पाचोरा – शिक्षणाचे खरे उद्दिष्ट म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणे नव्हे, तर माणूस घडविणे आणि जीवनमूल्यांचा दीप प्रज्वलित करणे. याच उद्दिष्टाचे जिवंत उदाहरण श्री गो से हायस्कूल, पाचोरा या पवित्र शिक्षण संस्थेने घडवले आहे. या विद्यालयात मी संदीप दामोदर महाजन शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यावेळी शिक्षण घेतलेल्या आणि आज एम एस सर्जन डॉक्टर पदवी प्राप्त केलेल्या डॉ. अपर्णा अनिल देशमुख यांच्या नेत्रदीप कार्यावर एक पत्रकार म्हणून लिहीण्याचा योग आला हे वाचकांनी वाचलंच असेल परंतु त्यावर डॉक्टर अपर्णा यांनी आपल्या गुरूंच्या कार्याबद्दल व्यक्त केलेल्या वंदनीय भावना संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी ठरल्या आहेत.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिलं –
“मी श्री गो से हायस्कूल, पाचोरा येथे शिकत असताना आपले प्रत्येक विद्यार्थ्याकडे सारखं लक्ष असायचं. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा हा आपला कटाक्ष होता. अशा शिक्षकांचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले असताना, आपले मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे होते. आपल्या साध्या, सरळ शब्दांत आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची ज्योत पेटत असे आणि थोड्याशा कौतुकाच्या शब्दांनी आम्ही आत्मविश्वासाने भरून जात होतो. आजही आपण लिहिलेलं वृत्त केवळ एक बातमी नाही, तर ती एक प्रेरणादायी कविता आहे. आपण यासाठी दिलेला वेळ, प्रेम आणि समर्पण पाहता मला अभिमान वाटतो आणि हा गौरव माझ्या संपूर्ण जीवनभर जतन करण्यासारखा आहे. पाचोऱ्याला आल्यावर नक्कीच आपणास भेटण्याचा प्रयत्न करेन आणि आपणही पुणे येथील आभाळमायाला भेट द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे.”
या हृदयस्पर्शी भावना वाचून फक्त पत्रकारच नव्हे तर शिक्षक म्हणून मी आपल्या भावना अत्यंत प्रेमाने आणि नम्रतेने व्यक्त केल्या. त्यात लिहीले
“डॉ. अपर्णा बेटा, तुझ्या इतक्या प्रेमळ आणि अंतःकरणातून आलेल्या शब्दांनी माझ्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले. शिक्षक म्हणून केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक धडपड, प्रत्येक समर्पणाचा क्षण आज सार्थ वाटतो. शिक्षक म्हणून मी नेहमीच एकच ध्यास जपला — प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना न्याय देणे आणि कोणत्याही भेदभावा शिवाय त्यांना घडविणे. आज तुझ्या या शब्दांनी वाटते की त्या प्रत्येक प्रयत्नाचं सुवर्णफळ मिळालं आहे.”
“बेटा, कोणतीही व्यक्ती — शिक्षक, डॉक्टर वा कोणत्याही क्षेत्रातील कार्यकर्ता — जर आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहतो, तर त्या निष्ठेचं फळ केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही मिळते.” मी आपल्या वैयक्तिक जीवनाचा उल्लेख करत सांगितले “माझ्या मोठ्या मुलीने, डॉ. वैष्णवीने, नाशिक विभागात सर्वात कमी वयात एमएससी मॅथेमॅटिक्स पूर्ण करून गणित विषयात पीएचडी मिळवली आहे. तर दुसरी मुलगी, डॉ. कादंबरी, खो-खो च्या राष्ट्रीय संघाची कर्णधार झाली तर नवी मुंबईतील एम जी एम मेडीकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण करून प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयात A+ प्राप्त करीत आजच तिने शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर दिला आणि लगेच दोहा या देशात कतार येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका विवाहाच्या समारंभात डान्स कोरिओग्राफर म्हणून रवाना झाली आहे”
शेवटी, महाजन यांनी भावना व्यक्त करत लिहिलं –
“ही यशोगाथा केवळ शैक्षणिक प्रगतीची नाही, तर समाजासाठी प्रामाणिकपणे दिलेल्या सेवा आणि संस्कारांचे जिवंत दर्शन आहे. हेच संस्कार मी आज तुझ्यातही पाहतो — डॉक्टर अनिलदादांच्या कार्यात आणि तुमच्या मातोश्रींच्या प्रेमळ संस्कारांतून. डॉ. अपर्णा बेटा, तुझ्या पत्राने मला हे प्रकर्षाने जाणवलं की, गुरूचं खरे यश आपल्या शिष्याच्या यशातच दडलेलं असतं. पाचोऱ्याला आल्यावर तुझी भेट माझ्यासाठी अमृततुल्य असेल. बेटा, तू आणि तुझ्यासारखे गुणवंत किर्तीवंत विद्यार्थी माझा अभिमान आहेत. माता वैष्णोदेवी तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर सदैव कृपा ठेवो. पुनश्च तुझ्या नेतृत्वाच्या तेजस्वी वाटचालीस माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!”
हे सर्व लिहीत असताना मला एक पत्रकार अथवा शिक्षक म्हणून मत व्यक्त करावे असे वाटत आहे श्री गो से हायस्कुलचा व ध्येय करिअर ॲकेडमीचा आजही जेव्हा वाऱ्यावरून एखादा विद्यार्थी “सर…” म्हणून हाक मारतो, तेव्हा काळाचा पडदा क्षणात मागे सरकतो. त्या निरागस नजरेतून, त्या कृतज्ञतेच्या डोळ्यांतून गुरू म्हणून घेतलेला प्रत्येक श्वास पुन्हा नव्याने जिवंत होतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं केवळ ज्ञानाचं नसतं, तर ते आत्म्याच्या गाभ्यातून घडलेल्या श्रद्धेचं असतं. त्या नात्याची उब श्री गो से हायस्कूल, पाचोऱ्याच्या प्रत्येक दालनात, प्रत्येक धड्यात आणि प्रत्येक आठवणीत आजही जिवंत आहे.
विद्यार्थ्यांना घडवताना मी नेहमीच प्रयत्न केला की, केवळ पुस्तकांपुरते शिक्षण देण्याऐवजी त्यांना जीवनाशी जुळवणारे धडे द्यावेत. मराठी आणि इतिहास हे माझे मुख्य विषय असले तरी त्या विषयांना मी फक्त अभ्यासाचा भाग न ठेवता जीवनाचा आरसा बनवले. अनेकदा पुस्तकं हातात न घेता, प्रत्यक्ष उदाहरणांमधून, जीवनातील घटना सांगून विद्यार्थ्यांना शिकवताना त्या कठीण वाटणाऱ्या विषयांमध्ये गोडी निर्माण केली.
आजही जेव्हा माझे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर पोहोचून म्हणतात
“सर, तुमचं शिकवणं आम्हाला आयुष्यभर पुरलं. इतिहासातील घटना आम्हाला जशाच्या तशा आठवतात, आणि गॅदरिंगमध्ये तुम्ही स्वतः कोरिओग्राफ केलेले डान्स आजही आमच्या स्मरणात आहेत…”
तेव्हा वाटतं — हा प्रवास व्यर्थ गेला नाही.
स्व. दादासाहेब आर. एस. थेपडे , स्व आप्पासाहेब ओ ना वाघ यांच्यासारख्या पितृतुल्य प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींनी श्री गो से हायस्कूल, पाचोरा ही केवळ शाळा नाही, तर ती एक संस्कारांची कार्यशाळा आहे. या शाळेने केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जीवनासाठी विद्यार्थी घडवले, त्यांच्या मनात संस्कारांचे बीज पेरले आणि त्यांच्या स्वप्नांना पंख दिले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूचा आजही जिव्हाळ्याने आणि आदराने उल्लेख करणे, हेच शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. शिक्षण म्हणजे केवळ शाळा-कॉलेजांपुरतं मर्यादित नसतं, तर ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडावं, अशी शिकवण देणं हेच खरे अध्यापन आहे.
आज या सर्व आठवणींनी मन भरून आलं आहे आणि पुन्हा एकदा सांगावसं वाटतं”मी आयुष्य जगत असताना विविध क्षेत्रातील अनेक उच्चस्तरीय राजकीय, शासकीय मान्यवरां पासून ते अगदी रस्त्यावरील टपोरी, छडकछाप बॅनरवरचे गुंड ते जागतिक पातळीवरील अंडरवर्ल्ड डॉन यांच्या जीवनाचे दर्शन व जवळून अनुभव घेतले आहे. अनेकांच्या सहवासात काही काळ व्यतीत केला, त्यांच्या स्वभावांचे विविध पैलू जवळून अनुभवले आहे.असे पण लोक बघितले आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी माय – बापांचे रोडावर तर सोडा परंतु घरात देखील त्यांच्या दररोज पाया पडलेल्या नाहीत मात्र राजकीय व शासकीय मान्यवरांचे मतलबासाठी रस्त्यावर पाय पडणारे चमचे आणि दहशत पोटी आपल्या आकाचे म्हणजेच गॉडफादरचे पाय पडणारे पंटर पण बघितले
परंतु, या सगळ्या अनुभवांमध्येही शिक्षकी जीवनात मिळणारा प्रेमाचा, विश्वासाचा आणि श्रद्धेचा ठेवा — हा खरंच आयुष्याचा अमृतसंच आहे. हे नातं केवळ शब्दांत मांडता येत नाही, आणि जेव्हा त्यांच्या पाया पडल्या जातात ते अंतःकरणाच्या गाभ्यातून उमटलेले असते. “जिथे गुरूंच्या प्रेमळ सावलीखाली शिष्य घडतो, तिथे प्रत्येक यशाची पहाट साक्षात तेजस्वी सूर्यकिरणांसारखी उगम पावते.”शेवटी एवढेच म्हणेल पुनश्च छडी लागे छम छम विद्या येई घमघम या शिक्षण प्रणालीची व याला प्रतिसाद देणाऱ्या पालकांची आज गरज आहे अन्यथा कोरोना नंतर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.