विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन आणि संवाद-विकास कार्यशाळा संपन्न व्यक्तिमत्त्व विकासासाठी कुटुंबातील सुसंवाद महत्त्वाचा – प्रा. डॉ. सतीष सूर्ये

0

पाचोरा- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सहकार्याने आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ आणि ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा दि. 04 मार्च 2025 रोजी महाविद्यालयात पार पडली.                                                या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी भूषविले. तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सतीष सूर्ये, डॉ. नागोराव डोंगरे, प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, पुणे येथील बालभारती मानसशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ. जे. पी. बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते                   कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती देताना समन्वयक डॉ. प्राजक्ता शितोळे आणि सहसमन्वयक प्रा. सुवर्णा पाटील यांनी आजच्या आधुनिक युगात विवाहसंस्थेवर होणारे परिणाम आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन कसे महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेचे उद्घाटन करताना श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “आजच्या पिढीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप, प्रेमविवाह आणि घटस्फोट यांची संख्या वाढत आहे. परिणामी, विवाहसंस्था धोक्यात येत आहे. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज बनली आहे. अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळू शकते.”       कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी कुटुंबातील सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना उत्तम जीवनाचा मार्गदर्शक मिळावा यासाठी कुटुंब आणि समाज या दोन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची असते. संवाद हा कोणत्याही नातेसंबंधाचा पाया आहे. जर कुटुंबातील संवाद सुसंवाद असेल, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास वेगाने आणि परिणामकारक होतो.                                                कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. सतीष सूर्ये यांनी ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले                                 त्यांनी सांगितले की, “मुलांचे कुटुंबातील संवाद जर सुसंवाद असेल, तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. पालकांनी मुलांशी संवाद साधताना त्यांना समजून घ्यायला हवे. चांगला संवाद हा आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवतो                      या सत्रात PPT सादरीकरण, व्हिडीओ क्लिप, विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि प्रश्नोत्तर सत्राचा उपयोग करून विषय अधिक स्पष्ट करण्यात आला. सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी सांगितले की, “कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण असेल, तर विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आपली जीवनगाथा घडवतात.                                       दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूरचे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागोराव डोंगरे यांनी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या १३ लाख पेक्षा जास्त जोडपी घटस्फोटित आहेत. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा संबंध नाही, तर दोन कुटुंबांचा मिलाफ असतो. विवाहपूर्व योग्य समुपदेशन केल्यास अशा समस्या टाळता येऊ शकतात.”ते पुढे म्हणाले की, “लग्न ठरवताना पत्रिका जुळवण्यापेक्षा मेडिकल तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे, तर मानसिक स्थैर्यासाठीही आवश्यक आहे              या सत्राचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बडगुजर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की, “विद्यार्थ्यांच्या जीवनात कुटुंब आणि शिक्षक हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. या वयात झालेल्या चुका हा दोष नसून वयाचा परिणाम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाशी मुक्तपणे संवाद साधावा.”                                           कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. ताईसाहेब सुचेताताई वाघ, तनिष्का ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ. ज्योतीताई वाघ आणि सौ. सुरेखाताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.                  सौ. ज्योतीताई वाघ यांनी ‘एकत्र कुटुंबपद्धती’चे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, “संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील संवाद वाढतो आणि त्यामुळे विवाह अधिक सुस्थितीत राहतो.”           कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. वासुदेव वले यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांमधून मिळालेल्या संस्कारक्षम व सकारात्मक विचारांची शिदोरी आपल्या आयुष्यात रुजवावी.”                                          कार्यशाळेतील सहभागींना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले                     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे आणि प्रा. स्वप्निल भोसले यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सुवर्णा पाटील आणि प्रा. जयश्री वाघ यांनी केले               कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here