पाचोरा – शहर, तालुका आणि पंचक्रोशी परिसर तसेच संलग्न तालुके व जिल्ह्यांमध्ये निसर्गाने आपली प्रचंड ताकद दाखवून दिली. वरून आकाशात राजाने कडकडाट करत विजांचा प्रचंड कडकडाट केला आणि त्यानंतर वादळ व मुसळधार पावसाने थैमान घातले. धरण, नद्या, नाले तर उफाळून वाहू लागलेच, पण गेल्या पन्नास वर्षांत नागरिकांनी कधीच पाहिला नव्हता असा विध्वंसक वादळी पाऊस यावेळी कोसळला. या पावसाने परिसरातील शेतकरी, व्यापारी, कामगार, घरगुती महिलांपासून लेकरांपर्यंत प्रत्येक घटकाला भयभीत केले. पाचोरा परिसरातील वृद्ध मंडळींनीही थरथरत सांगितले की, “आमच्या जन्मात कधी असं थैमान आम्ही पाहिलं नव्हतं.” या संकटाच्या क्षणी सर्वांत मोठे उदाहरण घडले ते म्हणजे मानवतेचे. जे माजी सैनिक कधी देशाच्या सीमेवर तैनात राहून राष्ट्रसेवा करत होते, तेच आज पुन्हा एकदा आपल्या गावात, शहरात, शेजाऱ्यांत, माताभगिनींच्या रक्षणासाठी पुढे सरसावले. त्यांच्यावरची वर्दी जणू पुनश्च परिधान झाली आणि देशसेवेइतकेच गाव-समाजसेवेचे महत्त्व त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या बरोबरच मंत्री, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सरकारी अधिकारी, निमसहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांनी एकत्रित येऊन मदतीचा हात पुढे केला. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाने “मी फक्त मानव आहे आणि मानवतेची सेवा हा माझा धर्म आहे” ही भावना डोळ्यासमोर ठेवून तन, मन आणि धनाने अष्टपैलू सहकार्य केले. याच क्षणी साने गुरुजींच्या कवितेतील अमर ओळी जणू आकाशातून दुमदुमून गेल्या—”खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे.” या ओळींनी जणू प्रत्येक नागरिकाला प्रेरणा दिली आणि प्रेम, करुणा, माणुसकी या तीन मूल्यांनीच मानवतेचे रक्षण होते हे अधोरेखित केले. आई, बहिणी, मुली याही मागे राहिल्या नाहीत. काहींनी स्वयंपाक करून गरम जेवण पोहोचवले, काहींनी आपल्या घरातील कपडे, अंथरुणं गरजूंसाठी दिली, तर काहींनी लहान मुलांच्या रडण्यावर स्वतःच्या लेकरांप्रमाणे त्यांना कुशीत घेतले. लहानग्यांनीही हातभार लावला—कधी पाणी पोहोचवले, कधी पिशव्या भरून नेल्या. प्रत्येकाच्या नजरेत केवळ एकच गोष्ट होती, ती म्हणजे संकटातून माणसाला वाचवणे. या वादळाने शेती तर अक्षरशः उध्वस्त केली. पिके पाण्याखाली गेली, शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कुणाचे घर कोसळले, कुणाचे संसार वाहून गेले. बऱ्याच जणांच्या डोळ्यांसमोर संसार उध्वस्त होतानाचा क्षण येऊन गेला. स्त्रियांचे दुःख शब्दांत मावत नाही, तर वृद्धांची हतबलता पाहून हृदय पिळवटून गेले. पण या भयाण परिस्थितीत एक गोष्ट समाधानकारक ठरली—संपूर्ण जनतेने एकजुटीने जागरूकपणे काम केल्यामुळे जीवितहानी टळली. जीव वाचवणे हेच सर्वांत मोठे कार्य ठरले. या सर्व अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली—निसर्गाने मानवजातीला एक धडा शिकवला आहे. जणू निसर्ग म्हणत आहे, “मानवा, तू जंगलं संपवलीस, झाडं तोडलिस, वाळू लुटलीस, नद्या आक्रसवल्या, माझं रूप विद्रूप केलंस… आता माझा बदला घ्यायलाच हवा.” आज आपण केलेल्या पापांची फळं निसर्ग आपल्या हातून वसूल करत आहे. आपल्याकडून नष्ट झालेल्या हिरवाईने, नष्ट झालेल्या निसर्गसंपत्तीनेच आज उग्र रूप धारण करून आपल्याला कळवले आहे की, चुकीची पावलं आता सुधारण्याची गरज आहे. पाचोरा पंचक्रोशीतील या आपत्तीने माणसामाणसांमधील भिंती पाडल्या. कुणी कोणत्या पक्षाचा, कुणी कोणत्या जातीचा, कुणी कोणत्या धर्माचा याची गणना कोणालाही नव्हती. सर्वत्र फक्त “आपण सारे एक” हा भाव दाटून आला. माणुसकीचा विजय निसर्गाच्या कहरावरही जणू ठसा उमटवून गेला. संकट कितीही मोठं असलं तरी आपण सारे मिळून उभं राहिलो, तर संकटाला हरवणं अशक्य नाही हे या प्रसंगाने सिद्ध केलं. ज्यांचे संसार उध्वस्त झाले त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून हृदय द्रवून जाते. वृद्ध आईचे थरथरणारे ओठ, घर गमावलेल्या मुलांचे निःशब्द रडणे, धान्यपाणी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले हतबल अश्रू—हे सारे दृश्य पाचोरा शहर व तालुक्यात कुठेही पाय ठेवला तरी पाहायला मिळाले. माणुसकीने मात्र प्रत्येकाला आधार दिला. एखाद्याने कपडे दिले, एखाद्याने घर उघडले, एखाद्याने शेजाऱ्याला आपल्या अंगणात आसरा दिला. ही दृश्यं जणू मानवतेच्या खरी ताकदीची साक्ष देऊन गेली. निसर्गाच्या या धड्यामुळे आता आपल्याला बदलण्याची वेळ आली आहे. जंगल जपायची, नद्या स्वच्छ ठेवायच्या, वाळूची चोरी थांबवायची आणि झाडं लावायची—ही आपली जबाबदारी आहे. अन्यथा निसर्गाचा कोप आणखी कठोर होईल. या वादळपावसाने दिलेला धडा विसरला, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. पाचोरा पंचक्रोशीतील नागरिकांनी दाखवलेली एकजूट, अष्टपैलू सहकार्य आणि मानवतेचा धर्म यामुळे आज सारेच म्हणत आहेत—निसर्गाचा कहर जरी प्रचंड होता, तरी माणुसकीची ताकद त्याहून मोठी होती.
पाचोरा – १९९५ ते २०२५—या तीस वर्षांच्या कालखंडात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाने अनेक चढ-उतार पाहिले. राजकीय परिस्थिती बदलत गेली, जनता आणि कार्यकर्त्यांच्या गरजाही बदलत गेल्या, नवनवीन अपेक्षा डोळ्यासमोर येऊ लागल्या. मात्र या सर्व बदलत्या चित्रात एक नाव कायम आदराने घेतले गेले ते म्हणजे पाचोरा-भडगावचे आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील. त्यांचे ध्येय, त्यांची तत्त्वनिष्ठता, त्यांचे कार्य आजही सर्वश्रुत आहे. ते कधीच स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे नव्हते. त्यांच्या अपेक्षा नेहमी कार्यकर्त्यांच्या घरावर, त्यांच्या उद्योगधंद्यावर, त्यांच्या संसारावर केंद्रित असायच्या. तात्यासाहेबांना वाटायचे—कार्यकर्त्याचे घर सुरक्षित, उद्योग उभा राहिला, संसार सुखी झाला, तर समाज आपोआप उभा राहतो. मात्र बदलत्या स्वार्थी राजकीय वातावरणात ही तत्त्वं निभावणं कठीण होतं. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढत होत्या, समाजाचा वेग बदलत होता. अशा परिस्थितीत संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी तात्यासाहेबांना एका हक्काच्या व्यक्तीची गरज होती. जणू अधिकाराच्या वजीराची. आणि ती भूमिका निभावली विद्यमान हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी. किशोरआप्पा पाटील यांचा प्रवास अनोखा आहे. पोलिस प्रशासनात असताना किंवा त्यानंतर त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपण निवडणूक लढवायची, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं किंवा नगराध्यक्ष व्हायचं. पण त्यांच्या रक्तातच एक प्रवृत्ती होती—प्रत्येकाशी जिव्हाळा ठेवायचा, जात-धर्म न बघता सुख-दुःखात धावून जायचं. संघटन ही त्यांची ताकद होती. कोणताही राजकीय खेळाडू त्यांच्या या गुणाला आव्हान देऊ शकत नव्हता. त्याकाळी किशोरआप्पांची आर्थिक परिस्थिती मर्यादित होती. लाखो रुपयांच्या वर्गणीच्या पावत्या फाडून टाकणं, जनतेच्या सुखदुःखात खिशातून खर्च करणं ही गोष्ट सोपी नव्हती. पण अपेक्षा नसताना त्यांनी वेळे प्रसंगी हात उसनवारी केली, कर्ज काढलं, वहिनी सुनिताताई पाटील यांच्या दागिन्यांनाही गहाण ठेवण्यासही मागे पुढे पाहीले नाही फक्त एवढंच की जनतेच्या संकटाच्या क्षणी मदतीचा हात मागे राहू नये. हाच त्या घराण्याचा खरा वारसा आहे—त्याग, मदत आणि माणुसकी. गणपती मंडळाचे कार्यकर्ते जेव्हा शिवसेना कार्यालयाजवळ यायचे तेव्हा ते प्रथम पाहायचे—तात्या आहेत का, की एकटे आप्पा आहेत? कारण पावती फाडायची की नाही हा निर्णय ह्याच गोष्टीवर ठरायचा. फक्त पावत्यांचा विषयच नव्हे, तर इतरही मदतीबाबत नेहमी अशीच परिस्थिती असे. आणि जेव्हा तात्यासाहेबांना या मदतीचे आकडे कानी पडायचे, तेव्हा किशोर आप्पांची शाळा ऐकण्यासारखी असायची. कारण स्वार्थी राजकीय वातावरणात व मतलबी लोकांच्या दुनियेत जगत असतांना तात्या साहेबांची त्यावेळची शिकवण व वाक्य खरोखर योग्य व सत्य होते असो
मागील आठवणींचा उल्लेख करतांना कोणतीही चमचेगिरी करण्यासाठी नाही, किंवा मला कोणतीही जाहिरात सुद्धा नको किंवा मला पुरस्कार पण विकायचे नाहीत तर हे सर्व वास्तव मांडण्यासाठी आहे. सत्य लिहिण्याची ताकद ज्या पत्रकाराच्या लेखणीत असते, त्यालाच समाज खरा पत्रकार मानतो. आज पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत जेव्हा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात जमिनीप्रमाणे पाणी साचलं आहे, तेव्हा एक नवं चित्र डोळ्यासमोर आलं आहे. विद्यमान आमदार किशोर आप्पांच्या सुपुत्राने—युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी—वडिलांच्या मार्गावरच नव्हे तर दहा पावलं पुढे टाकत मदतीचं एक नवं पर्व सुरू केलं आहे. दिवस-रात्र न थकता, स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता, त्यांनी स्वतःची मदतयंत्रणा कार्यान्वित केली आहे. सुमित पाटील यांची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे —त्यांच्या मदतीला कोणताही शासकीय आधार नाही. ते प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबात स्वतः खिशात हात घालून मदत करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे डोळ्यात पाणी तर आलंच, पण मनही हेलावून गेलं आहे. गावागावांतून फक्त एकच वाक्य ऐकायला मिळत आहे—”आजच्या काळात जेव्हा सगळे शासकीय मदतीची वाट बघत आहेत, तेव्हा खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारा एकमेव राजकीय व्यक्ती म्हणजे सुमित किशोर आप्पा पाटील.” यावेळी एक मात्र निश्चितच गोष्ट आठवते—एका गावाला प्रचंड आग लागली होती. प्रत्येक व्यक्ती ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होता. अशावेळी एक ईवलीशी चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. काही उपहासात्मक लोकांनी तिची थट्टा केली—“तुझ्या चोचीतील पाण्याने एवढी मोठी आग विझणार आहे का?” पण त्यावेळी एका बुद्धिवंताने म्हटलं—“या इवल्याशा चोचीतील पाण्याने कदाचित आग विझणार नाही, पण या चिमणीचं नाव मात्र इतिहासात आग विझवणाऱ्यांच्या यादीत लिहिलं जाईल, आग लावणाऱ्यांच्या नाही.” तशीच उपमा आज सुमित पाटील यांच्याबाबत द्यावी लागेल. संपूर्ण मतदारसंघात पूरासारखी भीषण परिस्थिती असताना त्यांच्या हातून दिली जाणारी मदत कदाचित पुरेशी वाटणार नाही, पण स्वतःच्या खिशातून त्यांची देण्याची प्रवृत्ती, त्यांची माणुसकी सिद्ध होते. आणि इतिहास लिहिला जाईल तेव्हा या प्रवृत्तीचं नाव निश्चितच मानवतेच्या रक्षणकर्त्यांच्या यादीत असेल. याच क्षणी भूतकाळाची आठवण जागी होते. स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील आणि किशोर आप्पा पाटील यांच्या कार्याची, त्यांच्यावरील विश्वासाची. त्यांच्या कार्याला कधीच राजकीय पदाचा स्पर्श नव्हता. त्यांच्या मदतीत कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता. आणि आज सुमित पाटील यांच्या कृतीतून तीच परंपरा पुनश्च जिवंत होताना दिसते आहे. आज संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक गल्लीत हेच बोलले जात आहे—“आप्पांनी जसा जनतेला आधार दिला, तसाच आधार सुमित आप्पा आज देत आहेत.” वडिलांची परंपरा केवळ टिकवून ठेवणेच नाही, तर तिला नवा आयाम देणे हे एखाद्या सुपुत्रालाच शक्य असते. सुमित पाटील यांनी ते सिद्ध केले आहे. गेल्या तीस वर्षांचा इतिहास बघताना मनात एकच विचार ठाम होतो—तात्यासाहेबांनी ज्या तत्त्वांची मशाल पेटवली, किशोर आप्पांनी तिला ज्योत बनवलं, त्या ज्योतीला आज नवा प्रकाश देण्याचं काम सुमित पाटील करत आहेत. या प्रकाशाने मतदारसंघातील अंधार दूर होतो आहे. त्यांच्या प्रत्येक मदतीच्या कृतीने नागरिकांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू पुसले जात आहेत. या लेखी प्रपंचाचा उद्देश केवळ वास्तव मांडणे हा आहे. जे दिसलं, जे अनुभवलं ते मांडलं. कारण पैसे तर थोड्याफार फरकाने सर्वांजवळच असतात परंतु त्यांनी जेव्हा ते त्यांच्या गरजेच्या वेळी दिले ते त्यांचे स्वार्थ असते & जेव्हा समोरच्यांना गरज असते तेव्हा जर दिले तर ती खरी मदत असते आणि हे सत्य वाचतांना प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येतं, मन द्रवून जातं. प्रत्येकाला असं वाटतं—“हा लेख लिहिणाऱ्या व्यक्तीला आपण एकदा तरी फोन करून आपलं मनोगत सांगावं.” कारण ही कथा फक्त एका घराण्याची नाही, तर एका मतदारसंघाच्या आत्म्याची आहे. तात्यासाहेबांची तत्त्वनिष्ठा, किशोर आप्पांची त्यागशीलता आणि सुमित पाटील यांची मानवतेची झळाळी—ही त्रिसूत्री आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थाने अभिमानाने मिरवता येईल अशी संपत्ती आहे.
पाचोरा ( बातमी योग्य वाटल्यास इतर ठिकाणी Send करा ) तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित मोठा घोटाळा उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सातत्याने लढा देणारे आंदोलक संदीप महाजन यांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने कोट्यवधींचे अनुदान मंजूर केले होते. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न होता, सॉफ्टवेअरची जाणूनबुजून केलेली हेराफेरी व चुकीच्या हाताळणीमुळे काही व्यक्तींच्या खात्यावर वळवण्यात आली. अनुदानाशी कोणताही संबंध नसतानाही काही जणांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. हा
प्रकार उघडकीस आणल्यानंतर विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे यांनी जणू काही हा घोटाळा त्यांच्या कारवाईनेच उघड झाला असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. काही निवडक पत्रकार व सॅटॅलाइट चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला श्रेय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. परंतु वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी असून हा घोटाळा केवळ संदीप महाजन यांच्या संघर्ष व प्रयत्नांमुळेच उघड झाला आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या कारवायांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार समजल्यावर आमदार किशोरआप्पा पाटील देखील हादरले. आतापर्यंत त्यांना ठामपणे वाटत होते की नाशिक विभागातील शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक अनुदान पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. स्वतःच्या पाठपुराव्याने त्यांनी शासनाकडून शंभर कोटींपेक्षा अधिक अनुदान मंजूर करून आणले असल्याचा त्यांना विश्वास होता. अनुदानाची रक्कम खऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे, हा त्यांचा समज होता. मात्र जेव्हा संदीप महाजन यांनी पुराव्यासह वस्तुस्थिती कथन केली, तेव्हा आमदार पाटील आश्चर्यचकित झाले आणि प्रचंड संतापले. कारण मंजूर केलेल्या रकमेचा अपहार झाला असल्याचे समोर आले आणि त्यांच्या मेहनतीला मोठा धक्का बसला. दरम्यान, आंदोलक संदीप महाजन यांनी या घोटाळ्याविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यांनी अन्नपाणी त्याग करून आमरण उपोषणाचा इशारा दिला तसेच आत्मदहनाची टोकाची भूमिका घेण्याची तयारीही दर्शवली. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर हे प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. या घोटाळ्यातील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे तहसीलदार विजय बनसोडे यांची घाईघाईतील कारवाई. त्यांनी काही बँक खातेधारकांना नोटिसा बजावल्या, काहींची खाती बंद केली, रिकव्हरीची कारवाई केली. परंतु हे अधिकार त्यांना कोणत्या कायद्यान्वये आहेत, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांत तपास पूर्ण होईपर्यंत व आरोपींवर कारवाई झाल्याशिवाय रिकव्हरी करता येत नाही. तरीसुद्धा तहसीलदारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतल्याने त्यांच्या कारवायांची कायदेशीरता संशयास्पद ठरत आहे. याशिवाय, तपासणी समितीची रचना देखील आपल्या मर्जीतील अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि सीएससी सेंटरची यंत्रणा यांना वाचवण्यासाठी तहसीलदारांनी स्वतःच्या आदेशाने केल्याचा महाजन यांचा आरोप आहे. या समितीत सामील असलेले आशिष काकडे यांच्यासारखे काही सदस्य व त्यांचे नातेवाईकच या प्रकरणात आरोपी होणार असल्याने त्यामुळे समितीची निष्पक्षता पूर्णतः धोक्यात आली आहे. याचवेळी काही तथाकथित पत्रकारांनी तहसीलदारांचे गुणगान गाऊन त्यांच्या कारवायांना महत्त्व दिले. ब्रेकिंग न्यूजद्वारे “घोटाळा तहसीलदारांनीच उघड केला” असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की संदीप महाजन यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच हा घोटाळा प्रकाशझोतात आला आहे. संदीप महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांचा या आंदोलनामागे कोणताही राजकीय स्वार्थ नाही. त्यांनी आयुष्यात कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचावा. चुकीची कारवाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि निरपराध शेतकरी, युवक वा नागरिक यांना गुन्ह्यात अडकवू नये, ही त्यांची ठाम मागणी आहे. सध्या तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना “सर्व्हर डाऊन”, “तांत्रिक अडचणी” अशा कारणांनी वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात असून “आपला पैसा मिळणार की नाही?” हा प्रश्न त्यांना सतावत आहे. संदीप महाजन यांनी मागणी केली आहे की प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती अनुदान मंजूर झाले याची सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपात तातडीने जाहीर करावी आणि त्याची प्रत पत्रकारांना उपलब्ध करून द्यावी. त्यातूनच खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल. या प्रकरणात तहसीलदार विजय बनसोडे यांचा हस्तक्षेप आणि कायद्याबाहेरील कारवाया गंभीर ठरत असल्याने त्यांचे निलंबन करून पाचोरातून तातडीने बदली करण्याची मागणी आता जोर धरत आहे. कारण ते पदावर राहिल्यास तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हा शाखेला पारदर्शक सहकार्य मिळावे यासाठी त्यांचे निलंबन अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीत संदीप महाजन यांनी दिलेला विश्वास शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. ते म्हणतात की योग्य कायदेशीर पूर्ततेनंतर शेतकऱ्यांचा पैसा निश्चितपणे त्यांच्या खात्यावर पोहोचेल. परंतु त्यासाठी पारदर्शक तपास, दोषींवर कठोर कारवाई आणि तहसीलदारांचे निलंबन या तिन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत. लवकरच आंदोलक संदीप महाजन या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत. त्यामध्ये सर्व पुरावे व वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येणार असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला आणखी गती मिळणार आहे. त्यामुळे तहसीलदार विजय बनसोडे यांची भूमिका, आमदार किशोरआप्पा पाटील यांचा संताप आणि शेतकऱ्यांचा न्याय मिळवण्यासाठीचा संघर्ष ही सर्वच मुद्दे चर्चेत राहणार आहेत. या घोटाळ्यातून एकच सत्य ठळक झाले आहे – शासनाने दिलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. निधीचा अपहार करणे हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळण्यासारखा गंभीर अपराध आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२५ मधील सुपर–४ टी-२० सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना जराशीही संधी न देता १७२ धावांचे लक्ष्य फक्त १७.२ षटकांत गाठले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर फखर झमान (१५ धावा, ९ चेंडू) हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर उंच झेल मारून बाद झाला. सईम अयूब (२१) शिवम दुबेच्या गोलंदाजीवर झेल देऊन माघारी परतला. हुसैन तलत (१०) यावेळी कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. सलामीला आलेल्या साहिबजादा फरहानने ५८ धावांची महत्वाची खेळी केली, पण शिवम दुबेच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. मोहम्मद नवाज (२१) याला धावचीत बाद केले. आघा सलमान (१७*) आणि फहीम अश्रफ फक्त ८ चेंडूत २० धावा ठोकून नाबाद राहिले. भारताकडून शिवम दुबेने २ बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १ बळी मिळवला. जसप्रीत बुमराहने बळी मिळवला नाही, पण त्याचा अचूक मारा आणि वेगवान यॉर्कर पाकिस्तानी फलंदाजांची डोकेदुखी ठरली.
१७२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात आक्रमक ठरली. शुभमन गिल (४७) याला फहीम अश्रफने त्रिफळाचीत बाद केले. अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावा (६ चौकार, ५ षटकार) ठोकल्या आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. कर्णधार सूर्यकुमार यादव (०) हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. चाचपडत खेळणारा संजू सॅमसनही (१३) हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला. तिलक वर्मा (३०) आणि हार्दिक पांड्या (७) शेवटच्या टप्प्यात संयमाने खेळत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यातील प्रत्येक धावा आणि बळीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दुबईतील मैदानावर भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वेगळेपण दिसत होते, पण अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे भारतीय प्रेक्षकांचा जल्लोष दुणावला होता.
या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याच्या आक्रमक खेळामुळे भारताने विजय धावसंख्या गाठली आणि स्पर्धेतली आपली जागा अधिक भक्कम केली.
स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सामन्यांनुसार भारताचा संघ अंकतालिकेत वरच्या क्रमांकावर आहे. सामन्यातील नाट्यमय क्षण, ताणतणाव, आक्रमक खेळ आणि प्रेक्षकांचा उत्साह यांमुळे भारतीय संघाची आघाडी कायम ठेवण्याची ही महत्वाची संधी ठरली आहे.
पाचोरा – तालुक्यातील काही भागात अचानक निर्माण झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना त्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या झोपड्याही टिकल्या नाहीत. एका क्षणात सर्वस्व वाहून गेले, काहींचे घर कोसळले, काहींच्या डोळ्यातले स्वप्न ढासळले. अशा वेदनादायी प्रसंगी शासनाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून तातडीने
पंचनामे केले, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकांची खरी ओळख त्यांना संकटाच्या क्षणी येणाऱ्या मदतीतून होते. इथेच खऱ्या सेवेचे आणि त्यागाचे दर्शन घडते. याच वेळी, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादातून त्यांच्या सुपुत्राने, सुमित किशोरआप्पा पाटील यांनी संकटग्रस्त कुटुंबांच्या अश्रूंना हात पुसण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाने केलेल्या पंचनाम्यांवर न थांबता, स्वतःच्या पुढाकारातून त्यांनी थेट प्रत्येक गरजूंच्या घरापर्यंत जाऊन मदतीचा हात पुढे केला. केवळ एका दिवसाचा आधार नव्हे, तर पुढील दोन महिने त्यांच्या कुटुंबाचा चुल पेटेल, मुले उपाशी राहणार नाहीत याची खात्री देणारा किराणा व आवश्यक सामान वाटप करून त्यांनी आपली समाजसेवेची बांधिलकी सिद्ध केली. लोकांच्या दुःखात सहभागी होणे ही केवळ राजकारणाची जबाबदारी नव्हे, तर ती एक मानवी कर्तव्य भावना आहे. किशोरआप्पा पाटील यांनी लोकसेवा करताना उभी केलेली मोलाची परंपरा लोकांनी अनुभवलेली आहेच; पण त्याहूनही अधिक स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा सुमित यांनी या परंपरेत केवळ पाऊल टाकले नाही, तर ती चार पावले पुढे नेण्याचा प्रयत्न केला. “वडिलांपेक्षा मुलगा चार पावले पुढे” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून जिवंत केला. ही मदत म्हणजे फक्त धान्याच्या पोत्यातली मोजकी धान्यकण नाहीत, तर यात समर्पण आहे, माणुसकी आहे, आणि “सेवा परमो धर्म” या जीवनमूल्याचा जिवंत प्रत्यय आहे. आपल्या हातून मिळालेल्या या छोट्याशा पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या मदतीमुळे अनेक कुटुंबांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले. संकटाच्या काळात एखाद्याच्या दारात उभा राहून त्यांच्या डोळ्यांत पाझरलेला विश्वास पाहणे, हेच खरे यश असते. सुमित किशोरआप्पा पाटील यांची ही कृती दाखवून देते की, समाजसेवा ही वारशाने मिळणारी मालमत्ता नसते, ती अंतःकरणातून येणारी प्रेरणा असते. वडिलांनी पेरलेल्या सेवाभावाच्या बीजाला आता मुलाने खतपाणी घालत चार पावले पुढे नेण्याचे काम सुरू केले आहे. हा वारसा पुढील काळातही जनतेसाठी एक विश्वासाचा दीपस्तंभ ठरेल, याची खात्री जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
पाचोरा ( भोला पाटील ) दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी, रविवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजता भडगाव रोडवरील शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) पाचोरा येथे मराठा सेवा संघाच्या पाचोरा-भडगाव विभागातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक कार्याला चालना देणे, नवीन पदाधिकारी नियुक्त करणे व आगामी कार्ययोजना निश्चित करणे या हेतूने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस विभागीय कार्याध्यक्ष मा. रामदादा पवार, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत ठाकरे सर तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी विशेष उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बळकटीसाठी नवे चेहरे, उत्साही तरुण व अनुभवी कार्यकर्त्यांचा मेळ घालून पुढील वाटचालीसाठी ठोस निर्णय घेण्यात आले. चर्चेनंतर झालेल्या निवडींमध्ये काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. विद्यमान तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले शिवश्री सुनील पाटील सर यांची प्रामाणिकता, संघटन कौशल्य व सातत्यपूर्ण कार्य पाहून त्यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती करण्यात आली. त्यांच्या या निवडीने पाचोरा-भडगाव विभागातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व अभिमानाची भावना व्यक्त झाली. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यात संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी शिवश्री राहुलआप्पा बोरसे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तरुणाईशी जुळवून घेणारे व सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहणारे राहुलआप्पा बोरसे यांच्या निवडीमुळे संघटनेला नवे बळ मिळणार आहे. याशिवाय पाचोरा शहरात संघटनेचे प्रभावी नेतृत्व उभे करण्यासाठी शिवश्री नितीन पाटील सर यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून संघटनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होणार आहे. सामाजिक क्षेत्रात शिक्षणाची उभारणी व प्रबोधनाची गरज अधोरेखित करताना पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी शिवश्री महेश पाटील सर यांची निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव व दृष्टीकोन यामुळे संघटनेच्या शैक्षणिक उपक्रमांना नवे आयाम मिळतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच मराठा सेवा संघ प्रेरित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या वाटचालीतील हा ऐतिहासिक क्षण मानला जात असून, संघटनेच्या भविष्यासाठी घेतलेल्या या निवडी फार महत्वाच्या ठरणार आहेत. बैठकीत बोलताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटनेची भूमिका अधोरेखित केली. संघटन एकजुटीने, सामाजिक बांधिलकी जपत, समाजातील तरुणाईला दिशा देणारी असावी, यावर भर देण्यात आला. आजवरच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, नव्या पदाधिकाऱ्यांवर समाजाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी आहे, असेही सांगण्यात आले. पाचोरा-भडगाव विभाग हा संघटनेच्या दृष्टीने नेहमीच महत्वाचा राहिला आहे. येथील कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी विविध उपक्रम राबवले असून, शिक्षण, रोजगार, आरक्षण, महिला सबलीकरण अशा विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला विशेष महत्व लाभले. कार्यकर्त्यांनी “जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमवून टाकले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन व सत्कार करून गौरव करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेच्या या निवडींमुळे आगामी काळात मराठा सेवा संघाच्या कार्याला नवे बळ, दिशा व गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी व तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी ही नवीन पदाधिकारी मंडळी कटिबद्ध राहतील, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारे पाचोरा-भडगाव तालुक्यातील मराठा सेवा संघाची बैठक ऐतिहासिक ठरली. यातून संघटनेच्या संघटनात्मक क्षमतेचे व समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे दर्शन घडले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटना अधिक भक्कमपणे उभी राहील आणि समाजहितासाठी कार्य करत राहील, अशी एकमुखी भावना उपस्थितांमध्ये उमटली. जय जिजाऊ… जय शिवराय…!
नवी मुंबई – स्त्रीशक्ती म्हणजे केवळ घरापुरती मर्यादित जबाबदारी नव्हे, तर समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी एक प्रेरणादायी शक्ती आहे, हे दाखवून देणारा एक ऐतिहासिक सोहळा नुकताच पनवेल येथे उत्साहात पार पडला. मनमुक्त फाऊंडेशनतर्फे शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरुची हॉल, पनवेल येथे “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा” या नावाने भव्य व वैभवशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची मूळ संकल्पना डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी मांडली होती. त्यांच्या विचारातून जन्माला आलेल्या या उपक्रमाला मनमुक्त फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी जोमाने उचलून धरले. स्थापनेपासूनच मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचा सन्मान या क्षेत्रांत फाऊंडेशनने केलेले उल्लेखनीय कार्य समाजात वेगळा ठसा उमटवत आले आहे. “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” हे संस्थेचे ध्येयवाक्य या कार्यक्रमातही प्रत्यक्ष जाणवले. या प्रेरणादायी सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवून स्वतःचा स्वतंत्र मार्ग तयार करणाऱ्या दहा महिलांचा सामूहिक गौरव करण्यात आला. घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने, आर्थिक मर्यादा आणि समाजातील दृष्टीकोन या साऱ्यावर मात करून या महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या अनेकांसाठी दीपस्तंभ ठरल्या आहेत. या सन्मानार्थींमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या नावांचा विशेष समावेश आहे. त्यांच्या प्रवासाने सिद्ध केले की स्त्रीशक्तीला कोणतीही चौकट थांबवू शकत नाही. सदर कृतज्ञता सोहळ्यास महाराष्ट्रातील नामांकित मान्यवर उपस्थित राहून महिलांच्या या यशगाथांना मानाचा मुजरा केला. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) या व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष वैभव प्राप्त झाले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित प्रेक्षकांच्या मनात स्त्रीशक्तीबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण झाला. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी मनमुक्त फाऊंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संचालिका अस्मिता कालन, मनिषा कुन्हाडे व मुक्ता भोसले यांच्या अथक परिश्रमामुळे हा दैदिप्यमान सोहळा यशस्वीपणे पार पडला, असे सर्वांनी एकमुखाने नमूद केले. समाजातील प्रत्येकाला आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या संकल्पनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. पराग कालन आणि दिव्या भोसले यांनी आकर्षक, सहज व भावनात्मक शैलीत केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी या सोहळ्याचे अनुभवताना स्त्रीशक्तीचा गौरव करण्याची ही योग्य संधी असल्याची भावना व्यक्त केली. सोहळ्याच्या अखेरीस डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात सातत्याने आयोजित करण्यात येतील. कारण, स्त्रीशक्तीचा गौरव करणे म्हणजे समाजाला प्रेरणा देणे आणि नव्या पिढीला आदर्श घालून देणे होय. पनवेल शहर या दिवसाचा एक ऐतिहासिक साक्षीदार ठरले. स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा अर्पण करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला असून, मराठी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन उपस्थितांच्या पोशाखातून व बोलण्यातून घडले. या सोहळ्याने समाजातील प्रत्येकाला विचार करायला लावले की, स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून, समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी एक सशक्त शक्ती आहे.