Home Blog Page 104

“सन्मानाचा निरोप:मुख्याध्यापक ए. बी. आहिरे सरांचा गौरव सोहळा”

0

Loading

पाचोरा — पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या श्री गो. से. हायस्कूलमध्ये कार्यरत पर्यवेक्षक ए. बी. आहिरे सर यांना भडगाव मुख्याध्यापकपदाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि सन्मानाने भरलेला निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनाविवश वातावरणात पार पडला.
ए. बी. आहिरे सर यांची नुकतीच भडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, श्री गो. से. हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या शालेय समितीचे चेअरमन दादासो खलिल देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवआण्णा महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख एम. बी. बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम,पर्यवेक्षक रहिम तडवी, संगिता वाघ मॅडम, महेश कौडीण्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले, तर आभारप्रदर्शन बी. एस. पाटील यांनी केले.
ए. बी. आहिरे सर हे केवळ इंग्रजी विषयाचे सशक्त अध्यापक नव्हते, तर बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. इंग्रजी विषयावर त्यांचे असामान्य प्रभुत्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यांच्या अध्यापन शैलीत स्पष्टता, सुसंगती आणि विद्यार्थ्यांना आत्मीयतेने मार्गदर्शन करण्याची खासियत होती. याशिवाय, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा तसेच ते उत्तम गायक म्हणून त्यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमांना आपली सुरेल उपस्थिती बहाल केली होती. त्यांच्या आवाजातील गोडी आणि सादरीकरणातील आत्मीयता अनेकांच्या हृदयात घर करून राहिली आहे. ते केवळ अध्यापनच नाही, तर प्रशासनिक कामकाजातही ए. बी. आहिरे सरांनी आपल्या अचूक आणि सूक्ष्म दृष्टिकोनाचा प्रत्यय दिला. पर्यवेक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी शालेय व्यवस्थापनाची धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली. शाळेच्या कामकाजात “सर्व शिक्षक समान” या तत्त्वाचा त्यांनी नेहमीच आग्रह धरला. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही पदे शालेय कामकाजासाठी प्रशासनिक गरजेची असली, तरी शिक्षकांमध्ये ज्येष्ठ-कनिष्ठ अशी भेदभावाची भावना होऊ नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी आपले कार्य अत्यंत समतोल आणि सर्वांचा सन्मान राखून पार पाडले.
तसे बघीतले तर शासकीय धोरणांनुसार, व स्कूल कोड अधिनियमानुसार, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या पदांशिवाय शालेय कामकाजात इतर शिक्षकांमध्ये वरिष्ठ-कनिष्ठतेचा कोणताही अधिकार नसतो. या तत्त्वाला अनुसरूनच ए. बी. आहिरे सरांनी सर्व शिक्षकांशी सन्मानपूर्वक, मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संबंध जोपासले. त्यामुळे शाळेतील शिक्षक वृंदात आपोआप एकतेचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण झाले.राजकीय क्षेत्रातही ए. बी. आहिरे सरांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पाचोरा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ आणि नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली होती. त्या निवडणुकीत “लक्ष्मी विरुद्ध सरस्वती” अशी संघर्षपूर्ण लढत रंगली होती.विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणच्या रजा टाकून तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दांडी मारून पाचोऱ्यात येऊन सरांच्या विजयासाठी सक्रिय झाले होते या अत्यंत अटीतटीच्या मुकाबल्यानंतर केवळ काही मोजक्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. परंतु निवडणुकीत त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता, प्रामाणिकता आणि स्वच्छ प्रतिमा आजही सर्वत्र कौतुकाने घेतली जाते. ए. बी. आहिरे सरांनी आपल्या शालेय सेवेला 15 जुलै 1996 रोजी प्रारंभ केला. त्या काळात त्यांनी इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून आपली अध्यापन यात्रा सुरू केली आणि याक्षणापर्यंत म्हणजेच तब्बल 27 वर्षे त्यांनी श्री गो. से. हायस्कूलमध्ये आपली सेवा अखंडपणे दिली. या दीर्घ सेवाकाळात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्याकडून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती म्हणावी लागेल. या निरोप समारंभात उपस्थित प्रत्येकाने ए. बी. आहिरे सरांबद्दल आपली कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्या योगदानाचे विविध पैलूंनी कौतुक केले. शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खालील देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आहिरे सर हे फक्त शिक्षक नाहीत, तर ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याने आणि इंग्रजी विषयातील सखोल ज्ञानाने शाळेच्या दर्जात उल्लेखनीय वाढ झाली.”
उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनीही आपल्या मनोगतात आहिरे सरांच्या समर्पित वृत्तीचे आणि शाळेविषयी असलेल्या जिव्हाळ्याचे विशेष उल्लेख केले. तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवआण्णा महाजन यांनी सांगितले की, “सांस्कृतिक कार्यक्रम असो, की शैक्षणिक उपक्रम, आहिरे सरांचा सहभाग नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. त्यांच्या गाण्याच्या सुरांनी कार्यक्रमांना रंगत आणली.”
पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम, रहिम तडवी, संगिता वाघ मॅडम, महेश कौडीण्य आदी शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना आहिरे सरांच्या सहकार्याची, विनम्रतेची आणि सर्वसमावेशक वृत्तीची भरभरून प्रशंसा केली.कार्यक्रमाच्या अखेरीस बी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपल्या आभारप्रदर्शनात त्यांनी म्हटले की, “ए. बी. आहिरे सरांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”निरोप समारंभाच्या दरम्यान काही क्षण भावनांनी ओथंबून गेले. शाळेतील जुन्या आठवणी, सहकार्याचे क्षण आणि मिळवलेले यशाचे टप्पे एकामागोमाग एक उजळून निघाले. विद्यार्थ्यांच्या स्मरणात आजही आहिरे सरांचे प्रेमळ मार्गदर्शन कोरले गेले आहे.आता जेव्हा ए. बी. आहिरे सर भडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत, तेव्हा त्यांच्याकडून भडगाव येथील सु गी पाटील या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही अशीच प्रेरणा मिळेल याबद्दल कुठलाही संदेह नाही. त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा नवा अध्याय आता भडगावमध्ये लिहिला जाणार आहे.
त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी श्री गो. से. हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थ्यांचा परिवार आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था यांच्यावतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. “आयुष्याच्या प्रत्येक नव्या वळणावर यशाची नवी शिखरे सर करावीत,” अशा सदिच्छा सर्वानी व्यक्त केल्या.
अशा या समृद्ध कार्यकाळानंतर, ए. बी. आहिरे सर हे पाचोरा तालुक्यातील एक आदर्श शिक्षक, आदर्श पर्यवेक्षक आणि आदर्श सहकारी म्हणून सदैव स्मरणात राहतील.

“परधाडे-वडगाव रस्त्यालगत व नगरदेवळा येथे सुरू जुगाराचा महासापळा : पत्रकार संदीप महाजन यांची पोलिसांकडे तक्रार”

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील परधाडे-वडगाव रस्त्याच्या साक्षीने एक धक्कादायक वास्तव समोर आले असून, येथील रेल्वे गेटजवळ विहिरीच्या बाजुने दुसखेड्याकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतांमध्ये चक्क कोट्यवधी रुपयांची जुगारात उलाढाल सुरू असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या गुप्त जुगार अड्ड्यांवर केवळ रोख पैशांचीच नव्हे तर वाहनं, शेती मालमत्ता, घरे, दागिने अशा मौल्यवान संपत्तीचीही व्यवहार खुलेआम होतो आहेत. जुगाराच्या या अड्ड्यांमध्ये व्यवहार इतके गतिमान असतात की, खेळाडूंची जशी हातचालाखी, तशीच क्लब चालवणाऱ्या मंडळींचीही जागरूकता वाचनीय आहे. पोलीस प्रशासन धाड टाकण्याच्या तयारीत असतानाच, गुप्त यंत्रणेमार्फत त्यांना आधीच सुगावा मिळतो आणि संपूर्ण अड्डा काही क्षणांतच रिकामा केला जातो. इतक्या सफाईदारपणे व नियोजनबद्ध रचनेने या जुगाराच्या अड्ड्यांचे संचालन केले जात आहे की, त्यामागे असलेल्या स्थानिक राजकीय आश्रयधारकांची शंका सहज निर्माण होते.
सध्या या क्षेत्रात जुगाराच्या प्रस्थाचा भडका इतक्या प्रमाणात उडाला आहे की, ग्रामीण भागातही आर्थिक पिळवणूक व सामाजिक ऱ्हासाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. शेतकरी, तरुण, सामान्य व्यापारी व मजुरवर्ग या जुगाराच्या मोहात फसत असून, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या जुगारातून हरलेल्या नागरिकांनी शेती गहाण टाकल्याच्या, घरे विकल्याच्या आणि अंगावरील दागदागिने गमावल्याच्या अनेक घटना स्थानिक पातळीवर घडल्या आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पत्रकार संदीप महाजन यांनी धाडसी पाऊल उचलत, परधाडे-वडगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा ठावठिकाणा, लोकेशनसह सविस्तर तक्रार स्थानीक व वरिष्ठ स्तरावर पोलीस प्रशासनाकडे दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर अड्ड्याच्या मागे स्थानिक राजकीय व्यक्तींचा थेट पाठिंबाच नव्हे तर भागीदारी आहे त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा बिनधास्त पद्धतीने सुरू राहू शकतो आहे.
त्याचबरोबर, विश्‍वासार्ह वृत्तानुसार, नगरदेवळा गावाजवळील मोसंबीच्या शेतात मागील काळात चक्क एका पोलीस हे कॉ च्या भागीदारी असलेल्या क्लबची पत्रकार संदीप महाजन यांनी सदरच्या जुगार अड्ड्याची तक्रार दिली होती त्याची थेट दखल नासीक IG साहेब & पोलीस अधीक्षक जळगाव साहेबांनी घेऊन पाचोरा पो स्टे व नगरदेवळा औ पो ला कळू न देता बाहेरील यंत्रणा वापरून धाड टाकून हा अड्डा उद्ध्वस्त केला होता आता पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक मोठा जुगार अड्डा उभा राहत असल्याची माहितीही पत्रकार संदीप महाजन यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. या अड्ड्याची रचना सुद्धा पूर्णपणे गोपनीय पद्धतीने केली जात आहे. शेतांमध्ये तयार केलेले तात्पुरते शेड, दाट झाडाझुडपांचा आडोसा, चारही बाजूंनी नजर ठेवणारी सशस्त्र गुप्त यंत्रणा, कोणताही संशय आल्यास काही क्षणात ठिकाण बदलण्याची क्षमता अशा पद्धतीने हा सगळा जुगाराचा मोठा गोरखधंदा उभा केला आहे या गंभीर प्रकारांमुळे परिसरातील सामान्य नागरिकांरीकांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परधाडे-वडगाव रस्ता व आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे संशयास्पद हालचालींनी व्यापलेला असतो. सतत बाहेरगावच्या संशयित वाहनांची वर्दळही जाणवते. इतकेच नव्हे तर जुगार अड्ड्यांना गुप्त सुरक्षा देण्यासाठी गावठी कट्ट्यासह काही खासगी बाऊन्सर तैनात केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. युवकांना जुगाराच्या मोहातून बाहेर काढणे आणि गावाचा परिसराची नैतिक अधःपात थांबवणे हे सध्याच्या घडीचे मोठे आव्हान बनले आहे. या जुगार अड्ड्यांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे, कुटुंबांमध्ये कलह होणे असे सामाजिक परिणामही दिसून येतात.
या पार्श्वभूमीवर पत्रकार संदीप महाजन यांनी अत्यंत जबाबदारीने पुढाकार घेत पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे तक्रार केली आहे आहे. त्यांनी आपली तक्रार करताना सदरचे गुगल लोकेशन देत मागणी केली आहे की, पोलिसांनी कोणतीही गडबड न करता, गुप्तपणे योग्य नियोजन आणि पूर्ण गोपनीयतेने अचानक कारवाई करावी. जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी तुटून पडल्यासच या अवैध उद्योगाचा बीमोड होऊ शकतो. या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पाचोरा तालुक्यातील या वाढत्या जुगार अड्ड्यांमुळे पंचक्रोशीतील अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त होत असताना, या सर्व प्रकरणात प्रशासन किती कठोर पावले उचलते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याच्या घडीला जुगाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागात पोलीस आणि प्रशासनाने काही कारवाया केल्या असल्या तरी त्या केवळ वरवरच्या राहिल्या आहेत. त्यामुळेच या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर समन्वय साधून एकात्मिक कारवाई होण्याची गरज आहे.
जुगार अड्ड्यांचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी केवळ पोलिसी कारवाई पुरेशी नाही, तर समाजातील प्रत्येक जागृत नागरिकानेही आपल्या स्तरावर सतर्क राहून माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा काही मोजक्या व्यक्तींच्या स्वार्थापायी संपूर्ण समाजाला मोठी किंमत मोजावी लागेल. गुप्त यंत्रणांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या जुगार अड्ड्यांमध्ये अनेकदा शहरी गुन्हेगारी गटांचे सदस्यही सहभागी होतात. काही वेळा अड्ड्यांमध्ये शस्त्रास्त्र बाळगण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे केवळ जुगार बंद पाडण्यापुरती कारवाई न करता, त्याचबरोबर तस्करी, गुन्हेगारी नेटवर्क्स यांचाही छडा लावणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकार संदीप महाजन यांचे हे पाऊल त्यांच्यासाठी जीवाला धोकेदायक व चॅलेंजिंग असून सुद्धा त्यांच्या माध्यमातून समाजातील गडद अंधारात लपलेले वास्तव प्रकाशझोतात येऊ लागले आहे. समाजहितासाठी धोक्याची पर्वा न करता त्यांनी उचललेले हे धाडस तालुक्यातील इतर पत्रकारांसाठी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरावे असेच आहे. आता प्रशासनाने संपूर्ण तयारीनिशी गुप्त कारवाई करत या जुगार अड्ड्यांना नेस्तनाबूत करावे, जुगारबाजांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि तालुक्याला या कर्करोगापासून वाचवावे, अशी जोरदार मागणी महाजन यांनी केली आहे इतर ही अड्डयांची सविस्तर माहिती लवकरच

पाचोरा नगरपरिषदेच्या पुढाकाराने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण मोहीम जोमात; नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

0

Loading

पाचोरा – पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यांवर मुक्तपणे वावरणारे श्वान, त्यांच्या आक्रमकतेमुळे घडणाऱ्या अपघाताच्या घटना, तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेकडून एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून, शहरातील भटके श्वान पकडून त्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमास जिल्हाधिकारी जळगाव यांनी विशेष पाठिंबा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने पाचोरा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला निर्देश दिले होते की, भटक्या श्वानांचे योग्य प्रकारे निर्बीजीकरण करावे व त्यामुळे भविष्यात त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवावे. यानुसार पाचोरा नगरपरिषदेने त्वरीत हालचाली सुरू केल्या आणि या मोहिमेसाठी ‘नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार’ यांची नियुक्ती करण्यात आली.
नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला भटके श्वान पकडण्याचे, त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण करून त्यांना त्यांच्या मूळ परिसरात परत सोडण्याचे जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत श्वानांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा त्रास न होता, पूर्णतः शास्त्रशुद्ध आणि मानवी दृष्टिकोनातून ही कारवाई केली जात आहे.
या मोहिमेंतर्गत पकडलेल्या प्रत्येक श्वानावर निर्बीजीकरणानंतर विशेष मार्किंग करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात त्यांची ओळख पटविता येईल आणि पुन्हा पकडण्याची गरज भासणार नाही. श्वानांचे लसीकरण केल्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होणार असून, माणसांमध्ये पसरू शकणाऱ्या रेबीजसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.
शहरातील बाहेरपुरा, छ. संभाजीनगर, भाजीपाला मार्केट परिसर, देशमुखवाडी, रसूल नगर, बहिरम नगर, भारत डेअरी परिसर, सिंधी कॉलनी आदी विविध भागातून आतापर्यंत एकूण १२५ श्वान पकडण्यात आले आहेत. यामध्ये काही विशेष आक्रमक श्वानांचा देखील समावेश होता, जे नागरिकांसाठी सतत त्रासाचे कारण ठरत होते. सध्या यांचे निर्बीजीकरण व लसीकरण नवसमाज निर्माण संस्थेद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल आणि आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारु हे दोघेही स्वतःदेखील नियमितपणे मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी केली असून, काही ठिकाणी विशेष पथक तैनात करून कारवाईला गती दिली आहे.
मुख्याधिकारी मंगेश देवरेसाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच उर्वरित संपूर्ण पाचोरा शहरातही ह्या मोहिमेचा विस्तार करण्यात येणार आहे. ज्या भागांमध्ये अजून श्वानांचे निर्बीजीकरण झालेले नाही, त्या भागांची यादी तयार करून टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले जाईल. नागरिकांनी देखील या मोहिमेमध्ये सहकार्य करावे आणि भटक्या श्वानांबाबतची माहिती नगरपरिषदेला द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी देवरे यांनी केले आहे.
या संदर्भात पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर सुरू केला आहे. पोस्टर, बॅनर, सोशल मीडियाद्वारे मोहिमेबाबत माहिती दिली जात आहे. तसेच नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहे की भटक्या श्वानांवर क्रूरता दाखविणे हा गुन्हा आहे आणि निर्बीजीकरण व लसीकरणाद्वारेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो.
विशेष म्हणजे, भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण व लसीकरणाची कारवाई ही केवळ शहराच्या स्वच्छतेसाठी नाही तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत आवश्यक आहे. श्वानांमुळे पसरू शकणाऱ्या रोगराईला आळा घालणे, नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि मानव-श्वान यांच्यातील संघर्ष टाळणे या सर्व बाबतीत या मोहिमेचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे.
याआधी अनेक वेळा नागरिकांनी नगरपरिषदेकडे भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येबद्दल तक्रारी केल्या होत्या. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती, सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी श्वानांच्या टोळक्यांमुळे अपघातही घडले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून हाती घेण्यात आलेली ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या मोहिमेची सुरुवात व्यवस्थित झाली असून, श्वान पकडण्यासाठी आधुनिक साधने व तज्ज्ञ कर्मचारी वापरण्यात येत आहेत. श्वानांना जेरबंद करताना त्यांच्या सुरक्षिततेची व आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्रशिक्षित पशुवैद्यकीय डॉक्टरांची सेवा घेण्यात येत आहे आणि प्रत्येक श्वानाला रेबीज प्रतिबंधक लस टोचली जात आहे.
या मोहिमेमुळे केवळ शहराचा चेहरामोहरा बदलेल असे नाही, तर भविष्यातील श्वान संख्या स्थिर राहील व कोणताही ताणतणाव निर्माण होणार नाही. तसेच, नागरिकांच्या मनात भटक्या श्वानांबद्दल असलेली भीती कमी होईल आणि शहरात एक प्रकारची सामाजिक सलोखा प्रस्थापित होईल.
मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची जिल्हाधिकारी कार्यालयानेही दखल घेतली असून, इतर नगरपरिषदांसाठी पाचोऱ्याचे हे उदाहरण प्रेरणादायी ठरेल, असे संकेत मिळत आहेत.
पुढील काही दिवसांत शहरातील सर्व प्रमुख प्रभागांत भटक्या श्वानांचे शास्त्रशुद्ध निर्बीजीकरण व लसीकरण होऊन ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी भटक्या श्वानांविषयी सहकार्याने व सहानुभूतीने वागावे, त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव बाळगावी आणि नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या या समाजहिताच्या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
भविष्यात जर नागरिकांनी वेळोवेळी सूचना दिल्या, तक्रारी नोंदवल्या आणि सहकार्य केले, तर पाचोरा हे शहर भटक्या श्वानमुक्त, स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्याचे स्वप्न निश्‍चितच साकार होईल.

“श्री गो से हायस्कूल पाचोऱ्याचा गौरव : गुरुशिष्य नात्याने उजळलेली प्रेरणादायी गाथा” – संदीप महाजनसर

0

Loading

पाचोरा – शिक्षणाचे खरे उद्दिष्ट म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणे नव्हे, तर माणूस घडविणे आणि जीवनमूल्यांचा दीप प्रज्वलित करणे. याच उद्दिष्टाचे जिवंत उदाहरण श्री गो से हायस्कूल, पाचोरा या पवित्र शिक्षण संस्थेने घडवले आहे. या विद्यालयात मी संदीप दामोदर महाजन शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यावेळी शिक्षण घेतलेल्या आणि आज एम एस सर्जन डॉक्टर पदवी प्राप्त केलेल्या डॉ. अपर्णा अनिल देशमुख यांच्या नेत्रदीप कार्यावर एक पत्रकार म्हणून लिहीण्याचा योग आला हे वाचकांनी वाचलंच असेल परंतु त्यावर डॉक्टर अपर्णा यांनी आपल्या गुरूंच्या कार्याबद्दल व्यक्त केलेल्या वंदनीय भावना संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी ठरल्या आहेत.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिलं –
“मी श्री गो से हायस्कूल, पाचोरा येथे शिकत असताना आपले प्रत्येक विद्यार्थ्याकडे सारखं लक्ष असायचं. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा हा आपला कटाक्ष होता. अशा शिक्षकांचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले असताना, आपले मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे होते. आपल्या साध्या, सरळ शब्दांत आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची ज्योत पेटत असे आणि थोड्याशा कौतुकाच्या शब्दांनी आम्ही आत्मविश्वासाने भरून जात होतो. आजही आपण लिहिलेलं वृत्त केवळ एक बातमी नाही, तर ती एक प्रेरणादायी कविता आहे. आपण यासाठी दिलेला वेळ, प्रेम आणि समर्पण पाहता मला अभिमान वाटतो आणि हा गौरव माझ्या संपूर्ण जीवनभर जतन करण्यासारखा आहे. पाचोऱ्याला आल्यावर नक्कीच आपणास भेटण्याचा प्रयत्न करेन आणि आपणही पुणे येथील आभाळमायाला भेट द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे.”
या हृदयस्पर्शी भावना वाचून फक्त पत्रकारच नव्हे तर शिक्षक म्हणून मी आपल्या भावना अत्यंत प्रेमाने आणि नम्रतेने व्यक्त केल्या. त्यात लिहीले
“डॉ. अपर्णा बेटा, तुझ्या इतक्या प्रेमळ आणि अंतःकरणातून आलेल्या शब्दांनी माझ्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले. शिक्षक म्हणून केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक धडपड, प्रत्येक समर्पणाचा क्षण आज सार्थ वाटतो. शिक्षक म्हणून मी नेहमीच एकच ध्यास जपला — प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना न्याय देणे आणि कोणत्याही भेदभावा शिवाय त्यांना घडविणे. आज तुझ्या या शब्दांनी वाटते की त्या प्रत्येक प्रयत्नाचं सुवर्णफळ मिळालं आहे.”
“बेटा, कोणतीही व्यक्ती — शिक्षक, डॉक्टर वा कोणत्याही क्षेत्रातील कार्यकर्ता — जर आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहतो, तर त्या निष्ठेचं फळ केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही मिळते.” मी आपल्या वैयक्तिक जीवनाचा उल्लेख करत सांगितले “माझ्या मोठ्या मुलीने, डॉ. वैष्णवीने, नाशिक विभागात सर्वात कमी वयात एमएससी मॅथेमॅटिक्स पूर्ण करून गणित विषयात पीएचडी मिळवली आहे. तर दुसरी मुलगी, डॉ. कादंबरी, खो-खो च्या राष्ट्रीय संघाची कर्णधार झाली तर नवी मुंबईतील एम जी एम मेडीकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण करून प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयात A+ प्राप्त करीत आजच तिने शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर दिला आणि लगेच दोहा या देशात कतार येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका विवाहाच्या समारंभात डान्स कोरिओग्राफर म्हणून रवाना झाली आहे”
शेवटी, महाजन यांनी भावना व्यक्त करत लिहिलं –
“ही यशोगाथा केवळ शैक्षणिक प्रगतीची नाही, तर समाजासाठी प्रामाणिकपणे दिलेल्या सेवा आणि संस्कारांचे जिवंत दर्शन आहे. हेच संस्कार मी आज तुझ्यातही पाहतो — डॉक्टर अनिलदादांच्या कार्यात आणि तुमच्या मातोश्रींच्या प्रेमळ संस्कारांतून. डॉ. अपर्णा बेटा, तुझ्या पत्राने मला हे प्रकर्षाने जाणवलं की, गुरूचं खरे यश आपल्या शिष्याच्या यशातच दडलेलं असतं. पाचोऱ्याला आल्यावर तुझी भेट माझ्यासाठी अमृततुल्य असेल. बेटा, तू आणि तुझ्यासारखे गुणवंत किर्तीवंत विद्यार्थी माझा अभिमान आहेत. माता वैष्णोदेवी तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर सदैव कृपा ठेवो. पुनश्च तुझ्या नेतृत्वाच्या तेजस्वी वाटचालीस माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!”
हे सर्व लिहीत असताना मला एक पत्रकार अथवा शिक्षक म्हणून मत व्यक्त करावे असे वाटत आहे श्री गो से हायस्कुलचा व ध्येय करिअर ॲकेडमीचा आजही जेव्हा वाऱ्यावरून एखादा विद्यार्थी “सर…” म्हणून हाक मारतो, तेव्हा काळाचा पडदा क्षणात मागे सरकतो. त्या निरागस नजरेतून, त्या कृतज्ञतेच्या डोळ्यांतून गुरू म्हणून घेतलेला प्रत्येक श्वास पुन्हा नव्याने जिवंत होतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं केवळ ज्ञानाचं नसतं, तर ते आत्म्याच्या गाभ्यातून घडलेल्या श्रद्धेचं असतं. त्या नात्याची उब श्री गो से हायस्कूल, पाचोऱ्याच्या प्रत्येक दालनात, प्रत्येक धड्यात आणि प्रत्येक आठवणीत आजही जिवंत आहे.
विद्यार्थ्यांना घडवताना मी नेहमीच प्रयत्न केला की, केवळ पुस्तकांपुरते शिक्षण देण्याऐवजी त्यांना जीवनाशी जुळवणारे धडे द्यावेत. मराठी आणि इतिहास हे माझे मुख्य विषय असले तरी त्या विषयांना मी फक्त अभ्यासाचा भाग न ठेवता जीवनाचा आरसा बनवले. अनेकदा पुस्तकं हातात न घेता, प्रत्यक्ष उदाहरणांमधून, जीवनातील घटना सांगून विद्यार्थ्यांना शिकवताना त्या कठीण वाटणाऱ्या विषयांमध्ये गोडी निर्माण केली.
आजही जेव्हा माझे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर पोहोचून म्हणतात
“सर, तुमचं शिकवणं आम्हाला आयुष्यभर पुरलं. इतिहासातील घटना आम्हाला जशाच्या तशा आठवतात, आणि गॅदरिंगमध्ये तुम्ही स्वतः कोरिओग्राफ केलेले डान्स आजही आमच्या स्मरणात आहेत…”
तेव्हा वाटतं — हा प्रवास व्यर्थ गेला नाही.
स्व. दादासाहेब आर. एस. थेपडे , स्व आप्पासाहेब ओ ना वाघ यांच्यासारख्या पितृतुल्य प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींनी श्री गो से हायस्कूल, पाचोरा ही केवळ शाळा नाही, तर ती एक संस्कारांची कार्यशाळा आहे. या शाळेने केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जीवनासाठी विद्यार्थी घडवले, त्यांच्या मनात संस्कारांचे बीज पेरले आणि त्यांच्या स्वप्नांना पंख दिले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूचा आजही जिव्हाळ्याने आणि आदराने उल्लेख करणे, हेच शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. शिक्षण म्हणजे केवळ शाळा-कॉलेजांपुरतं मर्यादित नसतं, तर ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडावं, अशी शिकवण देणं हेच खरे अध्यापन आहे.
आज या सर्व आठवणींनी मन भरून आलं आहे आणि पुन्हा एकदा सांगावसं वाटतं”मी आयुष्य जगत असताना विविध क्षेत्रातील अनेक उच्चस्तरीय राजकीय, शासकीय मान्यवरां पासून ते अगदी रस्त्यावरील टपोरी, छडकछाप बॅनरवरचे गुंड ते  जागतिक पातळीवरील अंडरवर्ल्ड डॉन यांच्या जीवनाचे दर्शन व जवळून अनुभव घेतले आहे. अनेकांच्या सहवासात काही काळ व्यतीत केला, त्यांच्या स्वभावांचे विविध पैलू जवळून अनुभवले आहे.असे पण लोक बघितले आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी माय – बापांचे रोडावर तर सोडा परंतु घरात देखील त्यांच्या दररोज पाया पडलेल्या नाहीत मात्र राजकीय व शासकीय मान्यवरांचे मतलबासाठी रस्त्यावर पाय पडणारे चमचे आणि दहशत पोटी आपल्या आकाचे म्हणजेच गॉडफादरचे पाय पडणारे पंटर पण बघितले
परंतु, या सगळ्या अनुभवांमध्येही शिक्षकी जीवनात मिळणारा प्रेमाचा, विश्वासाचा आणि श्रद्धेचा ठेवा — हा खरंच आयुष्याचा अमृतसंच आहे. हे नातं केवळ शब्दांत मांडता येत नाही, आणि जेव्हा त्यांच्या पाया पडल्या जातात ते अंतःकरणाच्या गाभ्यातून उमटलेले असते. “जिथे गुरूंच्या प्रेमळ सावलीखाली शिष्य घडतो, तिथे प्रत्येक यशाची पहाट साक्षात तेजस्वी सूर्यकिरणांसारखी उगम पावते.”शेवटी एवढेच म्हणेल पुनश्च छडी लागे छम छम विद्या येई घमघम या शिक्षण प्रणालीची व याला प्रतिसाद देणाऱ्या पालकांची आज गरज आहे अन्यथा कोरोना नंतर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागसेन नगर पाचोऱ्यात सिद्धार्थ लेझीम मंडळातर्फे शवपेटीचे लोकार्पण: समाजसेवेचा नवा आदर्श”

0

Loading

पाचोरा – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून नागसेन नगर पाचोरा येथील सिद्धार्थ लेझीम मंडळाच्या वतीने समाजासाठी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्या समाजासाठी दिलेल्या अपार योगदानाची प्रेरणा घेऊन, सिद्धार्थ लेझीम मंडळाने संपूर्ण नागरिकांसाठी विनामूल्य शवपेटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प साकारत, दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी नागसेन नगर येथील ग्राउंडवर भव्य आणि प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शवपेटीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पार पडले. ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज लोंढे, माजी नगरसेवक व काँग्रेस नेते अॅड. अविनाश भालेराव, माजी नगरसेवक अविनाश साबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र ब्राह्मणे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, आरपीआय अध्यक्ष शशिकांत मोरे, माजी नगरसेवक महेंद्र खेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सिद्धार्थ लेझीम मंडळाचे अमोल पवार, लखन वाघ तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम बागुल, खजिनदार आकाश बनसोडे आणि सचिव चंदू सोनवणे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन करताना सिद्धार्थ लेझीम मंडळ व जयंती मंडळाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कर्तव्यभावनेने परिपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी हा लोकार्पण सोहळा प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सिद्धार्थ लेझीम मंडळाच्या सभासदांनी व जयंती मंडळाच्या सदस्यांनी नागसेन नगर परिसरात भव्य जनजागृती मोहीम राबवली होती. विविध बॅनर, फलक, पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी या उपक्रमाचे प्रचंड स्वागत केले. शवपेटी लोकार्पण कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करून दिले आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या स्वप्नाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच आजचा हा उपक्रम घडल्याचे सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की, कोणतीही जात, धर्म, पंथ, वर्ग याच्या पलिकडे जाऊन केवळ मानवतेच्या भावनेने कार्य करणं, हीच खरी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. समाजासाठी आवश्यक अशा शवपेटीची उपलब्धता म्हणजे केवळ सेवा नव्हे, तर एका उच्च मूल्यांचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये अनिल जोगडे, रवींद्र सोनवणे, अशोक गायकवाड, विकास शेजवळ, शुभम तांबे, कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर, जय सपकाळे, संतोष खैरनार, भैया बाविस्कर, सागर खरे, निलेश जाधव, राजू दाभाडे, वाल्मीक गायकवाड, भैया गायकवाड, दादा भिवसने, मुकुल जैन, खंडू सोनवणे, अनिल लोंढे, किरण सोनवणे, किशोर बागुल, मंगल पवार, खर्चाने आप्पा, राजू अहिरे, भाऊराव पवार, बोदवड पेंटर चिंटू नरवाडे, भैय्या खेडकर, प्रकाश दिवसेने, संतोष पवार, राजू सोनवणे, भरत पवार, नाना खेळकर, संदीप गायकवाड, सुरज महिरे, सुरेश मोरे, दीपक जाधव, संदीप पवार, पप्पू जोगडे, जयेश अहिरे, सुरज अहिरे, गौरव साठे, सिताराम खैरनार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल, जे यांनी दिवस-रात्र परिश्रम घेऊन या कार्यक्रमाच्या यशासाठी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी संबोधन करताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाचा, संघर्षाचा आणि सामाजिक समतेच्या कार्याचा मागोवा घेतला. त्यांच्या दूरदृष्टीचा, प्रज्ञेचा आणि जिद्दीचा गौरव करताना अनेक वक्त्यांनी डोळे पाणावले. या प्रसंगी सिद्धार्थ लेझीम मंडळाने नव्याने खरेदी केलेली शवपेटी नागरिकांच्या सेवेसाठी खुली केली. या शवपेटीचे लोकार्पण करताना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांतून अभिमान आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळत होते. ‘सेवा हेच आमचे व्रत’ या भावनेने या मंडळाने हा उपक्रम उभा केला आहे, असे सांगून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापुढेही सामाजिक कार्यात आपला सहभाग वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पृथ्वीराज लोंढे यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याची गरज अधोरेखित केली. अॅड. अविनाश भालेराव यांनी सामाजिक न्यायाच्या महत्वावर भाष्य केले. भालचंद्र ब्राह्मणे यांनी रिपब्लिकन चळवळीच्या प्रेरणेचा उल्लेख करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. किशोर डोंगरे व शशिकांत मोरे यांनी सामाजिक सेवा क्षेत्रातील नव्या दिशा या उपक्रमातून खुल्या झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण सिद्धार्थ लेझीम मंडळ आणि जयंती मंडळाचे कार्यकर्ते एकदिलाने, जिद्दीने आणि सेवाभावाने कार्यरत होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडल्यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित नागरिकांना अल्पोपहारही देण्यात आला. कार्यक्रमात सामूहिक शपथ घेण्यात आली की, भविष्यात समाजाच्या गरजेनुसार आणखी उपक्रम राबवले जातील आणि समाजासाठी निस्वार्थ सेवेची परंपरा जोपासली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार यांना अनुसरून समाज upliftment च्या दिशेने सातत्याने पावले टाकली जातील, हा दृढ संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सर्व उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी सिद्धार्थ लेझीम मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि भविष्यात अशा आणखी समाजहितकारी उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या लोकार्पण सोहळ्यामुळे नागसेन नगर पाचोरा परिसरात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकण्यात आले आहे.

प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने ‘करिअर कंपास’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात नवे स्वप्न फुलवले

0

Loading

पाचोरा व येथील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘करिअर कंपास’ कार्यक्रम म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हता तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दीपस्तंभ ठरलेला एक प्रभावी सोहळा होता आणि या समृद्ध सोहळ्याचे खरे केंद्रबिंदू ठरले ते एसएसएमएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले सर ज्यांनी आपल्या सखोल, समर्पक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात नव्या संधींची, नव्या स्वप्नांची आणि नव्या विश्वासाची प्रेरणा निर्माण केली त्यांच्या वकृत्वाने आणि जीवनानुभवाने विद्यार्थी केवळ करिअर निवडीसंबंधी जागरूक झाले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा धडा शिकला प्रा. वले सरांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना सर्वप्रथम करिअर म्हणजे केवळ नोकरीचे साधन नसून ते जीवनाचा गाभा आहे हे सहजतेने समजावून सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की तुमचे ध्येय तुम्ही स्वतः ठरवा कोणत्याही सामाजिक दबावामुळे किंवा केवळ प्रतिष्ठेच्या झगमगाटामुळे तुम्ही तुमचे भविष्य ठरवू नका तर स्वतःच्या आवडी क्षमता मर्यादा आणि जीवनातील मूल्ये लक्षात घेऊन करिअरची दिशा निवडा लहान वयातच आपली स्वप्न निश्चित केली तर ती साध्य करणे सोपे जाते असे ते म्हणाले त्यांनी स्पष्ट केले की योग्य करिअर निवडीसाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे स्वतःच्या आवडीनिवडी गुणवैशिष्ट्ये आणि आकांक्षा यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे आपले रोजचे नियोजन अभ्यासाची आखणी परीक्षेच्या तयारीची योजना ह्या सर्व गोष्टींमध्ये सातत्य व चिकाटी लागते असे सांगत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भविष्यासाठी एक स्वप्न बाळगण्याचे आवाहन केले त्यांनी विज्ञान वाणिज्य व कला या सर्व शाखांमधील करिअरच्या अफाट संधींवर प्रकाश टाकला विज्ञान शाखेतील डॉक्टर इंजिनिअर संशोधक पर्यावरणतज्ज्ञ यांसारख्या व्यावसायिक संधींबरोबरच वाणिज्य शाखेतील चार्टर्ड अकाउंटंट फायनान्स अ‍ॅनालिस्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील आव्हाने तसेच कला शाखेतील सिव्हिल सर्व्हिसेस पत्रकारिता शिक्षण साहित्य क्षेत्रातील अनंत संधी यांचा वेध घेत विद्यार्थ्यांना सर्व पर्यायांची माहिती दिली करिअर निवडताना केवळ क्षेत्राचे बाह्य आकर्षण पाहू नये तर त्या क्षेत्राशी आपले नाते जुळते का आपल्याला त्यात दीर्घकाळ आनंद व समाधान मिळेल का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचे महत्त्व विशद करताना त्यांनी यूपीएससी एमपीएससी बँकिंग एसएससी अशा विविध परीक्षांचे स्वरूप तयारीची योग्य दिशा आणि वेळ व्यवस्थापन याचे महत्त्व पटवून दिले तसेच आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात नव्या संधी जसे की डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप व उद्योजकतेच्या क्षेत्रात होणारी झपाट्याने वाढ याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वास दिला की कोणतेही स्वप्न मोठे नाही जर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द व परिश्रम असतील त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करा ध्येय निश्चित करा अपयशातून धडा घ्या आणि सतत पुढे चालत राहा हा संदेश दिला त्यांच्या संवादातून विद्यार्थ्यांना केवळ करिअरविषयी नव्हे तर जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव इतका खोलवर होता की सभागृहातील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या प्रत्येक शब्दात स्वतःला शोधत होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक रितेश ललवाणी पाचोरा अध्यक्ष राजेश जैन महिला अध्यक्षा हर्षा संघवी जिल्हा कार्यकारिणी सचिव तृप्ती संचेती संचालक राजेश संघवी मनोज बांठिया पारस मुणोत निलेश सुराणा मधुर बोथरा सचिन संघवी प्रतिभा बाफना प्रशांत संघवी सोनी जैन पाश संघवी यश संघवी चेतन छाजेड हेमराज बाफना पायल बाफना मित्तल शहा दर्शना खुशी बांठिया लता बांठिया राजश्री बडोला हर्षाली छाजेड प्रियंका संघवी दिपाली संचेती क्रितिका ओस्तवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी सचिव जीवनजी जैन सहसचिव संजयजी बडोला खजिनदार जगदीशजी खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी सचिव रितेशजी ललवाणी संचालक संजयजी चोरडीया गुलाबजी राठोड गोपालजी पटवारी प्रितीजी जैन महेंद्रकुमारजी हिरण अशोककुमारजी मोर शेखरकुमारजी धाडीवाल यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या तयारीत शाळेचे सीईओ अतुल चित्ते व मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रिती शर्मा शितल तिवारी दिपिका रणदिवे योगिता शेंडे पुजा पाटील ज्योती बडगुजर कविता जोशी रूपाली देवरे भाग्यश्री ब्राम्हणकर विद्या थेपडे शितल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंखे वाल्मिक शिंदे किरण बोरसे संगीता पाटकरी पुजा अहिरे पुनम कुमावत शालिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदळे संजय सोनजे संदिप परदेशी कृष्णा शिरसाठ आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राम्हणे अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनिता शिंपी मनिषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे यांनी केले आणि वाल्मिक शिंदे यांनी आभार प्रदर्शन करत सर्वांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठीची दिशा मिळाली आहे प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने ‘करिअर कंपास’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या प्रेरणेचा आणि संधींच्या वाटेचा आधारस्तंभ ठरला आहे

पाचोरा येथून गेल्या १८ वर्षापासून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे  शासकीय जाहिरात यादीत समावेश असलेले साप्ता.झुंज चा वर्ष 18 अंक क्र. 04 दि.26 एप्रील 2025 आपणास सस्नेह सादर करीत आहे Dhyeya News & सा. झुंज संपादक. -संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव (M.A.B.Ed) & JournalismM0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510

0

Loading

पाचोऱ्यात अध्यात्मिक संस्कारांची शाळा : बालकांच्या घडवणुकीसाठी भव्य मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा – आजच्या यांत्रिक, धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये माणूस अनेक क्षेत्रांत भरभराट करत असला तरी त्याचा परीघ प्रामुख्याने भौतिक साधनसंपत्तीपर्यंतच मर्यादित राहिला आहे. घराघरांत आधुनिकतेचे आकर्षण, करिअरची स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचे अतिक्रमण हे आई-वडिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मात्र, त्याच वेळी आपल्या मुलांना दिले जाणारे प्रेम, वेळ आणि संस्कार या बाबतीत घराघरांत अघोषित दुष्काळ जाणवत आहे. मोबाईल, संगणक, इंटरनेट आणि विविध सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आजची पिढी परस्पर नात्यांपासून, सामाजिक शिस्तीपासून आणि अध्यात्मिक मूल्यांपासून दूर जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी एक मोठे आश्वासक पाऊल ठरत आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ५ मे ते १५ मे २०२५ या कालावधीत शक्तीधाम, स्वप्नशिल्प हॉटेलसमोर, भडगाव रोड, पाचोरा येथे भव्यदिव्य मोफत राज्यस्तरीय वारकरी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर आणि ‘अनाथांची माय’ ह.भ.प. सुनीताताई पाटील हे असून, गेल्या सहा वर्षांपासून ही जोडी समाजाच्या मुल्यनिर्माणासाठी परिश्रमपूर्वक कार्य करत आहे. त्यांच्या संयोजनातून आणि आदरणीय रमेशजी मोर साहेब यांच्या अमूल्य सहकार्यामुळे हे शिबिर आज एक समाजव्याप्त अभियान बनले आहे.या शिबिरामध्ये मुलांना शिस्तबद्ध, व्यावहारिक आणि अध्यात्मिक जीवनाचे धडे दिले जातात. सकाळी पाच वाजता सुरू होणारा दिनक्रम हा शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा आहे. सकाळी ५ ते ६ योगासन, संध्या व स्नान, ६ ते ७ गीता पाठ आणि विष्णुसहस्रनाम, ८ ते ९ अल्पोपहार, ९ ते १० रामरक्षा स्तोत्र व भजन, १० ते १२ विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन, १२ ते १ जेवण, १ ते ३ आराम, ३ ते ५ संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकासावर आधारित सत्र, ५ ते ६ हरिपाठ व पावली खेळ, ६ ते ७ मृदुंग व हार्मोनियमचे संगीत शिक्षण, ७ ते ८ रात्रीचे जेवण आणि ८ ते ९ दिवसभराच्या अभ्यासाचे पुनरावलोकन – या सर्वामधून मुलांची संपूर्ण जीवनशैली समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.सदर शिबिरामध्ये प्रत्येक मुलासाठी दोन वेळा उत्कृष्ट दर्जाचे जेवण, सकाळचा नाष्टा, दुपारी शीतपेय यांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा एक विशेष भाग म्हणजे मुलांना गीता, हरिपाठ, हनुमान चालीसा, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम यांसारखी धार्मिक पुस्तके भेट दिली जाणार आहेत. अध्यात्मिक अभ्यासाबरोबरच सामाजिक शिस्त, स्वावलंबन, सहकार्य, व्यावहारिक आचारधर्म या गोष्टींवरही विशेष भर दिला जातो. शिबिरात शेवटच्या दिवशी सहभागी मुलांना प्रमाणपत्र देखील देण्यात येते, जे त्यांच्या भावी शिक्षणात आणि सामाजिक सहभागात उपयोगी ठरणारे आहे. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे मुलांचे व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी, त्यांच्यातील संवाद कौशल्य, लोकाभिमुख वृत्ती, नेतृत्व क्षमता आणि भावनिक समज वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. विविध क्षेत्रातील यशस्वी, प्रेरणादायी वक्ते हे रोज मार्गदर्शनासाठी येतात, ज्यामुळे मुलांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होतो.योगेशजी महाराज व सुनीताताई पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, या शिबिरामध्ये पाचोरा आणि आजूबाजूच्या गावांमधील पालकांनी आपल्या पाल्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. मुलांना भौतिक साधनांची नव्हे, तर जीवनमूल्यांची, संस्कारांची, धार्मिक आस्थेची, संयमाची आणि समाजाशी बांधिलकीची गरज आहे. हे संस्कार घरून मिळायला हवे होते, परंतु वेळेअभावी जे कमी पडते ते या शिबिराच्या माध्यमातून भरून काढले जाते.लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था ही केवळ शिबिरपुरतीच मर्यादित नाही. या संस्थेमार्फत वर्षभर ६० अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण व संस्कार यांचे काम केले जाते. जेवण, कपडे, शिक्षण, औषधे आणि सर्व मूलभूत गरजा संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. त्यामुळे जर पाचोरा परिसरात किंवा जळगाव जिल्ह्यात कोठे आई-वडिलांविना जीवन जगणारी मुले असतील, तर त्यांना या संस्थेकडे पाठविण्याचे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.संस्थेचा दृष्टीकोन केवळ अध्यात्मिक शिक्षणापुरता नाही, तर सामाजिक जबाबदारी आणि मानवीय मूल्यांची रुजवणूक हाही संस्थेच्या कार्याचा भाग आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात वाहून न जाता, आपल्या पिढीला नीती, सत्य, सेवाभाव आणि संस्कारांची घडण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या संस्थेमार्फत सातत्याने होत आहे.शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या बालकांची नोंदणी पूर्वसूचनांच्या आधारे होत असून स्थानिक स्वयंसेवक, शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचेही विशेष योगदान शिबिर यशस्वी करण्यात मोलाचे ठरत आहे. शिस्त, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अध्यात्मिक प्रेरणा या सर्व गोष्टींचा संगम असलेले हे शिबिर मुलांसाठी केवळ एक धार्मिक उपक्रम नसून, जीवनाच्या मूलभूत सत्यांची ओळख करून देणारी शाळा बनले आहे.या शिबिराची सर्व तयारी अगदी नेटकेपणाने करण्यात आली असून प्रत्येक बाबतीत मुलांच्या सुरक्षिततेचा व सुसंस्कृततेचा विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. स्वच्छता, आरोग्य, पोषण आणि भावनिक स्वास्थ्य यांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तसेच सहभागी मुलांच्या पालकांशी संपर्क ठेवून त्यांना शिबिरात मुलांची प्रगती कळविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.शिबिराचे यश हे केवळ त्याच्या कार्यक्रमांवर नाही, तर त्या मागील सेवाभावी वृत्ती, श्रद्धा आणि अखंड कार्यक्षमतेवर आधारित आहे. पाचोऱ्याच्या समाजाला, विशेषतः मुलांमध्ये चांगुलपणा रुजवणाऱ्या या कार्यासाठी भाग्य लाभले आहे, असे म्हणावे लागेल.यामुळेच लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य, योगेशजी महाराज आणि सुनीताताई पाटील यांचा उपक्रम, आणि रमेशजी मोर साहेबांचे सहकार्य – हे सर्व मिळून एक अभूतपूर्व अध्यात्मिक आणि सामाजिक क्रांती घडवत आहेत. या शिबिराचा सहभाग अधिकाधिक वाढावा, हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजच्या या बातमीद्वारे प्रामाणिक अपेक्षा आहे.

महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये लठ्ठपणामुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज आपल्या समोर एक महत्वाचा आणि गंभीर विषय आहे – लठ्ठपणा आणि त्याचा महिलांमधील व तरुणांमधील कर्करोगाशी असलेला संबंध. कर्करोग होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात, पण आता लठ्ठपणाही एक महत्वाचं कारण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

आता वैद्यकीय क्षेत्रात असं दिसतंय की अनेक महिला, विशेषतः गर्भधारणेच्या वयानंतर, स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. हे दोन्ही कर्करोग हार्मोनच्या असंतुलनामुळे होतात. त्याचप्रमाणे २०–३० वयोगटातील तरुणांमध्ये आतड्याचा आणि पॅनक्रियाजचा कर्करोग वाढताना दिसतो आहे. या रुग्णांमध्ये कर्करोग वंशपरंपरागत नसून, लठ्ठपणा, हालचालींचा अभाव आणि अयोग्य आहार ही मुख्य कारणं आहेत.

लठ्ठपणाचा शरीरावर खोल परिणाम होतो. शरीरातील चरबी म्हणजे फक्त साठवलेली ऊर्जा नसून, ती हार्मोन्स (जसे की इस्ट्रोजेन) आणि सूज वाढवणारी रसायने तयार करते. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती बदलते. विशेषतः महिलांमध्ये चरबी वाढल्याने इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाच्या धोक्यावर होतो. याशिवाय, लठ्ठपणामुळे होणाऱ्या सूज आणि इन्सुलिन प्रतिकाराचा संबंध आतड्याच्या कर्करोगाशी स्पष्टपणे जोडला जातो.

या सगळ्यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे लठ्ठपणाचा फटका लहान वयातील तरुणांना अधिक प्रमाणात बसत आहे. या वयोगटात कर्करोगाची नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे थकवा, पचनाचे त्रास, अनियमित मासिक पाळी यासारखी लक्षणं दुर्लक्षित केली जातात आणि निदान उशिरा होतं.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आता आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. कर्करोगापासून बचाव फक्त सिगारेट, तंबाखू किंवा प्रदूषण टाळण्यापुरता मर्यादित नसावा. योग्य वजन राखण्यासाठी लहान वयापासूनच चांगल्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत. शाळा, कॉलेज आणि समाजातील आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये यावर चर्चा झाली पाहिजे.

वैयक्तिक पातळीवर काही साधे उपाय करता येतात – रोजचा व्यायाम, ताजं आणि फायबरयुक्त अन्न, प्रोसेस्ड अन्न कमी करणे, तणाव टाळणे, सिगारेट आणि दारू टाळणे, आणि पुरेशी झोप घेणे. हे उपाय फक्त कर्करोगच नव्हे, तर इतर आजारांपासूनही बचाव करतात.

डॉक्टरांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. किशोरवयीन, तरुण किंवा रजोनिवृत्तीनंतरच्या महिला – प्रत्येक रुग्णाला लठ्ठपणाचे धोके समजावून सांगण्याची जबाबदारी वैद्यक व्यावसायिकांनी घ्यायला हवी.

लठ्ठपणामुळे होणारा कर्करोग हा एक इशारा आहे. पण त्यात एक आशेचा किरण आहे – कारण लठ्ठपणा ही अशी गोष्ट आहे जी आपण नियंत्रित करू शकतो. योग्य माहिती, सतत जागरूकता, जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि वेळच्या वेळी तपासण्या करून आपण पुढच्या पिढीला या टाळता येणाऱ्या आजारांपासून वाचवू शकतो.

प्रशासनाच्या रणांगणातील अग्रगण्य पाचोरा प्रांत कार्यालयाची जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठरलेली कामगिरी

0

Loading

पाचोरा – प्रशासनिक कार्यक्षमता, लोकाभिमुख सेवा, शिस्तबद्ध नियोजन आणि सुसंगत कामकाजाच्या जोरावर प्रांत कार्यालय पाचोरा याने एक वेगळा उच्चांक गाठला असून, जिल्हा प्रशासनाच्या विविध निकषांवर आधारित मूल्यांकनात हे कार्यालय संपूर्ण जिल्ह्यात ‘उत्कृष्ट कार्यालय’ ठरले आहे. दि. २५ एप्रिल २०२५ रोजी नियोजन भवन, जळगाव येथे झालेल्या एका भव्य समारंभात मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालय यास गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे केवळ संस्थेच्या कामगिरीचे नव्हे तर संपूर्ण पाचोरा तालुक्याच्या विकासदृष्टीकोनाचे प्रतीक ठरले आहे. दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या संपूर्ण आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारे हा गौरव प्रदान करण्यात आला. यामध्ये निवडणूक व्यवस्थापन, महसूल वसुली, भू-संपादन, जातप्रमाणपत्र वाटप, अपत्ती व्यवस्थापन, गौण खनिज कारवाई, अर्ध-न्यायिक निर्णय प्रक्रिया, जमीनप्रकरणे आणि कार्यालयीन हिशोब संकलन हे सर्व घटक अंतर्भूत आहेत. प्रांत कार्यालय पाचोरा यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ५५,८७८ अर्जांवर कार्यवाही केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५७.६३% मतदान नोंदले गेले होते, तर यंदा ६०.०६% पर्यंत वाढ झाली. विधानसभेसाठी २०१९ मध्ये ६३.६२% मतदान झाले होते, जे २०२४ मध्ये ६८.७०% पर्यंत पोहोचले, ही वाढ प्रशासकीय यंत्रणांच्या जनजागृती व नियोजनाची फळे आहे. NH-753 J महामार्गासाठी १९ प्रस्तावांद्वारे १९.०६ हेक्टर क्षेत्र भू-संपादन करण्यात आले असून, १७ कोटी ४३ लाख ३७ हजार ३८१ रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला. याशिवाय रेल्वे प्रकल्पासाठी ११ प्रस्तावांच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या असून ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५८७ रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. यामध्ये जुवार्डी, अंचाळगाव व वसंत वाडी या प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण कजाप संदर्भातील ३३ आदेश पारित झाले. तालुका पाचोरा व भडगावमध्ये मिळून अवैध गौण खनिज वाहतूक करताना मिळून १८२ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी पाचोऱ्यातील ४९ व भडगावातील ५४ वाहने दंड भरून सोडण्यात आली. पाचोऱ्यात १ कोटी २० लाख ५९ हजार ५२ व भडगावात १ कोटी ७७ लाख ७४ हजार ९१८ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एकूण वसूल दंड १ कोटी ६४ लाखांहून अधिक ठरला. जमिनीसंबंधी ३५० हून अधिक प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये बिनशेती परवानगी (११६), बांधकाम व विभाजन (९७), तलाठी कार्यालय जागेची मागणी (९६), स्मशानभूमी/दफनभूमीची जागा, ब-सत्ता व वर्ग-१ परवानग्या (२१), महसूल गावात रुपांतरणाचे प्रस्ताव, मानसिंगका कॉलनीतील घरांच्या नावांत बदल आदी विषयांचा समावेश आहे. प्रांत कार्यालयाने महसुली अपील निकाली ८२ प्रकरणांवर निर्णय दिला. ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार १९ प्रकरणांमध्ये न्याय दिला गेला. महसूल वसुलीत तर १७ कोटी ९२ लाख रुपये वसूल करत १०४% लक्ष्यपूर्ती केली. विभागीय दंड विषयक कामकाजात AD cases १६४, तडीपार ४, दारूबंदीचे अंतिम आदेश ९६, शस्त्र परवाना नूतनीकरण ६३ या प्रकरणांमध्ये नियमित कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा उत्कृष्ट आदर्श उभा केला. भील समाजाचे १८००, मदारी समाजाचे ३४, गोंड समाजाचे २७ दाखले गृहचौकशी अहवालांच्या आधारे देण्यात आले. ३५ नॉन क्रिमीलेयर पडताळणी अहवाल सादर करण्यात आले. अभिलेख कक्षात ३२८५ संचिकांचे वर्गीकरण केले गेले. पारधडे रेल्वे अपघात काळात महसूल विभागाने सलग २ दिवस पूर्ण वेळ काम करून आपत्ती व्यवस्थापनात आपली कार्यक्षमता सिद्ध केली. अलेप अंतर्गत एकूण २६ अमुल्यांकीत प्रकरणांपैकी १५ परिच्छेद मान्य करण्यात आले. रु. २,५८,७८१/- इतकी वसुली करण्यात आली. या यशस्वी वाटचालीत नायब तहसीलदार कुंभार साहेब, अव्वल कारकून रेखा सोळंके, कल्पना परदेशी, महसूल सहायक सुरेश सोळंके, चेतन सोळंके, राजिंद्रे, उमेश वाडेकर, शिपाई श्री. श्रावणे, श्री. गुलाब पाटील, वाहनचालक मनोज पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. हे सर्व कर्मचारी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि सातत्याने एकसंध कार्यसंस्कृती घडवत आहेत. त्यांच्यामुळेच पाचोऱ्यासारख्या तालुक्यातील उपविभागीय कार्यालयाला जिल्ह्यात ‘उत्कृष्ट कार्यालय’ म्हणून गौरविण्यात आले आहे. पाचोरा प्रांत कार्यालयाने दाखवलेली कार्यक्षमता ही प्रशासनात पारदर्शकता, सजगता आणि वेळेवर निर्णय घेण्याची प्रवृत्ती कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. या गौरवामुळे येथील कर्मचाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात आणखी उच्च दर्जाचे प्रशासन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!