची धोरणात्मक आखणी
डिजिटल युगात समाज संघटनेची नव्याने उभारणी
या सगळ्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक आपले अनुभव, विचार आणि दिशा स्पष्ट करतील.
भविष्यातील समाजविकासाचा व्हिजन – ठोस प्रस्ताव
कार्यक्रमात संपूर्ण बडगुजर समाजाच्या विकासासाठी “समाज व्हिजन दस्तऐवज” तयार करण्यात येणार असून, तो संमेलनाच्या अखेरीस सर्व सहकारी मंडळांना सादर करण्यात येणार आहे.
या संमेलनात विविध क्षेत्रांतून समाजाचा गौरव वाढविणाऱ्या बडगुजर व्यक्तींनी शिक्षण, कायदा, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, लष्कर, कला, साहित्य, पत्रकारिता अशा क्षेत्रातील समाजरत्नांचे विचार हे समाजाला आदर्श निर्माण करणारे ठरतील
संपूर्ण संमेलनात प्रत्येक गाव, शहरातून प्रतिनिधींची उपस्थिती अत्यावश्यक असून, प्रत्येक प्रतिनिधीने स्वतःच्या गावातील समस्या, सामाजिक घडामोडी, विवाहातील अडथळे, महिला व युवकांचे प्रश्न, तसेच स्थानिक पातळीवर होणारे उपक्रम यांची माहिती घेऊन उपस्थित राहावे. हे विचारसत्र केवळ भाषणाचे व्यासपीठ नसून समाजमनाला दिशा देणारा एक सामूहिक संवाद ठरणार आहे.
हा संमेलन सोहळा म्हणजे केवळ एकदिवसीय कार्यक्रम नाही, तर नवीन सामाजिक युगाची सुरुवात आहे. समाजाने आपले दुर्लक्षित प्रश्न समोर आणले पाहिजेत, नुसते गाऱ्हाणे मांडणे नाही, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी एकजुटीने पुढे यायला हवे. या कार्यक्रमातून “आता काळ बदलला आहे, आता आपण बदलूया!” असा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई आणि सर्व सहकारी मंडळांकडून आवाहन करण्यात आले आहे की, या कार्यक्रमात आपले गाव, आपली संघटना, आपल्या मतांचा प्रतिनिधी म्हणून आपण सहभागी व्हा. संमेलनात आलेली मते, निर्णय, प्रस्ताव हे पुढील धोरणे ठरवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. आपल्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हा ऐतिहासिक क्षण चुकवू नका.
समाज हिताय, समाज सुखाय!
– एक आदर्श समाज घडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा!असे आवाहन बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई
सह – सर्व सहकारी मंडळे आणि समाज कार्यकर्तेयांनी केले आहे

Loading

2 COMMENTS

  1. बडगुजर समाजाचा उत्तम उपक्रम आहे. शुभेच्छा!

  2. अत्यंत स्तुत्य उपक्रम समस्त बडगुजर समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून सदर उपक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपली उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय आहे यातूनच समाज संघटन, विचारांचे सादरीकरण , अपेक्षित आहे सदर कार्यक्रम आयोजित केला त्यांचे प्रथमतः म्हणून मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here