Home Blog Page 53

सरकारचा नवा उपक्रम : एका क्लिकवर नोकऱ्या आणि अभ्यासक्रमांची माहिती

0

Loading

दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्र सरकार लवकरच एक स्मार्ट “जॉब डॅशबोर्ड” सुरू करणार आहे. या डॅशबोर्डवर एका क्लिकमध्ये विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात किती नोकऱ्या उपलब्ध असतील आणि त्या नोकऱ्यांसाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजेल. हा उपक्रम ब्रिटनच्या “जॉब्स अँड स्किल्स डॅशबोर्ड” आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील “लेबर मार्केट अँड क्रेडेन्शियल डेटा डॅशबोर्ड”च्या धर्तीवर राबवला जाणार आहे.

यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दूरसंचार आणि आयटी विभागाशी चर्चा केली आहे. ५जी, ६जी, क्वांटम कम्युनिकेशन्स, उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशीन लर्निंग आणि सेमीकंडक्टर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यात किती तज्ञांची गरज भासेल, याबाबत विभागांनी आपली मते मांडली आहेत. या डॅशबोर्डमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य अभ्यासक्रम निवडणे सोपे होईल. तसेच शिक्षणानंतर कोणत्या करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती आधीच मिळेल.

शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमात आवश्यक बदल करणे, नवे अभ्यासक्रम सुरू करणे किंवा कालबाह्य अभ्यासक्रम बंद करणे याबाबत या डॅशबोर्डकडून दिशा मिळेल. त्यामुळे रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यात या उपक्रमाची मोलाची भूमिका असेल. सध्या देशात कामगार ब्युरो डॅशबोर्ड, नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण, भारत स्किल्स पोर्टल, स्किल इंडिया डिजिटल हब आणि असीम पोर्टल कार्यरत आहेत; परंतु ही साधने मुख्यतः भूतकाळातील आकडेवारी, प्रशिक्षण किंवा रोजगार जुळवणीपुरतीच मर्यादित आहेत.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असे डॅशबोर्ड यशस्वीरीत्या चालवले जात आहेत. वॉशिंग्टन राज्यात हा डॅशबोर्ड रोजगार सुरक्षा विभाग आणि वॉशिंग्टन स्टेम या संस्थेकडून चालवला जातो. मे २०२५ मध्ये तेथील रिक्त पदांचा दर ३.७ टक्के होता. ब्रिटनमध्ये शिक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखालील या पोर्टलवर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीवर आधारित माहिती दिली जाते. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात ब्रिटनमध्ये तब्बल ७,२८,००० रिक्त पदांची नोंद झाली होती.

भारतामध्ये हा उपक्रम राबवताना विविध मंत्रालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी क्षेत्रातील माहिती एका व्यासपीठावर आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. एआयसीटीई, यूजीसी आणि एनसीव्हीईटी या संस्था या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. भविष्यातील रोजगार आणि शिक्षणाच्या दिशा दाखवणारा हा स्मार्ट जॉब डॅशबोर्ड देशातील तरुणांसाठी महत्त्वाची संधी निर्माण करेल.

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य; पात्र महिलांनी लवकर पूर्ण करा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “लाडकी बहीण योजना” अंतर्गत आता सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे, गैरप्रकार टाळणे आणि लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे हा आहे.

महिला व बालविकास विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून, पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार कायद्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठीही लाभार्थ्यांची पडताळणी ई-केवायसीद्वारे केली जाणार आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?

१. लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी.

२. या प्रक्रियेत महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती अपलोड करावी लागेल.

३. आवश्यक माहितीमध्ये नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.

४. सर्व माहिती अपलोड केल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टल पूर्णपणे सुरू नाही. मात्र, शासनाने लवकरच ती सुरू होईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेबसाइट वेळोवेळी तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू होताच तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहिसर दसरा २०२५: भक्तिप्रधान १८वा नवरात्रोत्सव, दररोज देवीचे अलौकिक दर्शन आणि भव्य दीपोत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील जीएसबी समुदाय भक्तांसाठी आणखी एक खास उत्सव घेऊन येत आहे. दहिसर येथील जीएसबी सभा आयोजित दहिसर दसरा १८वा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सारस्वत कल्चरल अँड रिक्रिएशन सेंटर (जी.एस.बी. गार्डन), एन.एल. कॉम्प्लेक्सजवळ, दहिसर ईस्ट, मुंबई येथे रंगणार आहे. हा उत्सव भक्तांना देवीच्या दिव्य अवतारांचे दर्शन घेऊन त्यांच्या श्रद्धा आणि भक्तिप्रधान अनुभवाचा आनंद घेण्याची अनन्यसाधारण संधी देतो. प्रत्येक दिवशी देवीचे वेगळे रूप दर्शनासाठी सजवले जाते, ज्यामुळे भक्तांना तिच्या प्रत्येक दिव्य अवताराचे पूजन करण्याची संधी मिळते. २००८ मध्ये परमपूज्य श्रीमद् सुधीन्द्र तीर्थ स्वामीजींच्या कृपाशिर्वादाने सुरू झालेला हा उत्सव आज मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित नवरात्रोत्सवांपैकी एक ठरला आहे.

भव्य दीपोत्सव आणि ‘माँ काली’ची पूजा हे उत्सवाचं मुख्य आकर्षण आहे. अष्टमीच्या दिवशी हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या मंडपामध्ये भक्तिभावाने पूजा केली जाते. दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात भक्तिगीतांचे स्वर आणि सामूहिक प्रार्थनेचे वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करते. उत्सव केवळ श्रद्धेचा नव्हे, तर सेवांचा आदर्शही ठरतो. दरवर्षी ५०,००० हून अधिक भक्तांना महाप्रसाद, पात्र विद्यार्थ्यांना १५–२० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण, तर २,००० पेक्षा जास्त मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य संच प्रदान केले जातात.

समाजसेवा आणि सांस्कृतिक समृद्धी यावरही उत्सव भरपूर भर देतो. नियमित रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासण्या आणि सतत चालू असलेली वैद्यकीय मदत समाजकल्याणात जीएसबी सभेची बांधिलकी अधोरेखित करतात. शास्त्रीय नृत्य, भजन-कीर्तन, वाद्यसंगीत आणि दीपोत्सवाची शोभा या सर्वांनी उत्सवाला विशेष ओळख दिली आहे. ह्या ह्या महापर्वाचे यूट्यूब आणि फेसबुक (@GSBSabhaDahisar) वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्यामुळे जगभरातील भक्तही उत्सवाचा अनुभव घेऊ शकतील.

जीएसबी सभा, दहिसर-बोरिवलीचे जयेश प्रभू म्हणाले, “१८ वर्षांपासून दहिसर दसरा हा केवळ सण नव्हे, तर श्रद्धा, सेवा आणि ऐक्याची एक यात्रा आहे. या वर्षीही आम्ही आपल्या परंपरा पुढे नेण्याचे वचन पुन्हा एकदा देत आहोत, तसेच शिक्षण, आरोग्यसेवा आणि अन्नदानाद्वारे समाजाची सेवा करत आहोत. मुंबईकरांना आमच्या नवरात्र उत्सवातील दैवी अनुभव आणि सांस्कृतिक संपन्नतेत सामावून घेण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रित करतो.”

शारदोत्सवात जिजाबाईंच्या नवविचारांचे तेजस्वी दर्शन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम पी शाह महिला महाविद्यालयच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (वर्ष पाचवे) निमित्ताने सुरू झालेल्या ‘‘नवदुर्गा : नवविचार’’ व्याख्यानमालेत पहिले पुष्प विद्यार्थिनींसमोर राजमाता जिजाबाई : स्वराज्य जननी राष्ट्रमाता ह्या विषयावर रंगले.

कार्यक्रमात व्हॉईस कोच, लेखिका व इतिहास कथनकार पद्मश्री राव यांनी राजमाता जिजाबाईंच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले, ‘‘जिजाबाई हे केवळ मातृत्वाचे नव्हे, तर नेतृत्वाचेही आदर्श आहेत. त्यांचे विचार आणि तत्त्वे आजही विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरतात. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला त्यांच्यातील जिजाऊ शोधणे आवश्यक आहे. जिजाई आणि शिवबा यांचा संबंध हे एक वेगळेच उदाहरण आहे. शारदोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींसमोर जिजाबाईंच्या नवविचारांचे तेजस्वी दर्शन घडवणे ही काळाची गरज आहे.’’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. अवनीश भट आणि कला शाखाप्रमुख डॉ. हिना शाह यांनी सांगितले, ‘‘नऊ दिवस साजरा होणारा शारदोत्सव आणि त्यातून हाताळले जाणारे विषय विद्यार्थिनींच्या सृजनतेला चालना देतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे.’’

कार्यक्रमाची सुरुवात सहा. प्रा. माधवी पवार यांच्या महालक्ष्मी अष्टकाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय कला शाखेतील अश्विनी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन संघमित्रा पडवणकर यांनी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमास माननीय प्राध्यापकवृंद, ग्रंथालयीन व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

शारदोत्सवाच्या दुसऱ्या माळेत उलगडले स्त्रीमनाचे सप्तसुर

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम.पी.शाह महिला महाविद्यालयच्या मराठी विभागात शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५ (वर्ष पाचवे) अंतर्गत ‘‘नवदुर्गा : नवविचार- बहुआयामी स्त्री’’ व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात विद्यार्थिनींसमोर ‘‘गंध सुरांचा ठाव स्त्रीमनाचा’’ ह्या विषयावर संस्कार प्रतिष्ठानच्या विश्वस्त व संगीत विशारद ॲड. सुरेखा भुजबळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

ॲड. सुरेखा भुजबळ म्हणाल्या, ‘‘संगीत आणि सूर हे केवळ संवेदना नाहीत, तर स्त्रीमनाच्या अस्तित्वाचे अविभाज्य भाग आहेत. सुरांमधील गंध जेव्हा स्त्रीच्या कोमल मनाचा ठाव घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वतःसाठी जगते. शारदोत्सवा निमित्ताने विद्यार्थिनींसमोर ह्या सुंदर विषयावर बोलण्याची संधी मिळाली. पाश्चिमात्य संगीताबरोबरच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत महत्त्वाचे आहे; कारण आपल्याला आपली परंपरा जोपासणे आणि वाढवणे आवश्यक आहे.’’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सहा.प्रा. माधवी पवार यांच्या शारदास्तवनाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय कला शाखेतील प्राची रांगळे, परिचय सिद्धी मेमाणे, तर आभार प्रदर्शन कीर्ती नाटेकर यांनी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमास माननीय प्राध्यापकवृंद, ग्रंथालयीन व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

पुरानंतर पाचोरा नगरपालिकेचा कठोर निर्णय : बसस्टॅन्ड रोडवरील अतिक्रमण हटवून नाले व गटारी मोकळे, नागरिकांच्या डोळ्यात दिलाशाचे अश्रू

0

Loading

पाचोरा – शहराने दिनांक 22 सप्टेंबर रोजी अनुभवलेला पुराचा तांडव अजूनही नागरिकांच्या मनातून गेला नाही. आकाशातून कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तसेच घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आणि त्याचा थेट फटका शहराला बसला. बसस्टॅन्ड परिसर ते रेल्वे उड्डाणपूल, जनता वसाहत, छत्रपती शिवाजी नगर, नागसेन नगर, भीम नगर, सफाई कामगार वसाहत तसेच बसस्टॅन्ड रोड या भागांत पाणी इतक्या झपाट्याने शिरले की, काही कुटुंबांना संसाराचा गडाच वाहून गेला. घरातील कपाटे, अंथरूण, शालेय दप्तर, पुस्तके, गणवेश, किराणा माल, भाकरीचे टोप, अगदी शिजवलेला जेवणाचा भांडाही पाण्यात तरंगताना दिसला. या दृश्याने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. नुकसानीची व्याप्ती इतकी होती की शेकडो नागरिकांनी उघड्यावर रात्र काढली. काहींनी छपरावर चढून जीव वाचवला. एक वृद्ध सफाई कामगार वसाहतीतील आजीबाई पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “आमच्या नातवाच्या शाळेच्या पुस्तकांचा गठ्ठा पाण्यात गेला. तो सारखा विचारतो, आता मी शाळेला कसा जाणार? याचे उत्तर माझ्याकडे नाही.” एका गृहिणीने सांगितले, “पाणी घरात इतक्या झपाट्याने आले की दोन वर्षांचा मुलगा गादीवर बसलेला होता, पाणी गादीवर येऊन त्याला उचलून घ्यायला आम्हाला जीवाच्या आकांताने धाव घ्यावी लागली.” या भीषण परिस्थितीची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, तसेच स्थानिक नेते अमोल शिंदे व वैशाली सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पूरग्रस्तांना धीर दिला. त्यांनी पाचोरा नगरपालिका प्रशासनाला स्पष्ट शब्दांत आदेश दिला की, “नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे, पंचनामे करून अहवाल सादर झाला पाहिजे आणि ज्या कारणामुळे पाणी अडले त्या मुळावर गदा घातली पाहिजे.” यानंतर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. प्रशासक मंगेश देवरे यांनी बुधवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला. जेसीबी, ट्रॅक्टर आणि शेकडो कर्मचाऱ्यांच्या साथीने त्यांनी बसस्टॅन्ड रोडवरील नाले आणि गटारींवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी नगरातील नाल्यावर उभारलेली सात ते आठ पक्या दुकानांची रांग ही नागरिकांच्या संकटाचे मूळ होती. नाल्यांवर सिमेंटचे बीम टाकून त्यावर लोखंडी अँगल व पत्रे लावून दुकाने बांधली गेली होती. या अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता. परिणामी पाणी उलटून घरे, वस्त्या पाण्यात बुडत होत्या. या वस्तुस्थितीची प्रचिती घेतल्यानंतर प्रशासक देवरे यांनी कुठलाही विलंब न करता जेसीबीच्या सहाय्याने ती सर्व दुकाने जमिनदोस्त केली. नागरिकांनी हात जोडून या कारवाईला पाठिंबा दर्शवला. फक्त तेवढेच नव्हे तर बसस्टॅन्ड रस्त्यावरील गटारींवर टाकलेले सिमेंटचे ढापे आणि त्यावर बसवलेले दुकानदारांचे अतिक्रमणही पाण्याच्या निचऱ्यास मोठा अडथळा ठरत होते. अनेक नागरिकांनी सांगितले की, “आम्ही कित्येकदा नगरपालिकेकडे तक्रारी दिल्या होत्या, पण अडथळे दूर झाले नाहीत. त्यामुळे पावसात आमची घरे नेहमी पाण्याखाली जातात.” या वेदना ऐकून प्रशासक देवरे यांनी सर्व ढापे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. काही तासांतच त्या गटारी पुन्हा मोकळ्या झाल्या. मोहिम सुरू करण्यापूर्वी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने सर्व दुकानदारांना नोटिसा देऊन अतिक्रमण स्वखुशीने काढण्याची संधी दिली होती. मात्र कोणीही पुढे आले नाही. अखेरीस बुधवारी सकाळी जेसीबींचा गडगडाट सुरू झाला आणि दुपारी बारा वाजेपर्यंत बसस्टॅन्ड रोडवरील पक्या दुकानांचे अतिक्रमण हटवून टाकले गेले. या कारवाईच्या वेळी काही दुकानदार नाराजी व्यक्त करत होते, परंतु बहुसंख्य रहिवासी मात्र डोळ्यांत अश्रू आणून म्हणत होते, “आज प्रशासनाने खरोखर आमच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.” प्रशासक मंगेश देवरे यांनी स्पष्ट केले की, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. पाणी वाहून जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आणि नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवणारे अतिक्रमण आम्ही अजिबात सहन करणार नाही. बसस्टॅन्ड परिसरातील कारवाई ही सुरुवात आहे, लवकरच शहरातील इतर नाले व गटारींवरील अतिक्रमणही हटवले जाणार आहे.” पाचोरा नगरपालिका प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलाशााचे भाव उमटले आहेत. काहींनी ही मोहीम ‘जगण्याचा श्वास परत मिळाल्यासारखी’ असल्याची प्रतिक्रिया दिली. एक गृहस्थ म्हणाले, “पावसाच्या पाण्यात आमची घरे बुडत होती, पण आता गटारे मोकळी झाल्यावर निदान सुरक्षिततेची आशा निर्माण झाली आहे.” पुराच्या भीषण घटनेनंतर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता ही केवळ अतिक्रमण हटवण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या आयुष्याला सुरक्षित करण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल आहे. आपत्ती निवारणापासून शहराच्या शाश्वत विकासापर्यंतचा हा प्रवास प्रशासन व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच शक्य होईल, याची जाणीव या कारवाईने करून दिली आहे.

जागर मातृशक्तीचा – नगरसेवक डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

0

Loading

जळगाव – भारतीय परंपरेतील सणांमध्ये नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा, मंगलमय आणि समाजाला एकत्र बांधणारा उत्सव मानला जातो. नऊ दिवसांचा हा उत्सव केवळ धार्मिक विधींनी मर्यादित राहत नाही तर समाजात स्नेह, ऐक्य, संस्कृतीचे जतन आणि शक्तीची उपासना यांचे दर्शन घडवणारा ठरतो. या मातृशक्तीच्या उपासनेतूनच समाजाला प्रेरणा मिळते आणि समाजजीवनाला नवचैतन्य प्राप्त होते. यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय काळात जळगाव शहरातील राजकारण, सामाजिक क्षेत्र आणि नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केलेले नगरसेवक, आदर्श कार्यकर्ता आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसानिमित्त एक भव्य अभिष्टचिंतन सोहळा तसेच भक्तिगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा फक्त वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता नवरात्रोत्सवाच्या उत्सवाशी जोडला गेला आहे. भक्तिगीतांच्या माध्यमातून समाजात अध्यात्मिकतेची भावना जागृत करणे, तर अभिष्टचिंतनाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य राहणार आहे. डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील हे समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून जळगावकरांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. नेहमी हसतमुख राहून सर्वसामान्यांच्या समस्या आपल्या समस्यांसारख्या स्वीकारून त्यांचे निराकरण करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. नगरसेवक या पदापेक्षा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख अधिक ठळकपणे पुढे येते. शहरातील विविध विकासकामांमध्ये त्यांचे योगदान आणि सर्व घटकांशी आपलेपणाने वागण्याची त्यांची शैली यामुळेच जनतेत त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. या आत्मीयतेचेच दर्शन त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिसून येणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे खान्देश किंग गृप यांचे थरारक व मनमोहक सादरीकरण. नवरात्रोत्सवाच्या वातावरणात भक्तिगीतांचा हा सोहळा उपस्थितांना अध्यात्मिक आनंद देईलच, शिवाय सांस्कृतिक वारशाचा अभिमानही वृद्धिंगत करेल. भक्तिगीतांच्या या सुरेल मैफलीतून समाजातील सर्व वयोगटांना आनंद मिळणार असून, उपस्थितांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरणार आहे. या सोहळ्यानंतर अभिष्टचिंतन कार्यक्रम आणि स्नेहभोजन आयोजित केले गेले आहे. भोजनाचे हे आयोजन केवळ जेवणापुरते मर्यादित नसून सामाजिक एकोपा, आपलेपणा आणि बंधुभावाचा उत्सव ठरणार आहे. एका छताखाली सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि स्नेही एकत्र बसून भोजन करतील, यामुळे आत्मीयतेचे वातावरण अधिक दृढ होईल. या अभिष्टचिंतन सोहळ्याची तारीख २६ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजता या सोहळ्यास प्रारंभ होणार असून स्थळ योगा सेंटर व शेतकी शाळेसमोरील मैदान, चंदूअण्णा नगर स्टॉप, खोटे नगर, जळगाव असे ठरविण्यात आले आहे. संभाव्य पावसाचे वातावरण लक्षात घेऊन या मैदानावर होणाऱ्या सोहळ्यासाठी सर्व सोयीसुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील मित्र परिवार आणि सरस्वती विद्या प्रसारक मंडळ परिवार, सतखेडा यांनी केले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून कार्यक्रमाची यशस्वी पूर्तता करण्यासाठी या संस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. नवरात्रोत्सवाचे मंगल वातावरण, समाजातील सर्व घटकांचा सहभाग आणि अभिष्टचिंतनाची हार्दिकता या सर्वांचा संगम या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. आयोजकांनी सर्व स्नेही, नागरिक व मान्यवरांना आग्रहपूर्वक आवाहन केले आहे की आपण सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहावे. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार असून आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, युवकांचे गट तसेच नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आधीच नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण असून, नवरात्रोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर हा सोहळा एक वेगळे स्थान निर्माण करणार आहे यात शंका नाही. संपर्कासाठी आयोजकांनी ७४९८३०४१३० हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. एकूणच, २६ सप्टेंबर २०२५ या दिवशी नगरसेवक डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस भक्तिगीतांचा कार्यक्रम, अभिष्टचिंतन आणि स्नेहभोजन यांच्याद्वारे एकत्रित साजरा होणार आहे. मातृशक्तीच्या उपासनेचा जागर, समाजातील एकोपा आणि सेवाभाव यांचा संगम घडवणारा हा सोहळा नवरात्रोत्सवाच्या आनंदात भर टाकणारा ठरेल आणि सर्व उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवेल यात शंका नाही.

जय योगेश्वर नगर परिसरातील नागरिकांचे धरणे आंदोलन : पंधरा वर्षांच्या मूलभूत सुविधांच्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त

0

Loading

पाचोरा – नगरपालिका पाचोरा हद्दीतील जय योगेश्वर नगर व अमृत नगर या परिसरातील नागरिकांनी आपल्या भागातील मागील पंधरा वर्षांपासून न सोडविलेल्या मूलभूत समस्या, विशेषतः रस्ते व नाल्यांच्या बांधकामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अखेर धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी जय योगेश्वर नगर येथील ओपन प्लेसमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे अध्यक्षस्थान चिधुभाऊ बळीराम महाजन यांनी भूषविले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पंधरा वर्षांपासून आम्ही या भागात राहत असूनही आजपर्यंत एकही योग्य दर्जाचा पक्का रस्ता किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशा नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. त्याउलट ज्या भागात घरेच नाहीत, अशा जागी नगरपालिका प्रशासन पक्के रस्ते व अंडरग्राउंड नाल्यांची कामे करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अन्याय झाल्याची भावना प्रबळ झाली आहे. धरणे आंदोलनादरम्यान सर्व रहिवाशांनी आपापली मते मांडून आपली व्यथा मोकळेपणाने व्यक्त केली. महिलांनीसुद्धा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला व आपल्या परिसरातील असुविधांचा अनुभव कथन केला. अनेकांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसात चिखल व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असल्याने हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येतात, वृद्ध व आजारी लोकांना वाहतुकीसाठी मार्गच नसतो. या गंभीर समस्यांकडे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे, याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी अध्यक्षस्थानील चिधु भाऊ बळीराम महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट इशारा दिला की, आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पंधरा वर्षांपासून निवेदन देऊनही न्याय मिळाला नाही, त्यामुळे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. जर प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही तर पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्यानुसार येत्या 7 ऑक्टोबर 2025 रोजी नगरपालिका पाचोरा यांच्या दालनात नागरिक पुन्हा एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे देखील आपल्या व्यथा मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येऊन धरणे आंदोलन करतील. नागरिकांच्या या ठाम भूमिकेमुळे नगरपालिका प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या अजूनही न सुटल्यास जनतेचा रोष अधिक वाढणार हे निश्चित आहे. या आंदोलनातून परिसरातील रहिवाशांनी दाखवून दिले की, आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे भागच आहे. नगरपालिका प्रशासनाने योग्य वेळी ठोस पावले उचलली नाहीत, तर या प्रश्नाचे स्वरूप केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरेल आणि व्यापक आंदोलनाचा चेहरा धारण करू शकते. जय योगेश्वर नगर व अमृत नगर परिसरातील या आंदोलनात सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी चिधु भाऊ महाजन यांनी सर्वांना आवाहन केले की, आपल्या भागाच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकदिलाने लढा द्यावा लागेल आणि ही लढाई प्रशासनाकडून हक्क मिळवून घेईपर्यंत थांबविली जाणार नाही.

खेडगाव नंदिचे येथे श्री बालाजी पेट्रोलीयम (एस.आर.)चा भव्य शुभारंभ : ग्राहकांच्या सेवेत अविरत कार्य करण्याचा संकल्प

0

Loading

पाचोरा-जळगाव महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व स्थानिकांसाठी मोठी सोय ठरणारा नवा इंधन केंद्र आता कार्यरत झाला आहे. पाचोरा शहरातून बाहेर पडल्यावर नांद्रा गावापर्यंत कुठेही पेट्रोल पंप उपलब्ध नसल्याने अनेक वर्षांपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून लोकसेवेसाठी नेहमीच पुढाकार घेणारे श्री बालाजी गृपचे नरेंद्र पाटील यांनी खेडगाव नंदिचे येथे श्री बालाजी पेट्रोलीयम (एस.आर.) स्थापन करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला. या नवीन पंपामुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक व बाहेरील वाहनधारकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. या पंपाचे उद्घाटन आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले. उद्घाटनाचा शुभहात नरेंद्र पाटील यांच्या सुपुत्री कु. विराली नरेंद्र पाटील हिच्या हस्ते झाला. यावेळी एस.आर. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भरत यादव, अमोल शिंदे, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, माजी नगरसेवक दत्ता पाटील, संजय कुमावत, प्रमोद सोनार, राम केसवाणी, पंढरी पाटील, राजु पाटील, राकेश पाटील, जारगाव सरपंच सुनिल पाटील, डॉ. भरत पाटील, विनोद तावडे, प्रविण पाटील, अमोल राजपुत, अनिल बच्छाव, अॅड. अनुराग काटकर, अॅड. योगेश पाटील, वैभव राजपुत, जितु पेंढारकर, उमेश पेंढारकर, प्रताप पाटील, पुरुषोत्तम तोतला, सुधिर पाटील, पुंडलिक पाटील, सतिष चौधरी, रणजित पाटील, सुशिल मराठे, चंद्रकांत धनवडे, संजय जडे, शरद देवरे, पी.पी. पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात बोलताना आमदार किशोरआप्पा पाटील म्हणाले की, “आजच्या घडीला इंधन ही केवळ प्रवाशांची गरज नसून ती जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातील लोक, शेतकरी आणि व्यापारी यांना पाचोरा शहरानंतर पेट्रोल-डिझेलच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. कधी कधी अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत होती. अशा परिस्थितीत दूरदृष्टी ठेवून नरेंद्र पाटील यांनी उभारलेला हा आधुनिक पंप केवळ व्यवसाय नाही तर समाजसेवेचे आदर्श उदाहरण आहे. यामुळे प्रवासी, वाहनचालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मी मनःपूर्वक नरेंद्र पाटील आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करतो.” ते पुढे म्हणाले की, “आपल्या तरुणाईने अशा समाजाभिमुख उपक्रमांना चालना द्यावी. रोजगारनिर्मिती, सेवा-सुविधा आणि लोकांच्या गरजांवर आधारित व्यवसाय हीच खरी काळाची गरज आहे. नरेंद्र पाटील यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
बालाजी गृपचे प्रमुख नरेंद्र पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, “प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी माझ्या नजरेसून सुटल्या नव्हत्या. अनेकांनी या भागात पंपाची गरज व्यक्त केली होती. त्यामुळेच लोकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. आमचा उद्देश केवळ इंधन विक्री नाही, तर ग्राहकांना शुद्ध, मापात आणि विश्वासार्ह सेवा देणे आहे. भविष्यात सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.” त्यांनी पुढे सांगितले की, “आमदार किशोरआप्पा पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत. स्थानिकांचा पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे. रोजगारनिर्मिती व सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
उद्घाटनावेळी परिसरात उत्सवमूढ वातावरण होते. आकर्षक सजावट, फलक आणि स्वागत समारंभामुळे सोहळ्याला विशेष देखणेपणा लाभला. वाहनधारकांनी या नवीन सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने या पंपामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांची मोठी सोय होईल, असा विश्वास दर्शविला.
खेडगाव नंदिचे येथे सुरू झालेला श्री बालाजी पेट्रोलीयम (एस.आर.) हा उपक्रम फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उभारला गेला आहे. पाचोरा-जळगाव मार्गावरील प्रवाशांसाठी ही नवी सुविधा खऱ्या अर्थाने दिलासादायी ठरणार असून आमदार किशोरआप्पा पाटील यांचे आशीर्वाद आणि नरेंद्र पाटील यांचा समाजाभिमुख दृष्टीकोन या पंपाला निश्चितच यशाकडे नेईल.

कमी उंची ही समस्या नाही तर आयुर्वेदातून मिळणारे समाधान : श्री विश्वरेणू आयुर्वेदिय चिकित्सालय पाचोरा येथे खात्रीशीर उपचार

0

Loading

पाचोरा – प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासंबंधी अनेक स्वप्ने असतात. मुलांनी केवळ शिक्षणातच नव्हे तर व्यक्तिमत्त्वात, आत्मविश्वासात आणि सर्वांगीण विकासात पुढे जावे, ही प्रत्येक पालकांची खरी इच्छा असते. मात्र काही वेळा मुलांच्या वाढीच्या प्रक्रियेत उंची कमी राहणे ही समस्या समोर येते. कमी उंचीमुळे शारीरिक आकर्षकता तसेच आत्मविश्वासावर परिणाम होतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. समाजातील अनेक मुले-मुली केवळ कमी उंचीमुळे आपली क्षमता असूनही मागे पडतात, तर काहींच्या मनात ही एक प्रकारची कमीपणाची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मुलं-मुलींच्या कमी उंचीमुळे त्यांच्या करिअरच्या निवडींपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत परिणाम होतो. विशेषत: स्पर्धा परीक्षा, लष्करी भरती, क्रीडा क्षेत्र किंवा मॉडेलिंगसारख्या व्यवसायांमध्ये उंचीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे कमी उंची ही केवळ शारीरिक समस्या न राहता मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारी बाब ठरते. मात्र आता या समस्येबाबत पालकांनी घाबरण्याचे किंवा निराश होण्याचे कारण नाही. कारण आयुर्वेद या प्राचीन शास्त्राने यावर प्रभावी आणि सुरक्षित उपाय उपलब्ध करून दिला आहे. पाश्चात्त्य औषधोपचारांमधून तात्पुरते परिणाम दिसून येऊ शकतात, परंतु आयुर्वेदिक औषधे शरीराच्या मूळ प्रकृतीवर काम करून नैसर्गिक पद्धतीने उंची वाढीस चालना देतात. या संदर्भात पाचोरा शहरातील श्री विश्वरेणू आयुर्वेदिय चिकित्सालय हे एक विश्वासार्ह ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे. येथे अनुभवी आयुर्वेदाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या कमी उंचीवर खात्रीशीर उपचार उपलब्ध आहेत. केवळ औषधेच नव्हे तर आहार, जीवनशैली आणि व्यायाम या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून रुग्णांना मार्गदर्शन दिले जाते. आयुर्वेदिक उपचारांची ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत असल्यामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न होता मुलांचा नैसर्गिक विकास साध्य होतो. पालकांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे या उपचारांमुळे खरंच फरक पडतो का? याचे उत्तर अनेक समाधानी रुग्णांच्या अनुभवांतून मिळते. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांच्या उंचीत लक्षणीय वाढ झाल्याचे समाधानकारक परिणाम पाहिले आहेत. उंची वाढल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक व प्रभावी झाले आहे. श्री विश्वरेणू आयुर्वेदिय चिकित्सालयात प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून त्याच्या प्रकृतीनुसार औषधोपचार दिले जातात. मुलांच्या वय, प्रकृती, आहारशैली आणि शारीरिक स्थितीचा विचार करून औषधे तसेच आहाराचे नियोजन केले जाते. यामुळे परिणाम अधिक खात्रीशीर आणि दीर्घकालीन ठरतात. पालकांसाठी ही एक मोठी संधी आहे. जर तुमच्या मुला-मुलींची उंची कमी असल्यामुळे तुम्हाला चिंता वाटत असेल, किंवा मुलं आत्मविश्वासाच्या बाबतीत मागे पडत असतील, तर आजच योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कमी उंची ही समस्या कायमस्वरूपी राहण्याची गरज नाही. आयुर्वेदाच्या नैसर्गिक आणि सुरक्षित उपचारांद्वारे तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. या संदर्भात श्री विश्वरेणू आयुर्वेदिय चिकित्सालय, पाचोरा येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळविण्यासाठी पालकांनी आजच संपर्क साधावा. पत्ता: गाळा क्रमांक – 13, पहिला मजला, बी.ए. मराठे कॉम्प्लेक्स, महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या पाठीमागे, स्टेशन रोड, पाचोरा
संपर्क क्रमांक: 9511885749 पालकांनो, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता ही सुवर्णसंधी गमावू नका. श्री विश्वरेणू आयुर्वेदिय चिकित्सालय येथे उपलब्ध असलेल्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे कमी उंची ही समस्या नव्हे तर आयुष्यातील एक सोपा टप्पा ठरू शकतो. आत्मविश्वासाने भरलेले, निरोगी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेले भविष्य तुमच्या मुलांची वाट पाहत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!