Home Blog Page 76

विघ्नहर्ता मेडिकलचे संचालक निशिकांत साळुंखे (नंदू दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन : परिसरात शोककळा

Loading

पाचोरा- शहरातील देशमुखवाडी भागातील ‘विघ्नहर्ता मेडिकल’चे संचालक निशिकांत साळुंखे (प्रसिद्ध नाव नंदू दादा) यांचे दिनांक 6 जुलै 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
निशिकांत साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात औषध व्यवसायात कार्यरत होते. ‘विघ्नहर्ता मेडिकल’ या नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार, गरजू रुग्णांना वेळोवेळी दिलेला वैद्यकीय सहाय्य, आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली मदत या गुणांमुळे ते संपूर्ण परिसरात लोकप्रिय होते. ‘नंदू दादा’ या नावाने ते तरुणांमध्ये विशेष ओळखले जात असत.
त्यांच्या निधनामुळे पाचोऱ्यातील व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत शोकसंदेश दिले आहेत. त्यांच्या निधनाने वैद्यकीय व्यवसायात एक प्रामाणिक, परिश्रमी आणि माणुसकी जपणारा चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. साळुंखे कुटुंब हे पाचोऱ्यात शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेले घराणे असून नंदू दादा हे अनेक उपक्रमांमध्ये अग्रभागी राहून मदतीस तत्पर असायचे. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. कोणत्याही प्रसंगी ते आपलेपणाने लोकांच्या मदतीला धावून जात असत. त्यांच्या जाण्याने साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 07 जुलै 2025 रोजी, सोमवार, सकाळी 10.30 वाजता त्यांच्याच राहत्या घरून पुनगाव रोडवरील आशीर्वाद ड्रीम सिटी येथून मार्गस्थ होणार आहे.

डायलेसिस “गरजूं रुग्णांना दिलासा,विघ्नहर्तामुळे पाचोऱ्यात नवसंजीवनीचा दीप उजळला”

Loading

पाचोरा – शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि CG Nephrocare & Dialysis Center यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पाचोरा सेंट्रल येथील APMC कंपाउंडमधील पहिल्या मजल्यावर दुपारी ३ वाजता उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते या सेवाभावी आरोग्य उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याची स्तुती केली. विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे डायलेसिस सेंटर पाचोरा तालुक्यातील एकमेव आणि सर्वाधिक सुविधा असलेले केंद्र असून ते संपूर्णपणे मोफत आहे. अत्याधुनिक यंत्रणा, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास तत्काळ सेवा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांना आता मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद सारख्या शहरांत जाण्याची गरज राहिलेली नाही. या कार्यक्रमाला पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाची शान वाढवली. विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, डॉक्टर्स, पत्रकार, नगरसेवक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती उत्स्फूर्त आणि भावनिक होती. उपस्थित सर्वांना या डायलेसिस सेंटरची सविस्तर माहिती देण्यात आली. उद्घाटनानंतर डायलेसिस तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाचोरा आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसंबंधी तपासण्या आणि सल्ला यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात रुग्णांना योग्य आहार, जीवनशैली, औषधोपचार पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवल्यास किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाचे संरक्षण होऊ शकते” असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले. CG Nephrocare & Dialysis Center ही संस्था देशभरात आरोग्य सेवेत अग्रेसर असून, त्यांनी अनेक राज्यांमध्ये दर्जेदार डायलेसिस सेवा सुरू केली आहे. आता पाचोरा शहरात त्यांनी अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाची सेवा पोहोचवली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही शहरी भागासारख्या सुविधा मिळणार आहेत. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “स्वतःला आरोग्यसेवेसाठी वाहून घेतलेल्या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत हे सेंटर सुरू करून गरजूंसाठी खऱ्या अर्थाने पाचोरा शहरात आणखी एक वरदान निर्माण केले आहे. ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून गरिबांसाठी दिलासा देणारी एक आशा आहे.” त्यांनी केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात अशी केंद्रं उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “आरोग्याची काळजी घेणं म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्राची सेवा करणं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले, “गावागावातून रुग्ण मोठ्या शहरांमध्ये प्रवास करत असतात. त्यात वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण विघ्नहर्ता हॉस्पिटलने हे सगळं पाचोऱ्याच्या दारात आणलं आहे. हे आरोग्यदूतच आहेत.” त्यांनी रुग्णांच्या भावना समजून घेत, समाजहिताची दृष्टी ठेवून केलेल्या कार्याची प्रशंसा केली. या उद्घाटन सोहळ्याला काही कारणास्तव संजयदादा गरुड उपस्थित नव्हते मात्र ते संस्थेच्या परिवारातील ज्येष्ठ आणि पूजनीय सदस्य आहेत, म्हणून त्यांच्या शुभाशीर्वादांचे महत्त्व कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तर्फे बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “आरोग्य हीच खरी सेवा या तत्त्वाला अनुसरूनच आम्ही हे केंद्र उभारले आहे. गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आरोग्यसेवा परवडणारी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो.” संस्थेच्या वतीने पुढेही अशी सामाजिक सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यापासून ते तपासणी शिबिरापर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विशेष उल्लेखनीय ठरला. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होत्या. “माझे वडील दर आठवड्याला बाहेरगावी डायलेसिससाठी जात होते. आता घराजवळच मोफत सुविधा मिळाल्याने आमच्यावरचा खर्च आणि मानसिक त्रास खूपच कमी होईल,” असे एका रुग्णाच्या मुलाने सांगितले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, व्यवस्थापन आणि CG Nephrocare टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन, स्वागत, माहिती सेवा, तपासणी शिबिराचे आयोजन इत्यादी साऱ्याच बाबतीत उत्कृष्ट समन्वय दिसून आला. या डायलेसिस सेंटरबाबत अधिक माहितीसाठी आणि लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 9529428691 किंवा 9096545920 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, www.cgnephrocare.com या वेबसाइटवरूनही सर्व तपशील मिळू शकतो. विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि CG Nephrocare यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेले मोफत डायलेसिस सेंटर ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून ती सामाजिक बांधिलकीचा आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श ठरली आहे. पाचोरा शहरातील गरजूंना आता आपल्या गावातच उपचार मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा एक वरदान ठरणार आहे. असेही प्रास्ताविकात डॉ सागरदादा गरुड यांनी बोलताना सांगितले “सेवा परमो धर्म:” या मूल्याची जाणीव या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली असून, पाचोऱ्याच्या आरोग्य क्षेत्रातील ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.

“बिनविरोध निवडणुकीसाठी माझ्यावर दबाव, मालमत्तेच्या जप्तीमागे राजकीय सूडबुद्धी” — डॉ. निलेश मराठे

Loading

पाचोरा – शहरातील पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे बिनविरोध निवडणुकीचे राजकारण चालू असताना, दुसरीकडे बँकेच्या सत्तारूढ गटाच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या डॉ. निलेश मराठे यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. शनिवारी दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी पाचोरा येथील विनायक पेट्रोल पंपावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भूमिकेचा धडका स्पष्टपणे मांडला. त्यांनी गंभीर आरोप करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “२०२१ मधील माझ्या एका न्यायप्रविष्ट कर्ज प्रकरणाला निवडणुकीच्या सहा दिवस आधी मुद्दामहून उजाळा देण्यात आला आणि माझ्या तारण मालमत्तेवर तहसीलदारमार्फत अचानक जप्तीची नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई म्हणजे राजकीय आकसाची परिसीमा आहे. माझ्या एकट्याच्या उमेदवारीमुळे बिनविरोध निवडणुकीचा डाव उधळून लागला आणि त्यामुळे सत्तारूढ पॅनलला मतदारांच्या दारात प्रचारासाठी जावे लागले आहे.” डॉ. मराठे यांनी स्पष्ट आरोप केला की त्यांच्यावर विविध मार्गांनी दबाव टाकून उमेदवारी माघारी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “माझी उमेदवारी रोखण्यासाठी अनेक हात मागे लागले होते. पण मी झुकलो नाही. मी बँकेच्या व्यवस्थापनातील मनमानी कारभार, अपारदर्शक नोकरभरती, शेतकरी आणि लघुव्यावसायिकांना कर्ज नाकारणे, सभासदांचे मतदान रद्द करणे अशा गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. त्यामुळेच सत्तारूढ गट घाबरला असून ही आकसपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.” डॉ. मराठे यांनी बँकेकडे चार वर्षांपूर्वी १ कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये परत केल्याचे नमूद केले असून त्यावर बँकेने अद्याप व्याज दिले नसतानाही जप्तीची कारवाई सुरू केल्याचा गंभीर आक्षेप घेतला. “ही संपूर्ण कारवाई म्हणजे पराभवाची भीती आणि माझ्या वाढत्या लोकाश्रयावर असलेला असह्य असूया आहे. मी कायद्याने लढणारा माणूस आहे. मला धमक्या, नोटीसी, ताबा कारवाई काही फरक पडत नाही. ही लढाई सामान्य नागरिकांसाठी, सभासदांच्या अधिकारांसाठी आहे,” असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजेंद्र मराठे, सुशील मराठे, हर्षल मराठे, तुषार मराठे तसेच कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. शांतिलाल सैंदाणे उपस्थित होते. या सर्वांचे उपस्थित राहणे ही या आंदोलनाची गांभीर्यपूर्ण छाया दर्शवत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतरच काही वेळात बँकेकडून महालक्ष्मी पेट्रोलियम सर्व्हिसचे मालक (प्रो. विनायक गोविंदराव मराठे) आणि श्री विनायक पेट्रोलियम सर्व्हिस चे मालक (प्रो. सपना सुरेश मराठे) यांच्याविरोधात तहसील कार्यालय पाचोरा यांच्याकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली. याच विरोधात अ‍ॅड. शांतिलाल सैंदाणे यांनी कायदेशीर उत्तर सादर करत बँकेच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जळगाव जिल्हा दंडाधिकारी यांनी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेला ताबा आदेश महालक्ष्मी पेट्रोलियम व विनायक पेट्रोलियमने अनुक्रमे DRT औरंगाबाद येथे SA क्रमांक 207/2021 आणि SA क्रमांक 183/2021 अंतर्गत आव्हानित केला असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी २०२२ रोजी DRT कडून दिलेल्या आदेशात बँकेने कोणताही वॉरंट काढले नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले असून बँकेला कारवाई करण्याआधी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिला आहे. बँकेकडून त्याचे पालनही झालेले नाही. तसेच, न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार संबंधितांनी No Lien Account मध्ये आवश्यक ती रक्कम भरलेली असून बँकेने कोणताही व्याज लावलेला नसतानाही त्यांच्यावर ताबा कारवाई केली जात असल्याचेही उत्तरात नमूद आहे. यामुळे बँकेची कारवाई ही संपूर्णपणे बेकायदेशीर, अपूर्ण माहितीवर आधारित असून ती न्यायालयीन आदेशाचा सरळ सरळ अवमान करणारी आहे. याशिवाय उत्तरात गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की, डॉ. निलेश मराठे हे पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीत एकतर्फी यश मिळवण्यासाठी प्रशासनाचा वापर करून विरोधकांवर दबाव आणणे, हीच सत्ताधाऱ्यांची सवय असल्याचा आरोपही या उत्तरात करण्यात आला आहे. तहसील कार्यालयास स्पष्टपणे चेतावणी देण्यात आली आहे की, जर सदर उत्तरानंतरही कारवाई थांबवण्यात आली नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया संपण्यापूर्वी जबरदस्तीने ताबा घेण्यात आला, तर संपूर्ण जबाबदारी तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उत्तरासोबत DRT आदेशाची झेरॉक्स प्रत, सिक्युरिटी व पुनर्बांधणी कायद्यातील तरतुदींचा संदर्भ, तसेच उत्तराच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडेही सादर करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पाचोरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चालवलेली खेळी असून त्यासाठी विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात आहेत. निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. डॉ. मराठे यांच्यावरील कारवाईचा आणि त्यांच्या उमेदवारीचा संबंध उघड उघड दिसत असतानाही प्रशासनाने डोळेझाक करणे ही लोकशाहीसाठी घातक बाब मानली जात आहे. निवडणुका या पारदर्शक, निष्पक्ष आणि दबावमुक्त वातावरणात व्हाव्यात हीच अपेक्षा असते. परंतु एखाद्या उमेदवाराला उमेदवारी न देण्यासाठी जाणीवपूर्वक त्याच्या मालमत्तेवर जबरदस्तीने ताबा घेणे, नोटीस पाठवणे आणि जप्तीचे आदेश देणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा आणि लोकशाहीचा सरळ सरळ अवमान आहे. हे प्रकरण केवळ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीपुरते मर्यादित राहिलेले नसून, न्यायालयीन प्रक्रियांचा अपमान, प्रशासकीय यंत्रणांचा दुरुपयोग आणि राजकीय हस्तक्षेप यांच्या तिहेरी संकटाकडे निर्देश करणारे आहे. डॉ. निलेश मराठे यांच्यावरील कारवाई, त्यांच्या आरोपांची गंभीरता आणि उत्तरात मांडलेले मुद्दे लक्षात घेता, या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. अन्यथा या घटनेचा समाजावर, संस्थेच्या प्रतिमेवर आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. सध्या ही निवडणूक पारंपरिक सहकारी चळवळीतील प्रतिष्ठेचा विषय बनली असून त्यात व्यक्तिगत आकस, तांत्रिक फसवेगिरी आणि संस्थात्मक दहशतीचा वापर होतो आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणातून संपूर्ण जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या निवडणुका, सदस्यांचे अधिकार, न्यायालयीन प्रक्रियेचे मोल आणि राजकीय स्वार्थ यासंबंधी कठोर आणि स्पष्ट विचार करण्याची वेळ आली आहे. जनतेला हे लक्षात आले पाहिजे की, एखादा उमेदवार केवळ बिनविरोध होण्यासाठी, कायदेशीर मार्गाने लढणाऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, तेव्हा तो लढा केवळ एका व्यक्तीचा नसून लोकशाहीच्या अस्तित्वाचा असतो. त्यामुळे या प्रकरणाचा शेवट न्यायदृष्ट्या पारदर्शक आणि लोकशाहीला बळ देणारा व्हावा, हीच अपेक्षा आहे.

आज दि 07/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

Loading

मेष
कामकाजात आत्मविश्वास असेल, नवीन संधी प्राप्त होतील. पण शेजारी असलेल्या लोकांशी संवादात सावधगिरी बाळगा. स्थानिक प्रवास शक्य.
शुभ अंक: १
शुभ रंग: लाल

वृषभ
जुलै महिन्याच्या ग्रह गोचरामुळे (शुक्र–मालव्य राजयोग) आर्थिक आणि प्रतिष्ठात्मक वाढ होण्याची शक्यता आहे 
शुभ अंक: ६
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
करिअर व कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल—शुभ योग गाजणार आहे
शुभ अंक: ५
शुभ रंग: पिवळा

कर्क
ग्रह गोचरबाधित असूनही बुधादित्य योगामुळे नफा–प्रगतीची शक्यता आहे .
शुभ अंक: ३
शुभ रंग: निळा

सिंह
ग्रह गोचरामुळे आरोग्य आणि घरातील वातावरणात ताण येऊ शकतो  नेतृत्वगुण मिळतील, तरी संयम आवश्यक.
शुभ अंक: ९
शुभ रंग: सोनेरी

कन्या
जुलैच्या ग्रह गोचराच्या प्रभावामुळे कामात चढ–उतार, तणाव आणि निर्णयांमध्ये अडथळे येऊ शकतात 
शुभ अंक: ५
शुभ रंग: हिरवा

तुला
प्रेम–संवादात सौहार्दपूर्ण काळ. संसर्ग टाळा आणि तुमच्या आवडीनिवडींमध्ये मनःस्थिती राखा.
शुभ अंक: २
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
जुलैतील ग्रह गोचरामुळे आत्मविश्वासात वाढ असली तरी गुप्त खर्च/जबाबदा-यांमध्ये अडथळे येऊ शकतात .
शुभ अंक: ७
शुभ रंग: काळा

धनु
शनि वक्री आणि ग्रह बदलामुळे स्थानांतर-संबंधित शक्यता; खर्च सावकाश ठेवा 
शुभ अंक: ३
शुभ रंग: नारिंगी

मकर
सरकारी वा व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सहयोग व उन्नती होण्याची शक्यता राहील .
शुभ अंक: ८
शुभ रंग: निळा

कुंभ
सामाजिक प्रतिष्ठा वाढ व वैयक्तिक संतुलन साधण्यास उत्साह. घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधान.
शुभ अंक: ४
शुभ रंग: जांभळा

मीन
भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती वाढेल. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम अनुकूल.
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

“स्वागताच्या फुलां मधले काटे – पोलीस निरीक्षक पवारांसमोर जुन्या कलेक्शनच्या सावल्यांची नवी परीक्षा”

Loading

पाचोरा – शहरात नुकत्याच घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले. शहराच्या मध्यवर्ती भागात, बसस्थानकाजवळ भरदिवसा गावठी कट्ट्याने गोळी झाडून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासनाची प्रतिमा डागाळली. परिणामी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री रेड्डी साहेबांनी सध्या सुरू असलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेऊन त्याचे पडसाद विधानसभा गृहात उमटायला नको म्हणून कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत तत्काळ हालचाल करत पाचोरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवनियुक्त पोलीस निरीक्षक म्हणून राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुलकुमार पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राज्यातील पोलिस खात्यात ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास शहरवासीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर झुंज वृत्तपत्र आणि ‘ध्येय न्यूज’ परिवारातर्फे त्यांचे स्वागत करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते. शहरात नव्याने आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे स्वागत मोठ्या थाटामाटात होते. अनेक सामाजिक संस्था, राजकीय मंडळी, स्वयंघोषित पत्रकार व कार्यकर्ते आणि तथाकथित समाजसेवक बुके घेऊन धावत येतात. परंतु हे बुके आणि त्यामागची हेतूशुद्धता तपासणे अधिक महत्त्वाचे ठरते. हेच बुके कधी काटेरी ठरू शकतात स्पेशली पाचोरा पत्रकारांच्या बाबतीत सांगायचे झाले तर अधिकृत पत्रकारां पेक्षा वेब न्यूज यूट्यूब च्या नावाने एकापेक्षा अनेक संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक विभागीय संपादक मंत्रालय प्रतिनिधी असे एक ना अनेक पत्रकार कार्यरत आहेत ज्यांना शुद्ध मराठी लिहिणे तर सोडाच परंतु बोलता सुद्धा येत नाही असे लोक संघटनेच्या नावाने जास्त गर्दी करून माझ्या मागे किती पत्रकार आहेत याचा प्रभाव निर्माण करतात याचे उदाहरण माजी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कार्यकाळाने दिले. म्हणून राहुलकुमार पवार यांनी या स्वागताच्या गोडगोडपणामागील संभाव्य धोके ओळखून फसव्या लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पाचोरा शहरात ३८ प्रकारच्या अवैध धंद्यांची खुलेआम वसुली माहिती सर्वश्रृत आहे. या ठिकाणी विविध स्वरूपाचे अवैध धंदे — गुटखा, मटका, दारू, सट्टा, जुगार, लाकूड, जिलेटीन कांडया, पोटली , लॉजवरील चद्दर बदल व्यवसाय इत्यादींचा सुळसुळाट असून, या सर्वांवर केवळ बघ्याची भूमिका पोलीस घेत असल्याची तक्रार आहे. या धंद्यांवर म्हणजेच कलेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ‘कलेक्टर’ निर्माण करण्याची घातकी स्पर्धा पोलीस खात्यात सुरू झाली होती. हेच गटबाजीचे वसुलीकरण निरीक्षक अशोक पवार यांच्या मनोबलाचे खच्चीकरण करणारे ठरले. त्यामुळे राहुलकुमार पवार यांच्यासाठी सर्वप्रथम हे गटीयकरण मोडून टाकून, कोणत्याही एका गटास पाठबळ न देता निष्पक्ष आणि कडक धोरण अंगीकारणे गरजेचे आहे. कारण या पोलीस स्टेशनला सर्वसामान्य नागरिक तर सोडाच परंतु चक्क पोलिसाच्या निर्दोष मुलाच्या प्रकरणात देखील तब्बल 30000 घेण्याचा प्रकार झालेला आहे.वास्तविक पाचोऱ्याचा अवैध धंद्यांचा इतिहास एखाद्या जुन्या पुस्तकासारखा आहे. पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या अवघ्या २५ फुटांवर धंदे ‘गुण्यागोविंदाने’ चालत होते. मात्र, एक काळ असा होता की गुंड आणि दलाल छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतसुद्धा फिरकत नसत. डि बी पोलीसांना पाहून गुंडांना व अवैधधंदे वाल्यांना बिळात शिरायला सुद्धा डी बी पथकाच्या एखाद्या पोलीसाची गाडीची एक चक्कर पुरेशी ठरत होती .त्या काळात पोलीस म्हणजे दादा होते आणि गुंड म्हणजे भयभीत उंदीर. पण मागील काही वर्षांत मात्र हे चित्र पूर्णतः उलटले. गुंड, दलाल आणि अवैध धंदेवाल्यांचा पोलीस स्टेशनमधील प्रवेश चक्क चहापाणी व स्नेहसंमेलन करण्यात वाढला. सामान्य माणसाला एन सी देताना व झाल्यावर सुद्धा खिशाला लागणाऱ्या पैशाची तजवीज करावी लागत होती. ही स्थिती बदलण्याची पूर्ण जबाबदारी आता राहुलकुमार पवार यांच्यावर आहे. याच पाचोरा पोलिस स्टेशनला तब्बल सहा महिने निरीक्षक नव्हते. मात्र त्या काळात पीएसआय श्री चौबे आणि चार ते पाच पोलिसांच्या चोख कर्तव्य भावनेमुळे पोलिसिंग यंत्रणा विस्कळीत झाली नाही. उलट एक आदर्श निर्माण झाला की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीतही जबाबदारीने काम करता येते. चौबे यांचा हा काळ राहुलकुमार पवार यांच्यासाठी एक आरसा ठरावा, की जबाबदारी घेणारे हात कमी असले तरी निर्णयक्षम नेतृत्व असले पाहिजे. “First impression is the last impression” या उक्तीप्रमाणे पोलीस निरीक्षक पदी रुजू होताचच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची पुनर्बहाली करण्याचे ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. खास करून खालील मुद्दे पवार यांनी प्राधान्याने हाती घ्यावेत: पाचोरा शहरातील “लातो के भूत,बातो से नही मानते. हे धोरण गुन्हेगारांबाबत स्वीकारून गुंडांचे अवैध धंद्यांचे सर्वेक्षण करून ते मुळासकट नष्ट करणे, डी बी, ट्राफीक,महिला दक्षता पथकाला स्वतंत्र कार्यक्षमता आणि अधिकार देणे, पोलीस स्टेशनमधील गटबाजी – भ्रष्टाचारी वृत्तीचं निर्मूलन, सामान्य नागरिकांच्या तक्रारी विनाअडथळा नोंदवल्या जातील, याची हमी, कोणत्याही गटाच्या दडपणाशिवाय पोलीस यंत्रणा पारदर्शक ठेवणे. राहुलकुमार पवार यांच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. पाचोऱ्याचा कायदा-सुव्यवस्थेचा इतिहास नव्याने लिहण्याची. भ्रष्ट आणि गुन्हेगारी नशेच्या विळख्यातून पिढ्या वाचवण्याची. लोकांचा पोलीसांवरील विश्वास पुन्हा जागवण्याची. जे पूर्वीच्या अधिकाऱ्यांना अपयश ठरले, ते आपण यशस्वी करू शकतो, हा आत्मविश्वास ते दाखवतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’ परिवारातर्फे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मन:पूर्वक स्वागत करताना, शहराच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कार्यकाळात क्रांतिकारी बदल घडून यावेत, हीच अपेक्षा आहे. स्वागताच्या बुकेसह यावेळी शहरवासीयांची विश्वासाची फुलं त्यांच्या पायाशी असोत, जी काटे बनून पुन्हा कुणालाही दुखावणार नाहीत.

भाविकांच्या सेवेत अठराव्या वर्षीही अखंड उत्साहाने ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’चा उपवास फराळ वाटप सोहळा संपन्न

Loading

पाचोरा ( भोला पाटील ) धार्मिक आणि सामाजिक भावनेचा संगम घडवणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील कृष्णापुरी चौफुलीवरील भारत डेअरी स्टॉप, अश्विनी ऑटो मोबाईल समोर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ यांच्या संयुक्त विद्यमाने साबुदाणा खिचडी, केळी व इतर उपवास फराळ वाटपाचा कार्यक्रम अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात आजपासून अठरा वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी काही मोजक्या तरुणांनी एकत्र येत उपवास करणाऱ्या भाविकांना निस्वार्थ भावनेने अन्नसेवा करण्याचा संकल्प केला आणि त्यातून ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ या दोन संघटनांची मूळ संकल्पना उदयास आली. आज त्याच उपक्रमाने पाचोऱ्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आयोजनकर्त्यांकडून पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच नियोजन सुरू केले जाते. विविध ठिकाणी भेटी घेऊन, साहित्य संकलन करून आणि कामांची विभागणी करून ही सेवा नेटकेपणाने पार पाडली जाते. या उपक्रमामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांचे भरघोस योगदान असते. काही दात्यांनी तर गुप्तपणेच मोठ्या प्रमाणात साबुदाणा , शेंगदाणे, तेल केळी, साखर इत्यादी आवश्यक साहित्याचा पुरवठा करून आपले कर्तव्य पार पाडले आहे.
आज ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल माऊलीच्या मुर्तीच्या दुध व दहीने अभिषेक व आरती करून झाली. यानंतर माऊली गृप आणि बहुळेश्वर गृपच्या वतीने माऊलीला उपवास फराळाचा नैवेद्य अर्पण करून साबुदाणा खिचडी, केळी आणि इतर उपवास फराळाचे वाटप सुरू करण्यात आले.
फराळ वाटपाच्या या पवित्र कार्यात कोणतेही राजकारण नव्हते, कोणताही प्रसिद्धीचा हव्यास नव्हता, होता तो केवळ भाविकांप्रती प्रेम, सेवा आणि भक्तीचा आदर. अनेक भाविकांना वेळेत अन्न मिळावे यासाठी कार्यकर्ते तत्पर होते. गर्दी असूनही शिस्तबद्ध रांगेत वाटप सुरू होते.
या सेवाभावी उपक्रमात यावर्षी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे साहेब यांनी कुटुंबासह उपस्थित राहून विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले व उपवासाचा फराळ ग्रहण केला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी देखील या कार्याची प्रशंसा करून आयोजकांचे अभिनंदन केले. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, पिंपरखेड आदी परिसरातील भाविक भक्त विठोबा दर्शनासाठी पायी चालत निघतात. अनेक भाविक अशा पदयात्रेच्या दरम्यान थकलेले असतात. यावेळी असा नि:स्वार्थ उपक्रम त्यांच्यासाठी वरदान ठरतो. सकाळी सुरू झालेला फराळ वाटपाचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालू होता आणि हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. या यशस्वी उपक्रमामागे ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ चे सर्व सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा व ज्येष्ठ भाविकांनी आपापली जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली. काहींनी स्वयंपाकाचे काम पाहिले, काहींनी वितरणाचे, काहींनी वाहतूक नियोजन तर काहींनी सुरळीत शिस्त राखण्यासाठी परिश्रम घेतले.अनेक महिला सदस्यांनी देखील फराळ तयार करण्यासाठी मेहनत घेतली. या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता आयोजकांनी पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक चांगल्या नियोजनाने उपवास फराळ वाटप करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अधिक भाविकांना सेवा देता यावी यासाठी नवीन जागा, अधिक स्वयंपाक साहित्य, आणि नवीन स्वयंसेवकांची भर घालण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘माऊली गृप’ आणि ‘बहुळेश्वर गृप’ चा उपक्रम हे केवळ खाद्य वाटप नव्हे, तर तो धर्म, श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा एक आदर्श प्रतीक बनलेला आहे. पाचोऱ्यातील ही परंपरा आज एक सामाजिक चळवळ म्हणून उभी राहत आहे.
या कार्यक्रमामुळे केवळ उपवास केलेल्या भाविकांना अन्न मिळते इतकेच नव्हे, तर शहरात भक्तीमय व सेवाभावाने भारलेले वातावरण निर्माण होते, जे सामाजिक सलोखा वाढवणारे आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते –
“जे जे भेटे भक्तांस आता, ते ते विठोबा रूप दिसता…”
‘माऊली गृप’ आणि ‘बहुळेश्वर गृप’ यांच्या या सेवा परंपरेला अशाच भक्तिभावाने पुढील अनेक वर्षे वृद्धिंगत व्हावे, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

Loading

सोलापूर (प्रतिनिधी ), पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे होते यावेळी यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली त्यांनी यावेळी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी आवर्जून सांगून पत्रकारांचे सुटल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे
पत्रकारितेबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय पत्रकार सुरक्षा समितीचे यंदाचे 9 वे वर्ष असून पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 2025 चा पुरस्कार कार्यक्रम सोलापूर येथील समाज कल्याण केंद्राचे उत्साहात पार पडला या कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कदम संजीव सदाफुले उच्च न्यायालय वकील मुंबई मीनाक्षीताई पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रा डॉ अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर रामचंद्र सरवदे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र मिर्झागालिब मुजावर संपादक लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती आन्सर तांबोळी (बी एस) सोलापूर शहर अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती डॉ. यु. एफ जानराव सेवानिवृत्त तथा प्रसिद्ध कुष्टरोग तज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व पत्र महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली
यावेळी प्रमुख मान्यवरांचा पत्रकार सुरक्षा समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्याचे कौतुक करून पत्रकार सुरक्षा समितीला शुभेच्छा दिल्या
आदर्श पत्रकार
राजू वग्गू अंबादास गज्जम अरुण सिडगिद्दी लक्ष्मण सुरवसे अतुल भडंगे रक्षंदा स्वामी श्रीकृष्ण देशपांडे कलीम शेख सागर पवार इम्तियाज अक्कलकोटकर प्रवीण राठोड इकबाल शेख अजमेर शेख सारिका चुंगे नंदकुमार बगाडे लहू कुमार शिंदे अशपाक शेख गणेश कारंडे निरंजन बोधुल वसीम राजा बागवान तसेच
आदर्श वकील
सिद्धांत सदाफुले शिव कैलास झुरळे
आदर्श कुटुंब प्रमुख
आन्सर तांबोळी (बी एस )
कृषीभूषण
शुक्राचार्य शेंडेकर
आदर्श ग्रामपंचायत सेवक
महादेव शेवाळे
कृषीरत्न
सागर गुंड
आदर्श रक्त पेढी
महात्मा बसवेश्वर रक्तपेढी सोलापूर चेअरमन वैभव राऊत
रेशीम रत्न
अमर पवार
यशस्वी उदयोजक
वजीर मुलाणी
आदर्श समाजसेवक
तानाजी माने सतीश गडकरी
इत्यादींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर डॉ कीर्तीपाल गायकवाड दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रोहित घोडके योगिनाथ स्वामी रमजान मुलाणी दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप गोपी जगताप इमरान आत्तार वैजनाथ बिराजदार अकबर शेख संभाजी गोसावी सचिन शिंदे मच्छिंद्र सराटे भागवत भरगंडे विजयकुमार झुंजा विनायक वाघमारे मल्लिकार्जुन हेगडे मेहबूब कादरी शकील शेख इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक सादिक शेख यांनी मानले

पाचोर्‍यात गुन्हेगारीला खतपाणी अवैध कट्टे खुलेआम सी आय डी व एस आय टी द्वारे -पत्रकार संदीप महाजन यांची चौकशीची मागणी

Loading

पाचोरा ( संदीप महाजन 7385108510 ) शहरात नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, गुन्हेगारी विश्वात बिनधास्तपणे फिरणाऱ्या अवैध शस्त्रांचा (कट्टा, पिस्तुल, गावठी बनावटीचे हत्यारे) सुळसुळाट होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यात एक युवक – आकाश मोरे (वय २५) याचा मृत्यू झाल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवले जात आहे. विशेष बाब म्हणजे याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना गावठी कट्टे शरद युवराज पाटील नामक सर्राईत गुन्हेगाराने पुरवल्याचे चौकशीत समोर आले असून त्यास देखील अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकार संदीप महाजन यांना आमदार प्रकरणी ( मारहाण प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आमदारांचा सहभाग नसतांना ) जी मारहाण झाली होती त्या मारहाणीत शरद युवराज पाटील याचा थेट सहभाग असल्याने त्याच्यावर व त्यावेळी सोबतच्या तीन सहकाऱ्यांवर मे जिंल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने डीवायएसपी मार्फत चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणून संदीप महाजन यांनी वेळोवेळी आता देखील कायम असलेली पोलीस प्रशासनाकडे केलेली संरक्षणाची मागणी किती महत्त्वाची होती हे आता स्पष्ट झाले आहे. पाचोरा पोलिसांची निष्क्रियता आणि नागरिकांच्या भावना आज तुफान उफाळून आल्या आहेत. विशेष म्हणजे ही मागणी स्थानिक पत्रकार आणि संपादक संदीप महाजन यांनी लेखी स्वरूपात संबंधित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सादर केली असून या पत्रात त्यांनी अनेक धक्कादायक बाबी अधोरेखित केल्या आहेत. महाजन यांच्या म्हणण्यानुसार या अवैध कट्ट्यांचा साठा केवळ गुन्हेगारांच्या घरी नसून ते स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी ही शस्त्रे अल्पवयीन मुलांच्या घरांमध्ये लपवून ठेवत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनुसार स्पष्ट झाले आहे. हे वास्तव अधिक गंभीर असून त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता संपूर्ण शहरात व्यापक पातळीवर अधुनमधून कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी महाजन यांची ठाम मागणी आहे. दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळच्या वेळेस पाचोरा एसटी बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेले. आकाश मोरे या युवकावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तो जागीच मृत झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे या घटनेत गावठी कट्ट्याचा वापर झाला असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. यामुळे पाचोऱ्यात किती प्रमाणात अशा अवैध शस्त्रांचा साठा झाला आहे, हा प्रश्न गंभीर बनला आहे. पाचोरा शहरात व परिसरात यापूर्वी देखील अवैध धंदे होते परंतु आता यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शिरकाव केल्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत आहेत. पूर्वी केवळ अपप्रवृत्तींचा काहीसा मर्यादित वावर असलेले पाचोरा शहर आता गुन्हेगारीच्या गंभीर छायेखाली झाकोळले जात आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना अवैध शस्त्रे सहज मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. गावठी कट्टे, देशी पिस्तुल, धारधार हत्यारे यांचा वापर हवेत फायर होणे हे मागील काही महिन्यांत झालेल्या विविध घटनांमध्ये दिसून आला आहे. विशेषतः शहरातील काही भाग, झोपडपट्ट्या, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली वस्ती ही अशा कारवायांची केंद्रबिंदू बनत चालली आहे. अशी हत्यारे अवैध मार्गाने आणून प्रति “दुर्लभ कश्यप” सारखा अवतार धारण करणे, त्यानुसार स्टेटस ठेवणे, त्याच्या सारखे मास्टर माईंड बनुन गुन्ह्यांसाठी व आपल्या विरोधकांवर वार करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणे आणि आपल्या विरोधकांना त्यांच्याच मित्रांकडून अथवा नातेवाईकांना हाताशी धरून संपवणे वेळोवेळी हे स्पष्ट झाले आहे, मात्र यावर कठोर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. पाचोरा बस स्थानक परिसरात पोलिसांची स्थायी चौकी असूनही एवढी गंभीर घटना घडणे आणि ड्युटीवरील पोलिसांचा अदृश्यपणा – हे प्रकार थेट पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. यामुळे ‘कर्तव्यचुकीच्या’ किंवा ‘सांठगाठ असण्याच्या’ आरोपांनाही खतपाणी मिळू लागले आहे. या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. नव्हेतर या प्रकरणामागे कोण सूत्रधार आहे हे समोर येण्यासाठी याचा तपास सीआयडी वा एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे. बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्चून बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. कोणतीही देखभाल, देखरेख किंवा दोष निवारण करण्यात आलेले नाही. हे देखील प्रशासनाच्या बेफिकिरीचेच लक्षण मानले जात आहे. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी दबक्या आवाजात त्यांच्या भीतीचे आणि संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. बस स्थानक परिसरात रोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, महिला, व्यापारी ये-जा करतात. त्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. ‘अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारी स्वरूपाचे स्टेटस ठेवणे व रिल बनवणे या विरोधात विशेष मोहीम’ राबवावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे. अधूनमधून राबविण्यात येणारे ‘कोंबिंग ऑपरेशन’ म्हणजे गुन्हेगारी किंवा दहशतवाद्यांविरुद्ध विशेष झडती मोहिम ज्या अंतर्गत पोलीस, एलसीबी, डीबी, स्थानिक गुप्तचर शाखा आणि कधी कधी एटीएसही संयुक्तरित्या काम करतात. यामध्ये पोलिसांकडून संशयित व्यक्ती, ठिकाणे, गोडाऊन, झोपडपट्ट्या, बंद घरे, गॅरेजेस, हॉटेल्स यांची झडती घेतली जाते. बिहार, उत्तर प्रदेश, इंदौर, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी अशा मोहिमा यशस्वी ठरल्या असून मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पाचोऱ्यातील सद्यस्थितीत कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले नाही तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात अधूनमधून विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवावे, अवैध शस्त्र विक्रेत्यांची माहिती देणाऱ्यांना . बक्षीस योजना राबवावी, गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीची तातडीने तपासणी व यादी तयार करावी, तातडीने यादीवरील गुन्हेगारांवर तडीपारी किंवा एमपीडीए लावण्यात यावा, बसस्टँड ड्युटीवरील किंवा तिथे ड्युटी लावणाऱ्या पोलिसांची व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर निलंबन करावे, सीसीटीव्ही यंत्रणा तत्काळ सुरू करून त्यासाठी स्वतंत्र देखभाल यंत्रणा कार्यान्वित करावी, महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके स्थापन करावीत, राजकीय हस्तक्षेप न होता पोलीस यंत्रणेला स्वतंत्रपणे कारवाई करू द्यावी, अशी मागणी देखील महाजन यांनी केली आहे. या घटनेबाबत गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रकार महाजन यांनी निवेदन सादर केले आहे. “सामान्य माणूस रस्त्यावर सुरक्षित नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे, याची जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे,” अशा शब्दांत पत्रकार महाजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पत्रकार एवढ्या दहशतीत आहेत की या प्रकरणी अटकेत असलेल्या गुन्हेगारांना गावठी कट्टे पुरवणाऱ्या शरद युवराज पाटील याच्या अटकेची किंवा त्याचे नाव टाकून बातमी लावण्याची हिंमत देखील कोणी करत नाही. विशेष बाब म्हणजे शरद युवराज पाटील अटकेत असतानाही पोलीस स्टेशनच्या जवळपास व शंभर मीटरच्या परिसरात गुन्हेगार असलेले त्याचे सहकारी सर्रासपणे जणू काही त्याला पहारा देण्यासाठी व त्याच्यासाठी कोण साक्षीदार म्हणून पोलीस प्रशासनास मदत करतात, यावर नजर ठेवण्यासाठी फिरताना दिसून येत आहेत. या घटनेने फक्त एक तरुण जीव गमावला नाही, तर संपूर्ण समाजातील विश्वास, सुरक्षितता आणि शासकीय यंत्रणेवरील अपेक्षा गमावल्या आहेत. अवैध कट्टे हे केवळ गुन्ह्याचे साधन नाहीत, तर समाजातील अस्थिरतेचा आणि पोलीस प्रशासनाच्या व्यवस्थेतील झोपेचा आरसा ठरतो. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची कायदा व सुव्यवस्था या कारणामुळे बदली केल्याचे आदेशात नमूद केले आहे, परंतु एखाद्या अधिकाऱ्याची बदली करून उपयोग नाही, तर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कलेक्शनसाठी पोलिसांची जी लॉबी व चढाओढसह गटबाजी सुरू आहे त्यावर देखील कुठेतरी ठोस उपाय करणे गरजेचे आहे. पत्रकार महाजन यांची फक्त कोंबिंग ऑपरेशन व गुन्हेगारांवर तडीपार अथवा एमपीडीएच्या कारवाया करणे ही केवळ मागणी नसून, पोलीसांचा धाक देखील शहराच्या भविष्यासाठी गरज आहे. ही वेळ अशीच कारवाई करण्याची आहे कारण उद्या उशीर होऊ शकतो.

आज दि 06/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

Loading

मेष

आज व्यावसायिक आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती संभवते. नवीन प्रकल्प पूर्ण होतील, मनःस्थिती स्थिर असेल. घरगुती तणाव स्वीकारण्यास तयार रहा.
शुभ अंक: १
शुभ रंग: लाल

वृषभ

आर्थिक प्रगतीचा दिवस; जागतिक संधींमध्ये सुधारणा. आर्थिक लेन-देनात सावधगिरीची गरज. प्रेम-नात्यांमध्ये सुधारणा संभवते.
शुभ अंक: ६
शुभ रंग: गुलाबी

मिथुन

करिअरमध्ये सर्जनशील संधी, नव्या संपर्कातून फायदा. निर्णय घेताना जरा संयम ठेवा.
शुभ अंक: ५
शुभ रंग: पिवळा

कर्क

व्यवसायात वाढ आणि प्रवासाची संधी. जुन्या भावना मनात येऊ शकतात—विश्रांती लाभदायक ठरेल.
शुभ अंक: ३
शुभ रंग: निळा 

सिंह

नेतृत्व व आत्मविश्वास आज स्पष्ट राहतील. कुटुंबीयांना आनंद मिळेल, मात्र शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: ९
शुभ रंग: सोनेरी

कन्या

कार्यक्षेत्रात संयम आवश्यक, आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक दृष्ट्या दिवस स्थिर राहील.
शुभ अंक: ५
शुभ रंग: हिरवा

तुला

कलात्मक कार्य आणि संभाषणात सौहार्द वाढेल. नात्यांमध्ये सुसंवाद आणि शांतता राहील.
शुभ अंक: २
शुभ रंग: गुलाबी 

वृश्चिक

आत्मपरीक्षण आणि गुप्त बाबी स्पष्ट होतील. खर्चात सावधगिरी बाळगा.
शुभ अंक: ७
शुभ रंग: काळा

धनु

शिक्षण, प्रवास किंवा नव्या संकल्पांमध्ये सकारात्मक योग. खर्च नियोजनात ठेवा.
शुभ अंक: ३
शुभ रंग: नारिंगी

मकर

कार्यस्थळी वरिष्ठांचा साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण सौम्य राहील परंतु जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवा.
शुभ अंक: ८
शुभ रंग: निळा 

कुंभ

सामाजिक स्थरावर प्रतिष्ठा वाढेल. वैयक्तिक संतुलन साधण्यास दिवस अनुकूल.
शुभ अंक: ४
शुभ रंग: जांभळा

मीन

आध्यात्मिक जागरूकता आणि भावनिक संतुलन वाढेल. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला आहे.
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

श्री. गो. से. हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात संपन्न

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे दिनांक ७ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला भक्तिभावाने व हरिनामाच्या गजरात पालखी दिंडी आणि वृक्षदिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शालेय समितीचे चेअरमन मा. दादासो खलिल देशमुख यांच्या हस्ते विधिवत पालखी पूजनाने झाली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षक सौ. ए. आर. गोहील, आर. बी. तडवी,आर. बी. बांठिया, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रशिक्षण प्रमुख एम. बी. बाविस्कर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख एम. टी. कौंडिण्य, कार्यालय प्रमुख अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरणात आणि मृदुंग-टाळांच्या निनादात विद्यार्थ्यांनी तालबद्ध पावलांनी संपूर्ण परिसरात दिंडी मार्गस्थ केली. गिरड रोड, भडगाव रोड, गजानन डेअरी मार्गे ही भक्तिपूर्ण दिंडी परिसरात फेरी करून पुन्हा विद्यालयात येऊन विसावली. मार्गात विद्यार्थ्यांनी रंगतदार रिंगण सादर करत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी फराळाचेही आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांतायन सर, रवी जाधव सर सागर थोरात, सौ. एस. पी. सूर्यवंशी, श्रीमती स्मिता सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!