पाडळसा (ता. यावल) – येथे दिनांक २४ मे २०२५ रोजी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यूसारख्या तापरोगांविषयी जनजागृती तसेच मान्सूनपूर्व आरोग्य सर्वेक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. यामागील प्रमुख उद्देश गावकऱ्यांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे, संभाव्य तापरोगांचे प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, आणि येत्या पावसाळ्यात जलजन्य व डासजन्य रोगांचा
प्रादुर्भाव रोखणे हा होता.गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने आणि उष्णता व आर्द्रता यामध्ये वाढ झाल्याने डासांची उत्पत्ती आणि तापरोगांच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तसेच जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांनी तातडीचे निर्देश देत आरोग्य पथकांना सज्ज राहण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता चव्हाण व डॉ. मोबशीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाडळसा व परिसरातील १८ गावांमध्ये एकसंध आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली.या व्यापक मोहिमेसाठी आरोग्य निरीक्षक, हिवताप निरीक्षक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि आशा स्वयंसेविका यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तापरोग व कंटेनर सर्वेक्षण, डासोत्पत्ती होणाऱ्या जागांचा शोध, दूषित पाण्याचे स्रोत, तसेच पाण्याच्या पुरवठ्यातील गळती, नळ व पाईपलाइन तपासणी, परिसर स्वच्छतेचा आढावा, आणि गावांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या यांचा समावेश होता. तापरोग प्रतिबंधासाठी केलेल्या या मोहिमेमध्ये गावातील प्रत्येक घरात जाऊन संबंधित नागरिकांची विचारपूस करण्यात आली. घरामध्ये पाणी साठवले जात असलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये डास अंडी घालू शकतात का, याचे निरीक्षण करण्यात आले. पाण्याचे कंटेनर, बादल्या, ड्रम, कुंड्या यांची नियमित स्वच्छता व झाकण लावण्याची माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.आरोग्य पथकाने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची स्थिती तपासली. कुठे पाईपलाईनमध्ये गळती आहे का, कुठे नळांना तोटी नाही, कुठे वॉल्वमध्ये त्रुटी आहेत, हे सर्व प्रत्यक्ष पाहून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संबंधित दोष दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. गावांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या डासजन्य रोगांना आळा घालण्यासाठी, गटारी व नाल्यांची साफसफाई, उकिरड्यांचे व्यवस्थापन, तसेच शेण-कचरा उचलण्याची मोहीम राबवली गेली.डेंग्यू व हिवताप प्रतिबंधक उपाय म्हणून गावांमध्ये ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. ‘कोरडा दिवस’ म्हणजे आठवड्यातून एक दिवस सर्व नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील साठवलेले पाणी पूर्णतः रिकामे करणे आणि त्या जागा कोरड्या ठेवणे, जेणेकरून डासांना अंडी घालण्यासाठी जागाच मिळणार नाही. या सर्व उपक्रमामध्ये पाडळसा गावाबरोबरच परिसरातील इतर १८ गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक गावात आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले. या सर्वेक्षण मोहिमेत तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे, आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, हितेंद्र पाटील, स्वप्नील भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी नीरज राणे यांच्या देखरेखीखाली सर्व कामकाज पार पाडण्यात आले.आरोग्य सेवक नितीन पाटील, सतीश पवार, गिरीश जावळे, भरत धांडे, दिनेश बच्छरे, अनिकेत बोरसे यांनी घरोघरी जाऊन तापरोग सर्वेक्षण केले. आशा सेविका प्रगती पाटील, शारदा पाटील, पुष्पा पाटील यांच्यासह सर्व आशा गटप्रवर्तकांनी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती घडवून आणली. प्रत्येक घरात सुसंवाद साधून नागरिकांना त्यांच्या घरातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांना काही ठिकाणी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची माहिती नव्हती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी होणारे धोके समजावून सांगितले. उदाहरणार्थ, घराबाहेरील झाडाच्या कुंड्या, जुनी खेळणी, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या या सर्व ठिकाणी पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होते, हे सांगून त्या वस्तू काढून टाकण्याची सूचना करण्यात आली.याशिवाय, दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या जलजन्य रोगांचा म्हणजेच गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉईड, हिपॅटायटीस आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, पिण्याच्या पाण्याचे उकळून वापरणे, टाकीत ब्लीचिंग टाकणे, आणि पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अनेक ठिकाणी क्लोरीन टॅब्लेट्स वितरित करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि डॉ. प्राजक्ता चव्हाण यांनी या सर्व मोहीमेची नियमित पाहणी केली. त्यांनी गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक पातळीवर स्वच्छता मोहीम चालवण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींना पत्रकाद्वारे सूचना देऊन पाण्याच्या गळतीचे तातडीने निराकरण, नळांना तोटी बसविणे, परिसरात ब्लीचिंग फवारणी करणे, अशा उपाययोजना त्वरीत हाती घेण्यास सांगण्यात आले.या सर्व मोहिमेमुळे पाडळसा व त्यासमोरील गावांमध्ये नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जाणीव वाढली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केली आहे. महिला व युवकांमध्ये देखील आरोग्य विषयक सकारात्मक बदल दिसून येत आहे. एकंदरीतच, पावसाळ्यापूर्वीचा हा उपाययोजना कार्यक्रम खरोखरच प्रशंसनीय असून डेंग्यू व जलजन्य रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होणार आहे. जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणांचा तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत संपूर्ण पथकाची एकसंध व निष्ठावान कार्यशैली यामुळे ही मोहीम यशस्वी झाली. जनतेने देखील या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला असून पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले. डॉ. सचिन भायेकर, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. राजू तडवी, डॉ. प्राजक्ता चव्हाण, आणि संपूर्ण आरोग्य कर्मचारीवर्गाचे स्थानिक प्रशासन आणि जनतेने विशेष कौतुक केले आहे. अशा प्रयत्नांतूनच ‘स्वस्थ गाव – सशक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल, याकडेच ही मोहीम निश्चितपणे वाटचाल करत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.