Home Blog Page 70

आईच्या अस्थी शेतात टाकून वृक्षारोपण ; उत्तर कार्याच्या खर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

Loading

पाचोरा – अलीकडच्या काळात अंत्यविधी, दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य यासारखे धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता, ते मोठ्या प्रमाणात खर्च, दिखावा आणि प्रतिष्ठा यांचे माध्यम ठरत असल्याचे आपण पाहतो. अनेकदा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर विधींचे स्वरूप एवढे विस्तृत केले जाते की ते जणू एखाद्या भव्य समारंभाचे रूप घेतात. काही ठिकाणी तर मृत्यू नंतरचा हा काळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या तत्त्वावर साजरा केला जातो. अशा पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील (जगताप) कुटुंबीयांनी त्यांच्या वृद्ध आईच्या निधनानंतर खर्च, दिखावा, कर्मकांड टाळून समाजप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाटील परिवाराने त्यांच्या वयोवृद्ध आई कै. शांताबाई पांडुरंग पाटील (वय ८७) यांच्या निधनानंतर पारंपरिक विधींऐवजी सामाजिक व पर्यावरणपूरक कृतींचा अवलंब करत समाजासमोर नवा मार्ग दाखवला. त्यांच्या आईच्या अस्थी गावातील स्वतःच्या शेतात आणि बांधावर विसर्जित करून, त्या जागी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संगोपन व संवर्धन त्यांनी आईप्रती असलेल्या निष्ठा आणि ममत्वाच्या प्रतीक म्हणून करण्याचा संकल्प केला आहे. त्या वृक्षांमध्ये आईचे रूप पाहण्याची आणि तिच्या आठवणींचे जतन करण्याची त्यांची भावनिक भावना खरोखरच हृदयस्पर्शी आहे. कै. शांताबाई पाटील यांच्या तिन्ही मुलांवर ग्रामीण संस्कार असले तरी विचार मात्र पुरोगामी आहेत. मोठे चिरंजीव अर्जुन पाटील हे मुंबईत नोकरी करतात, तर पोपट पाटील गावातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. तिसरे चिरंजीव राजेंद्र पाटील हे पाचोरा एसटी बस आगारात मुख्य मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. ते पाचोरा मॉर्निंग वॉक व योगा ग्रुपचे अध्यक्ष असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. शिवकालीन संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. वास्तुशांती, विवाह, उत्तरकार्य यांसारख्या कार्यक्रमांमध्ये ते पारंपरिक शिवकालीन विधी पार पाडतात. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचे विचार आणि कार्य त्यांनी आपल्या जीवनात आत्मसात केले आहे. त्यांच्या प्रतिमांचे पूजन, अभंगांचे गायन आणि ग्रंथांचे वाटप याच्या माध्यमातून ते सातत्याने जनजागृती करीत असतात. कै. शांताबाई पाटील यांच्या निधनानंतर राजेंद्र पाटील यांनी आईच्या दशक्रिया, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य विधी पारंपरिक पुरोहितांशिवाय, शिवकालीन कार्यपद्धतीने स्वतः पार पाडले. यात त्यांनी प्रतिमा पूजन, पुष्पांजली व अभिवादन करून आईला आदरांजली वाहिली. त्यांनी कर्मकांडाऐवजी श्रद्धेने केलेली ही विधी समाजात नवसंस्कार रुजवणारी ठरली. पुढे या उत्तरकार्याच्या खर्चातून म्हणजेच अंदाजे २५ हजार रुपयांत कोणतीही मोठी मेजवानी किंवा ब्राम्हण भोजन न करता, त्या पैशातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते १५ ऑगस्टच्या दिवशी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेंसिली, वही कव्हर्स, पाटी, पाटीपेन्सिल यांसारखी उपयुक्त शैक्षणिक साधने देऊन त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात पाटील कुटुंबीयांना अतिशय समाधान लाभले. सध्या ज्या काळात सामाजिक प्रतिष्ठा, नातेवाईकांचे कौतुक आणि धार्मिक कर्मकांड यासाठी लाखोंचा खर्च केला जातो, त्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबीयांनी दाखवलेला संयम, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी ही केवळ अनुकरणीय नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी आईच्या निधनानंतर ज्या पद्धतीने पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसारखे उपक्रम हाती घेतले, तो खरोखरच भावनिक आणि समाजहिताची जाणीव करून देणारा ठरतो. या कुटुंबाने केवळ वैयक्तिक शोकपर प्रसंगात नव्हे, तर त्यातून समाजाला सकारात्मक संदेश देत, मृत्यू नंतरही काहीतरी विधायक करणे शक्य आहे हे सिद्ध केले आहे. मृत व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजोपयोगी कृती करून त्या आठवणींना दीर्घकाल टिकवता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाळण बुद्रुक येथील पाटील कुटुंब. त्यांच्या या कृतीस सलाम करत, समाजातील इतरांनीही अशा पद्धतीने आदर्श घ्यावा आणि मृत्यू नंतरचा काळ देखील विधायकतेने साजरा करावा, हीच काळाची गरज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन : पाचोरा व भडगाव तालुक्यात भाजपचा उपक्रम राबविण्याचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे आवाहन

0

Loading

पाचोरा – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी केले आहे. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाची संपूर्ण माहिती दिली. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकास्तरीय आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेस मधुकर काटे, गोविंद शेलार, बन्सीलाल पाटील, सुभाष पाटील, नंदू सोमवंशी, अमोल पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, राजेंद्र साळुंखे आणि शिवदास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रारंभी मधुकर काटे यांनी या महा रक्तदान शिबिराच्या नियोजनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मंडळामध्ये शिबिराची जागा निश्चित करण्यात आली असून, आवश्यक औषधे, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर व स्वयंसेवकांची नेमणूक पूर्ण झाली आहे. दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा आदर्श ठेवत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. रक्तदान हे श्रेष्ठतम दान समजले जाते आणि अनेकांना जीवदान देणारे कार्य असते. त्यामुळे या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पाचोरा तालुका व भडगाव तालुक्यातील भाजप मंडळांमध्ये म्हणजेच पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, पिंपळगाव हरेश्वर आणि कजगाव येथे एकाच दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिर होणार आहे. या ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी नियोजनबद्ध प्रचार आणि जनसंपर्क मोहिमा राबविण्यात येत आहेत. पाचोरा येथे हे शिबिर छत्रपती संभाजी महाराज चौकात होणार असून, येथे दरवर्षीप्रमाणेच उत्साही वातावरणात रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भडगावमध्ये पारोळा चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिबिर भरवले जाणार आहे. नगरदेवळा येथे मुख्य बाजारपेठेत, पिंपळगाव हरेश्वर येथे उषःकाळ पॉलिक्लिनिकमध्ये आणि कजगाव येथे मातोश्री हॉस्पिटलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि आरोग्य संस्था समन्वयाने काम करणार आहेत. दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले की, समाजाच्या आरोग्यसुरक्षेसाठी आणि आपत्कालीन गरजांमध्ये रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशा वेळी अशा महा उपक्रमांमधून रक्तसाठा निर्माण होतो आणि अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होते. भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजकार्यात आघाडीवर असलेली संघटना आहे. सामाजिक बांधिलकी जपत हे रक्तदान शिबिर राबवले जात आहे. पत्रकार परिषदेत गोविंद शेलार यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये एकत्रितपणा निर्माण होतो आणि समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित होते. सुभाष पाटील यांनीही आपल्या भाषणात रक्तदानासंदर्भातील वैद्यकीय महत्त्व विशद केले. त्यांनी नमूद केले की, रक्तदान केल्याने शरीरात कोणतीही कमजोरी येत नाही, उलट शरीर नवचैतन्याने भरून जाते आणि नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या वतीने विशेष समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या समन्वयातून प्रत्येक शिबिर ठिकाणी आरोग्य सुविधा, जनजागृती साहित्य, स्वयंसेवकांची तयारी आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. गावोगावी पोस्टर, बॅनर, सोशल मीडियाद्वारे प्रचार केला जात आहे. स्थानिक डॉक्टरांचे सहकार्य घेतले असून, प्रत्येक ठिकाणी योग्य प्रमाणात रक्त साठवणुकीसाठी उपकरणे उपलब्ध असतील. कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी इच्छुक व्यक्तींची पूर्वनोंदणी देखील सुरू केली आहे. या उपक्रमात महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असून, युवक मंडळे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रेरणेचा जागर करत पाचोरा व भडगाव तालुक्यात भाजपच्या वतीने राबविण्यात येणारे हे महारक्तदान शिबिर केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, आरोग्यविषयक जनजागृती आणि संघटनात्मक ताकद दाखवणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. रक्तदान हेच जीवनदान या उक्तीप्रमाणे या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन समाजसेवेचे व्रत पूर्ण करावे, असे आवाहन दिलीपभाऊ वाघ आणि उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

पाचोरा पिपल्स डिजिटलायझेशनच्या बळावर सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी संस्था ठरणार – अतुलभाऊ संघवी

0

Loading

पाचोरा – पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाने बँकेला आधुनिक युगाशी सुसंगत बनवत, डिजीटलायझेशनच्या माध्यमातून राज्यभर प्रभाव टाकण्याचा निर्धार केला आहे. बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अतुलभाऊ संघवी यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या भावी योजना सविस्तरपणे मांडल्या. यावेळी बँकेचे संचालक प्रशांत अग्रवाल, ॲड. अविनाश भालेराव, नंदुबालाजी पाटील, भागवत महालपुरे, डॉ. अनंत पाटील, राहूल संघवी आणि शरद पाटे हेही प्रमुख उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत बोलताना अतुलभाऊ संघवी म्हणाले की, “पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची सेवा ही केवळ मर्यादित परिसरापुरती न राहता, ती संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारावी, हा आमचा ध्यास आहे. यासाठी बँकेच्या आर्थिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करून, ग्राहकांना वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज डिजीटल व्यवहार हे काळाची गरज बनले असून, आमची बँकही या प्रवाहाशी सुसंगत होण्यासाठी कटिबद्ध आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, “अत्याधुनिक सुविधा, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्यूआर कोड पेमेंट प्रणाली, यूपीआय सेवा आणि ग्राहक केंद्रित तंत्रज्ञानाचा वापर हे आमच्या वाटचालीतील प्रमुख घटक असतील. ग्रामीण भागातील ग्राहकही या आधुनिक सेवेचा लाभ सहजपणे घेऊ शकतील, याची काळजी घेतली जाईल.”पिंपळगाव हरेश्वर हे तालुक्यातील मोठे आर्थिक केंद्र असून, येथील व्यापारी, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता, पाचोरा पिपल्स बँकेची नवी शाखा लवकरच तेथे सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संघवी यांनी केली. “आमच्या बँकेच्या सेवा ग्रामीण भागात सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. पिंपळगाव हरेश्वर शाखेच्या माध्यमातून आम्ही नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि त्या भागातील आर्थिक व्यवहार अधिक गतिमान करू,” असेही त्यांनी नमूद केले.संघवी यांनी सांगितले की, “डिजिटलायझेशनचा प्रभाव वाढत असून, आमच्या बँकेच्या यूपीआय कोडची अ‍ॅक्टीव्हेशन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच आमचे सर्व ग्राहक त्यांच्या मोबाईल फोनवरून सहज आणि सुरक्षितपणे व्यवहार करू शकतील. यासोबतच मोबाईल अ‍ॅप आधारित बँकिंग, एसएमएस अलर्ट सुविधा, थेट ग्राहक सेवा, २४ तास तांत्रिक सहाय्य अशी व्यवस्था देखील उभारण्यात येणार आहे.” बँकेच्या विविध शाखांमध्ये नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यंत्रणा बसवून सेवा जलद, पारदर्शक आणि त्रुटीविरहित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.या निवडणुकीत सभासदांनी अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वावर आपला ठाम विश्वास दाखवला असून, सहकार पॅनेलमधील सर्व १५ उमेदवारांनी विजय संपादन करत बँकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण पान लिहिले आहे. विजयी संचालकांमध्ये अतुलभाऊ संघवी, प्रशांतभाऊ अग्रवाल, डॉ. अनंतदादा पाटील, राहूल संघवी, ॲड. अविनाशभाऊ भालेराव, सौ संगीता शरद पाटे, सौ. संध्या प्रकाश पाटील ,नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील, भागवत महालपुरे, पवन अग्रवाल, विकास वाघ, पुखराज डांगी, ॲड स्वप्नील पाटील, भागवत महालपुरे यांचा समावेश आहे. या विजयानंतर नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाने बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवे संकल्प स्वीकारले असून, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता, सभासद हित हे मुख्य केंद्रबिंदू असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.अतुलभाऊ संघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बँकेच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणताना, आम्ही सभासदांच्या सूचना, अपेक्षा, तक्रारी यांचा अभ्यास करून त्या धोरणात्मक पातळीवर अंमलात आणू. आमचे उद्दिष्ट केवळ नफ्यापेक्षा, बँकेचा शाश्वत आणि सदस्याभिमुख विकास साधणे हे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आपली कार्यसंस्कृती ही एकात्मतेवर आधारित आहे. प्रारंभीपासून आम्ही सर्व स्तरांतील कर्मचारी, ग्राहक व संचालक यांच्यात एकमेकांवरचा विश्वास दृढ ठेवला आहे आणि यामुळेच बँकेची वाटचाल ठाम आणि यशस्वी झाली आहे. येणाऱ्या काळातही आम्ही ही परंपरा कायम ठेवत, प्रत्येक शाखेला सशक्त आणि नवतंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी प्रयत्न करू.”यावेळी उपस्थित असलेल्या संचालक प्रशांत अग्रवाल, ॲड. अविनाश भालेराव, नंदुबालाजी पाटील, भागवत महालपुरे, डॉ. अनंत पाटील, राहूल संघवी आणि शरद पाटे यांनी आपापले मनोगत व्यक्त करत सदस्यांचे आभार मानले. “निवडणुकीत आम्हाला भरघोस पाठिंबा देणाऱ्या सर्व सभासदांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. हा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही एकनिष्ठपणे काम करणार असून, बँकेची विश्वासार्हता अधिक दृढ करण्याचा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “बँकेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सभासदांचा हितसंबंध विचारात घेण्यात येईल. आम्ही कोणताही निर्णय घेताना एकमुखाने, सहकाराची मूल्ये जपत आणि पारदर्शकतेच्या तत्वावर चालत निर्णय घेऊ.”तसेच, बँकेच्या वित्तीय स्थैर्याबाबत बोलताना अतुलभाऊ संघवी यांनी सांगितले की, “सध्याच्या घडीला आमच्या बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. कर्जवसुली, ठेवींची वाढ आणि व्यवस्थापनातील शिस्तबद्धता यामुळे आम्ही स्थिर आर्थिक पाया तयार केला आहे. आता या आधारावरच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून आम्ही एक पायरी पुढे जात आहोत.” त्यांनी असेही सांगितले की, “मुदत ठेव योजना, लोन योजनांमध्ये सुलभता, महिला बचत खाते योजना, तरुणांसाठी विशेष सुविधा अशा अनेक नवनवीन सेवा सुरू केल्या जातील.”संघवी यांनी यावेळी बँकेच्या सामाजिक बांधिलकीबाबतही भाष्य केले. “केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादा न ठेवता, समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी उद्यमशीलता कार्यक्रम अशा स्वरूपात सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही आमची बँक पुढे असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पत्रकार परिषदेच्या शेवटी संघवी यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक, कर्मचारी आणि हितचिंतकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “बँकेचा पाया विश्वासावर उभा आहे आणि आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि सेवा हे त्रिसूत्री बाळगत काम करणार आहोत.”
उपसंहार:
पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ही निवडणूक केवळ सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली नाही, तर तिने सहकार क्षेत्रात नव्या दिशा दाखवल्या आहेत. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाने घोषित केलेल्या विविध विकासात्मक योजना, डिजिटलायझेशनचा दृढ संकल्प आणि पारदर्शक व सभासदाभिमुख प्रशासनाचे आश्वासन या सर्व गोष्टींनी बँकेच्या पुढील वाटचालीत आशादायी संकेत दिले आहेत. या त्रिसूत्रीवर आधारित धोरणांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाली, तर पाचोरा पिपल्स बँक ही महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील आदर्श संस्था ठरेल, यात शंका नाही.

रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्षस्थापना सोहळ्याची शिस्तबद्ध व प्रेरणादायी सुरुवात : रोटेरियन डॉ. मुकेश तेली नवे अध्यक्ष तर सचिव डॉ अजयसिह परदेशी, सामाजिक सेवा कार्याचा घेतला नवा संकल्प

0

Loading

पाचोरा – “सेवा हेच आपले व्रत” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला धरून रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणीच्या पदस्थापनेचा सोहळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, रोटरी सदस्य, मान्यवर पाहुणे, आणि पाचोरा-भडगाव परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे सन्माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे यांची उपस्थिती. त्यांच्या हस्ते रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी सचिवपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. रोटरीच्या नव्या वर्षाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थापना सोहळ्यात प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोटरी चळवळीच्या सामाजिक भानाविषयी विवेचन करताना शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित सेवाकार्याचा संदर्भ दिला. रोटरी क्लब पाचोरा-भडगावने सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या मनोगतातून समाजात रोटरीच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या संकल्पाची मांडणी केली. “रोटरी ही केवळ संस्था नसून एक चळवळ आहे. या चळवळीच्या प्रत्येक घटकाने वैयक्तिक जबाबदारीने समाजात बदल घडवण्यासाठी झटले पाहिजे,” असे ते म्हणाले. तर नवनिर्वाचित सचिव रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी संयोजक म्हणून आगामी वर्षात अधिक व्यापक, प्रभावी आणि सहभागी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. पवन पाटील यांनी केले. त्यांनी २०२४-२५ या वर्षात क्लबने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा दिला आणि सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, ग्रामीण शाळांना मदत, युवावर्गासाठी करिअर मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले.
तसेच मावळते सचिव रोटेरियन शिवाजी शिंदे यांनी संयोजन आणि नियोजन यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. क्लबच्या कार्यकाळातील अभूतपूर्व योगदानाबद्दल दोघांनाही यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.
या भव्य कार्यक्रमास डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर किरण देशमुख यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी अध्यक्षस्थापना सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करत रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
या कार्यक्रमाची यशस्वीता ही केवळ नवीन अध्यक्ष आणि सचिव यांच्या नेतृत्वानेच नव्हे, तर संपूर्ण रोटरी कुटुंबाच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झाली. या निमित्ताने रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अनेक सदस्य, माजी पदाधिकारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. विशेषतः भाईसाहब अग्रवाल निलेश कोटेचा, संजय कोतकर, चंद्रकांत पाटील, सौ. उदावंत मॅडम, भरत सिनकर, चंद्रकांतजी लोडाया, सुयोगभाई जैन, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. घनश्याम चौधरी, डॉ. पंकज शिंदे, डॉ. सिद्धांत तेली, प्रज्ञेश खिलोशिया, डॉ. किशोर पाटील आणि डॉ. विशाल पाटील,गिरीश दुसाने,तहसीलदार श्री बनसोडे साहेब ,मुख्याधिकारी साहेब श्री मंगेश देवरे ,पोलिस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब ,डॉ.नितीन जमदाडे ,डॉ.राहुल काटकर ,डॉ.तौसिफ खाटीक ,सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन तायडे ,डॉ.मुकेश राठोड ,डॉ.विजय पाटील,शिंदे इंटरनेशनल स्कूल चे प्रिंसिपल श्री विजय पाटील सर ,होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विशाल पाटील ,डॉ.हृषिकेश चौधरी ,डॉ.अभिषेक जगताप ,डॉ.संकेत विसपुते,डॉ .प्रवीण माळी ,डॉ.स्वप्नील पाटील,रावसाहेब पाटील सर , व इतर सर्व रोटेरियन महिला सदस्य तसेच सम्मानीय रोटेरियन सदस्य तसेच पदाधिकारी हे जळगाव अमरावती नाशिक व चाळीसगाव येथून ही उपस्तीत होते . या सदस्यांचा उल्लेख करत नव्या कार्यकारिणीने विशेष आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. या संपूर्ण सोहळ्याला अनुशासन, वेळेची पाळी आणि आदरयुक्त वातावरण या गोष्टींनी अधिकच भारदस्त रूप दिले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची आणि संगीताचा आस्वाद घेता येईल अशा संगीतमय वातावरणाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी जबाबदारी पार पाडणाऱ्या केटरिंग आणि डीजे टीमचेही मनापासून आभार मानण्यात आले.
आजचा दिवस रोटरी क्लब पाचोरा-भडगावसाठी एक सन्मानाचा, प्रेरणादायी आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे. अध्यक्ष रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या उत्साहवर्धक भाषणातून संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी देण्याची भूमिका मांडली आणि सेवाभावाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाने ‘सेवा हेच आपले व्रत’ या ब्रीदवाक्याला साजेसा भाव आणि कृती दिली. समाजात सकारात्मकता पसरवणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे, युवा पिढीला दिशा देणे आणि आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यांसारख्या मूलभूत क्षेत्रांत रोटरीची प्रभावी उपस्थिती दिसून येणे हेच खरे यश आहे. आजचा सोहळा ही पुढील सेवाभावाच्या वाटचालीसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे.
या अध्यक्षस्थापना कार्यक्रमातून नवीन कार्यकारिणीने एक नवा अध्याय सुरू केला आहे. या अध्यायाचे प्रत्येक पान समाजहिताच्या कार्याने भरलेले असेल, अशी खात्री सर्व उपस्थित रोटेरियन बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांचे आभार मानत, पुढील काळात रोटरीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.

स्वच्छतेच्या वाटचालीत पाचोरा नगरपरिषदेचा भरघोस यश: स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये ३ स्टार मानांकन मिळवत राज्यात १३६ वे स्थान

0

Loading

पाचोरा: केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ ही व्यापक आणि स्पर्धात्मक मोहीम राबविण्यात येते. या अभियानांतर्गत 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाचोरा नगरपरिषदेनेही आपला सक्रिय सहभाग नोंदवित, अत्यंत नियोजनबद्ध व सुसंगत पद्धतीने विविध निकषांवर काम करून लक्षणीय यश संपादन केले आहे. या सर्वेक्षणाचा अंतिम निकाल 17 जुलै 2025 रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये पाचोरा नगरपरिषदेस हागणदारीमुक्त ODF++ व कचरा व्यवस्थापन संदर्भातील उपाययोजनांमुळे थेट 3 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. एकूण १२,५०० गुणांपैकी प्रभावीपणे ८२९४ गुणांची कमाई करीत पाचोरा शहराने राज्यात १३६ वे, नाशिक विभागात ९ वे, तर देशपातळीवरील ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात १८६ वे स्थान मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ‘ब वर्ग’ नगरपरिषदांमध्ये पाचोरा नगरपरिषदेने ४ था क्रमांक मिळवला असून, संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गौरवास्पद ठरली आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, शहरातील प्रत्यक्ष स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, लोकसहभाग, आरोग्याशी निगडित उपाययोजना, ग्रीन व क्लीन झोन निर्मिती, प्लास्टिकमुक्त मोहिमा, जल व मलनिस्सारण व्यवस्थापन, डंपिंग ग्राउंडची कार्यक्षमता, तसेच नागरिकांचे सक्षमीकरण अशा सर्वच अंगांनी पाचोरा नगरपरिषद यांनी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. या कामगिरीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे व समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्येही एक वेगळाच अभिमान निर्माण झाला आहे. या यशाचा गौरव करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, “हे यश केवळ प्रशासनाचे नसून, शहरातील प्रत्येक नागरीकाच्या सहकार्याचे फलित आहे. स्वच्छता, आरोग्य, प्लास्टिकमुक्ती, ओला-सुका कचरा वेगळा करणे, डोअर टू डोअर कलेक्शन, सायकलच्या माध्यमातून जनजागृती, डिजिटल फीडबॅक अशा अनेक गोष्टींचे सातत्यपूर्ण पालन नागरिकांनी प्रामाणिकपणे केल्यामुळेच हे यश शक्य झाले. माझ्या नगरपरिषदेतील विशेषतः आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन या अभियानाची तयारी केली आणि त्याचा परिणाम आपल्याला या मानांकनाच्या रूपाने मिळाला आहे.” याचबरोबर त्यांनी पुढे आवाहन करताना सांगितले की, “हे यश थांबण्याचे ठिकाण नाही, तर पुढील वाटचालीची दिशा आहे. नागरिकांनी यापुढेही नगरपरिषदेस स्वच्छतेसह इतर अनुषंगिक बाबतीत सहकार्य करावे. आपण सर्वांनी मिळून पाचोरा शहराला आगामी काळात ५ स्टार मानांकन प्राप्त करून देण्यासाठी सज्ज होऊ या.” तसेच मुख्याधिकारी देवरे यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय, आरोग्य, सफाई व तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे, तसेच शहरातील स्थानिक सामाजिक संस्था, विविध शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, व्यापारी संघटना यांचे यथोचित आभार मानले. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत घेतले गेलेले विविध उपक्रम हे केवळ सरकारी कागदोपत्री पुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत दिसून आले. नगरपरिषदेने शहरात राबवलेल्या ‘डस्टबिनमुक्त शहर’, ‘स्वच्छ पाचोरा – सुंदर पाचोरा’, ‘फूटपाथ विक्रेत्यांचे प्रशिक्षण’, ‘प्रशासन तुझ्या दारी – स्वच्छता माझी जबाबदारी’, ‘शाळांमधील स्वच्छता स्पर्धा’, ‘वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण’ असे अनोखे उपक्रम नागरिकांनी स्वीकारले. ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेच्या आधारे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुशोभिकरण, तसेच पुनर्वापरयोग्य वस्तूंमधून आकर्षक वस्तू तयार करणे यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या सगळ्या उपक्रमांचे परीक्षण करताना केंद्र शासनाच्या मूल्यांकन समितीने समाधान व्यक्त केले होते. अशा प्रकारे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत पाचोरा नगरपरिषदेस ‘३ स्टार मानांकन’ प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब असून, यामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा अधिकच रोवला गेला आहे. भविष्यात याच धर्तीवर आणखी उत्तम कामगिरीसाठी शहर सज्ज आहे. नागरिकांनी केवळ ‘स्वच्छता’ ही सरकारची जबाबदारी न मानता ती ‘स्वतःची जबाबदारी’ समजून पुढे आले, तर पाचोरा शहराला राष्ट्रीय पातळीवर आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण होणार यात शंका नाही. हे यश म्हणजे केवळ मानांकन नसून, शहराच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात नगरपरिषदेने अधिकाधिक ‘स्मार्ट आणि स्वच्छ’ धोरण अंगीकारून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम सुरू ठेवावे, हीच अपेक्षा सर्व स्तरांमधून व्यक्त होत आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये पाचोरा नगरपरिषद प्रशासनाचे नेतृत्व, नागरी सहभाग, माध्यमांचे प्रबोधन, आणि सर्व विभागांचे सुसूत्र समन्वय हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतेसाठीचा हा प्रवास येथेच थांबू नये, तर दरवर्षी पुढे जाऊन ‘स्वच्छ पाचोरा – तेजस्वी पाचोरा’ या दिशेने वाटचाल व्हावी, हीच सर्वांची मनोकामना आहे.

जिंदादिल, हसतमुख आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपले : स्वर्गीय नितीनभाऊ शिवचंद राठी यांना श्रद्धांजली

0

Loading

पाचोरा शहरात एक अत्यंत मनमिळावू, सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच पुढे राहणारी, मदतीसाठी तत्पर आणि सेवाभावी वृत्तीची असामान्य व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेल्याचे दुःखद आणि काळजाला चटका लावणारे वृत्त… पाचोऱ्यातील ज्येष्ठ आणि जिंदादिल व्यक्ती म्हणून परिचित असलेले नितीनभाऊ शिवचंद राठी यांचे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी शुक्रवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पाचोरा शहरासह सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक आणि पारिवारिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पुत्र अनिकेत यांच्यासह संपूर्ण राठी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.नितीनभाऊ राठी हे केवळ नावापुरते नव्हे, तर आचार-विचार, कृती, संवाद आणि सेवाभाव यातून खऱ्या अर्थाने “राठी” कुटुंबाची प्रतिष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष उर्जा होती. कोणताही माणूस भेटला तरी त्याच्याशी आत्मीयतेने बोलणे, त्याच्या अडचणीत समजूतदारपणे मार्गदर्शन करणे आणि शक्य तितकी मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. ते नेहमी हसतमुख असायचे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असायचं – ज्यामुळे कोणीही त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकत असे.त्यांचे सामाजिक योगदानही उल्लेखनीय होते. कोणतीही समाजोपयोगी बाब असो, धार्मिक उत्सव असो वा एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीची गरज असो – नितीनभाऊ नेहमी सर्वप्रथम पुढे असायचे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि कोणतेही काम ही आपली जबाबदारी समजून पार पाडायचे. मदतीची अपेक्षा करणाऱ्याला ‘नाही’ हा शब्द त्यांच्या तोंडून कधीही ऐकायला मिळत नसे. समाजात आपले कार्य करताना त्यांनी कधीच प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही, तर आपल्या परोपकारी स्वभावातून अनेकांचे जीवन समृद्ध केले.पाचोऱ्यातील शिवचंद रामकिसन राठी कुटुंबातील नितीनभाऊ हे अनेक पिढ्यांपासूनची सामाजिक प्रतिष्ठा जपणाऱ्या घराण्याचे नाव होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या कष्ट, आदर्श आणि मूल्यांचा वारसा जपताना स्वतःच्या वागणुकीतून त्याला अधिक बळ दिले. वडिलांप्रमाणेच त्यांनीही आपल्या जीवनात कधीच आराम किंवा चैन शोधली नाही, तर सध्या राहून सर्वांच्या सुखासाठी झटणे, हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.माणुसकीचे दर्शन म्हणजे नितीनभाऊ राठी. त्यांच्या अंतर्मुख सहानुभूतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. वैयक्तिक आयुष्यात त्यांचा संयम, नीतिमत्ता, आणि सकारात्मक दृष्टिकोन हे गुण त्यांच्या मित्रपरिवारातही आदराने पाहिले जात. त्यांचा प्रत्येक मित्र, सहकारी, परिचित हे त्यांच्याशी असलेल्या आठवणींना आता डोळ्यांत अश्रू घेऊन उजाळा देत आहेत. त्यांनी एखादी गोष्ट एकदा मनाशी घेतली की ती पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेतली नाही. त्यांच्या भाषेत गोडवा होता आणि स्वभावात सौजन्य होतं.सद्यस्थितीत समाजात सहकार्य, आपुलकी, आणि माणुसकी कमी होत चालली असताना नितीनभाऊंसारख्या व्यक्तींचे अस्तित्व हे खूप मोठा आधार ठरत असे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघण्यासारखी नाही. समाजात कुणीतरी असा हवा जो हसत हसत दु:खातल्या माणसाच्या पाठीशी उभा राहील, नितीनभाऊ त्या प्रकारात मोडत होते.त्यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जिन्गारो बारावे तसेच पगडी समारंभ दिनांक २२ जुलै २०२५ मंगळवार रोजी निश्चित करण्यात आले असून, पगडी समारंभ सकाळी ११ वाजता & गंगाप्रसादी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. हा कार्यक्रम अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्र, सहकारी, व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी उपस्थित राहून नितीनभाऊंसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहणार आहेत नितीनभाऊंचे स्मितहास्य, त्यांच्या प्रेमळ आठवणी आणि माणुसकीची ओळख कायम पाचोऱ्याच्या स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज संपादक संदीप महाजन व परिवारा तर्फे प्रभ्रू चरणी प्रार्थना…

मी अनुभवलेला मिलिंद

0

Loading

पाचोरा – अपार कष्ट, प्रामाणिकपणा, निष्ठा, आत्मिक विश्वास आणि सातत्याने परिश्रमाची तयारी असलेला एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमच्या परिवाराचा हिस्सा मिली उर्फ मिलिंद भास्कर सोनवणे.( Mo 9403018877 ) पत्रकारिता या क्षेत्रात अवघड वाटा पार करत, स्वतःच्या मेहनतीवर आणि संयमावर विश्वास ठेवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तीने केवळ शब्दांची धारच नाही, तर जगण्याची एक वेगळी शैली समाजापुढे ठेवली आहे. आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे आणि सन्मानामागे आपल्या माता-पित्यांचे, बहिणीचे, नातेवाईकांचे आणि सर्व स्नेहीजनांचे मोलाचे सहकार्य व उपकार आहेत, याचे सदैव भान बाळगणारा हा युवक म्हणजे ‘मी अनुभवलेला मिलिंद’. अनेकांना आपली यशोगाथा सांगताना आपलेच योगदान मिरवायची सवय असते. पण मिलिंदच्या बाबतीत हे पूर्णपणे उलट आहे. तो नेहमीच म्हणतो, “माझे यश हे माझे नसून माझ्या घरच्यांचे, माझ्या मित्रांचे, आणि मला संधी देणाऱ्यांचे आहे.” असा नम्र स्वभाव, नम्रवृत्ती आणि आत्मपरीक्षणाची सवय असलेल्या मिलिंदने स्वतःचं आयुष्य केवळ निष्कलंक आणि निर्व्यसनीच ठेवलं नाही, तर समाजातील तरुणांसाठी एक आदर्श जीवनशैलीही निर्माण केली आहे. आज वाढदिवसाच्या या खास दिवशी त्याचे हे सारे गुण पुन्हा एकदा स्मरणात आणावेसे वाटतात. मिलिंदचे बालपण आर्थिकदृष्ट्या फारच आव्हानात्मक होते. कोणत्याही कामाची लाज न बाळगता, किंबहुना लोटगाडीवर हमालीचे काम करून वडिलांना हातभार लावला. पण अशा परिस्थितीतही त्याने कधीही मार्ग चुकवला नाही. अभ्यास, वाचन आणि लेखन यांची त्याला लहानपणापासूनच आवड होती. त्याचे लेखन हे मनातून उमटणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब होते. माझ्याकडे वृत्तपत्र मित्रांचे काम करीत असताना यातूनच पत्रकारितेकडे त्याचा कल वाढत गेला आणि मग त्याने एकदा अनेक वृत्तपत्रांच्या वितरण एजन्सी घेऊन या क्षेत्राला आपलेसे केले. स्थानिक समस्यांपासून ते सामाजिक विसंगतीपर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य करणारा, पण कुणाच्याही अपमानाशिवाय मुद्दा मांडणारा, असा तो निर्भीड पत्रकार म्हणून ओळखला जातो. मात्र पत्रकारितेचा मार्ग सोपा नसतो. चुकीचे आरोप, विरोध, सामाजिक दबाव यांचा सामना करताना त्याने कधीही तत्त्व सोडले नाही. अनेक प्रसंगी अपमानास्पद वागणूक मिळाल्यावरही त्याचा संयम ढळला नाही. त्याला नेहमी वाटते की, पत्रकार हा केवळ माहिती पुरवणारा नसून समाजाचा आरसा असतो. तो जर खोट दाखवेल, तर समाजात चुकीची दिशा निर्माण होईल. म्हणूनच, सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन गोष्टींवर तो कायम ठाम राहतो. मिलिंदचा आणखी एक गुण म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दलची अपार कृतज्ञता. तो आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्याचे श्रेय तो नेहमीच आपल्या आई-वडिलांना, बहिणीला व काकांना देतो. वडिलांनी लहानपणी केलेले कष्ट, आईची मायेची सावली यांच्यासोबतच घरात असलेले तीन शिक्षक काका, तलाठी पदावर कार्यरत असलेल्या काका यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, पाठबळ आणि जिवलग मित्रांचे मन:पूर्वक साथ – याला तो आपले भाग्य समजतो. प्रत्येक क्षेत्रात सहज यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कामात सातत्य, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी लागते. आणि मिलिंदने हे सर्व गुण आत्मसात केले आहेत. पण हे सांगताना तो स्वतःचा गौरव करत नाही, उलटपक्षी, तो स्पष्टपणे सांगतो की “मी आज पत्रकारितेत आणि माझ्या आयुष्यात जो काही यशस्वी आहे, त्यामागे जर कोणाचा खरा हात असेल, तर ते आहेत फक्त आणि फक्त संदीपभाऊ महाजन. त्यांनी माझ्या आयुष्यात क्षणा क्षणाला पाठबळ दिलं आहे.खरं सांगायचं तर,मी जीवन जगत असताना अनेकांच्या मदतीला धावून गेलो. कुणी अडचणीत असेल तर मदतीचा हात दिला, अनेकांना नव्या ओळखी, संधी, नातेसंबंध निर्माण करून दिले. उपकार मानावा, ऋण लक्षात ठेवावं, अशी साधी माणुसकीची अपेक्षा होती — पण अनुभव वेगळाच आला. ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांच्यासाठी केले त्यांच्यातील निम्म्याहून अधिक लोकांनी त्याची जाणीव ठेवण्याऐवजी पाठीतच खंजीर खुपसला. उपकाराच्या बदल्यात विश्वासघातच दिला. पण कदाचित माणुसकी, निष्ठा, कृतज्ञता हे गुण रक्तातच असावे लागतात.
वंदनीय भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व आशीर्वादाचा मिलींदवर प्रभावच आहे की, आज मिलींद सारखा ऋण मानणारा माणूस माझ्या आयुष्यात आहे. त्याच्या कृतीतून, नम्रपणातून आणि ऋणशीलतेतून हे समजतं — अजूनही काही माणसं सच्ची, मूल्यांवर जगणारी आहेत… आणि त्या माणसांसाठी हे सगळं करून झालं, याचं समाधान वाटतं!  मिलिंदच्या आयुष्यात त्याच्या सहचारिणी कविता हिचा मोलाचा सहभाग आहे. अत्यंत कठीण काळातही तिने साथ दिली, आधार दिला आणि धीर दिला. मिलिंद नेहमी सांगतो की “माझ्या यशात माझी सहचारिणी कविता हिची साथ खूप मोलाची मिळाली. तीने माझी होती त्या परिस्थितीत साथ दिली आणि अजूनही ती साथ अविरतपणे सुरू आहे.” कधीही प्रसिद्धीचा गर्व न बाळगता तो सर्वसामान्य माणसासारखाच राहतो. साधेपणा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे त्याच्या जीवनाचे मूलभूत तत्त्व आहेत. ‘निर्व्यसनी जीवन’ हा आजच्या तरुणांसाठी केवळ शब्द झाला आहे. पण मिलिंदने ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखवली आहे. त्याचे बोलणे, वागणे, उठणे-बसणे यामध्ये एक शिस्त आणि गंभीरपणा जाणवतो. व्यसनमुक्त राहून त्याने स्वतःचा आत्मसन्मान जपला, आणि अनेक तरुणांनाही त्या दिशेने चालायला प्रेरणा दिली. आपल्या मित्रमंडळींमध्ये तो नेहमीच सकारात्मक उर्जा निर्माण करतो. कुणी अडचणीत असेल, संकटात असेल, तर मदतीसाठी तो प्रथम पुढे सरसावतो. त्याचा स्वभाव मदतीचा आहे, पण कधीही त्या बदल्यात काही अपेक्षा न ठेवणारा. आजच्या सोशल मीडियाच्या युगात लोक खोटं दाखवून प्रसिद्धी मिळवतात, पण मिलिंदने मात्र प्रामाणिकपणे सत्य मांडून आपली जागा निर्माण केली आहे. त्याच्या बातम्यांमध्ये भावनात्मक ओघही असतो, पण त्यात तथ्यालाही तितकेच महत्त्व असते. स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा जनहित त्याला अधिक प्रिय आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दल लिहिताना मला अभिमान वाटतो की, अशा एका गुणवान आणि विचारशील पत्रकाराशी माझा परिचयच नाहीतर तो माझ्या परिवाराचा एक सदस्य आहे. ‘मी अनुभवलेला मिलिंद’ हा केवळ पत्रकार नाही, तर एक सजग नागरिक, सच्चा निष्कलंक, आदर्श पुत्र आणि निष्ठावान माणूस आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात यश, आनंद, आरोग्य आणि समाधान कायम असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मिलिंदसारख्या तरुणांनी जर समाजाच्या विविध स्तरांमध्ये आपली भूमिका पार पाडली, तर समाज परिवर्तनाचा वेग निश्चितच वाढेल. जेव्हा तो समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि विसंगतीवर आवाज उठवतो, तेव्हा त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. म्हणूनच त्याचे बोलणे अधिक प्रभावी वाटते. तो समाजासाठी जगतो, समाजाच्या प्रश्नांवर झगडतो, म्हणून समाज त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याची ही प्रामाणिक झुंज, सत्याची वकिली आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली ही आपल्या देशाच्या पत्रकारितेच्या भविष्यासाठी एक आदर्श आहे. त्याच्यासारख्या तरुण पत्रकारांमुळेच भारतीय पत्रकारितेचा खरा चेहरा टिकून आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ या. वाढदिवसाच्या निमित्ताने, या प्रेरणादायी जीवनयात्रेला अधिक यशस्वी टप्पे लाभोत! परिश्रम, संयम, निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या बळावर तू आणखी मोठ्या यशशिखरावर पोहोचावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
Dhyeya News
सा. झुंज
संपादक संदीप दा. महाजन व परिवार, पाचोरा, जि. जळगाव
Mo. 7385108510

पाचोरा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात साजरा होणार

0

Loading

पाचोरा – श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त, कृष्णापुरी पाचोरा येथील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे ११वे वर्ष साजरे होत असून, यंदाही भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या भक्तगणांच्या उपस्थितीत दिनांक १६ जुलै २०२५ रोजी बुधवारी उत्साही प्रारंभ झाला. हा सप्ताह दिनांक २३ जुलै २०२५ पर्यंत अखंड हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ‘संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा’ येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ह.भ.प. श्री. विकास महाराज खरदेकर यांच्या कीर्तनाने भक्तिप्रेमींना अध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला. या सप्ताहाचे मार्गदर्शक व प्रमुख संयोजक म्हणून ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. योगेश महाराज धामणगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध रित्या पार पडत आहेत. संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन असा दररोजचा नित्यक्रम असणार आहे. या सप्ताहात दिनांक १६ जुलै रोजी ह.भ.प. श्री. विकास महाराज खरदेकर, १७ रोजी ह.भ.प. श्री. गोपाल महाराज उंदीर खेडकर, १८ रोजी ह.भ.प. श्री. दिपक महाराज रणावण, १९ रोजी ह.भ.प. सौ.संध्याताई माळी,सुरत २० रोजी ह.भ.प. सौ वैशालीताई टाकळे ,चाळीसगाव २१ रोजी ह.भ.प. श्री. सावता महाराज मोहाडी, २२ रोजी ह.भ.प. श्री. योगेश महाराज,धामणगावकर दि 23 रोजी ह भ प गोविंद महाराज केकत निंभोरा यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनासाठी समस्त भजन मंडळांचे आणि सेवेकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पंचक्रोशीतील विविध महिला भजन मंडळ, पाचोरा भजन मंडळ, लक्ष्मीबाई वारकरी शिक्षण संस्था, आणि ग्रामस्थ महिला यांचे सहकार्य लाभले आहे सप्ताहाच्या समारोपदिनी, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी बुधवारी सकाळी ८ वा. सुरुवात सालाबादप्रमाणे पालखी सोहळा संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, कोंडवाडा गल्ली येथून पाचोरा शहरातून भव्य मिरवणुकीने निघणार आहे. यानंतर नविन विठ्ठल मंदिर, पेट्रोल पंप येथे महाप्रसादाची आयोजन केले असून पाऊस आल्यास कृष्णापुरी येथे मूळ मंदिरात समारोप होणार आहे.या सप्ताहानिमित्त ०३ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ‘विद्यार्थी गुणवंत सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन, डिप्लोमा व इतर परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या भव्य सप्ताहासाठी ह.भ.प.वासुदेवअण्णा महाजन (नगरसेवक), ह.भ.प. प्रकाश चौधरी देशमुख वाडी, ह भ प मधुकर महाजन ,ह.भ.प. कै बाजीराव महाजन यांच्या स्मरणार्थ संजय बा. महाजन, ह.भ.प. प्रकाश बा.महाजन यांचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माळी समाज व विश्वस्त पंच मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा यांनी पुढाकार घेतला असून, अध्यक्ष के.एस. महाजन सर, उपाध्यक्ष नाना सां.महाजन, सुनील अ.महाजन,गोरख र. महाजन, सचिव शरद बा.गिते सह सचिव कन्हैयालाल देवरे, यांचा समन्वय लाभलेला आहे. तसेच विश्वस्त मंडळात अध्यक्ष अध्यक्ष चिंधू मोकळ,सचिव श्रीराम( नाना) महाजन ,उपाध्यक्ष संतोष महाजन,सदस्य युवराज महाजन,अशोक महाजन
यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग लाभला आहे. अखंड हरिनाम सप्ताह हे श्रद्धा, भक्ती व सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनले असून, कृष्णापुरी परिसरात अध्यात्मिक चैतन्याची अनुभूती देणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी एक पर्वणी ठरत आहे.

पाचोऱ्यातील खुशी पटवारी हिची महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग झेप – गुणवत्तेत मानाचं स्थान मिळवत परिसराचं नाव उज्वल

0

Loading

पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारी एक अत्यंत आनंददायी आणि गौरवशाली बातमी समोर आली आहे. द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील आठवी इयत्तेतील कु. खुशी राजेश पटवारी हिने महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तावान विद्यार्थ्यांच्या यादीत आपली जागा पक्की केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास ३,८७,००० विद्यार्थ्यांपैकी खुशी पटवारी हिने उल्लेखनीय कामगिरी करत मेरिट यादीत आपले नाव चमकावले असून तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः पाचोरा शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही परीक्षा महाराष्ट्रभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शैक्षणिक संधी असते. या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणित आणि भाषा विषयातील आकलनशक्ती, तार्किक बुद्धिमत्ता, वाचनगती आणि सखोल समज यांची कसोटी लागते. अशा परीक्षेत मेरिट यादीत स्थान मिळवणे ही एक अत्यंत सन्मानाची आणि मेहनतीची गोष्ट असते. खुशीने ही गोष्ट आपल्या चिकाटी, अभ्यास, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर साकारली आहे. तिच्या या यशामुळे तिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दर महिन्याला आर्थिक मानधन मिळणार असून हे मानधन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. खुशीचा हा यशस्वी प्रवास केवळ तिच्या परीक्षेतील गुणांपुरता मर्यादित नसून, ती एक सर्वांगिण गुणवत्तेची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही तिने विविध स्तरांवरील परीक्षा, स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपल्या शालेय आयुष्यात अनेक गौरवशाली कामगिरी बजावली आहे. तिला विविध विषयांमध्ये विशेष गोडी असून, ती नेहमीच ज्ञानप्राप्तीसाठी उत्सुक असते. तिच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, आणि आत्मविश्वास हे तिच्या यशामागचे मुख्य घटक आहेत. खुशी पटवारी हिची पार्श्वभूमी देखील उल्लेख करण्याजोगी आहे. ती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील भुसार मालाचे व्यापारी सतीशशेठ यांची नात असून, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार राजेश पटवारी यांची ज्येष्ठ कन्या आहे. वडीलांच्या सामाजिक जाणीवा, वृत्तपत्र क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन हे तिच्या घडणीत मोलाचे ठरले आहे. ज्ञान, शिस्त, आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचे संस्कार तिला बालपणापासूनच लाभले आहेत. या यशाचा परिसरात अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी खुशीच्या या यशाचे कौतुक करत तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या शाळेतील शिक्षक, वर्गमित्र, शेजारी, नातेवाईक, तसेच पाचोऱ्यातील सर्वच नागरिक तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. विशेषतः विद्यार्थिनी असूनही अशा मोठ्या स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे हे इतर विद्यार्थिनींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. खुशी हिने याआधीही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत विविध सन्मान, प्रशस्तीपत्रे, आणि गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. त्यामुळे तिचे नाव आधीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध होतेच, मात्र शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश तिच्या नावाला अधिक प्रतिष्ठा आणि ओळख देणारे ठरले आहे. तिच्या शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापकांनीही सांगितले की, खुशी ही अत्यंत नम्र, शिस्तप्रिय, अभ्यासू आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी आहे. अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती सक्रीय सहभाग घेत असल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण घडण दिसून येते. तिच्या यशामुळे तिच्या शाळेच्या शिक्षणपद्धतीला आणि व्यवस्थापनाला देखील दाद मिळत आहे. द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल हे पाचोऱ्यातील एक नामांकित शिक्षणसंस्थान असून, येथील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. त्यामध्ये खुशीच्या यशाची भर पडल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. या यशाचे खरे श्रेय खुशीच्या अथक मेहनतीला, पालकांच्या प्रोत्साहनाला आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला जाते. तिने आपल्या नावाप्रमाणेच खरंतर संपूर्ण कुटुंबात आणि परिसरात आनंदाचा माहोल निर्माण केला आहे. तिचा हा प्रवास यशाकडून अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जाईल याची खात्री बाळगता येते. तिचे भविष्यातील स्वप्न काय आहे, कोणत्या क्षेत्रात ती पुढे जाईल हे येणारा काळच सांगेल, मात्र इतकं निश्चित की तिची जिद्द, कष्टाची तयारी आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा तिला नक्कीच शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात उत्तुंग शिखरांवर घेऊन जाईल. या गौरवशाली क्षणी तिच्या कुटुंबियांना, शिक्षकवर्गाला, शाळेला आणि परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा. पाचोऱ्यातील खुशी पटवारीसारख्या विद्यार्थिनींमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही आपले स्वप्न मोठे बघण्याची आणि ते सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळत आहे. खुशीचे हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून, ते संपूर्ण पाचोऱ्याचे, जिल्ह्याचे आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेचे प्रतीक आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप उपक्रम संपन्न

0

Loading

जळगाव – पद्मालय गेस्ट हाऊस येथे एक अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा उपक्रम नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व, लोकसंग्रही पालकमंत्री मा. ना.भाऊसो. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून त्यांच्या स्वीय सहाय्यक मा. नवलसिंगराजे पाटील यांच्या पुढाकाराने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू, ग्रामीण व अल्पसाधनांवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त व दर्जेदार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके, माहिती व मार्गदर्शन या त्रिसूत्रीची गरज अधिक आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मर्यादित असल्याने त्यांना हवी ती साधने सहज उपलब्ध होत नाहीत. हीच बाब हेरून, शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांना बळ देण्यासाठी मा. नवलसिंगराजे पाटील यांनी हृदयपूर्वक पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची श्रीमंती देण्याचे कार्य केले. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख शिवराज पाटील, आसोदा येथील उपसरपंच गिरीशभाऊ भोळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, अजय महाजन, अनिलभाऊ उमेश पाटील, अजय देशमुख यांच्यासह गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली.मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून समाजातील शिक्षणमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम गाजावाजाविनाच, अत्यंत मनःपूर्वक व सेवाभावाने राबविण्यात आला. पुस्तक वाटप करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद, आश्वस्ततेचे प्रतिबिंब आणि त्यांच्या स्वप्नांकडे वाटचाल करण्याचा निर्धार स्पष्ट दिसून येत होता. या प्रसंगी बोलताना मा. नवलसिंगराजे पाटील म्हणाले, “मा. गुलाबराव पाटील साहेब हे केवळ मंत्री नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सदैव आस्थेने विचार करणारे एक संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून आणि सामाजिक जाणिवेतून आम्ही हे पुस्तक वाटपाचे कार्य हाती घेतले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी दिल्यास ते नक्कीच यशस्वी होतात, ही आमची ठाम श्रद्धा आहे.” मा. ना. भाऊसो. गुलाबराव पाटील साहेब हे जळगाव जिल्ह्याचे अत्यंत सक्रिय, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पालकमंत्री म्हणून परिचित आहेत. विकासाच्या प्रत्येक वाटेवर त्यांची अष्टपैलू भूमिका असतेच, परंतु शिक्षणासारख्या मूलभूत आणि दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या क्षेत्रातही त्यांची असलेली आस्था प्रेरणादायक ठरते. जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी चालना दिली असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी कधीही कमी पडू दिलेले नाही. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी व्याकरण, राज्यसेवा व केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा निवडक व दर्जेदार संदर्भ ग्रंथांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सामाजिक जाणीव ठेऊन केलेले हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. नवलसिंह पाटील यांचा हा उपक्रम इतरांनीही अनुकरणीय समजून पुढे न्यावा.” उपसरपंच गिरीशभाऊ भोळे यांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगण्याचे आवाहन केले. “या पुस्तकांच्या रूपाने तुम्हाला यशाची चावी मिळाली आहे. आता ही संधी सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा,” असे ते म्हणाले. या उपक्रमामुळे गावातील वातावरण शिक्षणाभिमुख व सकारात्मक बनले. पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला, तर विद्यार्थी अधिक सजगतेने अभ्यासाला लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात गावपातळीवरून अशी प्रगल्भ आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलली जात असल्याने भविष्यात या भागातून अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून पुढे जातील, हे निश्चित. कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय पुन्हा एकदा मा. ना.
भाऊसो गुलाबराव पाटील साहेब यांच्याच सामाजिक जाणिवांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंमलात आणलेल्या योजनांना दिले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणासारख्या क्षेत्रात जेव्हा असे उपक्रम राबविले जातात, तेव्हा त्याचा थेट लाभ गावागावांतील तरुणांना, त्यांच्या कुटुंबांना आणि संपूर्ण समाजाला होतो. संपूर्ण कार्यक्रम संयमी, मनापासून आणि विधायक पद्धतीने पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, मिळालेली पुस्तके ही त्यांच्यासाठी नवी उमेद, नव्या स्वप्नांची वाट खुली करणारी देणगी असल्याचे सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!