पाचोरा : शहरातील जुना आणि कायमचा अनुत्तरीत प्रश्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातगाडी, फळ-भाजी विक्रेत्यांचे व्यवस्थापन आणि वाहनतळ अभावी उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रश्न हे आजही तितक्याच तीव्रतेने नागरिकांच्या नजीक उभे आहेत. यासंदर्भात अनेकदा आलेले व गेलेले प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी फक्त चर्चेची पातळी गाठली; प्रत्यक्ष कायम स्वरूपी अंमलबजावणी मात्र कधीच दिसली नाही. परिणामी, या निष्क्रियतेचा व दुटप्पी धोरणांचा भडका अखेर एका शेतकऱ्याच्या कृतीतून उफाळून आला. शहरात कांदा विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या अरेरावीला वैतागून आपले वाहन पेटवण्याचा निर्धार घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.पाचोरा शहरातील केंद्रस्थानी असलेल्या बाजारपेठेत चारचाकी-दुचाकी वाहने आणि फळभाजी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी सततचा अनुभव आहे. या भागात कुठलीही अधिकृत आणि मान्यताप्राप्त वाहनतळ नसल्यामुळे पोलीस प्रशासनाची ‘नो-पार्किंग’ झोन कार्यवाही ही कायदेशीरदृष्ट्या प्रश्नचिन्हास्पद ठरते. त्यात भर म्हणजे विक्रेत्यांविषयी प्रशासनाची भूमिका एका बाजूला अती सहनशील आणि दुसऱ्या बाजूला अती कठोर ( सर्वाना सारखे नियम नसल्याने ) या अन्यायाचे गारुड अधिकच गडद होत आहे. विशेषतः एका विशिष्ट टोळीच्या विक्रेत्यांना अभय दिले जाते तर दुसऱ्या शेतकरी वर्गाला मात्र छळ सहन करावा लागतो. हुतात्मा स्मारकापासून ते कन्या शाळेपर्यंत, आणि नीलम हॉटेलपासून ते नगर परिषदेच्या भाजीपाला मार्केटपर्यंत – संपूर्ण परिसरात हातगाड्यांची, फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की पायी चालणेही कठीण झाले आहे. यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी, गैरसोय आणि गोंधळ याचा त्रास नागरिकांना तर होतोच; परंतु खरी झळ शिस्तीच्या नावाखाली दमवलेल्या गरीब शेतकऱ्यांना बसते नगरपरिषदेच्या भाजी मार्केटमध्ये दुकानांची डिपॉझिट आणि भाडेवसुली याबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. कोणाला किती भरावे लागते, कोणाकडून काय घेतले जात नाही – हे सर्व अज्ञात व अलिखित नियमानुसार चालते. पारदर्शकतेच्या नावावर छद्म नाट्य आणि निवडक लोकांसाठीच असलेले नियम हे चित्र अधिकच निराशाजनक आहे. अनेक दुकानांना वर्षानुवर्षे डिपॉझिट न भरता, भाडे न देता जागा वापरण्याची मुभा दिली गेली आहे, तर नवीन येणाऱ्या, विशेषतः ग्रामीण शेतकऱ्यांना कोणीही स्थान देण्यास तयार नाही. या सर्व गोंधळाच्या मुळाशी आहे नगरपरिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांची ‘भाकरी न फिरवणारी’ वृत्ती. ही मंडळी कायम स्वरूपी वर्षानुवर्षे एकाच काम कामजात असल्याने त्यांच्या सेटींगमुळे वेळोवेळी विक्रेत्यांकडून उघडपणे किंवा छुप्या स्वरूपात लाभ घेऊन त्यांच्यावर लक्ष न देण्याचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळेच बाजारपेठेतील शिस्तीचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः काही कर्मचारी कम अधिकाऱ्यांनी स्वतःला कायमस्वरूपी मालक समजून घेतले असून त्यांची चिरीमिरी आणि पक्षपाती कार्यपद्धती ही सर्व समस्यांचा केंद्रबिंदू आहे. अनेक वेळा शिस्त राखण्याच्या नावाखाली फक्त काही निवडक विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. बाकी लोक सेटींगच्या आधारे मोकळे फिरतात. परिणामी, निष्पाप विक्रेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे सध्या कार्यरत मुख्याधिकारी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छते संबंधी सध्याची कामगिरी अप्रतीम आहे. सफाई ठेकेदाराची निवड योग्य A+ झाल्याने रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व देखभाल चांगल्या प्रकारे केली जाते. मात्र, यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही.वाहन पार्कींग, हातगाडी नियंत्रण, विक्रेत्यांचे एकसंध नियमन यासंदर्भात कोणतीही ठोस कृती किंवा धोरणात्मक अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, एकंदरीतच या अनिर्णयामुळे परिस्थिती अधिक बिघडत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर काल 29 मे रोजी एक धक्कादायक प्रकार घडला. एका शेतकऱ्याने सकाळच्या सुमारास आपला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टरने शहरात आणला. अत्यल्प प्रमाणात आणलेला ताजा कांदा तो थेट ग्राहकांना विक्रीसाठी घेऊन आला होता. विक्रीस प्रारंभ होताच नगरपरिषदेचा कर्मचारी तेथे पोहोचला आणि अत्यंत उद्धटपणे त्या शेतकऱ्याशी वागू लागला.शाब्दिक चकमकीत काही कळायच्या आतच संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या वाहनावर पेटवण्याचा निर्धार केला. त्याच्या डोळ्यातली असहायता आणि संताप इतका तीव्र होता की आजूबाजूचे नागरिकही हतबुद्ध झाले. सुदैवाने वेळेवर पोलीस,न पा प्रशासनाचे अधिकारी पत्रकार आणि काही सामाजिक कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शेतकरी वर्गाचा आक्रोश समाजासमोर आणला. प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप न केला असता, एक मोठा अनुचित प्रसंग घडला असता. या घटनेनंतर भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे. हातगाडी, फळभाजी विक्रेत्यांसाठी स्पष्ट एकच धोरण व नियमावली असणे गरजेचे आहे आणि ती सर्वसामान्यांसाठी एकसारखी असली पाहिजे. ‘एकाला पोटाशी, दुसऱ्याला पाठीशी’ हे धोरण केवळ अन्यायाचे मूळ आहे. तसेच बाजारात सेटिंगवर चालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांच्यामुळेच प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. भाकरी फिरवल्यानंतर विशेषतः ‘चहा पेक्षा किटली गरम’ या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सावलीसुद्धा बाजारपेठेवर पडू न देणे हाच उत्तम उपाय ठरू शकतो.शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याने आपल्या श्रमाच्या बदल्यात मिळालेली भाजी बाजारात आणून विकण्यासाठी एवढे कष्ट केले आणि त्या बदल्यात जर त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली, तर हा समाज म्हणून आपल्यासाठी लाजिरवाणा क्षण आहे.अशा घटनांपासून प्रशासनाने शिकावे आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य विक्रेत्यांच्या सन्मानाचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वांसाठी एकच नियम असतील असे योग्य पावले उचलावीत, हीच सर्वांची अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात असेच प्रसंग अधिक तीव्र स्वरूप धारण करतील आणि त्याची जबाबदारी संपूर्णतः प्रशासनावरच राहील.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.