मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातील कु. परी रुपेश महाडिक हिने नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या एशियन मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्वल केलं आहे.
परी ही डॉ. गोविंद राजे इंग्लिश मिडियम स्कूल, रोहा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी असून ती गरीब व मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येते. तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून आई गृहिणी आहे. तिची मोठी बहीण दहावीत शिक्षण घेत आहे. चार सदस्यांच्या कुटुंबातून येऊन परीने जिद्द, चिकाटी व सातत्याच्या बळावर ही झळाळती कामगिरी गाजवली आहे. ती खऱ्या अर्थाने उगवती आणि प्रेरणादायी खेळाडू ठरली आहे.
परीने यापूर्वीही विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवले आहे. ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, माणगावच्या जिल्हास्तरीय, धाटावच्या तालुकास्तरीय, दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि आता नेपाळमधील आशियाई स्तरावरील स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकावली आहेत. तिच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे, ही गोष्ट रोहावासीयांसह सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
या सुवर्ण विजयानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ, रोहा शहर महिला विभागाच्यावतीने कु. परी महाडिक हिचा तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. महिला अध्यक्षा दीपा भिलारे, सरचिटणीस अश्विनी पार्टी आणि महिला संघटक प्रिया साळुंके यांनी परीचे मन:पूर्वक अभिनंदन करत तिच्या इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आषाढी वारी म्हणजे भक्तिरसाची गंगाच! वारकरी संप्रदायाच्या या चैतन्यरूपी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी आणि पंढरीच्या द्वारी विठूरायाला भेटण्याच्या ओढीने श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी ‘विठ्ठलमय पर्यावरण वारीत’ रंगून गेल्या.
शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी, आषाढी एकादशी निमित्ताने मराठी विभाग, समाजशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रीन क्लब आणि नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. अल्पा दोशी यांच्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थिनींनी स्वरचित कविता, समूहगायन, नृत्य आणि गाणी सादर करत भक्तिरसात रंग भरले. या सादरीकरणांनंतर मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी “वारकरी संप्रदाय आणि पर्यावरण” या विषयावर विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
त्यानंतर, विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत, तुळशी वृंदावन हाती घेत, टाळ-लेझीमच्या गजरात संपूर्ण महाविद्यालयाच्या प्रांगणात विठूच्या नामस्मरणात हरखून गेलेल्या वातावरणात पर्यावरणाची वारी साकारली. ही वारी अनुभवताना महाविद्यालय परिसर भक्तिभावाने न्हाल्यासारखा भासला.
या विशेष उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना सांगितले की, “संतांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पर्यावरणपूरक वार्यांचे आयोजन महाविद्यालयात होणे ही काळाची गरज आहे.”
कला शाखा प्रमुख व ग्रीन क्लब समन्वयक डॉ. हिना शाह यांनीही विद्यार्थिनींच्या सर्जनशील सहभागाचे कौतुक करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन कु. मनाली मणचेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रश्मी शेट्ये तुपे यांनी केले.
या भक्तिभावाने भरलेल्या कार्यक्रमात आणि पर्यावरण वारीत विद्यार्थिनींसह महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाचोरा – पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी रुजू होताच अवघ्या ३६ तासांमध्ये आपल्या कार्यतत्परतेचा ठसा उमठवत, शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या सकारात्मक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे शहरातील सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत असून, नागरिकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल कुमार पवार हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक तडफदार, निष्ठावान व जनतेच्या सुरक्षेबाबत सदैव जागरूक अधिकारी म्हणून ओळखले जातात. पाचोरा पोलीस ठाण्यात त्यांनी नुकतीच जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी “अवैध हत्यार मुक्त” “रोमिओ मुक्त पाचोरा” आणि “विद्यार्थिनी सुरक्षितता मोहीम” असे विशेष मिशन सुरू केले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणारे, कट्ट्यावर थांबून टवाळक्या करणारे तथाकथित रोमिओ, तसेच परीक्षेच्या काळात मुलींना त्रास देणारे टपोरींना वठणीवर आणण्यासाठी कटाक्षाने निरीक्षण सुरू केले आहे. या कार्यवाहीत त्यांनी स्वतंत्र पोलीस अधिकारी, एक महिला कॉन्स्टेबल आणि प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढवली आहे. शाळा आणि कॉलेज परिसरात सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. दररोज एक महिला पोलीस कर्मचारी व पुरुष पोलीस अधिकारी शाळा व महाविद्यालय परिसरात चोख गस्त घालत असून विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्यही सुरू आहे. पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी सुरुवातीपासूनच स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारी विरोधात त्यांनी ‘झीरो टॉलरन्स’ ची भूमिका घेतली असून, कोणत्याही प्रकारचा त्रास देणारा, टोळीयुद्ध करणारा, सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणारा यांना क्षमा केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आदेश दिले आहेत की, सर्वसामान्य जनतेशी सौजन्यपूर्ण वागावे, त्यांच्या समस्या तातडीने ऐकून घेऊन कायदेशीर मार्गाने मार्गदर्शन करावे. गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सक्रीय करण्यात आले असून, विशेष पथक तयार करून अवैध धंद्यांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणारे, वाहनांवर मॉडिफाइड सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदूषण करणारे, विना परवानगी रात्री उशिरा फिरणारे यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवार यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे पाचोरा शहरात नवीन उर्जा आणि शिस्त निर्माण झाली आहे. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी त्यांनी उचललेले पावले निश्चितच अभिनंदनीय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलीस दल नव्या जोमाने काम करत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आता एक सशक्त यंत्रणा उभी राहत आहे.शहरातील काही ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही अनेक पोलीस निरीक्षक पाहिले, पण अवघ्या 36 तासात राहुल पवार यांनी दाखवलेला उत्साह, तत्परता, आणि नागरी संवाद कौशल्य हे विशेष कौतुकास्पद आहे.” महिला वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या कार्यपद्धती संदर्भात प्राप्त माहितीनुसार गुन्हेगारी प्रवृत्तींना वचक देण्यासाठी कधी वेळप्रसंगी कठोर कारवाई करण्यात येते, तर जनतेला विश्वासात घेण्यासाठी संवाद, समज आणि मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा वापर केला जातो – हे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते – “धाक दाखवणाऱ्या टोळ्यांवर आता धाक निर्माण करणारा एक खंबीर अधिकारी उभा राहिला आहे!” पाचोरा शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करून हा सकारात्मक बदल आणखी भक्कम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच काळाची गरज आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा, मुलुंड (पूर्व) येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिरसपूर्ण आणि उत्साहाने भरलेली दृश्ये पाहायला मिळाली. “आषाढी वारी आली शाळेच्या दारी” या भावसंपन्न घोषवाक्याला साजेसा आनंदोत्सव
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला, विठू नामाचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले, रिंगण घातले आणि फुगड्यांचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाल्यासारखा भासला. या दिंडी सोहळ्यात पालकांनीही उस्फूर्त सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घातली. कार्यक्रमाची संकल्पना साकारण्यासाठी आणि यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता अनभुले तसेच सतीश डोंगरे, मृणाली तावडे, सुरेखा पाटील आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली.
लहानग्यांच्या टाळ-मृदंगाच्या नादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात पार पडलेला हा वारी सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्म, परंपरा आणि संस्कृतीची बीजे पेरणारा ठरला.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आषाढी एकादशी निमित्ताने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र तर्फे एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी वृक्षदिंडी काढण्यात आली. ही वृक्षदिंडी श्री स्वामी समर्थ मठ, सेंट्रल रेल्वे, परळ येथून निघून परळ नाक्यावरील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन समाधानपूर्वक संपन्न झाली. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर चालणाऱ्या या वृक्षदिंडीत वाऱ्याच्या झुळुकीसह हिरवाईचा गंध वातावरणात दरवळत होता.
या दिंडीत ६० ते ८७ वर्षे वयोगटातील सुमारे १६० ते १७५ ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला, हे विशेष उल्लेखनीय. आयुष्याच्या संध्याकाळीही पर्यावरण संवर्धनासाठी आणि भक्तिरसासाठी दाखवलेली त्यांची निष्ठा खरंच प्रेरणादायी ठरली.
दिंडीच्या समारोपानंतर २०० जणांना साबुदाणा खिचडीचे प्रसादरूपाने भोजन देण्यात आले, ज्यामुळे या आध्यात्मिक सोहळ्याला सामाजिकतेचीही सशक्त जोड मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या पुढील पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले: वैशाली शिंदे – उपाध्यक्ष, मोहन कटारे – कार्याध्यक्ष, गोविंद राणे – सचिव, उल्हास हरमळकर – खजिनदार, प्रतिभा सपकाळ – उपसचिव, प्रतिभा सावंत – विश्वस्त, विमल माळोदे – विश्वस्त
तसेच या वृक्षदिंडीमध्ये शिवाजी गावकर, गीता नाडकर्णी, कांतीलाल परमार, रश्मी नाईक, दिलीप मेस्त्री, जगदीश काळे, सुमंगल गुरव, नम्रता पडवळ, स्वाती मयेकर, विष्णू मणियार, सुनिता पारकर, ज्योती काळे, शैलजा काळे, कलबुर्गी ताई, श्री तेलकर, प्रदीप ढगे, आनंद धायफुले, नंदकिशोर आरोंदेकर, दशरथ खमितकर, उदय फणसेकर, भूपेंद्र राठोड, मारुती पेडणेकर आणि लक्ष्मण गोटल या सदस्यांचाही सक्रिय सहभाग होता.
पर्यावरण रक्षणाचा सशक्त संदेश देणारी ही वृक्षदिंडी स्वामी विरंगुळा केंद्राच्या सामाजिक व अध्यात्मिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आणि उत्स्फूर्त सहभागासह यशस्वीरीत्या पार पडली.
जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा माणसाच्या स्वभावातच आहे. प्रत्येकजण आपल्या परीने यशस्वी व्हायचा प्रयत्न करत असतो. कुणी पैसा कमावतो, कुणी प्रसिद्धी, कुणी सत्तेच्या शिखरावर पोहोचतो. पण या सर्व प्रवासात जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर माणूस पोहोचतो, तेव्हा त्याच्या हातात उरलेली शिल्लक ही केवळ आठवणींची, माणुसकीची, प्रेमाची आणि केलेल्या सत्कर्मांचीच असते. याच विचाराला अधोरेखित करत इतिहासातला एक थोर विजेता सिकंदर शेवटी मृत्यूच्या क्षणी सांगतो – “माझे दोन्ही हात शवपेटीतून बाहेर ठेवा, जेणेकरून जगाला कळावे की मी संपूर्ण जग जिंकलं, पण जाताना रिकाम्या हातानेच गेलो.” हे शब्द केवळ शोकांतिक नाहीत, तर ते संपूर्ण जीवनदर्शनाचे गूढ उलगडणारे आहेत. आयुष्य म्हणजे एक गणित आहे, पण हे गणित नेहमीच चुकीचं वाटतं कारण आपण त्यात योग्य चिन्ह वापरत नाही. जीवनात बेरीज करायची असते चांगल्या नात्यांची, सवयींची, गुणांची. वजाबाकी करावी लागते द्वेषाची, मत्सराची, अहंकाराची. गुणाकार करावा लागतो परिश्रमाचा, श्रद्धेचा, संयमाचा आणि भागाकार करावा लागतो अनुभवाचा, ज्ञानाचा, आनंदाचा. पण आपण अनेकदा यात गोंधळ करतो. ज्याची वजाबाकी हवी, त्याची बेरीज करतो. ज्याचा भागाकार हवा, त्याचा गुणाकार करतो. परिणामी, उत्तर नेहमीच मनाविरुद्ध येते आणि आपण म्हणतो, ‘आयुष्याचे गणित चुकले’. पण आयुष्य कधी चुकत नाही, चुकतो तो आपला दृष्टिकोन. अनुभव सांगतो की माणसे पारखताना भावनांपेक्षा निरीक्षणावर, कृतीवर आणि वेळेवर आधारित विचार करावा. चांगल्या दिवसांत सर्वजण जवळ असतात, पण कठीण प्रसंगात कोण उभं राहतं, हेच खरे माणूस ओळखण्याचे कसोटीदर्शक तत्त्व असते. “स्वार्थी लोक फुलासारखे असतात, सुगंध असेपर्यंत जवळ राहतात” – हीच खरी भावना समाजात आजच्या घडीला दिसून येते. म्हणून अनुभवाशिवाय कोणाच्याही शब्दांवर विसंबून चालत नाही. मैत्री असो, नाते असो, व्यवहार असो, अनुभव हेच खरे आरसे असतात. आजच्या भौतिकवादी युगात आपण जग जिंकण्याच्या नादात हृदयं गमावतो आहोत. सामाजिक माध्यमांवर हजारो मित्र आहेत, पण प्रत्यक्ष संकटात फोन उचलणाराही नसतो. एकत्र फोटो काढणारे असंख्य, पण एकत्र दुःख वाटणारे कुठे हरवले? म्हणूनच पैसा कमवला , जग जिंकलं म्हणजे यशस्वी झालो, ही कल्पना चुकीची आहे. खरे यश म्हणजे हृदयं जिंकणे. कोणी एखाद्या वृद्ध मातेला औषधं देऊन तिचा आशीर्वाद मिळवतो, कोणी शेतकऱ्याला शेतीसाठी मदत करून त्याचे आयुष्य बदलतो, कोणी विद्यार्थ्याला पुस्तकं देऊन त्याच्या स्वप्नांना दिशा देतो – हाच खरा विजय असतो. कारण अशा माणसाच्या नावाचा उच्चार करताना डोळ्यांत कृतज्ञतेची नमी दिसते. कधी कधी वाटतं, आयुष्याची किंमत आपण चुकीच्या मापाने मोजतो. पैशाच्या राशीत माणूस शोधतो, पण एकटा पडल्यावर समजतं की माणूस असणं हीच खरी संपत्ती आहे. एक उदाहरण घ्या – एखाद्या गावात श्रीमंत व्यापारी राहतो, त्याच्या घरी गाड्या, नोकरचाकर, ऐशआराम सर्व काही असतं. पण मृत्यूच्या वेळी त्याच्या डोळ्यांत फक्त पोकळी असते, कारण त्याने आयुष्यभर माणसं गमावली. दुसरीकडे एक शिक्षक असतो, ज्याचं स्वतःचं घरही डागडुजीचं असतं. पण त्याच्या शिष्यांनी मिळवलेले यश, समाजात त्याच्याबद्दल असलेला सन्मान, आणि शेवटच्या क्षणी त्याच्या खांद्याला खांदा लावणारे शेकडो हात – ही त्याची खरी संपत्ती असते. यावर एक सुंदर शायरी आठवते “कुछ ऐसा करो कि जाने के बाद भी, लोग तुम्हारे नाम से मुस्कुराएं। दौलत तो सब कमा लेते हैं, मगर दिलों को जीतना सबके बस की बात नहीं।” आपण आपल्या मुलांना किती पैसे देऊ शकलो, याचं मोजमाप समाज करत नाही, पण आपण किती प्रेम दिलं, किती वेळ दिला, किती मूल्य शिकवलं – यावरच त्यांच्या आयुष्याची घडण अवलंबून असते. घरात जेवण असावं, पण प्रेमाचं ताटही वाढलं पाहिजे. शिक्षण असावं, पण संस्कारांची शिदोरी त्याहून महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच आपण ‘संपत्ती’ कमवणं थांबवून ‘संपर्क’ कमवायला हवे. जीवन हे क्षणभंगुर आहे. शरीर सुंदर असो वा कुरूप, धनाढ्य असो वा गरीब – अखेर मृत्यू एकसमानच. यमराज आहे की नाही? स्वर्ग – नरक आहे की नाही हे मला माहीत नाही व कोणी ते पहिले देखील नाही परंतु हे सर्व बघायला मिळते ते मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्याच कर्मभूमीवर कारण शेवटी समाज हे विचारत नाहीत की बँक बॅलन्स किती आहे, ते पाहतात की मनुष्यानं कोणकोणाच्या जीवनात प्रकाश आणला? कोणाची मदत केली? कोणासाठी उभा राहिला? म्हणून माणूस म्हणून जगावं, तेही इतकं ताकदीने की, की मृत्यूही म्हणेल – “अरे, हा जीव अगदी हृदय जिंकून आला!” आपल्या समाजात संतांच्या जीवनाकडे पाहिलं, तर ते कधीच सिंहासनावर नव्हते, पण लाखो हृदयं त्यांच्या पायाशी होती. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव – हे कुणी मोठ्या कॉलेजातून शिकलेले नव्हते, पण त्यांच्या शब्दांनी समाज घडला, हृदयं जिंकली. यामध्येच यशाचं खरं गमक आहे. “जग जिंकल्याचा मोठेपणा काय सांगतो, जर हृदय गमावलं असेल तर? सिंहासन मिळालं, पण नातं हरवलं तर यशाचं काय अर्थ आहे खरं?” जीवनाचं अंतिम सत्य हे आहे की, एक दिवस आपण सगळेच निघून जाणार आहोत. पण आपल्या मागे उरणार आहे ती आपली आठवण. म्हणून ती अशी असावी की, लोक म्हणावे – “हा माणूस खूप काही करून गेला, रिकाम्या हाताने गेला खरं, पण हृदयं भरून गेला.” आपल्याला विचार करावा लागेल की आपण दररोज काय कमावत आहोत – पैसा की प्रेम? पद की प्रतिष्ठा? अहंकार की आत्मसंतोष? कारण यशस्वी होणं हे निव्वळ परिणाम नसून, एक प्रवास आहे – मूल्यांचा, माणुसकीचा, आणि आत्मिक उन्नतीचा. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं – “पैसा हेच जर सगळं असतं, तर मृत्यूच्या क्षणी माणूस रडत नसता. माणुसकी, प्रेम आणि आपुलकी – हीच खरी कमाई असते, बाकी सर्व फसवणूक असते.” जग जिंका जरूर, पण हृदयं हरवू नका. कारण शेवटी जिंकलेली हृदयं हीच तुमचं खरं साम्राज्य असतात. आणि म्हणूनच – “जग जिंकूनही सिंकंदर रिकाम्या हातानेच गेला होता!”
पाचोरा – तालुक्यातील गिरणामाईच्या कुशीत वसलेल्या पुनगाव एक नावाजलेलं गाव. या गावाचा लौकिक केवळ निसर्ग संपन्नतेमुळेच नाही, तर येथे जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून गावाच्या, पंचक्रोशीच्या आणि तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तीमत्त्वांमुळे अधिक आहे. या गावाने अनेक कर्तबगार घडवले, पण यामध्ये एक नाव विशेष उल्लेखनीय आहे – आदरणीय नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील (Mo.9421639025 ) आज त्यांचा वाढदिवस… आणि हीच योग्य संधी आहे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या गुणांचा आणि त्यांच्या शांत, पण ठाम व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेण्याची. एका आदर्श शेतकऱ्यापासून ते एक उत्तम संघटक आणि समाजसुधारक पर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील हे नाव आज पाचोरा तालुक्यात आदर्श शेतकरी म्हणून ओळखलं जातं. शेती ही केवळ व्यवसाय नसून एक जबाबदारी, समाजासाठी उपयुक्त काम असल्याचा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांनी केवळ पारंपरिक पद्धती न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत उत्पादनवाढीवर भर दिला.पुनगाव परिसरात त्यांनी स्वतः शेतात जमीनीच्या परीक्षणापासून ते पीक संरचनेपर्यंत विविध प्रयोग करत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंचनाच्या नव्या पद्धती, ठिबक सिंचन, पीकवापसी, आणि सेंद्रिय शेती यामध्ये त्यांनी स्वतः आदर्श निर्माण केला आणि ते इतरांना शिकवले.नानासाहेब प्रल्हादभाऊ हे सध्या पुनगाव विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांनी या संस्थेचे नेतृत्व आपल्या निस्वार्थ, पारदर्शक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत जबाबदारीने पार पाडले आहे. संस्थेच्या कारभारात शिस्त, नियमितता, आणि सभासदांना वेळेवर सेवा हे त्यांच्या काळातील ठळक वैशिष्ट्य राहिले.ते स्वतः कायम म्हणतात, “संस्थेवर लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर संस्थेला नफा नको, लोकांना दिलासा हवा!” आणि याच तत्वावर त्यांनी संस्था चालवली. आज त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था एक विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जाते जिथे सर्वसामान्य शेतकऱ्याला आधार मिळतो.नानासाहेब प्रल्हादभाऊ यांचं व्यक्तिमत्त्व मनमिळावू, नम्र, आणि सुसंस्कृत आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही अहंकार नाही, अगदी गावातील लहान माणसाशीही ते तितक्याच आपुलकीने बोलतात. त्यांनी कधीही प्रसिद्धीची हाव ठेवली नाही, त्यांना मान-सन्मान हवेत असा आग्रह नाही. उलट कामातून समाधान मिळतं यावर त्यांचा विश्वास.त्यांनी समाजात कधीही भेदभाव केला नाही. कोणत्याही जाती-धर्माच्या माणसाशी ते जसे प्रेमाने वागतात, तसेच ते लोकांच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळेच गावातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम आणि आदर आहे.पुनगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील सोसायटी व गावाच्या विकासासाठी नानासाहेब प्रल्हादभाऊ यांनी सतत प्रयत्न केले. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण अशा मूलभूत गरजांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी अशा शासकीय यंत्रणेशी संवाद साधून गावासाठी सकारात्मक निर्णय मिळवले. त्यांच्या प्रयत्नातून गावात बऱ्याच सुधारणा झाल्या, विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ तरुणांमध्ये एक विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. कुठलाही तरुण नव्या व्यवसायासाठी, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी किंवा कौटुंबिक निर्णयासाठी त्यांच्याकडे सल्ला मागतो. आणि ते सुद्धा वेळ देऊन त्याला समजावून सांगतात, शक्य असल्यास मदतीचा हात देतात.वृद्धांसाठी देखील त्यांचा दृष्टिकोन फारच आदरयुक्त आहे. गावातील ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांना कार्यक्रमात पुढे स्थान देणं ही त्यांची सवयच झाली आहे. त्यामुळे नानासाहेब प्रल्हादभाऊ म्हणजे “सर्वांचे नानासाहेब प्रल्हादभाऊ” अशी ओळख निर्माण झाली आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ यांनी केवळ शेती आणि संस्था यापुरतेच कार्य मर्यादित ठेवले नाही, तर गावातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सक्रीय आहेत. आषाढी एकादशी, हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, होळी, शिवजयंती, व बालदिन यासारख्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतातच, पण आर्थिक मदत आणि व्यवस्थापनात देखील हातभार लावतात.ते वारकरी परंपरेचा आदर राखणारे आहेत. कीर्तन, प्रवचन यामध्ये ते श्रद्धेने सहभागी होतात. त्यांचा विश्वास आहे की अध्यात्म आणि समाजकारण हे एकमेकांना पूरक असावे.त्यांचे कुटुंब म्हणजे गुणांचा संग्रह. मुलांमध्ये त्यांनी शिक्षणाची आवड निर्माण केली. सून, नातवंड यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुटुंबात कोणतीही गोष्ट छुपी नाही – सगळं खुलेपणाने बोलणं आणि एकमेकांची मते ऐकणं हे त्यांच्या घरातील संस्काराचे मूळ आहे.त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्या सामाजिक कार्यात कधी अडथळा ठरत नाहीत, उलट सहकार्य करतात. त्यामुळे नानासाहेब प्रल्हादभाऊ यशस्वी कुटुंबप्रमुख म्हणूनही गावात ओळखले जातात.मृतभाषीक नानासाहेब प्रल्हादभाऊ कुठेही भेटले की ओठावर हसू असते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच प्रसन्नता असते. कोणतीही मोठी समस्या असो, ते शांतपणे ऐकतात आणि शांतपणे मार्ग शोधतात. त्यांचं हे संयमी आणि नम्र वर्तन अनेकांना शिकण्यासारखं आहे.आजच्या काळात अनेकजण केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, पण नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील हे नाव आजही सामूहिक हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तीमत्त्वाचं उदाहरण आहे. त्यांनी “माणसात गुंतवणूक केली तर समाज फुलतो” हे आपल्याला दाखवून दिलं आहे.आज नानासाहेब प्रल्हादभाऊ यांचा वाढदिवस. पण तो केवळ शुभेच्छांचा, फुलांचा आणि केकचा कार्यक्रम नाही – तो त्यांच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.आदरणीय नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देताना, आपण सगळेच त्यांच्या कार्याला सलाम करतो. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, दीर्घायुषी जीवन लाभावं आणि त्यांचं अनुभवसंपन्न मार्गदर्शन आपल्याला पुढील अनेक वर्षं लाभत राहावं, हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी एवढेच “मितभाषी स्वभाव आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे, शेतकरी ते समाजसुधारक हा प्रवास पूर्ण करणारे – नानासाहेब प्रल्हादभाऊ यांच्या जीवनाची हीच खरी ओळख आहे.”
पाचोरा- शहरातील देशमुखवाडी भागातील ‘विघ्नहर्ता मेडिकल’चे संचालक निशिकांत साळुंखे (प्रसिद्ध नाव नंदू दादा) यांचे दिनांक 6 जुलै 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. निशिकांत साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात औषध व्यवसायात कार्यरत होते. ‘विघ्नहर्ता मेडिकल’ या नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार, गरजू रुग्णांना वेळोवेळी दिलेला वैद्यकीय सहाय्य, आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली मदत या गुणांमुळे ते संपूर्ण परिसरात लोकप्रिय होते. ‘नंदू दादा’ या नावाने ते तरुणांमध्ये विशेष ओळखले जात असत. त्यांच्या निधनामुळे पाचोऱ्यातील व्यापारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत शोकसंदेश दिले आहेत. त्यांच्या निधनाने वैद्यकीय व्यवसायात एक प्रामाणिक, परिश्रमी आणि माणुसकी जपणारा चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. साळुंखे कुटुंब हे पाचोऱ्यात शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असलेले घराणे असून नंदू दादा हे अनेक उपक्रमांमध्ये अग्रभागी राहून मदतीस तत्पर असायचे. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. कोणत्याही प्रसंगी ते आपलेपणाने लोकांच्या मदतीला धावून जात असत. त्यांच्या जाण्याने साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 07 जुलै 2025 रोजी, सोमवार, सकाळी 10.30 वाजता त्यांच्याच राहत्या घरून पुनगाव रोडवरील आशीर्वाद ड्रीम सिटी येथून मार्गस्थ होणार आहे.
पाचोरा – शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि CG Nephrocare & Dialysis Center यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पाचोरा सेंट्रल येथील APMC कंपाउंडमधील पहिल्या मजल्यावर दुपारी ३ वाजता उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते या सेवाभावी आरोग्य उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याची स्तुती केली. विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे डायलेसिस सेंटर पाचोरा तालुक्यातील एकमेव आणि सर्वाधिक सुविधा असलेले केंद्र असून ते संपूर्णपणे मोफत आहे. अत्याधुनिक यंत्रणा, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास तत्काळ सेवा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांना आता मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद सारख्या शहरांत जाण्याची गरज राहिलेली नाही. या कार्यक्रमाला पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाची शान वाढवली. विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, डॉक्टर्स, पत्रकार, नगरसेवक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती उत्स्फूर्त आणि भावनिक होती. उपस्थित सर्वांना या डायलेसिस सेंटरची सविस्तर माहिती देण्यात आली. उद्घाटनानंतर डायलेसिस तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाचोरा आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसंबंधी तपासण्या आणि सल्ला यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात रुग्णांना योग्य आहार, जीवनशैली, औषधोपचार पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवल्यास किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाचे संरक्षण होऊ शकते” असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले. CG Nephrocare & Dialysis Center ही संस्था देशभरात आरोग्य सेवेत अग्रेसर असून, त्यांनी अनेक राज्यांमध्ये दर्जेदार डायलेसिस सेवा सुरू केली आहे. आता पाचोरा शहरात त्यांनी अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाची सेवा पोहोचवली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही शहरी भागासारख्या सुविधा मिळणार आहेत. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “स्वतःला आरोग्यसेवेसाठी वाहून घेतलेल्या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत हे सेंटर सुरू करून गरजूंसाठी खऱ्या अर्थाने पाचोरा शहरात आणखी एक वरदान निर्माण केले आहे. ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून गरिबांसाठी दिलासा देणारी एक आशा आहे.” त्यांनी केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात अशी केंद्रं उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “आरोग्याची काळजी घेणं म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्राची सेवा करणं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले, “गावागावातून रुग्ण मोठ्या शहरांमध्ये प्रवास करत असतात. त्यात वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण विघ्नहर्ता हॉस्पिटलने हे सगळं पाचोऱ्याच्या दारात आणलं आहे. हे आरोग्यदूतच आहेत.” त्यांनी रुग्णांच्या भावना समजून घेत, समाजहिताची दृष्टी ठेवून केलेल्या कार्याची प्रशंसा केली. या उद्घाटन सोहळ्याला काही कारणास्तव संजयदादा गरुड उपस्थित नव्हते मात्र ते संस्थेच्या परिवारातील ज्येष्ठ आणि पूजनीय सदस्य आहेत, म्हणून त्यांच्या शुभाशीर्वादांचे महत्त्व कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तर्फे बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “आरोग्य हीच खरी सेवा या तत्त्वाला अनुसरूनच आम्ही हे केंद्र उभारले आहे. गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आरोग्यसेवा परवडणारी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो.” संस्थेच्या वतीने पुढेही अशी सामाजिक सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यापासून ते तपासणी शिबिरापर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विशेष उल्लेखनीय ठरला. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होत्या. “माझे वडील दर आठवड्याला बाहेरगावी डायलेसिससाठी जात होते. आता घराजवळच मोफत सुविधा मिळाल्याने आमच्यावरचा खर्च आणि मानसिक त्रास खूपच कमी होईल,” असे एका रुग्णाच्या मुलाने सांगितले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, व्यवस्थापन आणि CG Nephrocare टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन, स्वागत, माहिती सेवा, तपासणी शिबिराचे आयोजन इत्यादी साऱ्याच बाबतीत उत्कृष्ट समन्वय दिसून आला. या डायलेसिस सेंटरबाबत अधिक माहितीसाठी आणि लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 9529428691 किंवा 9096545920 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, www.cgnephrocare.com या वेबसाइटवरूनही सर्व तपशील मिळू शकतो. विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि CG Nephrocare यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेले मोफत डायलेसिस सेंटर ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून ती सामाजिक बांधिलकीचा आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श ठरली आहे. पाचोरा शहरातील गरजूंना आता आपल्या गावातच उपचार मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा एक वरदान ठरणार आहे. असेही प्रास्ताविकात डॉ सागरदादा गरुड यांनी बोलताना सांगितले “सेवा परमो धर्म:” या मूल्याची जाणीव या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली असून, पाचोऱ्याच्या आरोग्य क्षेत्रातील ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.