एम. एम. महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त ‘Cyber Crime’ विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम – महिलांसाठी मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजना!

0

पाचोरा, दि. 08 मार्च 2025 – ‘सायबर गुन्हेगारीविरोधात महिलांचे संरक्षण’ हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला! पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सायबर क्राईम’ (Cyber Crime) या ज्वलंत विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव येथील सायबर सेल विभागाच्या श्रीमती दीप्ती अनफाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ आणि व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. सायबर सुरक्षेच्या वाढत्या गरजेची जाणीव ठेवून, महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी हा कार्यक्रम विशेष उपयोगी ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सायबर क्राईमशी संबंधित अनुभव आणि माहिती सांगत, महिलांची कशी फसवणूक केली जाते, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांमध्ये कोणती काळजी घ्यावी, यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयश्रीताई वाघ यांनी केले. त्यांनी सायबर गुन्हेगारीमुळे महिलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी याविषयी माहिती दिली. यानंतर जळगाव येथील सायबर सेल विभागाचे तज्ज्ञ श्री. अरविंद वानखेडे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, त्याचे स्वरूप कसे असते आणि त्यावर कायदेशीर उपाययोजना कोणत्या आहेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे देऊन विद्यार्थिनी आणि महिलांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, कोणत्या सायबर गुन्ह्यांचा समावेश कायद्यांतर्गत केला जातो, आणि गुन्हेगारांना कोणती शिक्षा होते याबद्दल माहिती दिली. सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देताना त्यांनी ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, फिशिंग, आणि डिजिटल चोरी यासारख्या प्रकारांवर प्रकाश टाकला.
बँक ऑफ महाराष्ट्र, पाचोरा शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री. पराग निखारे यांनी Financial Fraud म्हणजे काय, डिजिटल व्यवहारांमध्ये घ्यावयाची काळजी, OTP आणि बँक खात्याची सुरक्षितता, ऑनलाईन पेमेंट गेटवेज, UPI व्यवहार, क्रेडिट कार्ड फसवणूक यासंबंधी माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, ‘सावध नागरिकच सुरक्षित नागरिक’ असतो. ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नये, अनोळखी व्यक्तींशी पैशांची देवाण-घेवाण करू नये आणि संशयास्पद लिंक किंवा कॉलवर प्रतिसाद देऊ नये.’
पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांनी सायबर गुन्ह्यांवर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ‘सायबर गुन्हेगारी ही आधुनिक युगातील सर्वांत धोकादायक समस्या आहे. विशेषतः महिला आणि तरुण मुली यांना याचा मोठा फटका बसतो. त्यासाठी प्रत्येकाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबाबदारीने वागले पाहिजे.’ त्यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. विशेषतः सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संभाषण, आपली खासगी माहिती शेअर करणे, बँकिंग माहिती लीक होणे, आणि फसवणुकीच्या वेबसाईट्सना बळी पडणे यावर विशेष भर दिला.
‘Cyber Security Professional Basic Online Course’ ची ओळख सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी श्री. गोकुळ सोनार यांनी ‘Cyber Security Professional Basic Online Course’ याविषयी माहिती दिली. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी आणि महिला ऑनलाईन सुरक्षितता कशी राखावी, पासवर्ड संरक्षित कसे ठेवावेत, आणि हॅकिंगपासून कसे बचावावे याविषयी शिकू शकतात.या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. गौतम निकम, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. लक्ष्मी गलाणी, प्रा. अक्षय शेंडे, श्रीमती ज्योती जाधव, श्री. सुनील नवगिरे, श्री. जयेश कुमावत, श्री. बी. जे. पवार, श्री. घनश्याम करोसिया, श्री. सुरेंद्र तांबे आदी मान्यवर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुमारे 70 विद्यार्थिनी आणि महिलांची नोंदणी करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रम सहसमन्वयक डॉ. क्रांती सोनवणे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. संजिदा शेख यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आणि विद्यार्थिनींना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेला हा उपक्रम फक्त माहितीपुरता न राहता, महिला आणि तरुणींमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर जागरूकतेची चळवळ रुजवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here