Home Blog Page 158

सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप: १ डिसेंबर २०२४ पासून शेतकऱ्यांसाठी नवे युग

0

Loading

पाचोरा ( बातमी शेतकरी हिताची आहे कॉपी पेस्ट करण्यास हरकत नाही ) रब्बी हंगामाच्या प्रारंभासह, १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हे नवे ॲप कार्यान्वित केले आहे. या सुधारणेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद स्वतः आणि सहजगत्या करण्याची सुविधा मिळणार आहे.
सुधारित ई-पीक पाहणीचा संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार
यापूर्वी ई-पीक पाहणीसाठी जुने मोबाईल ॲप वापरले जात होते. मात्र, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता हे ॲप ‘ई-पीक पाहणी DCS’ या नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. यामुळे १००% पीक पाहणी हे नव्या सुधारणांसह मोबाईल ॲपद्वारेच केली जाणार आहे.
सुधारित प्रक्रियेची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांना आधी त्यांच्या पिकांची नोंद मोबाईल ॲपवर करण्याची सुविधा होती, तर उर्वरित पीक पाहणी तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. मात्र, नव्या सुधारित प्रक्रियेनुसार प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक नेमण्यात आला आहे.
सहाय्यकाची भूमिका:
हंगामाच्या पहिल्या दिवसापासून सहाय्यक शेतकऱ्यांसोबत राहील.
शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात सहाय्यक मदत करेल.
पीक पाहणी संबंधित तांत्रिक किंवा अन्य समस्यांचे समाधान देखील त्वरित केले जाईल.
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपची आवश्यकता
शेतकऱ्यांसाठी पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, आणि किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत पिकांची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकांची वेळेत नोंद होणे अत्यावश्यक आहे.
मोबाईल ॲपचे नवे नियम आणि वैशिष्ट्ये

  1. फोटो अपलोडिंग:
    शेतकऱ्यांना निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचे फोटो घेणे अनिवार्य आहे.

प्रत्येक पिकासाठी दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.

  1. पारदर्शकता:

यामुळे नोंदी अधिक प्रामाणिक आणि पारदर्शक राहतील.

शेतकऱ्यांच्या नावावरच पिकांची नोंद राहील.
सुधारित ॲपच्या फायद्यांविषयी महत्त्वाची माहिती
सुलभ नोंदणी: शेतकऱ्यांना आपापल्या मोबाईलवरून नोंदणी करता येईल.
तांत्रिक सहाय्य: अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सहाय्यकांची नियुक्ती.
सक्षमता: नोंदीतील अचूकता वाढून शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.
वेळेची बचत: शेतकऱ्यांचा वेळ वाचेल व प्रक्रिया गतिमान होईल.
शेतकऱ्यांसाठी सूचना
सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली पीक पाहणी हंगाम सुरू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. निश्चित वेळेत पीक नोंदणी न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
शासकीय योजनांचा लाभ कसा होईल?
पीक पाहणीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यास शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील:

  1. नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईसाठी सरळ आणि जलद प्रक्रिया.
  2. पीक कर्जासाठी बँकांची तत्काळ मंजुरी.
  3. पीक विम्याचा लाभ वेळेत मिळणे.
    • MSP अंतर्गत शासकीय खरेदीसाठी पात्रता.
      शेतकऱ्यांसाठी नव्या ॲपच्या वापराचे महत्त्व
      सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे अधिक सोपे होणार आहे. पीक पाहणी प्रक्रिया पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत होणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल.
      शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची सक्षमता वाढेल आणि महाराष्ट्र राज्याच्या कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हंगाम सुरू होताच सुधारित ॲपचा वापर करून पिकांची वेळेत नोंदणी करावी असे आवाहन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी पत्रकाव्दारे केले आहे

१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये पाकिस्तानची विजयाने सुरुवात, भारताचा ४३ धावांनी केला पराभव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्पर्धेतील प्रबळ दावेदार भारताचा ४३ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ विकेट गमावत २८१ धावा केल्या. शाहजेब खानने सर्वाधिक १५९ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात भारतीय क्रिकेट संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४७.१ षटकांत २३८ धावांवर सर्वबाद झाला. निखिल कुमारने ६७ धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर फहम आणि सुभान यांना प्रत्येकी २ यश मिळाले.

शाहजेबने आपल्या खेळीत १० षटकार आणि ५ चौकार लगावले. शाहजेब आणि सलामीवीर उस्मान खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी झाली. उस्मान ९४ चेंडूत ६० धावांची खेळी खेळून बाद झाला. पण, शाहजेब शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. त्याने मनमोकळेपणाने फलंदाजी करत १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शाहजेबने युवा एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा कामरान गुलाम (७) यांचा विक्रम मोडला. त्याने १० षटकार मारले. 

एकवेळ पाकिस्तानची धावसंख्या ४३.३ षटकांत ३ बाद २४१ धावा होती. असे असतानाही पाकिस्तान संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ५ षटकांत कसून गोलंदाजी करत पाकिस्तानला २८१ धावांवर रोखले. भारताकडून समर्थ नागराजने ३ आणि आयुष म्हात्रेने २ बळी घेतले. पाकिस्तानने शेवटच्या ५ षटकात ४ गडी गमावून ३३ धावा केल्या. 

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील भारतासाठी या सामन्यात खेळत होता, त्याला केवळ १ धाव करता आली. ज्याला अलीकडेच आयपीएल २०२५ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले होते. 

टी२० विश्वविक्रम: एकाच संघाच्या ११ जणांनी गोलंदाजी करत रचला विश्वविक्रम,जगात घडले पहिल्यांदाच तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० हा फलंदाजांचा खेळ… यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचेच विक्रम होतात. अशा स्थितीत कोणत्याही संघाने गोलंदाजीचा विक्रम केला तर नवलच नाही का? दिल्लीने सय्यद मुश्ताक अली टी२० चषक २०२४ मध्ये असाच एक विक्रम केला आहे. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करायला संधी दिली. टी२० क्रिकेटमधला हा विक्रम आहे. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या एसएमएटी टी२० स्पर्धेच्या सामन्यात दिल्लीने मणिपूरला २० षटकांत ८ गडी गमावून १२० धावांवर रोखले. या सामन्यात दिल्लीने यष्टिरक्षकासह सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी केली. याआधी, कोणत्याही संघाने कोणत्याही टी२० सामन्यात गोलंदाज म्हणून वापरलेल्या खेळाडूंची कमाल संख्या ९ होती. 

या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने सर्वांना चकित केले आणि सामन्यातील सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली. तो स्वतः संघाचा यष्टिरक्षक आहे. त्याने सामन्यात २ षटके टाकली आणि १ बळीही घेतला. बडोनीने एक निर्धाव षटकही टाकले. 

दिल्लीकडून दिग्वेश (२/८) आणि हर्ष त्यागी (२/११) यांनी चेंडूसह चांगली कामगिरी केली, तर प्रियांश आर्य (१/२) आणि आयुष सिंग (१/७) यांनीही विकेट घेतल्या. सर्व संसाधने वापरूनही दिल्लीला मणिपूरला सर्वबाद करता आले नाही. कसोटीतही असे एकदा घडले आहे. २००२ मध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी दिली होती. 

स्पर्धेच्या अन्य एका सामन्यात हार्दिक पांड्याने त्रिपुराविरुद्ध चांगली कामगिरी केली. हार्दिक या स्पर्धेत बडोद्याचे नेतृत्व करत असून त्याने त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात २३ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. 

पांड्याच्या झंझावाती फलंदाजीत पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता, डावखुरा फिरकी गोलंदाज पी सुलतानने एका षटकात सर्वाधिक २८ धावा केल्या. या षटकात पांड्याने ६, ०, ६, ६, ४, ६ धावा केल्या. म्हणजे षटकात पांड्याच्या बॅटमधून ४ षटकार आणि १ चौकार आला. पांड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे बडोद्याने त्रिपुराचे ११० धावांचे लक्ष्य अवघ्या ११.२ षटकांत पूर्ण केले.

यापूर्वी हार्दिक पांड्याने तमिळनाडूविरुद्ध अशीच पॉवर हिटिंग केली होती, जिथे त्याने ३० चेंडूत ६९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गुर्जपनीत सिंगने एका षटकात २९ धावा दिल्या होत्या. पांड्याने त्या षटकात सलग ४ षटकार मारले होते, यावरून पंड्याचा घातक फॉर्म दिसून येतो. या स्पर्धेमध्ये पांड्याने उत्तराखंडविरुद्ध २१ चेंडूत ४१ आणि गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत ७४ धावा अशा दोन नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळल्या होत्या. त्याचे सातत्यपूर्ण पॉवर हिटिंग हे या वर्षीच्या एसएमएटीचे प्रमुख आकर्षण आहे. पांड्याच्या या पॉवरपॅक कामगिरीच्या जोरावर बडोदा यंदा सय्यद मुश्ताक अली टी२० चषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. 

लोककलेतील भिष्मचार्य मधुकर नेराळे कालवश!

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील तमाशासह लोककलेचा आधारवड ठरलेले आणि लोककलेत आपली भिष्मचार्य‌ म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे (८१) यांचे मुंबईत सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ह्रदय विकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण तमाशा, लोककलाभूमी शोकाकुल झाली. लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटर एकाएकी पोरके झाल्याची भावना सर्वत्र पसरलेली दिसते.

नेराळे यांनी आयुष्यभर लोककलेच्या अस्तित्वासाठी स्वतःला वाहून घेतले. वडिलोपार्जित गिरणगावातील न्यू हनुमान थिएटरमध्ये १९६० पर्यंत पारंपरिक तमाशा कलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते अगदी मधु कांबीरकर पर्यंतच्या असंख्य कलावंताना ‘न्यू हनुमान थिएटर’ हे आधारवड ठरले. त्यामुळेच या कलावंतांचे भाग्य उदयाला आले. तमाशा हा खरा लोककलेचा चेहरा, परंतु कलेच्या अत्याधुनिक काळात तो हरवत चालला होता. परंतु मधूकर नेराळे यांनी तमाशा कलेवर‌ राज्यभर परिषदा, शिबीरे,संमेलने घेऊन त्या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांनी अनेक कलावंत घडविले आणि लोककलेच्या संस्था स्थापनेला प्रोत्साहन दिले. १९६९ च्या सुमारास स्वतःची यशराज लोक नाट्य संस्था स्थापन करून वगसम्राट, गाढवाचे लग्न, आतुन कीर्तन बाहेरून तमाशा, राजकारण गेले चूलीत, उदं ग अंबे उदं, पुनवेची रात्र काजळी अशी एकापेक्षा एक संगीत लोकनाट्य कला रसिकांपुढे आणून कलावंतांमध्ये‌ नवा आत्मविश्वास रुजविला. तमाशा कलावंतांचा लोकाश्रय संपला तेव्हा त्यांना न्यू हनुमान थिएटरमध्ये आश्रय तर‌ दिलाच, पण सरकारी अनुदान मिळवून देण्यासही पुढाकार घेतला. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर पुरस्कार ते अगदी २०२३ पर्यंत जपान येथील राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचे शेकडो सन्मान म्हणजे त्यांच्या लोककलेतील समर्पित जीवनाची साक्ष ठरतात. त्यांच्या निधनाने असंख्य कलावंतामध्ये लोककलेतील वटवृक्ष उन्मळून पडल्याची भावना कलाविश्वात विखुरलेली दिसते. त्यांच्या अंत्ययात्रेला कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘भारतीय संविधान अमृत महोत्सव’ मोठया उत्साहात साजरा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा अमृत महोत्सव संविधान दिन सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रीन क्लब अंतर्गत पदवी व पदव्युत्तर कला, वाणिज्य शाखेतील सर्व विभागातील प्राध्यापक, विद्यार्थिंनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठया उत्साहात साजरा केला.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख अतिथी लायन दारा पटेल पीजीडी यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले. तसेच उपस्थित विद्यार्थिनींना संविधानाचे महत्त्व सांगून यापुढे तुम्ही त्याचे पालन करणार याची शाश्वती घेतली. संविधानाबद्दल आदर प्रकट करत त्यानुसार आपले जीवन प्रेरित करावे असे मनोगतात त्यांनी सांगितले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस नमन करून संविधानाचे महत्त्व वर्गामध्ये सांगण्यात आले. संविधान दिनानिमित्त अनेक विद्यार्थिनींनी वर्गांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्याचबरोबर भारतीय संविधानातील घटना, महिलांचे कायदे, महिला सक्षमीकरण याविषयी देखील मुलींनी आपली मते व्यक्त केली. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श व संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरता संविधान उद्देशिकेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे हे महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींना संविधानाचे महत्त्व सांगणारी एक छोटी चित्रफित दाखविण्यात आली. यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता संपूर्ण महाविद्यालयात भित्तीपत्रके लावण्यात आली. संविधानावर आधारीत भित्तीपत्रके आणि घोषणापत्रके तयार करणारी स्पर्धां आयोजित करण्यात आली होती त्यात ५८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

पाचोरा DYSP कार्यालयातील ASI देवेंद्र दातीर सेवानिवृत्त; 31 वर्षांची निष्कलंक सेवा संपन्न

0

Loading

पाचोरा: पाचोरा उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) देवेंद्र दातीर हे वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या 31 वर्षांच्या दीर्घ पोलीस सेवेत त्यांनी निष्ठा, प्रामाणिकता आणि कर्तव्यपरायणतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.
व्यावसायिक प्रवास:
देवेंद्र दातीर यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण भुसावळ येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीराम दातीर असून ते भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथे सेवेत होते. 1994 साली देवेंद्र दातीर यांनी जळगाव येथे पोलीस दलात प्रवेश केला आणि त्यानंतर पाचोरा येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांनी संपूर्ण 31 वर्षांची सेवा पाचोरा विभागात विविध ठिकाणी केली. या कालावधीत त्यांच्यावर कधीही कोणताही दंड, शिस्तभंगाची कारवाई किंवा नोटीस झालेली नाही.
सेवेतील उल्लेखनीय कामगिरी:
त्यांच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीची दखल घेऊन 2021 साली महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, दिव्य मराठी पोलीस पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याचा विशेष गौरव झाला. पोलीस दलातील वरिष्ठांपासून सहकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर त्यांनी आपल्या कामगिरीने विश्वास निर्माण केला.
कौटुंबिक जीवन:
देवेंद्र दातीर यांना पत्नी व दोन मुली असून त्यांचे कुटुंब त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पाठबळ ठरणार आहे. त्यांच्या भविष्यातील योजना पोलीस दलाशी जोडलेल्या आहेत. पोलीस प्रशासनासाठी जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा ते निःसंकोच हजर राहतील, असे त्यांनी आपल्या भावनिक निवेदनात सांगितले.
सेवापूर्ती सोहळा व स्नेहसंमेलन:
सेवापूर्तीचा मुख्य कार्यक्रम 30 नोव्हेंबर 2024 रोजी पाचोरा पोलीस अधीक्षक कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस दलातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 8 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या स्नेही व कुटुंबीयांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईकांसाठी विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुभेच्छा व प्रार्थना:
देवेंद्र दातीर यांना त्यांच्या 31 वर्षांच्या निष्कलंक सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य सुखमय, आनंदी व निरोगी जावे, अशी सर्वांच्या मनःपूर्वक भावना आहे. पाचोरा पोलिस दलात त्यांनी ठेवलेला निष्ठेचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

संविधानाचे महत्त्व लक्षात घ्याडॉ.गणपतराव ढेंबरे

0

Loading

   ऐनपूर – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे  संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने हे होते.प्रमुख पाहुणे रासेयो विभागीय समन्वयक डॉ.जे.पी.नेहेते हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून रावेर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे व प्रा.सी.पी.गाढे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ.डी.बी.पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी आपल्या व्याख्यानात संगितले की,प्रत्येक भारतीय व्यक्तीने संविधान निर्मितीची प्रक्रिया नीटपणे समजून घेतली पाहिजे.संविधान आपल्याला अनेक हक्क देते तसेच संविधान आपल्याला कर्तव्याची जाणीव सुद्धा करून देते.भारतीय लोकशाही ही जगासाठी आदर्श आहे. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये संविधाना विषयीची जागरूकता निर्माण करणे हे आम्हा शिक्षकांचे काम आहे. समाजाला संविधानाचे महत्त्व सांगितले गेले पाहिजे.असे मत डाॅ जी आर ढेंबरे यांनी मांडले.
प्रा.सी.पी.गाढे यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मितीची प्रक्रिया विशद केली.होते.यासंविधानामुळेच समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळाला.अशी भावना आपल्या भाषणातून प्रा सी पी गाढे यांनी मांडली. प्रा.एस.पी.उमरीवाड यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करवून घेतले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संविधानामुळे आपली ओळख निर्माण झाली आहे. असे विचार व्यक्त केले.आभार प्रदर्शन प्रा एच एम बाविस्कर यांनी केले.
उपप्राचार्य डॉ.एस.एन.वैष्णव,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.रेखा पाटील,प्रा.डॉ.व्ही.एन.रामटेके, प्रा. डॉ एस बी पाटील, डॉ एस एन पाटील, डॉ महेन्द्र सोनवणे प्रा इंगळे डॉ.पी.आर.गवळी,प्रा.डॉ.संदीप सांळुके,प्रा.नरेंद्र मुळे,प्रा. अक्षय महाजन,प्रा.ज्ञानेश्वर कोळी,डॉ पी. आर. महाजन,प्रा प्रदिप तायडे,प्रा डॉ नीता वाणी आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग मार्फत आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ एस.बी.पाटील यांनी केले.भारतीय राज्यघटनेच्या जयघोषाने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

वाढती लोकसंख्या पर्यावरणास घातक: डॉ. जे. बी. अंजने यांचे प्रतिपादन

0

Loading

ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विश्व पर्यावरण संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्येच्या पर्यावरणावरील परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला, तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
     कार्यक्रमाची सुरुवात प्रा. हेमंत बाविस्कर यांच्या कुशल सूत्रसंचालनाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते, रावेर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणपतराव ढेंबरे व प्रा. सी. पी. गाढे उपस्थित होते.
       आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान किती महत्त्वाचे आहे यावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, “वाढती लोकसंख्या ही पर्यावरणासाठी मोठा धोका आहे. लोकसंख्या वाढीमुळे वृक्षतोड, जमिनीचे धूप, पाणीटंचाई, हवामानबदल यांसारख्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.”
     त्यांनी प्रत्येक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना स्वीकारून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. याशिवाय, लावलेल्या झाडांची निगा राखण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
     प्रमुख पाहुणे डॉ. जे. पी. नेहेते यांनी पर्यावरण संवर्धनासाठी रासेयोच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. गणपतराव ढेंबरे यांनी पर्यावरणीय आव्हानांवर मात करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाबद्दल सांगितले. प्रा. सी. पी. गाढे यांनी स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. एन. वैष्णव आणि प्रा. हेमंत बाविस्कर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. डी. बी. पाटील यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
     या कार्यक्रमाला प्रा. डॉ. रेखा पाटील, डॉ. पी. आर. महाजन, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. पी. आर. गवळी, प्रा. डॉ. संदीप साळुंखे, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांसारखे महाविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
    कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याच्या शपथेसह झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती निर्माण झाली असून, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढला आहे.
      विश्व पर्यावरण संवर्धन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रभावी ठरला. वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना या विषयांवर झालेली चर्चा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली.

भडगाव महसूल विभागाची मोठी कारवाई, तीन वाहनांवर जप्तीची कारवाई

0

Loading

भडगाव – पाचोरा विभागातील भडगाव महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री पाचोरा विभाग प्रांत अधिकारी श्री. भूषण अहिरे यांच्या आदेशानुसार आणि भडगाव तहसीलदार श्रीमती शितल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांनी धसका  घेतला आहे, आणि महसूल विभागाने अशा अवैध कार्यवाहीला आळा घालण्यासाठी आणखी कडक पावले उचलण्याची ग्वाही दिली आहे.
   भडगाव तहसील क्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीच्या बाबतीत बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने एक विशेष पथक तयार केले. पाचोरा विभाग प्रांत अधिकारी श्री. भूषण अहिरे यांच्या आदेशानुसार कारवाईच्या नियोजनावर एक गोपनीयता राखण्यात आली. भडगाव तहसीलदार श्रीमती शितल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुकीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले, ज्यांनी मध्यरात्री उशिरा कार्यवाही सुरू केली.
   पथकात पाचोरा विभागाचे मंडळ अधिकारी श्री. दिनेश येडे (गिरड विभाग), ग्राम महसूल अधिकारी श्री. सुनील मांडोळे (लोन प्र. ऊ.), तसेच भडगाव तहसील कार्यालयाचे इतर अधिकारी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाचे अधिकारी जसे की श्री. राहुल पवार (गिरड-टोणगाव), श्री. आशिष काकडे (जारगाव), श्री. महादू कोळी, श्री. विलास शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांच्या समवेत वाहन चालक श्री. लोकेश वाघ यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका पार केली.
     कारवाईची यंत्रणा अत्यंत चोख होती आणि सर्व कार्यवाही सुसंगत आणि निर्बाधपणे पार पडली. ट्रॅक्टर आणि डंपर जप्त करून ती तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आली. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहतुकीसाठी आवश्यक पुरावे जमा करण्यात आले.
  या कारवाईमध्ये तीन वाहनांची जप्ती करण्यात आली.
   या वाहतुकीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
1. डंपर क्र. 1 – विना नंबर plate असलेला पिवळ्या रंगाचा भारत बेंझ कंपनीचा डंपर. या वाहनाचा मालक शरद पाटील, भडगाव पेठ येथे राहत आहेत.
2. डंपर क्र. 2 – अशोक लेलँड कंपनीचा डंपर (MH 12 KP 3856 क्रमांक). या वाहनाचा मालक सागर महाजन, पाचोरा येथील रहिवासी आहेत.
3. डंपर क्र. 3 – अशोक लेलँड कंपनीचा दुसरा डंपर. या वाहनाचा मालक अजय सुरवाडे आहेत.
या वाहनांवरील कारवाई प्रशासनाच्या ठाम निर्णयावर आधारित होती, कारण या वाहनांचा वापर अवैध वाळू वाहतुकीसाठी केला जात होता.
  या कारवाईनंतर भडगाव क्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता आहे. महसूल विभागाने ही कारवाई कडक पद्धतीने पार पाडल्यामुळे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला विरोध करणारा संदेश दिला आहे. अनेक नागरिक या कारवाईचे स्वागत करत असून, ते म्हणतात की अशा प्रकारच्या कारवायांमुळे स्थानिक पर्यावरण आणि सरकारी नियमांची योग्य अंमलबजावणी होईल.
पाचोरा विभाग प्रांत अधिकारी श्री. भूषण अहिरे यांचे म्हणणे आहे की, “अवैध वाळू वाहतुकीविरोधी कारवाईला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. भविष्यात अशा कारवायांमध्ये आणखी अधिक कडक पावले उचलली जातील.”
श्रीमती शितल सोलट, भडगाव तहसीलदार, यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, “कडक पावले उचलून या प्रकाराच्या अवैध व्यवहारांचा हिशोब घेतला जाईल. आमच्या विभागाने कारवाईची तीव्रता अधिक करून या कृत्यांचा परिष्कृतपणे शोध घेतला आहे.”
   या कारवाईमुळे अनेक स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या पाऊलखुणांचे  स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, “अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे, आणि अशा प्रकारच्या कठोर कारवायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.”
  महसूल विभागाने अशा प्रकारच्या कारवायांसाठी निश्चित केलेल्या धोरणामुळे, पुढील काळात अवैध वाळू उत्खनन रोखण्यात मदत होईल, असे अनेक विश्लेषकांचे मत आहे.
भडगाव महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जे कठोर पाऊल उचलले आहे, ते निश्चितपणे इतर विभागांना मार्गदर्शन करणारे ठरेल. कारवाईची योजना अत्यंत गोपनीय होती आणि ती वेळेवर अंमलात आणण्यात आली. भविष्यात अशा आणखी कारवायांचा भाग होईल आणि अवैध वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी सरकारच्या इतर एजन्सीला देखील योगदान देण्याची आवश्यकता आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) ता.११ फेब्रुवारी ते ता.१८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा ता.२४ जानेवारी ते ता.१० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) ता.२१ फेब्रुवारी ते ता.१७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ता.३ फेब्रुवारी ते ता.२० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!