पाचोरा – भारतभूमी ही श्रद्धा, संस्कृती आणि सनातन परंपरांचा खजिना आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचे जीवन विविध कर्मकांडांनी जोडलेले असते. त्यात ‘श्राद्धविधी’ या विधीला विशेष महत्त्व आहे. अनेकांनी ‘गया’ म्हणजेच बिहारमधील प्रसिद्ध पितृश्राद्ध तीर्थ ऐकले असेल. मात्र, आईसाठी म्हणजेच मातृश्राद्धासाठी जे स्थान अखंड भारतात सर्वश्रेष्ठ आणि एकमेव मानले जाते, ते म्हणजे गुजरातमधील सिद्धपूर. याच स्थळाला
‘मातृगया’ या नावानेही ओळखले जाते. गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यात वसलेले हे सिद्धपूर धार्मिक, पौराणिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे मातृश्राद्ध म्हणजेच मातृ आत्म्याच्या शांतीसाठी विशेष विधी पार पाडली जाते. हा अनुभव केवळ श्रद्धेचा नसून, अंतःकरणातून व्यक्त होणाऱ्या कृतज्ञतेचा असतो. सिद्धपूरचे पौराणिक महत्त्व अद्वितीय आहे. त्रिदेवांपैकी ब्रह्मदेवाचे एकमेव प्राचीन मंदिर येथेच होते, जे आजही त्या युगाची ऐतिहासिक साक्ष देते. येथील बिंदू सरोवर ब्रह्मदेवाच्या अश्रूंमधून निर्माण झाल्याचे मानले जाते. म्हणूनच हे तीर्थक्षेत्र विशेष मानले गेले आहे. सिद्धपूर हे असे स्थान आहे जिथे तप, श्राद्ध, स्नान आणि आत्मशांती एकत्रित अनुभवता येतात. येथे केवळ विधी होत नाही, तर अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त केली जाते. गया येथे पितृश्राद्ध केले जाते, हे सर्वश्रुत आहे. परंतु मातृश्राद्ध फक्त सिद्धपूर येथे केल्यासच त्याचे संपूर्ण फल मिळते, अशी दृढ श्रद्धा आहे. आपण नेहमीच वडिलांच्या ऋणाची आठवण ठेवतो, परंतु आईचे ऋण – जन्मदात्री म्हणून – हे खूप खोल आणि भावनिक असते. अशा मातेसाठी, तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी केली जाणारी विधी म्हणजे सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध होय. स्कंद पुराण आणि वायू पुराणात या स्थळाचा स्पष्ट उल्लेख ‘मातृगया’ म्हणून करण्यात आला आहे. सिद्धपूर येथे श्राद्ध विधीसाठी एक विशिष्ट पद्धत आहे. ही विधी संपूर्णपणे शास्त्रोक्त, विधिपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धेने फक्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, प.पू. चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पार पाडली जाते. येथे पं. महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या (मो. 9825561729, 9825504407) हे गेली तीस वर्षे अत्यंत श्रद्धेने आणि अनुभवाने मार्गदर्शन करणारे पंडित म्हणून कार्यरत आहेत. पालनपूर रेल्वे स्टेशनपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिंदू सरोवराजवळ ही संपूर्ण विधी पार पडते. विशेष बाब म्हणजे, फक्त ₹500 च्या नाममात्र शुल्कामध्ये खालील विधी अत्यंत भावनिकतेने आणि श्रद्धेने पार पाडल्या जातात: 1. त्रिपिंडी श्राद्ध 2. मातृगया पिंडदान 3. स्नान आणि तर्पण 4. भोजन. या सर्व विधींसाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागतो. विशेषतः, महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या यांच्याकडे या विधीच्या दरम्यान कोणताही शॉर्टकट अथवा व्यावसायिक दृष्टिकोन आढळत नाही. प्रत्येक विधी अत्यंत भावनात्मक, संपूर्ण श्रद्धेने आणि शास्त्रोक्त मंत्रोच्चारांसह पार पाडली जाते. यापूर्वी मी त्र्यंबकेश्वर येथे शिखरे गुरुजींकडे नारायण नागबली विधीचा अनुभव घेतलेला होता. तेव्हाही स्वामी समर्थ केंद्राच्या प्रयत्नांमुळे ती विधी पारदर्शकतेने व समाधानकारकपणे पूर्ण झाली होती. येथेही त्याच पातळीचा आणि अधिक श्रद्धेचा अनुभव आला. विशेषतः बिंदू सरोवराच्या परिसरात फिरताना, जेव्हा इतर ठिकाणी चाललेल्या विधी पाहिल्या, तेव्हा भाविकांशी बोलून असे लक्षात आले की सिद्धपूरमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होते आणि अत्यंत कमी वेळात विधी पार पाडली जातात. त्याच्या तुलनेत स्वामी समर्थ केंद्राच्या विधीत कुठेही फसवणूक अथवा आर्थिक शोषण नव्हते. ही केवळ धार्मिक विधी नव्हती, तर ती अंतःकरणातील कृतज्ञता आणि भावनेची अभिव्यक्ती होती. आपल्या आईने आपल्या आयुष्यात जे काही केले, त्याच्या ऋणाचे हे एक अध्यात्मिक उत्तर होते. सिद्धपूरचा हा अनुभव केवळ एक विधी न राहता, तो आयुष्यभर लक्षात राहणारा होतो. स्वामी समर्थ केंद्रामार्फत पार पडणाऱ्या या विधी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकतेपासून मुक्त असतात, हेच यांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात, जिथे श्रद्धेलाही व्यवसायाचे रूप दिले गेले आहे, तेथे अशा केंद्रामार्फत पार पडणाऱ्या विधीच खरे अध्यात्म दाखवतात. शेवटी एक भावनिक विचार – “वडिलांचे ऋण गया येथे फेडता येते, पण आईच्या ऋणाचे पूर्ण प्रायश्चित्त केवळ सिद्धपूरमध्येच शक्य आहे.” प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी सिद्धपूरमध्ये मातृश्राद्ध करणे आवश्यक आहे. ही केवळ धार्मिक बाब नसून, मानवी संस्कृतीतील ऋणपरंपरेचा सन्मान करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पं. महेंद्रभाई, हितेशभाई पंड्या यांचेद्वारे पार पडणारा हा अध्यात्मिक उपक्रम केवळ एक कर्मकांड न राहता, मातृत्वाच्या ऋणाची भावनिक परिपूर्ती होतो. ही विधी आपल्या जीवनात मातेकडून मिळालेल्या त्याग, ममता आणि प्रेमाची आठवण करून देणारा एक पवित्र क्षण असतो. आई आपल्याला जन्म देते, वाढवते, कधीही न थकता आपल्यासाठी जगते. तिच्या या अमर्याद प्रेमाचे ऋण आपण अशा श्रद्धाविधीद्वारेच थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो. सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध हे त्या अमूल्य ऋणाची भावनिक व अध्यात्मिक व्याख्या आहे. येथे जेव्हा आपण आपल्या आईच्या आत्म्यासाठी पिंड अर्पण करतो, तेव्हा केवळ मंत्रच नाही तर आपल्या अंतःकरणातील अश्रूही त्या जलात मिसळतात. हा उपक्रम मनाला स्पर्श करणारा, आत्म्याला हलवणारा आणि श्रद्धेने भरलेला अनुभव असतो. अशा पवित्र भूमीत, पवित्र उद्देशाने, पवित्र मनाने पार पडलेली ही विधी प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलीच पाहिजे, कारण “आईसारखी दुसरी कोणतीही देवी नाही.” सिद्धपूरच्या बिंदू सरोवरावरून परतणारा प्रत्येक भाविक केवळ समाधान घेऊनच परतत नाही, तर तो आपल्या जीवनात आईच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव घेऊन परततो… आणि त्याच्या ओठांवर फक्त एकच वाक्य असते — “मातृदेवो भव”… ✒️ – संदीप दा महाजन, पाचोरा – 7385108510
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.