पाचोरा- विवाहसंस्था टिकवण्यासाठी परस्पर समजूतदारपणा, संवाद कौशल्य आणि योग्य विचारसरणी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या आधुनिक काळात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, ‘प्री-वेडिंग’ संस्कृती आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण यामुळे विवाहसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ आणि ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयांवर दि. 04 मार्च रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश तरुणाईला विवाहसंस्थेचे महत्त्व पटवून देणे, वैवाहिक नातेसंबंध अधिक समजून घेण्यास प्रवृत्त करणे आणि संवाद कौशल्याच्या माध्यमातून संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या शुभहस्ते पार पडले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना विवाहसंस्थेच्या बदलत्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की,
“आजच्या युगात विवाहसंस्था अनेक संकटांना तोंड देत आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे समाजातील कुटुंबसंस्थेच्या विघटनाचे द्योतक आहे. यामुळे विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज झाली आहे. योग्य विचार करूनच विवाहाचा निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मनस्ताप सहन करावा लागतो. आमचे महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतात संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले,
“विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. विवाह हा आयुष्यभर टिकणारा बंधन आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना योग्य संवाद, विचार आणि समुपदेशन गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद जर सुसंवाद असेल, तरच विद्यार्थी एक उत्तम व्यक्तीमत्त्व घडवू शकतात.”
कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. सुवर्णा पाटील यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले, तर आभार डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी मानले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन डॉ. सतीष सूर्ये यांनी ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की,
“व्यक्तिमत्त्व हा जन्मजात गुण नसून तो घडवला जातो. घरातील संवाद हा जर सकारात्मक असेल तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक प्रभावी होतो. उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करणे हे केवळ व्यवसायासाठी नव्हे, तर नातेसंबंध दृढ करण्यासाठीही आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांसमोर संवाद कौशल्याचे महत्त्व PPT, व्हिडिओ क्लिप आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. या सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी संवाद कौशल्याच्या प्रभावीतेवर भर देत कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनिवार्य असल्याचे मत मांडले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागोराव डोंगरे यांनी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
“महाराष्ट्रात सध्या 13 लाखांपेक्षा जास्त विवाह तुटलेले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे विवाहपूर्व समुपदेशनाचा अभाव. पती-पत्नीने एकमेकांविषयी संपूर्ण समर्पणभाव ठेवणे हेच खरे लग्न असते. विवाह ठरविण्याआधी मुला-मुलींच्या पत्रिका जुळवण्यापेक्षा वैद्यकीय तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात.”
या सत्राचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बडगुजर होते. त्यांनी विद्यार्थी व कुटुंब यांच्यातील सुसंवाद कसा महत्त्वाचा आहे, यावर भाष्य केले.
“विद्यार्थ्यांच्या या वयात चुका होऊ शकतात, पण त्या चुकीच्या सवयी न बनू देणं, हे कुटुंब आणि शिक्षकांचे मोठे कर्तव्य आहे.”
या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले, प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी करून दिला, तर आभार प्रा. जयश्री वाघ यांनी मानले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मा. सौ. ताईसाहेब सुचेताताई वाघ, तनिष्का ग्रुपच्या माजी अध्यक्षा मा. सौ. ताईसाहेब ज्योतीताई वाघ आणि मा. सौ. ताईसाहेब सुरेखाताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
“आजच्या पिढीने एकत्र कुटुंबपद्धतीचा स्वीकार केला, तर वैवाहिक जीवन अधिक यशस्वी होईल. संवादाच्या माध्यमातून कोणतीही समस्या सोडवता येते.”
कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी विद्यार्थ्यांना “या कार्यशाळेतून संस्कारक्षम आणि सकारात्मक विचारांची शिदोरी घ्यावी,” असा संदेश दिला.
विद्यार्थिनी कु. चेतना हिरे व कु. गायत्री क्षीरसागर यांनी कार्यशाळेबद्दल आपले अनुभव शेअर केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना विवाहपूर्व समुपदेशनाचे आणि संवाद कौशल्याच्या महत्त्वाचे भान आले. विवाह हा केवळ समारंभ नसून, जीवनभर टिकणारे नाते आहे आणि त्यासाठी सुसंवाद अत्यंत गरजेचा आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.