मेष – आज कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. कामात काटेकोरपणा आवश्यक आहे. जिद्दीने प्रयत्न केल्यास लाभ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक – ४ │ शुभ रंग – लाल
वृषभ – आर्थिक बाबतीत प्रगती दिसून येईल. जुने अडकलेले काम पुढे सरकेल. घरगुती वातावरणात सौहार्द राहील. मन शांत राहील. शुभ अंक – ७ │ शुभ रंग – हिरवा
मिथुन – नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यवसायातील प्रयत्न यशस्वी ठरतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक. लहान प्रवास संभवतो. शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा
कर्क – कामकाजात चांगली प्रगती होईल. शासकीय कामांत गती येईल. नातेवाईकांकडून मदत मिळेल. आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पांढरा
सिंह – नोकरीत पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता. मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल. सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल. शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी
कन्या – घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. संयमाने घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. शुभ अंक – २ │ शुभ रंग – राखाडी
तुळ – भागीदारीतून फायदा होईल. महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक – ६ │ शुभ रंग – निळा
वृश्चिक – अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय व नोकरीत नवे अवसर लाभतील. मित्रमंडळींच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. शुभ अंक – १ │ शुभ रंग – काळा
धनु – शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. मुलांशी संवाद वाढेल. धार्मिक व सामाजिक कामांत सहभाग लाभदायी ठरेल. शुभ अंक – ८ │ शुभ रंग – पिवळा
मकर – आर्थिक लाभाची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल. कुटुंबात सौहार्द राहील. शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी
कुंभ – प्रवासाचा योग आहे. मित्रांमुळे नवीन संधी मिळेल. आत्मविश्वासाने कामे हाताळल्यास यश निश्चित आहे. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – आकाशी
मीन – आध्यात्मिकतेकडे ओढा वाढेल. कामकाजात प्रगतीची चिन्हे दिसतील. घरात मंगलकार्याची चर्चा होईल. शुभ अंक – ७ │ शुभ रंग – जांभळा
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : साताऱ्यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकप्रिय कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हा निर्णय पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महामंडळाच्या चार घटक संस्था व संलग्न व समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध प्रस्तावांवर चर्चा केल्यानंतर सर्व सदस्यांनी विश्वास पाटील यांचे नाव एकमताने मान्य केले. मराठी साहित्यासाठी केलेल्या त्यांच्या बहुआयामी योगदानाचा विचार करता, अध्यक्षपदी त्यांची निवड अत्यंत योग्य ठरली.
विश्वास पाटील हे केवळ कादंबरीकार नाहीत, तर आय. ए.एस. अधिकारी म्हणूनही त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रखडलेले बांधकाम त्यांनी फक्त १४ महिन्यांत पूर्ण केले. शिक्षणात त्यांनी एम.ए. इंग्रजी साहित्य, कायद्याची पदवी संपादन केली असून, आय.ए.एस. अधिकारी पदावर कार्यरत असतानाही त्यांनी लेखनासोबत प्रशासनिक योगदानही दिले. त्यामुळे त्यांचे साहित्य सामाजिक, ऐतिहासिक तसेच प्रशासनिक वास्तवाचे प्रतिबिंब मांडणारे ठरते.
विश्वास पाटील यांचे लेखन वाचकांना इतिहास, समाज आणि मानवी जीवनाचे विविध पैलू अनुभवायला लावते. पानिपत कादंबरीत मराठ्यांच्या पराक्रमाची, धोरणांची आणि पराभवाची हृदयस्पर्शी कथा आहे, तर झाडाझडती कादंबरीत धरणग्रस्तांचे जीवन, जगणे-मरणे उलगडले आहे; या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२) मिळाला. चंद्रमुखी कादंबरीत प्रेमकथा सामाजिक वास्तवाशी जुळवून मांडली आहे, तर संभाजी कादंबरीत छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन दर्शन वाचकांना भावले. याशिवाय पांगिरा, लस्ट फॉर लालबाग, नागकेशर, गाभुळलेल्या चंद्रबनात या कादंबऱ्यांत सामाजिक विषय, शेती, पाणी, कामगारांचे हाल, लोक कलावंतांची दुर्दशा यांचा मार्मिक आढावा आहे.
त्यांच्या कादंबऱ्यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली असून इंग्रजीमध्ये पानिपत, संभाजी, महानायक वेस्टलँड अॅमेझॉनकडून तर झाडाझडती हॅचेटकडून प्रकाशित झाली. साहित्यकांनी त्यांचे योगदान जाहीरपणे कौतुक केले आहे – सुनील गंगोपाध्याय, अमिताव घोष आणि इंदिरा गोस्वामी यांचा समावेश आहे.
विश्वास पाटील यांना मराठी व भारतीय साहित्य क्षेत्रात सातऱ्याहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शिनी राष्ट्रीय पारितोषिक, नाथमाधव पारितोषिक, इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, गडकरी पुरस्कार व भारतीय भाषा परिषद पारितोषिक यांचा समावेश आहे.
साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान संमेलन होणार आहे. ग्रंथडिंडी उद्घाटनाच्या दिवशी ग्रंथ प्रदर्शन, कविकट्टा आणि बालकुमारांसाठी आनंद मेळावा आयोजित केला जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होईल. चार दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानांतर्गत), कोमल संमेलन, लेखक मुलाखती, कवी संमेलन, कादंबरी कार्यशाळा अशा विविध कार्यक्रम संमेलनात समाविष्ट आहेत. संमेलनात सहभागी होण्यासाठी संपूर्ण साहित्यक, पुरस्कारप्राप्त लेखक आणि माजी अध्यक्षांना पूर्वसूचना व विशेष निमंत्रण देण्यात आले आहे, जे वाचक आणि सहभागी लेखकांसाठी संमेलनाच्या तयारीसाठी योग्य कालावधीत करण्यात आले आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२५ च्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. या घणाघाती यशासह टीम इंडियाने सुपर ४ फेरीत दमदार एन्ट्री मारली आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी घेतली खरी, पण भारतीय गोलंदाजांच्या आघाताने त्यांची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने सॅम अयुबला शून्यावर बाद केले. लगेचच जसप्रीत बुमराहने मोहम्मद हारीसला (३) झटपट तंबूत धाडलं. फक्त दोन षटकांत दोन गडी गमावल्याने पाकिस्तान गडबडला आणि भारतीय चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला.
थोडा प्रतिकार करताना फखर झमान (१७) आणि साहिबजादा फरहान (४०) यांनी ३९ धावांची भागीदारी केली. पण अक्षर पटेलने ८ व्या षटकात फखरला झेलबाद करून पुन्हा पाकिस्तानचा पाया हलवला. त्यानंतर कर्णधार सलमान अली आगा (३) यालाही त्याने तंबूत पाठवले. यानंतर कुलदीप यादवच्या फिरकी जादूने पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरण अधिक वेगाने सुरू झाली. १३ व्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर हसन नवाज आणि मोहम्मद नवाज यांना बाद केले, तर पुढच्याच षटकात सेट फलंदाज फरहानलाही (४०; ३ षटकार, १ चौकार) माघारी धाडलं.
वरुण चक्रवर्तीने फहीम अश्रफला (११) बाद करत पाकिस्तानच्या डावावर शेवटची शिक्कामोर्तब केली. निर्धारित २० षटकांत पाकिस्तानचा डाव ९ गडी गमावून केवळ १२७ धावांवर आटोपला.
भारतीय गोलंदाजांत कुलदीप यादवने ४ षटकांत फक्त १८ धावांत ३ गडी टिपले आणि सामनावीर ठरला. अक्षर पटेलने २, तर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तुफानी सुरुवात केली. अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात चौकार-षटकार ठोकत दमदार सूर लावला. त्याने ३१ धावा केल्या. शुबमन गिल १० धावांवर बाद झाला. पण सूर्यकुमार यादवने निर्धारपूर्वक फलंदाजी करत ४२ चेंडूत नाबाद ५३ धावा ठोकल्या. तिलक वर्मा (३१) सोबत त्याने ५६ धावांची भक्कम भागीदारी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. तिलक बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला आणि त्यानेही नाबाद राहून सूर्यकुमारला उत्तम साथ दिली.
भारताच्या डावाने शंभरी गाठली तेव्हा विजयासाठी फक्त २८ धावा हव्या होत्या. अखेर सूर्यकुमार आणि शिवम या जोडीने संयमी पण ठाम खेळ करत १६ व्या षटकात लक्ष्य गाठले. भारताने ३ गडी गमावून १२८ धावा करून पाकिस्तानवर ७ गडी राखून घणाघाती यश मिळवले.
यूएईनंतर पाकिस्तानवरही दमदार विजय मिळवून भारताने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. आता १९ फेब्रुवारीला दुबईत ओमानविरुद्ध टीम इंडिया उतरणार असून विजयी हॅटट्रिकची संधी साधण्यासाठी सज्ज आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर येथे १९वे कविसंमेलन रंगले.
कविसंमेलनाची सुरुवात झाली ८ वर्षांच्या सत्यम विजयकुमार पवार यांनी सादर केलेल्या पोवाड्याने. छोट्या कलाकाराच्या कोवळ्या आवाजाने सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यावेळी त्याची आई आणि बहीण देखील उपस्थित होते, ज्यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले.
कविसंमेलन तीन सत्रांत नियोजनबद्ध आखणी केले गेले होते: शिक्षक दिनानिमित्त पहिले सत्र, नवरात्र-दसरा साजरे करण्याचे दुसरे सत्र, आणि तिसरे सत्र मुक्त विषयावरील कविता सादरीकरणासाठी राखीव ठेवले होते.
कार्यक्रमात आश्विनी सोपान म्हात्रे, वैभवी विनीत गावडे, उत्तम कुलकर्णी, विक्रांत मारुती लाळे, कल्पना दत्तात्रेय देशमुख, प्रा. स्नेहा केसरकर, कल्पना दिलीप मापूसकर, विवेक वसंत जोशी, धनंजय पांडुरंग पाटील, अनुकूल छाया माळी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपापल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
चंद्रकांत दढेकर यांनी “मनातील माणसं” या नरेंद्र चपळगावकर यांच्या पुस्तकातील काही अंशांचे सादरीकरण केले, तर नमिता नितीन आफळे यांनी “साधना” या शैला दातार यांच्या पुस्तकातील काही भाग प्रभावी नाट्यमय पद्धतीने सादर केला. यामुळे उपस्थितांना भावनिक आणि मनोवेधक अनुभव मिळाला. त्यांच्या प्रभावी अभिवाचनाने संमेलनाची शोभा वाढवली आणि रसिकांमध्ये कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
आस्वादक म्हणून प्रा. जगदीश संसारे, श्रीमती मणिबेन एमपी शाह कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, मुंबईच्या १२ विद्यार्थिनी, किरण जाधव व अशोक भाई नार्वेकर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. आश्विनी सोपान म्हात्रे यांनी आणलेला खाऊ आणि नमिता आफळे यांनी आणलेले चॉकलेट हा प्रसंग खास गोड करणारा ठरला.
कार्यक्रमात प्रा. जगदीश संसारे यांचा शाल व शब्दगुच्छ अर्थात पुस्तक भेट देऊन तसेच सत्यम विजयकुमार पवार आणि गीतांजली मोहन पोळ यांना विश्वभान प्रतिष्ठान, मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या वतीने मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम पद्धतशीरपणे आणि नियोजनबद्धरीत्या संपन्न व्हावा यासाठी विक्रांत लाळे, सनी आडेकर, वैभवी गावडे आणि नमिता आफळे यांनी विशेष सहकार्य केले. किरण जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या सांभाळली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी २०वे कविसंमेलन ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित होणार असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे सर्व साहित्यप्रेमींमध्ये आगामी कार्यक्रमाची उत्सुकता वाढली.
या कविसंमेलनाने साहित्यप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी कविता सादरीकरणे ऐकायला मिळाली आणि सर्व उपस्थितांचा अनुभव संस्मरणीय ठरला.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाचा सहकार भुषण व सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त संस्था ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई या प्रथम क्रमांकाच्या संस्थेची ४६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष जिजाबा पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक १४ सप्टेंबर, २०२५ रोजी “मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र, वासुदेव बळवंत फडके मार्ग (९० फुट रस्ता), मुलुंड (पूर्व), मुंबई” येथे उत्साही वातावरणात पार पडली.
सभेत मुंबै बँकेचे अध्यक्ष व गटनेते विधानपरिषद आमदार प्रविणभाऊ दरेकर उपस्थित होते. सभेची सुरुवात विठठल अडुळकर, उमा साखरे, सुनिल राउत, नंदकुमार महाडेश्वर आणि रतनसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते गणेशपूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
आमदार दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. याशिवाय संस्थेने सुरू केलेल्या फ्रँकिंग मशिनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकारी संस्था चालवणे कठिण असते, तरी ज्ञानदीप संस्थेने ६,५०० कोटींपेक्षा जास्त संमिश्र व्यवसाय यशस्वीरित्या केला आहे. ग्रामीण भागात सहकार चळवळीला अधिक वैभव मिळावे, असे त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेचे संस्थापक संचालक विश्वनाथ पवार यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल तसेच अध्यक्ष जिजाबा पवार यांची महाराष्ट्र शासनाचे नियामक मंडळ व पगारदार सहकारी पतसंस्था आदर्श उपविधी दुरुस्ती समितीमध्ये सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मागील सभेचे इतिवृत्त संचालक बाळकृष्ण पवार यांनी वाचले. आर्थिक वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांनी सादर करताना दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेचे एकूण सभासद ३,०५,६८२, वसुल भाग भांडवल रु. १५४ कोटी, राखीव व इतर निधी रु. ५२८ कोटी, थकबाकीचे प्रमाण ३.६३% आणि निव्वळ एन.पी.ए. ०% असल्याचे सांगितले. मार्च २५ अखेर एन.पी.ए. रु. १८१ कोटी होती. संस्थेचा स्वनिधी रु. ६३८ कोटी, ठेवी रु. ३,६७० कोटी, कर्जे रु. २,८८८ कोटी, संमिश्र व्यवसाय रु. ६,५५८ कोटी, गुंतवणूक रु. १,३२१ कोटी असून निव्वळ नफा रु. ४५.३९ कोटी झाला.
सचिव चंद्रकांत शिंदे, संचालक एकनाथ जगताप, रविंद्र केंजळे, विजय कासुर्डे, निवृत्ती मस्के, अनुप पवार, बाळासाहेब वांजळे, शुभम पवार आणि किरण तपकिरे यांनी विषय सुचीनुसार ठराव मांडले व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. संचालक हणमंत धिवार, संचालिका छाया शिंदे व दुर्गा वाघ तसेच कर्मचारी प्रतिनिधी संजय शिर्के उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक, संचालक विश्वनाथ पवार यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुधारीत आदर्श उपविधी स्वीकृतीबाबत वाचन केले. अधिकाधिक सभासद उपस्थित राहून प्रश्न विचारावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्ष जिजाबा पवार यांनी शाखेच्या व्यवसाय वृद्धीवर आधारित जागा खरेदी व विक्री, सामाजिक कार्य, ठेवी व कर्ज व्याजदरात बदल, निधी उभारणी व विनियोग धोरण तसेच मुलुंड येथील विग्नहर पतसंस्था विलीनकरण प्रस्ताव सादर करून सभागृहाची मान्यता घेतली. ज्ञानदीप ही फ्रँकिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक डिजीटल व्यवहारांच्या सेवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वार्षिक सभेने मंजूरी दिलेल्या ११% लाभांशाचे वितरण सभेनंतर करण्यात आले.
सभेचे सूत्र संचालन संचालक रविंद्र केंजळे यांनी केले, संचालिका दुर्गा वाघ यांनी आभार मानले. मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, विभागीय व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी सभेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पसायदानानंतर मा. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाट्य व चित्रपटसृष्टीत आपल्या संवेदनशील दिग्दर्शनशैलीने, नवोन्मेषी नेपथ्यरचनेने आणि मनस्वी कलाभानाने वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व नेपथ्यकार शिवदास घोडके यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजारानंतर रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली असून रंगभूमीने एक प्रगल्भ, वैचारिक आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या पार्थिवावर बेलापूर येथे सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
घोडके हे मुळचे नांदेडचे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (१९८१) त्यांनी शिक्षण घेतले व १९८२ मध्ये शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून परतल्यावर त्यांनी अविष्कार नाट्यसंस्थेचे महाभोजन तेराव्याचे हे नाटक रंगभूमीवर आणले. पुढील चार दशकांत त्यांनी दिग्दर्शन आणि नेपथ्य या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
मराठी चित्रपट चंबू गबाळे (१९८९) हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट ठरला. त्या काळातील मनोरंजनप्रधान प्रवाहातही त्यांनी सामाजिक आशय आणि कलात्मकतेचा आग्रह धरला. लक्ष्मीकांत बेर्डे, चित्तरंजन कोल्हटकर आणि मच्छिंद्र कांबळी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात गाजल्या. तसेच चरणदास चोर हे लोककथा नाटक त्यांनी आयपीटीए व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या सहकार्याने सादर करून प्रायोगिक नाट्यक्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली. नुकतेच त्यांनी इप्टासाठी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई कोणाची हे नाटक दिग्दर्शित केले. या नाटकातून शहरी वास्तव आणि सामाजिक विषमता उलगडण्यात आली होती. तर शेवंता जिती हाय यासारख्या अनेक नाटकांतून त्यांची प्रयोगशील वृत्ती प्रकर्षाने जाणवली.
मुंबई विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना नाट्यदिग्दर्शनाबरोबर नेपथ्यरचना व रंगमंच साकारण्याचे धडे दिले. विशेषतः मुलांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “थिएटरचे थेरॅप्यूटिक वापर” या संकल्पनेवर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. कांचनताई सोनटक्के यांच्या विशेष मुलांच्या शाळेत त्यांनी विशेष मुलांना नाट्यकलेचे धडे दिले. राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले.
त्यांच्या निधनानंतर नाट्यरसिक, सहकारी दिग्दर्शक आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली. नाट्यकर्मी विजय पवार यांनी लिहिले, “शिवदासजींचे योगदान आमच्यासाठी दीपस्तंभासारखे राहील. त्यांनी शिकवलेले धडे आणि रंगभूमीवरील त्यांचा दृष्टिकोन आमच्या कार्याला दिशा देत राहील.”
त्यांच्या पश्चात आई, पत्नी स्वप्ना आणि मुलगा गुलजार असा परिवार आहे. शिवदास घोडके यांचा कलाप्रवास केवळ दिग्दर्शनापुरता मर्यादित न राहता नाट्यकलेच्या सामाजिक पैलूंचाही शोध घेणारा ठरला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवरील एक महत्त्वाचा अध्याय संपला असून त्यांची अनुपस्थिती रंगभूमीवर कायमची जाणवणारी ठरेल.
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच लोककला, परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यांना आपल्याकडे सामावून घेतलं आहे. दशावतार हा चित्रपट त्याच प्रवाहातील परंतु वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारा आहे. कोकणातील लोकप्रिय लोकनाट्यप्रकार दशावतार हा इथे केवळ कलाप्रकार म्हणून दाखवलेला नाही, तर श्रद्धा, नैतिकता आणि समाजजीवनाशी नातं सांगणारा जिवंत वारसा म्हणून उलगडला आहे.
कथानकाचा गाभा बाबुली मिस्त्री (दिलीप प्रभावळकर) या दशावतारी नटाभोवती फिरतो. आयुष्य कलेला अर्पण केलेला हा कलाकार वयोमानामुळे दुर्बल झाला आहे; तरीही अवतारधारणेच्या ओढीपासून तो दूर जाऊ शकत नाही. प्रभावळकरांनी बाबुलीच्या डोळ्यांतली आसक्ती, संवादातील जिद्द आणि रंगमंचावर उलगडणारा रुद्रावतार इतक्या ताकदीने साकारला आहे की प्रेक्षक भारावून जातात.
त्यांचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) पित्याच्या हट्टाला तर्कशुद्ध प्रतिसाद देतो. काळजी, राग, प्रेम आणि असमंजसपणा यांचा संगम त्याच्या भूमिकेत दिसतो. काही ठिकाणी गती मंदावते, तरी पितापुत्र नात्याचा भावनिक ताण दोघांनीही प्रामाणिकपणे व्यक्त केला आहे.
इन्स्पेक्टर मायकेल डोकोस्टा (महेश मांजरेकर) गावातील गडद वास्तव आणि सत्तेचं प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या आवाजातली धार आणि देहबोली चित्रपटाला वेगळं टोक देतात. लक्ष्मण वाडेकर (भरत जाधव) नेहमीच्या विनोदी छटेत रंग भरतो; तर वंदना (प्रियदर्शनी इंदलकर) ग्रामीण स्त्रीजीवनाचा सच्चा स्पर्श देते. आबा तांडेल (रवी काळे) यांचा भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा ठसा जाणवतो. मॉंटी सरमळकर (अभिनय बेर्डे), मंत्री अशोक सरमळकर (विजय केंकरे) आणि पोलीस पाटील परब (सुनील तावडे) यांनी आपापल्या भूमिकेने लक्ष वेधलं आहे.
याशिवाय, स्थानिक कलाकारांनी साकारलेले अवतार नाट्यविशेष उल्लेखनीय आहेत. उदा. नरसिंह, वामन, वराह, राम-रावण युद्ध, तसेच मत्स्यावताराच्या प्रसंगांमध्ये स्थानिक रंगकर्मींचा अभिनय आणि नृत्यशैली प्रेक्षकांना खऱ्या लोकनाट्याचा अनुभव देतात. त्यांचा सच्चेपणा हा चित्रपटाचा प्राण आहे.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी लोकनाट्याची परंपरा आणि आधुनिक संघर्ष यांची सांगड उत्तम घातली आहे. त्यांची दृश्यरचना आणि अवकाशाचा वापर परिपक्वतेचं दर्शन घडवतो. विशेष म्हणजे, दिग्दर्शकाने केवळ नाट्य दाखवण्यावर भर न देता त्यामागची सामाजिक-धार्मिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. मात्र, पटकथेत काही दृश्यांचा ताण जाणवतो. गावकुसातील राजकारण आणि वादांवरील प्रसंग जर थोडक्यात घेतले असते, तर कथानक अधिक धारदार झालं असतं.
गीतकार गुरू ठाकूर यांनी साकारलेली डॉक्टरची व्यक्तिरेखा तसेच संवाद लेखन हा चित्रपटाचा ठळक पैलू आहे. संवादांमधील म्हणी, उपरोध आणि भावनिक टोक प्रेक्षकांना भिडतात. गाण्यांपैकी “आवशीचो घो माझ्या करू तेचा काय…” हे गाणं गावजीवनाच्या भावविश्वाला अगदी नेमकं पकडतं. तसेच भक्तिरसाने भारलेलं एक गाणं आणि युद्धछटेसाठी रचलेला वीररसप्रधान पद्यांश कथानकाला बळकटी देतात. तरी काही गाणी थोडी जास्त वेळ खेचली गेल्याने गती मंदावते.
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी पारंपरिक वाद्यांचा जिवंत वापर केला आहे. ढोल, ताशा, तुतारी आणि हार्मोनियम यांच्या सुरांनी लोककलेचं वातावरण अनुभवायला मिळतं. भक्तिरस, करुणा आणि वीररस या सर्व छटा संगीतामधून समरसून येतात. पार्श्वसंगीत काही ठिकाणी संवादांवर जड झालं असलं तरी एकंदर परिणाम प्रभावी आहे.
छायाचित्रकार देवेंद्र गोलतकर यांनी कोकणची निसर्गसंपन्नता पडद्यावर अप्रतिम पकडली आहे. हिरव्यागार रानातले देव-दानव युद्धाचे प्रसंग, समुद्रकिनाऱ्यावर उलगडलेलं मत्स्यावताराचं दृश्य आणि मंदिरे-रंगभूमीवरील प्रकाशयोजना हे विशेष उल्लेखनीय आहेत. निसर्ग हा इथे केवळ पार्श्वभूमी नसून कथानकाचा सह-नायक वाटतो. संकलक फैजल महाडिक यांनी कथानकाचा धागा साधारण नीट सांभाळला आहे, जरी काही ठिकाणी प्रसंगांचा अवधी अधिक वाटतो.
रंगभूषा, मेकअप आणि वेशभूषेच्या दृष्टीने चित्रपट ठाम उभा आहे. बाबुलीच्या रुद्रावतारातला मेकअप, वेशभूषा आणि मुकुट-आभूषणांची भव्यता प्रेक्षकांना भारावून टाकते. मात्र काही ग्रामीण पात्रांची वेशभूषा अधिक वैविध्यपूर्ण दाखवली असती, तर वास्तवदर्शी परिणाम अधिक गडद झाला असता.
चित्रपटाची सकारात्मक बाजू — प्रभावळकरांचा अभिनय, स्थानिक कलाकारांचा सच्चेपणा, संवादांची ताकद, गीतांची लोकसंगीताशी असलेली सांगड, छायाचित्रणाची मोहकता आणि दिग्दर्शनाची संवेदनशीलता. असं असलं तरी काही उणिवा — पटकथेत काहीसा सैलपणा, प्रसंगांचा ताण, गाण्यांचा अवधी आणि अधूनमधून जड वाटणारं पार्श्वसंगीत.
एकूणच दशावतार हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नसून सांस्कृतिक अनुभव म्हणून बघावा असाच आहे. कारण मोठ्या पडद्यावरच लोकनाट्याची भव्यता, कलाकारांची उर्जा, निसर्गाची मोहकता आणि श्रद्धेची तीव्रता पूर्णतेने अनुभवता येते. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघावा — तेव्हाच या कलेचं खरं सौंदर्य आणि आत्मा आपल्याला अनुभवायला मिळेल.
चित्रपट: दशावतार (२०२५) निर्माते: सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर लेखक-दिग्दर्शक: सुबोध खानोलकर संवाद- गीत: गुरू ठाकूर कलाकार: दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल आणि इतर संगीत: ए. व्ही. प्रफुलचंद्र छायांकन: देवेंद्र गोलतकर संकलन : फैजल महाडिक
मेष – कामकाज सुरळीत पार पडेल. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. नवे संपर्क लाभदायी ठरतील. आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक – १ │ शुभ रंग – लाल
वृषभ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रवास शक्य. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – हिरवा
मिथुन – मित्रांचा आधार लाभेल. काही जुनी अडचण दूर होईल. आर्थिक खर्च वाढेल पण मनःशांती मिळेल. संयम ठेवा. शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा
कर्क – कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन कामात गती येईल. जिद्दीने प्रयत्न कराल तर यश निश्चित आहे. आरोग्य चांगले राहील. शुभ अंक – ९ │ शुभ रंग – पांढरा
सिंह – प्रतिष्ठा वाढेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. कामकाजात गती येईल. आनंददायी वेळ घालवाल. शुभ अंक – ६ │ शुभ रंग – केशरी
कन्या – आर्थिक नियोजन करा. आरोग्याची थोडी काळजी घ्या. घरातील सदस्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. संयम ठेवा. शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी
तुळ – मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास शक्य आहे. मन प्रसन्न राहील. शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा
वृश्चिक – व्यवसायात नफा मिळेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. शुभ अंक – २ │ शुभ रंग – काळा
धनु – कामकाजात प्रगती होईल. शिक्षणात यश मिळेल. प्रवासाचे योग अनुकूल आहेत. सामाजिक मान मिळेल. शुभ अंक – ८ │ शुभ रंग – पिवळा
मकर – खर्च वाढेल परंतु लाभही होईल. घरातील वातावरण आनंददायी राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी
कुंभ – मित्र व सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवे करार व समझोते फायद्याचे ठरतील. शुभ अंक – ३ │ शुभ रंग – आकाशी
मीन – धार्मिक कार्यात मन गुंतवाल. घरगुती सुख वाढेल. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक आहे. मन शांत राहील. शुभ अंक – ६ │ शुभ रंग – जांभळा
पाचोरा – तालुक्यात उघडकीस आलेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्याने आता मोठे वळण घेतले असून या प्रकरणाची सर्व सूत्रे वरीष्ठ स्तरावरून थेट जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहेत. स्थानिक पातळीवर चौकशी व हाताळणी करताना अनेकदा अनियमितता व दुर्लक्ष दिसून आले होते. काही आरोपींना सोयीस्करपणे वगळणे, दोषी CSC सेंटर चालक व नातेवाईकांना व सासरच्या मंडळींना वाचवणे, संगणकातील माहितीशी छेडछाड करणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर बाबी चौकशीत आढळल्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील झाले आहे. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीतून थेट कागदपत्रे व ट्रांजेक्शन आधारे कोणते आरोपी खरोखर गुंतले आहेत हे स्पष्ट होणार असून दोषींना कायदेशीर शिक्षा टळणार नाही असे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे राज्यातील एक अत्यंत महत्त्वाची तपास यंत्रणा असून ती आर्थिक अनियमितता, फसवणूक, शासकीय निधीचा गैरवापर अशा गुन्ह्यांची तपासणी करते. ही शाखा थेट पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. प्राथमिक टप्प्यात तक्रारी व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर स्वतंत्र तपास अधिकारी नेमला जातो. संगणकीय माहितीचे फॉरेन्सिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा, शासकीय खात्यांतील फाईल्सची चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांची व लाभार्थ्यांची जबाब नोंदवणे अशी प्रक्रिया केली जाते. अनेकदा अशा प्रकरणात आरोपी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत असल्याने पुराव्यांचे पुनरुज्जीवन करणे शक्य होते. विशेष म्हणजे या प्रकरणात पाचोरा तहसील कार्यालयातून झालेल्या हाताळणीत अनेक बेकायदेशीर बाबी पुढे आल्या आहेत. चौकशी समितीने काही तलाठ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हितचिंतकांना व एजंटांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली आहे. तर काहींनी पुरावे नष्ट करीत सोयीस्कर शेतकऱ्यांच्या हक्काला बाजूला सारून सामान्य शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला आहे आणि स्थानिक स्तरावरील हस्तक्षेपाला येथे थारा उरणार नाही. कोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, कोणी संगणकातील माहितीशी छेडछाड केली, कोणी खोटे लाभार्थी तयार करून शेतकऱ्यांचा हक्क लाटला हे सर्व उघड होणार आहे. आरोपींची निश्चिती करून भारतीय दंड संहितेतील कलमे कमी-जास्त करणे, आरोपांची पूर्तता करणे हे काम आता आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारात येईल. या विभागाची चौकशी संथ गतीने सुरू असली तरी “चुकीला माफी नाही” यानुसार तिचा परिणाम ठोस असतो स्थानिक पातळीवरून आता कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाही, फक्त वरिष्ठांचे आदेश मिळतील आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण दोषी ठरतात आणि कोण आपले हात स्वच्छ असलेले सुटतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. शेतकरी अनुदानासारख्या जनहिताच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे आणि या तपासातून गुन्हेगारांना सहज जामीन मिळणे & दोषींना माफी मिळणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या अनुदानात अपहार झाला आहे अशा पिडीत शेतकऱ्यां पैकी कोणतीही आर्थिक तरतुद किंवा कोणताही खर्च न करता फक्त आवश्यक ती कागदपत्रे कोर्टात सादर करून आपला खाजगी वकील लावणे आवश्यक आहे तरच या लढ्याला यश शक्य आहे खेदाची बाब म्हणजे यासाठी अद्याप याप्रकरणी न्यायालयीन कामकाजासाठी शेतकरी किंवा त्यांना सोबत घेऊन त्यांचे हितचिंतक एकहीपुढे आलेला नाही याचा शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनी खेद व्यक्त केला आहे