पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका लॉजिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात युवक आणि युवती अश्लील अवस्थेत सापडल्याची घटना समोर येताच, समाजमनात एकाच वेळी आश्चर्य, संताप आणि चिंता अशा संमिश्र भावना उमटल्या. या घटनेने समाजातील अनेक पातळ्यांवर असलेली तुटलेली शिस्त, गढूळ नैतिकता आणि गढबडलेल्या व्यवस्थेचे वास्तव उघडे पाडले आहे. केवळ दोन व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न म्हणून ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. कारण ही घटना आपल्या समाजातील एका मोठ्या वळणाची नोंद करणारी आहे. या प्रकरणात युवक-युवती आक्षेपार्ह स्थितीत आढळले, हे जसे चिंताजनक आहे, तसेच हॉटेल चालकाने विश्वासाने आपल्या व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवली व्यवस्थापकाने कोणतीही अधिकृत ओळख न तपासता रूम उपलब्ध करून दिली, हे देखील तितकेच गंभीर आहे. हॉटेल व्यावसायिकांनी फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने कायद्याला बगल देऊन, कोणत्याही प्रकारच्या तपासणीशिवाय खोली भाड्याने देणे हा केवळ बेजबाबदारपणाच नव्हे, तर समाजहिताला धोका निर्माण करणारा प्रकार आहे. ग्राहकांची माहिती नोंदवहीमध्ये अपूर्ण होती, ओळखपत्रांची खातरजमा नव्हती, आणि कोणत्याही तपशीलांची शहानिशा केली नव्हती. या साऱ्या गोष्टी एकत्र आल्यावर लक्षात येते की अशा लॉजिंग व्यवसायांच्या मुळांमध्येच भ्रष्टाचार आणि गोंधळ दडलेला आहे. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पीएसआय योगेश गणगे, हवालदार संदीप राजपूत आणि विश्वास देशमुख यांनी तात्काळ आणि योग्य अशी छापेमारी करत कायद्यासमोर तथ्य ठेवले. ही कारवाई नक्कीच स्वागतार्ह आणि प्रशंसनीय आहे. मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे – ही कारवाई अपवाद होती की आता पासून नियमित नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे? अशा लॉजिंग्सवर सातत्याने तपासण्या व्हायला हव्यात. ग्राहक नोंदवही, ओळखपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी यासारख्या बाबींवर काटेकोर देखरेख ठेवली गेली पाहिजे.
या घटनेतील आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे काही तथाकथित भुरटे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अशा आबंट शौकीन जोडप्यांना रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉजिंगवर ‘नजर’ ठेवतात वेळे प्रसंगी तिथे येणाऱ्या अशा जोडप्यांना स्टाफच्या मदतीने त्यांची माहिती जमा करतात आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळतात ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते,परंतु पत्रकारितेच्या नावावर अशा व्यक्ती स्वतःच समाजाला काळिमा फासणाऱ्या ठरतात. अशी मंडळी पत्रकारितेच्या छत्राखाली स्वतःचा पोटापाण्याचा व्यवसाय चालवत असतील तर हे निंदनीयच नव्हे, तर गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु यासाठी अधिकृत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही कारण या सर्व गोष्टी “तेरी भी चूप मेरी भी चुप” अशा स्वरूपात असतात
एकीकडे लॉजिंग व्यवस्थापन बेजबाबदारपणे खोल्या देत आहे, तर दुसरीकडे अशी प्रकरणे हेरून काही भुरटी पत्रकार मंडळी पत्रकार संघटनेच्या नावाने ग्रुप तयार करणे व ‘पकड’ तयार करून पैसे कमावतात – यात शेवटी बळी पडतात ते युवक-युवती. & अनैतिक संबंध जोपासणारे वैवाहिक जोडपे या भडगाव रोड हॉटेल प्रकरणात युवक परधर्मीय असल्याची आणि युवती गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चुप्प राहीली नाही तर या प्रकरणाला वेगळे सामाजिक आणि धार्मिक वळण लागले असते.असतेच काही धर्मांध व कट्टरपंथीय गट अशा घटनांचा गैरफायदा घेत सामाजिक तेढ वाढवतात, द्वेषभावना पसरवतात आणि सामान्य नागरिकांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. याचा फटका सर्वसामान्य कुटुंबांना आणि मुलींच्या भविष्याला बसतो. अशा प्रकरणांमध्ये युवतीवर समाजाकडून अधिक मोठा दोष दिला जातो. तिच्या वर्तनावर, कपड्यांवर, बोलण्यात, वागण्यात शंभर प्रश्न विचारले जातात. तिच्या कुटुंबावर कलंक लागतो. समाज माध्यमांमध्ये तिची ओळख व्हायरल होते. अशा प्रसंगांमध्ये युवती मानसिकदृष्ट्या तुटून जाते, आत्महत्येच्या विचारापर्यंत जाते. तिचे शिक्षण, करिअर, वैवाहिक जीवन साऱ्याच गोष्टींवर याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच पोलिसांनी आणि माध्यमांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवणे हे कायदेशीरच नव्हे तर मानवीदृष्ट्याही आवश्यक आहे. या साऱ्या प्रकारामध्ये पालक आणि समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांकडे दोष देऊन भागणार नाही. पालकांनी आपल्या मुलांशी खुलेपणाने संवाद साधायला हवा, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांचा मानसिक आणि भावनिक कल कसा आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. प्रेम, स्नेह आणि योग्य मार्गदर्शनाने तरुणांना विश्वासात घेणे हे गरजेचे आहे. फक्त दबाव, शिस्त आणि शिक्षा यांच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना दूर लोटत असतो आणि ते अशा चुकीच्या वाटांकडे वळतात. या प्रकरणाने आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली – की समाज म्हणून आपण तुटलो आहोत. नैतिकता, नियम, जबाबदारी, सहिष्णुता या साऱ्या मूल्यांची आपल्याकडे उणीव आहे. हॉटेलचे व्यवस्थापन, पोलिस यंत्रणा, पत्रकारिता, पालक आणि समाज – सर्व घटकांनी एकत्र येऊन या समस्येच्या मुळावर मारायला हवे. नाहीतर अशा घटनांचा प्रादुर्भाव वाढत जाईल आणि हेच आपण उद्याचे समाज म्हणून पाहू इच्छितो का, हा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहील. लॉजिंगमध्ये घडलेली ही घटना केवळ पोलिस कारवाईचा भाग नाही. ही आपल्या समाजाच्या अधःपतनाची निशाणी आहे. ही एक चेतावणी आहे – ज्या पातळीवर समाज घसरतोय, त्या पातळीवर जर आपण आज विचार केला नाही, तर उद्याचा काळ आणखीनच भयावह ठरेल. म्हणूनच, फक्त घटना पाहणे पुरेसे नाही, तर त्या घटनांमागे दडलेले संदर्भ समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कायद्याचा धाक, नैतिकतेचे भान आणि समाजिक जबाबदारी यांची सांगड घालूनच आपण अशी घसरलेली परिस्थिती रोखू शकतो. अन्यथा अशा खोल्यांतून बाहेर पडणाऱ्या आवाजात भविष्यात संपूर्ण समाजाची प्रतिष्ठा गमावली जाईल, आणि तेव्हा पश्चातापाला उशीर झालेला असेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.