Home Blog Page 97

विजेचा लपंडाव; पाचोऱ्यात जनतेचे संतप्त मनोस्वास्थ्य कोलमडले

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरात अचानक आणि अनियमितपणे खंडित होणाऱ्या विजेमुळे पाचोरेकर अक्षरशः हैराण झाले आहेत. नेमकी वीज केव्हा जाणार आणि केव्हा येणार, याचा कोणताही अंदाज न लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनचक्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसा अथवा रात्री कधीही विद्युत पुरवठा खंडित केला जातो. या लपंडावामुळे सामान्य ग्राहक, व्यापारी वर्ग, उद्योगधंदे, आरोग्य केंद्रे, विद्यार्थी, गृहिणी आणि वृद्धजन हे सर्वच त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणने वीज बंद ठेवण्याची निश्चित वेळ जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील विविध भागांत दररोज कोणत्याही प्रकारचा वेळापत्रक किंवा कारण न देता वीजपुरवठा बंद करण्यात येतो. बहुतांश वेळा ही वीज सकाळच्या सुमारास अचानक जाते आणि अचानक केव्हाही येते काही वेळा तर दुपारी अथवा संध्याकाळीच परत येते. त्यामुळे नागरिकांची सकाळी सुरू होणारी सर्व कामे थांबतात. चहा बनवणे, नाश्ता करणे, कपडे धुणे, ऑफिसला जाण्यापूर्वीची तयारी, मुलांची शाळेसाठी तयारी, ई-मेल पाठवणे, ऑनलाइन मिटिंग्स – हे सर्व काही अंधारात आणि वीज नसल्यामुळे अपूर्ण राहते. अनेक वेळा वीज गेल्यानंतर नागरिकांनी कॉल सेंटरवर किंवा स्थानिक वीज वितरण कार्यालयात संपर्क केला तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही.
“वीज येणार कधी याचे उत्तर कर्मचारी देऊ शकत नाहीत, आणि काही वेळांनी ती आपोआप येते. नागरिक काय आशेवर जगावे?” असा सवाल पाचोऱ्यातील रहिवासी उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, या विजेच्या लपंडावामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. प्रिंटिंग, फोटो स्टुडिओ, झेरॉक्स दुकानं, इंटरनेट कॅफे, किराणा दुकाने, मेकअप पार्लर्स, कापड दुकाने, लोखंडी व वेल्डिंग कारखाने आणि इतर सर्व व्यावसायिक ठिकाणी विजेच्या अनुपस्थितीत व्यवसाय करणं अत्यंत अवघड बनलं आहे.
याशिवाय, विविध वस्ती भागांतील नागरिकांनी सांगितले की, दररोज अचानक वीज गेल्याने पाणी पुरवठा व्यवस्थाही विस्कळीत होत आहे. काही भागांत बूस्टर पंपाच्या माध्यमातून टाकीत पाणी खेचले जाते. परंतु वीज नसेल तर पाणी उचलणंही शक्य होत नाही. त्यामुळे संपूर्ण वस्तीला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
गृहिणींचा त्रास आणखी मोठा आहे. स्वयंपाकाची कामं, वॉशिंग मशीन, मिक्सर, मिक्रोवेव्ह, ओव्हन, फ्रीज, ग्राइंडर, आटा चक्की यांसारख्या घरगुती वस्तूंवर घरातील अन्नधारणा अवलंबून असते. सकाळी नाश्ता तयार करताना वीज गेली की संपूर्ण कुटुंबाचा दिवस असह्य होतो. महिलांना काहीच नियोजन करता येत नाही. एका गृहिणीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सकाळपासून रात्रीपर्यंत वीज कधीही जाते, केव्हा येईल याची शाश्वती नाही. कधी कधी ती आली तरी काही मिनिटांत पुन्हा गायब होते. या सततच्या बिघाडामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंना धक्का बसतोय आणि आर्थिक नुकसान होत आहे.”
शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता परीक्षा, प्रॅक्टिकल्स, ऑनलाइन तास, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर, वर्कशॉप्स अशा अनेक गोष्टींसाठी वीजेची आवश्यकता असते. परंतु अचानक वीज गेल्यामुळे अभ्यासाचे सर्व नियोजन कोलमडते. काही वेळा विद्यार्थी मोबाईलचे फ्लॅश लावून किंवा टॉर्चच्या उजेडात अभ्यास करतात, परंतु ही गोष्ट डोळ्यांवर ताण आणते आणि एकाग्रतेवर परिणाम करते.
मध्यमवर्गीय व लघुउद्योगांचेही असेच हाल होत आहेत. अनेकांनी आपापल्या ऑफिसमध्ये व बँकामध्ये इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी बॅकअप ठेवले असले तरी त्यालाही मर्यादा असतात. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नियमित वीज ही अत्यंत आवश्यक बाब आहे. याउलट अनेक दुकानांत ग्राहक खरेदी करत असताना अंधार पडल्यामुळे ते बाहेर निघून जातात. काही ग्राहकांचा रोष दुकानांवर उतरतो आणि वाद निर्माण होतो. हे प्रकार वारंवार घडत असल्याने व्यापाऱ्यांची मानसिक अवस्था अस्वस्थ झाली आहे.
आरोग्य क्षेत्रही याला अपवाद नाही. पाचोऱ्यातील अनेक क्लिनिक्स, डायग्नोस्टिक सेंटर, छोट्या हॉस्पिटल्समध्ये वीज नसेल तर अत्यावश्यक तपासण्या करता येत नाहीत. सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी यांसारख्या सेवांवर याचा थेट परिणाम होतो. काही रुग्णालयांमध्ये जनरेटर असूनही डिझेलचा खर्च सतत वाढत आहे. “आम्ही रुग्णसेवा देतो आहोत, पण वीज नसल्यामुळे उपकरणं अर्धवट पडतात. यामुळे रुग्णांचंही हाल होतं,” असे एका डॉक्टरांनी सांगितले.
या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता, पाचोरेकर नागरिकांनी महावितरणकडे ठोस मागणी केली आहे की, “जर नियोजनबद्ध देखभाल, दुरुस्ती किंवा भार कमी करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करावाच लागतो, तर किमान त्याची वेळ व दिनांक जाहीर करावी.”
हे करणे महावितरणसाठी फार अवघड नाही, कारण कोणतीही तांत्रिक देखभाल ही अचानक लागत नाही. त्यासाठी आधीच नियोजन असते. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा केव्हा बंद राहणार आहे हे लोकांना कळवले तर नागरिक आपापले काम वेळेआधी उरकतील. व्यापाऱ्यांना व्यवसायाची तयारी करता येईल, गृहिणी स्वयंपाकाचे नियोजन करू शकतील, आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळेचे व्यवस्थापन करता येईल.
महावितरणच्या स्थानिक शाखेला वारंवार या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. बहुतेक वेळा “लाइनवर काम चालू आहे”, “लोड जास्त झालाय”, “मुख्य स्टेशनवर समस्या आहे”, “पुरवठा पूर्ववत करण्यात येईल” असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. पण वास्तवात नक्की काय चालू आहे हे कुणालाच कळत नाही. नागरिकांचा विश्वास आणि संयम या दोन्ही गोष्टींचा अंत आता होत चालला आहे.
सध्या पाचोरा शहरातच नव्हे, तर त्याला जोडलेल्या उपनगरांमध्ये, परिसरातील छोट्या गावांमध्येही हीच समस्या आहे. दिवसातून अनेक वेळा वीज गेल्याचे अनुभव सर्वत्र ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे वीज गेले तरी बिल मात्र वेळेवर भरावे लागते, तेही सुसूत्रतेने आणि दंडासहित. नागरिक विचारत आहेत, “जेव्हा सेवा विस्कळीत आहे, तेव्हा बिल व्यवस्थित भरायची जबाबदारी आमची, पण सेवा देण्याची जबाबदारी कोणाची?”
सध्याच्या या विजेच्या लपंडावामुळे जनता इतकी त्रस्त झाली आहे की, महावितरणविरोधात संताप वाढतो आहे. नागरिकसंख्या, वीजवापराचे प्रमाण, वाढती घरांची संख्या, व्यवसायांचे वाढते स्वरूप या सगळ्यांचा विचार करून ही यंत्रणा सक्षम केली गेली पाहिजे. पण उलट त्यात ढिसाळपणा, दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव दिसतो आहे.
यासाठी स्थानिक राजकीय पक्ष व मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वीज वितरण कार्यालयासमोर ठोस मागण्या मांडायला हव्यात. लोकशाहीत सेवा देणाऱ्या यंत्रणांनी पारदर्शकता ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांना नियमितपणे नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे.
शेवटी, नागरिकांचा एकच आक्रोश – “आम्हाला दिवसभर अंधारात ठेऊन कोणतं विकासाचं स्वप्न दाखवताय?”
झुंज वृत्तपत्र & ध्येय न्यूज, पाचोरा
– जनतेचा आवाज, प्रशासनापर्यंत पोहचवणारी आवाजवाट.

ऑप्रेशन सिंधुर: शत्रूच्या बंकरमध्ये भारताची सिंहगर्जना आणि नारीशक्तीच्या पराक्रमाची गगनभेदी साक्ष

Loading

ऑप्रेशन सिंधुर — ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, ती होती संपूर्ण भारताच्या आत्मसन्मानाची, राष्ट्राभिमानाची आणि युद्धकौशल्याची सिंहगर्जना. पाकिस्तानप्रेरित दहशतवाद्यांच्या भूमीत घुसून त्यांच्या बंकरांवर घाव घालणाऱ्या भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईने जगभरात भारताच्या लष्करी सामर्थ्याची, राजकीय इच्छाशक्तीची आणि धोरणात्मक अचूकतेची एक अमिट छाप उमटवली आहे. या मोहिमेने भारताला केवळ सुरक्षित केलं नाही, तर जगालाही ठाम सांगितलं की भारत आता फक्त आपल्या सीमेवर रक्षण करत नाही, तर शत्रूच्या घरात घुसून त्याच्या स्वप्नांनाही चुरडून टाकतो. ही लढाई गोळ्यांची नव्हती, ती होती भारताच्या सर्जिकल डिटरन्स धोरणाची विजयकथा.ऑप्रेशन सिंधुरच्या यशस्वीतेनंतर भारतीय लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दोन नामांकित महिला अधिकारी समोर आल्या — कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह. या दोघी अधिकारी केवळ आपली शौर्यगाथा मांडत नव्हत्या, तर त्यांचा आत्मविश्वास, सामर्थ्य आणि निर्णायक भाषा ही समोर बसलेल्या शेकडो पत्रकारांपेक्षा अधिक भारदस्त होती. त्यांचे उच्चार हे केवळ माहिती नव्हते, ते होते भारताच्या आत्मसन्मानाचे प्रतिध्वनी! कर्नल सोफिया कुरेशी — या भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअरमधील वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी १९९९ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथून लष्करात प्रवेश केला. बायो-केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतलेल्या आणि युद्धनीतीच्या सखोल अभ्यासात पारंगत झालेल्या कर्नल कुरेशी या २०१६ मध्ये “एक्सरसाइज फोर्स १८” या ऐतिहासिक बहुराष्ट्रीय युद्धसरावात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. काँगोमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये त्यांनी केलेली सेवा ही लष्करातील महिला नेतृत्वाचे प्रतीक बनली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ऑपरेशन सिंधुर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी केंद्रं भारतीय लष्कराच्या नियोजनबद्ध आणि अचूक हल्ल्यांतून उद्ध्वस्त करण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे या कारवाईदरम्यान निष्पाप नागरिकांना हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली. त्यांच्यासोबत व्योमिका सिंह या भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर होत्या. त्या हेलिकॉप्टर पायलट असून २०१९ पासून फ्लाइंग ब्रांचमध्ये स्थायिक आहेत. अभियांत्रिकी शिक्षणानंतर वायुसेनेत दाखल झालेल्या व्योमिका यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील अतिदुर्गम भागांमध्ये चेतक व चीता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक अवघड मोहीमा यशस्वी केल्या आहेत. २०२१ मध्ये त्यांनी २१,६५० फूट उंचीवर माउंट मणिरंग येथे महिला गिर्यारोहण मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भारतीय सशस्त्र दल संयमाने काम करतं, पण जर पाकिस्तानने पुढचे पाऊल उचलले, तर आम्ही पुन्हा त्यांचं अस्तित्वही नष्ट करू.” या दोघी अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंधुरचा सारांश मांडताना अशा आत्मविश्वासाने, दणकट भाषेत आणि देशप्रेमाच्या ओलाव्याने परिपूर्णतेने मांडला की उपस्थित प्रत्येक जण स्तब्ध झाला. शत्रूवर फक्त गोळ्या झाडण्यापेक्षा, त्याच्या मेंदूत भीतीचे बीज पेरणे किती आवश्यक असते हे या ऑपरेशनने दाखवून दिलं. केवळ सामरिक यश नव्हे तर मानसिक विजय मिळवणं हे नव्या भारताचं वैशिष्ट्य आहे.ऑप्रेशन सिंधुरमधील तांत्रिक अचूकता, गुप्तचर यंत्रणांचा पराक्रम आणि एकात्मिक सैन्य नेतृत्व ही या यशाची प्रमुख कारणं आहेत. नौदलाच्या विशेष कमांडो युनिट्सने अचूक सागरी मार्गाने घुसखोरी करत दहशतवादी तळांवर अशी कारवाई केली की पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनीही हादरून जावं. या ऑपरेशनमध्ये शत्रूच्या सायबर नेटवर्क्सवर तसेच त्याच्या संचार केंद्रांवर अचूक लक्ष्य करून संपूर्ण प्रणाली laminalize करण्यात आली. त्यांचं संप्रेषण तुटलं, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या संपूर्ण दहशतवादी यंत्रणेची मुळेच नष्ट झाली. या कारवाईवर देशातील काही तथाकथित पुरोगामी बुद्धिवाद्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेच नेहमीचे — जे जवानांचा मृत्यू झाला की मौन बाळगतात, पण जेव्हा शत्रूवर प्रतिघात होतो तेव्हा “मानवाधिकार”, “संविधान”, “संघीयता” असे ढोंगी शब्द उगारतात. यांचं असं म्हणणं आहे की युद्ध थांबावं, पण युद्धासाठी खतपाणी घालणाऱ्या शत्रूवर कोणीही आवाज उठवू नये! यांचं नेहमीचं धोरण म्हणजे — शत्रूचा बचाव कर, भारताचं नाव बदनाम कर, आणि तेच पत्रकारितेचं किंवा बुद्धिवादाचं गोंडस चिलखत घालून स्वतःचं पाप लपव. हे लोक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या नावाखाली देशविघातक अजेंडा चालवतात. पण ऑपरेशन सिंधुरने अशा सगळ्या विचारसरणींना तोंडघशी पाडलं आहे.आज भारतीय जनता राष्ट्रभक्तीच्या मार्गावर एकवटली आहे. सोशल मीडियावरून, गावातल्या चौकात, महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, शाळेच्या प्रार्थनात आणि सैनिकांच्या बूटांखालून एकच गर्जना ऐकू येते — भारत आता थांबणार नाही! ऑपरेशन सिंधुर ही घोषणा आहे — की जर कोणी भारताच्या शौर्याला आव्हान दिलं, तर त्याचे अस्तित्वच इतिहासात मिटवले जाईल. आता भारत केवळ सैन्यानेच नाही, तर मानसिक, आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवरही विजय मिळवत आहे. या ऑपरेशनचे एक वेगळे आणि शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणजे यात नेतृत्वाची सूत्रं दोन महत्त्वाच्या महिला अधिकाऱ्यांकडे होती. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत स्त्रीशक्ती हे आता फक्त औपचारिकतेपुरते प्रतिनिधित्व न राहता निर्णायक नेतृत्वाची नवी दिशा बनली आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन अधिकारी म्हणजे देशातील प्रत्येक तरुणीला सांगणारा आदर्श आहेत — “सीमा ही मर्यादा नाही, ती संधी आहे!” ऑप्रेशन सिंधुर केवळ सैनिकी विजय नाही, तो आहे राष्ट्रीय उर्जेचा स्फोट! हा स्फोट एका नवीन भारताच्या जन्माची घोषणा आहे. हा भारत आता मागे हटणारा नाही. हा भारत आता गुलामीच्या आठवणींमध्ये अडकलेला नाही. हा भारत आता शांततेच्या ढोंगाला बळी पडणारा नाही. हा भारत आता रणभूमीवर लढतो, आणि रणांगणाबाहेरही विचारांच्या युद्धात विजयी होतो. शेवटी, ज्यांनी भारतमातेच्या चरणावर रक्त वाहिलं त्यांना वंदन. ज्यांनी शत्रूंना उखडून फेकलं त्यांना सलाम. आणि ज्यांनी देशाच्या पराक्रमाला विरोध केला त्यांना नम्रतेने पण ठामपणे एकच उत्तर — “तुमचं युग संपलं आहे, भारताचा काळ सुरू झाला आहे!”                                        “यावर मला कवितेच्या खालील काही ओळी सुचल्या आहेत”

“जेव्हा माझ्या सिंदूरावर आच येते…”

मी सीता आहे…
त्यागाचं प्रतीक, मर्यादेची मूर्ती,
प्रत्येक अग्निपरीक्षेत जळले,
पण कुणालाही दोष न देता, मौन पाळले .कुलमर्यादा जपली.                                          मी सरस्वती आहे…
शब्दसाधनेची तेजस्विनी, ज्ञानाची धार,
माझ्या वीणेच्या प्रत्येक सुरातून,
जगाला विवेकाचा मार्ग दाखवला.              पण समजू नका — हे मौन माझं दुर्बलपण नाही!
ही शांतता माझा पराभव नाही — ती माझी सजगता आहे!
जेव्हा माझ्या सिंदूरावर कुणी आच आणेल,
तेव्हा मी दुर्गा बनेन — जळणाऱ्या ज्वाळेची उग्रमूर्ती!                                                  मी त्या प्रलयाची साद बनेन,
जी अन्यायाच्या गाभ्यालाच हादरवेल,
मी त्या हाताची ताकद बनेन,
जो अत्याचाराच्या गळ्याला गच्च पकडेल!  कारण माझा सिंदूर — केवळ सौंदर्य नाही,
तो माझा आत्मसन्मान आहे, माझं अस्तित्व आहे,
तो माझ्या पतीचा जीवनसूत्र नाही फक्त,
तो माझ्या ओळखीचा तेज आहे, माझ्या श्रद्धेचीज्योतआहे!                                         मी कधी शांत, कधी तेजस्विनी,
मी कधी करूणा, कधी क्रांतीची आग,
मी स्त्री आहे — या सृष्टीच्या प्रत्येक निर्मितीची शिला,
आणि जेव्हा माझ्या अस्मितेला ललकार दिला जाईल,
तेव्हा इतिहास पुन्हा लिहिला जाईल —
मी पुन्हा दुर्गा बनून रणभूमीत उतरेन,
सिंदूराच्या प्रत्येक थेंबातून अग्नी वर्षाव करीन!

शाश्वत शेतीचा नवा आराखडा : पाचोऱ्यात उद्या खरीप हंगाम 2025 साठी तालुकास्तरीय नियोजन व मार्गदर्शन कार्यशाळा – मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

Loading

पाचोरा –– महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 पूर्वतयारीसाठी भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील भूषवणार असून, हा उपक्रम फळरोप वाटिका, गिरड रोड, पाचोरा येथील कृषि विभागाच्या आवारात संपन्न होणार आहे. शासनाच्या शेतकरीहितदृष्टीकोनातून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची ही मालिका यंदा नव्या दमाने सुरू होत आहे. सन 2024–2025 या वर्षात कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा, त्यामधून साध्य झालेली उद्दिष्टे, शेतकऱ्यांचा लाभ आणि पुढील खरीप हंगाम 2025 साठी आखण्यात आलेल्या नव्या धोरणांची माहिती या कार्यशाळेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये विविध मोहिमा, प्रात्यक्षिके, सजीव स्टॉल्स, शेतमाल प्रक्रिया उद्योगांचे प्रात्यक्षिक, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे सहभाग, मार्गदर्शन सत्र व कृषी तज्ज्ञांचे संवाद सत्र या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
या कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान, साधने, आधुनिक शेतीमाल उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन व संधी यांची सखोल माहिती मिळणार असून, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, खाजगी निविष्ठा वितरक आणि सूक्ष्म सिंचन कंपन्यांचा प्रत्यक्ष सहभाग यात असेल.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, उपविभागीय कृषि अधिकारी किशोर मांडगे, कृषि विकास अधिकारी विजय बनसोडे, तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये डॉ. हेमंत बाहेती, डॉ. गिरीश चौधरी, इंजि. वैभव सुर्यवंशी, डॉ. शरद जाधव (कृषी विज्ञान केंद्र, जळगाव) हे तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. बीजप्रक्रिया, माती नमुना, उगवण चाचणी, जैविक निविष्ठा, BBF तंत्रज्ञान, जलसंधारण, फळबाग लागवड, गुलाबी बोंडअळी नियंत्रण आदी विषयांवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके ही या कार्यशाळेचा केंद्रबिंदू असणार आहेत.
या आधी 4 मे 2025 रोजी तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषी विभागातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, सूक्ष्म सिंचन विक्रेते यांची उपस्थिती होती. सविस्तर नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, प्रात्यक्षिकांचे व्यवस्थापन यावर या बैठकीत सखोल चर्चा झाली.
कार्यशाळेच्या आयोजनामध्ये PMFME योजनेअंतर्गत नवउद्योजकांचा सहभाग घेतला जाणार असून, त्यांनी उभारलेले स्टॉल्स आणि त्यांचे अनुभव शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधी, शासकीय मदतीच्या योजना आणि उत्पादन क्षमतेवाढीचा मार्ग यावरही चर्चा होणार आहे.
प्रदर्शन विभागात जैन इरिगेशन, निर्मल सीड्स, IFFCO, महाधन, बेल्जियम फर्टिलायझर, महाबीज, कृषि विज्ञान केंद्र व अन्य कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, येथे रासायनिक आणि जैविक निविष्ठा, नॅनो तंत्रज्ञान, जैविक प्रक्रिया, स्पिरुलिना उत्पादन अशा विविध संकल्पनांचे प्रात्यक्षिक व माहिती सादर केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे बोधवाक्य “शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजारव्यवस्था म्हणजेच आदर्श बाजारव्यवस्था” हे असून, या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांमध्ये बाजार व्यवस्थापनाबाबत स्वयंपूर्णतेचा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न आहे.तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पाचोरा व आत्मा यंत्रणा यांच्या समन्वयातून आयोजित या नावीन्यपूर्ण उपक्रमात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाचा नवा शिखर – सौ. जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्ज्वल निकालाने शिक्षण संस्थेचा सन्मान वृद्धिंगत

Loading

भडगाव : शिक्षण ही केवळ ज्ञानाची देवाणघेवाण नसून ती नव्या पिढीच्या जीवनदिशेला आकार देणारी शक्ती आहे. आणि हीच शक्ती प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या मनात व भविष्याच्या वाटेवर जागवण्याचे मोलाचे कार्य पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहे. याच संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेले सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग यांनी सन २०२५ च्या बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक निकाल साध्य करून संस्थेची यशस्वी परंपरा पुढे नेली आहे. यंदा शालेय निकाल ऑनलाइन जाहीर होताच संपूर्ण परिसरात समाधान व अभिमानाची लहर उमटली. शास्त्र शाखेचा निकाल तब्बल ९८.५०%, कला शाखेचा ८९.५०% तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८७.५०% इतका लागल्याने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेचा आणि शैक्षणिक बांधिलकीचा एक अभेद्य ठसा उमटला आहे.
शास्त्र शाखा
या विभागात – गौरव संदीप सोनवणे याने ८७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गौरव हा अभ्यासू, शांत, आणि समर्पित विद्यार्थी असून त्याची ही घोडदौड त्याच्या चिकाटीचे उदाहरण आहे. त्याच्यापाठोपाठ श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर आदित्य योगेश चिंचोले याने ८५.६७% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ही तिघंही विद्यार्थी शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत.
कला शाखा
या विभागात – चैताली भीमराव मोरे हिने ८८.८३% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. चैतालीच्या गुणांचा आलेख हा शालेय जीवनात सततच वरच्या पातळीवर राहिला आहे. तिच्या यशामागे तिची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा आहे. मेघा नरेंद्र पाटील हिने ८२.१७% गुण मिळवून द्वितीय तर अंकुश बाळकृष्ण माळी याने ८०.८३% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
या शाखेअंतर्गत तीन वेगवेगळ्या तांत्रिक विषयांत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
अकॉउंटिंग विभागात प्रतीक्षा गणेश पाटील हिने ६९.६६% गुणांसह यश मिळवले.
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात किरण अनिल पवार याने ६८.८३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला तर दुसऱ्या गटात भूषण ज्ञानेश्वर पाटील याने ६५.१४% गुणांसह प्रथम स्थान प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सदर निकालाची अधिकृत घोषणा होताच, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, मानद सचिव दादासो ॲड महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन आबासो दत्ता पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो विनय जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे चेअरमन नानासो विजय देशपांडे, तसेच सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक अजय अहिरे, उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षक शरद महाजन, पर्यवेक्षिका छाया बिर्‍हाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधुभगिनींच्या मार्गदर्शनामुळेच आज विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालवले जाणारे उपक्रम, तांत्रिक प्रशिक्षण व नैतिक मूल्यांची जाणीव या साऱ्यांचे प्रतिबिंब या निकालात प्रकर्षाने दिसून आले. सतत पुढे जाण्याची ऊर्जा आणि संस्थेचा विकासदृष्टीकोन शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या बळावरच नव्हे तर आपल्या अभ्यासातील शिस्त, अभ्यासाची सातत्यपूर्णता, सुसंस्कारित वागणूक, आणि समाजोपयोगी दृष्टिकोन यामुळे शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ही परंपरा अखंड सुरु ठेवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्नशील आहेत.
यंदाच्या निकालामुळे संस्थेवर असलेला विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. संस्थेने वेळोवेळी शाळेतील भौतिक सुविधा, संगणक शिक्षण, तांत्रिक साहित्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा, ई-लर्निंग, खेळाचे मैदान यावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. शिक्षणसंस्था म्हणजे फक्त ज्ञानदानाचे केंद्र नसते तर ती मूल्य, संस्कार आणि नेतृत्व निर्माण करणारी कार्यशाळा असते. सौ. जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाने या तत्वाला अनुसरून शिक्षण दिले आणि आज त्याच्या फळरूपात गुणवंत विद्यार्थी समाजासमोर उभे ठाकले आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांचे वैयक्तिक यश नसून, ते त्यांच्या शिक्षकांचे, पालकांचे आणि संस्थेच्या मार्गदर्शक मंडळाचे एक सामूहिक यश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे भावी शिक्षण व करिअर प्रवास यशस्वी होवो, ते उच्च शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देतील, अशा शुभेच्छा संस्थेच्या वतीने सर्वांनी एकमुखाने व्यक्त केल्या. या निकालाच्या निमित्ताने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला असून भविष्यात ही परंपरा अधिक बहरत राहो हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज तर्फे शुभेच्छा

“पा.ता. सह संस्थेच्या विश्वासाचे फळ – विद्यार्थ्यांच्या यशाने उजळले शिक्षणाच्या वाटेवरचे स्वप्निल शिखर!”

Loading

पाचोरा–( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)— एचएससी परीक्षेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांनी घेतलेली भरारी आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश हे या संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. संस्थेच्या सर्वच शाळांनी आणि महाविद्यालयांनी यावर्षीचा निकाल अत्यंत समाधानकारक दिला असून विदयार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाचे योग्य नियोजन हे त्रिसूत्री कारणीभूत ठरले आहे. श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय पाचोरा यांचा निकाल यंदा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेने यंदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेचा ९७ टक्के तर कला शाखेचा ९१ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत पाटील ऋषिकेश मिलिंद याने ९२.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याच्या खालोखाल जान्हवी जितेंद्र पाटील हिने ९०.१७ टक्के आणि चौधरी प्राची किशोर हिने ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेत पाटील निकिता राजेंद्र हिने ८९.६७ टक्के, पवार चिन्मयी नागसेन हिने ८८.१७ टक्के आणि राऊळ अनिकेत विनोद याने ८६.६७ टक्के गुण मिळवत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. कला शाखेत खैरे किंजल मनोज हिने ७७.६७ टक्के, महाजन संचिता विशाल हिने ७६.८३ टक्के आणि पाटील प्रतीक्षा तुळशीराम हिने ७६.१७ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमध्ये पाटील अतुल देवानंद याने ६३.८३ टक्के, मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये माधुरी कैलास कुमावत हिने ६६.८३ टक्के आणि अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटमध्ये पाटील अर्जुन बापू व लाधे पंकज गोविंद या विद्यार्थ्यांनी ६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशात विद्यार्थ्यांची वैयक्तिक मेहनत आणि आत्मविश्वास दिसून येतो. पाटील ऋषिकेश मिलिंद याने सांगितले की रात्रंदिवस अभ्यासाचा सातत्यपूर्ण ध्यास घेतला होता. परीक्षा संपल्यावरही यशाची खात्री होती. जान्हवी पाटील हिने अभ्यासात शिस्त आणि सातत्य ठेवले. पाटील निकिता हिने कोविड नंतरच्या अडचणींचा सामना करत यश मिळवले. माधुरी कुमावत हिने वैद्यकीय क्षेत्रात सशक्त दृष्टीकोन मिळवल्याचे सांगितले. भडगाव येथील सौ सु गि पाटील माध्यमिक विद्यालय, सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयाचा निकालही उल्लेखनीय ठरला आहे. विज्ञान शाखेत गौरव संदीप सोनवणे याने ८७ टक्के, श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७ टक्के आणि आदित योगेश चिंचोली याने ८५.६७ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. कला विभागात चैताली भिमराव मोरे हिने ८८.८३ टक्के, पाटील मेघा नरेंद्र हिने ८२.१७ टक्के आणि अंकुश बाळकृष्ण माळी याने ८०.८३ टक्के गुण मिळवले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये भूषण ज्ञानेश्वर पाटील, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये किरण अनिल पवार, आणि अकाउंट मॅनेजमेंटमध्ये प्रतीक्षा गणेश पाटील हे अनुक्रमे प्रथम आले आहेत. चैताली मोरे हिने सांगितले की अभ्यासाच्या सातत्यामुळे आणि आईच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. गौरव सोनवणे याने शाळेच्या सराव परीक्षा आणि नियोजित अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. अंकुश माळी याने UPSC हे आपले अंतिम ध्येय असल्याचे सांगितले. श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील एचएससी व्होकेशनल विभागाचा निकाल ९३.३३ टक्के लागला आहे. एकूण ४५ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये १०० टक्के, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये ८६.६६ टक्के आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये ९३.३३ टक्के निकाल लागला आहे. या विभागात पवार रामेश्वर सुभाष याने ६५.१७ टक्के, गायकवाड सावन सोमनाथ याने ६३.८३ टक्के आणि पाटील जयेश विठ्ठल याने ६३.८३ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावले आहेत. रामेश्वर पवार याने प्रॅक्टिकल शिक्षणामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात रस निर्माण झाल्याचे सांगितले. बांबरुड येथील डॉ राम मनोहर लोहिया उच्च माध्यमिक महाविद्यालयाचा निकाल ९०.६२ टक्के लागला आहे. यामधून पाटील मेघना श्रीराम हिने ६९.८३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला असून तिने सांगितले की संसाधने कमी असली तरी स्वप्न मोठं असल्यामुळे यश मिळवता आलं. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव ॲड महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासो व्ही टी जोशी, स्थानिक समिती चेअरमन अण्णासाहेब दगाजीराव वाघ, आबासो दत्तात्रय पवार, बाबासो विनय जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चेअरमन नानासो विजय देशपांडे, सुभाष तोतला, दादासो खलिल देशमुख, अण्णासो वासुदेव महाजन व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा निकाल हा केवळ टक्केवारीचा नसून विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिक्षकांच्या मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्याचे फलित आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची ही शैक्षणिक भरारी आगामी काळात पिढ्यांच्या घडणीसाठी आणखी मजबूत पाया सिद्ध होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

रुग्णसेवेचा समर्पणयोग – सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्यतेजस्वी वर्धापन दिन!

Loading

पाचोरा – वैद्यकीय क्षेत्रात केवळ ज्ञानच नव्हे, तर संवेदनशीलतेची उब आणि माणुसकीचा स्पर्श यांच्याही तेवढ्याच गरज असते. अशाच मूल्यांच्या आधारावर उभे राहिलेले, आणि अवघ्या सहा वर्षांत हजारो रुग्णांच्या मनात विश्वासार्हतेचे स्थान निर्माण करणारे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता आपल्या यशस्वी वाटचालीच्या सातव्या वर्षात प्रवेश करत आहे. रुग्णसेवेचा खरा अर्थ काय, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर स्वप्निल पाटील व डॉक्टर सौ. ग्रिष्मा पाटील या उच्चशिक्षित, सेवाभावी दांपत्याचे हे जीवनकेंद्र.या वर्धापन दिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे आणि त्या मागे असलेले विचार, तत्त्व, परिश्रम आणि समर्पण यांचा उजाळा घेणे आवश्यक ठरते.
सहा वर्षांपूर्वी 2019 मध्ये पाचोऱ्यातील भडगाव रोडवरील 'भाग्यश्री प्लाझा' येथे उभे राहिलेल्या या हॉस्पिटलने अल्पावधीतच परिसरातील आरोग्यसेवेमध्ये नवे मापदंड निर्माण केले आहेत. डॉ. स्वप्निल पाटील यांचा वैद्यकीय प्रवास हा केवळ डिग्रीपर्यंत मर्यादित नाही. पाचोऱ्यातच शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. पाटील यांनी दहावी व बारावीमध्ये सातत्याने प्रथम क्रमांक राखत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. एम.डी. मेडिसिन ही पदवी सुवर्णपदकासह मिळविल्यानंतर त्यांनी मुंबईतील जसलोक आणि सायन या प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये क्रिटिकल केअर विभागात सेवा बजावली. तरीही, मोठ्या शहरातील आकर्षक संधींना नकार देत त्यांनी आपली जन्मभूमी, शिक्षणभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पाचोऱ्यात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांची अर्धांगिनी डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी एम.बी.बी.एस. आणि डी.सी.एच. या पदव्या प्राप्त करून स्वतःला बालकांच्या आरोग्यासाठी वाहून घेतले. त्या नवजात शिशु आणि बालरोग तज्ञ म्हणून सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेवा बजावत आहेत. त्यांच्या बालकांप्रती असलेल्या ममत्वपूर्ण दृष्टीकोनामुळे रुग्ण आणि पालक यांच्यात त्यांच्या प्रती अपार विश्वास निर्माण झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये मधुमेह, थायरॉईड, किडनी, यकृत, उच्च रक्तदाब, मेंदू विकार, मिरगी, हृदयविकार, दमा अशा किचकट आजारांवर अचूक निदान आणि सुयोग्य उपचार केले जातात. डॉ. ग्रिष्मा पाटील यांच्या विभागात नवजात बाळांपासून बारा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सर्व आजारांवर शास्त्रोक्त व परिणामकारक उपचार केले जातात. अंगावर सूज येणे, बाळ दूध न पिणे, हातपाय निळे पडणे, त्वचाविकार, वारंवार ताप येणे, कावीळ, न्युमोनिया अशा बालकांशी निगडित समस्या अत्यंत तज्ञतेने हाताळल्या जातात. हॉस्पिटलमध्ये असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित स्टाफ, सुसज्ज आयसीयू, स्वच्छता, तत्पर रुग्णवाहिका आणि सुसंवादी प्रशासन यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आत्मविश्वासाने उपचार घेण्यासाठी येथे येतात.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सेवा सुरू करून सिद्धिविनायक हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सामाजिक भान दाखवले आहे. या योजनेअंतर्गत नवजात शिशूपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांवर दमा, मेंदूचे विकार, हृदयविकार, मलेरिया, डेंग्यू, सर्पदंश, विषबाधा, अपघाती इजा, फ्रॅक्चर अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार सुरू झाले आहेत. नवजात बालकांसाठी NICU सुविधा आणि वयोवृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा हा या हॉस्पिटलचा विशेष पैलू ठरला आहे.
कोरोना काळात डॉक्टर्स दांपत्याने अहोरात्र सेवा करत स्वतःचे प्राण धोक्यात घालून सामाजिक कर्तव्य पार पाडले. स्वतः बाधित होऊनही ते पुन्हा सेवा देण्यासाठी सज्ज झाले. त्यांच्या या समर्पणाचे अनेक उदाहरणे आज पाचोऱ्यात दररोज ऐकायला मिळतात. त्यांनी फक्त वैद्यकीय उपचारच केले नाहीत तर लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला, भीती घालवली आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी केवळ रुग्णसेवा केली नाही तर आरोग्याच्या क्षेत्रात समाजाभिमुख उपक्रमांचीही एक शृंखला उभी केली आहे. ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, माता-पित्यांसाठी मार्गदर्शन, मुलांच्या शाळांमध्ये तपासण्या, मोफत तपासणी योजना, सवलतीत औषधे देणारे उपक्रम राबवले गेले आहेत.
हे सर्व पाहता सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ एक उपचार केंद्र नाही तर सामाजिक स्वास्थ्याची चळवळ ठरली आहे. हॉस्पिटलच्या पुढील टप्प्यात टेलीमेडिसिन सेवा, महिला आरोग्य केंद्र, मोफत कॅन्सर तपासणी, वृद्धांसाठी फिजिओथेरपी सुविधा, नर्सिंग व फार्मसी कॉलेज, कार्डियाक कॅथलॅब यांचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता, तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या दांपत्याने केला आहे. त्यांच्या या नियोजनात केवळ वैद्यकीय सुविधा नाहीत तर रुग्णाच्या मानसिक आणि आर्थिक आधाराचा विचारही अंतर्भूत आहे. डॉ. स्वप्निल आणि डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक सेवा उपक्रम आणि प्रत्येक उपचार यामागे असलेली माणुसकीची भावना या हॉस्पिटलच्या प्रत्येक भिंतीत खोलवर भिनलेली आहे. त्यामुळेच आज सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या माणुसकीच्या विजयाचा साजरा ठरतो. सर्व पाचोरा व तालुक्याच्या जनतेकडून या सेवाभावी युगपुरुष व युगस्त्रीला मानाचा मुजरा आणि पुढील आरोग्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ‘सिद्धिविनायक’ हे केवळ नाव नसून – आरोग्याचा आशीर्वाद देणारे श्रद्धास्थान!

पाचोरा न.पा. प्रशासनाचा बेफिकीर कारभार — नागरिकांचा कर ‘हरामाचा’ नाही; कामासाठी ओरडावे लागते, ही दुर्दैवी परिस्थिती!

Loading

पाचोरा – नगरपालिका प्रशासनाचा शहरातील नागरी सुविधा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गटार सफाईसारख्या मूलभूत कामासाठी नागरिकांनी सतत मागणी करूनही, न.पा. प्रशासनाने जी बेपर्वा आणि बेजबाबदार भूमिका घेतली आहे, ती अक्षरशः संतापजनक आहे. जे नागरिक प्रामाणिकपणे घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता कर आणि इतर सर्व कर वेळेवर भरतात, त्यांच्या कष्टाच्या पैशाची अशी थट्टा करणे, हे केवळ अन्यायकारकच नव्हे तर लज्जास्पद आहे.
शहरातील श्री गो से हायस्कूल पासून ते पुनगाव रोड साई प्रोव्हीजन पर्यंत रोड परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून गटारीत गाळ साचलेला आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही, न.पा. प्रशासन मात्र झोपेत आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, विनंती केली, वारंवार फोन करून लक्ष वेधले. तरीही प्रशासकीय यंत्रणा दिखावा व रेकॉर्डला फोटो काढण्या पुरता हलली अखेर जेंव्हा काही कामगार पाठवण्यात आले, तेव्हा तो फक्त ‘दाखवायचा कार्यक्रम’ ठरला. दोनच कामगार आले, त्यात फक्त एकाकडेच गाळ काढण्यासाठी पावडी होती. दुसरा केवळ उभा होता. ही टीम ‘स्पेशल’ म्हणावी की ‘बिनकामी’ – हेच समजत नाही. त्यांनी नेमका किती गाळ काढला, कुठे नेला, त्याचा कोणताही ठोस अहवाल नाही. फोटो नाही, पंचनामा नाही, खात्री नाही – म्हणजे काम केले की नाही याचा कोणताही पुरावा नाही.
या भागात नियमित गटार सफाई कर्मचारी दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे बक्षीस जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे. झाडूवाला येतो दिसतो, पण गटारीसाठी कोण येतो, कधी येतो, काहीच माहिती नाही. सोमवारीही परिसरात झाडण्यासाठी कोणताही सफाई कर्मचारी आलेला नव्हता. रविवारी सुट्टी असते हे समजण्याजोगे आहे, पण सोमवारसुद्धा मोकळा? मग आठवड्यात साप्ताहिक सुटी आणि कामाचा दिवस तरी कोणता? नागरिक रोज गाळ साचलेली गटारं, ओसंडतं सांडपाणी आणि घाणीकडे पाहून जगतात. आणि प्रशासकीय अधिकारी मात्र एसी ऑफिसात आरामात बसलेले.
प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते. नागरिकांनी भरलेला एकेक रुपया हा त्यांचा घाम-गाळाचा पैसा असतो. तो पैसाकोणाच्या बापाच्या इस्टेटीचा नाही. तो कोणालाही माफक काम करून खाण्यासाठी नाही. करदात्यांच्या पैशातून गाड्या घेतल्या जातात, ए सी ऑफिस चालतात, पगार जातात, निविदा काढल्या जातात, पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच होत नाही. आणि नागरिकांनी जर मुद्दा उपस्थित केला तर त्यांच्यावर उपकार केल्यासारखं वागणं हे तर अधिकच लाजीरवाणं आहे.
सदर भागाचे भावी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी कुठे आहेत? त्यांना या परिसरातील स्थिती माहिती आहे का? की त्यांना फक्त निवडणुकीआधीच रस्ते, गटारं, लाईट यांची आठवण होते? जेव्हा नागरिकांचा प्रचंड संताप होतो, सोशल मीडियावर बातम्या येतात, तेव्हाच ही मंडळी जागी होतात. न.पा. प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील हे ढिसाळ नियोजन आणि बिनधास्त टाळाटाळ नागरिकांना अक्षरशः अपमानास्पद वाटते.
गाळ हे केवळ गटारीत साचलेले गंध व कचरा नाही, तर ही संपूर्ण व्यवस्थेची सडलेली मानसिकताच आहे. जिथे नागरिकांनी तक्रार केली की केवळ देखावा करून ‘काम केले’ असं दाखवलं जातं, हे थेट मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाचं अपयशच आहे. हे गाळ केवळ गटारीपुरता मर्यादित नाही – तो योजनांमध्ये, नियोजनामध्ये, अंमलबजावणीमध्ये आणि यंत्रणेमध्ये भरून राहिला आहे.
प्रत्येक विभागात अधिकारी, पर्यवेक्षक, वॉर्ड प्रभारी, झोन अधिकारी आहेत. मग त्यांच्या कामाची मोजदाद कोण करतो? गाळ काढण्याचे, उचलण्याचे व विल्हेवाट लावण्याचे ठोस नियोजन कधी केलं गेलं? नागरिकांनी प्रत्यक्ष तक्रार दिल्यावर काम करणारी ही ‘दगड झोपलेली यंत्रणा’ खरेच लोकशाहीची शान आहे का?
या पार्श्वभूमीवर काही आपली संतप्त मतं व्यक्त केली. एका रहिवाशाने थेट विचारले – “आम्ही कर भरतो ते काय यांचं पोषण करण्यासाठी का? आम्ही झोपत नाही, श्रम करून पैसा कमावतो, आणि यांचं काम फक्त गाळ काढायचं तेही नाटक करून दाखवायचं? आमच्या भागातले पाणी गटारात मिसळतं, आणि यांच्यासाठी आमच्याकडून डोनेशन?”
सफाई कर्मचाऱ्यांची सुट्टी रविवारी असावी, हे मान्य. पण सोमवारी का आले नाहीत? त्यांचं वेळापत्रक काय आहे? कोणत्या दिवशी कोणत्या भागात कोण येतो, किती वेळ राहतो, काय साधनं असतात याचा कुठलाच दस्तऐवज नसतो. शिवाय, झाडूवाले देखील उन्हामुळे अर्धा तास उभे राहिले की जातात – यांच्यावर कोण देखरेख करतं
हे चालणार नाही!
पाचोरा शहराच्या विकासाचे दावे करणाऱ्या यंत्रणेसमोर हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली आहे. जर मूलभूत सुविधा वेळेवर, काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने दिल्या गेल्या नाहीत, तर सार्वजनिक निषेध, तक्रारी, आणि प्रसंगी योग्यत्या सक्षम यंत्रणेकडे व प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी लागेल
यासाठी                                     १)प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची उपस्थिती यादी ऑनलाईन प्रसिद्ध व्हावी                          २) गाळ काढल्यानंतर फोटोसह माहिती जनतेला द्यावी                                      ३) झोननिहाय जबाबदार अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक जाहीर करावेत ४)कंत्राटी कामगारांच्या कडून वेळेवर, प्रत्यक्ष कामाचा अहवाल तयार केला जावा                                          अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये महिन्याला एकदा जाहीर पाहणी दौरा घ्यावा आणि अहवाल प्रसिद्ध करावा
प्रशासन जर वेळेवर, पारदर्शक आणि जबाबदारीने काम करत नसेल, तर लोकांचा विश्वास ढळतो. हा केवळ गटारीचा प्रश्न नाही, हा जनतेच्या आत्मसन्मानाचा, त्यांच्या हक्काचा, आणि त्यांच्या कराच्या पैशाच्या वापराचा प्रश्न आहे. प्रशासनाने लक्षात ठेवावे – जनता मूर्ख नाही. आणि जनतेचा पैसा हा त्यांच्या घामाचा आहे, लाच किंवा % वारी म्हणून नव्हे तर हक्क म्हणून दिलेला आहे.
तुर्त एवढेच      

  1.  

 

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरी मुंबईत ६ मेपासून दिमाखात रंगणार!

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ही स्पर्धा ६ मे ते १६ मे २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प.), मुंबई येथे रंगणार आहे.

राज्यभरातील नामांकित नाट्यसंस्था या अंतिम फेरीत सहभागी होत असून, त्यांचे दर्जेदार प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. प्रत्येक प्रयोग रात्री ८:३० वा., तर अंतिम दिवशीचा प्रयोग शुक्रवार, १६ मे रोजी दुपारी ४ वा. आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

मंगळवार, दि. ६ मे – उर्मिलायन

बुधवार, दि. ७ मे – सूर्याची पिल्ले

गुरुवार, दि. ८ मे – शिकायला गेलो एक

शुक्रवार, दि. ९ मे – मास्टर माइंड

शनिवार, दि. १० मे – ज्याची त्याची लव्हस्टोरी

सोमवार, दि. १२ मे – नकळत सारे घडले

मंगळवार, दि. १३ मे – थेट तुमच्या घरातून

बुधवार, दि. १४ मे – गोष्ट संयुक्त मानापमानाची

गुरुवार, दि. १५ मे – असेन मी… नसेन मी…

शुक्रवार, दि. १६ मे (दुपारी ४ वा.) – वरवरचे वधू-वर

या नाट्यस्पर्धेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार (महाराष्ट्र शासन) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अॅड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य विभाग) यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम अधिक व्यापक झाला आहे.

विकास खारगे (भाप्रसे), मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग, तसेच विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे संपूर्ण आयोजनाचे प्रमुख आधारस्तंभ असून, त्यांनी सर्व नाट्यरसिकांना या कलाविष्कारांचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्येक प्रयोगासाठी तिकीट दर ₹५०/- व ₹३०/- असून, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तिकीटविक्री संबंधित प्रयोगाच्या दिवशीच नाट्यगृहात करण्यात येईल.

मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेला साजेशी अशी ही नाट्यस्पर्धा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंददायी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि पालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या करिअर मार्गदर्शन केंद्रातर्फे शनिवार, दि. १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, इंडस्ट्रियल इस्टेट कंपाऊंड, डॉ. आंबेडकर रोड, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई ४०० ०१२ या ठिकाणी होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
इ. १० वी व १२ वी नंतरच्या शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रमुख पाहुणे: डॉ. संकल्प राव – संचालक, आयटीएम इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्सेस

मार्गदर्शक: समर्थ पालकर – संचालक, समर्थ एज्युकेअर, विषय: १० वी, १२ वी नंतरच्या परदेशातील करिअर संधी

शर्मिला लोंढे – व्याख्याता व करिअर समुपदेशक, विषय: १० वी, १२ वी नंतरचे करिअर पर्याय, आव्हाने आणि नियोजन

कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी विकास शिंदे – मंडळप्रमुख, उमेश निंबरे – प्रमुख, करिअर मार्गदर्शन केंद्र, अरुण तळगावकर – सहायक प्रमुख, करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्याशी पुढील क्रमांकांवर संपर्क साधू शकता ९८७०४ २२९५९ / ९००४६ ७३२२४ / ९४२१७ ४६२४९

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“राज्य नाट्य स्पर्धेचा गौरव सोहळा ५ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात”

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आणि २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या कलाकार, तंत्रज्ञ व नाट्य संस्थांचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार असून सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

या कार्यक्रमात प्राथमिक फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्य कलाकारांचा, तंत्रज्ञांचा तसेच नाट्य संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नवोदित आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!