गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन व पुस्तक विमोचन समारंभ मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे संपन्न

0

रावेर – गुर्जर बोलीभाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, मोठे वाघोदे बु., आणि गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन व पुस्तक विमोचन समारंभ” मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे पार पडला.
     गुर्जर बोलीभाषेचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प
गुर्जर बोलीभाषा ही पश्चिम भारतातील विशिष्ट सांस्कृतिक परंपरांचे प्रतीक आहे. तिच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या “गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्रा”च्या माध्यमातून यापूर्वीही अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गुर्जर बोलीभाषेतील साहित्यिक, लोकगीते, कथा आणि सांस्कृतिक परंपरांना जागतिक स्तरावर पोहोचवणे हा होता.
      या प्रसंगी “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गुर्जर बोलीभाषेतील लोकसाहित्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत.
       कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ
कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात बोलीभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एका समाजाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन केले.
      साहित्यिक व मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषितज्ञ वसंतराव लक्ष्मण महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून वेदसाई हॉस्पिटल, सावदा येथील बालरोगतज्ञ डॉ. विलास जगन्नाथ पाटील उपस्थित होते. त्यांनी बोलीभाषेतील साहित्य हा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केंद्रामार्फत संकलीत साहित्याबद्दल माहिती देताना गुर्जर बोलीभाषेच्या लोप पावत असलेल्या काही खास वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
    साहित्य सादरीकरणासाठी आलेल्या प्रमुख साहित्यिकांमध्ये श्रीकांत रमेश पाटील (रांजणी), सुरेखा मनीष पाटील (रावेर), व्यंगचित्रकार शरद श्रावण महाजन (एरंडोल), शिक्षिका विमल वेडू पाटील (ऐनपूर), रजनी किशोर पाटील (नवीन निंबोल), रिता विजय चौधरी (बलवाडी), आणि सविता अरुण महाजन (कल्याण) यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या सादरीकरणातून गुर्जर बोलीभाषेचे साहित्य किती समृद्ध आहे, हे स्पष्ट केले.
      या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. टी. महाजन, उपाध्यक्ष श्रावण सिताराम महाजन, चेअरमन डी. के. महाजन, व्हॉ. चेअरमन विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव पी. एल. महाजन, तसेच ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील आणि सचिव संजय वामन पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. महाजन यांनी केले, सूत्रसंचालन पवन चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक वैभव चौधरी यांनी मानले.
   या कार्यक्रमामुळे गुर्जर बोलीभाषेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, भविष्यात या भाषेतील कथा, कविता, लोकगीते आणि इतर साहित्याचे संकलन आणि प्रकाशन करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलण्यात येतील. यासाठी स्थानिक संस्थाचालक आणि शिक्षण मंडळांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदेचे मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक आर. पी. बडगुजर, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
    गुर्जर बोलीभाषा ही समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक बोलीभाषेतील साहित्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
     या साहित्य संमेलनाने जळगाव जिल्ह्यातील गुर्जर भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली असून, या भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प केला आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here