Home Blog Page 114

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयाला शैक्षणिक भेट

0

Loading

पाचोर ( मनोज बडगुजर )-जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमात “फिल्ड व्हिजीट” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जीवनातील प्रशासन आणि शासकीय यंत्रणांचा अनुभव मिळवून देणे हा होता. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी तहसील

कार्यालय, पाचोरा येथे भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची आणि प्रशासन यंत्रणेची प्रत्यक्ष माहिती घेतली. या शैक्षणिक भेटीमध्ये विद्यार्थ्यांना तहसीलदार विजय बनसोडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत निवडणूक यंत्रणेच्या कार्यप्रणालीबद्दल सखोल माहिती दिली. श्री बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय, तिचे महत्त्व काय, भारतात लोकशाहीची रचना कशी आहे, या गोष्टींचे विस्तृत विवेचन केले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा म्हणजे काय, त्यांचे कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या काय असतात, राज्याचे प्रमुख कोण असतात, राज्यपाल व मुख्यमंत्री यांची भूमिका काय असते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, ग्रामपंचायत ते महानगरपालिका यांतील निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातात, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.                                         मतदान यंत्रणा कशी काम करते, ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) कसे कार्य करते, व्हीव्हीपॅट यंत्रणा कशी वापरली जाते, एक मतदार मतदान करताना त्याच्या मताची गोपनीयता कशी राखली जाते यासंबंधी त्यांनी प्रत्यक्ष यंत्र दाखवून विद्यार्थ्यांना समजावले. मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रांचे नियोजन, मतमोजणी प्रक्रिया, मतपत्रिकांचे सुरक्षिततेचे नियम, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व जबाबदाऱ्या यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मतदारसंघ म्हणजे काय, तो कसा ठरवला जातो, जनगणना व भौगोलिक रचनेच्या आधारे मतदारसंघाचे पुनर्रचनेचे कार्य कसे केले जाते, याबाबत त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले. भारतात खासदार आणि आमदार निवडले जातात ती संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजून घेतली. लोकशाही ही केवळ एक राजकीय व्यवस्था नसून ती एक जीवनशैली आहे, हे अधोरेखित करत बनसोडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधान आणि लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण केली.                                    विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. “जर कोणी मतदान न केल्यास काय परिणाम होतो?”, “मतदानासाठी काय पात्रता लागते?”, “नवीन मतदार नोंदणी कशी होते?”, “मतदान प्रक्रियेत अपंग मतदारांसाठी काय सुविधा आहेत?”, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि बनसोडे यांनी त्यांना अचूक व समर्पक उत्तरे देत त्यांची उत्सुकता शमवली.   या भेटीत निवडणूक नायब तहसीलदार रणजीत पाटील आणि संगणक तज्ज्ञ जयंत जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, ई-गव्हर्नन्स प्रणाली, डिजिटल नोंदणी, ऑनलाइन मतदार यादी तपासणी इत्यादी आधुनिक प्रणालींची माहिती दिली. तहसील कार्यालयात चालणाऱ्या विविध विभागांची कार्यपद्धती, महसूल नोंदणी, जमीन अभिलेख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आदी बाबींची विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली.                                         या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेशशेठ बोथरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपाध्यक्ष गिरीषनाना  कुलकर्णी, सचिव जिवनभाऊ जैन, सहसचिव संजयशेठ बडोला, खजिनदार तथा खिलोशिया उपहारगृहाचे मालक जगदीशशेठ खिलोशिया, स्कूल कमिटीचे चेअरमन लालचंदशेठ  केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशशेठ ललवाणी, संचालक संजयभाऊ  चोरडिया, गुलाबभाऊ राठोड, गोपालशेठ  पटवारी, प्रीतीजी जैन, महेंद्रकुमार  हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांचेही मार्गदर्शन व उपस्थिती लाभली.                               या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व शाळेचे सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शाळेतील शिक्षिका निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रूपाली जाधव, प्रीती शर्मा, शितल तिवारी, दीपिका रणदिवे, योगिता शेंडे, पूजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राह्मणकर, विद्या थेपडे, पिंकी जैन, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, संगीता पाटकरी, पूजा अहिरे, कल्पना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.                          याशिवाय, शिक्षक वाल्मीक शिंदे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदीप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राह्मणे, शिवाजी पाटील, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनीषा पाटील, विकास मोरे यांचे देखील या उपक्रमात मोलाचे योगदान लाभले.            या उपक्रमामागे इयत्ता 8 वीचे वर्गशिक्षक किरण बोरसे यांची कल्पक संकल्पना होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत कल्पकतेने राबवला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाचा अनुभव मिळावा, त्यांना शालेय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष जीवनाशी सुसंगत उदाहरण मिळावे या उद्देशाने त्यांनी ही भेट आखली.                                         या भेटीतून विद्यार्थ्यांनी फक्त निवडणूक प्रक्रिया नव्हे तर प्रशासनाची कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये, संविधानाचे महत्त्व आणि एक जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे गहन बोध घेतले. अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढते, त्यांचा आत्मविश्वास बळावतो आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होते.निश्चितच, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाला व्यवहार्य संदर्भ मिळतो, आणि ते उद्याचे सजग, प्रगल्भ व जबाबदार नागरिक बनतात.

आरसीबीच्या विजयाने आयपीएल २०२५ ची जबरदस्त सुरूवात

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या उद्घाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) वर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत स्पर्धेला दमदार सुरुवात केली.

ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ गडी गमावून १७४ धावा केल्या. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (५६ धावा, ३१ चेंडू) आणि सुनील नारायण (४४ धावा, २६ चेंडू) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी घेत केकेआरला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. क्रुणाल पांड्या (४ षटकांत २९ धावा, ३ बळी) याने चमकदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना १६.२ षटकांतच ३ गडी गमावून १७७ धावा करत विजय मिळवला. सलामीवीर फिल सॉल्ट (५६ धावा, ३१ चेंडू) आणि विराट कोहली (५९ धावा, ३६ चेंडू) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. राजत पाटीदार (३४ धावा, १६ चेंडू) याने वेगवान खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. क्रुणाल पांड्या त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला.

या विजयानंतर आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये विजयी सुरुवात करत गुणतालिकेत पहिले दोन गुण मिळवले आहेत.

उद्याचे सामने:-

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या १८व्या सत्राची सुरुवात २२ मार्च २०२५ रोजी झाली असून अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

उद्या, २३ मार्च २०२५ रोजी दोन महत्त्वाचे सामने खेळवले जातील:-

पहिला सामना – दुपारी ३:३० वाजता
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

दुसरा सामना – संध्याकाळी ७:३० वाजता
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

आयपीएल २०२५ च्या रोमांचक सुरुवातीने स्पर्धेची रंगत वाढली असून, उद्याच्या सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश – राजकीय गणित, वस्तुस्थिती आणि भविष्यातील दिशा

0

Loading

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी हा निर्णय राजकीय गरज म्हणून पाहिला, तर काहींनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून झालेला बदल मानला. काही राजकीय निरीक्षकांनी याला स्वार्थ म्हणून हिणवले, तर काही समर्थकांनी याला राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे मान्य केले. परंतु, या निर्णयामागील वस्तुस्थिती, राजकीय समीकरणे आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतल्यास, तो केवळ एक राजकीय तडजोड नसून पुढील राजकीय प्रवास सुसह्य करण्यासाठीचा रणनीतिक विचार असल्याचे स्पष्ट होते.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण सुरू केले. काहींना आश्चर्य वाटले की, एका समाजवादी कुटुंबातून आलेले आणि कधीही हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंध नसलेले दिलीपभाऊ भाजपमध्ये कसे सामील होऊ शकतात? काहींनी त्याचा अर्थ स्वार्थी राजकारण आणि सत्तेची आस याशी लावला.
मात्र, राजकारण हा केवळ विचारधारांचा खेळ नसून, तो वास्तवावर आधारलेला असतो. एखाद्या नेत्याच्या भूमिका, त्याच्या वाटचालीतील संघर्ष, त्याला मिळालेला पाठिंबा किंवा झालेली उपेक्षा, याचा बारकाईने विचार केला तर या निर्णयामागील कारणे सहज उलगडतात.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे वडील, स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, हे महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गरीब, मध्यमवर्गीय व्यापारी आणि शेतकरी समाजाच्या हितासाठी लढा दिला. त्यांनी निवडणुका लढवल्या, आमदारकी भूषवली आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले.
विशेष म्हणजे, स्व. आप्पासाहेब वाघ हे 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे पहिले सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अपक्ष आमदारांपैकी एक होते. त्यांच्या आणि इतर अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार सत्तेत आले आणि सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपशी संबंध नव्याने सुरू झालेला नाही, तर तो अप्रत्यक्षरीत्या पूर्वीपासून होता.
आजचे राजकारण 90च्या दशकाच्या किंवा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीसारखे राहिलेले नाही. आजच्या घडीला विचारधारेपेक्षा पक्षाचे पाठबळ, आर्थिक बळ आणि सत्ता समीकरणे अधिक महत्त्वाची ठरतात. एकेकाळी विचार आणि तत्वांसाठी झटणारे कार्यकर्ते आजच्या राजकीय वातावरणात पैशाच्या बाजारात हरवत चालले आहेत.
आजच्या निवडणुकीच्या राजकारणात, उमेदवाराच्या लोकप्रियतेपेक्षा पक्षाच्या आर्थिक पाठबळाचा प्रभाव जास्त दिसून येतो. निवडणुकीच्या काळात घरच्या भाकरी बांधून प्रचार करणारे कार्यकर्ते आता कुठे दिसत नाहीत, आणि त्यांची जागा पैसे देऊन विकत घेतलेले समर्थक घेत आहेत. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांसारख्या नेत्यांनी सत्तेच्या समीकरणानुसार निर्णय घेणे अपरिहार्य ठरते.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर काम केले. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही. पक्षाकडूनही आणि काही ठिकाणी मतदारांकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे, निवडणूक लढवण्यासाठी वारंवार स्वतःच्या मालमत्ता विकाव्या लागतात, हे कुणालाही दीर्घकाल टिकवता येणार नाही.
अशा परिस्थितीत, “समय के साथ चलो” या तत्त्वाचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरते. पक्ष आणि विचारधारेशी बांधील राहण्याचा आग्रह धरत बसल्यास, राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय केवळ तडजोड नसून, भविष्याचा विचार करून घेतलेला व्यावहारिक निर्णय आहे.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी :– सध्याच्या EVM च्या राजकीय वातावरणात स्वतंत्र लढून अस्तित्व टिकवणे कठीण आहे. भाजपसारख्या पक्षात सामील झाल्यास त्यांना अधिक संधी आणि पाठबळ मिळू शकते.
विकासाच्या संधी :– भाजप सरकारमध्ये स्थानिक विकासाच्या संधी अधिक आहेत. त्याचा लाभ मतदारसंघासाठी होईल.
नव्या पिढीच्या राजकारणाशी जुळवून घेणे :– बदलत्या राजकीय वातावरणात नव्या पिढीच्या राजकारणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
स्व. आप्पासाहेब वाघ यांचा अप्रत्यक्ष वारसा :– 1995 च्या सरकार स्थापनेत त्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली होती. त्यामुळे भाजपसोबत जाणे पूर्णतः अनपेक्षित नाही.
सत्ताधारी पक्षाचा फायदा :– कोणत्याही पक्षाचा नेता असो, सत्ताधारी पक्षाच्या जवळ राहिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवणे सोपे होते.
दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावर विरोधकांनी टीका करणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकारणात कोणताही निर्णय घेतल्यावर समर्थन आणि विरोध असणारच. त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहतील, तर विरोधक त्याला संधी म्हणून पाहतील.
भाजप प्रवेशामुळे, त्यांच्या मतदारसंघात नवे समीकरण तयार होईल. काही पारंपरिक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, तर नवीन कार्यकर्ते जोडले जातील. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय स्वार्थ किंवा विचारधारेला तिलांजली देण्याचा निर्णय नाही, तर तो परिस्थितीनुसार घेतलेला व्यावहारिक आणि आवश्यक निर्णय आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी, हा बदल व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवा.
“राजकारण हे स्थित्यंतरशील असते आणि त्यात टिकून राहायचे असेल, तर काळानुसार बदल स्वीकारावेच लागतात.”

या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने पुढील कवितेच्या ओळी दिलीपभाऊ यांच्या बाबतीत समर्पित करीत आहे

दीप हूँ, अंत तक लड़ता रहूंगा,
आंधियों से हर पल टकराता रहूंगा।
जलने की पीड़ा से कभी न घबराऊंगा,
अंधेरों को चीरकर रोशनी फैलाऊंगा।      दिप हू तूफानों की चाहे जितनी हो साजिश,
मेरी लौ में है अडिग एक जिद, एक आस।
तेल कम हो जाए, बाती भी बुझने लगे,
फिर भी अपने हौसले से जलता रहूंगा।        दिप हू अंधकार के समंदर में एक किनारा हूँ,
नाउम्मीदी में उम्मीद का सहारा हूँ।
वक्त की आंधियां मुझको मसल नहीं सकती,
मैं दीप हूँ, अंत तक जलता रहूंगा।               दिप हू टूटूंगा, झुकूंगा नहीं, डिगूंगा नहीं,
अपनी रोशनी से हर दिल में बसता रहूंगा दीप हूँ, अंत तक लड़ता रहूंगा                                            दिप हू हर अंधेरे से आखिरी सांस तक भिड़ता रहूंगा।

लोकन्यायालय “न्यायाचा लोकाभिमुख चेहरा”- सौ शितल महाजन

0

Loading

पाचोरा येथे पार पडलेले राष्ट्रीय लोकन्यायालय हे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर एक सामाजिक शुश्रूषा आहे. आज न्यायप्रक्रियेबाबत सामान्य नागरिकामध्ये असलेला अविश्वास, खर्च व वेळेच्या बाबतीत असलेली भीती – अशा साऱ्यांना लोकन्यायालय हे उत्तर आहे.
१०५८ प्रकरणांचा निपटारा आणि ४ कोटी १८ लाखांहून अधिक रकमेची वसुली ही केवळ आकडेवारी नसून, समाजातील शांतता, समाधान आणि सुसंवादाची दिशा आहे. जुनी प्रकरणे मिटणे, कौटुंबिक तडजोडी, आर्थिक वादांचा निपटारा यामुळे लोकांचा मानसिक ताण हलका होतो आणि समाजात सौहार्द नांदतो.
या यशामध्ये न्यायालयीन यंत्रणेबरोबरच विविध शासकीय विभागांचा समन्वय व सहकार्य हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. न्याय व्यवस्था लोकांच्या दारात आणणारे हे लोकन्यायालय म्हणजे ‘न्याय मंदिराचे खुले दरवाजे’ आहेत – जेथे गरिब, दुर्बळ, साध्या माणसाला मोठा वकील लागतोच असे नाही, फक्त तडजोडीची मानसिकता लागते.
या उपक्रमातून प्रेरणा घेत इतर तालुक्यांनीही अशा यशस्वी लोकन्यायालयाचे अनुकरण करावे, हीच आजची गरज आणि दिशा आहे.
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी न्यायपालिका हा एक महत्त्वाचा आणि गरिमास्पद स्तंभ. मात्र वेळखाऊ आणि खर्चिक न्यायप्रक्रिया ही न्याय मिळवण्यातील सर्वात मोठी अडचण ठरली आहे. अशा परिस्थितीत ‘राष्ट्रीय लोकन्यायालय’ ही संकल्पना म्हणजे एक युगांतरकारी बदल आहे.
पाचोरा येथे नुकतेच पार पडलेले लोकन्यायालय हे याचे ठळक उदाहरण आहे. एकाच दिवशी १०५८ प्रकरणांचा निपटारा आणि ४ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक रकमेची वसुली हा आकडा केवळ आश्चर्यकारक नाही, तर समाजाच्या न्यायभानावरचा विश्वास पुनःस्थापित करणारा आहे.
या उपक्रमाची पुढील महत्वपुर्ण वैशिष्ट्ये आहेत
१) त्वरित निर्णय प्रक्रिया
२)तडजोडीचा मार्ग
३)कमी खर्चात न्याय
४)वाद टाळण्याची सकारात्मक दिशा
जुनी प्रकरणे, कौटुंबिक वाद, बँक प्रकरणे, वीजबिल वसुली, वाहतूक दंड आदी विविध क्षेत्रातील वाद एका दिवसात मिटणे ही समाजासाठी समाधानाची बाब आहे.
सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या खर्चाशिवाय न्याय मिळवून देण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेसाठी, ज्यांच्यासाठी न्यायालय म्हणजे एका वेगळ्याच दुनियेतले प्रकरण वाटते – त्यांना लोकन्यायालय ही एक सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था वाटू लागली आहे.
सर्व यंत्रणांचा समन्वय, वकिलांचा सक्रिय सहभाग, न्यायाधीशांचे मार्गदर्शन आणि नागरिकांची सहभागिता – हीच लोकन्यायालयाची खरी ताकद आहे.
या लोकन्यायालयांमुळे केवळ वाद मिटत नाहीत, तर एक शांतता, एक सौहार्द निर्माण होते. कुटुंबे निस्तरली जातात, ताण-तणाव कमी होतो आणि समाजाच्या गतीला वेग मिळतो.
न्यायालय हे केवळ शिक्षा देण्यासाठी नसते, तर समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे केंद्र असते – याचा प्रत्यय पाचोरा लोकन्यायालयातून आला आहे.
समाजानेही या प्रक्रियेचा भाग व्हावे, वाद मिटवण्यासाठी लोकन्यायालयासारख्या संधींचा स्वीकार करावा, हाच या विचारलेखाचा सार आहे.                    

लेखक  -सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

पाचोरा राष्ट्रीय लोकन्यायालयात 1058 प्रकरणांचा यशस्वी निपटारा; 4 कोटींहून अधिक रक्कमेची वसुली

0

Loading

पाचोरा- दिनांक २२ मार्च २०२५ रोजी पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक असा राष्ट्रीय लोकन्यायालयाचा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यामध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेला गती देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायप्राप्तीसाठी पूरक ठरणाऱ्या अशा अनेक प्रकरणांचा निकाल देण्यात आला.या लोकन्यायालयाचे अध्यक्षस्थानी विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर श्री. जी. एस. बोरा होते. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली आणि कुशल नेतृत्वाखाली या संपूर्ण उपक्रमाचे संचालन यशस्वीरीत्या पार पडले. या विशेष लोकन्यायालयामध्ये विविध न्यायालयीन प्रकरणांचा निकाल देण्यात आला. यामध्ये विशेषतः दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे आणि दुसरे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयांतर्गत एकूण 166 प्रकरणांची सुनावणी करण्यात आली. या प्रकरणांमध्ये न्यायालयीन तडजोडीनुसार न्यायसंगत निपटारा साधण्यात आला असून, यामधून एकूण 2 कोटी 4 लाख 14 हजार 583 रुपयांची वसुली करण्यात आली.या प्रकरणांमध्ये अनेक जुनी प्रकरणे होती, जी विविध कारणांमुळे लांबणीवर पडली होती. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेली चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आली, जे लोकन्यायालयाच्या यशस्वितेचे ठळक उदाहरण आहे.न्यायालयीन प्रकरणांबरोबरच या लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले. एकूण 892 वादपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारच्या तक्रारी, आर्थिक व कर्जवसुलीशी संबंधित वाद, कौटुंबिक तडजोडी, बँक प्रकरणे, वाहतूक वसुली प्रकरणे आणि अन्य सामंजस्याने सुटणाऱ्या वादांचा समावेश होता.                                          .           या वादपूर्व प्रकरणांतून 2 कोटी 14 लाख 26 हजार 892 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली, जी या उपक्रमाची कार्यक्षमता दर्शवते. या संपूर्ण राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या आयोजनातून एकूण 1,058 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला, आणि त्यामधून 4 कोटी 18 लाख 41 हजार 475 रुपयांची रकमेची वसुली करण्यात आली. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, लोकन्यायालयाच्या माध्यमातून न्यायप्रक्रियेला नवसंजीवनी मिळते व नागरिकांचा वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचतो. या लोकन्यायालयात कौटुंबिक वादातील 20 प्रकरणे देखील तडजोडीने निकाली काढण्यात आली, ज्यामुळे अनेक कुटुंबांना नवा मार्ग मिळाला. या प्रकरणांत विवाह संबंध, विभक्त जीवन, पोटगी, आणि घरगुती वाद इत्यादींचा समावेश होता.तसेच, व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, ज्यामुळे दूरस्थ ठिकाणी असलेल्या पक्षकारांनाही न्याय मिळवण्याची संधी मिळाली. यामुळे तांत्रिक युगातील न्यायसुविधांची आधुनिक रूपरेषा अधिक सशक्त होत असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले.या यशस्वी आयोजनामध्ये पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती जी. एस. बोरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच पंच सदस्य म्हणून श्रीमती ललिता पाटील यांनी देखील जबाबदारी यथोचित पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रकरणांचे सुलभीकरण झाले.या लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी पाचोरा न्यायालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी व कर्मचारी, बी.एस.एन.एल. अधिकारी व कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी व कर्मचारी, तसेच पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी समर्पक योगदान दिले. तसेच न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक व कर्मचारी वर्ग यांनी देखील या उपक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले.या राष्ट्रीय लोकन्यायालयात पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, आणि त्यांनी आपापल्या प्रकरणांमध्ये तडजोडीचा मार्ग स्वीकारत, वेळ आणि आर्थिक नुकसान टाळण्याचा निर्णय घेतला. हे लोकन्यायालय समाजाला सौहार्दपूर्ण न्यायप्रक्रियेची प्रेरणा देते. पाचोरा येथील राष्ट्रीय लोकन्यायालयाचा हा उपक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित राहिला नसून तो न्याय प्रक्रियेतील लोकाभिमुखता आणि कार्यक्षमतेचा एक उत्कृष्ट नमुना ठरला आहे. १०५८ प्रकरणांचा निपटारा आणि ४ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक रकमेची वसुली हे याचे स्पष्ट संकेत आहेत. लोकन्यायालय हे पारंपरिक न्यायप्रक्रियेचा पूरक माध्यम असून, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना सुलभ, सुलभीत आणि न्याय्य समाधान मिळवून देणारा एक प्रभावी मार्ग आहे. पाचोरा तालुक्यातील या उपक्रमाने अन्य न्यायालयांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

शिक्षणातील सावरलेली वीण : शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील बदलती नाती – सौ.शितल महाजन

0

Loading

‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणत अनेकांनी तंत्रज्ञानाचा अंकुश आपल्या हातात घेतला. पण दुर्दैवाने ही मुठ्ठी उघडली तेव्हा आपल्या मुलंच कधी निसटली, हे लक्षातच आलं नाही.
एके काळी शिक्षक म्हणजे समाजातील आदर्शवत व्यक्ती. त्यांचे बोलणे म्हणजे शिस्त, वर्तन म्हणजे सुसंस्कृती आणि निर्णय म्हणजे अंतिम सत्य मानले जायचे. पालक त्यांच्या मुलांबाबत शिक्षकांचा सल्ला घेत, सहकार्य करत. पण आज स्थिती उलटी झाली आहे. शिक्षकाने जर एका विद्यार्थ्याला साधी शिक्षा केली, तर पालक शाळेत धडकतात. त्यांची भाषा असते, “त्याला शिक्षा केली म्हणून तो आजारी पडला… आम्ही लगेच डॉक्टरकडे नेलं… हात सुजला… तो शांत का बसतोय… त्याला काय मानसिक धक्का बसलाय का?”
आज शिक्षकांनी चुकूनही कुणाला ओरडले, तरी तो गुन्हा ठरतो. कुणा मुलाच्या – मुलीच्या बॅगेत लव्ह लेटर सापडले, मोबाईलमधून अश्लील मजकूर आढळला, तरी शिक्षकांनी पालकांना सांगायला भीती वाटते. कारण सांगितल्यास शिक्षकावर विनयभंग, छळ, मानसिक त्रास यांसारखे आरोप लावण्याची धमकी दिली जाते.
हे चित्र इतके विदारक आहे की, शिक्षकांचे काम शिक्षणापेक्षा स्पष्टीकरण देणे झाले आहे.
पूर्वी शिक्षकांकडून मिळणारी शिस्त म्हणजे आयुष्याचे मार्गदर्शन असे. शिक्षकांनी दिलेली एखादी शिक्षा – ती वेळेवर दिलेली दिशा होती. पण आता शिस्त म्हणजे अन्याय, शिक्षा म्हणजे अत्याचार, आणि शाळा म्हणजे आरोपांची जागा बनली आहे.
आज सहावी-सातवीची मुले सैराटसारख्या चित्रपटांतील वर्तन जगायला लागली आहेत. प्रेयसीप्रेमाची नाटके, बिनधास्त संवाद, मोबाईलच्या साहाय्याने अश्लील व्यवहार – ही आजची खरी शाळेतील परिस्थिती आहे.
पूर्वी पालक मुलांच्या वेळो-वेळी वह्या, दप्तर, कंपास तपासायचे. आता मात्र पालकांच्या हातात मुलांच्या प्रगतीचं अंधार पडलंय. त्यांना मुलांच्या मोबाईलमध्ये काय आहे, हे माहिती नाही. बॅग तपासण्याऐवजी त्यांचं लक्ष फक्त ‘त्याने कोणता ब्रँडचा मोबाईल घेतला’ यावर असतं.
पालक शाळा, परीक्षा, शिक्षक याकडे फक्त जबाबदारी टाकून मोकळे होतात. मग मुलांच्या चुकीच्या वर्तनाला शिक्षक जबाबदार कसे?
अलीकडे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून फायटर , हल्ले, चाकू बाळगणे, व्हायरल व्हिडिओ तयार करणे अशा घटना घडू लागल्या आहेत. हे केवळ शिस्तीचे उल्लंघन नाही, तर सामाजिक अस्थिरतेचे लक्षण आहे. शिक्षक जर यावर बोलले, तर पुन्हा ‘शाळेने आमच्या मुलाला त्रास दिला’ असा आरोप.
एक काळ होता, शिक्षकांच्या घरासमोर मार्गदर्शनासाठी लोक उभे राहायचे. आज शिक्षकांचं मत विचारण्याऐवजी त्यांच्यावर संशय घेतला जातो. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते.
शिक्षकांचे निर्णय, निरीक्षण, सूचना – आता पालकांना ‘हस्तक्षेप’ वाटतात. शाळेतील शिक्षणव्यवस्था रोज टिकली की नाही, याची चिंता  आता शिक्षकांच्या मनात आहे.
शिक्षक हे समाज घडवतात. पण त्यांच्यावरच जर शिक्षण थोपवले गेले, तर समाजाची दिशा भरकटते. पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवायला हवा. शिक्षकांना संरक्षण हवे, अधिकार हवे, आत्मसन्मान टिकवण्यासाठी सामाजिक पाठबळ हवे.
शाळा म्हणजे केवळ पुस्तके शिकवायची जागा नाही, ती संस्कारांचे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठात जर शिक्षक असुरक्षित असतील, तर शिक्षण कुंठित होईल.
आज गरज आहे ती पालकांच्या मानसिकतेच्या बदलाची. मुलाला फक्त पैसे, मोबाईल, वस्तू देणं म्हणजे जबाबदारी नव्हे. पालकत्व म्हणजे संवाद, मार्गदर्शन आणि परिश्रमाची साथ.
शिक्षकांनी दिलेले संस्कार जर पालक पेलू शकत नसतील, तर ही पिढी स्वैराचार आणि दिशाहीनतेच्या गर्तेत जाणार. मुलांवर प्रेम जरूर करा, पण अंधप्रेम करणे शिक्षणाच्या विरोधात आहे.
आजचा लेख कुठल्याही व्यक्तिगत कोणत्याही शिक्षकाच्या किंवा शाळेच्या , गावाच्या बचावार्थ नव्हे, तर सद्यस्थितीत   समाजातील असंतुलन दाखवणारा आरसा आहे. शिक्षक हे अजूनही समाजाचा आधारस्तंभ आहेत. पण जर त्यांना आपण ‘अपराधी’ ठरवत राहिलो, तर उद्याची पिढी ‘अशिक्षित’ नसली तरी ‘अविचारी’ नक्की होईल.
म्हणूनच, शिक्षकांनी जबाबदारी घ्यावीच, पण पालकांनीही ती टाळू नये. शिक्षण ही एकत्रित प्रक्रिया आहे, शिक्षक आणि पालक दोघांनीही ती सन्मानाने आणि सहकार्याने पार पाडली पाहिजे.                        लेखक – सौ. शितल संदीप महाजन ( उप- शिक्षीका श्री गो से हायस्कूल पाचोरा Mo. 7588645908 )

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 24 मार्च सोमवार रोजी कार्यशाळा ; सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

0

Loading

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि विभागीय अधिस्विकृती समिती, नाशिक, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 मार्च 2025 रोजी “विकास पत्रकारिता: काल, आज, उद्या” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. व्ही. एल.माहेश्वरी राहणार आहेत. उद्घाटनानंतर प्रथम सत्रात “पत्रकारांसाठीच्या शासनाच्या विविध विकास योजना” या विषयावर नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक किरण मोघे तर “अधिस्विकृती पत्रिका निकष आणि प्रक्रिया” या विषयावर अहिल्यानगर येथील दैनिक लोकमतचे संपादक तथा विभागीय अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ” शासकीय योजना आणि विकास पत्रकारिता” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील तर ” विकास पत्रकारितेतील स्थित्यंतरे’ या विषयावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य असलेले नाशिक येथील दैनिक दिव्य मराठीचे संपादक अभिजीत कुलकर्णी, अहिल्यानगर येथील महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी विजयसिंह होलम, नाशिक विभागाचे टीव्ही नाईनचे ब्युरो चीफ चंदन पूजाधिकारी, नाशिक येथील दैनिक पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख किरण लोखंडे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो.एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप होईल. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ.सुधीर भटकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, ॲड. सूर्यकांत देशमुख यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोकन्यायालयाचा सुवर्णअवसर : पाचोरा न्यायालयात २२ मार्च रोजी विविध प्रकरणांच्या तडजोडीसाठी विशेष उपक्रम

0

Loading

पाचोरा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशावर आधारित, दिनांक २२ मार्च २०२५ रोजी पाचोरा येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती, पाचोरा मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या या लोकन्यायालयाचा प्रमुख उद्देश – नागरिकांच्या विविध वादग्रस्त व प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करून न्यायप्रवेश अधिक सुलभ व सुलभ बनविणे हा आहे.                                 या विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने नुकतीच पाचोरा न्यायालयात पूर्वसिद्धता बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती, पाचोरा चे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री जी. बी. औंधकर होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्री एस. व्ही. निमसे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तसेच पाचोरा तालुक्यातील ज्येष्ठ वकिल मंडळी उपस्थित होती. या बैठकीत लोकन्यायालयाच्या आयोजनाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.                                           राष्ट्रीय लोकन्यायालयात खालीलप्रमाणे विविध प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येणार आहेत:           १) नियमित दिवाणी दावे व दरखास्त. २)संक्षिप्त फौजदारी खटले (सामान्य स्वरूपाचे)                                             ३) धनादेश अनादर (चेक बाऊन्स प्रकरणे     ४)वैवाहिकप्रकरणे                                            ५) न्यायालयात प्रलंबित असलेल्या व कायद्याने तडजोड करण्यास पात्र अशा इतर फौजदारी व दिवाणी प्रकरणांचा समावेश                               ६) वादपूर्व प्रकरणे – जसे की बँकांची थकीत कर्जे, मोबाईल कंपन्यांशी संबंधित दावे, टेलिफोन/वीजबिल बाबत वाद       ७)ग्रामपंचायत करप्रकरणे – घरपट्टी व पाणीपट्टी यांसंदर्भातील प्रकरणे               याशिवाय, बँक, टेलिकॉम कंपन्या, वीज कार्यालय यांच्याकडून नागरिकांना सवलती व तडजोडीच्या प्रस्तावांसह संबंधित प्रकरणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.                                                          .लोकन्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेचा कालावधी, आर्थिक खर्च आणि मानसिक ताण कमी करून दोन्ही पक्षांसाठी तडजोड हा परस्पर हिताचा मार्ग आहे. अनेक वेळा थकीत बँक कर्ज, वीजबिलांचे दावे, चेक बाऊन्स प्रकरणे यांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते, परंतु लोकन्यायालयामुळे अशा प्रकरणांचा निकाल जलद व सर्वमान्य पद्धतीने होतो.        बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, दिनांक २२ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या या लोकन्यायालयात सहभागी व्हावे. नागरिकांनी आपली प्रलंबित वादविवादातील प्रकरणे किंवा वादपूर्व बाबी या न्यायालयात ठेवून न्यायप्रक्रियेत भाग घ्यावा, ही सुवर्णसंधी गमावू नये.                               लोकन्यायालय हे न्यायदान प्रक्रियेचे लोकाभिमुख स्वरूप आहे. न्यायालयीन खर्च व वेळ यांची मोठी बचत, तसेच दोन्ही पक्षांच्या समाधानासह न्याय मिळवून देणारा मार्ग म्हणजे लोकन्यायालय. अनेक वेळा लहान लहान कारणांनी वादविवाद गंभीर स्वरूप धारण करतात, परंतु अशा प्रकरणांचा निपटारा या उपक्रमातून सहज होतो. त्यामुळे समाजातील शांतता व सौहार्द राखण्यास लोकन्यायालय मोलाची भूमिका    बजावतअसते.                                           तालुका विधी सेवा समिती पाचोरा यांच्या वतीने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तडजोडीने करून न्याय प्रक्रियेस गती द्यावी. पाचोरा न्यायालयात होणाऱ्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. हे केवळ वैयक्तिक न्यायदानाचेच नव्हे, तर सामाजिक सलोख्याचेही पाऊल ठरेल.

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा २०२४-२५ च्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवड झालेल्या नाटकांची घोषणा केली.

स्पर्धेत २३ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. या नाट्यसंस्थांनी उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर केले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी खालील दहा नाटकांची निवड झाली आहे – शिकायला गेलो एक – (गौरी थिएटर्स), असेन मी नसेन मी – (स्क्रिप्टिज क्रिएशन्स), गोष्ट संयुक्त मानापमानाची – (नाट्यसंपदा कलामंच), वरवरचे वधुवर – (कलाकारखाना आणि शांताई), उर्मिलायन – (सुमुख मंच), नकळत सारे घडले – (नवनीत प्रोडक्शन्स), ज्याची त्याची लव्हस्टोरी – (एकदंत क्रिएशन्स), थेट तुमच्या घरातून – (प्रज्ञाकार आणि सोहम), मास्टर माईंड – (अस्मय थिएटर्स), सुर्याची पिल्ले – (सुबक)

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. अनिल बांदिवडेकर, पंढरीनाथ (पॅडी) कांबळे आणि भाग्यश्री चिरमुले यांनी काटेकोरपणे केले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल २०२५ मध्ये मुंबई येथे रंगणार आहे.

६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘मिडीआ’ नाटक प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘रुद्रेश्वर, गोवा’ या संस्थेच्या ‘मिडीआ’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यासाठी रु. ६ लाखांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी १७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत अन्य विजेते पुढीलप्रमाणे :-

द्वितीय पारितोषिक (रु. ४ लाख) : मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे यांच्या ‘मून विदाउट स्काय’ नाटकाला

तृतीय पारितोषिक (रु. २ लाख) : माणूस फाऊंडेशन, मुंबई यांच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ नाटकाला

विशेष पारितोषिके : दिग्दर्शन : प्रथम : गंगाराम नार्वेकर (मिडीआ), द्वितीय : मुकुल ढेकळे (मून विदाउट स्काय), तृतीय : डॉ. सोमनाथ सोनवळकर (द फिलिंग पॅराडॉक्स), नेपथ्य : प्रथम : सुमित शेलार (मून विदाउट स्काय), द्वितीय : सचिन गोताड (द फिलिंग पॅराडॉक्स), तृतीय : योगेश कापडी (मिडीआ), प्रकाश योजना : प्रथम : निखिल मारणे (मून विदाउट स्काय), द्वितीय : प्रसन्न निकम (इन्शाअल्ला), तृतीय : साईप्रसाद शिर्सेकर (द फिलिंग पॅराडॉक्स), रंगभूषा : प्रथम : एकनाथ नाईक (मिडीआ), द्वितीय : उल्लेश खंदारे (द फिलिंग पॅराडॉक्स), तृतीय : उल्लेश खंदारे (लिअरने जगावं की मरावं), संगीत दिग्दर्शन : प्रथम : बिपीन वर्तक (इन्शाअल्ला), द्वितीय : ऋषिकेश देशमाने (संगीत मतीविलय), तृतीय : कृष्णा देवा (डिनायल), उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक) : पुरुष कलाकार : अश्विन शर्मा (हमीदाबाईची कोठी), महेंद्र कुरघोडे (मोक्ष), यशवंत चोपडे (ब्लॅकन्ड इक्वेशन), श्रीराम जोग (हा खेळ पुन्हा खेळू), प्रणव सपकाळे (मून विदाउट स्काय), डॉ. सोमनाथ सोनवळकर (द फिलिंग पॅराडॉक्स), वैभव मावळे (वाघमाऱ्या जानकीराम), अमोल देशमुख (विक्रमाचा घातांक क्ष), महेश कोपरेकर (डिनायल), पंकज दिवेकर (इम्युनिटी : द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), स्त्री कलाकार : पूनम सरोडे (वेटलॉस), वैष्णवी काकोडे (मिडीआ), भावना चौधरी (ब्लॅकन्ड इक्वेशन), समृद्धी कोटगी (इम्युनिटी : द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), मानसी गोसावी (मून विदाउट स्काय), प्रेरणा खेडेकर (द फिलिंग पॅराडॉक्स), लक्ष्मी पिंपळे (सेलिब्रिटी), अक्षता सुर्वे (इन्शाअल्ला), श्रेयसी वैद्य (डिनायल), सिध्दी कुलकर्णी (वाघमाऱ्या जानकीराम).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : पुरुष कलाकार : मनिष उईके (व्रणिता), सुनील मळेकर (पाकीट), मंथन जाधव (इम्युनिटी : द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), मयूर पाटील (सितारों से आगे), उमेश चव्हाण (वाघमाऱ्या जानकीराम), स्त्री कलाकार : शब्दुली सुतार (दानव), मनुजा नार्वेकर लोकूर (मिडीआ), स्नेहा घडवई (लेबल), श्रद्धा शितोळे (द फिलिंग पॅराडॉक्स), हर्षाली बेलवलकर (सितारों से आगे).

दि. १७ फेब्रुवारी २०२५ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत रंगशारदा नाट्यमंदिर, बांद्रा, मुंबई येथे ही अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रविंद्र अवटी, संजय पेंडसे, प्रदीप वैद्य आणि शंकुतला नरे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात कलाकारांनी व संस्थांनी अधिक उत्तम नाट्यप्रयोग सादर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!