Home Blog Page 10

आज दि.01/03/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल.
शुभ अंक: 9
शुभ रंग: लाल

वृषभ:
आज संयम ठेवल्यास लाभ होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रवास योग संभवतो.
शुभ अंक: 5
शुभ रंग: पिवळा

कर्क:
भावनिक निर्णय टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 2
शुभ रंग: पांढरा

सिंह:
नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 1
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
कामात बारकाईने लक्ष द्या. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक: 7
शुभ रंग: निळा

तुळ:
संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक सुख समाधान मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
गुप्त शत्रूंपासून सावध रहा. धैर्य आणि चिकाटीने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कुटुंबीयांचा सल्ला उपयोगी ठरेल.
शुभ अंक: 8
शुभ रंग: जांभळा

धनु:
प्रवास किंवा नवीन योजना यशस्वी ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. सकारात्मक विचार ठेवा. जुने मित्र भेटू शकतात.
शुभ अंक: 3
शुभ रंग: केशरी

मकर:
कामात स्थिरता येईल. संयम आणि मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
शुभ अंक: 4
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यास चांगला दिवस. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभ अंक: 7
शुभ रंग: आकाशी

मीन:
आध्यात्मिक कल वाढेल. मन शांत राहील. कौटुंबिक आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील.
शुभ अंक: 2
शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कर्तव्यनिष्ठा, शैक्षणिक योगदान आणि सेवाभावाचा गौरव करणारा गो. से. हायस्कूलमधील भावपूर्ण व स्मरणीय सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश वसंतराव पाटील आणि नाईक पदावर कार्यरत संजय वामन पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला अनेक दशकांच्या प्रदीर्घ सेवेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक व सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही सेवकांचा गौरव करण्याचा हा क्षण शाळेच्या इतिहासातील स्मरणीय ठरला. विद्यालयाच्या कलादालनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा–भडगाव तालुक्याचे माजी आमदार भाऊसो दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक सतीश नारायण चौधरी, योगेश माधवराव पाटील, पिंपळगाव–हरेश्वर येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रुपेश पाटील यांच्या इशस्तवनाने झाली. त्यानंतर दिनेश वसंतराव पाटील व संजय वामन पाटील यांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी प्रास्ताविकातून दोघांच्या कार्यकाळाचा आढावा घेत शाळेच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित त्यांच्या कार्यपद्धतीचे सविस्तर वर्णन केले. किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर यांनी आपले सहकारी दिनेश वसंतराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणात यश मिळविल्याचे नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांनी दोघांच्या कार्याचा गौरव करत निष्ठावंत कर्मचाऱ्यांमुळेच शिक्षणसंस्थेची प्रतिमा अधिक भक्कम होते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख यांनी समाधान व्यक्त करत दोघांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना दिनेश वसंतराव पाटील यांनी संस्थेने वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत निवृत्तीनंतरही संस्थेसाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. संजय वामन पाटील यांच्या वतीने त्यांचा मुलगा सोहम पाटील याने वडिलांच्या सेवापूर्ती निमित्त संस्थेप्रती ऋण व्यक्त करून कृतज्ञता प्रकट केली. या कार्यक्रमास माजी पर्यवेक्षक ए. जे. महाजन , शांताराम चौधरी, तसेच सकाळ व दुपार सत्रातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य यांनी केले

ज्ञान, कर्तव्यनिष्ठा आणि साधेपणाचा ३४ वर्षांचा प्रवास पूर्ण : डी. व्ही. पाटील सरांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती सोहळा

0

Loading

पाचोरा – शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात आपले योगदान ठळकपणे नोंदवून ठेवणारे दिनेश वसंतराव पाटील (डी. व्ही. पाटील सर) Mo. 9420109477 हे श्री गो. से. हायस्कूलच्या किमान कौशल्य विभागातून तब्बल ३४ वर्षे ३ महिने अखंड, निष्ठावंत आणि प्रामाणिक सेवा बजावून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीत आणि तांत्रिक शिक्षणाच्या बळकटीकरणात दिलेले योगदान केवळ एका शिक्षकापुरते मर्यादित न राहता आदर्श मार्गदर्शक, शिस्तप्रिय कार्यकर्ता आणि समाजाशी नाते जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे आहे. त्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती ही केवळ वैयक्तिक टप्प्याची समाप्ती नसून संस्थेच्या इतिहासातील एक भावनिक आणि गौरवशाली पर्व ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ठीक १० वाजता श्री गो से हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला संस्थेचे अध्यक्ष तथा मा.आ. दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, सेक्रेटरी ॲड महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, शालेय चेअरमन खलिलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवअण्णा महाजन आणि मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, शिक्षकवर्गाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीने होणारा हा सोहळा डी. व्ही. पाटील सरांच्या प्रदीर्घ सेवेला कृतज्ञतेने नमन करणारा ठरणार आहे. डी. व्ही. पाटील सरांचे बालपण पाचोरा येथील रंगारी गल्लीमध्ये गेले असून त्या परिसरातील साधेपणा, कष्टाची सवय आणि सामाजिक बांधिलकीची भावना याच वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी झाली. पुढे त्यांचे वास्तव्य गांधी चौक येथे झाले. प्राथमिक शिक्षण त्यांनी सु. भा. पाटील विद्यामंदिर येथे घेतले, तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्री गो. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच त्यांनी शिस्त, अभ्यासू वृत्ती आणि तांत्रिक विषयांची विशेष ओढ जोपासली. पुढे स्थापत्य विषयात पदविका पूर्ण करून त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची ठोस पायरी गाठली. शिक्षणानंतर दोन वर्षे त्यांनी बाहेरील कंत्राटी कामे तसेच प्लॅनिंगची कामे करत प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभव मिळवला आणि नियोजन, गुणवत्ता व जबाबदारी यांचे महत्त्व प्रत्यक्ष कामातून आत्मसात केले. २० नोव्हेंबर १९९१ रोजी त्यांनी श्री गो. से. हायस्कूलमध्ये किमान कौशल्य विभागात बिल्डिंग मेंटेनन्स या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ निदेशक म्हणून रुजू होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्या काळात किमान कौशल्य विभाग हा विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग होता. पाटील सरांनी केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनात कामाची शिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आणि समाजात सन्मानाने आपले स्थान मिळवले. शाळेतील विविध बांधकाम, देखभाल आणि तांत्रिक कामांमध्येही त्यांनी आपले ज्ञान वापरून संस्थेला योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी दिली आणि बिल्डिंग मेंटेनन्स या विषयातून बांधकामाची मूलतत्त्वे, देखभाल व्यवस्थापन, सुरक्षिततेचे नियम, नियोजनाची शिस्त आणि गुणवत्तेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले. शिस्तप्रिय पण माणुसकीची ऊब जपणारे शिक्षक अशी त्यांची ओळख असून विद्यार्थ्यांच्या अडचणी असोत वा सहकाऱ्यांचे प्रश्न, ते नेहमी शांतपणे ऐकून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. डी. व्ही. पाटील सरांचे एक विशेष आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे वास्तुशास्त्राविषयी त्यांचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न अभ्यास होय. दीर्घकाळाच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष कामातून त्यांनी या विषयात प्राविण्य मिळवले असून त्यामुळे त्यांना केवळ पाचोरा तालुका किंवा जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध भागांतून वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येते. निवासी घरे, धार्मिक स्थळे, सामाजिक केंद्रे तसेच संस्थात्मक इमारती याबाबत त्यांचे मार्गदर्शन अनेकांना दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या वडिलांच्या कार्याचा खोल प्रभाव असून त्यांचे वडील व्ही. डी. पाटील साहेब यांनी पाचोरा नगरपालिकेत सब ओव्हरसीअर म्हणून काम करताना पाचोरा पाणीपुरवठा योजना, के. टी. वेअर प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारखी अनेक महत्त्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. सार्वजनिक कामांमधील प्रामाणिकपणा, गुणवत्तेची जाणीव आणि जबाबदारीची भावना हीच मूल्ये डी. व्ही. पाटील सरांनी आपल्या सेवेतही कायम जपली. डी. व्ही. पाटील सरांच्या या यशस्वी आणि स्थिर जीवनप्रवासामागे त्यांच्या सौभाग्यवती सौ. भावना यांचा मोलाचा, न बोलता दिसणारा पण सदैव जाणवणारा सहभाग आहे. देविदास चिंधु राजहंस यांची कन्या असलेल्या सौ. भावना यांच्याशी ४ मार्च १९९४ रोजी डी. व्ही. पाटील सरांचा विवाह झाला आणि त्या दिवसापासून सौ. भावना यांनी पाटील सरांच्या प्रत्येक सुख-दुःखात, चढ-उतारांत आणि जबाबदाऱ्यांच्या वाटचालीत पावलावर पाऊल ठेवत अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ दिली. कुटुंब, सेवा, समाज आणि अध्यात्म या सर्व स्तरांवर पाटील सरांची वाटचाल सुकर करण्यामध्ये सौ. भावना यांचे योगदान अतिशय मोलाचे आणि आधारस्तंभ ठरणारे आहे. विशेष बाब म्हणजे डी. व्ही. पाटील सर ज्या संस्थेत शिक्षण घेतले, त्याच संस्थेत त्यांनी आयुष्याची सेवा बजावली, ही एक दुर्मीळ आणि अभिमानास्पद बाब असताना त्यांच्या मातोश्री सुलभाआई यांचे वडील चिंधू सुपडू दलाल म्हणजेच सर्वांचे परिचित दलाल गुरुजी हे सुपडू भादु पाटील विद्यामंदिर या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक होते, अशी शैक्षणिक परंपरा लाभलेले हे कुटुंब असल्याने ज्ञान, संस्कार आणि शिक्षण यांचे बीज पिढ्यानपिढ्या रुजलेले दिसून येते. शासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून श्री स्वामी समर्थ पाचोरा केंद्राचे काम महाराजांच्या आशीर्वादाने योग्य नियोजनासह त्यांनी मार्गदर्शन करून पूर्णत्वास नेले, तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील केंद्र आणि शिंदाड व नगरदेवळा केंद्राची कामेही त्यांच्या देखरेखीखाली वास्तुशास्त्राच्या नियमानुसार यशस्वीरीत्या पार पडली असून इतर काही केंद्रांची कामेही आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. कौटुंबिक जीवनातही त्यांनी आदर्श निर्माण केला असून मोठा मुलगा कौस्तुभ हा B.E. Civil, M.E. (Structure) शिक्षण पूर्ण करून ‘अवध इंजिनिअर्स अँड डेव्हलपर’ ही स्वतंत्र फर्म यशस्वीपणे चालवत आहे तर दुसरा मुलगा वेंकटेश हा B.Tech. Agri. Engineer आणि MBA असून कृषी व व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. ३४ वर्षे ३ महिने इतक्या प्रदीर्घ सेवाकाळात डी. व्ही. पाटील सरांनी संस्थेच्या उभारणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपले सर्वस्व दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला मिळालेली खरी पावती आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे आयुष्य समाजाभिमुख आणि सक्रिय राहणार असून वास्तुशास्त्राविषयी मार्गदर्शन, आधुनिक पद्धतीने शेती, समाजकार्य आणि अध्यात्माकडे अधिक वळणे असे त्यांचे पुढील मानस आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे कार्य थांबणे नसून नव्या वाटचालीची सुरुवात आहे, हे त्यांच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होत असून त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी सेवेला मानाचा मुजरा करताना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व त्यांच्या परिवाराच्या वतीने डी. व्ही. पाटील सरांचे पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पाचोरा तालुक्यात विकास योजनांच्या नावाखाली निधी लुटीचा संशय : ग्रामपंचायतींमधील गैरप्रकारांचे गंभीर आरोप

0

Loading

पाचोरा – केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. मात्र पाचोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हाच उद्देश बाजूला सारत योजनांच्या निधीचा गैरवापर, कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्षात शून्य कामकाज अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने ग्रामीण विकासाच्या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १५ व्या वित्त आयोगापासून ते मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, आमदार–खासदार निधी आणि पंचायत समिती–जिल्हा परिषद योजनांपर्यंत जवळपास प्रत्येक प्रमुख योजनेत अनियमितता, निकृष्ट कामे आणि संशयास्पद देयके झाल्याचे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये कागदावर विकासाचे ढीग उभे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र गावातील नागरिकांना त्या कामांचा कोणताही लाभ मिळत नसल्याची परिस्थिती आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या गटार, पाईपलाईन, सांडपाणी व्यवस्थापन व पाणीपुरवठा कामांबाबत सर्वाधिक तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात ती अर्धवट ठेवण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून निधीची उघड उधळपट्टी करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. मोजमाप पुस्तकात (एमबी) प्रत्यक्ष मोजमापापेक्षा जास्त मोजमाप दाखवून बिले उचलली गेल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजनांतून निधी उचलल्याचे आरोप काही ग्रामपंचायतींवर होत आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत झालेल्या अंतर्गत रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटच्या कामांबाबतही आजही प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्यांची जाडी नियमानुसार न ठेवता कमी जाडीचे रस्ते तयार करणे, काही महिन्यांतच रस्त्यांना तडे जाणे, दिवे बसवले असल्याचे दाखवून प्रत्यक्षात ते अस्तित्वात नसणे, तसेच जुन्या कामांनाच नव्याने दाखवून निधी खर्च केल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मनरेगा योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू मजुरांना रोजगार देणे हा असला, तरी काही गावांमध्ये ही योजना केवळ कागदावरच राबवली जात असल्याचे चित्र आहे. बोगस जॉब कार्ड, खोट्या नावाने मजूर हजेरी, प्रत्यक्षात यंत्रसामग्री वापरूनही मजुरी बिल दाखवणे, तसेच मजुरांच्या खात्यात मजुरी न जमा होणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक कामांच्या ठिकाणी माहिती फलक नसणे, मस्टर रोल सार्वजनिक न ठेवणे यामुळे पारदर्शकतेचा पूर्णतः अभाव दिसून येतो. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकामासाठी दिलेल्या अनुदानाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी शौचालय अस्तित्वात नसतानाही अनुदान काढण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी अर्धवट बांधकाम करून पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिल्याच्या तक्रारीही दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘हर घर नळ, हर घर जल’ या जलजीवन मिशनच्या घोषणेला पाचोरा तालुक्यात अनेक ठिकाणी फोलपणा आल्याचे दिसते. कागदोपत्री घरगुती नळजोडणी पूर्ण दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये पाणीच येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. निकृष्ट पाईपलाईन, सतत गळती, तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे गावकऱ्यांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल देण्याचा उद्देश असताना काही प्रकरणांमध्ये पात्र लाभार्थ्यांऐवजी नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींना लाभ दिल्याचे आरोप होत आहेत. घर पूर्ण न करता पूर्ण दाखवून हप्ते उचलणे, तसेच काही लाभार्थ्यांकडून अप्रत्यक्षपणे पैसे मागितल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या डिजिटलीकरणासाठी निधी देण्यात आला. मात्र काही ठिकाणी संगणक, प्रिंटर व इंटरनेट सुविधा कागदावर दाखवून प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचे आरोप आहेत. प्रशिक्षण खर्चही कागदोपत्री फुगवून दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार व खासदार निधीतून करण्यात आलेल्या कामांबाबतही पाचोरा तालुक्यात असंतोष व्यक्त केला जात आहे. फलकांवर मोठ्या अक्षरात नावे झळकावत कामे मात्र अपूर्ण ठेवणे, गुणवत्तेत तडजोड करणे, तसेच राजकीय दबावाखाली ठराविक ठेकेदारांनाच कामे देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद योजनांअंतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीच्या कामांमध्ये खर्च फुगवणे, साहित्य खरेदीत कमिशनखोरी, तसेच अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले उचलण्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. राज्य शासनाच्या विशेष योजनांतर्गत आपत्ती मदत, दलित वस्ती सुधारणा योजनेतही अपात्र लाभार्थ्यांना मदत देण्यात आल्याचे आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे आरोप होत आहेत. या सर्व योजनांमध्ये एक समान धागा आढळतो—अंदाजपत्रक फुगवणे, मोजमाप पुस्तकात फेरफार, निकृष्ट दर्जाचे साहित्य, दुहेरी निधी उचल, बोगस लाभार्थी आणि बिलाशिवाय खर्च. यामुळे शासनाच्या योजनांचा मूळ उद्देशच मोडीत निघत असून ग्रामीण जनतेचा प्रशासनावरील विश्वास दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचे गंभीर प्रकार पाचोरा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये घडत असल्याच्या अनेक तक्रारी व यांचे संपादक यांच्याकडे दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत. गावातील विकासकामे, निधी वापर, बिले, मोजमाप, लाभार्थी यादी याबाबत ठोस स्वरूपाच्या तक्रारी, संशय किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी योग्य ती कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ अथवा इतर पुराव्यासह थेट संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्क क्रमांक मो. 7385108510 असा देण्यात आला आहे. या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून सत्य समोर आणण्याची भूमिका माध्यमांकडून घेतली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. ग्रामीण विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित गैरप्रकारांचा साखळदंड थांबवायचा असेल, तर केवळ निधी मंजुरी पुरेशी नाही. प्रत्येक कामावर कठोर प्रशासकीय नियंत्रण, तांत्रिक तपासणी, सामाजिक लेखापरीक्षण आणि दोषींवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे. अन्यथा विकास योजनांचा निधी काही मोजक्यांच्या फायद्यासाठी वापरला जात राहील आणि सामान्य ग्रामस्थ विकासाच्या प्रतीक्षेतच राहतील, अशी तीव्र भावना पाचोरा तालुक्यात व्यक्त होत आहे.

पाचोरा नगरपरिषदेचा एआय व्हॉट्सॲप चॅटबॉट : लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाचा नवा टप्पा

0

Loading

पाचोरा – नगरपालिका निवडणुकीपूर्वीचा प्रशासनाचा प्रशासकीय कार्यकाळ हा केवळ दैनंदिन कारभारापुरता मर्यादित न राहता प्रगतिशील, लोकाभिमुख आणि भविष्यातील प्रशासनाची दिशा ठरवणारा ठरला. नगरपालिका निवडणुका समाप्त झाल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत समस्यांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा-सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यापर्यंतचा हा प्रवास पाचोरा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व, पाचोरा नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची प्रशासकीय पकड व तांत्रिक जाण, शिवसेना नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील यांची संघटनात्मक व लोकप्रतिनिधी म्हणूनची सक्रिय भूमिका आणि नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांचे लोकाभिमुख नेतृत्व ठळकपणे दिसून येते. पाचोरा नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत मुख्य अधिकारी, उपमुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्यावर भर देण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य, करव्यवस्था, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत विषयांवर सातत्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. याच पार्श्वभूमीवर झालेल्या पाचोरा नगरपालिका निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे एकतर्फी बहुमत प्राप्त झाले. सभागृहात शिवसेना शिंदे गटाची सत्ता असली तरी प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव असून प्रत्यक्षात संपूर्ण नगरपरिषदेत महायुतीचेच नेतृत्व असल्याचे चित्र स्पष्ट झाले. या राजकीय स्थैर्याचा थेट लाभ शहराच्या विकासाला मिळाला. नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील आणि सर्व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात टप्प्याटप्प्याने विकासकामांना गती देण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छतेचे नियोजन, पथदिवे, पाणीपुरवठ्याचे नियोजन, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण अशा विविध कामांमध्ये सातत्य दिसून आले आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला. याच समन्वयाचे पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे पाचोरा नगरपरिषदेने उचललेला एआय आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा निर्णय होय. डिजिटल युगात नागरिकांच्या अपेक्षा ओळखून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा हा ठोस प्रयत्न आहे. नगरपरिषदेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधांची माहिती, अर्ज प्रक्रिया, कर भरणा व तक्रार निवारण याबाबतची माहिती आता नागरिकांना थेट त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या अत्याधुनिक एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील, भाजपा गटनेते सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियांका पाटील, मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या चॅटबॉटची संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम, ई-ऑफिसचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, तक्रार निवारण, नागरिकांचे जीवनमान सुलभ करणे आणि कार्यालयीन पारदर्शकता वाढवणे या सर्व मुद्द्यांची तांत्रिक सांगड या प्रकल्पात घालण्यात आली आहे. या चॅटबॉटमुळे पाणीपुरवठा खंडित होणे, कचरा उचल न होणे, रस्त्यावरील खड्डे, स्ट्रीटलाइट बंद असणे, करासंबंधी अडचणी अशा विविध तक्रारी थेट नोंदवता येणार असून त्यावर संबंधित विभागाकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पाठपुरावा होणार आहे, त्यामुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढेल आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक ठोसपणे निश्चित होईल. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहराचा विकास केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीतही आधुनिकता येत आहे. त्यांनी प्रशासनाला केवळ निधीपुरवठा न करता ठोस दिशा दिली आहे. त्या दिशेला मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी प्रशासकीय शिस्त व तांत्रिक बळ दिले आहे, तर शिवसेना गटनेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासन यांच्यातील सेतूची भूमिका समर्थपणे पार पाडली आहे. नगराध्यक्ष सौ सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की 18002335259 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून एआय चॅटबॉटचा जास्तीत जास्त वापर करावा. एकूणच, पाचोरा नगरपरिषदेचा एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉट हा केवळ तांत्रिक उपक्रम नसून नेतृत्व, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील प्रभावी समन्वयातून साकारलेला लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाचा नवा अध्याय ठरला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा–भडगाव परिसरात बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकार : संघटित रॅकेटची सखोल चौकशी व कठोर कारवाईची गरज

0

Loading

पचोरा – जळगाव जिल्ह्यातील आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे हजारो मजूर उपजीविकेसाठी या क्षेत्रावर अवलंबून आहेत. रस्ते, इमारती, व्यापारी संकुले तसेच शासकीय व खासगी बांधकामांमुळे विकासाचा वेग वाढलेला दिसत असला तरी या विकासामागे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे जीवन अजूनही असुरक्षित आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य आणि कामाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शासनाने बांधकाम कामगार नोंदणी व विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र पाचोरा–भडगाव परिसरात या योजनांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असून संपूर्ण प्रक्रियेत संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. बांधकाम कामगार नोंदणीसाठी ठरवून दिलेल्या अटी स्पष्ट असतानाही प्रत्यक्षात खोटे कामाचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि ओळखींच्या जोरावर बोगस नोंदणी केल्याचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत. अनेक खरे बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित राहतात, तर बांधकामाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्ती नोंदणीकृत लाभार्थी म्हणून यादीत दिसतात. यामागे काही ठेकेदार, दलाल आणि मध्यस्थ सक्रिय असून दोन ते पाच हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी करून दिली जात असल्याची चर्चा परिसरात उघडपणे होत आहे. नोंदणी झाल्यानंतर मिळणारे साहित्य, आर्थिक सहाय्य आणि विविध योजना कागदोपत्री मंजूर होतात, मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या हाती काहीच पडत नाही किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जाते. हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, रेनकोट, टूल किट यांसारखे साहित्य मंजूर होऊनही ते अपूर्ण स्वरूपात दिले जाणे, किंवा “कमिशन” दिल्याशिवाय न मिळणे, असे प्रकार दबक्या आवाजात सांगितले जात आहेत. आर्थिक सहाय्याच्या योजनांमध्येही मोठा विलंब, अपारदर्शकता आणि दलालांचा हस्तक्षेप दिसून येतो. प्रक्रिया लवकर करून देतो या नावाखाली टक्केवारी घेतली जाते आणि शासनाने दिलेली मदत पूर्णपणे कामगारापर्यंत पोहोचत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ कामगारांचीच नव्हे तर खोटे बांधकाम कामगाराचे दाखले देणाऱ्या ठेकेदारांचीही सखोल आणि सूक्ष्म पद्धतीने चौकशी होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कामगार कायद्यानुसार संबंधित ठेकेदाराने ज्या कामगाराच्या नावावर दाखले दिले आहेत, त्या कामगाराला प्रत्यक्षात पगार अथवा मजुरी अदा करण्यात आली आहे का, याची तपासणी झाली पाहिजे. संबंधित कामगार ठेकेदाराकडे काम करत असताना कामगार ॲक्टनुसार सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा, साधने आणि विमा संरक्षण देण्यात आले होते का, याचीही काटेकोर चौकशी आवश्यक आहे. तसेच जेवढ्या मजुरीचे दाखले ठेकेदाराकडून देण्यात आले आहेत, तेवढ्याच प्रमाणात संबंधित ठेकेदाराने कर, उपकर व इतर वैधानिक कर भरले आहेत का, याची आर्थिक तपासणी झाली तरच खरे वास्तव समोर येऊ शकते. अशा सूक्ष्म आणि सर्वंकष चौकशीतून पाचोरा–भडगाव परिसरात सुरू असलेले हे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा प्रकार एखाद-दोन प्रकरणापुरता मर्यादित नसून पद्धतशीर, संघटित आणि आर्थिक फायद्यासाठी चालवला जात असल्याचा संशय अधिकच बळावत आहे. दोन ते पाच हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश होणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण अशा प्रकारांमुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बांधकाम कामगार हे विकासाचे खरे शिल्पकार असून पाचोरा–भडगावसारख्या तालुक्यांमध्ये त्यांच्या कष्टावरच शहरे आणि सार्वजनिक सुविधा उभ्या राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनांचा गैरवापर थांबवणे ही केवळ प्रशासकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक अंमलबजावणी झाली तरच या योजनांचा खरा लाभ गरजू बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचेल, अन्यथा विकासाच्या नावाखाली सुरू असलेले हे रॅकेट अधिकच बळावेल आणि कष्टकरी कामगार पुन्हा एकदा फसवला जाईल.

कुरंगीतील बनावट उतारे–बोगस कर्ज प्रकरणात तक्रार अर्ज दाखल; लेटर पॅड-शिक्का-सही बनावट की सत्य याच्या चौकशीकडे लक्ष

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील कुरंगी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उघडकीस आलेले बनावट उतारे व त्याआधारे उचललेले बोगस कर्ज प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, या प्रकरणात आता एक महत्त्वाची वळणदार घडामोड समोर आली आहे. कुरंगी येथील ग्रामसेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची योग्य ती परवानगी घेऊन आज पाचोरा पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला असून तो स्वीकारण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता अधिकृत चौकशीची दिशा मिळाली असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात गावातील काही उताऱ्यांमध्ये मूळ मालकांच्या नावात फेरफार करून बँक व विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज उचलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नसून, थेट नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित असल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. यापूर्वी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष चौकशी व पुढील प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाल्याने विविध शंका उपस्थित झाल्या होत्या. आज तक्रार अर्ज अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आल्याने या प्रकरणातील तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामसेवकांच्या भूमिकेनुसार संबंधित बनावट उतारे ग्रामपंचायतीकडून जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जासाठी वापरण्यात आलेला ग्रामपंचायतचा लेटर पॅड, त्यावरील शासकीय शिक्का आणि ग्रामसेवकांची सही ही सत्य आहे की बनावट, याची सखोल चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर हे लेटर पॅड, शिक्के व सह्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले, तर हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होऊ शकते. अशा परिस्थितीत केवळ कुरंगीपुरते न थांबता पाचोरा तालुक्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींमध्ये अशा स्वरूपाचे प्रकार घडले आहेत, याचा सखोल व व्यापक तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीचा अधिकृत शिक्का व सही वापरण्याचा अधिकार अत्यंत मर्यादित असतो, त्यामुळे या कागदपत्रांचा गैरवापर कसा झाला, कुठून झाला आणि कोणाच्या मदतीने झाला, हे तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे. कुरंगीतील हा प्रकार समोर आल्यानंतर तालुक्यातील काही इतर ग्रामपंचायतींबाबतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी ऐकू येऊ लागल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांनी हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण तालुक्याच्या पातळीवर तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचारी, प्रशासन तसेच सरपंच व सदस्य यांनीही या प्रकरणात पारदर्शक आणि सहकार्याची भूमिका घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. आवश्यक असल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर वस्तुस्थिती मांडून योग्य ती दखल घेण्याची प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या स्तरावरही या प्रकरणाची माहिती दिली जाऊन मार्गदर्शन घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करताना आता संयमित पण ठाम भूमिका घेतली असून, तक्रार अर्ज स्वीकारण्यात आल्याने पुढील तपास प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित केले आहे. सत्य समोर यावे, दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारची प्रकरणे भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी निष्पक्ष, सखोल व वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती दिशा घेतात, लेटर पॅड-शिक्का-सही याबाबत काय निष्कर्ष निघतात आणि तपासातून संपूर्ण चित्र कसे उलगडते, याकडे संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चिमुकल्यांच्या निरागस उत्साहाने रंगले निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे पाचवे स्नेहसंमेलन

0

Loading

पाचोरा : तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे पाचवे स्नेहसंमेलन बालविश्वाच्या आनंदी गजरात आणि कलाविष्कारांच्या रंगीबेरंगी छटांत अत्यंत उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात सजवलेल्या रंगमंचावर चिमुकल्यांच्या पावलांनी ताल धरला, तर त्यांच्या निरागस हास्याने उपस्थितांच्या मनात आपुलकीची ऊब पसरली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गणेश वंदनेने स्नेहसंमेलनाचा मंगल प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला. लहानग्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. पंजाबी, हिंदी, मराठी तसेच कोळी भाषेतील गीतांवर सादर झालेल्या नृत्यांनी संस्कृतींचा सुरेल संगम घडवून आणला. चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण हालचाली आणि तालबद्ध पावले पाहून प्रेक्षक भारावून गेले. काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाचा आशय नृत्यातून उलगडत सादर करण्यात आला, ज्यातून श्रमाचे मोल आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले. ‘यमला, पगला, दिवाना’ या गाण्यावर साकारलेला धर्मेंद्रजींच्या चित्रपटातील लोकप्रिय शैलीचा नृत्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. बालकलाकारांनी अभिनय आणि नृत्य यांचा सुरेख मेळ घालत सादर केलेल्या या सादरीकरणाला प्रचंड दाद मिळाली. त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनी जिंकलेल्या विश्वचषकाचे प्रतीकात्मक चित्रण नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. या सादरीकरणातून क्रीडा क्षेत्रातील महिलांचे यश, जिद्द आणि देशाभिमान यांचा भावनिक संदेश प्रभावीपणे पोहोचला. अध्यक्षीय मनोगतात आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाचे मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत अधिक वेळ घालवून संवाद वाढवावा, कारण सुदृढ कौटुंबिक नाते मुलांना मोबाईल आणि सामाजिक माध्यमांपासून नैसर्गिकरित्या दूर ठेवते, असे त्यांनी स्पष्ट केले. वाचनाची आवड लहान वयातच रुजवणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा आग्रहही त्यांनी धरला. या स्नेहसंमेलनास शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, भडगावच्या तहसीलदार सौ. शितल सोलट, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा भारमल व सौ. वर्षा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि समर्पित परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आरोही पाटील हिने प्रभावीपणे मांडले, तर आभारप्रदर्शन कु. आयुषी चौधरी हिने सुयोग्य शब्दांत केले. चिमुकल्यांच्या निरागसतेतून उमटलेले भाव, त्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास आणि संस्कारांची झलक यामुळे हे स्नेहसंमेलन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता बालकांच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला असून शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.

महिलांच्या जीवासाठी आ. किशोरआप्पा पाटील यांची ठाम आणि कृतीशील भूमिका : चेस्ट कॅन्सरवर विधानसभेत प्रश्न, तर पेटस् स्कॅन व्हॅनसाठी मंत्र्यांकडे थेट मागणी

0

Loading

मुंबई – महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्पी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे सुरू झाले असून या अधिवेशनात जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. याच अधिवेशनात पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर ग्रासणाऱ्या चेस्ट कॅन्सरच्या गंभीर प्रश्नावर विधानसभेचे लक्ष वेधले. ग्रामीण महाराष्ट्रात

विशेषतः महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळत असून सामाजिक संकोच, माहितीचा अभाव, आर्थिक अडचणी आणि महागड्या तपासण्यांमुळे अनेक महिला वेळेवर तपासणी करून घेत नाहीत, परिणामी आजार प्रगत अवस्थेत जातो आणि उपचार अधिक खर्चिक व गुंतागुंतीचे ठरतात, ही वस्तुस्थिती त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली. चेस्ट कॅन्सर प्राथमिक अवस्थेत ओळखला गेला तर तो मोठ्या प्रमाणावर बरा होऊ शकतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध असतानाही ग्रामीण भागात तपासणीची यंत्रणा अपुरी असल्यामुळे अनेक महिलांचे प्राण धोक्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्या ग्रामीण महिलांच्या आवाक्याबाहेर असून प्रवासाचा खर्च, तपासणीसाठी लागणारा वेळ आणि उपचारांचा मोठा आर्थिक बोजा यामुळे गोरगरीब कुटुंबे उपचारापासून दूर राहतात, ही बाब त्यांनी ठाम शब्दांत मांडली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात, विशेषतः ग्रामीण भागात, मोबाईल वैद्यकीय व्हॅनच्या माध्यमातून चेस्ट कॅन्सरची प्राथमिक तपासणी मोहीम राबवावी, अशी ठोस मागणी त्यांनी विधानसभेत केली. गावोगावी, वाडी-वस्तीवर या व्हॅन पोहोचल्यास महिलांची वेळेत तपासणी होऊन आजार सुरुवातीच्या टप्प्यातच सापडेल आणि तातडीने उपचार सुरू करून अनेक महिलांचे प्राण वाचवता येतील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील गंभीर त्रुटींकडेही लक्ष वेधले. गोरगरीब जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेत चेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार बसत असतानाही अनेक ठिकाणी ‘योजनेत बसत नाही’ असे कारण देऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले. काही रुग्णालये व मध्यस्थ यंत्रणा योजनेचा गैरवापर करून गरीब कुटुंबांना मोठ्या खर्चात ढकलत असल्याने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, हा विषय केवळ विधानसभेतील प्रश्नापुरता मर्यादित न ठेवता आमदार किशोरआप्पा पाटील यांनी त्याच दिवशी प्रत्यक्ष लेखी पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांना सविस्तर पत्र दिले. या पत्रात त्यांनी पाचोरा–भडगाव मतदारसंघासाठी जिल्हा वार्षिक योजना (डि.पी.डी.सी) अंतर्गत पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन मंजूर करण्याची ठोस मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे मतदारसंघात अत्याधुनिक तपासणी सुविधेची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पाचोरा–भडगाव मतदारसंघासाठी पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन उपलब्ध झाल्यास परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून आज कर्करोगाच्या अचूक निदानासाठी पेटस् स्कॅनसारख्या तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, मात्र त्या सध्या मोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित असल्याने ग्रामीण रुग्णांना दूरच्या शहरांमध्ये जावे लागते आणि त्याचा मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागतो, हे वास्तव त्यांनी पत्रातून अधोरेखित केले. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (डि.पी.डी.सी) अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन ही पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी स्पष्ट विनंती त्यांनी केली आहे. प्रश्न उपस्थित करणे, शासनाचे लक्ष वेधणे आणि त्याच वेळी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लेखी पाठपुरावा करणे, ही आमदार किशोरआप्पा पाटील यांची कार्यपद्धती असून त्यामुळेच ते केवळ लोकप्रतिनिधी न राहता जनतेच्या दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जर शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन मंजूर झाली, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. लवकर निदान, तातडीचे उपचार आणि कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध झाल्यास अनेक महिलांचे प्राण वाचू शकतील आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गोरगरीब जनतेचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. अशा प्रकारे, चेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर विषयावर विधानसभेत ठाम आवाज उठवून आणि पेटस् स्कॅन व्हॅनसाठी मंत्र्यांकडे थेट मागणी सादर करून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केवळ प्रश्न मांडला नाही, तर तो सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली असून हा उपक्रम तातडीने सुरू झाल्यास अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आज आहेत आणि भविष्यातही राहतील, हे निश्चितपणे म्हणावे लागेल.

वरील मजकूर आपणास योग्य वाटल्यास आपण फक्त नाव कट न करता अथवा मजकुरात बदल न करता इतरत्र Send करणेस अथवा प्रसिद्ध करणेस विनंती

कॉपीच्या बाजारात प्रामाणिक शिक्षणाचा एकाकी पण ठाम लढा – संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा

0

Loading

पाचोरा – “शिस्त जर शिक्षा वाटत असेल, तर आमच्या अकॅडमीत प्रवेश घेऊ नका.” या एका वाक्यातूनच ध्येय करिअर अकॅडमीची संपूर्ण शैक्षणिक भूमिका स्पष्ट होत होती. हे वाक्य जाहिरातबाजीसाठी वापरलेले घोषवाक्य नव्हते; ते शिक्षण व्यवस्थेतील साचलेपणा विरुद्ध उघडपणे घेतलेली भूमिका होती. संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा (जि. जळगाव) सुरू झाली तेव्हा शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. निकाल, टक्केवारी आणि सोयीस्कर मार्ग यांपेक्षा शिस्त, समज, सातत्य आणि जबाबदारी यांना येथे प्राधान्य देण्यात आले. त्या काळात अनेक ठिकाणी शिक्षण म्हणजे गुणांची स्पर्धा, कॉपीची मूक संमती आणि पालकांच्या अपेक्षांना कुरवाळण्याचा व्यवसाय बनत चालला होता. अशा वातावरणात ध्येय करिअर अकॅडमीने कॉपीमुक्त शिक्षणाचा निर्धार केला. हा निर्णय सहज स्वीकारला जाण्यासारखा नव्हता. कारण तो केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण व्यवस्थेसाठी अस्वस्थ करणारा होता. विशेषतः मोठे पगार घेऊनही प्रामाणिक अध्यापनाची नैतिक तयारी नसलेले, बायकोच्या नावावर शिकवण्या दाखवून प्रत्यक्ष स्वतः अध्यापन करणारे काही प्राध्यापक आणि शिक्षक या भूमिकेमुळे अस्वस्थ झाले. त्यांच्या सोयीच्या, तडजोडीच्या शिक्षणपद्धतीवर थेट बोट ठेवले गेले होते. परिणामी, शक्य त्या सर्व पातळ्यांवर विरोध झाला. गैरसमज पसरवले गेले, अपप्रचार करण्यात आला, सामाजिक दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र ध्येय करिअर अकॅडमीची भूमिका बदलली नाही. कारण येथे शिक्षण हे व्यवहार नव्हते, तर जबाबदारी होती. या अकॅडमीत शिस्त ही केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नव्हती. पालकांनाही स्पष्ट भूमिका देण्यात आली होती. दररोज रात्री आपल्या पाल्याची वही उघडून पाहणे, त्या वहीवर दिनांक आणि वार आहे का ते तपासणे आणि फक्त सही करणे – एवढीच अपेक्षा होती. वहीतील मजकूर योग्य आहे का, उत्तर बरोबर आहे का, याची चौकशी पालकांनी करू नये, हे ठामपणे सांगितले गेले. पालकांनी पालकत्व निभवावे, शिक्षक होण्याचा प्रयत्न करू नये, ही भूमिका स्पष्ट होती. जोपर्यंत वहीवर सही होत नाही, तोपर्यंत पालकांनी रात्री जेवणाच्या ताटावर बसायचे नाही – हा नियम कठोर वाटत असला, तरी त्याने घराघरांत शिक्षणाला एक शिस्तबद्ध स्थान मिळाले. विद्यार्थ्यांसाठीचे नियमही तितकेच ठोस होते. मोबाईल वापरावर बंदी, शिस्तभंगाला थेट कारवाई, उशीर झाल्यास कारण सांगण्यासाठी थेट पालकांशी संपर्क. प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा आणि त्या धड्यातील प्रत्येक मुद्दा शिकवणे शिक्षकांसाठी बंधनकारक होते. गणितासारख्या विषयात तर प्रत्येक उदाहरण समजावून सांगितले जात असे. “हे येणार नाही” किंवा “हे टाळू” अशा शब्दांना येथे वाव नव्हता. प्रत्येक धड्यावर स्वतंत्र चाचणी, नियोजित कालावधीत अंतर्गत परीक्षा आणि वार्षिक मूल्यमापन ही पद्धत काटेकोरपणे राबवली जात होती. २०१० पासूनच अध्यापन व स्पेशली परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घेतल्या जात. परीक्षेदरम्यान गैरप्रकाराची शक्यता शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. कॉपी करणे तर दूरच, साधे बोलणेही सहन केले जात नसे. अशा वेळी त्वरित कारवाई होत असे. यामुळे परीक्षेचा अर्थ मुलांच्या मनात भीती नव्हे, तर जबाबदारी म्हणून रुजत गेला. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वेगळा घरगुती अभ्यास करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत नसे. कारण वर्गात शिकवलेले व्यवस्थित नोंदवणे बंधनकारक होते आणि रात्री वही तपासली जाणार, याची जाणीव असल्याने वर्गात लक्ष देणे अपरिहार्य ठरत असे. परिणामी समज वाढत गेली. हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य रात्रीची अभ्यासिका ही मोठी संधी ठरली. या सर्व प्रक्रियेचे परिणाम हळूहळू दिसू लागले. केवळ गुणच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली. आजही अनेक माजी विद्यार्थी भेटले की ते स्वतःची ओळख “ध्‍येयचा विद्यार्थी” म्हणून अभिमानाने करून देतात. पालकही तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात की शिस्तीच्या या शिक्षणामुळेच त्यांच्या मुलांना आयुष्यात दिशा मिळाली. हे शब्द म्हणजे पैशात मोजता न येणारी पावती होती. मात्र कोरोना काळाने संपूर्ण शिक्षणविश्व ढवळून काढले. प्रत्यक्ष अध्यापन जवळजवळ थांबले. बहुतांश विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कापासून दूर गेले. ऑनलाईन शिक्षण हे अनेकांसाठी शिकण्याचे माध्यम न राहता केवळ वेळ घालवण्याचे साधन बनले. ज्या पालकांकडे मूलभूत सुविधा नव्हत्या, त्यांनाही मुलांसाठी मोबाईल घ्यावा लागला. याचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले. याच काळात संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीसमोर एक कठीण निर्णय उभा राहिला. ज्या शिक्षणपद्धतीचा पाया प्रत्यक्ष संवाद, नियंत्रण, देखरेख आणि शिस्त यावर होता, ती पद्धत तडजोडीने ऑनलाईन चालवणे योग्य नाही, हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोनापासून आजतागायत ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. हा निर्णय आर्थिक किंवा सोयीचा नव्हता; तो तत्वनिष्ठ होता. दरम्यानच्या काळात शिक्षणक्षेत्रात वेगळेच चित्र दिसू लागले. सरसकट पासची मानसिकता, निकाल वाढवण्यासाठी लवचिकता, गैरप्रकारांकडे दुर्लक्ष – या सगळ्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळला. प्रवेश घेताना “पास करून देणार का?” हा प्रश्न विचारला जाऊ लागला. काही ठिकाणी शिक्षकांवरही अनैतिक तडजोडींचा दबाव आला. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील तयारीवर झाला. होय, आज प्रत्यक्षात ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. वर्गातील शांतता, रिकामे बाक, बंद अभ्यासिका हे दृश्य वास्तव आहे. मात्र ध्येय संपले आहे, असे नाही. ध्येय ही इमारत नव्हती; ती एक विचारधारा होती. ज्या विद्यार्थ्यांनी शिस्त अनुभवली, ज्या पालकांनी जबाबदारी स्वीकारली, आणि ज्या शिक्षकांनी प्रत्येक घटक प्रामाणिकपणे पार पाडला – ते सर्व आजही त्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. कार्यालय बंद असले, तरी त्या शिक्षणाचे संस्कार आजही अनेक कुटुंबांत जिवंत आहेत. हा प्रश्न केवळ एका अकॅडमीपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीचा आहे. आपण निकालाला प्राधान्य देतो की गुणवत्तेला? सोयीला महत्त्व देतो की शिस्तीला? ध्येय करिअर अकॅडमीने या प्रश्नांची उत्तरे आपल्या कृतीतून दिली होती. त्यामुळे ती अस्वस्थ करणारी ठरली. कदाचित उद्या परिस्थिती बदलेल. कदाचित पुन्हा एकदा ध्येय करिअर अकॅडमी सारखे शिस्तीचे इतर दालनांची दरवाजे उघडतील. तेव्हा कदाचित ही अकॅडमी एक प्रेरणा आठवण म्हणून उरेल. पण तिचा विचार, तिची भूमिका आणि तिचा आदर्श संपणार नाही. कारण ध्येय ही संस्था नव्हती; तो एक संस्कार होता. कार्यालय बंद असणे हे वास्तव आहे. पण ध्येय जिवंत असणे ही आशा आहे. आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे शिक्षण अजून संपलेले नसते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!