Home Blog Page 67

शासन विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य – एक नवे वळण?- गुरुदत्त वाकदेकर,

0

Loading

लोकशाही व्यवस्थेचा आत्मा म्हणजे व्यक्त होण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि मत मांडण्याचा हक्क. संविधानाने नागरिकांना दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर सामाजिक समतेचा आणि वैचारिक परिपक्वतेचं द्योतक आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जारी केलेल्या एका आदेशामुळे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध आणले गेले आहेत. समाजमाध्यमांवर शासनाच्या धोरणांवर टीका करणे, मतप्रदर्शन करणे यास बंदी घालण्यात आली असून, नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही बाब केवळ प्रशासकीय नियमपालनापुरती मर्यादित न राहता, एका गंभीर घटनात्मक आणि नैतिक चर्चेचा विषय बनली आहे. डिजिटल युगात समाजमाध्यमे ही फक्त संवादाची माध्यमं नाहीत, तर माहितीचे स्रोत, जनतेच्या अपेक्षा आणि शासकीय कार्यपद्धतीवर प्रतिक्रिया देणारे प्रभावी मंच ठरले आहेत. कर्मचारी वर्ग हा यंत्रणेचा भाग असल्याने त्यांच्या अनुभवातून आलेले निरीक्षण, प्रश्न आणि सूचना या समाजासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु याच माध्यमातून शासनाच्या धोरणांवर टीका होत असल्याने प्रशासनाला बदनामीचा धोका वाटू लागला आहे. परिणामी, सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी यांच्यावर समाजमाध्यमावरील वर्तनासाठी नवे नियम लागू केले आहेत. यात वैयक्तिक आणि कार्यालयीन खाती स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश, गोपनीय माहितीचा प्रसार टाळणे, बंदी असलेल्या संकेतस्थळांचा वापर न करणे यासह शासनाविरोधातील मतांपासून दूर राहण्याच्या सूचना आहेत. या नव्या आदेशात “टीका” या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या नसल्याने, चांगल्या उद्देशाने केलेल्या सूचना, प्रशासनातील त्रुटींवर केलेले भाष्य, किंवा सार्वजनिक हितासाठी केलेले मतप्रदर्शन यांनाही आक्षेप येऊ शकतो. त्यामुळे कर्मचारी वर्गात संभ्रमाची आणि भीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आदेश घटनात्मक अधिकारांच्या चौकटीत कितपत बसतो याचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. भारतीय संविधानाचा अनुच्छेद १९(१)(अ) प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करतो. त्याला अनुच्छेद १९(२) अंतर्गत काही मर्यादा असल्या तरी त्या स्पष्ट, न्यायसंगत आणि समाजहिताच्या चौकटीत असाव्या लागतात. कर्मचारी वर्ग शासनव्यवस्थेचा भाग असला तरी तेही नागरिक आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक मतांना घटनात्मक संरक्षण आहे. सरकारला असलेले भितीचे कारण म्हणजे खोटी माहिती, अफवा वा गोपनीयता भंग यांचा धोका. मात्र असे धोके टाळण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शक धोरणे, आचारसंहितांचे प्रशिक्षण आणि माहितीची जबाबदारी यांचा अवलंब करता येईल, फक्त बंदी घालून नव्हे. या संदर्भात माहितीचा अधिकार कायदा, तसेच “उघड करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण कायदा” ही दोन्ही विधेयके कर्मचारी वर्गाला सत्य उजेडात आणण्यासाठी प्रोत्साहन देतात. जर शासनाचे आदेश या कायद्यांवर मर्यादा आणत असतील तर हा एक गंभीर विरोधाभास ठरतो. न्यायालयांनी वेळोवेळी व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. अनेक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, विचार मांडणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवले जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा ते समाजहिताच्या चौकटीत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मानवी हक्कांचा भाग म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्यात आले आहे. कर्मचारी संघटनांनी या विषयावर परखड भूमिका घेतली पाहिजे. अनेकदा दबाव किंवा राजकीय समन्वयामुळे संघटनांची भूमिका अस्पष्ट राहते. तथापि, या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या चिंता, संभ्रम आणि स्वातंत्र्यावरील मर्यादा याबाबत खुली चर्चा होणे आवश्यक आहे. अन्यथा शासन आणि कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक तणावग्रस्त होतील आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर परिणाम होईल. त्याचवेळी कायदेशीर पर्याय खुले आहेत – प्रशासनिक न्यायाधिकरण, मानवी हक्क आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे जनहित याचिका केली जाऊ शकते. मात्र त्याही पुढे जाऊन शासनाने कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करून स्पष्ट आणि न्यायसंगत धोरण तयार करणे हाच योग्य मार्ग ठरेल. शेवटी हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर विचार करण्याची आणि तो मांडण्याची संधी आहे. शासनाने व्यक्त होणाऱ्या आवाजांना बंद केल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम होईल की अधिक भयग्रस्त? हा लेख विचार करण्यासाठी नाही, तर विचार जागवण्यासाठी आहे. मत मांडणे म्हणजे राजद्रोह नव्हे, तर ते बदलाचे बीज असते. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे लोकशाहीचे प्रतिबिंब अधिक स्वच्छ होईल की धूसर, याचे उत्तर वेळच देईल. पण तोवर सजग नागरिक आणि विवेकी कर्मचारी म्हणून आपली भूमिका निभावताना आपण अभिव्यक्तीच्या अधिकाराचे भान ठेवले पाहिजे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाजमाध्यमांवर निर्बंध लागू; टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय आणि करारपद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी समाजमाध्यमांवरील वर्तणुकीबाबत कडक आचारसंहिता लागू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, याचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

डिजिटल युगात समाजमाध्यमे संवादाचे प्रभावी माध्यम बनली आहेत. माहितीचे आदानप्रदान, जनसंपर्क आणि लोकसहभाग यासाठी त्यांचा वापर होतो. मात्र, काही कर्मचारी शासनाच्या धोरणांवर सार्वजनिक टीका करतात, गोपनीय माहितीचा प्रसार करतात किंवा खोटी व भ्रामक माहिती शेअर करतात. अशा प्रकारांमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते आणि शिस्तभंगाच्या घटना वाढतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत.

… असे आहेत नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध

राज्य सरकारच्या किंवा देशातील कोणत्याही सरकारच्या धोरणांवर वा कृतीवर समाजमाध्यमांवर टीका करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन समाजमाध्यम खाती स्वतंत्र ठेवावीत. केंद्र वा राज्य सरकारने बंदी घातलेल्या संकेतस्थळांचा व अ‍ॅप्सचा वापर करू नये. कोणतेही गोपनीय दस्तऐवज, फाईल्स वा कागदपत्रे पूर्वमान्यता शिवाय अपलोड, प्रसारित, शेअर करू नयेत.

या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.

हे नियम पुढील सर्व घटकांवर लागू होतील – शासकीय, निमशासकीय, कराराधीन, प्रतिनियुक्तीवर असलेले, बाह्यस्त्रोताद्वारे नेमलेले कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमधील अधिकारी व कर्मचारी.

सरकारचा हेतू की नियंत्रण?

या निर्णयामुळे शासनात शिस्त, गोपनीयता आणि अधिकाऱ्यांकडून जबाबदारीचे पालन होईल, हे जसे खरे; तसेच यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर बंधने येणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, पोलीस व नागरी सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन संवादावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय “वर्तमानाच्या गरजेनुसार सजग पाऊल” की “अधिकारांवर मर्यादा घालणारे नियंत्रण” – यावर समाजात मतविभाजन होण्याची शक्यता आहे.

शासकीय कर्मचारी म्हणून आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्याची प्रतिष्ठा, जबाबदारी आणि सरकारची विश्वासार्हता ही आपल्यामुळे टिकून राहते. म्हणूनच, सोशल मीडियावर व्यक्त होताना नागरिक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कर्मचारी म्हणून कर्तव्यनिष्ठा यामध्ये योग्य समतोल साधणे अत्यावश्यक ठरते.

बॅनर नको… !विचारांचे तेज हवे! एक आत्मपरीक्षणात्मक वाढदिवस  संदीप दा. महाजन

0

Loading

पाचोरा – ३१ जुलै २०२५ आज माझा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा दिवस जस जसा जवळ येतो, तस तसे मनात अनेक विचारांच्या लाटा उसळतात. “वाढदिवस साजरा करावा तरी कसा?” — हा प्रश्न दरवेळी मनात पुन्हा पुन्हा उमटतो. मी अनेकदा या दिवशी पाचोरातच नसतो. यंदाही मी कुठल्याही मोठ्या जल्लोषापेक्षा ईश्वराच्या चरणी डोके टेकवण्याचे ठरवले आहे. देवदर्शनाने हा दिवस खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होतो, असं मला वाटतं. आजकाल वाढदिवसाचं स्वरूपच बदललं आहे. सकाळ होताच मोबाईलवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्वच माध्यमांवर रंगीबेरंगी शुभेच्छा, फोटो, स्टोरीज, पोस्ट्स झळकतात. हो हे सर्व सामान्य माणसासाठी ठीक आहे काही जण स्वतःच्या पैशाने चौका-चौकात स्पेशली शाळा – कॉलेजच्या चौकात व रस्त्यावर & मुख्य बाजार पेठेसह वर्दळीच्या ठिकाणी फोटोचे बॅनर्सही लावतात. क्षणभर चेहऱ्यावर हसू उमटतं. पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र एक विचार नकळत डोकावतो — ही सगळी दिखाव्याची संस्कृती आहे का? बॅनरवर माझा चेहरा झळकला म्हणजे प्रेम दाखवलं गेलं असं समजायचं का? खरं सांगायचं तर वाढदिवस हा आत्मपरीक्षणाचा दिवस असावा. वय वाढतं, ती एक गोष्ट झाली. पण मी खऱ्या अर्थाने वाढलो का? अनुभवानं समृद्ध झालो का? हे विचारणं जास्त आवश्यक आहे. त्या दिवशी आपण स्वतःला विचारावं — मागच्या वर्षात मी कोणाच्या अश्रूंना आधार दिला का? कोणाच्या खांद्यावर हात ठेवला का? एखाद्याच्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश टाकला का? माझ्या आयुष्यातील अनेक वाढदिवस मी गोंगाटाशिवाय, साधेपणाने साजरे केले आहेत. बॅनर लावणं, स्टेजवर भाषणं देणं, पेढे वाटणं या गोष्टी माझ्या वाढदिवसाचा गाभा नाहीत.कारण मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे कोणताही राजकीय नेता नाही त्यांच्या स्तरावर ही बाब योग्य आणि आवश्यक आहे यासाठी मी नेहमी म्हणतो, “मैत्री ही मनात असावी, बॅनरवर नाही; आणि प्रेम हे कृतीत असावं, प्रदर्शनात नव्हे.” कधी कधी आपल्या मित्रमंडळींमध्ये एक विचित्र देवाण-घेवाण सुरू होते. “त्याने माझ्यासाठी बॅनर लावला, म्हणून मी त्याच्यासाठी लावणार.” पण या भावना किती खोलवर असतात, हेच मुळात शंकास्पद आहे. त्याऐवजी जर कोणाच्या आयुष्यात आपण खरंच एखादं चांगलं स्थान निर्माण करू शकलो, तर तेच अधिक मौल्यवान ठरतं. मी एक काळ ध्येय करिअर अकॅडमी नावाने एक शैक्षणिक संस्था चालवत होतो. त्या काळात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या खिशातील पैसे खर्च करून माझ्यासाठी एक बॅनर लावला. मी त्यांच्यावर ओरडलो नाही. त्यांच्यातील भावनांचा आदर केला. पण मी त्यांना शांतपणे एवढंच सांगितलं — “तुमचं खरं प्रेम मला फोटो लावून दाखवू नका. त्याऐवजी शिकून मोठं व्हा, काही तरी साध्य करा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत माझ्या घरी भेटायला याल, तोच माझा खरा वाढदिवस असेल.” आज त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण यशस्वी जीवन जगत आहेत. जेव्हा ते भेटायला येतात, त्यांच्या डोळ्यांतील समाधान, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचं गौरव पाहिलं की, त्या क्षणातच मी खूप मोठं बॅनर पाहिल्यासारखं वाटतं — पण ते मनात उमटलेलं असतं. आजकाल प्रसिद्धीच्या झगमगाटामध्ये खऱ्या नात्यांची गडबड होते आहे. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तेव्हा शहरभर त्याचे बॅनर झळकतात, पोस्ट्स वाहतात. पण तोच व्यक्ती जेव्हा एखाद्या अपघातात मृत्युमुखी पडतो, तेव्हा श्रद्धांजलीचाही एक पोस्टर कुणी लावत नाही. हीच आपली समाजमनाची उथळता आहे.आणि हे मी पाचोरा शहरात जीवन जगत असताना अनुभवले आहे फोटो झळकतो तेवढा वेळ. आठवण मात्र मनात राहते ती कायम. खरं प्रेम, आदर आणि आपुलकी ही कधीच प्रदर्शनातून व्यक्त होत नाही. ती कृतीतून उमटते. आज मी हे ठामपणे सांगतो की, मला माझ्या वाढदिवशी मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स, जाहिरातबाजी नकोय. आणि स्वतःच्या पैशाने तर नकोच – नको मला फक्त इतकंच हवंय की, एखाद्याच्या जीवनात मी एखादा दिवा पेटवला असेन, तर तेच माझं खरं यश, आणि तोच माझा वाढदिवस! आज समाजात वाढदिवस म्हणजे पार्टी, बँडबाजा, डेकोरेशन, महागड्या केकचा कार्यक्रम अशी एक तात्कालिक झिंग तयार झाली आहे. पण त्या झिंगेपलिकडे खरं माणूसपण उरलंय का, हा विचार कुणी करत नाही. मला असं वाटतं, प्रत्येकाच्या वाढदिवशी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारावा — मी एखाद्याच्या आयुष्यात दिलेला प्रकाश आजही तेवतोय का? सजावट केलेले मंच विसरले जातात. पण आपल्या कृतीतून उमटलेले संवेदनशील स्पर्श कायम आठवणीत राहतात. वाढदिवशी किंवा वर्षभरात आपण कोणा गरीब विद्यार्थ्याचं शैक्षणिक शुल्क भरलं, एखाद्या आजारी व्यक्तीला औषधं दिली, कुणाचं अश्रू पुसलं — ही खरी मोठी कामगिरी ठरते. दैनंदिन जीवनात पैसा, प्रसिद्धी, सत्ता, यश हे सर्व गोष्टी काहीकाळासाठी झगमगतात. पण शेवटी उरतं ते आपलं माणूसपण आणि आपल्यामुळे इतरांच्या मनात निर्माण झालेली आठवण. आज मी वाढदिवस साजरा करत असलो तरी त्याचा ‘दाखवा’ करण्याचा हेतू नाही. माझा वाढदिवस ‘जगण्यासाठी’ असावा, ‘दिसण्यासाठी’ नव्हे. माझ्या नावाचा नारा, चेहऱ्याचा फोटो, फुगे व तोरणं यापेक्षा जर कुणाच्या आयुष्यात मी शांती, दिलासा, आधार किंवा प्रेरणा देऊ शकलो, तर तेच माझं खरं सेलिब्रेशन आहे. आणि म्हणूनच मी हा वाढदिवस दरवर्षी आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा करतो. माझं नाव कुठे झळकलं की नाही, हे महत्त्वाचं नाही… पण मी कुणाच्या अंतःकरणात कोरला गेलो का? हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच — बॅनर नको… विचारांचे तेज हवे! हेच माझं जीवनदर्शन. हेच माझं वाढदिवसाचं आत्मभान.

कर्तव्यनिष्ठेचा शिरोमणी – सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करून गौरव

0

Loading

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान, कार्यक्षम आणि प्रेरणादायी अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त केलेले सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांना दिनांक २९ जुलै २०२५ रोजी त्यांच्या गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. पोलीस दलातील ही सर्वोच्च पातळीची गौरवाची मान्यता मिळवणं ही केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीची आणि निष्ठेचीच नाही, तर समस्त महाराष्ट्र पोलीस दलासाठीही अभिमानाची बाब आहे. शाम खंडेराव शिंदे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावात झाला. भगूर हे गाव ऐतिहासिक दृष्टिकोनातून ओळखले जाते. याच भूमीने अनेक लढवय्ये, समाजसेवक आणि राष्ट्रसेवक घडवले आहेत. बालपणातच त्यांनी सामाजिक भान, कष्टाची सवय आणि जबाबदारीची जाणीव अंगी बाणवली. शालेय शिक्षण भगूर येथेच घेतले तर उच्च शिक्षण नाशिक शहरात पार पाडले. शिक्षणाबरोबरच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. सामाजिक न्यायासाठी काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार केला. सन १९९१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत यश मिळवून त्यांनी पोलीस उप निरीक्षक पदावरून आपल्या सेवेला सुरुवात केली. ही एक सुरुवात होती – कठोर शिस्त, अतूट मेहनत आणि अपार कर्तव्यनिष्ठेच्या प्रवासाची. या प्रवासात त्यांनी अमरावती, नाशिक, जळगाव, नवी मुंबई आणि मुंबई या महत्वाच्या ठिकाणी विविध पदांवर कार्यरत राहून पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे VVIP सुरक्षा विभागात तीन वर्षांची सेवा. या विभागात त्यांनी देशाच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे अतिशय बारकाईने नियोजन केले. यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायमूर्ती, राजदूत, परदेशी प्रतिनिधी इत्यादींच्या दौऱ्यांदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पाच वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी अनेक धाडसी कारवाया करत भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. अनेक सापळा कारवायांमध्ये त्यांनी नेतृत्व करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक केली. या कामगिरीने शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे त्यांना आतापर्यंत पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे. हे चिन्ह महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत गौरवास्पद मानले जाते. याव्यतिरिक्त एकूण २७८ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत – ही संख्या त्यांच्या कामगिरीची आणि कार्यक्षमतेची साक्ष आहे. या सर्व पुरस्कारांतून त्यांच्या कार्यक्षमतेची ओळख झाली असली तरी दिनांक 29 जुलै 2025 रोजी मुंबई येथील राजभवन मध्ये एक भव्य राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान समारंभ संपन्न प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ६४ जणांना शौर्यगौरव पदक, ४ जणांना विशेष सेवा पदक आणि ३८ जणांना उपयुक्त सेवा पदक देण्यात आले, एकूण १०६ पुरस्कारप्राप्तांना सन्मानित करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister): एकनाथ शिंदे
राज्य गृहमंत्र्य (Minister of State for Home, Urban): युगेश कदम
मुख्य सचिव, गृह विभाग (Principal Secretary Home): अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक (Special IG Law & Order): डॉ. मनोज कुमार शर्मा (Meritorious Service Medal प्राप्त)
पोलीस महासंचालक (DGP): रश्मी शुक्ला
त्यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पुरस्कारप्राप्तांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता हा समारंभ पोलीस दलातील धैर्यगौरव, कार्यक्षमता व सेवा भावनेचा गौरव करणारा एक फारच महत्वाचा आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला राष्ट्रपतींकडून प्राप्त झालेले “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक” हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आणि सर्वोत्तम मानांकन ठरले आहे. हे पदक केवळ पुरस्कार नसून पोलीस सेवेमधील उत्कृष्टतेचे आणि निष्कलंक सेवाभावाचे प्रतीक असल्याचे राज्यपाल यांनी मनोगतात सांगितले सध्या शाम खंडेराव शिंदे हे मुंबई शहरातील आर्थिक गुन्हे विभागात सहायक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणारे असते. बोगस कंपन्या, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हेगारी, बेनामी व्यवहार, हवाला व्यवहार अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये चौकशी करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे यासाठी तांत्रिक ज्ञान, निरीक्षणशक्ती, धैर्य आणि अनुभव यांचे समन्वय आवश्यक असतो. शिंदे यांनी यामध्ये आपल्या नेतृत्वगुणांनी आणि पारदर्शक कार्यशैलीने हा विभाग यशस्वीपणे सांभाळला आहे. सहकारी अधिकारी त्यांच्याबद्दल सांगतात की, “शिंदे सर हे एक आदर्श अधिकारी आहेत – जे कधीही चुकीच्या गोष्टींशी तडजोड करत नाहीत. त्यांनी कायद्याला सर्वोच्च मानले असून, प्रत्येक केसमध्ये ते न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहतात.” सामान्य जनतेसाठीही ते नेहमीच सहज उपलब्ध राहतात. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करताना ते जनतेबद्दल मात्र संवेदनशीलतेने आणि सहृदयतेने वागत असल्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यांची आचारसंहिता अत्यंत साधी, पण प्रभावी आहे – “कर्तव्य सर्वोपरि.” या चार शब्दांतच त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचे सार सामावले आहे. प्रामाणिकपणा, वेळेचे व्यवस्थापन, शांत चित्ताने निर्णय घेणे आणि सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे या गुणांमुळे ते आपल्या विभागात आदर्श नेते म्हणून ओळखले जातात. आजच्या काळात जेव्हा समाजात भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, आणि बेजबाबदारीबाबत चिंता व्यक्त केली जाते, तेव्हा शाम खंडेराव शिंदे यांच्यासारखे अधिकारी समाजासमोर एक आदर्श ठरतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी, प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा शोधणाऱ्यांसाठी, आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या जीवनप्रवासात एक संदेश दडलेला आहे – प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे यांचा प्रवास हा केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर तो महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवाचा, निष्ठेचा आणि कार्यक्षमतेचा प्रवास आहे. त्यांनी अनेक संकटांचा सामना करत, अत्यंत जबाबदारीने आणि सचोटीने सेवा बजावली आहे. राष्ट्रपती पोलीस पदक हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही, तर कर्तव्याशी निष्ठावान असलेल्या हजारो पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान आहे. अशा आदर्श अधिकाऱ्यांच्या सेवेमुळेच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावते आणि समाजात विश्वास निर्माण होतो. शिंदे सरांचे कार्य आणि योगदान पुढील पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.

शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी? तहसिलदार व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात धाव

0

Loading

पाचोरा : तालुक्यातील एका शेतकऱ्याने तहसिल कार्यालयातील तहसिलदार आणि मंडळ अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत थेट पाचोरा न्यायालयात धाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रकरणात शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या साहित्याची चोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, प्रशासनाच्या मनमानी कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विनोद दोधु भोई (रा. पाचोरा) या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्जाने घेतलेला ट्रॅक्टर दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री तहसिल कार्यालयाच्या आदेशावरून मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतला. वाळू चोरी करतो आहे, या केवळ संशयावरून हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, सदर ट्रॅक्टरमध्ये वाळूचा कोणताही पुरावा आढळून आला नव्हता. मात्र तरीही बेकायदेशीररित्या ट्रॅक्टर जप्त करून खोटे पंचनामे तयार करण्यात आले आणि ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणून उभा करण्यात आला. या वेळी शेतकऱ्याकडून दंडाची रक्कम मागितल्याचा आरोपही भोई यांनी केला आहे. या कारवाईविरोधात विनोद भोई यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कलम ४८ (७) आणि (८) नुसार ट्रॅक्टर मुक्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रॅक्टरमधून कोणतीही अवैध गौण खनिज वाहतूक झाली नाही, हे स्पष्ट करत दिनांक ३ जुलै २०२५ रोजी ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशापूर्वीच पाचोरा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विजय शिवाजी बनसोडे आणि मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांनी ट्रॅक्टरमधील Battery (₹9,000/-), Starter (₹11,000/-), Hydraulic Danda (₹2,200/-) आणि Pata (₹4,500/-) असे एकूण ₹26,700/- किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तींना हाताशी धरून चोरून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी साहित्याचा वापर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी विनोद भोई यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. मात्र, स्थानिक पोलीस ठाण्याने तक्रार नोंदवण्यास नकार दिला. परिणामी, भोई यांनी अॅड. अंकुश बी. कटारे (वकील, पाचोरा) यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु, अद्यापही पोलीस यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नाही. या पाश्र्वभूमीवर विनोद भोई यांनी शेवटी पाचोरा येथील न्यायालयात भारतीय सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १७५ अन्वये थेट अर्ज दाखल केला. हा अर्ज दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला. सदर अर्जात न्यायालयाने पाचोरा पोलीस स्टेशन तसेच प्रांताधिकारी यांना संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. सदर प्रकरणाचे विधीक कार्य अॅड. अंकुश बी. कटारे हे पाहत असून, शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि प्रशासकीय मनमानी थांबावी यासाठी न्यायालयात पुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या या गंभीर स्वरूपाच्या कृतीमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे आता केवळ स्थानिक नव्हे तर जिल्हा पातळीवरील सामाजिक आणि कृषक संघटनांचेही लक्ष वेधले जात आहे. शेतकऱ्यांची मालमत्ता अशी पद्धतशीरपणे गहाळ होणे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न आता अधिकच गंभीर होत आहे. न्यायव्यवस्थेचाच आश्रय घेत शेतकरी आपल्या हक्कासाठी लढा देत आहे, ही बाब प्रशासनासाठी आत्मपरीक्षणाची वेळ ठरू शकते.

शिक्षणाची लाल दिव्याची आशा – श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील कु. राजनंदिनी खैरे हिचे नवोदय यश

0

Loading

पाचोरा –  शहरातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्तीमधून शिक्षणाची एक नवी उमेद निर्माण करणाऱ्या कु. राजनंदिनी खैरे हिने शासकीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पान जोडले आहे. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या नामवंत शाळेच्या इयत्ता पाचवी ‘क’ वर्गातील ही विद्यार्थिनी 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झाली असून तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी निश्चित झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. राजनंदिनी भीमराव खैरे ही सौ. सुवर्णा व भीमराव आनंद खैरे यांची कन्या असून, पाचोरा शहरातील मिलिंद नगर भागातील दलित वस्तीमध्ये राहते. या परिसरात शैक्षणिक वातावरणाचा पूर्णतः अभाव असून, मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या आहेत. येथे शिक्षणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम नियमित राबवले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या राजनंदिनीने मिळवलेले यश हे केवळ तिचे नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. नवोदय प्रवेश परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा असून संपूर्ण भारतातील लाखोने विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात. या वर्षी 2025-26 साठी झालेली परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेची तयारी करताना राजनंदिनीने अत्यंत साधनशून्यतेतून अभ्यास केला. आर्थिक अडचणींमुळे तिला कोणत्याही खास क्लासमध्ये प्रवेश घेता आला नव्हता, मात्र गणित विषयासाठी तिने बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली थोडकाच कालावधी क्लासेस लावले होते. या परीक्षेदरम्यान ओएमआर शीट भरताना तिने नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ चूक केली होती. त्यामुळे पालक घाबरले, पण या वेळी शाळेच्या शिक्षकांनी व संबंधित व्यक्तींनी नवोदय प्रशासनाशी थेट संपर्क साधून योग्य ती दुरुस्ती करून पालकांना समाधान दिले. या प्रसंगातूनही विद्यार्थिनी आणि कुटुंबाला आधार देण्यात आला. शाळेतील विजय पाटील सरांनी राजनंदिनीला वेळोवेळी मार्गदर्शक व्हिडीओ पाठवले. त्याच व्हिडीओवर आधारित अभ्यास करून तिने नवोदयसाठी तयारी केली. पण खरा दिशादर्शक ठरले ते सुहास बागुल सर. बागुल सरांचा मिलिंद नगर परिसराशी अनेक वर्षांचा संबंध असल्याने या भागातील सामाजिक व शैक्षणिक स्थिती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होती. राजनंदिनीच्या अंगी असलेले शैक्षणिक गुण त्यांनी हेरले आणि पालकांशी संपर्क करून तिला नवोदय परीक्षेसाठी प्रवृत्त केले. राजनंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. वडील भीमराव खैरे हे हातमजुरीवर रोजंदारी तत्त्वावर काम करतात. आई सुवर्णा खैरे शिवणकाम करून उदरनिर्वाह करते. घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. सतत दारिद्र्याशी झगडत हे कुटुंब जीवन जगत आहे. अशा अवस्थेमध्येही त्यांनी मुलीच्या शिक्षणाचा निर्धार सोडला नाही. बागुल सरांनी त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून “कसलंही आर्थिक टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला नवोदयसाठी लागेल ते मी पाहतो,” असे आश्वासन दिले. सुहास बागुल सरांनी केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच दिले नाही, तर राजनंदिनीच्या रोजच्या दिनचर्येवर बारकाईने लक्ष ठेवले. वेळोवेळी तिला म्हणत, “बेटा, मिलिंद नगरमध्ये लाल दिव्याची गाडी घेऊन येणारी पहिली मुलगी तूच व्हायचीस!” अशा प्रेरणादायी शब्दांनी तिला मानसिक बळ दिले. या यशानंतर शाळेत राजनंदिनीचा सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पालक सौ. सुवर्णा व भीमराव खैरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी, ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील, वर्गशिक्षक विजय पाटील यांच्यासह सागर पाटील, मयूर देवरे, प्रशांत पाटील, रवींद्र जाधव, विशाल बागुल यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी राजनंदिनीच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजनंदिनीच्या यशामध्ये तिच्या परिश्रमाबरोबरच तिच्या शिक्षकांचे, शाळेचे व कुटुंबाचे महत्त्वाचे योगदान आहे. हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून संपूर्ण वस्तीतील, शाळेतील आणि समाजातील प्रत्येक गरिब, वंचित मुला-मुलींसाठी एक प्रेरणा आहे. मुख्याध्यापक नरेंद्र पाटील म्हणाले, “राजनंदिनीसारखी विद्यार्थिनी आमच्या शाळेचा अभिमान आहे. तिच्या जिद्दीला आमच्या शिक्षकांनी दिशा दिली. हे यश संस्था, शाळा, शिक्षक आणि कुटुंब यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.” या यशानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था देखील याचे कौतुक करत असून भविष्यात इतर विद्यार्थ्यांसाठी नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे राबवण्याचा विचार करीत आहे. राजनंदिनीचे स्वतःचेही मोठे स्वप्न आहे – “मी भविष्यात एक मोठी अधिकारी बनून माझ्या भागातील परिस्थिती बदलवायची आहे,” असे ती आत्मविश्वासाने सांगते. अशा प्रकारच्या यशोगाथा हे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतात. कु. राजनंदिनी खैरे हिचे हे यश लाखो वंचित विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण तिच्या या यशाबद्दल झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन, उपशिक्षीका सौ. शितल सं. महाजन व परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन सह भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

श्रीमती एम.एम.पी. शाह महिला महाविद्यालयात कारगिल शूरवीरांना कॅडेट्सकडून श्रद्धांजली

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम.पी. शाह महिला कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीर जवानांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्यात आली.

कॉम-३ मधील ४० एनसीसी कॅडेट्स व १ एएनओ यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कॅडेट्सनी कारगिल युद्धातील अमर जवानांना सशस्त्र सलामी दिली.

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ. भरत पाठक, श्री. वसंत खेतानी, श्री. अतुल संघवी, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाला एएनओ लेफ्टनंट सुवर्णा जोशी आणि लेफ्टनंट राजश्री करंजेकर यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कॅडेट्समध्ये देशभक्ती व सेवाभाव या मूल्यांची रुजवणूक झाली.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थिनींच्या मनात देशसेवेची बीजे पेरणारा ठरला.

घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरातून सव्वा लाखांचा ऐवज लंपास; पाचोरा पोलिसांच्या चतुर तपासातून आरोपी जेरबंद

0

Loading

पाचोरा –  शहरातील वृंदावन पार्क परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि अतिशय काटेकोर तपासकार्यामुळे केवळ काही तासांतच चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड, तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पाचोरा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार राहुल पवार यांनी स्वीकारल्यापासून गुन्हेगारांना चपराक बसण्याचे प्रमाण वाढले असून, सर्वसामान्य जनतेला पोलीस दलाकडून तातडीने मदत मिळण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. कठोर, परंतु पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या घटनेचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 27.07.2025 रोजी दुपारी 12.00 ते 12.30 या कालावधीत पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथे राहणाऱ्या अश्विनी राजेश डहाळे, वय 33 वर्षे, व्यवसाय – घरकाम, यांच्या घरात अज्ञात चोरट्याने संमतीविना प्रवेश करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्या पर्समधून खालीलप्रमाणे मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या मालामध्ये 1,05,000 रुपये किमतीचा सोन्याचा सुमारे 11 ग्रॅम वजनाचा नेकलेस आणि 500 रुपयांच्या तीन नोटा असे एकूण 1,500 रुपये रोख रक्कम होती. या सर्व चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत 1,06,500 रुपये इतकी होती. या प्रकरणी अश्विनी डहाळे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. गुन्हा क्र. 375/2025, भा.दं.सं. कलम 305(अ) नुसार सदर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोहवा/1328 गजानन देशमुख यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रमेशकुमार शामलाल जांगीड, वय 49 वर्षे, मूळ रा. वार्ड क्रमांक 3, ईसाडिया, ता. मादपुर, जि. सिकर, राजस्थान, सध्या रा. एस.बी.आय कॉलनी, पाचोरा हा व्यक्ती फिर्यादी अश्विनी डहाळे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी फर्निचरचे काम करण्यासाठी आला होता. चोरीच्या घटनेनंतर तो अचानक बेपत्ता झाला होता, यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी गुप्त बातमीदाराची मदत घेऊन संशयित आरोपी रमेशकुमार जांगीड याला शोधून काढले. त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला दिनांक 27 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6.55 वाजता अटक करण्यात आली. अधिक तपास करत असताना रमेशकुमार जांगीड याने चोरी केलेला मुद्देमाल आपल्याच ताब्यातील एस.बी.आय कॉलनीमधील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी पंचांसमक्ष मेमोरेडम पंचनामा करून तपास केला. त्यात त्याच्या कब्जातून 1,05,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व 500 रुपयांच्या तीन नोटा (एकूण रोख 1,500 रुपये) असा एकूण 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर चोरी प्रकरणातील गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी अटक आरोपी रमेशकुमार जांगीड याला न्यायालयात रिमांड रिपोर्टासह सादर केले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत विश्वास वाढला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी पाचोरा शहरात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी राबवलेली रणनीती आणि त्यांच्या नेतृत्वगुणामुळे पोलीस विभागात एक सकारात्मक बदल दिसून येत आहे. त्यांच्या कार्यशैलीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. सदर प्रकरणात तपास करणारे पोहवा/1328 गजानन देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने आणि चिकाटीने तपास केला. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत (पोकों/100), जितेश पाटील (पोकों/1609), हरिष परदेशी (पोकॉ/1409), कमलेश राजपूत (पोकों/429) यांनी सहकार्य केले. या गुन्ह्याच्या उकलामुळे पाचोरा शहरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. काही तासांत चोरीच्या घटनेचा उलगडा करून मुद्देमाल परत मिळवणं ही पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेची उत्तम साक्ष देणारी बाब ठरली आहे. या कामगिरीबद्दल पाचोरा पोलीसांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेतून काही महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. पहिली बाब म्हणजे घरात काम करणाऱ्या व्यक्तींबाबत सतर्क राहणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित झाले आहे. घरगुती कामासाठी येणाऱ्या लोकांचे आधी पोलीस व्हेरिफिकेशन करणे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून शिफारस घेणे, ही काळाची गरज ठरत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू ठेवल्यास त्याबाबत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षेची हमी नसेल तर दागदागिने बँकेत ठेवणे हा पर्याय विचारात घ्यावा. या प्रकरणामुळे पाचोरा शहरात नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असून पोलिसांनी दाखवलेली तत्परता व कार्यक्षमता ही सर्वांच्या कौतुकास पात्र आहे. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःची सुरक्षा जागरूकतेने मजबूत करणे गरजेचे आहे. पोलीस विभागाकडून देखील नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असून, कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाचोरा पोलीस स्टेशनने दाखवलेली तत्परता, चपळाई आणि संयमित पद्धतीने केलेला तपास हा इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी आदर्श ठरावा, अशीच जनतेची भावना असून पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाचे मनोबल निश्चितच उंचावले आहे. त्यांचे सुशिक्षित, योग्य नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख धोरण हे पाचोरा शहरासाठी एक मोठे बलस्थान ठरत आहे.

दि पाचोरा पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अतुलभाऊ संघवी, तर व्हा. चेअरमनपदी प्रशांतभाऊ अग्रवाल यांची बिनविरोध निवड

0

Loading

पाचोरा – दि पाचोरा पीपल्स को-ऑप. कॉ बँक लि. पाचोरा जि. जळगाव या तालुक्यातीलच नव्हे चार जिल्हे मिळून एक अग्रगण्य आणि जनमानसात विश्वासार्हतेचा ठसा उमटवलेल्या सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुक दिनांक 13 जुलै 2025 रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीनंतर 14 जुलै रोजी मतमोजणीचे काम पार पडले. या मतमोजणीत अतुलभाऊ संघवी यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व, आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाला जनतेने भरभरून साथ दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेच्या भविष्यासाठी नवा मार्ग प्रशस्त केला. मतमोजणीनंतर नियमानुसार संचालक मंडळाचे सत्तास्थापन व पदनिर्धारण करण्याची प्रक्रिया दिनांक 28 जुलै 2025 रोजी पाचोरा पीपल्स बँकेच्या प्रशस्त सभागृहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस नवनिर्वाचित संचालक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील हे होते. त्यांच्या देखरेखीखाली चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सभेला अतुलभाऊ संघवी, प्रशांतभाऊ अग्रवाल, डॉ. अनंतदादा पाटील, राहुल संघवी, ॲड. अविनाशभाऊ भालेराव, सौ. संगीता शरद पाटे, सौ. संध्या प्रकाश पाटील, नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील, भागवत महालपुरे, पवन अग्रवाल, विकास वाघ, पुखराज डांगी, ॲड. स्वप्नील पाटील, देवेंद्र कोटेचा आणि अविनाश कुडे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. या बैठकीत चेअरमन पदासाठी नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील यांनी अतुलभाऊ संघवी यांचे नाव सुचवले. संघवी यांचा उमेदवारी अर्ज नियमानुसार दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे व्हा. चेअरमन पदासाठी राहुल संघवी यांनी प्रशांतभाऊ अग्रवाल यांचे नाव सुचवून त्यांचा अर्ज सादर केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, या दोन्ही पदांसाठी कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज दाखल झाला नाही. ही बाब त्या उमेदवारांविषयी असलेल्या विश्वासाचे ठोस प्रतीक आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी औपचारिक घोषणा करत अतुलभाऊ संघवी यांची चेअरमन म्हणून आणि प्रशांतभाऊ अग्रवाल यांची व्हा. चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभागृहात या घोषणेनंतर

टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ‘सहकार पॅनल’ने दाखवलेली एकजूट, संयमित प्रचार, आणि जनतेच्या प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका यामुळे मतदारांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला. बँकेच्या पूर्वीच्या कार्यकाळात अतुलभाऊ संघवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेले योगदान, प्रामाणिक कारभार, आर्थिक सुदृढता, आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेता मतदारांनी पूर्ण पॅनलवर कौल दिला. या विजयामुळे बँकेतील पारदर्शकता, विश्वासार्हता, आणि स्थिरता यांना बळकटी मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, बँकेच्या अनेक ग्राहक व सभासदांनी या निकालाचे स्वागत करताना सोशल मिडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला. अतुलभाऊ संघवी हे सहकार क्षेत्रातील एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. बँकेच्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी भरीव भूमिका बजावली आहे. अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांमध्येही त्यांनी बँकेला स्थिरतेकडे नेले. शाखा विस्तार, ग्राहक सेवा सुधारणा, डिजिटल बँकिंग सेवा, आणि कामकाजातील पारदर्शकता ही संघवी यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात बँकेचा व्याप वाढवताना त्यांनी शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग, आणि तरुण उद्योजक यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मतदारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रशांतभाऊ अग्रवाल यांची निवड व्हा. चेअरमन पदावर झाल्यामुळे बँकेच्या कारभारात नव्या ऊर्जा आणि व्यवस्थापन कौशल्याची भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ते स्वयंउद्योजक, आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम जाण असलेले, आणि सहकार मूल्यांशी बांधील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्यवसायातील अनुभव, कारभारातील शिस्त आणि निर्णयक्षमतेमुळे बँकेच्या धोरणनिर्धारण प्रक्रियेत नावीन्यता येईल. त्यांच्याकडून बँकेच्या ग्राहक सेवा क्षेत्रात सुधारणा, मोबाईल बँकिंगचा वापर, कर्जवाटप प्रक्रियेतील गतिमानता यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. नव्या संचालक मंडळाच्या हाती बँकेच्या कारभाराची सूत्रे आली आहेत. यावेळी बँकेपुढे काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत – सर्वसामान्य ग्राहकांना बँकेच्या मुख्य प्रवाहात आणणे, नवीन शाखा सुरू करून ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणे, एनपीएचे प्रमाण कमी करणे व कर्ज वसुलीचा वेग वाढवणे, डिजिटल बँकिंग प्रणालीला अधिक मजबूत करणे, महिला बचत गट व तरुण उद्योजकांना प्राधान्य देणे, बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम बनवणे. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नवे नेतृत्व सक्षम आणि सज्ज आहे. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याचे विशिष्ट योगदान, अनुभव आणि तज्ज्ञता असून बँकेचा समतोल विकास साधण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली याबद्दल सभासद आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बँकेचे नियमित सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच विविध समाजघटकांनी अतुलभाऊ संघवी व प्रशांतभाऊ अग्रवाल यांचे अभिनंदन करत, बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दि पाचोरा पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने दाखवलेला विश्वास, बिनविरोध निवड झालेल्या चेअरमन व व्हा. चेअरमनचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमतेचा लौकिक यामुळे बँकेपुढील पाच वर्षांचा कार्यकाळ हा निश्चितच आर्थिक सशक्तता, पारदर्शक कारभार आणि जनतेशी निष्ठा यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अतुलभाऊ संघवी आणि प्रशांतभाऊ अग्रवाल यांच्यासारख्या अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली पाचोरा पीपल्स बँक आणखी यशाचे शिखर गाठेल, अशी जनतेची खात्री आणि अपेक्षा आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरांतून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रेरणादाई उपस्थितीत हजारो शिवभक्तांचा सहभाग..!

0

Loading

पाचोरा : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने एक आगळावेगळं, भक्तिपर, सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमांची संपूर्ण रूपरेषा ‘समाजासाठी समर्पित शिवसेना’ या संकल्पनेवर आधारलेली होती. या उपक्रमांमध्ये एकीकडे अध्यात्मिक आधारे जनजागृती घडवून आणली गेली, तर दुसरीकडे पर्यावरण जपण्यासाठी वृक्षारोपणासारख्या कृतीद्वारे हरित संस्कृतीचा संदेश पोहोचवण्यात आला. या सामाजिक-धार्मिक उपक्रमांना शिवसेनेच्या मातृशक्तीचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या नेत्या मा. वैशालीताई सूर्यवंशी यांची प्रेरणादायी व सक्रिय उपस्थिती लाभली. त्यांच्यासह युवा नेतृत्व करणारे मा. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी देखील यात उत्साहाने सहभाग नोंदवत जनतेशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिवसैनिक, पदाधिकारी व सामान्य नागरिक यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या भव्य उपक्रमाची सुरुवात एक अत्यंत भक्तिपर आणि मंगलमय वातावरणात झाली. पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक महादेवाचे बांबरुड येथील श्री महादेव मंदिरात सकाळी मंगल वाजंत्री, शंखध्वनी आणि हर हर महादेवच्या जयघोषात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी एकमुखाने प्रार्थना केली की, उद्धवजी ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय प्रगतीचा मार्ग खुला व्हावा! या आरतीमुळे परिसरात अध्यात्मिक शांतीचे आणि एकतेचे चैतन्य निर्माण झाले. महाआरतीनंतर सुरू झाली शिवभक्तांच्या परंपरेची आणि श्रद्धेची साक्ष असलेली कावड यात्रा. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना नेत्या मा. वैशालीताई सूर्यवंशी आणि मा. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी स्वतः यात पायी चालत भाग घेतला. त्यांच्या या सहभागाने सर्व उपस्थित शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संपूर्ण यात्रा ही भक्तिभाव, भजन-कीर्तन, डमरु आणि ताशा-ध्वनींनी भारलेली होती. शिस्तबद्ध रांगा, डोक्यावर पवित्र जल असलेल्या कावडी आणि हातात भगवा ध्वज असलेले हजारो शिवभक्त पाहता क्षणीच मनात श्रद्धा आणि अभिमान दाटून येत होता. कावड यात्रेच्या मार्गावर, निर्मल सीड्स समोरील श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याजवळ, हजारो शिवभक्तांना थंड दूध वाटप करण्यात आले. हे दूधवाटप केवळ एक सेवा नव्हती, तर समाजाभिमुखतेची आणि श्रद्धेच्या सेवेसाठीची शिवसेनेची बांधिलकी याचे सजीव उदाहरण होते. हा उपक्रमदेखील मा. वैशालीताई सूर्यवंशी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः राबवला. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक भक्ताशी प्रेमाने संवाद साधत होते, ज्यामुळे परस्पर आदरभाव व आत्मीयता दिसून आली. यात्रेनंतर एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये मा. वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वतः झाडांचे रोप लावून उपस्थितांना पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या या रोपांना समर्पण, संयम आणि संस्कृतीचे प्रतीक मानण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही वृक्षलागवड करून ‘एक झाड, एक जीवन’ ही संकल्पना जनमानसात रुजवली. शिवसेनेने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेऊन केवळ राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी पार पाडणारी संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वृक्षारोपण करताना उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत एकमेकांशी समरसून कार्य करणाऱ्या शिवसैनिकांचे दृढ नातेही या निमित्ताने अधिक बळकट झाले. या प्रसंगी योजना ताई पाटील, मनिषा पाटील, निता भांडारकर, दिपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, पप्पू राजपूत, संदीप जैन, बंटी हटकर, प्रशांत पाटील, बंडू मोरे, चेतन पाटील, गजू पाटील, रतन परदेशी, रमेश पाटील, गोपाल परदेशी, महाजन, पप्पू दादा पाटील, भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, दगडू पाटील, मनोज चौधरी, हरीश देवरे, भूषण पाटील, राजू मोरे, फकिरा पाटील, जितेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे उत्साही योगदान व सहभागाने कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडला. या संपूर्ण उपक्रमामागे एकच मूळ प्रेरणा होती – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याविषयी असलेला आदर, प्रेम आणि विश्वास! त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन शिवसेनेने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय विकासासाठी जो पायाभूत विचार मांडला आहे, तो या उपक्रमांद्वारे साकार करण्यात आला. प्रत्येक उपस्थिताच्या मनात एकच भावना स्पष्टपणे दिसून येत होती – “उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडो!” या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेने एक महत्त्वाचा संदेश दिला – श्रद्धा ही केवळ धार्मिक नसून ती सामाजिक बांधिलकीची जाणीव असते, पर्यावरण संरक्षण हे केवळ सरकारचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, आणि राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजहितासाठी असावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राबवलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून भक्ती, वृत्ती आणि हरित संस्कृती यांचा गजर संपूर्ण मतदारसंघात घुमला. या कार्यक्रमांमधून सामाजिक एकात्मतेची प्रचिती आली, तसेच नागरिकांच्या मनात शिवसेनेच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने आदरभाव निर्माण झाला. या भव्य उपक्रमांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी वेगळं आणि उपयोगी करण्याची प्रेरणा जिथे आहे, तिथेच खरी नेतृत्वाची ओळख ठरते. मा. वैशालीताई सूर्यवंशी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच अनुकरणीय ठरावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. या साऱ्या उपक्रमांचे एकमेव ध्येय होते – शिवसेनेच्या विचारधारेतून समतोल, समरस, आणि समृद्ध महाराष्ट्र घडविणे!

पाचोरा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नियोजनपूर्व बैठक उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भव्य स्वरूपात करण्याच्या दृष्टीने श्री एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे एक महत्वपूर्ण व नियोजनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस.एस. पाटील (उपप्राचार्य, एस.एस.एम.एम. महाविद्यालय) हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जे.पी. बडगुजर, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, तसेच मुख्याध्यापक सुरवाडे सर, मुख्याध्यापक धोनी सर, मुख्याध्यापक पिंजारी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका क्रीडा समितीचे सदस्य गणेश पाटील, एस.के. पाटील, सुभाष राठोड व प्रा. वाल्मीक पाटील हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेच्या निमित्ताने काही नव्या जबाबदाऱ्या आणि नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. गणेश पाटील आणि गजानन सोमवंशी यांची मुख्याध्यापक पदावर नेमणूक झाल्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्याचप्रमाणे चंद्रभान शिंदे यांची RSP (Road Safety Patrol) म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचप्रमाणे महाविद्यालयात स्पोर्ट्स कोट्यातून नुकतीच नियुक्त झालेल्या प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन क्रीडा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे यांचे सामाजिक वास्तव आणि शिक्षणातील क्रीडाविभागाच्या महत्वावर केलेले विचारमंथन. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. तो विद्यार्थ्यांचे केवळ खेळात प्रशिक्षण देत नाही तर शिस्त, टीमवर्क, नेतृत्व आणि परिश्रम या मुल्यांचाही विकास करतो.” त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांची मोबाईलच्या आहारी गेलेली जीवनशैली हा एक गंभीर सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित करत क्रीडा आणि मैदानी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शरीरसंपदा, मानसिक संतुलन व सकारात्मकता निर्माण होते हे अधोरेखित केले. स्पर्धा पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत, असा ठाम आग्रहही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून उपस्थित क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप, नियोजन, प्रक्रिया याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या वर्षी पाचोरा तालुकास्तरावर एकूण १० प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा, खेळाडू आणि संघ नोंदणीसाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.” यामध्ये खेळाडू इम्पोर्ट प्रक्रिया, मागील वर्षाची प्राविण्य प्रमाणपत्रे डाऊनलोड करणे, तसेच प्रत्येक खेळाचे नियम व शिस्तबद्ध संचालन याविषयीचे तांत्रिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन त्यांनी दिले. प्रा. गिरीश पाटील यांनी सर्व शाळांनी आणि महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने नोंदवावा, जेणेकरून सर्व ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणी खेळाडूंना संधी उपलब्ध होईल, असे आवाहनही केले. “क्रीडांगण हीच खरी प्रयोगशाळा आहे जिथे खेळाडू स्वतःला घडवतो, हरतो, जिंकतो आणि आयुष्याला आकार देतो,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या बैठकीला तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांतील क्रीडा शिक्षक आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी अतिशय नेटकेपणाने केले. त्यांनी प्रत्येक मान्यवराला योग्य त्या पद्धतीने बोलते करून कार्यक्रमात सुसूत्रता राखली. तर आभार प्रदर्शन प्रा. वाल्मीक पाटील यांनी करत उपस्थित मान्यवरांचे आणि सहभागी शिक्षकांचे मन:पूर्वक आभार मानले. सभेचा संपूर्ण प्रवास अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. शाळेतील क्रीडा शिक्षक एकत्र येऊन काम करत असल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा सभागृहात जाणवत होती. बैठकीत अनेकांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मोकळेपणाने मांडल्या. एकमेकांच्या सहकार्याने अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. या बैठकीद्वारे केवळ आगामी क्रीडा स्पर्धांचे नियोजन झाले नाही, तर शिक्षकांमध्ये संवाद, सहकार्य आणि सशक्त तालुका क्रीडा यंत्रणा उभी करण्याची चळवळही रुजलेली दिसून आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरावी, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!