Home Blog Page 68

पाचोरा ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांना आलेली खंडणीची धमकी – एक गंभीर सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न

0

Loading

पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उपविभागीय शहर असून वैद्यकीय सेवा, शिक्षण, व्यापार, शेती व सामाजिक चळवळींसाठी ओळखले जाते. या शहराची प्रतिमा अनेक वर्षांपासून “सुसंस्कृत आणि चिकित्सकदृष्ट्या सजग शहर” म्हणून राहिलेली आहे. मात्र अलीकडे समोर आलेली एक धक्कादायक घटना – पाचोरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टाक यांना २ कोटींच्या खंडणीसाठी आलेली धमकी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची चेतावणी – ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठेवर घाला घालणारी आहे. डॉ. टाक यांना आलेली धमकी ही चिठ्ठी, ई-मेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून करण्यात आली. यात त्यांच्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून मागणी पूर्ण न केल्यास त्यांचे खोटे व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशी मागणी ही केवळ एक आर्थिक गुन्हा नसून, डॉक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर हल्ला आहे. या प्रकरणात डॉ. टाक यांनी तातडीने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून त्यांनी सुसंगत पुरावे देखील पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. या संदर्भात पाचोरा येथील पत्रकार व सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत संबंधित आरोपींना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन प्रशासनात दिले आहे तथापि, नागरिकांमध्ये यासंबंधी एक सशंकतेची भावना निर्माण झाली आहे की, केवळ स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत एवढ्या गुंतागुंतीच्या आणि डिजिटल स्वरूपाच्या गुन्ह्याचा सखोल तपास होईल का? पाचोरा पोलिसांची खरेतर कामगिरी चांगली असून विविध गुन्ह्यांत त्यांनी यशस्वी कारवाई केली आहे. परंतु, सायबर गुन्हेगारीचे वाढते स्वरूप आणि खंडणी मागण्यामागील नेटवर्क पाहता हे प्रकरण जिल्हा पातळीवरील स्थानिक गुन्हे शाखा (LCB), तसेच सायबर क्राईम युनिटकडे वर्ग करून युद्धपातळीवर तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. पाचोऱ्यासारख्या प्रगतशील शहरात अशा प्रकारचा खंडणीचा गुन्हा होणे ही स्वतःच चिंताजनक बाब आहे. हे प्रकरण वैयक्तिक वाटले तरी त्यामागे कोणते तरी संगठित रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराच्या वास्तविक मुळापर्यंत पोहोचणे, समाजासमोर तथ्य मांडणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. या प्रकरणामुळे शहरातील सरकारी रूग्णालयांची प्रतिमा, नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षिततेविषयीचा भाव यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही घटना पाचोऱ्याच्या सामाजिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी एकमेव मोठे उपचार केंद्र आहे. येथे दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी गर्दी करतात. परंतु रुग्णालयात सध्या काही भुरटे, पोटभरू व तोतया पत्रकारांनी ठाण मांडले असून, बिनधास्त वावर करताना दिसत आहेत. यामध्ये काही चिडीमार प्रवृत्तीच्या लोकांचाही सहभाग असून त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे डॉक्टरांवर दबाव टाकणे, त्रास देणे आणि स्वार्थासाठी बदनामी करणे, असे दिसते. डॉ. टाक यांच्या संदर्भातील घटनेचा या असामाजिक प्रवृत्तींशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वजण रुग्णालयाच्या आवारात बिनधास्त वावरत असल्याने तेथील सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने काही तातडीच्या सुरक्षा उपाययोजना हाती घेणे गरजेचे ठरते: CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, विशेषतः गेट, ऑपरेशन थिएटर, डॉक्टर केबिन, औषध वितरण केंद्र व गर्दीच्या जागी. असंबंधित व्यक्तींचा रुग्णालयात वावर बंद करण्यासाठी गेटवर ओळखपत्राधिष्ठित प्रवेश प्रक्रिया लागू करणे. तोतया पत्रकार, खंडणीखोर व चिडीमार यांचा वावर थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तातडीने मदत घेणे. रुग्णवाहिकेच्या अधिकृत चालकाशिवाय इतर व्यक्तींना पार्किंग व इमारतीच्या आसपास थांबण्यास मज्जाव करणे. डॉ. टाक हे मूळचे बाहेरगावचे असले तरी त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यदक्षतेने व निष्ठेने सेवा बजावली आहे. रुग्णसेवेप्रती त्यांची बांधिलकी पाहता, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करून खंडणी मागणे हे निंदनीय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल घेणे ही फक्त प्रशासनाची नव्हे तर वैद्यकीय संघटनांची देखील नैतिक जबाबदारी आहे. IMA, सरकारी डॉक्टर संघटना, MSFDA व इतर वैद्यकीय व्यासपीठांनी या प्रकरणात उघड पाठिंबा दर्शवून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत व मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत लेखी मागणी करणे गरजेचे आहे. डॉ. टाक यांच्यासारख्या जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना अश्लीलतेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या प्रवृत्ती ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गंभीर इशारा आहे. त्यामुळे पाचोऱ्यातील ही घटना ही फक्त स्थानिक तपासापुरती मर्यादित न ठेवता जिल्हा गुन्हे शाखा, सायबर क्राईम व गुप्तचर यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपासली गेली पाहिजे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, आरोपींना अटक करून समाजासमोर ठेवावे, डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि पाचोऱ्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला पुन्हा सन्मान मिळवून द्यावा, हीच वेळेची मागणी आहे.असे झाले तरच कोणतेही सक्षम व कर्तव्यनिष्ठ अधिकारी पाचोरा येथे आपली जबाबदारी पार पाडताना स्वतःला असुरक्षित व बाहेरगावचे असल्याने एकटे पडलो असे समजणार नाही

डॉक्टर टाक यांना खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा अहिर सुवर्णकार मंडळातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन

0

Loading

पाचोरा – शहरातील ग्रामीण रुग्णालयात निःस्वार्थी सेवा बजावणारे डॉक्टर टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पाचोरा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध घटकांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाचोरा तालुक्यातील समस्त सोनार समाज बांधवांच्या वतीने अहिर सुवर्णकार मंडळ यांच्यातर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात डॉक्टर टाक यांच्यावर झालेल्या अत्यंत गंभीर आणि अमानुष प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत, एका खोट्या नावावरून डॉक्टर टाक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले. अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकारामुळे डॉक्टर टाक यांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत. अहिर सुवर्णकार मंडळाने निवेदनाद्वारे प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत – 1) डॉक्टर टाक यांना नैतिक, मानसिक व कायदेशीर आधार मिळावा – अशा भीषण परिस्थितीत डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आवश्यक आहे. समाजाने आणि प्रशासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. 2) दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी – फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते. अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे. 3) सायबर गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी – या प्रकरणामध्ये सायबर गुन्ह्यांचा समावेश असल्याने तज्ज्ञांच्या मदतीने स्वतंत्र आणि पारदर्शक तपास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 4) समाजात जनजागृती व्हावी – अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी. निवेदन देताना अहिर सुवर्णकार मंडळाचे प्रमुख सदस्य आणि पाचोरा तालुक्यातील सोनार समाजातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रकार केवळ एका डॉक्टरवर हल्ला नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर आघात आहे. डॉक्टर हे समाजाचे आधारस्तंभ असतात आणि त्यांच्याविरुद्ध अशा नीच पद्धतीने खंडणी मागणे म्हणजे माणुसकीच्या नावाला काळिमा फासण्यासारखे आहे. या गंभीर प्रकारामुळे पाचोरा शहरात नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकीकडे डॉक्टर टाक यांच्यासारखे सेवाभावी व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र मेहनत घेतात, तर दुसरीकडे अशा सेवाभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अहिर सुवर्णकार मंडळाने सादर केलेले निवेदन हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि डॉक्टरांसारख्या सेवाभावी व्यक्तींच्या सन्मानासाठी लढा असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेऊन दोषींना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेविषयी विश्वास निर्माण व्हावा, हीच या निवेदनामागची मूळ भावना असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विधी जनजागृती शिबिर संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तालुका विधी सेवा समितीचे मा. अध्यक्ष आदरणीय निमसे साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली, बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूल येथे एक व्यापक व उपयुक्त विधी जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचा उपयोग व त्याचा प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकवर्गापर्यंत सर्वांसाठी हे शिबिर माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरले. या शिबिरामध्ये प्रमुख वक्त्यांपैकी एक प्रा. वैशाली बोरकर यांनी POSH ACT-2013 म्हणजेच “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व तक्रार निवारण कायदा” यावर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी या कायद्याच्या उद्दिष्टांपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. शाळेतील विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रा. बोरकर यांनी उदाहरणांच्या सहाय्याने कायद्याची व्याप्ती स्पष्ट करताना हे अधोरेखित केले की, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक, शारीरिक व भाषिक त्रासांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाऊ शकते आणि महिलांनी याबाबत सजग राहणे काळाची गरज आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रकाश विसपुते सर यांनी विधी विषयातील मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत उलगडून दाखवताना, शाळकरी वयातील विद्यार्थ्यांना कायदेशीर जाणीव व जाण असणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. त्यांनी कायदे केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्काचे संरक्षण करणारा एक मजबूत आधारस्तंभ आहे, हे स्पष्ट केले. महिलांच्या सुरक्षितता व गोपनीयतेचा अत्यंत संवेदनशील विषय मांडताना डॉ. सौ. सुनिता मांडोळे यांनी स्त्रीच्या सन्मानाची जपणूक करणारे अनेक कायदे समजावून सांगितले. समाजात अनेकदा महिलांना गोपनीयतेचा अभाव जाणवतो आणि त्यातूनच त्यांचे मानसिक व सामाजिक शोषण होते. त्यामुळे महिलांनी आपल्या हक्कांची आणि कायद्याच्या संरक्षणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. बालकांच्या सुरक्षेचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बॅड टच आणि गुड टच या विषयावर सौ. ललिता पाटील यांनी मार्गदर्शन करताना बालकांशी संवाद साधला. त्यांनी मुलामुलींना त्यांच्या शरीरासंदर्भात काय योग्य आहे व काय अयोग्य, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बालकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता विश्वासू मोठ्यांशी बोलण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या सत्राने उपस्थित पालकवर्ग व शिक्षकांनाही बालसुरक्षेच्या बाबतीत जागरूक केले. POCSO ACT म्हणजेच “बालकांवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा” या विषयावर ॲड. भाग्यश्री महाजन यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १८ वर्षांखालील मुलामुलींवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळवणुकीवर हा कायदा कठोर शिक्षेची तरतूद करतो. यामध्ये मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांची जबाबदारी घेणाऱ्या प्रौढांची जबाबदारी या दोन्हींचा समावेश असतो. शाळा, महाविद्यालये व इतर शिक्षण संस्थांनीही या कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका विधी सेवा समितीचे कार्य व त्याचे फायदे या विषयावर ॲड. अंकुश कट्यारे यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी विधी सेवा समिती म्हणजे काय, ती कोणासाठी काम करते, तिच्या कार्यपद्धती काय आहेत, याची माहिती दिली. अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे काम विधी सेवा समिती करत असते. शाळांमधूनही या माध्यमातून जनजागृती होणे हे समाजहितासाठी आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. कुमारावस्थेत व युवा अवस्थेत शरीरात होणारे जैविक व मानसिक बदल आणि त्यादृष्टीने घ्यावयाची काळजी या विषयावर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत संवेदनशीलतेने व आत्मियतेने समजावले की, या वयातील शारीरिक व मानसिक बदल नैसर्गिक असून त्याकडे चुकीच्या नजरेने पाहू नये. विद्यार्थ्यांनी याकाळात सकारात्मक सवयी अंगीकाराव्यात व सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया व्यसनापासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष ताहेर भाई कपाशी, उपाध्यक्ष मुस्तफा भाई लाकडावाला, CEO बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, उपप्राचार्या सौ. अश्विनी सोमपूरकर यांच्यासह संपूर्ण शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी शाळेच्या पातळीवरून विद्यार्थीहिताच्या व कायदेसाक्षरतेच्या या उपक्रमात पूर्ण जबाबदारीने सहभाग घेतला. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर ज्ञानाची जाणीव निर्माण झाली. विशेषतः मुलींसाठी POSH व POCSO कायद्यांविषयी सखोल माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व सुरक्षिततेचा भाव वाढला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण बुरहाण इंग्लिश मिडियम स्कूल परिवाराचे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पाचोरा यांनी विशेष कौतुक केले. अशा प्रकारचे शिबिरे शाळांमध्ये वेळोवेळी होणे अत्यावश्यक असून, यामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही सशक्त होतात. कायद्याच्या अंधारात वावरणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रकाश पोहोचवणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व आजच्या काळात अधिकच वाढले आहे. बुरहाण इंग्लिश मिडियम स्कूलने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे अत्युत्तम उदाहरण सादर केले आहे.

माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प : पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक उपक्रमांचे भव्य पाऊल

0

Loading

भडगाव – आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. याच भावनेतून प्रेरित होत, माऊली फाउंडेशन या सामाजिक संस्थेने २०२५ या वर्षात ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हाती घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून या अभियानाची सुरुवात झाली असून, या उपक्रमाला भडगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ नुकताच साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड, भडगाव येथे झाला. या उद्घाटनप्रसंगी माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, तसेच मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक आणि माऊली फाउंडेशनचा समर्पित सहकारी वृंद हे सर्वजण प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी परिसरात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, फक्त लागवडीपुरतेच हे कार्य मर्यादित न राहता, त्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही या फाउंडेशनने केला आहे. “सजीव सृष्टी टिकवायची असेल तर निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संगोपन.” – असे विचार या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या संकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माऊली फाउंडेशन फक्त वृक्षारोपण करून थांबत नाही, तर त्या झाडांची वाढ, संरक्षण व निगा यासाठी विशेष समिती स्थापणार आहे. प्रत्येक झाडाचे दत्तकत्व स्थानिक स्वयंसेवकांना देण्यात येणार असून त्याच्या वाढीचा कालावधी, देखरेख आणि त्यावर होणाऱ्या बदलांचा लेखाजोखा ठेवण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मनोहर सूर्यवंशी होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आपल्या देशात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु त्यातील फारच थोड्या झाडांचे संगोपन होते. म्हणूनच आमच्या फाउंडेशनने केवळ वृक्ष लागवड न करता ‘संगोपन’ या शब्दाला सुद्धा समान महत्त्व देत ५०१ झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. हे झाडे केवळ पर्यावरणच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य, हवामानाचे संतुलन आणि जैवविविधतेचे रक्षण करणारे ठरणार आहेत.” कार्यक्रमात उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सांगितले की, “माऊली फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम असे विविध उपक्रम सतत राबवले जातात. आता पर्यावरण रक्षणासाठी फाउंडेशनने हे भव्य पाऊल उचलले असून हे फक्त एक दिवसाचे काम नाही, तर हे एक दीर्घकालीन अभियान आहे. यातूनच खरी सामाजिक जबाबदारी पार पाडली जाणार आहे.” संचालिका संगिता जाधव यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “या वृक्षांची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. झाडे लावून फोटो काढणे ही काही शेवटची प्रक्रिया नाही, तर त्यांच्याबरोबर आपल्या मनाचे नाते निर्माण होणे आणि त्यांना जिवंत ठेवणे हाच खरा मानवतेचा खरा धर्म आहे.” नगरसेविका योजना पाटील यांनी सांगितले, “भडगावसारख्या ग्रामीण भागात वृक्ष लागवडीचा मोठा फायदा होतो. जलसंधारण, जमिनीत आर्द्रता टिकवणे, पक्ष्यांना आश्रय देणे, शुद्ध हवा यासाठी ही झाडे उपयुक्त ठरतात. माऊली फाउंडेशनचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून नगरपरिषदही भविष्यात यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे.” शिवराम पाटील, मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ यांनीही आपले विचार व्यक्त करताना नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी या प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक यांनी शाळेच्या वतीने वृक्षांचे रक्षण व संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतीमंद विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशी कृतीतून शिकण्याची संधी मिळते आणि निसर्गाशी आत्मीय नाते निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. माऊली फाउंडेशनच्या या अभियानाची पुढील टप्प्यात भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये विस्तार होणार असून शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, शासकीय कार्यालयांचे आवार, तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या झाडांसाठी जलसिंचन, कुंपण व्यवस्था, खत व्यवस्थापन याचीही आखणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, वृक्ष लागवड अभियानाबरोबरच माऊली फाउंडेशन लवकरच रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य जागर, युवकांसाठी नशाबंदी जनजागृती मोहीम, तसेच स्वच्छता अभियान हेही कार्यक्रम भडगाव तालुक्यात राबवणार आहे. त्यामुळे हे फक्त वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता, सर्वांगीण सामाजिक प्रबोधनाचे व पर्यावरण जागृतीचे उदाहरण ठरणार आहे. समारोपाच्या क्षणी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “या अभियानात प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. हे झाड तुमच्या मुलासारखे वाढवा, कारण हे झाडच उद्याचे प्राणवायू निर्माण करणारे यंत्र आहे.” एकूणच, माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हा केवळ एक उपक्रम नसून, ही एक सामाजिक चळवळ आहे. ही चळवळ पर्यावरणरक्षणाच्या दिशेने भडगाव तालुक्याला नवा मार्ग दाखवेल, यात शंका नाही.

पालक-विद्यार्थ्यांचा हिरवाईसाठी सकारात्मक प्रतिसाद : श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथील अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद

0

Loading

पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल, पाचोरा या नामवंत शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मिळून झाडे लावावीत, आणि त्या क्षणाचे छायाचित्र शाळेच्या वर्गसमूहात पाठवावे, अशी विनंती संबंधित वर्गशिक्षकांनी पालकांना केली. विशेष म्हणजे, या उपक्रमास विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, केवळ काही मिनिटांतच झाडे लावल्याची छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोहोचू लागली. या उपक्रमामागे शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच प्रेरणेतून संपूर्ण शिक्षकवर्गाने आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना संदेश पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. झाडे लावण्याच्या कृतीतून केवळ पर्यावरण रक्षणाची भावना रुजवली गेली नाही, तर शाळा-विद्यार्थी-पालक यांच्यातील बंध अधिक दृढ झाले. या मोहिमेचा प्रारंभ वर्ग सातवी ब च्या वर्गशिक्षिका सौ. शितल महाजन यांनी आपल्या वर्गाच्या पालकांसाठी तयार केलेल्या संदेशाद्वारे झाला. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता त्यांनी आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअ‍ॅप पालकगटावर एक महत्त्वाचा संदेश पाठवला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत मिळून कोणतेही झाड लावावे, त्यावेळी काढलेले छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवावे, आणि हे कार्य दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण व्हावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. या संदेशाची झपाट्याने दखल घेत मनश्री रविंद्र गढरी या सातवी ब वर्गातील विद्यार्थिनीच्या आई सौ. मनिषा गढरी यांनी अत्यंत तत्परतेने शाळेच्या या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या मुलीसोबत एक वृक्षारोपण केले आणि त्याचे छायाचित्र काही मिनिटांतच वर्गसमूहात पाठवले. गढरी कुटुंबाचे हे उदाहरण इतर पालकांसाठी प्रेरणादायी ठरले आणि मग पालकांच्या सहभागाने हा उपक्रम अधिक व्यापक रूप धारण करू लागला. झाडे लावण्याच्या या मोहिमेमध्ये केवळ झाड लावणे एवढ्यावरच मर्यादित न राहता, अनेक पालकांनी आपल्या घरातील लहान भावंडांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले. काही पालकांनी आपल्या अंगणात, तर काहींनी शेतामध्ये झाडे लावली. एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी तर गावातील मंदिराच्या परिसरात झाड लावून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी देण्याची जबाबदारीही घेतली. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे’ ही भावना रुजताना दिसत आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या झाडासोबत एक पाटी लावली होती, ज्यावर लिहिले होते – “हे झाड माझं आहे, मी त्याची काळजी घेईन.” अशा प्रकारच्या कृतीतून विद्यार्थ्यांच्या मनात झाडांविषयी आत्मीयता निर्माण होणे, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “फक्त वर्गात बसून पर्यावरणशास्त्र शिकवणे आणि प्रत्यक्ष झाडे लावण्याचा अनुभव देणे यामध्ये मोठा फरक असतो. विद्यार्थ्यांनी स्वतः झाड लावले की, त्याला पाणी घालणे, त्याची निगा राखणे याचे महत्त्व ते प्रत्यक्ष शिकतात. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक छोटासा पण ठोस पाऊल आहे.” वर्गशिक्षिका सौ. शितल महाजन यांनी यामागील प्रेरणा विषद करताना सांगितले की, “गेली काही वर्षे आपण वृक्षारोपणाविषयी खूप बोलतो, पण कृती फारच मर्यादित असते. त्यामुळे यंदा मी ठरवलं की माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने झाड लावले पाहिजे. आणि त्या झाडाचे छायाचित्र पाठवावे, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. मनश्री आणि तिच्या आईने दिलेला पहिला प्रतिसाद हा अत्यंत उत्साहवर्धक होता.” हा उपक्रम शाळेच्या इतर वर्गांपर्यंतही पोहोचत असून अनेक वर्गशिक्षकांनी देखील आपापल्या वर्गातील पालकांना अशाच प्रकारची सूचना देऊन झाडे लावण्यास प्रवृत्त केले आहे. शिक्षक आणि पालक यांच्यातील हे समन्वयाचे उदाहरण शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न राहता, प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांची जाणीव होऊ लागली आहे. यासारखे उपक्रम ग्रामीण भागातल्या शाळांनी राबविल्यास पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणता येईल. झाड लावण्याचा हा उपक्रम एका दिवसापुरता न राहता, त्या झाडांची वाढ, त्यांची निगा, पाणी देणे, खत टाकणे आणि भविष्यात ती झाडे कशी उपयोगी पडतील, याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली गेल्यास ते संपूर्ण जीवनात पर्यावरणपुरक जगण्याचे धडे घेऊ शकतील. श्री गो.से. हायस्कूलचा हा उपक्रम केवळ एक साधा पर्यावरण जागृती उपक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडलेली एक प्रेरणादायी कथा होती. विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांसोबत मिळून झाड लावले, यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला, पर्यावरणाविषयी आत्मीयता निर्माण झाली आणि शाळेच्या संस्कारक्षम शिक्षणपद्धतीचे प्रतिबिंब पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीनेही या उपक्रमाचे कौतुक केले असून लवकरच या उपक्रमाच्या अंतर्गत लावलेल्या झाडांचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे, जेणेकरून ही झाडे वाढतील आणि त्यांचे संगोपन सुस्थितीत होईल. शेवटी, हे निश्चितच म्हणता येईल की पाचोरा येथील श्री गो.से. हायस्कूलच्या या अभिनव उपक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही घोषणा केवळ घोषणाच न राहता कृतीतून साकार होत आहे, आणि त्यात मुख्य सहभाग आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा – जो या उपक्रमाचा खरा आत्मा आहे.

डॉक्टर टाक यांना अश्लील व्हिडिओच्या धमकीसह २ कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा तालुक्यात संतापाची लाट; पत्रकारचं प्रशासनाला निवेदन

0

Loading

पाचोरा – शहरातील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेले डॉक्टर टाक यांना निनावी चिठ्ठी व मेल व्दारे अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची संतापजनक घटना नुकतीच उजेडात आली आहे. या प्रकारामुळे पाचोरा तालुक्यात केवळ वैद्यकीय वर्तुळातच नव्हे तर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेतही तीव्र संतापाची भावना पसरली आहे. या खंडणीप्रकरणाची गंभीर दखल घेत पाचोरा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत दिनांक २५ जुलै २०२५ रोजी आमदार किशोर आप्पा पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे सामूहिक निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला. हे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना पत्रकारांनी थेट भेटून सादर केले. या निवेदनात पत्रकारांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, डॉक्टर टाक यांना फसवणूक, ब्लॅकमेलिंग व खंडणीप्रकरणातून नैतिक, मानसिक व कायदेशीर आधार दिला जावा. हे केवळ एक वैयक्तिक प्रकरण नाही तर समाजाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे म्हणजे केवळ डॉक्टरांची नव्हे तर संपूर्ण समाजाची मानसिक शांतता व सामाजिक समृध्दी धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेल्या आणि अनेक वर्षांपासून निःस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या डॉक्टर टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून एका खोट्या पत्रकाराच्या नावे संपर्क साधून अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली.त्यानंतर थेट दोन कोटी रुपये खंडणीच्या स्वरूपात मागण्यात आले. हा प्रकार अतिशय मानसिक त्रासदायक, भीषण आणि गंभीर स्वरूपाचा असून संबंधित डॉक्टरांनी याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनला तात्काळ तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याबाबत प्राथमिक तपास करत आहेत.
या प्रकारानंतर पाचोरा शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डॉक्टर हे समाजातील आधारस्तंभ असून त्यांच्या सेवा, निष्ठा आणि कार्यक्षमतेवर संपूर्ण जनतेचा विश्वास असतो. अशा व्यक्तींना अश्लीलतेच्या माध्यमातून बदनाम करून ब्लॅकमेलिंग करणे म्हणजे वैद्यकीय व्यवसायावरच नव्हे तर माणुसकीवरच घाला घालण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन एकमताने आवाज उठवला असून अशा घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पाचोरा पत्रकार यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढील ठळक मागण्या मांडण्यात आल्या आहेत: 1) डॉक्टर टाक यांना मानसिक, सामाजिक व कायदेशीर पाठबळ मिळावे अशा भीषण मानसिक दबावाच्या परिस्थितीत डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आणि कायदेशीर पातळीवर सरकारने व प्रशासनाने त्यांना मदत करावी. 2) दोषींवर कठोर कारवाईची मागणी: या गुन्ह्याचा तात्काळ, सखोल तपास करून दोषी व्यक्तींना अटक करून कठोर कायदेशीर शिक्षा द्यावी. यामध्ये सायबर गुन्ह्यांची छाननी करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. 3) जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस तपासात पारदर्शकता राखावी व संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने माध्यमांद्वारे सादर करावी. 4) सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असून तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात यावा. 5) समाजात अशा प्रकारच्या मानसिक, सामाजिक व तांत्रिक गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी शासन, पोलीस, पत्रकार व वैद्यकीय संघटनांनी मिळून संयुक्त मोहीम राबवावी.
निवेदन देताना उपस्थित पत्रकारांची एकजूट – सदर निवेदन पत्रकार सी एन चौधरी, संदीप महाजन, राजेंद्र खैरनार, अनिलआबा येवले, गजानन गिरी, नागराज पाटील, शेख जावेद, धनराज पाटील, भोला पाटील, नंदकुमार शेलकर, एन एस भुरे, प्रशांत येवले, भास्कर सोनवणे, भुवनेश दुसाने, प्रविण बोरसे, निखील मोर यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. हे सर्व पत्रकार सध्या पाचोरा तालुक्यात कार्यरत असून पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेले आहेत. ही घटना प्रशासन आणि राजकीय नेतृत्वासाठीही एक मोठी कसोटी आहे. डॉक्टरांवरील या प्रकाराचा निकाल लावण्यात शासन यंत्रणा अपयशी ठरल्यास, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील आणि प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्याकडून या प्रकरणात सक्रीय आणि ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार फक्त एका डॉक्टरविरोधात नव्हे, तर संपूर्ण समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर हे रुग्णांसाठी जीवनदायी असतात. अशा सेवाभावी व्यक्तींना बदनाम करून पैसे उकळण्याचा प्रयत्न म्हणजे गुन्हेगारीचा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी एकत्र येत सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट दिसून आले. या आंदोलनात समाजातील इतर घटकांनीही पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, संबधित डॉक्टरांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, हीच अपेक्षा पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे. निवेदन देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांनी एकजुटीने प्रशासनाला साद घातली असून, यामध्ये कोणताही राजकीय वा वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ सामाजिक भान आणि जबाबदारी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले आहे.
पाचोरा शहराच्या सामाजिक आरोग्य, सुरक्षितता आणि न्यायाच्या दृष्टीने डॉक्टर टाक यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी केलेले हे पत्रकार संघटनेचे निवेदन केवळ निषेध नव्हे, तर समाजाला आरोग्यदायी आणि सुरक्षित ठेवण्याच्या लढ्याचा भाग आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत, दोषींना कठोर शिक्षा करून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा, हीच अपेक्षा.

डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी

0

Loading

पाचोरा- शहर व परिसरात वैद्यकीय क्षेत्र नेहमीच एक आदर्शवत पद्धतीने कार्यरत राहिले आहे. करोना महामारीच्या काळात माणुसकी हरवलेली असताना, पाचोरा येथे तरी ग्रामीण रुग्णालय ते खेड्यापाड्यांतील डॉक्टरांनी अपार कष्ट घेऊन जनतेसाठी दिवसरात्र अहोरात्र सेवा केली. त्या काळातील त्यांच्या कार्याचा आदर आजही प्रत्येक पाचोरावासी करतो. मात्र, अशा एका आदर्श वैद्यकीय व्यवस्थेत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा व चिंतेचा विषय ठरत आहे. पाचोरा शहरातील एक ख्यातनाम डॉक्टर अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात सापडण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून, अशा प्रकाराला भीक न घालता या धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित डॉक्टरने थेट पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरला गेल्या चार दिवसांत दोन वेळा निनावी चिठ्ठ्यांद्वारे धमकी देण्यात आली होती. चिठ्ठ्यांमध्ये स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले की, “तुमचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आमच्याकडे आहेत. हे व्हायरल होऊ नयेत, तर २ कोटी रुपये द्या,” अन्यथा समाजात मानहानी होईल अशी धमकी देण्यात आली. इतकेच नाही, तर डॉक्टरच्या मोबाईलवरून देखील एक मेसेज आला होता, ज्यात लिहिले होते की, “या प्रकरणात हस्तक्षेप करू नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.” या सर्व प्रकारांमुळे संबंधित डॉक्टर प्रचंड तणावात गेले. त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर होणाऱ्या परिणामाची जाणीव असल्याने त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केला आहे. धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या असून, मोबाईल नंबरचा तपास करण्यात येत आहे. या नंबरद्वारे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही. पाचोरा पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. मात्र, एवढ्या गंभीर प्रकरणाबाबत अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नसल्याची खंत पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ही केवळ एका डॉक्टराविरुद्धची धमकी नसून, संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करण्याचा हा कपटी डाव आहे पाचोरा येथील वैद्यकीय व्यवसाय बाबत सांगायचे झाले तर येथील डॉक्टर समाज हा आपल्या सेवाभावासाठी ओळखला जातो. एखाद्या वैयक्तिक कारणामुळे किंवा ब्लॅकमेलिंगसाठी जर डॉक्टरांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असेल, तर ही संपूर्ण समाजासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी बाब आहे. पाचोरा शहरात आरोग्यसेवेसाठी झटणारे डॉक्टर मोठ्या निष्ठेने काम करत असताना, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा बनावट व्हिडीओद्वारे धमकी देणे, हा वैद्यकीय पेशाच नव्हे तर मानवतेवरही आघात आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे — इतकी धक्कादायक घटना घडूनही, पाचोरा पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली गेली नाही. यामुळे पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोलिसांनी पारदर्शकपणे कार्य करून समाजाच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर पाचोरा शहरातील विविध डॉक्टर संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार जर रोखायचे असतील, तर संपूर्ण समाजाने एकत्र येणे आणि या प्रवृत्तींचा तीव्र विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. ब्लॅकमेलिंग हे फक्त आर्थिक गुन्हा नसून सामाजिक प्रतिष्ठेवर हल्ला करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेतील दोषींवर सायबर गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे शाखा व अन्य विशेष पथकांकडून तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ स्थानिक पोलीस तपास पुरेसा ठरणार नाही, कारण अशा गुन्ह्यांचे जाळे अनेक वेळा मोठ्या रॅकेटशी जोडलेले असते. या घटनेनंतर पाचोरा येथील वैद्यकीय क्षेत्रात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, शासनाने व पोलीस प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, तसेच धमकी, ब्लॅकमेलिंग यांसारख्या गुन्ह्यांसाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे
पाचोरा शहरातील वैद्यकीय सेवा ही अत्यंत निष्ठावान व सेवाभावी डॉक्टरांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत एका डॉक्टरला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २ कोटींची मागणी करणे, हा केवळ गुन्हा नाही तर माणुसकीचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि समाजात चुकीचे संदेश जाऊ नये याची दक्षता घ्यावी. समाजातील प्रत्येक घटकांनी अशा प्रवृत्तींचा निषेध करून वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेची व सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, हीच काळाची गरज आहे. आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा येथील पत्रकार बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार,प्रांताधिकारी भूषण अहिरे,पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार निवेदन देण्यात येणार आहे

“शिवकालीन रणरागिनी” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक तेजस्विनी स्त्रियांनी समाज, कुटुंब, युद्धनीती, राज्यकारभार आणि संस्कृतीमध्ये अतुलनीय योगदान दिले. या स्त्रीशक्तीचा अभ्यास, जागर आणि अभिमान व्यक्त व्हावा, यासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)” आणि “मराठी साहित्य व कला सेवा” या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा विषय शिवकालीन रणरागिनी असा असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभ्यासक, गृहिणी, लेखक आणि साहित्यप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शब्दमर्यादा १००० ते १५०० असून, स्पर्धा खुल्या गटात होणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये ५०००/–, द्वितीय क्रमांकासाठी ३०००/– आणि तृतीय क्रमांकासाठी २०००/– सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र मुंबई येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची नियमावली आणि अधिक माहितीसाठी marathisahityavkalaseva@gmail.com किंवा WhatsApp क्रमांक ९९८७७४६७७६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

“भाषेवर सक्ती नव्हे, भक्ती हवी!” — प्रा. जगदीश संसारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी विभाग आणि बॅफी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला शाखा, प्रथम वर्ष बॅफी आणि प्रथम वर्ष बी.कॉमच्या विद्यार्थिनींसाठी मराठी भाषेवरील गोडी वाढवण्याच्या उद्देशाने एक विशेष व्याख्यान दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. जगदीश संसारे होते. भाषेवरील सक्तीपेक्षा भक्ती निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत विद्यार्थिनींना भाषेतील सौंदर्यस्थळांची सैर घडवली.

प्रा. संसारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणत्याही भाषेची सक्ती महत्त्वाची नसते, तर त्या भाषेवर भक्ती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्या-त्या भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून काढून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत.” त्यांनी भाषेतील लालित्य, गोडी आणि अभिव्यक्तीची ताकद विविध उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून दाखवली. त्यांच्या सुस्पष्ट उदाहरणांनी आणि ओघवत्या मांडणीनं उपस्थित विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि आत्मीयता जागृत झाली.

सदर व्याख्यानाला दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. व्याख्यानाचा प्रभाव इतका होता की शेवटी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा” हे बालगीतमय गाणं सर्वांनी एकत्र गायले. विद्यार्थिनींनी आनंदाने सहभाग घेतल्याचा हा क्षण म्हणजेच या व्याख्यानाचे खरे यश म्हणावे लागेल. विद्यार्थिनींमध्ये भाषेची गोडी निर्माण होणे, हीच या उपक्रमाची सर्वात मोठी फलश्रुती ठरली.

रात्रीच्या गस्तीत सापडला घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी; पाचोरा पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

0

Loading

पाचोरा- पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २० जुलै २०२५ रोजी रात्रीपासून २१ जुलैच्या पहाटेपर्यंत करण्यात आलेल्या नियमित गस्तीदरम्यान पोलिसांनी घरफोडीच्या तयारीत असलेल्या संशयित इसमास रंगेहाथ पकडून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. त्यानंतर पुढील तपासादरम्यान त्याच आरोपीकडून दोन स्वतंत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, यामध्ये चोरीस गेलेली मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दिनांक २० जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २१ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्र गस्त सुरू होती. गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/१९०७ कमलेश शांताराम पाटील, पोकों/२३३० संदीप पाटील आणि पोकॉ/१४०९ हरीष कनीराम परदेशी सहभागी होते. या पथकाने गस्तीदरम्यान पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास जारगाव चौफुली परिसरात एक इसम पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आणले. पोलिसांनी तत्काळ दक्षता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी त्यास विश्वासात घेत विचारणा केली असता त्याने आपले नाव कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी, वय २३ वर्षे, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात घरफोडीसाठी वापरले जाणारे विविध धारधार आणि अनकुचीदार हत्यारे जप्त करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी सुरा, दोन लोखंडी चिमटे, एक लोखंडी टी-आकाराचे हत्यार आणि एक लोखंडी कात्री असा संशयास्पद साहित्य समाविष्ट होता. सदर साहित्य पाहता त्याने घरफोडीच्या उद्देशाने यांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास पाचोरा पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ३५६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(क) आणि भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोना/३१३६ महेंद्र प्रकाश पाटील करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने काही काळापूर्वी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३५८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४०,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो, लाल रंगाची, क्रमांक MH-19 BV-8763 ही चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. सदर प्रकरणाचा तपास पोहेकॉ/१०५८ वसीम सलीम शेख करत आहेत. यापुढे तपास अधिक खोलवर सुरू असतानाच तिसऱ्या गुन्ह्याचाही छडा लागला. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड येथील एका घरात चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार त्याच्यावर पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३३७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील करत आहेत. या तीनही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी दाखवलेली सतर्कता, चातुर्य आणि तत्परता ही उल्लेखनीय असून, एका संशयास्पद व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलीस यशस्वी ठरले आहेत. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या पोउपनिरीक्षक योगेश गणगे, सफौ रणजित पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, शरद पाटील, कमलेश पाटील, संदीप पाटील आणि हरीष परदेशी या सर्वांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पाचोरा शहरासह तालुक्यात सध्या विविध ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेली ही कामगिरी केवळ गुन्हेगारांना रोखण्यासाठीच नाही, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पोलिसांची नियमित गस्त, सतर्क निरीक्षण आणि तत्काळ कारवाई यामुळे भविष्यात अशा गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील तपास पूर्ण होताच आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून न्याय मिळविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथक पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या कार्यशैलीला जिल्ह्यातूनही प्रशंसा मिळत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!