Home Blog Page 72

अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सर्वांचे घर असावे, सर्वा मुखी असावा घास, राहू नये कधी कुणी उपाशी हा एकाच वसा हा एकाच ध्यास… समाजात माणुसकीची जाणीव ठेवत, निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी ‘अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन’ तर्फे त्यांच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त एक आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ११ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमात सामाजिक भान जपत कार्य करणाऱ्या उल्लेखनीय महिलांचा गौरव करण्यात येणार असून, एक प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणेश वंदनेने होणार असून, त्यानंतर संस्थेची कार्यदिशा, उद्दिष्टे आणि संस्थापकांचा थोडक्यात परिचय सादर केला जाईल. यानंतर “बाईपण भारी देवा” या संगीतमय आणि भावस्पर्शी अभिवाचनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

कार्यक्रमात समाजासाठी समर्पित योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंगळागौरी स्पर्धासुद्धा रंगणार आहे. ही पारंपरिक स्पर्धा उपस्थितांसाठी एक आनंदाचा अनुभव ठरणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला आपली उपस्थिती हीच आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जर आपण अथवा आपल्याजवळील एखाद्या महिलेनं समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलं असेल, तर त्यांचं नाव आणि थोडक्यात परिचय ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत WhatsApp क्रमांक 9175775251 वर पाठवावा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रज्ञा प्रफुल्ल पितळे – 7887555251.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका प्रज्ञा प्रफुल्ल पितळे (अध्यक्षा) आणि संजना प्रफुल्ल पितळे (उपाध्यक्षा) यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्त्री सामर्थ्याचा सन्मान, समाजसेवेचा गौरव आणि श्रावणातील सांस्कृतिक उत्सव यांचा अनोखा संगम म्हणजे हा कार्यक्रम ठरणार आहे.

श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

0

Loading

पाचोरा – दिनांक 1 ऑगस्ट 2025 शुक्रवार या दिवशी तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा या नामवंत व प्रतिष्ठित शाळेत दोन थोर भारतीय विभूतींना आदरांजली वाहणारा गौरवशाली कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या मुख्य प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन शाळेतील

पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. अंजली गोहिल मॅडम, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, ज्येष्ठ शिक्षक पी. एम. पाटील, एस. एल. वाघ, तसेच ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. पाटील मॅडम यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या क्षणी सर्व शिक्षक व विद्यार्थी एकाच छत्राखाली एकवटले होते, आणि भारतमातेच्या या थोर सुपुत्रांना कृतज्ञतेने अभिवादन करत होते. कार्यक्रमाच्या मुख्य भागात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांद्वारे आणि भाषणांद्वारे या थोर महापुरुषांचे कार्य उजागर केले. प्रत्येक विद्यार्थ्याने टिळकांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेमागील इतिहास, त्यांचा राष्ट्रवाद, समाज प्रबोधनासाठी त्यांनी उभारलेले सार्वजनिक सण, आणि त्यांची पत्रकारितेतील भूमिका प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने टिळकांचे देशासाठी असलेले प्रेम, शिक्षणावरील त्यांचा विश्वास, तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न यांचा उल्लेख केला. सौ. अंजली गोहिल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना टिळकांचे जीवनकार्य, त्यांची विद्वत्ता, त्यांनी लढवलेली वैचारिक लढाई, तसेच त्यांनी आपल्या लेखनातून जागवलेले राष्ट्रप्रेम याची सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “टिळकांनी जनतेच्या मनात लपलेला स्वाभिमान जागवला. ‘Kesari’ व ‘Maratha’ हे वृत्तपत्र केवळ शब्दांचे नव्हते, तर ब्रिटिश सत्तेला हादरवणारे विचारांचे अस्त्र होते.” श्री. सागर थोरात सर यांनी कार्यक्रमात एक वेगळी ऊर्जा निर्माण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाडा गायन सादर केला. पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी अण्णाभाऊंच्या लढवय्या जीवनाची, समाज परिवर्तनाच्या कार्याची आणि शोषित-पीडितांसाठी त्यांनी घेतलेल्या संघर्षांची जिवंत छबी विद्यार्थ्यांसमोर उभी केली. त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यकृती, प्रबोधनात्मक कथा व सामाजिक बांधिलकी यांबाबत सुद्धा मनोगत व्यक्त करतांना सांगीतले अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव तुकाराम बाळू साठे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वातेगाव, ता. वाळवा, जि. सांगली (महाराष्ट्र) येथे झाला.त्यांचे बालपण अतिशय हलाखीचे आणि दारिद्र्यग्रस्त होते. शिक्षणाच्या संधीपासून वंचित असतानाही त्यांनी स्वतःच्या कष्टाने, निरीक्षणाने आणि अनुभवाने समाजजीवनाचे विविध पैलू समजून घेतले.
ते साहित्यिक, लोककवी, नाटककार, समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांचे लेखन मुख्यतः शोषित, पीडित, दलित आणि कष्टकरी वर्गाच्या दुःखांवर, संघर्षांवर आणि स्वाभिमानावर आधारित होते. त्यांनी फड नाट्य, पोवाडा, तमाशा, कथा, कादंबरी आणि लोकनाट्याच्या माध्यमातून समाज जागृती केली. त्यांच्या “फकीरा” या कादंबरीला विशेष प्रसिद्धी लाभली, जी नंतरच्या काळात शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी “ललित लेखनाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती” हे कार्य अविरत चालवले. त्यांनी सुमारे 35 कादंबऱ्या, 15 नाटकं आणि 10 लोकनाट्ये लिहिली.
त्यांना “लोकशाहीर” ही पदवी त्यांच्या लोकभिमुख कार्यासाठी आणि लोककलेतील योगदानासाठी बहाल करण्यात आली. 1969 साली वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांनी दलित साहित्य आणि समता चळवळीत जो प्रकाश टाकला, तो आजही प्रेरणादायक आहे.
अण्णाभाऊ साठे हे भारताच्या सामाजिक क्रांतीचा एक निर्धारपूर्वक आवाज होते – ज्यांनी लेखणीला शस्त्र बनवून अन्यायाविरुद्ध झुंज दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल आर. बी. बोरसे सर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये योग्य सुसूत्रता, भाषेतील प्रवाहीपणा आणि समारंभास साजेसे वातावरण त्यांनी निर्माण केले. आभार प्रदर्शन रूपेश पाटील यांनी करताना सर्व मान्यवर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुकपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “या दोन्ही महापुरुषांच्या विचारांनीच आजची पिढी घडू शकते. म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन हे काळानुरूप आवश्यक आहे.” या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते सातवीचे सर्व विद्यार्थी, सकाळ सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत एकाग्रतेने आणि आदरभावाने हा कार्यक्रम अनुभवला. या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच इयत्ता सातवी ‘ब’ या वर्गातही स्वतंत्र पद्धतीने अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करणारा उपक्रम राबविण्यात आला. वर्गशिक्षिका सौ. शितल संदीप महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गातच छोटेखानी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात हर्षदा कोळी, आराध्य शिरुडे, मनश्री गढरी, प्राजक्ता चंदने, ऋतुजा तरळ, वेदांत पाटील, प्रतीक तरळ, समर्थ पाटील आणि अश्विनी मातेरे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित मनोगते सादर केली. विद्यार्थ्यांनी पुस्तके, शाळेतील वाचनालयातील माहिती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि डिजिटल स्रोतांचा अभ्यास करून स्वतःचे विचार मांडले. ह्या मनोगतांमध्ये त्यांनी अण्णाभाऊंचे संघर्षमय बालपण, त्यांच्या क्रांतीकारक कथा व लेखन, आणि टिळकांचे पत्रकारितेतील योगदान, शिक्षणातील सुधारणा, आणि भारतमातेवरील प्रेम याचे प्रभावी दर्शन घडवले. वर्गशिक्षिका सौ. शितल महाजन मॅडम यांनी या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पेन भेट देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पेन ही केवळ वस्तू नसून, ती विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा आणि अभ्यासनिष्ठेचा प्रतीक आहे असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायक संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची आणि तयारीची स्तुती करताना सांगितले की, “हे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत, आणि अशा कार्यक्रमातून त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान निर्माण होते.” या वर्ग उपक्रमात देखील शाळेच्या कार्यक्रमाशी सुसंगतता राखली गेली. सर्व वातावरण राष्ट्रभक्तीने भारलेलं होतं. शाळा पातळीवरील भव्य कार्यक्रम व वर्गस्तरीय प्रेरणादायी उपक्रम यांचा संयोग हा केवळ कार्यक्रमपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या मनात या महापुरुषांविषयी आदरभावना, जिज्ञासा आणि अभ्यासाची रुची निर्माण करणारा ठरला. आजच्या पिढीला इतिहासातील अशा प्रेरणास्त्रोतांपासून शिकायला मिळणं ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांनी विद्यार्थी केवळ अभ्यासापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते वैचारिकदृष्ट्या परिपक्व होतात.शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे उपक्रम राबवणे म्हणजे शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांची फलश्रुती आहे.

देशात चमकलेलं गावाचं नाव – डॉ. अनिकेत संजय पाटील यांचा AIAPGET 2025 परीक्षेत देशात प्रथम क्रमांक!

1

Loading

दुसखेडा (ता. पाचोरा) या छोट्याशा खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि अविरत अभ्यास, प्रचंड मेहनत, कठोर शिस्त आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीच्या जोरावर अखिल भारतीय आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET – All India Ayush Post Graduate Entrance Test) 2025 मध्ये देशभरातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. अनिकेत संजय पाटील यांचे नाव सध्या संपूर्ण परिसरात अभिमानाने घेतले जात आहे. त्यांच्या या अद्वितीय, उल्लेखनीय आणि प्रेरणादायी यशामुळे दुसखेडा गावासह पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण लेवे गुजर समाजाचा गौरव उंचावला आहे. डॉ. अनिकेत पाटील हे दुसखेडा गावातील एक सामान्य कुटुंबातील मुलगा. त्यांचे वडील संजय रघुनाथ पाटील हे भूमिपुत्र, म्हणजेच शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिकवावे, हीच संजय पाटील यांची जीवनधारा. त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार न करता, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कमालीचा त्याग केला. त्याच मेहनतीच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या बळावर अनिकेतने हे अशक्यप्राय यश संपादन केले आहे. शेतातील मातीचा सुगंध घेऊन शिकलेल्या, घरात लाईटच्या कमतरतेत दिव्याच्या उजेडात अभ्यास करणाऱ्या अनिकेतने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये आपलं नाव सर्वांत वर नेऊन ठेवणं ही बाब केवळ त्याच्याच नव्हे तर आपल्या ग्रामीण महाराष्ट्रासाठी आणि देशातील शेतकरी समाजासाठीही अभिमानाची आहे. अनिकेतने आयुर्वेद वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली होतीच. मात्र पदव्युत्तर शिक्षणासाठी AIAPGET परीक्षेच्या तयारीसाठी त्याने आपली संपूर्ण ऊर्जा झोकून दिली. ही परीक्षा देशभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आयुष क्षेत्रातील पीजी म्हणजेच एम.डी./एम.एस. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाते. यात यश मिळवणं म्हणजे अत्यंत कठीण काम. या परीक्षेत अनिकेतने केवळ उत्तीर्ण होऊन पात्रता मिळवलेली नाही, तर तो थेट देशात प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे. ही गोष्ट त्याच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि अभ्यासातील एकाग्रतेची साक्ष आहे. अनिकेत पाटीलचे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे. ग्रामीण भागातील, मर्यादित आर्थिक संसाधनांमध्येही जग जिंकता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. सध्या केवळ शहरांमध्ये राहणाऱ्यांनाच संधी मिळते, अशी समजूत मोडून काढत अनिकेतने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं आहे. त्याच्या यशामागे फक्त त्याचं अभ्यासू वृत्ती नव्हे, तर त्याचे आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र, आणि गावकऱ्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. सतत मिळालेली प्रेरणा, पाठिंबा, आणि आशीर्वाद यांनीच त्याच्या पाठीमागे उभं राहत, त्याला या शिखरापर्यंत पोहोचवलं. अनिकेतच्या यशामुळे दुसखेडा या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात गाजू लागलं आहे. गावातील लोकांमध्ये आनंदाचं, अभिमानाचं आणि कृतज्ञतेचं वातावरण आहे. एकामेकांना पेढे वाटून हे यश साजरं केलं जात आहे. गावातील शाळांमध्ये अनिकेतचं नाव विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून सांगितलं जातंय. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था, शिक्षण संस्थांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला सन्मानित करण्याचे नियोजन सुरू केले आहे. डॉ. अनिकेत संजय पाटील हे लेवे गुजर समाजाचे उज्वल तारा ठरले आहेत. एकीकडे ग्रामीण भागातून, दुसरीकडे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी उंच भरारी घेतल्यामुळे संपूर्ण समाजात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. समाजात शिकून मोठं झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची भावना बळकट करण्याच्या दृष्टीने ही घटना अत्यंत प्रेरणादायी ठरते. पाचोरा परिसर लेवे गुजर समाज यांच्यातर्फे डॉ. अनिकेत पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले असून, त्यांचे अभिनंदन करताना खालील शब्दांत गौरव व्यक्त करण्यात आला — “या अभिमानास्पद यशासाठी डॉ. अनिकेत पाटील यांना लाख लाख सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!” स्वतः अनिकेत पाटील याने या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मी हे यश केवळ माझं मानत नाही. हे माझ्या आई-वडिलांचं, माझ्या शिक्षकांचं, आणि माझ्या गावाचं यश आहे. प्रत्येक मुलाने स्वप्न पाहायला हवं आणि त्यासाठी मेहनत घ्यायला हवी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमचा ध्यास आणि कष्ट तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातील.” त्याचा हा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हजारो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. AIAPGET 2025 मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर आता अनिकेतची इच्छा आयुर्वेद क्षेत्रात संशोधन, सेवा, आणि शिक्षण या तिन्ही माध्यमांतून काम करण्याची आहे. भारतातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं त्याचं ध्येय आहे. आज ग्रामीण भागातील एक मुलगा देशात प्रथम क्रमांक मिळवतो, तेव्हा त्यामागे केवळ अभ्यास नसतो, तर संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष, समाजाचा पाठिंबा, आणि गावच्या संस्कारांची शिदोरी असते. शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं धान्य आणि त्याचं मूल देशात टॉपर होणं म्हणजे एक युगानुरूप सत्य आहे. डॉ. अनिकेत संजय पाटील यांचा प्रवास हा लाखो विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. डॉ. अनिकेत संजय पाटील यांनी AIAPGET 2025 परीक्षेत मिळवलेला देशात पहिला क्रमांक हे केवळ एक शैक्षणिक यश नाही, तर ते एक सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण आहे. अशा गुणवंत युवकांचा आदर्श ठेवून आपण समाज म्हणून शिक्षण, प्रयत्न आणि प्रामाणिकतेला सर्वोच्च स्थान देणं ही काळाची गरज आहे. पाचोरा परिसर लेवे गुजर समाजाच्या वतीने व झुंज वृत्तपत्र , ध्येय न्युज संदीप महाजन व परिवाराच्या वतीने डॉ. अनिकेत संजय पाटील यांना कोटी कोटी शुभेच्छा, अभिमानपूर्वक सलाम आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आज दि.01/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष

आजच्या ग्रहयोगामुळे तुमच्या कामांत वर्चस्व प्राप्त होऊ शकते—कार्यसमूह व्यवसायात सहकार्य लाभदायक ठरेल. जुन्या योजनांतील वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल; कला, अभिनयात नाव मिळेल.

शुभ अंक: 1 • शुभ रंग: सोन्याचा

वृषभ

आज सरकारी सत्तेचा लाभ, कार्यालयातील अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक वातावरणात सौहार्द कायम राहील. वडीलधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे व्यवसायात उन्नतीची शक्यता. खर्च नियंत्रणात ठेवा.

शुभ अंक: 6 • शुभ रंग: गुलाबी

मिथुन

आज वरिष्ठांशी संबंध घट्ट होतील. आर्थिक व्यवहार सुलभ होतील रोजगाराच्या किंवा राजकारणी दर्जाच्या संधी दिसतील. मात्र अनावश्यक वाद किंवा एखाद्या व्यक्तीशी मनोऽभावनेशी सावध रहा.

शुभ अंक: 5 • शुभ रंग:

कर्क

आज मागालिक कार्यक्रम, प्रवास किंवा नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुलू शकतील. चर्चेतून निर्णय घ्या—भावनात्मक निर्णय टाळा.

शुभ अंक: 2

शुभ रंग: मोती पांढरा

सिंह

आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि व्यवसायात वाढ पाहायला मिळेल. तुमचा आत्मविश्वास नेतृत्वगुण कौतुकास्पद ठरतील. आरोग्य आणि सल्ला देणाऱ्यांचा विचार ठेवा.

शुभ अंक: 1 • शुभ रंग: सोन्याचा

कन्या

आज मित्रमंडळींचं सहकार्य वाढेल. कौटुंबिक समस्यांवर सहकार्याने मार्ग खुलेल. व्यापारात मोठा नफा साध्य होऊ शकतो. संयम आणि तार्किक विचार करून निर्णय घ्या.

शुभ अंक: 7? • शुभ रंग: आकाशी निळा

तुळा

राजकारण सार्वजनिक कार्यात मान मिळण्याची शक्यता आहे. परंतु आर्थिक अडचणी मानसिक ताण संभवतो; खर्चात विवेक ठेवा. सामाजिक संवादातून समाधान मिळेल.

शुभ अंक: 6 • शुभ रंग: गुलाब रंग

वृश्चिक

नफा करिअर उन्नतीचे दिवस आहे. मोठ्या प्रोजेक्ट्सची जबाबदारी मिळू शकते. लहान अडचणी येऊ शकतात—निर्णय स्वत: घ्या, आणि खर्चावर ताळमेळ ठेवा.

शुभ अंक: 8 • शुभ रंग: गडद मॅरून

धनु

आज खूपच व्यस्त दिवस असेल—परंतु त्या व्यस्ततेतून आर्थिक कामाच्या स्तरावर प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्र कुटुंबाचा सहकार्य लाभदायक ठरेल.

शुभ अंक: 3 • शुभ रंग: नारिंगी

मकर

आज विश्वासघाताची शक्यता आहे—अभिनव योजना करताना काळजी घ्या. परंतु, प्रिय व्यक्तींमधून किंवा पालकांकडून सल्ला स्थिरता मिळू शकते. दीर्घकालीन निर्णयासाठी संयम ठेवा.

शुभ अंक: 10? • शुभ रंग: इंद्रधनुष्य निळा

कुंभ

आज नियोजित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता असून जुन्या प्रकल्पांचा फल येऊ शकतो. मित्रांचा आधार फायदा देईल.

शुभ अंक: 11? • शुभ रंग: लॅव्हेंडर

मीन

भावनिक स्पष्टता आणि सर्जनशीलतेचा दिवस. मित्रांबरोबर वेळ घालविण्यात आनंद मिळेल. बजेट नियोजनातून सुरक्षितता राहील. सौम्य व्यायाम आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.

शुभ अंक: ? • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शासन विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य – एक नवे वळण?- गुरुदत्त वाकदेकर,

0

Loading

लोकशाही व्यवस्थेचा आत्मा म्हणजे व्यक्त होण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि मत मांडण्याचा हक्क. संविधानाने नागरिकांना दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर सामाजिक समतेचा आणि वैचारिक परिपक्वतेचं द्योतक आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जारी केलेल्या एका आदेशामुळे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध आणले गेले आहेत. समाजमाध्यमांवर शासनाच्या धोरणांवर टीका करणे, मतप्रदर्शन करणे यास बंदी घालण्यात आली असून, नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही बाब केवळ प्रशासकीय नियमपालनापुरती मर्यादित न राहता, एका गंभीर घटनात्मक आणि नैतिक चर्चेचा विषय बनली आहे. डिजिटल युगात समाजमाध्यमे ही फक्त संवादाची माध्यमं नाहीत, तर माहितीचे स्रोत, जनतेच्या अपेक्षा आणि शासकीय कार्यपद्धतीवर प्रतिक्रिया देणारे प्रभावी मंच ठरले आहेत. कर्मचारी वर्ग हा यंत्रणेचा भाग असल्याने त्यांच्या अनुभवातून आलेले निरीक्षण, प्रश्न आणि सूचना या समाजासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु याच माध्यमातून शासनाच्या धोरणांवर टीका होत असल्याने प्रशासनाला बदनामीचा धोका वाटू लागला आहे. परिणामी, सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी यांच्यावर समाजमाध्यमावरील वर्तनासाठी नवे नियम लागू केले आहेत. यात वैयक्तिक आणि कार्यालयीन खाती स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश, गोपनीय माहितीचा प्रसार टाळणे, बंदी असलेल्या संकेतस्थळांचा वापर न करणे यासह शासनाविरोधातील मतांपासून दूर राहण्याच्या सूचना आहेत. या नव्या आदेशात “टीका” या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या नसल्याने, चांगल्या उद्देशाने केलेल्या सूचना, प्रशासनातील त्रुटींवर केलेले भाष्य, किंवा सार्वजनिक हितासाठी केलेले मतप्रदर्शन यांनाही आक्षेप येऊ शकतो. त्यामुळे कर्मचारी वर्गात संभ्रमाची आणि भीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आदेश घटनात्मक अधिकारांच्या चौकटीत कितपत बसतो याचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. भारतीय संविधानाचा अनुच्छेद १९(१)(अ) प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करतो. त्याला अनुच्छेद १९(२) अंतर्गत काही मर्यादा असल्या तरी त्या स्पष्ट, न्यायसंगत आणि समाजहिताच्या चौकटीत असाव्या लागतात. कर्मचारी वर्ग शासनव्यवस्थेचा भाग असला तरी तेही नागरिक आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक मतांना घटनात्मक संरक्षण आहे. सरकारला असलेले भितीचे कारण म्हणजे खोटी माहिती, अफवा वा गोपनीयता भंग यांचा धोका. मात्र असे धोके टाळण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शक धोरणे, आचारसंहितांचे प्रशिक्षण आणि माहितीची जबाबदारी यांचा अवलंब करता येईल, फक्त बंदी घालून नव्हे. या संदर्भात माहितीचा अधिकार कायदा, तसेच “उघड करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण कायदा” ही दोन्ही विधेयके कर्मचारी वर्गाला सत्य उजेडात आणण्यासाठी प्रोत्साहन देतात. जर शासनाचे आदेश या कायद्यांवर मर्यादा आणत असतील तर हा एक गंभीर विरोधाभास ठरतो. न्यायालयांनी वेळोवेळी व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. अनेक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, विचार मांडणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवले जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा ते समाजहिताच्या चौकटीत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मानवी हक्कांचा भाग म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्यात आले आहे. कर्मचारी संघटनांनी या विषयावर परखड भूमिका घेतली पाहिजे. अनेकदा दबाव किंवा राजकीय समन्वयामुळे संघटनांची भूमिका अस्पष्ट राहते. तथापि, या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या चिंता, संभ्रम आणि स्वातंत्र्यावरील मर्यादा याबाबत खुली चर्चा होणे आवश्यक आहे. अन्यथा शासन आणि कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक तणावग्रस्त होतील आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर परिणाम होईल. त्याचवेळी कायदेशीर पर्याय खुले आहेत – प्रशासनिक न्यायाधिकरण, मानवी हक्क आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे जनहित याचिका केली जाऊ शकते. मात्र त्याही पुढे जाऊन शासनाने कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करून स्पष्ट आणि न्यायसंगत धोरण तयार करणे हाच योग्य मार्ग ठरेल. शेवटी हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर विचार करण्याची आणि तो मांडण्याची संधी आहे. शासनाने व्यक्त होणाऱ्या आवाजांना बंद केल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम होईल की अधिक भयग्रस्त? हा लेख विचार करण्यासाठी नाही, तर विचार जागवण्यासाठी आहे. मत मांडणे म्हणजे राजद्रोह नव्हे, तर ते बदलाचे बीज असते. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे लोकशाहीचे प्रतिबिंब अधिक स्वच्छ होईल की धूसर, याचे उत्तर वेळच देईल. पण तोवर सजग नागरिक आणि विवेकी कर्मचारी म्हणून आपली भूमिका निभावताना आपण अभिव्यक्तीच्या अधिकाराचे भान ठेवले पाहिजे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाजमाध्यमांवर निर्बंध लागू; टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय आणि करारपद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी समाजमाध्यमांवरील वर्तणुकीबाबत कडक आचारसंहिता लागू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, याचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

डिजिटल युगात समाजमाध्यमे संवादाचे प्रभावी माध्यम बनली आहेत. माहितीचे आदानप्रदान, जनसंपर्क आणि लोकसहभाग यासाठी त्यांचा वापर होतो. मात्र, काही कर्मचारी शासनाच्या धोरणांवर सार्वजनिक टीका करतात, गोपनीय माहितीचा प्रसार करतात किंवा खोटी व भ्रामक माहिती शेअर करतात. अशा प्रकारांमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते आणि शिस्तभंगाच्या घटना वाढतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत.

… असे आहेत नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध

राज्य सरकारच्या किंवा देशातील कोणत्याही सरकारच्या धोरणांवर वा कृतीवर समाजमाध्यमांवर टीका करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन समाजमाध्यम खाती स्वतंत्र ठेवावीत. केंद्र वा राज्य सरकारने बंदी घातलेल्या संकेतस्थळांचा व अ‍ॅप्सचा वापर करू नये. कोणतेही गोपनीय दस्तऐवज, फाईल्स वा कागदपत्रे पूर्वमान्यता शिवाय अपलोड, प्रसारित, शेअर करू नयेत.

या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.

हे नियम पुढील सर्व घटकांवर लागू होतील – शासकीय, निमशासकीय, कराराधीन, प्रतिनियुक्तीवर असलेले, बाह्यस्त्रोताद्वारे नेमलेले कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमधील अधिकारी व कर्मचारी.

सरकारचा हेतू की नियंत्रण?

या निर्णयामुळे शासनात शिस्त, गोपनीयता आणि अधिकाऱ्यांकडून जबाबदारीचे पालन होईल, हे जसे खरे; तसेच यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर बंधने येणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, पोलीस व नागरी सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन संवादावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय “वर्तमानाच्या गरजेनुसार सजग पाऊल” की “अधिकारांवर मर्यादा घालणारे नियंत्रण” – यावर समाजात मतविभाजन होण्याची शक्यता आहे.

शासकीय कर्मचारी म्हणून आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्याची प्रतिष्ठा, जबाबदारी आणि सरकारची विश्वासार्हता ही आपल्यामुळे टिकून राहते. म्हणूनच, सोशल मीडियावर व्यक्त होताना नागरिक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कर्मचारी म्हणून कर्तव्यनिष्ठा यामध्ये योग्य समतोल साधणे अत्यावश्यक ठरते.

बॅनर नको… !विचारांचे तेज हवे! एक आत्मपरीक्षणात्मक वाढदिवस  संदीप दा. महाजन

0

Loading

पाचोरा – ३१ जुलै २०२५ आज माझा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा दिवस जस जसा जवळ येतो, तस तसे मनात अनेक विचारांच्या लाटा उसळतात. “वाढदिवस साजरा करावा तरी कसा?” — हा प्रश्न दरवेळी मनात पुन्हा पुन्हा उमटतो. मी अनेकदा या दिवशी पाचोरातच नसतो. यंदाही मी कुठल्याही मोठ्या जल्लोषापेक्षा ईश्वराच्या चरणी डोके टेकवण्याचे ठरवले आहे. देवदर्शनाने हा दिवस खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होतो, असं मला वाटतं. आजकाल वाढदिवसाचं स्वरूपच बदललं आहे. सकाळ होताच मोबाईलवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्वच माध्यमांवर रंगीबेरंगी शुभेच्छा, फोटो, स्टोरीज, पोस्ट्स झळकतात. हो हे सर्व सामान्य माणसासाठी ठीक आहे काही जण स्वतःच्या पैशाने चौका-चौकात स्पेशली शाळा – कॉलेजच्या चौकात व रस्त्यावर & मुख्य बाजार पेठेसह वर्दळीच्या ठिकाणी फोटोचे बॅनर्सही लावतात. क्षणभर चेहऱ्यावर हसू उमटतं. पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र एक विचार नकळत डोकावतो — ही सगळी दिखाव्याची संस्कृती आहे का? बॅनरवर माझा चेहरा झळकला म्हणजे प्रेम दाखवलं गेलं असं समजायचं का? खरं सांगायचं तर वाढदिवस हा आत्मपरीक्षणाचा दिवस असावा. वय वाढतं, ती एक गोष्ट झाली. पण मी खऱ्या अर्थाने वाढलो का? अनुभवानं समृद्ध झालो का? हे विचारणं जास्त आवश्यक आहे. त्या दिवशी आपण स्वतःला विचारावं — मागच्या वर्षात मी कोणाच्या अश्रूंना आधार दिला का? कोणाच्या खांद्यावर हात ठेवला का? एखाद्याच्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश टाकला का? माझ्या आयुष्यातील अनेक वाढदिवस मी गोंगाटाशिवाय, साधेपणाने साजरे केले आहेत. बॅनर लावणं, स्टेजवर भाषणं देणं, पेढे वाटणं या गोष्टी माझ्या वाढदिवसाचा गाभा नाहीत.कारण मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे कोणताही राजकीय नेता नाही त्यांच्या स्तरावर ही बाब योग्य आणि आवश्यक आहे यासाठी मी नेहमी म्हणतो, “मैत्री ही मनात असावी, बॅनरवर नाही; आणि प्रेम हे कृतीत असावं, प्रदर्शनात नव्हे.” कधी कधी आपल्या मित्रमंडळींमध्ये एक विचित्र देवाण-घेवाण सुरू होते. “त्याने माझ्यासाठी बॅनर लावला, म्हणून मी त्याच्यासाठी लावणार.” पण या भावना किती खोलवर असतात, हेच मुळात शंकास्पद आहे. त्याऐवजी जर कोणाच्या आयुष्यात आपण खरंच एखादं चांगलं स्थान निर्माण करू शकलो, तर तेच अधिक मौल्यवान ठरतं. मी एक काळ ध्येय करिअर अकॅडमी नावाने एक शैक्षणिक संस्था चालवत होतो. त्या काळात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या खिशातील पैसे खर्च करून माझ्यासाठी एक बॅनर लावला. मी त्यांच्यावर ओरडलो नाही. त्यांच्यातील भावनांचा आदर केला. पण मी त्यांना शांतपणे एवढंच सांगितलं — “तुमचं खरं प्रेम मला फोटो लावून दाखवू नका. त्याऐवजी शिकून मोठं व्हा, काही तरी साध्य करा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत माझ्या घरी भेटायला याल, तोच माझा खरा वाढदिवस असेल.” आज त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण यशस्वी जीवन जगत आहेत. जेव्हा ते भेटायला येतात, त्यांच्या डोळ्यांतील समाधान, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचं गौरव पाहिलं की, त्या क्षणातच मी खूप मोठं बॅनर पाहिल्यासारखं वाटतं — पण ते मनात उमटलेलं असतं. आजकाल प्रसिद्धीच्या झगमगाटामध्ये खऱ्या नात्यांची गडबड होते आहे. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तेव्हा शहरभर त्याचे बॅनर झळकतात, पोस्ट्स वाहतात. पण तोच व्यक्ती जेव्हा एखाद्या अपघातात मृत्युमुखी पडतो, तेव्हा श्रद्धांजलीचाही एक पोस्टर कुणी लावत नाही. हीच आपली समाजमनाची उथळता आहे.आणि हे मी पाचोरा शहरात जीवन जगत असताना अनुभवले आहे फोटो झळकतो तेवढा वेळ. आठवण मात्र मनात राहते ती कायम. खरं प्रेम, आदर आणि आपुलकी ही कधीच प्रदर्शनातून व्यक्त होत नाही. ती कृतीतून उमटते. आज मी हे ठामपणे सांगतो की, मला माझ्या वाढदिवशी मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स, जाहिरातबाजी नकोय. आणि स्वतःच्या पैशाने तर नकोच – नको मला फक्त इतकंच हवंय की, एखाद्याच्या जीवनात मी एखादा दिवा पेटवला असेन, तर तेच माझं खरं यश, आणि तोच माझा वाढदिवस! आज समाजात वाढदिवस म्हणजे पार्टी, बँडबाजा, डेकोरेशन, महागड्या केकचा कार्यक्रम अशी एक तात्कालिक झिंग तयार झाली आहे. पण त्या झिंगेपलिकडे खरं माणूसपण उरलंय का, हा विचार कुणी करत नाही. मला असं वाटतं, प्रत्येकाच्या वाढदिवशी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारावा — मी एखाद्याच्या आयुष्यात दिलेला प्रकाश आजही तेवतोय का? सजावट केलेले मंच विसरले जातात. पण आपल्या कृतीतून उमटलेले संवेदनशील स्पर्श कायम आठवणीत राहतात. वाढदिवशी किंवा वर्षभरात आपण कोणा गरीब विद्यार्थ्याचं शैक्षणिक शुल्क भरलं, एखाद्या आजारी व्यक्तीला औषधं दिली, कुणाचं अश्रू पुसलं — ही खरी मोठी कामगिरी ठरते. दैनंदिन जीवनात पैसा, प्रसिद्धी, सत्ता, यश हे सर्व गोष्टी काहीकाळासाठी झगमगतात. पण शेवटी उरतं ते आपलं माणूसपण आणि आपल्यामुळे इतरांच्या मनात निर्माण झालेली आठवण. आज मी वाढदिवस साजरा करत असलो तरी त्याचा ‘दाखवा’ करण्याचा हेतू नाही. माझा वाढदिवस ‘जगण्यासाठी’ असावा, ‘दिसण्यासाठी’ नव्हे. माझ्या नावाचा नारा, चेहऱ्याचा फोटो, फुगे व तोरणं यापेक्षा जर कुणाच्या आयुष्यात मी शांती, दिलासा, आधार किंवा प्रेरणा देऊ शकलो, तर तेच माझं खरं सेलिब्रेशन आहे. आणि म्हणूनच मी हा वाढदिवस दरवर्षी आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा करतो. माझं नाव कुठे झळकलं की नाही, हे महत्त्वाचं नाही… पण मी कुणाच्या अंतःकरणात कोरला गेलो का? हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच — बॅनर नको… विचारांचे तेज हवे! हेच माझं जीवनदर्शन. हेच माझं वाढदिवसाचं आत्मभान.

कर्तव्यनिष्ठेचा शिरोमणी – सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करून गौरव

0

Loading

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान, कार्यक्षम आणि प्रेरणादायी अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त केलेले सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांना दिनांक २९ जुलै २०२५ रोजी त्यांच्या गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस दलातील ही सर्वोच्च पातळीची गौरवाची मान्यता मिळवणं ही केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीची आणि निष्ठेचीच नाही, तर समस्त महाराष्ट्र पोलीस दलासाठीही अभिमानाची बाब आहे. शाम खंडेराव शिंदे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावात झाला. भगूर हे गाव ऐतिहासिक दृष्टिकोनातून ओळखले जाते. याच भूमीने अनेक लढवय्ये, समाजसेवक आणि राष्ट्रसेवक घडवले आहेत. बालपणातच त्यांनी सामाजिक भान, कष्टाची सवय आणि जबाबदारीची जाणीव अंगी बाणवली. शालेय शिक्षण भगूर येथेच घेतले तर उच्च शिक्षण नाशिक शहरात पार पाडले. शिक्षणाबरोबरच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. सामाजिक न्यायासाठी काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार केला. सन १९९१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत यश मिळवून त्यांनी पोलीस उप निरीक्षक पदावरून आपल्या सेवेला सुरुवात केली. ही एक सुरुवात होती – कठोर शिस्त, अतूट मेहनत आणि अपार कर्तव्यनिष्ठेच्या प्रवासाची. या प्रवासात त्यांनी अमरावती, नाशिक, जळगाव, नवी मुंबई आणि मुंबई या महत्वाच्या ठिकाणी विविध पदांवर कार्यरत राहून पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे VVIP सुरक्षा विभागात तीन वर्षांची सेवा. या विभागात त्यांनी देशाच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे अतिशय बारकाईने नियोजन केले. यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायमूर्ती, राजदूत, परदेशी प्रतिनिधी इत्यादींच्या दौऱ्यांदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पाच वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी अनेक धाडसी कारवाया करत भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. अनेक सापळा कारवायांमध्ये त्यांनी नेतृत्व करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक केली. या कामगिरीने शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे त्यांना आतापर्यंत पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे. हे चिन्ह महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत गौरवास्पद मानले जाते. याव्यतिरिक्त एकूण २७८ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत – ही संख्या त्यांच्या कामगिरीची आणि कार्यक्षमतेची साक्ष आहे. या सर्व पुरस्कारांतून त्यांच्या कार्यक्षमतेची ओळख झाली असली तरी दिनांक 29 जुलै 2025 रोजी मुंबई येथील राजभवन मध्ये एक भव्य राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान समारंभ संपन्न प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ६४ जणांना शौर्यगौरव पदक, ४ जणांना विशेष सेवा पदक आणि ३८ जणांना उपयुक्त सेवा पदक देण्यात आले, एकूण १०६ पुरस्कारप्राप्तांना सन्मानित करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister): एकनाथ शिंदे
राज्य गृहमंत्र्य (Minister of State for Home, Urban): युगेश कदम
मुख्य सचिव, गृह विभाग (Principal Secretary Home): अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक (Special IG Law & Order): डॉ. मनोज कुमार शर्मा (Meritorious Service Medal प्राप्त)
पोलीस महासंचालक (DGP): रश्मी शुक्ला
त्यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पुरस्कारप्राप्तांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता हा समारंभ पोलीस दलातील धैर्यगौरव, कार्यक्षमता व सेवा भावनेचा गौरव करणारा एक फारच महत्वाचा आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला राष्ट्रपतींकडून प्राप्त झालेले “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक” हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आणि सर्वोत्तम मानांकन ठरले आहे. हे पदक केवळ पुरस्कार नसून पोलीस सेवेमधील उत्कृष्टतेचे आणि निष्कलंक सेवाभावाचे प्रतीक असल्याचे राज्यपाल यांनी मनोगतात सांगितले सध्या शाम खंडेराव शिंदे हे मुंबई शहरातील आर्थिक गुन्हे विभागात सहायक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणारे असते. बोगस कंपन्या, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हेगारी, बेनामी व्यवहार, हवाला व्यवहार अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये चौकशी करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे यासाठी तांत्रिक ज्ञान, निरीक्षणशक्ती, धैर्य आणि अनुभव यांचे समन्वय आवश्यक असतो. शिंदे यांनी यामध्ये आपल्या नेतृत्वगुणांनी आणि पारदर्शक कार्यशैलीने हा विभाग यशस्वीपणे सांभाळला आहे. सहकारी अधिकारी त्यांच्याबद्दल सांगतात की, “शिंदे सर हे एक आदर्श अधिकारी आहेत – जे कधीही चुकीच्या गोष्टींशी तडजोड करत नाहीत. त्यांनी कायद्याला सर्वोच्च मानले असून, प्रत्येक केसमध्ये ते न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहतात.” सामान्य जनतेसाठीही ते नेहमीच सहज उपलब्ध राहतात. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करताना ते जनतेबद्दल मात्र संवेदनशीलतेने आणि सहृदयतेने वागत असल्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यांची आचारसंहिता अत्यंत साधी, पण प्रभावी आहे – “कर्तव्य सर्वोपरि.” या चार शब्दांतच त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचे सार सामावले आहे. प्रामाणिकपणा, वेळेचे व्यवस्थापन, शांत चित्ताने निर्णय घेणे आणि सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे या गुणांमुळे ते आपल्या विभागात आदर्श नेते म्हणून ओळखले जातात. आजच्या काळात जेव्हा समाजात भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, आणि बेजबाबदारीबाबत चिंता व्यक्त केली जाते, तेव्हा शाम खंडेराव शिंदे यांच्यासारखे अधिकारी समाजासमोर एक आदर्श ठरतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी, प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा शोधणाऱ्यांसाठी, आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या जीवनप्रवासात एक संदेश दडलेला आहे – प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांचा प्रवास हा केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर तो महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवाचा, निष्ठेचा आणि कार्यक्षमतेचा प्रवास आहे. त्यांनी अनेक संकटांचा सामना करत, अत्यंत जबाबदारीने आणि सचोटीने सेवा बजावली आहे. राष्ट्रपती पोलीस पदक हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही, तर कर्तव्याशी निष्ठावान असलेल्या हजारो पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान आहे. अशा आदर्श अधिकाऱ्यांच्या सेवेमुळेच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावते आणि समाजात विश्वास निर्माण होतो. शिंदे सरांचे कार्य आणि योगदान पुढील पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.

शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी? तहसिलदार व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात धाव

0

Loading

पाचोरा : तालुक्यातील एका शेतकऱ्याने तहसिल कार्यालयातील तहसिलदार आणि मंडळ अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत थेट पाचोरा न्यायालयात धाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रकरणात शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या साहित्याची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, प्रशासनाच्या मनमानी कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विनोद दोधु भोई (रा. पाचोरा) या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्जाने घेतलेला ट्रॅक्टर दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री तहसिल कार्यालयाच्या आदेशावरून मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतला. वाळू चोरी करतो आहे, या केवळ संशयावरून हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, सदर ट्रॅक्टरमध्ये वाळूचा कोणताही पुरावा आढळून आला नव्हता. मात्र तरीही बेकायदेशीररित्या ट्रॅक्टर जप्त करून खोटे पंचनामे तयार करण्यात आले आणि ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणून उभा करण्यात आला. या वेळी शेतकऱ्याकडून दंडाची रक्कम मागितल्याचा आरोपही भोई यांनी केला आहे. या कारवाईविरोधात विनोद भोई यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कलम ४८ (७) आणि (८) नुसार ट्रॅक्टर मुक्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रॅक्टरमधून कोणतीही अवैध गौण खनिज वाहतूक झाली नाही, हे स्पष्ट करत दिनांक ३ जुलै २०२५ रोजी ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशापूर्वीच पाचोरा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विजय शिवाजी बनसोडे आणि मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांनी ट्रॅक्टरमधील Battery (₹9,000/-), Starter (₹11,000/-), Hydraulic Danda (₹2,200/-) आणि Pata (₹4,500/-) असे एकूण ₹26,700/- किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तींना हाताशी धरून चोरून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी साहित्याचा वापर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी विनोद भोई यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. मात्र, स्थानिक पोलीस ठाण्याने तक्रार नोंदवण्यास नकार दिला. परिणामी, भोई यांनी अॅड. अंकुश बी. कटारे (वकील, पाचोरा) यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु, अद्यापही पोलीस यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नाही. या पाश्र्वभूमीवर विनोद भोई यांनी शेवटी पाचोरा येथील न्यायालयात भारतीय सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १७५ अन्वये थेट अर्ज दाखल केला. हा अर्ज दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला. सदर अर्जात न्यायालयाने पाचोरा पोलीस स्टेशन तसेच प्रांताधिकारी यांना संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. सदर प्रकरणाचे विधीक कार्य अॅड. अंकुश बी. कटारे हे पाहत असून, शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि प्रशासकीय मनमानी थांबावी यासाठी न्यायालयात पुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या या गंभीर स्वरूपाच्या कृतीमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे आता केवळ स्थानिक नव्हे तर जिल्हा पातळीवरील सामाजिक आणि कृषक संघटनांचेही लक्ष वेधले जात आहे. शेतकऱ्यांची मालमत्ता अशी पद्धतशीरपणे गहाळ होणे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न आता अधिकच गंभीर होत आहे. न्यायव्यवस्थेचाच आश्रय घेत शेतकरी आपल्या हक्कासाठी लढा देत आहे, ही बाब प्रशासनासाठी आत्मपरीक्षणाची वेळ ठरू शकते.

शिक्षणाची लाल दिव्याची आशा – श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील कु. राजनंदिनी खैरे हिचे नवोदय यश

0

Loading

पाचोरा –  शहरातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्तीमधून शिक्षणाची एक नवी उमेद निर्माण करणाऱ्या कु. राजनंदिनी खैरे हिने शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पान जोडले आहे. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या नामवंत शाळेच्या इयत्ता पाचवी ‘क’ वर्गातील ही विद्यार्थिनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झाली असून तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी निश्चित झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. राजनंदिनी भीमराव खैरे ही सौ. सुवर्णा व भीमराव आनंद खैरे यांची कन्या असून, पाचोरा शहरातील मिलिंद नगर भागातील दलित वस्तीमध्ये राहते. या परिसरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्णतः अभाव असून, मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत. येथे शिक्षणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम नियमित राबवले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या राजनंदिनीने मिळवलेले यश हे केवळ तिचे नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. नवोदय प्रवेश परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा असून संपूर्ण भारतातील लाखोने विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात. या वर्षी 2025-26 साठी झालेली परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेची तयारी करताना राजनंदिनीने अत्यंत साधनशून्यतेतून अभ्यास केला. आर्थिक अडचणींमुळे तिला कोणत्याही खास क्लासमध्ये प्रवेश घेता आला नव्हता, मात्र गणित विषयासाठी तिने बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली थोडकाच कालावधी क्लासेस लावले होते. या परीक्षेदरम्यान ओएमआर शीट भरताना तिने नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ चूक केली होती. त्यामुळे पालक घाबरले, पण या वेळी शाळेच्या शिक्षकांनी व संबंधित व्यक्तींनी नवोदय प्रशासनाशी थेट संपर्क साधून योग्य ती दुरुस्ती करून पालकांना समाधान दिले. या प्रसंगातूनही विद्यार्थिनी आणि कुटुंबाला आधार देण्यात आला. शाळेतील विजय पाटील सरांनी राजनंदिनीला वेळोवेळी मार्गदर्शक व्हिडीओ पाठवले. त्याच व्हिडीओवर आधारित अभ्यास करून तिने नवोदयसाठी तयारी केली. पण खरा दिशादर्शक ठरले ते सुहास बागुल सर. बागुल सरांचा मिलिंद नगर परिसराशी अनेक वर्षांचा संबंध असल्याने या भागातील सामाजिक व शैक्षणिक स्थिती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होती. राजनंदिनीच्या अंगी असलेले शैक्षणिक गुण त्यांनी हेरले आणि पालकांशी संपर्क करून तिला नवोदय परीक्षेसाठी प्रवृत्त केले. राजनंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. वडील भीमराव खैरे हे हातमजुरीवर रोजंदारी तत्त्वावर काम करतात. आई सुवर्णा खैरे शिवणकाम करून उदरनिर्वाह करते. घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. सतत दारिद्र्याशी झगडत हे कुटुंब जीवन जगत आहे. अशा अवस्थेमध्येही त्यांनी मुलीच्या शिक्षणाचा निर्धार सोडला नाही. बागुल सरांनी त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून “कसलंही आर्थिक टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला नवोदयसाठी लागेल ते मी पाहतो,” असे आश्वासन दिले. सुहास बागुल सरांनी केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच दिले नाही, तर राजनंदिनीच्या रोजच्या दिनचर्येवर बारकाईने लक्ष ठेवले. वेळोवेळी तिला म्हणत, “बेटा, मिलिंद नगरमध्ये लाल दिव्याची गाडी घेऊन येणारी पहिली मुलगी तूच व्हायचीस!” अशा प्रेरणादायी शब्दांनी तिला मानसिक बळ दिले. या यशानंतर शाळेत राजनंदिनीचा सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पालक सौ. सुवर्णा व भीमराव खैरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी, ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील, वर्गशिक्षक विजय पाटील यांच्यासह सागर पाटील, मयूर देवरे, प्रशांत पाटील, रवींद्र जाधव, विशाल बागुल यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी राजनंदिनीच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजनंदिनीच्या यशामध्ये तिच्या परिश्रमाबरोबरच तिच्या शिक्षकांचे, शाळेचे व कुटुंबाचे महत्त्वाचे योगदान आहे. हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून संपूर्ण वस्तीतील, शाळेतील आणि समाजातील प्रत्येक गरिब, वंचित मुला-मुलींसाठी एक प्रेरणा आहे. मुख्याध्यापक नरेंद्र पाटील म्हणाले, “राजनंदिनीसारखी विद्यार्थिनी आमच्या शाळेचा अभिमान आहे. तिच्या जिद्दीला आमच्या शिक्षकांनी दिशा दिली. हे यश संस्था, शाळा, शिक्षक आणि कुटुंब यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.” या यशानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था देखील याचे कौतुक करत असून भविष्यात इतर विद्यार्थ्यांसाठी नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे राबवण्याचा विचार करीत आहे. राजनंदिनीचे स्वतःचेही मोठे स्वप्न आहे – “मी भविष्यात एक मोठी अधिकारी बनून माझ्या भागातील परिस्थिती बदलवायची आहे,” असे ती आत्मविश्वासाने सांगते. अशा प्रकारच्या यशोगाथा हे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतात. कु. राजनंदिनी खैरे हिचे हे यश लाखो वंचित विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण तिच्या या यशाबद्दल झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन, उपशिक्षीका सौ. शितल सं. महाजन व परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन सह भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

श्रीमती एम.एम.पी. शाह महिला महाविद्यालयात कारगिल शूरवीरांना कॅडेट्सकडून श्रद्धांजली

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम.पी. शाह महिला कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीर जवानांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्यात आली.

कॉम-३ मधील ४० एनसीसी कॅडेट्स व १ एएनओ यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कॅडेट्सनी कारगिल युद्धातील अमर जवानांना सशस्त्र सलामी दिली.

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ. भरत पाठक, श्री. वसंत खेतानी, श्री. अतुल संघवी, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाला एएनओ लेफ्टनंट सुवर्णा जोशी आणि लेफ्टनंट राजश्री करंजेकर यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कॅडेट्समध्ये देशभक्ती व सेवाभाव या मूल्यांची रुजवणूक झाली.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थिनींच्या मनात देशसेवेची बीजे पेरणारा ठरला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!