जळगाव – जिल्हा सत्र न्यायालयातील वकिली व्यवसाय करणारे ॲड सचिन सुरेश चव्हाण यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८ (7)अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या तक्रारीत म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षकाराने एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी चौकशीसाठी पाचोरा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे
त्यांना सांगण्यात आले. चौकशी दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तक्रारदार व त्यांच्या पक्षकार मित्रांसोबत उर्मट आणि बेकायदेशीर वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांनी अपमानास्पद वर्तन करत धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे का?”, “तुम्ही वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी कायद्याचे शिक्षण घेतले आहे का?” अशा प्रकारच्या अपमानास्पद शब्दांत त्यांचा अपमान करण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात माहिती प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयासह, महाराष्ट्र पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण आणि पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना पाठवण्यात आली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
पाचोरा: श्री अंबाजी माता मंदिराच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ४ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगर येथील या मंदिरात महाप्रसाद (भंडारा), महापूजा, पार्थिव शिवलिंग पूजन व महाआरतीचे आयोजन असून, या सोहळ्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्याच्या
पार्श्वभूमीवर गांधी नगर परिसरातील भुयारी गटारीमुळे मुख्य रस्त्यांवरील खड्डे हे भाविकांसाठी मोठी समस्या ठरत आहेत. मंदीराकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता संभाव्य अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिक व भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. श्री अंबाजी माता मंदिराचा वर्धापन दिन हा भाविकांसाठी श्रद्धेचा मोठा सोहळा असतो. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा, यासाठी पाचोरा नगरपालिकेने तसेच विद्यमान नगरसेवक व भावी नगरसेवक यांनी ही महत्वाची समस्या लक्षात घेऊन तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण अथवा खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. नगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यास, या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि कार्यक्रम निर्विघ्न पार पडेल. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचोरा: शहरात मोठी खळबळ उडवणाऱ्या पत्रकाराच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात पत्रकार संदीप महाजन यांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिस प्रशासनाची तपास यंत्रणा सक्रिय झाली. तब्बल पाच दिवसा पासून बेपत्ता असलेली मुलगी केवळ १२ तासांच्या आत पोलीसांनी हरवलेली मुलगी आणि मुलगा शोधून ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी फारशी तत्परता दाखवली नव्हती. मात्र, पत्रकार संदीप महाजन यांनी व काही पत्रकार बांधवांनी या
प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा करत पोलिस प्रशासना विरोधात आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणा वेगाने कार्यान्वित झाली मुलाच्या वडीलांना व नातेवाईक, मित्र यांना पोलीसी भाषा दाखवताच अल्पावधीतच पोलीसांनी आरोपींचा माग काढून मुलगी आणि मुलगा दोघांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अन्य प्रकरणांमध्ये तक्रारींची दखल घेण्यासाठी दिवसेंदिवस विलंब होतो, तपास ढिसाळपणे रेटला जातो, मात्र पत्रकारांनी
आवाज उठवताच १२ तासांतच गुन्ह्याचा उलगडा होतो, हे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकार महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली असून, “सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्यावरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर पोलिसांना योग्य पद्धतीने काम करण्यास भाग पाडले, तर तपासाची गती वाढते,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.आता सदर प्रकरणी पुढे काय होते आणि आरोपीस मदत केल्या प्रकरणी कोणाला आरोपी केले जाते व कोणाला अभय दिले जाते याकडे लक्ष लागुन आहे ही घटना पाचोरा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीचे प्रतिबिंब असुन पोलिसांनी केवळ दबावाखाली येऊन नव्हे, तर प्रत्येक प्रकरणात तत्परतेने काम करावे, अशी मागणी आता समाजातून होऊ लागली आहे.
पाचोरा – शहरातील श्री अंबाजी माता मंदिर यंदा आपल्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ४ मार्च २०२५, मंगळवार रोजी हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. मंदिर विश्वस्त आणि भाविक मंडळींनी हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केला असून, महापूजा, पारंपरिक सोहळे, महाआरती आणि महाप्रसाद (भंडारा) या निमित्ताने भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत. महापूजा: सकाळी ७.०० ते ९.०० पारंपरिक सोहळा: सकाळी ९.०० ते १०.३० महाआरती: सकाळी १०.३० ते ११.०० महाप्रसाद (भंडारा): सकाळी ११.०० ते दुपारी २.०० हा सोहळा श्री अंबाजी माता मंदिर, गांधी नगर, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने सजवला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, आयोजकांनी आवश्यक व्यवस्थापन केले आहे.
पाचोरा – येथील बाजोरिया नगर भागातील टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाला पालक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोहन पाटील आणि प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव रोडवरील वाघ डेअरी समोरील प्रांगणात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, भारत पाटील, रविंद्र पाटील, सपना शिंदे, अमोल बडगुजर, तुषार आणि भुषण सर, भरत खंडेलवाल, प्रा. सी. एन. चौधरी, ध्येय न्यूजचे संचालक संदीप महाजन, राहूल पाटील, अनिल येवले, ललिता पाटील, वैशाली पाटील, ऐश्वर्या वाघ, प्रा. गौरव चौधरी, अक्षय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्य वार्षिक सोहळ्यात पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची उधळण करत नृत्य, गायन, नाट्य, वकृत्व, फॅन्सी ड्रेस अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमातील सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये केले आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न केला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोबाईलचा अतिरेकी वापर, प्लास्टिक आणि गुटखा बंदी, स्वच्छता अभियान, ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण, व्यसनांचे दुष्परिणाम, पालकांची भूमिका, कौटुंबिक सुसंवाद आणि संस्कारांचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटके आणि एकपात्री अभिनयाद्वारे प्रभावी प्रबोधन केले. त्यांच्या उत्कट सादरीकरणामुळे उपस्थित पालक आणि मान्यवर भारावून गेले. या सांस्कृतिक सोहळ्यात मुलांनी सादर केलेल्या विविध कलाकृतींना पालकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मुलांच्या सहज आणि निरागस अभिनयाने, जोशपूर्ण नृत्याने आणि प्रभावी संवादांनी संपूर्ण वातावरण भारून गेले. अनेक पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “या कार्यक्रमामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होत असून, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो.” सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी आणि त्यांना समाजातील विविध समस्यांविषयी जागरूक करता यावे, हा या वार्षिक उत्सवामागील मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून पालक व प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे संदेश दिले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची भरभरून प्रशंसा केली. पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम महत्त्वाचे असतात. शिक्षणाबरोबरच कलागुणांना चालना देणे हे विद्यार्थी घडविण्यासाठी गरजेचे आहे.” पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी मुलांच्या सामाजिक भान जपणाऱ्या सादरीकरणाबद्दल कौतुक व्यक्त केले आणि सांगितले की, “या लहानग्यांनी मोठ्यांनाही शिकण्यासारखे काहीतरी दिले आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ही लहान वयातच निर्माण झाली पाहिजे.” तसेच, प्रा. सी. एन. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेबद्दल गौरवोद्गार काढले. ध्येय न्यूजचे संचालक संदीप महाजन यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या अभिनय व वक्तृत्व कौशल्यांची प्रशंसा केली. या उत्सवात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे विविध रंग सादर केले. भारतीय परंपरा, सण, उत्सव, तसेच देशप्रेम यासंदर्भातील विविध नृत्य-नाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. विशेषतः “संस्कारांचे महत्त्व” या नाटिकेने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. या नाटिकेमध्ये पालकांनी आपल्या मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांना नैतिकता आणि मूल्यांची शिकवण कशी द्यावी या संदर्भात अत्यंत मार्मिक संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला पालकांनी भरभरून दाद दिली. टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रोहन पाटील आणि प्रियंका पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पालकांनी त्यांचे आभार मानले. रोहन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्यातील सृजनशीलता विकसित होते.” कार्यक्रमाच्या अखेरीस प्रियंका पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि असेच कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केलेल्या कार्यक्रमांची उजळणी पालकांनी घरीही केली. अनेक पालकांनी सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे मुलांना आपले सुप्त गुण सादर करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलते.” शाळेने यापुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली. संपूर्ण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि पालकांसाठी आनंददायी आठवण बनला.
पाचोरा – महिलांचा जागतिक दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची संधीही आहे. याच उद्देशाने ‘गुजर सखी’ महिला मंडळाच्या वतीने शनिवार, दि. ८ मार्च रोजी सु. भा. प्राथमिक विद्या मंदिर, देशमुखवाडी, पाचोरा येथे भव्य आणि बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन, पारंपरिक वेशभूषा प्रदर्शन, आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये… १) एकल लोकनृत्य स्पर्धा – मराठमोळ्या ठसक्यात! लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पारंपरिक एकल लोकनृत्य (सोलो फोक डान्स) हे विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांना ३ मिनिटांच्या वेळमर्यादेत नृत्य सादर करता येईल. महाराष्ट्राच्या समृद्ध नृत्यपरंपरेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. २) मराठी वेशभूषा स्पर्धा – संस्कृतीचा गौरव! महिलांनी पारंपरिक मराठी पेहराव करून या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. नऊवारी साडी, पैठणी,किंवा आपल्या बालपणातील मराठी पेहराव,महाराष्ट्रातील नामांकित मराठी महिला व्यक्तिमत्वाचे पेहराव..इत्यादींना प्राधान्य देण्यात आले आहे.. ३) विनोदी उखाणा स्पर्धा – शब्दसौंदर्याची जादू! महाराष्ट्रीयन लग्नसमारंभात रंगत आणणाऱ्या उखाण्यांची ही स्पर्धा महिलांसाठी खास ठेवण्यात आली आहे. मात्र पारंपरिक उखाणा न घेता विनोदी शैलीतील, चतुरस्र आणि सृजनशील उखाणे सादर करून सहभागी महिला आपली कलात्मकता सिद्ध करू शकतात. ४) ‘होम मिनिस्टर’ –ज्या महिला वरील तीन स्पर्धेत सहभागी होवू शकत नसतील त्या सर्वांसाठी घरगुती खेळांचा जल्लोष! महिलांसाठी विविध घरगुती खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विनोदी आणि कौशल्यावर आधारित विविध खेळ खेळून महिलांना आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देता येईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी तिच्या आवडीचे खास वान तिला भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यासोबतच कोल्ड कॉफी आणि स्वादिष्ट अल्पोपहार यांचा आस्वाद घेण्याची संधीही महिलांना मिळणार आहे. महिला आरोग्यासाठी विशेष उपक्रम: रक्त तपासणी शिबिर! महिला दिनाच्या निमित्ताने ८ ते १० मार्च या कालावधीत महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. या तपासणीमध्ये रक्तगट, हिमोग्लोबिन पातळी, थायरॉईड, आणि रक्तातील साखर (शुगर लेव्हल) यांचे परीक्षण केले जाणार आहे. या तपासणीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी. कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये: ✅ संपूर्णतः मोफत सहभाग – कोणत्याही स्पर्धेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ✅ वेळेवर सुरू होणारा कार्यक्रम – ठरलेल्या वेळेतच सर्व कार्यक्रम पार पडतील. ✅ सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन – मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. स्पर्धेसाठी संपर्क आणि नावनोंदणी: स्वाती पाटील – 970440303 महिला दिनानिमित्त आयोजित हा विशेष कार्यक्रम महिलांना एकत्र आणण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे साधन ठरणार आहे. पारंपरिकतेची गोडी, स्पर्धेचा रोमांच, मनोरंजनाचा आनंद आणि आरोग्यविषयक जागरूकता एकत्र अनुभवण्यासाठी हा सोहळा नक्कीच अविस्मरणीय ठरेल! असे आवाहन डॉ सौ सोनाली पाटील,सौ वैशाली पाटील,सौ शीतल महाजन यांनी केले आहे
पाचोरा – शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, नागरिक असुरक्षिततेच्या भावनेत जीवन जगत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथमच गावठी कट्टे सापडण्यासारखे गंभीर गुन्हेगारी प्रकार घडत आहेत. पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांना खुलेआम अभय मिळत आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणी कोणतीही चौकशी वा कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्या तात्काळ बदलीसाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेची चौकशी करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे. विशेष म्हणजे बहुजन समाजातील व्यक्ती व पत्रकार धनराज पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला चक्री या अवैध धंद्यातील तरुणाने पळवुन नेले तरी सदरचा तपास संशयास्पद आहे १) शहरात गावठी कट्टे सापडण्याच्या घटनांनी नागरिक भयभीत २) गुन्हेगारांशी पोलिसांचे मैत्रीपूर्ण संबंध – गुन्हेगारीला मिळतेय अभय ठराविक पोलिसांचे मोबा. नंबरचे कॉल डिटेल तपासले तर गुन्हेगार , अवैध धंदेवाले यांच्याशी किती सलोख्याचे संबंध आहेत हे सहज लक्षात येईल ३) नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही किंवा विलंब केला जातो ४) तक्रारींच्या नोंदीत पक्षपात – ठराविक लोकांना संरक्षण ५)सामान्य नागरिकांना त्रास, तर गुन्हेगारांना आश्रय ६)आर्थिक व्यवहारातून ठराविक लोकांचेच प्रश्न सोडवले जातात ७) महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष – बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबियांकडून पैसे आणि वाहनसह इतर खर्च वसूल करणे ८) निर्भया पथकाचे अपयश – महिलांना संरक्षणाचा अभाव ९) अवैध दारू, जुगार अड्डे, सट्टे , चक्री व इतर गुन्हेगारी प्रकारांवर पोलीस मूकदर्शक संमती १०) पोलीस दलातील अंतर्गत शिस्तभंग – कायद्याची खिल्ली उडवली जाते ठरविक पोलीस व अधिकाऱ्यांवर आशिर्वाद विरोध करणारे व कलेक्शन न आणणाऱ्या पोलीसांवर कारवाई करणे किंवा त्यांचे विरोधात वरिष्ठांन कडे रिपोर्ट पाठवणे ११) पाचोऱ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाल्याचे विद्यमान आमदार किशोरआप्पा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. या प्रकरणी अद्याप कोणतीही चौकशी
नाही, तपास नाही, कारवाई नाही!विशेष म्हणजे या प्रकरणात जितेंद्र आहिरे नामक दलीत समाजाचा एक प्राध्यापक बेपत्ता आहे तरी त्याच्या तपासावर प्रगती शुन्यया प्रकरणी माळी नामक व्यक्तीला ताब्यात घेतले नंतर आर्थीक तडजोड झाली की काय? त्यावर चुप्पी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कार्यकाळात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांना वाचा फुटली असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ढिलाई आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ तपास प्रक्रिया लांबवून अन्यायकारक वर्तन यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर नागरिकांचा विश्वास उडाला आहे यासाठी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. जर प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे. विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, विविध सामाजिक संघटना व जागृत नागरिकांनी आपले अंतर्गत मतभेद, गटतट बाजुला ठेऊन या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन महाजन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पाचोरा- शहरात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली असून, संबंधित मुलगा आणि त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी पोलिस प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणात नवीन कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल होणे आवश्यक असतानाही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांची सहनशक्ती संपली असून, त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) आणि महिला व बाल विकास विभागासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे.या घटनेने संपूर्ण शहरात चिंता आणि रोष व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाचा कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली, तक्रारी दाखल केल्या, परंतु
पोलिसांचा दिरंगाईचा आणि निष्क्रियतेचा पवित्रा अजूनही कायम आहे. वास्तविक, CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स पळून जाण्यास मदत करणारे यांचा तपास युद्धपातळीवर होणे गरजेचे होते, मात्र तसे काहीही घडत नसल्याचे दिसत आहे अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भात बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण कायदा (POCSO Act) तसेच भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आरोपी व त्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. विशेषतः, अपहरण, बालविवाहासाठी जबरदस्ती, लैंगिक शोषण, संगनमत करून गुन्हा करण्यास मदत करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई अपेक्षित होती. तथापि, पोलिसांनी संबंधित मुलाला मदत करणाऱ्यांना व नातेवाईकांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही आणि त्याच्या मित्रमंडळींविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. अल्पवयीन मुलीचे अपहरण हे केवळ एका कुटुंबाचे दु:ख नाही, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. जर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली असती, तर इतर कोणत्याही आरोपींना असे कृत्य करण्याची हिंमत झाली नसती. पण दुर्दैवाने, पाचोरा पोलीस प्रशासन “अधिकृत आदेश” आणि “पुराव्यांच्या चाचण्या” याच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात मुलाचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि इतर सहकारी यांना तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांकडून याबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास विलंब केला, कॉल रेकॉर्ड्स मिळवण्यात निष्काळजीपणा दाखवला आणि मोबाईल लोकेशनद्वारे मुलीचा ठावठिकाणा लावण्यास विलंब केला, हे विशेष चिंतेचे कारण ठरत आहे. परिस्थिती अशी आहे की, पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम गावठी कट्टे आणि इतर गुन्हेगारी कृत्ये उघडकीस येतात, मात्र स्थानिक पोलिसांना याची माहितीही राहत नाही. काही दिवसापूर्वी, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यांची मोठी तस्करी उघड केली होती, पण आश्चर्य म्हणजे, पाचोरा पोलीस प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ राहिले होते. चोऱ्याचे प्रमाणतर नित्याचे झाले आहे त्यामुळे या पोलीस प्रशासनाची जबाबदारी, तत्परता आणि कारवाई करण्याची इच्छाशक्ती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारख्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी जर तातडीने अॅक्शन घेतली नाही, तर अशा घटनांमध्ये गुन्हेगारांना अभय मिळत राहील आणि समाजात असे प्रकार पुन्हा घडण्याची भीती वाढेल पोलिसांची चालढकल पाहून मुलीच्या पालकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) आणि महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांचा आक्रोश इतका प्रखर आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन न झाल्यास आणि पोलिसांनी निष्क्रियता दाखवल्यास, आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.महिला व बालविकास विभागाने POCSO कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची शिफारस केली असून, जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिज मुलाच्या कुटुंबीयांवर आणि मित्रमंडळींवर पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? पोलिसांची ही झोप अपहरण करणाऱ्या आरोपीला अभय देण्याचा प्रकार आहे का? जर पोलिसांनी आता तातडीने कारवाई केली नाही, तर हे प्रकरण जिल्हा स्तरावरच नाही, तर राज्य पातळीवर मोठ्या आंदोलनाचा विषय ठरू शकतो. हा केवळ एक गुन्हा नाही, तर समाजात वाढत असलेल्या अशा घटनांचे प्रतिबिंब आहे. जर अल्पवयीन मुलींना अशा प्रकारे फसवले जात असेल आणि पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसेल, तर भविष्यात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची भीती आहे. समाजातील प्रत्येकाने पोलिसांवर दबाव आणणे गरजेचे आहे, जेणेकरून अल्पवयीन मुलींचे संरक्षण मजबूत करता येईल आणि अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई करावी: मुलाचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा सखोल तपास करावा. POCSO आणि IPC अंतर्गत कठोर गुन्हे नोंदवून आरोपींना तातडीने अटक करावी. मुलाच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकार्य करणाऱ्या लोकांना ताब्यात घ्यावे. महिला आणि बाल संरक्षण विभागाने या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी. पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या घटनेत पोलिसांनी निष्क्रियता दाखवली, त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे. समाजानेही अशा घटनांविरोधात उभे राहून, “चुकीला माफी नाही” या धोरणाचा अवलंब केला पाहिजे. जर पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेतली नाही, तर न्यायासाठी मोठे आंदोलन उभारणे गरजेचे आहे
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री जी. ओ. शाह ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आपल्या भाषेची श्रीमंती आपणच वाढवली पाहिजे. त्यासाठी अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. अनेक पुस्तकांचा आढावा घेताना ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने कसे भारावून टाकले, हे विद्यार्थिनींनी आपल्या स्वानुभवातून मांडले.”
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी ‘म…मराठीचा’ हे पथनाट्य सादर केले.
साताऱ्यावरून विशेष उपस्थित असलेले डबिंग कलाकार गणेश चिंचकर यांनी विद्यार्थिनींना मराठीत करिअरच्या संधी समजावून सांगितल्या आणि आवाजाच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. उपप्राचार्य डॉ. अवनिश भट्ट यांनी सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.
ग्रंथालयाच्या गायत्री हार्डीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा व मराठी भाषेच्या अभिजाततेचा आढावा घेत वाचनवृद्धीवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता सिंग यांनी विंदा करंदीकरांची ‘नजर रोखून नजरेमध्ये’ ही कविता सादर केली.
प्रा. किरण जाधव यांनी विदर्भी भाषेतील प्रहसन सादर केले, तर डॉ. हिरालाल भोसले यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनाने स्वतःमध्ये कसा बदल घडला, हे विद्यार्थिनींसमोर मांडले.
डॉ. माधवी साठये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचा आढावा घेत पर्यायी मराठी शब्दांविषयी माहिती दिली तसेच ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातील विचार मांडले.
मानसशास्त्र विभागाच्या वेदश्री भागवत यांनी अनेक पुस्तकांचा आढावा घेत आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. प्रा. शरद गिरमकर यांनी विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ आणि ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण केले.
प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ कादंबरीचा आढावा घेतला. काही विद्यार्थिनींनीही आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे, प्रा. नेहा भोसले आणि प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अश्विनी प्रभू यांनी समारोपप्रसंगी आपली भूमिका मांडली तसेच ग्रंथालयाने मराठी कवितासंग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी विभागामार्फत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी भूषविले. मराठी भाषेचा गौरव कुसुमाग्रज यांनी वाढविला म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा -दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रा डॉ रेखा पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ .महेंद्र किसन सोनवणे यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मातृभाषा दिन, मातृभाषा दिन हे वेगवेगळे असून मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो असे सांगितले.आपल्या व्याख्यानातून त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती दिली. सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर उपक्रमाचा आस्वाद बहुसंख्य प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला.