लट्टालूर ते खिद्रापूर : राष्ट्रकूट–शिलाहार संबंधांचा ऐतिहासिक सेतू – युवराज पाटील चोबळीकर

0

Loading

मागच्या महिन्यात मी खिद्रापूरचे सहकुटुंब पाहून आलो… अत्यंत देखणे, माझे तिथून पाय निघत नव्हते… आणि ऐतिहासिक गोष्टी पोटात घेवून हे मंदिर उभं आहे… मी गेली अनेक दिवस याचे संदर्भ शोधत होतो.. कमाल म्हणजे आमच्या लातूरचे अप्रत्यक्ष बंध असल्यामुळे थोडी प्रादेशिक अस्मिता जागी झाली, त्यातून लिहलेला हा लेख आहे….!!
महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाकडे पाहताना राष्ट्रकूट आणि शिलाहार ही दोन राजघराणी स्वतंत्रपणे अभ्यासली जातात; मात्र प्रत्यक्षात या दोहोंमधील नातेसंबंध हा केवळ राजकीय अधीनतेपुरता मर्यादित नसून, तो दख्खनच्या सांस्कृतिक, स्थापत्य आणि धार्मिक जडणघडणीचा कणा ठरलेला आहे. हा संबंध समजून घ्यायचा असेल, तर लातूर (प्राचीन लट्टालूर), तेर (प्राचीन तगर) आणि खिद्रापूर या तीन स्थळांना एकाच ऐतिहासिक रेषेत जोडून पाहावे लागते.
लट्टालूर हे राष्ट्रकूट घराण्याचे मूळ स्थान मानले जाते. ‘लट्टालूरपुरवराधीश्वर’ अशी उपाधी धारण करणाऱ्या राष्ट्रकूट सम्राटांनी येथूनच दख्खनच्या राजकारणाला आकार दिला. याच लट्टालूरपासून अवघ्या काही कोसांवर वसलेले तेर (तगर) हे प्राचीन व्यापारी नगर होते. रोम, इजिप्त आणि पश्चिम आशियाशी व्यापार करणाऱ्या या नगरातूनच पुढे शिलाहार राजघराण्याचा उदय झाला, ही बाब इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
तेर या नगराचे महत्त्व केवळ व्यापारी केंद्र म्हणून नव्हे, तर राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या भूमी म्हणूनही होते. शिलाहार राजे अभिमानाने स्वतःला ‘तगरपुरवराधीश्वर’ म्हणवून घेत असत. याचा अर्थ, त्यांची सत्ता केवळ कोकणात निर्माण झाली नसून, तिची मुळे दख्खनच्या पठारावर, तगरसारख्या समृद्ध नगरात खोलवर रुजलेली होती. याच तगरमधून शिलाहारांच्या तीन स्वतंत्र, पण परस्परांशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या शाखा निर्माण झाल्या….उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर शाखा.
उत्तर कोकण शाखेने ठाणे, मुंबई आणि आसपासचा परिसर व्यापला. पुरी किंवा राजपुरी ही त्यांची राजधानी होती. दक्षिण कोकण शाखेने रत्नागिरी–सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले, खारेपाटण (बलिपत्तन) हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. तर कोल्हापूर शाखेने करवीर, सातारा आणि सांगली परिसरावर सत्ता प्रस्थापित करून वळिवडे व पन्हाळा या ठिकाणांना राजकीय महत्त्व प्राप्त करून दिले.
या तिन्ही शाखांचा उगम एकाच भूमीत.,तेरमध्ये…झालेला असला, तरी त्यांच्या राजकीय वाटचालीमागे राष्ट्रकूट साम्राज्याचा स्पष्ट आश्रय होता. राष्ट्रकूट हे दख्खनचे सार्वभौम सम्राट होते आणि शिलाहार हे त्यांचे अत्यंत विश्वासू मांडलिक मानले जात. सम्राट तिसरा गोविंद याने उत्तर कोकण जिंकल्यानंतर तेथे आपला मांडलिक म्हणून पहिला कपर्दी याची नियुक्ती केली. ही नियुक्ती केवळ प्रशासकीय नव्हती, तर ती राष्ट्रकूट–शिलाहार विश्वासाच्या दृढ पायावर उभी होती.
दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती दिसते. राष्ट्रकूट सम्राट पहिला कृष्ण याने शिलाहार वीर सणफुल्ल याच्यावर त्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली. हे मांडलिकत्व इतके घट्ट होते की, पुढे राष्ट्रकूट साम्राज्याचा अस्त झाल्यानंतरही शिलाहार राजांनी आपल्या ताम्रपटांत राष्ट्रकूट सम्राटांची वंशावळ, उपाध्या आणि पराक्रम आदराने कोरून ठेवले. ही बाब त्यांच्या राजनिष्ठेचे आणि ऐतिहासिक स्मरणशीलतेचे द्योतक आहे.
या राजकीय अनुबंधाचा सर्वात ठळक आणि आजही दिसणारा ठसा म्हणजे स्थापत्यकलेचा वारसा. राष्ट्रकूट आणि शिलाहार यांच्या काळात महाराष्ट्रात जी मंदिरे, लेणी आणि शिल्पे निर्माण झाली, ती केवळ धार्मिक स्थळे नसून त्या काळच्या सौंदर्यदृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि सांस्कृतिक समन्वयाची साक्ष आहेत.
उत्तर कोकणातील अंबरनाथचे शिवमंदिर हे याचे उत्तम उदाहरण आहे. शिलाहार राजे चित्तराज आणि मुम्मुणी यांनी बांधलेल्या या मंदिरात राष्ट्रकूटकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. कोरीवकाम, प्रमाणबद्ध रचना आणि शिल्पांची सजीवता यामुळे हे मंदिर दख्खन स्थापत्याचा मानबिंदू ठरते.
मुंबईजवळील घारपुरी (एलिफंटा) लेणी ही राष्ट्रकूट आश्रयाखाली आणि शिलाहार सहभागातून विकसित झाल्याचे अनेक इतिहासकार मानतात. येथील ‘त्रिमूर्ती’ शिल्प हे केवळ शैव परंपरेचे प्रतीक नसून, भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च टप्पा मानले जाते.
या सगळ्या परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे खिद्रापूरचे कोप्पेश्वर मंदिर. कोल्हापूरच्या शिलाहार राजांनी उभारलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा जिवंत ग्रंथच आहे. मंदिराचा स्वर्गमंडप, अधिष्ठानावरील ९५ हत्तींच्या मूर्तींचे गजपीठ, तसेच भिंतींवरील सूक्ष्म शिल्पकाम पाहताना शिलाहार राजांच्या कलारसिकतेचा प्रत्यय येतो. म्हणूनच या मंदिराला योग्य अर्थाने ‘दक्षिणेचे छोटे खजुराहो’ असे म्हटले जाते.
शिलाहारांचे योगदान केवळ स्थापत्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सांस्कृतिक समन्वय आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला त्यांनी दान दिलेच, पण त्याचबरोबर जैन बस्त्या आणि बौद्ध विहारांनाही आश्रय दिला. विविध धर्म, पंथ आणि विचारधारांना एकत्र नांदवणारी ही परंपरा त्या काळातील सामाजिक समतोल दर्शवते.
साहित्य क्षेत्रातही शिलाहारांनी मोलाचे योगदान दिले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजाने लिहिलेली ‘अपरार्क’ ही याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर काश्मीरपर्यंत पोहोचली होती. यावरून त्या काळातील बौद्धिक देवाणघेवाणीची व्याप्ती लक्षात येते.
आज लातूरच्या लट्टालूरपासून सुरू होणारा हा इतिहासाचा प्रवास, तेरच्या तगरमार्गे खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतो, तेव्हा जाणवते की हा केवळ राजसत्तांचा आलेख नाही. हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतींचा, कलात्मक परंपरेचा आणि धार्मिक उदारतेचा ऐतिहासिक सेतू आहे. ‘तगर ते कोकण’ आणि ‘लट्टालूर ते करवीर’ अशी ही अखंड परंपरा आजही आपल्या लेण्यांत, मंदिरांत आणि शिलालेखांत जिवंत आहे. फक्त्त ती अस्ताव्यस्त आणि विस्तीर्ण भूपट्यावर विस्तारलेली आहे… खूप फिरावं लागेल आणि दस्ताऐवज एकत्र करावा लागेल… खूप मोठा ऐतिहासिक खजिना आहे हे नक्की….!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here