जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार राजेंद्र खैरनार गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराशी झुंज देत आहेत. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना तातडीने निर्णय घेणे कठीण जात आहे. वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवास, औषधे व इतर आवश्यक बाबींमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आला आहे. दरम्यान, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पत्रकार परिषदे नंतर चौका कट्यावर झालेल्या चर्चेत खैरनार यांची व्यथा इतर पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचली. पत्रकार बंधूंनी क्षणाचाही विलंब न लावता, आपापल्या परीने जी काही मदत शक्य होती ती तातडीने जमा करून खैरनार यांच्या हाती दिली. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. आपल्या व्यावसायिक आयुष्यात समाजातील घडामोडींचा आवाज पोहोचवणाऱ्या पत्रकाराला, आज त्याच बांधवांनी दिलासा दिला, हे खऱ्या अर्थाने पत्रकारितेतील ऐक्याचे दर्शन होते. पत्रकार बांधवांनी तातडीने खैरनार यांना पुढील उपचारासाठी नासीक रवाना केले आणि जबाबदारी उचलली. तरीही पुढील प्रवास, उपचारादरम्यान लागणारे खर्च व औषधांसाठी अजूनही मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे स्नेही, पत्रकार बांधव किंवा समाजातील दानशूर व्यक्तींनी इच्छुक असल्यास राजेंद्र खैरनार यांच्या मोबाईल क्र. 9096237788 वर थेट संपर्क साधून रक्कम पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार राजेंद्र खैरनार यांच्या उदाहरणातून समाजाने एकत्र येऊन दिलेला आधार हा नि:स्वार्थ सेवाभाव आणि खरी माणुसकी दाखवणारा प्रसंग आहे.
पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानातील घोटाळ्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात यावी, या मागणीसाठी पाचोऱ्यातील पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी 1 सप्टेबर 2025 पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2023-24 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील तब्बल 52,689 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. यासाठी शासनाकडून 70 कोटी 16 लाख 53 हजार 240 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र या अनुदानाचे वितरण करताना 39 शेतकऱ्यांच्या सुमारे 14 लाख 50 हजार रुपयांची रक्कम इतरांच्या खात्यात वळवण्यात आली. तहसीलदारांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून आतापर्यंत 4 लाख 63 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम चार दिवसांत वसूल होईल, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली मात्र, केवळ नोटिसा बजावणे व वसुलीवर समाधान न मानता, हे थेट गुन्हेगारी कृत्य असल्याने दोषींवर गुन्हा दाखल होऊन SIT अथवा आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे. महाजन यांनी दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत : 1) महसूल विभागातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे. 2) दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह दोषी ई-सेवा केंद्र चालक व खातेदारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा. 3) केवळ 2023-24 नव्हे, तर सन 2020-21 पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदानाची चौकशी व्हावी. 4) चुकीच्या खात्यांमध्ये वळवलेली रक्कम परत मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. 5) सर्व अनुदान यादी सार्वजनिक करून पारदर्शकता सुनिश्चित करावी. “शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा हडप करून काहींनी भ्रष्टाचाराचा खेळ खेळला आहे. हे पोटभरणेचे नव्हे तर सरळ लुटमारीचे प्रकरण आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शेतकरी वर्गाच्या न्यायासाठी माझे आमरण उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. याची जबाबदारी प्रशासनावरच राहील,” असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.
पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर शासनाकडून मिळालेल्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न होता परस्पर इतर व्यक्तींच्या खात्यात वळवून हडप करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शासनाच्या संवेदनशील योजनांमधील निधी अशा पद्धतीने वळवला जाणे हे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर शासनाच्याही विश्वासाला तडा देणारे आहे. या प्रकरणाची चौकशी व कारवाईची मागणी पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदार व पोलिसांकडे केली असून, दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर न्यायालयीन लढाई उभारण्याचा इशारा दिला आहे 2023-24 या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने अनुदान जाहीर केले. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणे अपेक्षित होते. परंतु तक्रारीनुसार, काही संगनमताने ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना न देता इतरांच्या खात्यात जमा झाली. अर्जदार रतिलाल गबरू नाईक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनुदान परस्पर ई-केवायसी करून इतरांच्या नावावर वळवण्यात आले. हे काम दीपक नाना पाटील यांच्या पिंप्री येथील ई-सेवा केंद्रातून झाले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीतील विशिष्ट तपशील असा 1) रतिलाल गबरू नाईक यांच्या नावावर मंजूर झालेली रु. 34,136 ची रक्कम परस्पर विश्वनाथ कटुबा पाटील यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा येथील खात्यात वळवली गेली. 2) शरतिलाल गबरू नाईक यांच्या नावावर मंजूर झालेली रु. 34,952 ची रक्कम परस्पर किशोर परदेशी यांच्या सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात जमा झाली. 3) संगिता राजाराम चव्हाण यांच्या नावावर मंजूर झालेली रु. 34,136 ची रक्कम परस्पर रुपेश परशुराम पाटील यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात जमा झाली. याप्रकरणात संबंधित तिन्ही खातेदारांचे मोबाईल क्रमांक व इतर तपशील तक्रारपत्रात जोडले गेले आहेत. व पीडित शेतकऱ्यांनी या खातेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी थेट कबुली दिली की, “आमच्या खात्यात आलेल्या पैशांपैकी काही रक्कम आम्ही महसूल विभागातील लोकांना दिली आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही”. अशा शब्दांत दादागिरी करत त्यांनी जबाबदारी झटकली. यावरून महसूल विभागातील काही कर्मचारी, ई-सेवा केंद्र चालक व बाहेरील खातेदार यांचे थेट संगनमत असल्याचे दिसते. तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी वारंवार तलाठी मॅडम यांच्याकडे कागदपत्रे सादर करून चौकशीची मागणी केली. मात्र दरवेळी “आज ये, उद्या ये, चार दिवसांनी बघू” अशा उडवाउडवीच्या उत्तरांनी त्यांना थेट भ्रमित केले. 2023-24 ची अधिकृत यादी उपलब्ध करून देण्यास नकार देण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ई-सेवा केंद्र चालक दीपक नाना पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी “आम्ही सर्व मॅनेज केले आहे. तहसीलदार, तलाठी यांना माहिती आहे” असे उत्तर दिले. ही कबुली अत्यंत गंभीर स्वरूपाची मानली जात आहे. या प्रकारामुळे शासनाने प्रत्यक्ष मदतीसाठी वितरित केलेला निधी काहींच्या खिशात गेला. शासनाच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आणि शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा लाटला गेला. अतिवृष्टीमुळे आधीच कर्जबाजारी व मानसिक ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा मिळायला हवा होता. परंतु उलट शासनाची मदत त्यांच्या हातात येण्याआधीच भ्रष्ट जाळ्यात अडकली. या घटनेमुळे संपूर्ण महसूल प्रशासनाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र उभे राहिले आहे. जर या प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास पूर्णपणे ढासळेल. याशिवाय, भविष्यात इतर योजनांमध्येही अशाच प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शासकीय स्तरावर तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक ठरते. पीडित शेतकऱ्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की – या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 2023-24 च्या अतिवृष्टी अनुदानाची खरी यादी सार्वजनिक करावी. परस्पर अन्य खात्यांमध्ये वळवलेले पैसे परत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत. महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीची चौकशी व्हावी. तक्रारदारांनी या प्रकरणातील पुरावे – आधार प्रमाणीकरण पावत्या, बँक खात्यांचे तपशील, शासन पिक नुकसान पावत्या – तहसीलदारांकडे जोडले आहेत. पाचोरा तालुक्यातील हा प्रकार ही केवळ काही शेतकऱ्यांची वेदना नसून, शासन यंत्रणेवरील गंभीर प्रश्नचिन्ह आहे. भ्रष्टाचाराचे हे जाळे जर खरे असेल, तर गरीब शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणाऱ्या शासन योजनेलाच गालबोट लागते. आता शासन, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि शासनाच्या योजनांवर त्यांचा विश्वास परत बसेल. कर्तव्यदक्ष आणि जनता व शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा असलेले पाचोरा प्रांताधिकारी साहेब व पाचोरा तहसीलदार साहेब यांचे या प्रकरणी ध्येय न्युज व झुंज वृत्तपत्र विशेष लक्ष वेधु इच्छीते 1. शेतकऱ्यांच्या नावावर आलेले अनुदान थेट परस्पर इतरांच्या खात्यात जमा झाले – हे गंभीर घोटाळे नाही का? 2. महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा थेट आरोप झाला आहे. आपण हे मान्य करता का? आणि दोषींवर कोणती कठोर कारवाई करणार? 3. मूळ शेतकऱ्यांचा पैसा परत त्यांच्या खात्यात जाण्यासाठी आपण तातडीने ठोस आदेश देणार का? 4. शेतकऱ्यांनी जोडलेले पुरावे – आधार पावत्या, बँक तपशील – हे सर्व पाहिल्यावरही विलंब का होत आहे? 5. अशा भ्रष्टाचारामुळे शासनावरील शेतकऱ्यांचा विश्वास पूर्णपणे ढासळतोय. तो परत मिळवण्यासाठी महसूल प्रशासन काय ठोस पावले उचलणार? 6. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ई-सेवा केंद्र व महसूल यंत्रणेत कोणते नियंत्रण आणणार? 7. दोषींवर फक्त अंतर्गत चौकशी करणार की थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई 8) करणार? पीडित शेतकऱ्यांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी दिल्या तरी “आज ये, उद्या ये” अशा उडवाउडवीची उत्तरे का दिली गेली? 9) अधिकृत अनुदान यादी सार्वजनिक करण्यास आपण का नकार दिला? यामागे कोणते दडपण किंवा संगनमत आहे का? 10) ई-सेवा केंद्र चालकावर “आम्ही सर्व मॅनेज केले आहे” अशी थेट कबुली दिल्याचा आरोप आहे. महसूल प्रशासन त्याची चौकशी कशी करणार? 11) शेतकऱ्यांचा पैसा चुकीच्या खात्यात जमा झाला. या गैरव्यवहाराला आपण थेट जबाबदार मानता का? 12) खातेदारांनीच कबुली दिली की काही रक्कम महसूल विभागातील लोकांना दिली आहे. यावर महसूल प्रशासनाची प्रतिक्रिया काय? 13) शेतकऱ्यांना हक्काचा पैसा मिळालेला नाही. आपण तातडीने तो पैसा परत देण्याची हमी देणार का? 14) शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास तुटतोय. त्यांना थेट दिलासा देण्यासाठी आपण कोणती पावले उचलणार?
पाचोरा – शैक्षणिक आयुष्याचा गाभा केवळ पुस्तकातील धडे, वर्गातील तास किंवा परीक्षांचे गुण यात सीमित नसतो. खरी शिकवण ती असते जी आयुष्यभर उपयोगी पडते, जी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची, श्रमाचे महत्त्व ओळखण्याची आणि जीवनमूल्ये आत्मसात करण्याची संधी देते. श्री गो. से. हायस्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या एका छोट्याशा पण हृदयस्पर्शी प्रसंगाने याचे सुंदर उदाहरण घडवले. सहावीच्या इंग्रजी विषयातील My English Book Six या पाठ्यपुस्तकात “Are you a DIY kid?” हा धडा आहे. त्यातील “I love to help in kitchen” या घटकात विद्यार्थ्यांना साधे पदार्थ स्वतः करून पाहण्याचा प्रकल्प इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. वैशाली कुमावत यांनी दिला. उद्देश असा की विद्यार्थी वाचनापुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून स्वयंपाकातील मूलभूत कौशल्ये शिकतील, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनकलेचा गोड अनुभव घेतील. योगायोग असा की याच दिवशी श्री गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचा वाढदिवस होता.
मुख्यध्यापक एन आर ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्री गो से हायस्कूल मधील शिक्षक-शिक्षिका वृंद
या प्रसंगाने प्रकल्पाला एक वेगळाच भावनिक रंग दिला. भातखंडे येथील विद्यार्थी प्रशांत कुमावत याने या प्रकल्पाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या शेतातून थेट गावरान मेवा – घोडची भाजी – आणली. ग्रामीण मातीत उगवलेली ही भाजी घरी स्वयंपाकघरात बनवताना प्रशांतने केवळ पाककलेचा अनुभव घेतला नाही, तर “I love to help in kitchen” या वाक्याचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला. आपल्या छोट्या हातांनी बनवलेली भाजी तयार करून शाळेत आणली साध्या पण पारंपरिक पदार्थाची ही अनुभूती विद्यार्थ्यांसाठी खास ठरली.विशेष सर्वांत हृदयस्पर्शी क्षण आला, जेव्हा प्रशांतने ही भाजी थेट मुख्याध्यापकांच्या दालनात नेली. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत त्याने पोळीचा घास स्वतःच्या हाताने मुख्याध्यापकांच्या तोंडात घातला. उपस्थित सर्वजण थबकून पाहत राहिले. एका लहानशा विद्यार्थ्याच्या आपुलकीने भरलेल्या या कृतीने डोळ्यांत पाणी आले. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनीही या क्षणाला भावनिक प्रतिसाद देताना सांगितले, “विद्यार्थ्याकडून अशी अनपेक्षित शुभेच्छा मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. मुलाने आपल्या हातांनी जेवण बनवून मला घास घालून शुभेच्छा दिल्या, हे माझ्यासाठी अनमोल आहे. शिक्षक म्हणून याहून मोठं बक्षीस काही असू शकत नाही.” त्यांच्या शब्दांतला आनंद आणि विद्यार्थ्यावरील माया संपूर्ण शाळेला जाणवली. या प्रकल्पात इतर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. कुणी सॅन्डविच बनवले, कुणी पोहे, तर कुणी साधा चहा तयार केला. प्रत्येकाने आपल्या परीने “I love to help in kitchen” या वाक्याची प्रचीती दिली. परंतु प्रशांतचा उपक्रम सर्वांच्या मनात घर करून गेला, कारण त्यात केवळ प्रकल्प पूर्ण करण्याची नुसती औपचारिकता नव्हती, तर भावनिकता, श्रमाचे महत्त्व आणि शिक्षकावरील आदर दडलेला होता. श्री गो. से. हायस्कूलची हीच खरी ताकद आहे. येथे शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहत नाही. प्रशांत कुमावतच्या या कृतीतून संपूर्ण वर्गाला प्रेरणा मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी “आपणही काहीतरी नवीन करून शिक्षकांना आनंद द्यावा” अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. कारण मुलांना घरगुती कामांशी जोडले की त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक संवेदनशील बनतात. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचा वाढदिवस या वर्षी केवळ केक, फुलांचा गुच्छ किंवा शुभेच्छांच्या ओघापुरता मर्यादित राहिला नाही. एका विद्यार्थ्याने आपल्या छोट्याशा हातांनी बनवलेला घास त्यांच्या तोंडात घातला – ही कृती अनमोल ठरली. कारण त्यात श्रम, आपुलकी, आदर आणि जीवनमूल्यांचा सुंदर संगम होता. शिक्षण हे नेमके कोणते असते याचे दर्शन या घटनेतून घडले. आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की “I love to help in kitchen” या वाक्याभोवती उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाने केवळ स्वयंपाक शिकवला नाही, तर शिक्षणाचे, श्रमाचे आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याचे खरे मूल्य उजागर केले.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय चर्चेचं केंद्र बनला आहे. गावोगावच्या चौकात, शेतशिवारातील पाखरांमध्ये, शहरातील व्यापारी कट्ट्यांवर, तरुणांच्या मंडळीत—सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, “या निवडणुकीत नेमकं कोणाचं पारडं जड ठरणार?” लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांची जनतेवरील पकड निश्चितच अजूनही मजबूत आहे. त्यांच्या कामकाजाचा सहजसोपेपणा, सतत लोकांमध्ये राहण्याची शैली आणि “आपलं माणूस” अशी जपलेली प्रतिमा—यामुळे त्यांना लोकांचा विश्वास आहे. परंतु दुसरीकडे, भाजपकडे केवळ व्यक्तींचं नव्हे तर संघटित नेतृत्वाचं बलशाली अस्त्र आहे. या संघटनाला योग्य दिशा, योग्य सूत्र आणि खासदार फंडातील विकासकामातून कार्यकर्त्यांना एकत्र आणणारं अधिष्ठान जर मिळालं, तर पाचोरा-भडगावमध्ये राजकारणाचा खेळच पलटी होऊ शकतो. आणि हे अधिष्ठान म्हणजे नामदार गिरीशभाऊ महाजन! गिरीशभाऊ महाजन हे केवळ भाजपचे ज्येष्ठ नेतेच नाहीत, तर राज्याच्या राजकारणात ठाम पाय रोवलेलं, कार्यकर्त्यांच्या हृदयात जागा मिळवलेलं आणि विरोधकांच्याही तोंडून कौतुक ओघाने मिळणारं असं व्यक्तिमत्व आहे. पाचोरा-भडगावच्या रणांगणात गिरीशभाऊंचा प्रभाव हा फक्त राजकीय नाही, तर भावनिकही आहे. कार्यकर्ते म्हणतात—“गिरीशभाऊ आहेत, म्हणजे आम्ही एक आहोत.” भाजपकडे आज मतदारसंघात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, नानासाहेब संजय वाघ, सौ. वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील , बन्सीलाल पाटील , नंदुबापु सोमवंशी अशी एक ना अनेक ताकदवान नावं आहेत. या प्रत्येकाचं स्थानिक पातळीवर स्वतंत्र वर्चस्व आहे. पण समस्या अशी की ही नेतेमंडळी अजून एकाच छत्राखाली पूर्णपणे संघटित झालेली नाहीत. प्रत्येकाचं स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र गट, स्वतःच्या पद्धतीनं होणारा प्रचार—यामुळे पक्षाचं सामूहिक बळ जनतेपुढे ठळकपणे येत नाही. लोकांच्या मनात प्रश्न उभा राहतो—“भाजप खरंच एकत्र आहे का? की फक्त कागदोपत्री ताकद आहे?” यावर उत्तर द्यायचं झालं, तर एकमेव सूत्रधार जो सगळ्यांना एकत्र आणू शकतो तो म्हणजे गिरीशभाऊ महाजन. त्यांनी राज्यभर संघटन उभं केलं आहे, नेतेमंडळींना एका सूत्रात बांधलं आहे आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जपला आहे. त्यामुळेच भाजपच्या विजयाची गुरुकिल्ली त्यांच्या हाती आहे. एवढं मात्र निश्चित आहे की जिल्ह्यातील वा राज्यातील राजकीय स्थिती काहीही असो, पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आजही एकनाथराव खडसे साहेबांचे हितचिंतकांचा मोठा आणि सक्रिय गट अस्तित्वात आहे. त्यामुळे या गटाला नजरेआड करून कोणतेही राजकीय गणित आखणे शक्य नाही, हे तेवढंच महत्त्वाचं वास्तव आहे. आजचा मतदार केवळ आश्वासनांवर खूश होत नाही. रोजगार, शिक्षण, सिंचन, आरोग्य, रस्ते—या मूलभूत प्रश्नांवर ठोस योजना आणि जलद अंमलबजावणी अपेक्षित आहे. आमदार किशोरआप्पा पाटील या बाबतीत वेगळं स्थान मिळवून आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेणं, अडचणीत धावून जाणं, आर्थिक मदत करणं, अधिकाऱ्यांशी थेट संपर्क ठेवणं—या शैलीमुळे त्यांना “आपलं माणूस” अशी प्रतिमा मिळाली आहे. त्यामुळे भाजपने जर खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा असेल, तर केवळ नेत्यांच्या वैयक्तिक ताकदीवर न राहता थेट जनतेशी संपर्क साधावा लागेल. नेत्यांद्वारे नव्हे तर थेट कार्यकर्त्यांपर्यंत स्वतंत्र यंत्रणा उभी करून आर्थिक रसदीचा महापुर उभा करावा लागेल. हीच खरी वेळ आहे गिरीशभाऊ महाजन यांनी थेट मैदानात उतरण्याची आणि सगळ्या नेत्यांना एका सूत्रात बांधण्याची. भाजपच्या विजयासाठी सर्व नेत्यांचं मनोमिलन महत्त्वाचं आहे. दिलीपभाऊ वाघ, नानासाहेब वाघ, वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे यांच्यातील मतभेद गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली विसरले गेले, तरच पक्ष जनतेपुढे एकसंघ दिसेल. त्याचबरोबर प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ते उभे करणं आवश्यक आहे. बूथ पातळीवर शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद आणि आर्थिक रसदची मजबूत यंत्रणा उभारली, तर निवडणुकीचं समीकरण पालटेल. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांच्या अडचणी ऐकाव्यात, त्यांना आश्वासन नव्हे तर ठोस उपाय द्यावेत. गिरीशभाऊंच्या सोबत हे काम अधिक विश्वासार्ह ठरेल. रोजगार निर्मिती, शैक्षणिक संधी, सिंचन व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर स्पष्ट आराखडा जनतेसमोर ठेवणं आवश्यक आहे. गिरीशभाऊंचा अनुभव यात उपयोगी पडेल. त्याचबरोबर गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या मतदारसंघाला अधिक वेळ दिला, तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. गिरीशभाऊ महाजन यांची खासियत म्हणजे त्यांचा माणुसकीने भरलेला स्वभाव. साध्या कार्यकर्त्याशी आपुलकीनं बोलणं, शेतकरी वा आरोग्याच्या प्रसंगी कोणी अडचणीत असेल तर धावून जाणं, विकासाच्या कामात वेगाने निर्णय घेणं—यामुळेच त्यांचं नाव लोकांच्या मनात वेगळं स्थान मिळवतं. सध्याचे आमदार किशोरआप्पा पाटील निश्चितच बलाढ्य आहेत. पण त्यांच्याविरोधात लढायचं असेल तर भाजपला फक्त व्यक्तींचं नव्हे तर संघटनेचं, शासकीय आशीर्वादाचं आणि आर्थिक रसदचं बळ उभं करावं लागेल. लोकांना दाखवावं लागेल की भाजप ही केवळ नेत्यांची फळी नाही, तर एकत्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. हीच खरी परीक्षा आहे भाजपची—“संघटनाची ताकद” लोकांसमोर ठसवण्याची. महाराष्ट्राचं राजकारण आज बुद्धिबळाचा पटच म्हणावा लागेल. प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळली जाते आणि ती थेट सत्तेच्या समीकरणावर परिणाम घडवते. दिल्लीच्या इशाऱ्यावरच फडणवीस साहेब वजीरासारखे सत्तेत सक्रीय आहेत. पण वजीर एकटा कितीही बलवान असला तरी, पटावर घोड्याची चाल अनपेक्षित आणि निर्णायक ठरते. अजितदादा पवारांचा प्रवेश हा फक्त एका पक्षाचं विभाजन नाही, तर शिंदे शिवसेनेला वेळोवेळी शह देणारा अष्टपैलू डाव आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद दुबळी भासत आहे. आणि जर न्यायालयीन निकालानंतर त्यांचं अधिकृत चिन्ह गेलं, तर त्यांच्याकडे भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नसेल. अशा वेळी पाचोरा–भडगावसह राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपला थेट लाभ होणार आहे. याचा अर्थ असा की या निवडणुकीत दोन प्रवाह थेट भिडणार आहेत—वैयक्तिक प्रभाव विरुद्ध संघटनाची ताकद. या लढतीत भाजपचं शस्त्र असेल मनोमिलन आणि संघटन; तर केंद्रबिंदू, प्रेरणा आणि हिरो असतील फक्त एकच—गिरीशभाऊ महाजन.
पाचोरा : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल घडताना दिसत आहेत. शिंदे गटात म्हणजेच शिंदे शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी नवीन चेहरे, कार्यकर्ते, नेते यांचा सतत प्रवेश सुरू आहे. पण पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात हा प्रवेशाचा प्रवास एकाच नावाभोवती फिरताना स्पष्ट दिसतो – ते नाव म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील! जनतेच्या मनावर गारूड करणारा, विश्वास निर्माण करणारा, प्रत्येक अडचणीत धावून जाणारा, राजकारणात असूनही सेवाभाव जपणारा असा हा नेता. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक शिंदे शिवसेनेत सामील होत आहेत आणि या प्रवाहात आता एक वेगळीच लाट निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, असे प्रमूख व्यक्ती की ज्यांनी आतापर्यंत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला नाही, त्यांना शोधायलाही भिंग लावावे लागेल. हे घडण्यामागे कारण एकच आहे – लोकांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावर असलेला प्रगाढ विश्वास. किशोरआप्पा पाटील हे नाव लोकांसाठी केवळ आमदार या पदापुरते मर्यादित राहिलेलं नाही. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट मनोमन पटते – या माणसाजवळ गेलं की आपण रिकाम्या हाताने परत येत नाही. ते कितीही कामात व्यस्त असले तरी एखादं काम समोर आलं की लगेच त्याकडे लक्ष घालतात. आणि एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय माघार घेत नाहीत. आपला माणूस कोणत्याही पक्षाचा असो, कुटुंबाचा असो की विरोधकाचा – त्याला मदत करण्यासाठी किशोरआप्पा पाटील नेहमी तत्पर असतात. त्यांच्या कार्यालयात किंवा घरी कोणी आले की तो निराश परत जात नाही. त्यांची विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे मुंबई येथून असो की रात्री उशिरापर्यंत मतदार संघात दौरे करून घरी पोहोचले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा लोकांच्या ( OPD ) भेटी सुरू होतात. एखादा आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन चौकशी करणे, गरज पडल्यास आर्थिक मदत करणे, कोणाचा रस्ता अडलेला असेल तर त्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, पाण्याच्या नळाची लाईन सुरू करण्यासाठी तगादा लावणे, कोणाचं बँकेचं कर्ज अडलेलं असेल तर ते सोडवून देणे – अशा एक ना अनेक शेकडो कामांचा अनुभव लोकांनी घेतलाय. त्यामुळेच लोक म्हणतात, “किशोरआप्पा पाटील यांच्याकडे गेलं की प्रश्न सुटतोच.” फक्त किशोरआप्पा नव्हे तर त्यांचा मुलगा सुमित पाटील देखील सक्रिय राजकारणात व समाजकार्यात उतरताना दिसतोय. किंबहुना तो वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करतो.असे म्हणण्यास हरकत नाही त्याच्या वागण्यात साधेपणा आहे, सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नाही, सत्तेचा वडिलांच्या आमदारकीचा गर्व नाही, दिखाऊपणा नाही. तो शांत, नम्र आणि सगळ्यांना आपल्यासारखं वागवतो. त्यामुळे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तो लवकर प्रिय झाला आहे. सुमित पाटील यांनी देखील लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचं काम सुरू केलं आहे. लोकांच्या अडचणी ऐकून लगेच उपाय शोधण्यासाठी तो रात्रंदिवस फिरत असतो.स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्यापासून या घराण्याची खरी ओळख म्हणजे – “राजकारण हे नाव मिळवण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी आहे.” किशोरआप्पा पाटील आणि त्यांचं कुटुंब ही विचारसरणी पाळतं. त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. एखाद्याची बदली अपेक्षित ठिकाणी होण्यासाठी मदत केली, एखाद्याला नोकरी मिळवून दिली, एखाद्याच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे सरसावले, एखाद्याच्या आजारपणात आधार दिला, गावोगावी पाणी-रस्ते अशा मुलभूत सुविधा मिळवून दिल्या – ही यादी अंतहीन आहे. तरीही एक प्रश्न अधूनमधून त्यांच्या मनाला चटका लावतो – ज्यांना त्यांनी मदत केली, ते योग्य वेळी त्यांच्या सोबत राहतात का? कारण समाजात हल्ली एक विचित्र प्रवृत्ती वाढताना दिसतेय – लोकांना गरज असते तेव्हा मदत मागतात, पण त्याच माणसाला मदतीची गरज भासली तर ते पाठमोरे होतात. “माझं काम झालं, आता मला काय घ्यायचं त्याच्याशी” – अशी मानसिकता समाजात वाढतेय. पण हे विसरणं लोकांच्या माणुसकीला शोभणारं नाही. ज्याने आपल्यासाठी वेळ, पैसा, मेहनत दिली, त्याची आठवण ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लोकांची कामं केली आहेत. त्यांच्या कुटुंबाने प्रत्येक संकटात लोकांच्या पाठीशी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पण निवडणुकीच्या काळात लोकांनी त्यांना साथ दिली नाही, तर हे सारे प्रयत्न व्यर्थ ठरतील. निवडणुका म्हणजे फक्त मतांचा खेळ नाही, तर ती खरी कसोटी असते – कोण आपला आहे, कोण फक्त बोलतो, आणि कोण प्रत्यक्षात उभा राहतो. त्यामुळे ज्यांनी त्यांच्या मदतीचा अनुभव घेतला आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी आता त्यांच्या सोबत बिना पैशाने व विना स्वार्थाने . उभं राहावं. याउलट समाजात काही लोक फक्त घेतात पण परत कधीच देत नाहीत. अशा लोकांमुळे समाज घडत नाही, तो मोडतो. म्हणूनच ही वेळ लोकांनी विचार करण्याची आहे – जे आपल्या मदतीला धावून आले, त्यांच्यासोबत आपण कितपत उभं आहोत? जे काम करतात, संकटात आधार देतात, त्यांचं नाव निवडणुकीत पुढे यावं हीच खरी न्यायाची गोष्ट आहे. कारण जेव्हा काम करणाऱ्याला पाठबळ मिळत नाही, तेव्हा समाजासाठी झटण्याची उमेद पुढे कोणत्याही नेत्याला राहणार नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात एक वेगळीच राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या भगिनी स्वर्गीय तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या कन्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी या आज उबाठा शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय रंगमंच आणखीनच रंगतदार बनला आहे. पाचोरा-भडगाव भाजपामध्ये आता माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,नानासाहेब संजय वाघ, सौ. वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे अशी मातब्बर मंडळी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आमदार किशोरआप्पा पाटील एकटे उभे आहेत. वरवर पाहता दोन्ही बाजूंच्या ताकदीत तफावत दिसते. केंद्रापासून ते राज्यापर्यंत भाजप-शिंदे शिवसेना युती असली तरी स्थानिक स्तरावर आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळत आहेत. मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होऊनही पक्षाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही. नेत्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे परंतु पक्षाचे अद्यापही पाचोरा शहरात स्वंतंत्र मध्यवर्ती कार्यालय नाही यामागे कारण आहे – वरतून पक्ष संघटन व जनसंपर्क दौऱ्यांकरता आर्थिक रसद मिळालेली नाही. विद्यमान मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पाचोरा – भडगाव पक्ष संघटनेकडे व नेत्यांच्या एकजुटीसाठी पुरेसे लक्ष व वेळ दिलेला नाही स्थानिक भाजपने प्रसारमाध्यमांवर पाहिजे तसा भर दिलेला नाही त्यामुळे पाचोरा-भडगाव भाजपने संघटन आणि जनसंपर्कचा स्पीड अजून पकडलेला नाही. अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कोण वरचढ ठरेल हे काळ आणि वेळच ठरवेल. सध्याच्या राजकीय वातावरणात मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे – लोकांचा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, सेवाभावामुळे आणि लोकांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांचं थांबणं व त्यांना थांबवणे आता अशक्य झालं आहे.