Home Blog Page 147

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – ब्रिजेश सिंह

0

Loading

नागपूर, दि. 18:माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान अधिक माहिती सक्षम होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाच्या मर्यादा आता AI च्या साहाय्याने कमी होत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर न राहता त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या कामात त्याचा योग्य उपयोग करून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात श्री. ब्रिजेश सिंह बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते.कार्यक्रमाला नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, तसेच दयानंद कांबळे उपस्थित होते.

तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होत नाहीत, नवीन संधी निर्माण होतात – ब्रिजेश सिंह

श्री. ब्रिजेश सिंह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, तंत्रज्ञानामुळे नेहमीच नवीन संधी निर्माण होतात, याचा अनुभव आपण याआधीही घेतला आहे. AI च्या संदर्भातही अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला गेला नाही तर नोकऱ्या गमावण्याचा धोका अधिक आहे.

AI च्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीस गांभीर्याने पडताळून, तिचे नैतिक आणि संवैधानिक दृष्टिकोनातून परीक्षण करूनच वापरावे, असेही त्यांनी सुचवले.

भ्रमित संदेश आणि आर्थिक फसवणूक यापासून सावधगिरीची गरज

विविध समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लोक चुकीच्या संदेशांना बळी पडत आहेत. यामुळे आर्थिक फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरीने AI चा उपयोग केला पाहिजे, असे सांगत श्री. ब्रिजेश सिंह यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करताना मानवतेच्या दृष्टीकोनातून संवेदनशीलता राखण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

AI च्या उपयोगासाठी पत्रकारांनी अधिक सक्षम होणे गरजेचे – राहुल पांडे

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले की, भारत विरोधी कृत्ये टाळण्यासाठी भारतीय पद्धतीने AI विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेलाही AI शी जोडून अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनी आपल्या गुणवत्तेसोबतच AI चा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले.

जळगावमधील पत्रकारांसाठी ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ

जळगाव जिल्हा नियोजन कार्यालयात या व्याख्यानाचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध पत्रकारांनी याचा लाभ घेतला. या व्याख्यानावर जळगावमधील प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया

किशोर पाटील, जळगाव, ब्युरो, टी 9 मराठी:
“खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले. पत्रकारितेत कशा पद्धतीने बहुआयामी बदल होत आहेत आणि त्याला अनुसरून AI किंवा इतर सर्व या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्या आत्मसात करण्याची गरज आहे. सरांचे मार्गदर्शन ऐकल्यावर आपण खरंच खूप मागे पडलो आहोत, असे जाणवले. काळासोबत राहण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन सरांकडून मिळाले. पत्रकारितेतील आणि त्याला अनुरूप तंत्रज्ञानातील होणारे बदल समजले. यासाठी वेळोवेळी अशा व्याख्यान आणि कार्यक्रमांची मोठी गरज आहे.”

गौरव राणे, मीडिया कर्मी, जळगाव:
“AI सोबत पत्रकारिता गेल्या दीड वर्षापासून अनुभवत आहे. जय महाराष्ट्र, टाईम्स नाऊ मराठी, News18 लोकल सोबत काम करत असताना AI चा नाव समोर आले. हळूहळू काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम शिकायला मिळाले. पण त्यापेक्षा AI खूप मोठे आहे! हे समजून घेऊन पत्रकारिता पुढे न्यावी लागेल. अनेक नवीन बाबी समजल्या, अर्थात पूर्ण बघू शकलो नाही, दिल्लीमध्ये असल्याने! पण सुंदर उपक्रम! धन्यवाद नव्या माहितीसाठी.”

मोहन दुबे, रिपोर्टर, News Nation/NEWS स्टेट महाराष्ट्र, जळगाव:
“खरं तर आजकाल पत्रकारितेची व्याख्या दिवसेंदिवस बदलत आहे. अशातच आता AI पद्धती येऊ घातल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानासोबत पत्रकारिता करणे म्हणजे एक आव्हानच आहे. तंत्रज्ञानाशी जुळवून घेत येणाऱ्या काळात पत्रकारिता कशी करावी हे या व्याख्यानातून अवगत झाले. असे व्याख्यान होणे फार महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आताच्या नवीन पिढीतील तरुणांना आणि पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आपल्यातील पत्रकार जिवंत ठेवायचा असेल तर तंत्रज्ञानाला सोबत घेऊन योग्य ती माहिती मिळवून पत्रकारिता केलेली बरी.”

विजय पाठक, फ्री प्रेस जर्नल, जळगाव:
“आज तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सध्या चर्चेत आहे. विविध क्षेत्रांत याचा उपयोग केला जात आहे. पत्रकारिता क्षेत्रातदेखील या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला सुरुवात झाली आहे. विषय तसा अत्यंत क्लिष्ट, पण अत्यंत सोप्या पद्धतीने ब्रिजेश सिंह साहेबांनी पत्रकारितेत याचा कसा वापर करायचा हे समजावले. एक चांगले भाषण ऐकण्याचा आज आनंद मिळाला. याच्यातून विषय कठीण नाही, तर सोपा आहे, हे लक्षात आले. धन्यवाद!”

नरेंद्र पाटील, दै. पुढारी, प्रतिनिधी, जळगाव:
“AI विषयक सरांचे मार्गदर्शन ऐकले. ऐकून खूप काही माहिती मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आपण जे उच्चार करतो त्यामधून गूगल सर्च आपली प्रतिमा बनवून आपल्याला हवी तशी माहिती देते. म्हणजे आपल्या उच्चारांवर किती चांगला भर द्यावा, हे समजले. दुसरी गोष्ट, AI ची माहिती पडताळून घ्यावी, जसे 300 किंवा 1000 वर्षांपूर्वीची पुस्तके गूगलवर दिसतात, पण त्यांची सत्यताही पडताळून पाहावी, असे सरांनी सांगितले. आपल्या भाषेतून काही माहिती ट्रान्सलेट करावी, तिचा योग्य उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन मिळाले. अनेक टूल्स समजले व त्यांचा उपयोग कसा करावा हे शिकायला मिळाले.”

मनोज बारी, आवृत्ती प्रमुख, देशोन्नती, जळगाव:
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर ब्रिजेश सिंह यांचे अप्रतिम व्याख्यान अल्पकाळ असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे एकत्र बघता आले. भविष्यकाळ AI चाच आहे, असे एकंदरीत चित्र आहे. सर्व पत्रकारांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे देखील गरजेचे आहे. पुढील व्याख्यानाला नक्कीच पूर्णवेळ उपस्थित राहू. धन्यवाद जिमाका जळगाव.”

बांधकाम कामगारांना भांडी व ट्रंक वाटप श्रध्दाताई शिंदे यांचा बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम

0

Loading

सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : संत रोहिदास  चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा श्रध्दाताई शिंदे‌ यांच्यावतीने बांधकाम कामगारांना ‌भांडी व पेटी वाटप करण्यात आले. त्यांनी बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.
सदर उपक्रम केवळ बांधकाम कामगारांचा सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत करेल असे नाही तर त्यांचे जीवनमान सुधारण्यासही हातभार लावेल. या उपक्रमाद्वारे कामगारांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबासह चांगले जीवन जगू शकतील.
सदर उपक्रम केवळ कामगारांसाठीच नाही तर समाजासाठीही एक सकारात्मक विचारांचे पाऊल आहे, याचे कौतुक करायला हवे. हा उपक्रम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यास हातभार लावेल.

‘एक देश, एक निवडणूक’ साठी जेपीसीची स्थापना २१ सदस्यांच्या समितीचे चौधरी अध्यक्ष

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘एक देश, एक निवडणुक’ साठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) स्थापना करण्यात आली आहे. ३१ सदस्यीय जेपीसीमध्ये अनुराव ठाकुर आणि प्रियांका गांधी या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपचे संसदपटू पीपी चौधरी असतील. ‘एक देश, एक निवडणुक’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आता ते संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे.

जेपीसीच्या शिफारशी मिळाल्यानंतर ते संसदेत मंजूर करून घेण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे पुढील आव्हान असेल. ‘एक देश, एक निवडणुक’शी संबंधित विधेयक हे घटना दुरुस्ती विधेयक असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असेल. कलम ३६८(२) अन्वये, घटनादुरुस्तीसाठी विशेष बहुमत आवश्यक आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक सभागृहात, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने विधेयक मंजूर करावे लागेल.

या विधेयकाने भारताची संघराज्य संरचना, संविधानाची मूलभूत रचना आणि लोकशाहीची तत्त्वे यावर मोठ्या प्रमाणावर कायदेशीर आणि घटनात्मक वादविवाद सुरू केले आहेत. लोकसभेबरोबरच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेतल्याने राज्यांच्या स्वायत्ततेवर परिणाम होईल आणि सत्तेच्या केंद्रीकरणाची परिस्थिती निर्माण होईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या प्रस्तावाचा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांवर, जसे की फेडरल संरचना आणि लोकशाही प्रतिनिधित्वावर परिणाम होतो का, याकडेही कायदेतज्ज्ञांचे लक्ष आहे.

काँग्रेस या विधेयकाला संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला मानते. हे विधेयक म्हणजे देशात ‘हुकूमशाही’ आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी हे विधेयक असंवैधानिक म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘ही विधेयके घटनाबाह्य आहेत. हे आपल्या राष्ट्राच्या संघराज्याच्या विरोधात आहे. आमचा या विधेयकाला विरोध आहे.

जेपीसीमध्ये कोण कोण आहेत?

१. पी.पी. चौधरी (भाजप)
२. डॉ. सीएम रमेश (भाजप)
३. बन्सुरी स्वराज (भाजप)
४. परशोत्तमभाई रुपाला (भाजप)
५. अनुराग सिंग ठाकूर (भाजप)
६. विष्णू दयाल राम (भाजप)
७. भर्तृहरि महताब (भाजप)
८. डॉ. संबित पात्रा (भाजप)
९. अनिल बलूनी (भाजप)
१०. विष्णू दत्त शर्मा (भाजप)
११. प्रियांका गांधी वाड्रा (काँग्रेस)
१२. मनीष तिवारी (काँग्रेस)
१३. सुखदेव भगत (काँग्रेस)
१४. धर्मेंद्र यादव (समाजवादी पक्ष)
१५. कल्याण बॅनर्जी (टीएमसी)
१६. टी.एम. सेल्वागणपति (डीएमके)
१७. जीएम हरीश बालयोगी (टीडीपी)
१८. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-शरद पवार)
१९. डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना)
२०. चंदन चौहान (आरएलडी)
२१. बालाशोवरी वल्लभनेनी (जनसेना पार्टी)

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-२ केंद्रातून ‘मोक्ष’ प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘मोक्ष’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच माणूस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा या संस्थेच्या ‘हायब्रीड’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक रमाकांत जाधव (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक-१९६० रोजी), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रदीप पाटील (नाटक-मोक्ष) द्वितीय पारितोषिक केतन दुधवडकर (नाटक- रेड अंब्रेला), रंगभूषा प्रथम पारितोषिक वासुदेव आंब्रे (नाटक- जगज्जेता), द्वितीय पारितोषिक उल्लेश खंदारे (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक महेंद्र कुरघोडे (नाटक- मोक्ष) व नेहा अष्टपुत्रे (नाटक- पूर्णविराम), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शिवानी पेडणेकर (नाटक- हायब्रीड), प्रेरणा खेडेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), तेजश्री दाभोळकर (नाटक- म्याडम), भारती परमार (नाटक- मोक्ष), प्रथमेश भाट (नाटक-मोक्ष), डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स), अक्षय भोसले (नाटक – शोकांतिकेची रात्र), निनाद चिटणीस (नाटक- साती साती पन्नास)

दि. ६ डिसेंबर, २०२४ ते १८ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संजय दखणे, श्री. संजय कुळकर्णी आणि श्रीमती अर्चना कुबेर यांनी  तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

“लोकशाही दिन सप्ताहांतर्गत आ किशोरआप्पा पाचोरा तालुक्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन”

1

Loading

पाचोराप्रशासनिक सुधार आणि लोक शिकायत विभाग, भारत सरकारच्या कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयामार्फत “गुड गव्हर्नन्स वीक” अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” ही विशेष मोहीम दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पाचोरा तालुक्यात मंडळ स्तरावर नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा, प्रशासकीय अभिप्राय घेणे, शासकीय योजनांची माहिती देणे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी विविध मंडळ मुख्यालयांवर विशेष लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.00 वाजता पाचोरा, कुऱ्हाड खुर्द, गाळण बुद्रुक, नगरदेवळा बुद्रुक, नांद्रा, पिंपळगाव, लोहटार, वरखेडी बुद्रुक आणि शिंदाड येथे ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत.या विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी पाचोरा तालुका स्तरावर साजरा होणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 वाजता लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय विधानसभा सदस्य किशोरआप्पा पाटील भूषविणार असून, तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या प्रलंबित अर्जांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांना त्या योजनांचा अधिकाधिक लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाईल.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन आणि पदाधिकारी, प्रगतीशील शेतकरी, मान्यवर पत्रकार, लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा एक महत्वपूर्ण उपक्रम असून, याद्वारे स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रशासनाशी थेट संवाद साधावा आणि आपल्या समस्या मांडून त्यावर उपाय शोधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.गुड गव्हर्नन्स वीकच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास आणि संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

भोजनालय ( मेस ) & कार्यालयीन तसेच घर कामासाठी अनुभवी महिला – पुरुष कर्मचारी पाहीजेत

0

Loading

1) कार्यालय व सफाई कामासाठी   1मुलगा
2) घरकामासाठी:  2 महिला पाहीजेत
तसेच
3) मेस स्वयंपाक 1 &                   सफाई कामासाठी 1                            शाकाहारी/मांसाहारी भोजनालयासाठी  अनुभवी 1 महिला / 1पुरुष
4) डबे पोहोचवण्यासाठी व मेसच्या इतर कामासाठी:1मुलगा पाहिजे                                  इच्छुकांना  कामकाजा बाबत माहीती & पगार संदर्भात चर्चा करायची असल्यास (फोन वरून चौकशी करू न करता)
दि. 21/12/24 शनिवारी दुपारी 3 ते 6
दि 22/12/24 रविवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रत्यक्ष यावेत
संपर्क:  संदीप महाजन
ध्येय करिअर ॲकेडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, गो से हायस्कूल मागे जुन्या पाण्याच्या टाकीच्या समोर   पाचोरा       जि जळगाव येथे यावे
मो.: 7385108510 / 7588645907

अर्धांगिनीला marriage anniversary च्या  हार्दिक शुभेच्छा

1

Loading

प्रिय शितल,
आज आपल्या 31 वर्षे सहजीवनाचा हा खास दिवस—आपल्या लग्नाचा वाढदिवस! हा दिवस मला पुन्हा त्या सुंदर क्षणाची आठवण करून देतो, जेव्हा आपण एकमेकांचे होतो. त्या दिवसापासून तुझ्या सहवासाने माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर, अर्थपूर्ण आणि आनंददायी झाला आहे.
तुझ्या प्रेमाने माझ्या जीवनात रंग भरले, आणि तुझ्या साथीत मी जगण्याचा खरा अर्थ शिकलो. तुझा सहवास म्हणजे एक गोड सण आहे, जो रोज साजरा होतो. तुझ्या प्रत्येक गोष्टीत माया, कर्तव्य, आणि निस्वार्थ प्रेम दिसतं.
आपलं नातं जणू एका गोड गाण्याचं रूप आहे, ज्यामध्ये प्रत्येक सूर प्रेमाने गुंफलेला आहे. या प्रवासात कधी आनंदाच्या लहरी आल्या, तर कधी आव्हानांचे वादळ; पण तुझ्या हातातला हात कधीच सुटला नाही.
आजच्या या खास दिवशी, मी मनापासून प्रार्थना करतो की आपल्या सहजीवनाचा हा प्रवास असाच हसत-खेळत, प्रेमाने आणि समाधानाने भरलेला राहो. तू नेहमी माझ्या आयुष्याचा आनंद राहशील, आणि आपलं नातं दिवसेंदिवस अधिक गहिरं होत राहो.*
तुझा संदीप
शुभेच्छा:
“आयुष्याच्या प्रवासात आपण नेहमीसाठी एकत्र असू,
प्रत्येक क्षणाला आपल्या प्रेमाचा गोडवा लाभू,
तुझ्या हास्याने माझं आयुष्य उजळत राहो,
आणि आपलं नातं नेहमीच प्रेमाने बहरत राहो.”
   लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एमएलडीसी माजी विद्यार्थी संघटनेने “नाट्य गीत गायन” स्पर्धेची घोषणा

1

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एमएलडीसी माजी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांसाठी “नाट्य गीत गायन” स्पर्धा जाहीर केली आहे. सदर स्पर्धा खुला गट आणि महाविद्यालयीन गट अशा दोन गटात होणार आहे. खुल्या गटाची स्पर्धा रविवार, ५ जानेवारी, २०२५ रोजी, तर महाविद्यालयीन गट स्पर्धा शनिवार, ११ जानेवारी, २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही स्पर्धा सकाळी १० वाजता केशवराव घैसास सभागृह, एम एल डहाणूकर वाणिज्य महाविद्याल, विलेपार्ले येथे सुरू होतील.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. अधिक माहितीसाठी, इच्छुकांनी मिलिंद बागुल यांच्याशी 8097000625 किंवा माधवी कुलकर्णी 9869027699 या क्रमांकावर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत संपर्क साधावा.
एमएलडीसी ॲल्युमनी असोसिएशनचा मुंबईचे कार्यवाह स्वप्नील शेणवी यांनी सांगितले की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करण्याचा यशस्वी इतिहास आहे आणि त्यांना यावेळीही सहभागींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

रविचंद्रन आश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; २८७ सामन्यात ७६५ बळी; भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अाश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटसह २८७ सामने खेळले आणि ७६५ विकेट घेतल्या. आश्विन हा भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे ज्याने ९५३ विकेट्स घेतल्या आहेत.
गाबा कसोटी संपताच ३८ वर्षीय अश्विनने निवृत्ती जाहीर केली. तो कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेला पोहोचला. तो म्हणाला, भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून आज माझा शेवटचा दिवस होता. मी क्लब क्रिकेट खेळत राहीन.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, मी पर्थला आलो तेव्हा आश्विनने मला त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले. मी त्याला गुलाबी चेंडूच्या चाचणीपर्यंत संघात राहण्यास सांगितले. एखाद्या खेळाडूने निर्णय घेतला तर त्याचा आदर केला पाहिजे. तो उद्या भारतात परतणार आहे.
आश्विनने २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर ३७ वेळा पंचक अर्थात ५ विकेट आहेत आणि ८ वेळा मॅचमध्ये १० विकेट घेतल्या आहेत.  आश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. आश्विनने टी२०मध्ये ७२ विकेट घेतल्या आहेत.
एक फलंदाज म्हणून आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ३५०३ धावा केल्या आणि एकूण ६ कसोटी शतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची एकूण ८ शतके होती.
आश्विनच्या नावावर कसोटीत ३७ पंचक आहेत, जे भारतीय गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर कुंबळेचा क्रमांक येतो. कुंबळेने कसोटीतील ३५ डावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक डावात पाच विकेट्स घेण्याचा एकूण विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. असे त्याने ६७ वेळा केले. आश्विन शेन वॉर्नसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
आश्विनने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध ५३ सामने खेळले आणि १५० बळी घेतले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांच्याविरुद्ध आश्विनने ५० सामन्यांत १४६ बळी घेतले आहेत.
आश्विनच्या नावावर ऑस्ट्रेलियात परदेशात सर्वाधिक विकेट आहेत. त्याने कांगारूंच्या घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ३८ सामने खेळले आणि ७१ बळी घेतले. याशिवाय त्याने श्रीलंकेत १६ सामन्यात ४९ बळी घेतले आहेत. आश्विनच्या नावावर भारताच्या १३१ सामन्यात ४७५ बळी आहेत.
आश्विनच्या निवृत्तीवर क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर प्रतिक्रिया
विराट कोहली – तुझ्यासोबत खेळतानाच्या सगळ्या आठवणी समोर आल्या. तुझ्यासोबतच्या प्रवासातील प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे.  भारतीय क्रिकेटचा एक दिग्गज म्हणून तुम्ही नेहमी स्मरणात राहशील. तुला आणि तुझ्या जवळच्या लोकांसाठी खूप आदर आणि खूप प्रेम. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मित्रा!
गौतम गंभीर – त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले, ‘तुला तरुण गोलंदाज ते आधुनिक क्रिकेटच्या दिग्गज बनताना पाहण्याचा बहुमान हा मी कधीही विसरणार नाही. मला माहित आहे की, येणाऱ्या पिढ्यांचे गोलंदाज म्हणतील की आश्विनमुळे मी गोलंदाज झालो! भावा तुझी सदैव आठवण येईल!’
दिनेश कार्तिक – उत्कृष्ट कारकिर्दीसाठी शाबासकी. तुझ्यासोबत खेळण्याचा मला अभिमान आहे. तामिळनाडूकडून खेळणारा तू नक्कीच महान खेळाडू आहेस.
हरभजन सिंग – अद्भुत क्रिकेट कारकिर्दीसाठी आश्विनचे अभिनंदन. कसोटी क्रिकेटपटू म्हणून तुमची महत्त्वाकांक्षा वाखाणण्याजोगी होती. एका दशकाहून अधिक काळ भारतीय फिरकीचा ध्वजवाहक असल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या यशाबद्दल खूप अभिमान आहे आणि तुम्हाला पुन्हापुन्हा भेटण्याची इच्छा आहे.
युवराज सिंग – आश्विन चांगला खेळ केला आणि एका अप्रतिम प्रवासासाठी अभिनंदन! जगातील सर्वोत्तम खेळाडूंना बाद करण्यापासून ते कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्यापर्यंत, तुम्ही संघासाठी उत्कृष्ट खेळाडू आहात. तुमच्या दुसर्‍या खेळीसाठी स्वागत आहे.
रवी शास्त्रीं – अरे ऍश, अप्रतिम कारकिर्दीसाठी अभिनंदन, ओल्ड बॉय. माझ्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात तू एक अमूल्य संपत्ती होतास आणि तुझ्या कौशल्याने आणि कामगिरीने खेळाला खूप समृद्ध केले.  देव तुला सदैव आशीर्वाद देईल.

ऐनपूर महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

0

Loading

ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव आणि प्रा. एस. पी. उमरीवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पूजनाचे कार्य मान्यवरांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमामध्ये प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. आपल्या भाषणात त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांची जाणीव करून देण्यावर आणि त्यासाठी संविधानाने दिलेल्या संरक्षणावर भर दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संविधानाने दिलेल्या विविध हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय अधिकारी डॉ. जे. पी. नेहेते, कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, प्रा. व्ही. एच. पाटील, तसेच हर्षल पाटील आणि श्रेयस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाने अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण केली आणि अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांविषयी असलेली माहिती व्यापक करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि उपस्थितांना संविधानाच्या महत्त्वाची आणि अल्पसंख्याक हक्कांच्या जतनाची जाणीव झाली. महाविद्यालयाच्या या प्रयत्नांमुळे समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव वाढीस लागली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!